उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
'पुलं', 'पुलं'प्रेम, 'पुलं'प्रेमी
धम्मकलाडू
July 30, 2009 - 9:42 am
संपादक मंडळाशी चर्चा झाल्यानंतर रामायण आणि महाभारताचा काळ ह्या चर्चेतली 'पुलं', 'पुलं'प्रेम, 'पुलं'प्रेमी ह्यांच्यावरील अवांतर चर्चा ह्या चर्चेत हलविण्यात आली आहे. मी संपादक मंडळाचा आभारी आहे.
इथे केवळ ह्याच विषयावर इथे चर्चा करावी. विशिष्ट जातीजमाती, व्य. नि. पाठवण्याची सुविधा नसणे, खरडवही स्वतःहून बंद करता न येणे इत्यादी विषयांवर इथे चर्चा करू नये, ही विनंती.
दुवे:
Comments
अवांतर
पुलंची पुस्तके वाचून अनेकदा हसू येते हे जरी खरे असले, तरी 'पुलंची पुस्तके वाचून हसू येते' हे त्रिकालाबाधित सत्य नाही.
उदाहरणादाखल, 'पूर्वरंग'मध्ये पुलंनी मांडलेले चिनी लोकांबद्दलचे काही विचार, मते आणि उल्लेख हे आजच्या निकषांवर तपासल्यास ते लिखाण तद्दन racist आहे, असे म्हणावे लागेल. (उदा. सिंगापूरमधील कोणत्यातरी उद्यानातील शिल्प पाहून ते शिल्प 'झुरळाच्या लोणच्याचे अजीर्ण झालेल्या चिन्याच्या दु:स्वप्नातून उतरल्यासारखे' भासण्याचा उल्लेख, चिनी बायकांना होणार्या डुकरासारख्या पिलावळीबद्दलचे उल्लेख, चिन्यांच्या डोळ्यांच्या फटींतून केवळ बिलंदरपणा ओसंडण्याचा उल्लेख, वगैरे. उदाहरणे आठवणीतून दिली आहेत; शब्दयोजना तंतोतंत मुळाबरहुकूम नसण्याची शक्यता आहे. गरजूंनी मूळ लिखाण तपासून पहावे.) असे लिखाण आजमितीस वाचून हसू न येता, एके काळी आपण असे लिखाण वाचून हसू शकत होतो, आणि चिनी लोकांबद्दल काहीही वैयक्तिक अनुभव नसतानासुद्धा अशा लिखाणास केवळ ते 'पुलंचे आहे' एवढ्याच निकषावर नुसते मानाच डोलावू शकत होतो नव्हे, तर डोक्यावरही घेऊ शकत होतो, हे लक्षात येऊन स्वतःचीच लाज वाटते.
(असे महाराष्ट्रात मोठ्याने म्हटल्यास लोक येड्यात तरी काढतात किंवा तुटून तरी पडतात, हा मुद्दा पूर्णपणे वेगळा.)
पु.लंना नावे ठेवायची फ्याशन
याच प्रतिक्रियेवरून असं नाहि पण यासारख्या अनेक प्रतिक्रीया गेल्या काहि दिवसांत माझ्या वाचनात येत आहेत. हे माझे वाचन वाढल्याचे लक्षण आहे का हल्ली पु.लंना नावं ठेवली की आपले विचार प्रगल्भ झाले असा (गैर)समज वाढीस लागतो आहे?
ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव
(गैर)समज
काही हळव्या पुलंप्रेमीना चिमटे घेतल्यास ते (हळवे पुलंप्रेमी) पुलंना नावं ठेवल्याचा कांगावा करतात असा (गैर)समज बहुधा वाढीस लागतो आहे. तुमच्या वाचनात आलेल्या प्रतिक्रिया द्याव्यात.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
सहमत
भारतीय नागरीकांचा एक मुलभुत गुण मराठी वाचकांमध्ये न शोधता सापडतो तो हाच. व्यक्तिपुजा.
चिमटे काढणारे वाढले की पुलंना नावे ठेवणे ही हल्लीची फॅशन बनत चाललीये वगैरे नक्कीच सुरु होते. पुलं एक महान कलाकार होते हे मान्य. अरे पण भारतात जिथे लोकं गांधीजींना सोडत नाहीत तिथे पुलं तर फक्त महाराष्ट्रापुरते. चिमटे एवढे मनावर काय घ्यायचे?
फॅशन नाही
पु.लं ना नावे ठेवण्याची फॅशन असलीच तर ती आता फार जुनी झाली आहे असे म्हणावे लागेल. नेमाडे, जी.ए. यांनी पु.लं.ची पुरेशी सालटे काढली आहेत. मला वाटते प्रश्न फक्त पु.लं चा नाही. कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीला तात्काळ एका फ्रेममध्ये घालून त्याभोवती आरती ओवाळण्याची घाई करण्याचा आहे. पु.लंचे बरेच साहित्य वाचनीय, मनोरंजक आणि 'चांगले' या सदरात मोडणारे आहे हे मान्य केले तरी पु.लंची ओळनओळ ब्रह्मवाक्य असे म्हणण्याचे अगदी अट्टल पुलप्रेमींनाही काही कारण नाही - नसावे. तशी कुणाचीच प्रत्येक गोष्ट निर्दोष नसते. दोस्तोवस्कीवर प्रशंसावर्षाव करणार्या जी.एंनी दोस्तोवस्कीमध्ये पानेच्या पाने चिखल आहे, असे म्हटले आहे. आणि असे म्हणणार्या जी.एं ची 'सांजशकुन', 'पैलपाखरे', 'आकाशफुले' ही पुस्तके चिखलाने लिडबिडलेलीच आहेत. प्रश्न मला वाटते या वस्तुनिष्ठ् राहाण्याचा आहे. आण्णा थोर, आण्णांचे गाणे थोर, मग म्हणून आण्णांच्या मैफलीतला दारु भरलेला पितळी तांब्या थोर असे म्हणण्याचे काहीच कारण नाही. निळूभाऊ थोर, धोंडे पाटील थोर, दिगू टिपणीस थोर, पण 'कथा अकलेच्या कांद्याची' भिकारच!
मुद्दा मला वाटते हाच आहे.
सन्जोप राव
आजपर्यंत मेलो नाही म्हणून यापुढे मरणार नाही, असे नाही. किंबहुना आजपर्यंत मेलो नाही म्हणूनच यापुढे मरणार! - विनोबा
हेच म्हणतो...
त्यात भर...
आमचे संकेतस्थळ भारी... त्याला नावे ठेवणे हि फॅशनच आहे....
अरे हो, आण्णा म्हटलं की हल्ली खुप गोंधळ होतो. जरा डिट्टेलवार लिहिलेत ते बरे झाले नाहीतर हल्ली आमचे आण्णा थोर म्हणवुन घेणारे दुसरे एक आण्णा थोर आण्णा आहेत आणि त्यांचे प्रेमी सुद्धा. काँग्रेसची सत्ता असली कि ते फारशी उपोषणे करत नाहीत. फक्त धमक्या देतात आणि मागे घेतात. ते सुद्धा एक थोर आण्णा आहेत.
नशीब
आता पुलंच्या नशीबातच ते लिहिले आहे त्याला कोण काय करणार?
प्रकाश घाटपांडे
विनोदनिर्मिती
लेख विचार करायला लावणारा आहे. पुलंची वर दिलेली उदाहरणे आजच्या काळात रेसिस्ट वाटू शकतात. विनोदाचे वेगवेगळे प्रकार आहेत. यातील काही विनोदाचे प्रकार सर्वच लोकांना आवडतील असे नाही. या संदर्भात इतर विनोदी लेखक/कॉमेडिअन यांच्याकडे पाहिल्यावर असे आढळते की एखाद्या व्यक्ती, समाज, गट, चालीरीती यांची वेगवेगळ्या प्रकारे टर उडवणे यातून बरेचदा विनोदनिर्मिती झाली आहे. तेव्हा अशी विधाने फक्त पुलंनी नव्हे, तर अनेकांनी केली आहेत. उदा. पहिल्यांदा साइनफेल्ड ही मालिका पाहिली तेव्हा त्यातील विनोदाची पातळी फारच ऑफेन्सिव्ह वाटली होती. यात राष्ट्राध्यक्ष केनेडी यांच्या हत्येपासून ते वंशभेद, हिटलर आणि ज्यू यासारख्या अनेक संवेदनाशील गोष्टींची टर उडवण्यात आली आहे. याची सवय झाल्यावर साइनफेल्ड आवडू लागले. असेच होमर सिम्पसनमध्येही आढळते. (होमर आजही बरेचदा ऑफेन्सिव्ह वाटते.) विशेषत: विनोदनिर्मिती ऑब्झरव्हेशनल कॉमेडी या सदरात मोडत असेल तर बरेचदा अशीच असते. (यात पुल आणि साइनफेल्ड दोन्ही आले.) साइनफेल्डनंतर बर्याच अमेरिकन सिटकॉममध्ये वंशभेदावर विनोद करण्यात आले आहेत.
हसू येण्याबाबत अनुभव असा आहे बरेच विनोदी लिखाण परत वाचताना तितके विनोदी वाटतेच असे नाही. कारण त्यातील 'सरप्राइझ एलेमेंट' निघून जातो. मला पुलंचे काही लिखाण आजही परत वाचावेसे वाटते (गाळीव इतिहास) तर काही लिखाण बर्याच वर्षांमध्ये न वाचूनही परत वाचेन असे वाटत नाही. यात अर्थातच व्यक्तीनुसार बरीच सापेक्षता येऊ शकते.
----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson
सहमत
सहमत
(वार आणि चिमटे यात भेद करणारा)ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव
काही मुद्द्यांचा परामर्श
सहमत. शिवाय, एखाद्या लेखकाचे बहुतांश विनोदी (किंवा इतर प्रकारचेही) लिखाण आवडले, म्हणजे सगळेच आवडेल, असेही नाही.
कदाचित शक्य आहे. परंतु मूळ प्रतिसादात उल्लेखिलेल्या विशिष्ट (specific अशा अर्थी) विधानांत काही विनोदी आहे, असे निदान मला तरी वाटत नाही. (ही विशिष्ट विधाने काहीशी टोकाची, आणि अशी अनेक विधाने परस्परसान्निध्यात आल्यामुळे काहीशी अतिरेकी आणि काहीशी चिनी लोकांबद्दलच्या पूर्वग्रहांतून किंवा सुप्त आकसातून निर्माण झाल्यासारखी वाटतात. अर्थात हा पु.लं.च्याच नव्हे, तर तत्कालीन मराठी समाजमानसाचा भाग असू शकेल, हे ज्याअर्थी ती पुस्तके खपली आणि माझ्यासकट बहुतांश लोकांना आवडली, यावरून ओघाने आले. परंतु हे समर्थन होऊ शकत नाही आणि म्हणून आजही ही विधाने विनोद म्हणून ग्राह्य झाली पाहिजेत असेही नाही.)
बाकी पु.लं.च्या विनोदी (आणि गंभीरसुद्धा) लेखनाचा (आणि त्यांच्यातील इतरही कलागुणांचा) मीही चाहता आहे.
हे कशाचेही समर्थन होऊ शकत नाही. पु.लं.चे नाही, आणि इतरांचेही नाही. ('उंदरास मांजर साक्ष' यासच म्हणत असावेत काय? की मला जे अभिप्रेत आहे त्याकरिता दुसरी कोणती म्हण आहे?)
'स्वतःला हसता येणे' हा चांगला गुण आहेच. परंतु कोठला विनोद कोणी केला किंवा कशाची टर कोणी उडवली तर कोणाला कधी आवडू शकेल आणि कोणाला कधी प्रक्षोभक वाटू शकेल हे व्यक्तीवर आणि प्रसंगावर अवलंबून आहे, असे वाटते. दोन शीख व्यक्ती एकमेकांना सरदारजीचे विनोद बिनदिक्कतपणे सांगू शकतील. परंतु तोच सरदारजीचा विनोद एखाद्या शीखेतर व्यक्तीने एखाद्या शीख व्यक्तीस सांगितला, तर तो नेमका कसा घेतला जाईल हे असा विनोद सांगण्यामागील विनोद सांगणार्याच्या हेतूचे त्या शीख व्यक्तीच्या मनातील जे perception असेल, त्यावर बर्याच अंशी अवलंबून राहील.
(काही समांतर उदाहरणे घ्यायची झाली, तर सामान्य अमेरिकन इंग्रजी बोलीभाषेत कृष्णवर्णीयांकरिता काही अपमानास्पद शब्द आहेत. किमानपक्षी सार्वजनिकरीत्या बोलताना ते वापरले जाऊ नयेत असा संकेत आहे. (याचा अर्थ एरवी ते वापरले गेल्यास योग्य आहे असा नव्हे.) अशा काही शब्दांचा वापर कृष्णवर्णीयांत एकमेकांचा उल्लेख करण्यासाठी, एकमेकांना हाक मारण्यासाठी वगैरे सर्रास केला जातो. बर्याचदा अशा शब्दांबरोबर एखादी शिवीही आपोआप जोडून येते. अर्थात हे योग्य आहे असे नाही, परंतु अनेकदा असा उल्लेख करणार्यास किंवा ज्याचा उल्लेख केला जात आहे त्यास त्याचे काहीही वाटत नाही. मात्र कृष्णवर्णीयांखेरीज कोणीही असा शब्द वापरल्यास ते अपमानकारक मानले जाते. किंवा दुसरे उदाहरण घ्यायचे झाल्यास, महाविद्यालयीन वसतिगृहांत वगैरे अनेकदा एकमेकांचे चांगले मित्र असणार्या दोन व्यक्ती एकमेकांना हाक मारतानासुद्धा आईमाईवरून शिव्या देऊन मारताना दिसतात. दोघांनाही त्याचे काही वाटत नाही. मात्र तिसर्या एखाद्या असंबद्ध व्यक्तीने अशी शिवी दिल्यास ते तितके kindly घेतले जात नाही.)
अर्थात, टर कोणी उडवली किंवा टीका कोणी केली याबरोबरच टर कशाची उडवली किंवा टीका कशावर केली यावरही टर किंवा टीका कशी घेतली जाईल हे बर्याच अंशी अवलंबून असावे, हा आणखी एक पूर्णपणे वेगळा आणि काहीसा अवांतर मुद्दा. उदाहरणार्थ, पु.लं.च्या केवळ एखाद्या विशिष्ट लिखाणावर मुद्द्यास धरून केलेली टीकाही एखाद्या कट्टर पु.ल.-प्रेमीस रुचणार नाही. परंतु नाना फडणविसावर केलेली मुद्देसूद (आणि रास्त) टीका किंवा पहिल्या बाजीरावाची किंवा पेशवाईची उडवलेली (मवाळ, आणि म्हणूनच अनाक्षेपार्ह, परंतु तरीही अकारण) खिल्ली यांबद्दल त्याच्या मनात तेवढ्या तीव्र भावना उमटतीलच, असे नाही. अर्थात, हे व्यक्तिसापेक्ष आहे. (आणि नैसर्गिकही आहे. त्यात निश्चितपणे काही आक्षेपार्ह आहेच, असा माझा दावा नाही.)
(व्यक्तिशः माझ्यापुरते बोलायचे झाले, तर मी स्वतः बर्यापैकी कट्टर पु.ल.-प्रेमी असलो, तरी पु.लं.वर कोणी टीका केल्याने मला फारसा त्रास होत नाही. (नाही म्हणायला 'आहे मनोहर तरी' फारसे झेपले नव्हते हे मी कबूल करतो, परंतु त्यातील मुद्द्यांपेक्षा त्यातील बर्याच मजकुराच्या relevanceबद्दलच्या प्रश्नांमुळे ते खटकले होते. आणि अर्थात तेही व्यक्तिसापेक्ष असू शकते हे मी आगाऊ मान्य करतो.) आणि बाजीराव, नाना फडणवीस, राघोबादादा किंवा एकंदरच पेशवाईतील इतर मातब्बर मंडळी ही तर बोलूनचालून ना माझ्या जातीची, ना पातीची (ही 'पात' नेमकी काय असते याबद्दल मला निश्चित कल्पना नसली तरीही); गावकरी म्हणूनही मला त्यांच्याबद्दल काही विशेष प्रेम किंवा आस्था नाही, आणि पेशवाईचा मी फ्यान नाही. शिवाय पेशव्यांनी माझ्या कोणत्याही पूर्वजाला कोणतेही इनाम दिलेले नसल्याकारणाने आणि पेशव्यांच्या घराण्यात निदान माझ्या माहितीत तरी माझ्या कोणत्याही पूर्वजाचे विवाह-(किंवा विवाहबाह्य-)संबंध नसल्याने पेशव्यांशी माझे इतरही कोणत्या प्रकारचे लागेबांधे नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कोणी टीका केली किंवा त्यांची टर उडवली, तरी माझ्या अंगाला भोके पडू नयेत. टीका रास्त असेल, तर ती मी मानू शकतो. नसेल, तर जेथे शक्य आहे तेथे मुद्देसूद प्रतिवाद करू शकतो. नाहीतर सोडून देऊ शकतो. आणि टर (कोणाचीही) उडवली, आणि एकांगी किंवा अनाठायी वाटली, तर उलटी टर उडवून टोलवून देऊ शकतो. किंवा अगदी फारच आक्षेपार्ह वाटली, तर सरळसरळ आक्षेप नोंदवू शकतो. किंवा सोडून देऊ शकतो.
नक्की माहीत नाही, आणि स्वतःचीच टिमकीही वाजवायची नाही, परंतु प्रगल्भता, प्रगल्भता म्हणतात ती हीच असावी काय?)
बराचसा सहमत, परंतु यात 'सरप्राइझ एलेमेंट' हाच घटक नेहमी कामी येईल असेही सांगता येत नाही. कधीकधी 'सरप्राइझ एलेमेंट' न राहतासुद्धा एखादे लिखाण पुन्हापुन्हा वाचावेसे वाटू शकते, तर कधीकधी 'सरप्राइझ एलेमेंट' राहूनही एखादे लिखाण पुन्हा वाचावेसे वाटणार नाही. चांगले उदाहरण चटकन आठवत नाही, पण प्रयत्न करायचाच झाला, तर 'माझे खाद्यजीवन' किंवा 'तुझे आहे तुजपाशी'मध्ये खरे तर आता 'सरप्राइझ एलेमेंट' असा राहिलेला नाही. परंतु ते मी पुन्हापुन्हा वाचू शकतो. उलट 'तीन पैशाचा तमाशा' वाचलेले आणि एकेकाळी पाहून आवडलेले आणि संग्रहीही असले, तरी बर्याच वर्षांत न वाचल्यामुळे पूर्णपणे विसरलेले असल्याकारणाने 'सरप्राइझ एलेमेंट' म्हटले तर आहे, पण तरीही पुन्हा उघडावेसे वाटत नाही. 'व्यक्ती आणि वल्ली' किंवा 'गणगोत'मधील व्यक्तिचित्रांबाबत काहीसे असेच; फारशी आठवत नाहीत, त्यामुळे 'सरप्राइझ एलेमेंट' थोडाफार टिकून आहे, पैकी काही पुन्हा वाचावीशी वाटतील तर काही उघडूनही बघण्यात रस वाटणार नाही.
पु.लं.व्यतिरिक्त इतर विनोदी प्रकारांबद्दल (यांपैकी सर्वच 'लेखन' या सदरात मोडत नसल्याकारणाने 'प्रकार' या शब्दाचे प्रयोजन.) बोलायचे झाल्यास 'टिनटिन' (Tintin) मालिकेतील कॉमिके एके काळी (शालेय आणि महाविद्यालयीन वयात) पुन्हापुन्हा वाचूनसुद्धा (पुढे काय होणार हे माहीत असले तरी) हसू येत असे; आता तितकी मजा येत नाही. याच्या अगदी उलट 'ऍस्टेरिक्स' (Asterix) मालिकेतील कॉमिकांविषयी. महाविद्यालयीन काळात ओळख झाल्यापासून पारायणे झालेली असली (आणि संपूर्ण संच संग्रही असला), तरी आजही दर वेळेस वाचायला घेतल्यावर अनेकदा त्यात मजा घेण्यासारखे नवीन काहीतरी सापडते आणि पुन्हापुन्हा वाचायला मजा येते. वुडहाउसच्या 'स्मिथ' (Psmith)मालिकेतील कोणतेही पुस्तक आधी अनेकदा वाचलेले असले, तरी मला आजही हसवू शकते, उलटपक्षी वुडहाउसच्याच 'जीव्ह्ज़' (Jeeves) मालिकेतील पुस्तकांनी ती उत्तरशालेय किंवा महाविद्यालयीन वयात वाचायला सुरुवात केली असता जेवढी मजा दिली, तेवढी मजा ती आज देत नाहीत. 'ब्लँडिंग्ज़ कॅसल' (Blandings Castle) मालिकेतील पुस्तके अनेकदा आजही मजा देऊन जातात, परंतु बर्याचदा ते मूडवर (आणि गॅलॅहड - Galahad उर्फ Gally, लॉर्ड एम्ज़वर्थचा धाकटा भाऊ - हे पात्र कथानकात असण्यानसण्यावर) अवलंबून असते. उलटपक्षी 'यूक्रिज' (Ukridge) किंवा 'मिस्टर मलिनर' (Mr. Mulliner) मालिकेतील पुस्तकांनी हसवले नाही असे नाही, परंतु प्रथम वाचली तेव्हा वुडहाउसच्या इतर मालिकांतील पुस्तकांच्या मानाने तितकीशी न आवडल्याने पुन्हा उघडावीशी वाटत नाहीत.
अर्थात, हे सर्व व्यक्तिसापेक्ष आहे, हा भाग आहेच.
(अवांतर: 'मी कट्टर पु.ल.-प्रेमी आहे' आणि 'आम्हाला नॉन-व्हेज/फिश/बीफ खायला आवडते' या दोन विधानांत मला अर्थाअर्थी फारसा फरक जाणवत नाही. 'नॉन-व्हेज', 'फिश' किंवा 'बीफ' या सरसकट संज्ञा झाल्या. त्यामुळे या क्याटेगरीत मोडणारे काही किंवा बहुतांश प्रकार एखाद्याला आवडले, तरी सगळे आवडतीलच किंवा आवडलेच पाहिजेत, असे काही नसते. आणि जे आवडत नाही ते आवडत नाही असे म्हणायला काहीही अडचण नसते. किंवा इतरांस न आवडण्यास काही प्रत्यवाय असण्याचेही कारण असते. मला मटणाचा रस्सा किंवा तंदूरी चिकन किंवा साल्मनची (रावस? चूभूद्याघ्या.) किंवा मॅकरेलची (बांगडा? पुन्हा चूभूद्याघ्या.) निगिरी सुशी किंवा साशिमी किंवा मीडियम रेअर फिले मिन्ञों किंवा प्राइम रिब आवडत असेल, पण म्हणजे मला सदर्न डीप फ्राइड ब्रेडेड चिकन आवडेलच असे नाही. किंवा थँक्सगिविंगचा टर्की स्टफिंग आणि ग्रेव्हीसह मी प्रसादतुल्य म्हणून पुन्हापुन्हा मागून आवडीने खाईन, पण इतर दिवशी तोच टर्की मला कागदाच्या लगद्यासमान लागू शकेल आणि टर्कीचे सँडविच खायला आवडणारही नाही. म्याकडॉनल्डातला हॅम्बर्गर आवडणार नाही. एखाद्या ष्टेकहौसातला जाडजूड आणि रसरशीत हॅम्बर्गर आवडेलही. आणि मीडियम रेअर ष्टेक भले मला आवडत असेल, पण एखाद्याने 'ते वातड असते, तोंडात चोथा होतो म्हणून मला आवडत नाही' असे जर मला म्हटले, तर तो गोमातेचा अपमान समजून त्याच्या अंगावर धावून जावेसे मला वाटणार नाही. (आणि तोंडात चोथा होऊ शकतो हे खरेही आहे.) जोपर्यंत मला ष्टेक आवडते यावरून माझ्याबद्दल काही बरीवाईट मते मला ऐकवण्याचा उघड किंवा छुपा प्रयत्न तो करत नाही, तोपर्यंत तसे करण्याचे काही कारण मला तरी दिसत नाही. असो.)
म्हण / शुद्धिपत्र
परामर्शासाठी घेतलेल्या मुद्द्यांपैकी तिसर्या मुद्द्याच्या परामर्शातील या वाक्यसमूहात, 'उंदरास मांजर साक्ष'ऐवजी 'एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारु नये' ही म्हण सयुक्तिक ठरावी, असे श्री. आजानुकर्ण कळवतात.
श्री. आजानुकर्ण यांचे आभार.
शुद्धिपत्र:
शेवटच्या परिच्छेदातील उपरोल्लेखित वाक्य 'किंवा इतरांस न आवडण्यास काही प्रत्यवाय असण्याचेही कारण नसते.' असे वाचावे.
टंकनदोषाबद्दल दिलगीर आहे.
काय?
मीडियम रेअर ष्टेक जर वाताड, तोंडात चोथा????
असे असल्यास आपल्याला रेस्टॉरंट बदलायची किंवा बाजारभावाने टीप द्यायची गरज आली आहे असे नम्रपणे सुचवू इच्छीतो. :-)
समर्थन नव्हे
हे कशाचेही समर्थन होऊ शकत नाही. पु.लं.चे नाही, आणि इतरांचेही नाही. ('उंदरास मांजर साक्ष' यासच म्हणत असावेत काय? की मला जे अभिप्रेत आहे त्याकरिता दुसरी कोणती म्हण आहे?)
इथे हेतू समर्थनाचा नाही. विनोदनिर्मितीसाठी या प्रकारच्या विनोदांचा वापर सर्रासपणे होतो असे म्हणायचे आहे. आता हा वापर योग्य की अयोग्य हे ज्याचे त्याने ठरवावे. एव्हरीबडी लव्हस रेमंड या लोकप्रिय मालिकेच्या एका एपिसोडमध्ये घरात एक कृष्णवर्णीय व्यक्ती येते. त्या व्यक्तीसमोर वंशभेदाचा उल्लेख होऊ नये याची काळजी घेत असताना नकळत (त्यांच्या मते नकळत) प्रत्येक वाक्याला असे उल्लेख होत जातात आणि संपूर्ण एपिसोडमध्ये त्या व्यक्तीचे अपमान होत जातात. हे बघताना सुरूवातीला तिटकारा, कंटाळा आणि शेवटी चीड आली. तरीही ब्याकग्राउंडमध्ये हशा चालू होता. तात्पर्य : कोणती गोष्ट कुणाला विनोदी वाटेल आणि कुणाला वाटणार नाही यात इतके वैविध्य आहे की त्या बाबतीत सर्वसाधारण विधान होऊ शकते किंवा नाही याबाबत शंका आहे.
मी कट्टर पुलप्रेमी वगैरे नाही. भक्तही नाही. त्यामुळे पुलंवर टीका झाली तर मला व्यक्तिशः त्याचे काही वाटत नाही. ही (आपलाच शब्द वापरायचा झाला तर) प्रगल्भता मराठी संकेतस्थळांमुळेच (मस) आली आहे हे इथे नम्रपणे नमूद करू इच्छीतो. (मस हा वैराग्याकडे जाणारा एक्सप्रेसवे नसला तरी गेलाबाजार टू लेन हायवे नक्कीच आहे अशा अर्थाचे विधान अस्मादिकांनीच केल्याचे स्मरते.) मसवर लोकप्रिय व्यक्तींवर टीका त्या व्यक्तीचे भक्तगण कोण अहेत आणि त्यांच्याशी आपले संबंध कसे आहेत यावरून होत असते. (का याचे कोडे आजपर्यंत सुटलेले नाही.) एखाद्या सदस्याविरूद्ध काही बोलता आले नाही तर त्याच्या दैवताला झोडपावे अशा प्रकारच्या चर्चा अनेकदा होतात. त्यामध्ये भाग घेणे कधीच सोडून दिले आहे. (प्रस्तुत चर्चेमध्ये विनोदनिर्मिती हा मुख्य मुद्दा असल्याने भाग घ्यावा वाटला.) याचे एक कारण व्यक्तीपूजा हे ही असावे. आपल्या दैवताची प्रत्येक कृती आणि कलाकृती अत्युत्कृष्टच आहे असा अट्टाहास धरला तर आपले दैवतही माणूस आहे याचे विस्मरण होते. मग आमिरचा घजनी टुकार आहे, अमिताभचे असंख्य शिणेमे भिकार आहेत, आरडीने कितीतरी गाण्यात पाश्चात्य गाण्यांच्या चाली जशाच्यातश्या उचलल्या आहेत अशा प्रकारची विधाने भक्तगणांना पचवणे जड जाते. (इथे आमिर, अमिताभ, आरडी मला प्रचंड आवडतात हे नमूद करावेसे वाटते. त्यामुळे हा त्यांच्या भक्तगणांवर छुपा हल्ला नाही याची कृपया नोंद घ्यावी.) कुठल्याही कलाकाराचे/कलाकृतीचे निरपेक्ष मूल्यमापन किंवा त्याबाबत चर्चा मसवर कधीही होऊ शकेल का याबाबत शंका वाटते.
बाकी विनोदी साहित्याबद्दल बोलायचे तर हिचहायकर्स गाइड, यस मिनिस्टर/यस प्राइम मिनिस्टर, वूडी ऍलन कितीही वेळा वाचले तरी पुन्हा वाचावेसे वाटतात. कॉमिक्समध्ये डिलबर्ट, एक्सकेसीडी, पीएचडी कॉमिक्स आवडतात. साइनफेल्ड ठराविक कालावधी गेल्यावर पुन्हा पहावेसे वाटते. फ्रेंड्स बरेच एपिसोड पाहूनही विनोदी कमी, बालिश जास्त वाटते. कलाकारांमध्ये रॉबिन विलियम्स आणि जिम कॅरी यांची स्टँड-अप कॉमेडी अफलातून आहे. हिंदी-मराठीमध्ये सध्या एकही बरा म्हणावा असा विनोदी कार्यक्रम सापडलेला नाही. शेखर सुमनचे टेढी बात ठीक वाटते आहे. (हिंदी-मराठीत 'ये जो है जिंदगी' सारखी निखळ विनोदी सिटकॉम का होत नाही?) असो.
----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson
सलोख्याचे संबंध
ह्याचा अर्थ त्या व्यक्तीच्या भक्तगणांशी सलोख्याचे संबंध असल्यास मसवर त्या लोकप्रिय व्यक्तीवर टीका होत नाही, असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? की उलट? अनेकदा दैवतांवर टीका केल्याने सलोख्याचे संबंध बिघडल्याची उदाहरणेही भरपूर आहेत.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
टीका
ह्याचा अर्थ त्या व्यक्तीच्या भक्तगणांशी सलोख्याचे संबंध असल्यास मसवर त्या लोकप्रिय व्यक्तीवर टीका होत नाही, असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? की उलट?
याबाबत नक्की विदा नाही (!) पण असे होत असावे.
अनेकदा दैवतांवर टीका केल्याने सलोख्याचे संबंध बिघडल्याची उदाहरणेही भरपूर आहेत.
हे अनेकदा बघण्यात आले आहे. आता टीका हे शस्त्र वापरल्याने असे होते की दैवतांचे माणूसपण नाकारल्यामुळे याची कल्पना नाही.
----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson
विनोद आणि आकस
एखाद्या वंशाविषयी आकस बाळगणे आणि त्यांच्यावर विनोद करणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी असाव्यात असे वाटते. वांशिक विनोद करणारी व्यक्ती त्या वंशाविषयी आकस बाळगणारी असते(च ) असे नाही. वांशिक विनोद हे रेशियल स्लर ठरवले गेले तर अमेरिकेतील स्ट्यांड अप कॉमेडी करणार्यांची दुकाने बंद पडतील. वांशिक टिप्पण्या, टपल्या ह्यावर अक्षरशः डझनाने विनोद केले जातात आणि सगळ्याच वंशाचे प्रेक्षक खळखळून हसतात. (जसे की पुलंनी पुणेकर मुंबईकर नागपुरकर मध्ये मारलेल्या टपल्या तिन्ही गावांचे लोक एंजॉय करतात) तेच मायकल रिचर्ड्स् (साइनफिल्ड मधला क्रेमर) या विनोदी नटाने जेव्हा स्टेजवरुन् वांशिक शिवीगाळ केली तेव्हा मात्र लोक भडकले होते आणि तो संकटात सापडला होता.
छान...
छान, माहितीपूर्ण चर्चा. वाचून आनंद वाटला... :)
आपला,
('भारतरत्न' आण्णांचा भक्त, पुलंप्रेमी आणि पितळी तांब्यावर लोभ असलेला) तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!