छायाचित्र : चतुर कावळा

chatur kavla

मुंबईच्या कचरा घेउन जाणार्‍या 'क्लिन् अप' गाडीवरच्या कचर्‍यावर ताव मारणारे कावळे.

कॅमेर्‍याची माहिती:

नोकिया मोबाईल कॅमेरा: न७२

लेखनविषय: दुवे:

Comments

शीर्षक

या छायाचित्रासाठी 'चतुर कावळा'ऐवजी 'गलिच्छ कचरागाडी' हे शीर्षक अधिक सयुक्तिक ठरावे.

या छायाचित्राचा विषय, केंद्रबिंदू किंवा उत्सवमूर्ती कावळा आहे हे चित्राकडे पाहून कोणत्याही प्रकारे सूचित होत नाही. कचर्‍याची गाडी मात्र प्रकर्षाने दिसते.

कावळ्याचे चातुर्यही चित्राकडे पाहून आपोआप सूचित होत नाही.

तसेही या चित्रात दोन कावळे आहेत. पैकी नेमका कोणता कावळा उत्सवमूर्ती आहे?

मी छायाचित्रकलातज्ज्ञ नाही. पण तरीही, दोहोंपैकी एका कावळ्यास चित्राच्या मध्यभागी ठेवून थोडे अधिक झूम केले असता चित्र अधिक परिणामकारक झाले असते काय यावर विचार करत आहे. (परंतु मोबाइल कॅमेर्‍यात हे फारसे शक्य नसावे. तसेही प्रभावी छायाचित्रणासाठी मोबाइल कॅमेरा हे फारसे उपयुक्त उपकरण नसावे.)

तूर्तास या छायाचित्रातील कावळ्यांकडे पाहून आपण या विश्वातील एक नगण्य धूलिकण असल्याबद्दलच्या उक्तीची आठवण येते.

(अवांतर: छायाचित्रकलेतले मला फारसे - किंवा जवळपास काहीच - कळत नाही. परंतु तरीही माझ्यासारख्या अडाण्यालासुद्धा हे छायाचित्र पाहून जे काही वाटले किंवा सुचले, ते प्रामाणिकपणे मांडले आहे. चूभूद्याघ्या.)

सहमत

पर्स्पेक्टिव ह्यांच्याशी सहमत आहे. ह्या चित्रात कावळ्याचे चातुर्य नक्की कसे दिसते ते समजले नाही.

सुंदर चित्र !

>>कावळ्याचे चातुर्यही चित्राकडे पाहून आपोआप सूचित होत नाही.
मला मात्र वाटते की, कावळ्यांना प्रवास करायला कदाचित जे परिश्रम लागतात ते 'गलिच्छ गाडीवर' बसल्यामुळे करावे लागणार नाही. कारण थोड्या वेळाने गाडी कुठेतरी जाईल. कदाचित कावळ्यांना नेमके तिकडेच जायचे असू शकते. त्यामुळे कावळ्याचे चातुर्य आमच्या नजरेस येत आहे.

>>तसेही प्रभावी छायाचित्रणासाठी मोबाइल कॅमेरा हे फारसे उपयुक्त उपकरण नसावे.
मोबाईलवर नोकिया एन-७०, व ७२ वर चांगले फोटो येतात.आपण दाखवण्याचा आग्रह करत असाल तर काही फोटो इथे डकवीन ! :)

सारांश, फोटो चांगला आला आहे, अजून् येऊ द्या. कारण किती हजार शब्दात जो विचार व्यक्त होत नाही ते चित्रातून व्यक्त होते असे म्हणतात. (चुभुदेघे)

-दिलीप बिरुटे

नेमका मुद्दा! / काहीसा असहमत

>>कावळ्याचे चातुर्यही चित्राकडे पाहून आपोआप सूचित होत नाही.
मला मात्र वाटते की, कावळ्यांना प्रवास करायला कदाचित जे परिश्रम लागतात ते 'गलिच्छ गाडीवर' बसल्यामुळे करावे लागणार नाही. कारण थोड्या वेळाने गाडी कुठेतरी जाईल. कदाचित कावळ्यांना नेमके तिकडेच जायचे असू शकते. त्यामुळे कावळ्याचे चातुर्य आमच्या नजरेस येत आहे.

माझा नेमका मुद्दा मांडायला मदत केल्याबद्दल आभारी आहे.

या चित्रातून आपल्याला कावळ्याचे चातुर्य उडण्याचे परिश्रम वाचवण्यात दिसते. लेखिकेला ते ताव मारायला फुकटातला कचरा मिळवण्यात दिसते. आम्हाला मुदलातले कावळेच सांगितल्याशिवाय दिसत नाहीत, त्यामुळे त्यांचे चातुर्यही दिसत नाही.

थोडक्यात, या चित्रात दाखवलेल्या कावळ्यांचे काही चातुर्य आहे ही बाब आणि ते चातुर्य नेमके कशात आहे हा तपशील पाहणार्‍याच्या दृष्टिकोनावर ('पर्स्पेक्टिव') अवलंबून आहे. त्यामुळे, कावळ्याचे चातुर्य चित्राकडे पाहून आपोआप सूचित होत नाही असे अजूनही वाटते.

उलट, अधिक निरीक्षणाअंती, आणि थोडा दूरदृष्टिपूर्वक विचार केला असता, यात कावळ्याचे चातुर्य नसून आत्मघातकी मूर्खपणा असावा असे वाटू लागते.

१. या गाडीला लायसेन्स प्लेट नाही. पुढच्या चौकात पोलिसाने पकडले असता ट्रकचा ड्रायवर ती लायसेन्स प्लेट 'काऊने नेली' म्हणून पाठीमागे बसलेल्या कावळ्यांकडे अंगुलिनिर्देश करू शकतो, आणि त्यातून कावळ्यांवर हकनाक चोरीचा आळ येऊ शकतो. त्याहीपुढे, पोलिसाने पकडण्यापूर्वी उडून जाण्याचा प्रयत्न केला असता गुन्हा करून फरारी होण्याचा आरोपही लागू होऊ शकतो. एकंदरीत कावळे कायद्याच्या वाईट कचाट्यात सापडू शकतात.
२. चित्रातील गाडीची टायरे धूसर किंवा बर्‍यापैकी गुळगुळीत दिसतात. याचा अर्थ एक तर ही टायरे झिजलेली असावीत, किंवा गाडी चालू असल्यामुळे - आणि चाके फिरत असल्यामुळे - धूसर आली असावीत. परंतु एकंदरीत गाडी आणि कावळेसुद्धा धूसर न येता बर्‍यापैकी सुस्पष्टपणे उमटलेले असल्याकारणाने गाडी स्थिर आहे असे मानता यावे, म्हणजेच दुसरी शक्यता वगळता यावी. म्हणजेच गाडीची टायरे झिजून गुळगुळीत झाली असावीत. त्यातून रस्ता ओला असावा असे चित्राच्या प्राथमिक निरीक्षणावरून वाटते. (चूभूद्याघ्या.) अशा परिस्थितीत अशा गाडीतून प्रवास केल्यास आणि ड्रायवरला अचानक ब्रेक लावण्याची वेळ आल्यास गाडी घसरत जाऊन कशालातरी धडकून अपघात होण्याचा, आणि प्रसंगी कावळ्यांचा अपघाती मृत्यू होण्याचा धोका संभवतो.

एवढा पुढचा विचार करू न शकणार्‍या कावळ्यांचे चातुर्य नेमके कसे, ते कळत नाही.

कारण किती हजार शब्दात जो विचार व्यक्त होत नाही ते चित्रातून व्यक्त होते असे म्हणतात.

चित्रातून वाटेल त्या हजार शब्दात व्यक्त होऊ शकणारे कोणतेही काहीतरी व्यक्त होण्यापेक्षा लेखकाला अपेक्षित असलेले नेमके व्यक्त होणे महत्त्वाचे. मात्र त्याकरिता चित्रही तेवढ्या दर्जाचे पाहिजे.

काही मुद्दे !

>>चातुर्य नेमके कशात आहे हा तपशील पाहणार्‍याच्या दृष्टिकोनावर ('पर्स्पेक्टिव') अवलंबून आहे.
मुद्दा अगदी मान्य आहे. ...! त्यामुळेच ''चातुर्य चित्राकडे पाहून आपोआप सूचित होत नाही'' हे वाक्य काहीसे अस्पष्ट विचार प्रकट करते असे वाटते.

निरिक्षणांचा उहापोह :
१) गुळगुळीत टायरांवरुन असे वाटते की, महानगरपालिकेची कचरा वाहतूक करणारी ती गाडी असावी असे वाटते. महानगरपालिकेच्या गाडीचा ड्रायव्हर असल्यामुळे तो आपला शासकीय सहकारी आहे, अशा भावनेने पोलीस त्याला पकडणार नाही असे वाटते. मात्र नंबर प्लेट मागच्या बाजूलाच असलीच पाहिजे, असा कायदा सांगत नाही. (चुभुदेघे) मात्र क्रमांक स्पष्ट दिसावेत अशा ठिकाणी नंबरप्लेट लावली पाहिजे, तेव्हा ती नंबरप्लेट समोरच्या बाजूला असावी असे वाटते. त्यामुळे कावळा कायद्याच्या कचाट्यात येण्याची तशी कमी शक्यता वाटते.

२)>>ड्रायवरला अचानक ब्रेक लावण्याची वेळ आल्यास गाडी घसरत जाऊन कशालातरी धडकून अपघात होण्याचा, आणि प्रसंगी कावळ्यांचा अपघाती मृत्यू होण्याचा धोका संभवतो.
महानगर पालिकेतील ड्रायव्हरला अपघात झाल्यानंतर होणार्‍या घटनांची कल्पना असल्यामुळे, जसे, अपघाताची चौकशी , समिती नेमणे, आणि न्यायालयात प्रकरण गेले तर निवृत्तीच्या उंबरठ्यावर त्याचा निकाल लागेल, या भितीने शासकीय कार्यालयातील, महानगरपालिकेतील ड्रायव्हरांचे (इतर ड्रायव्हरांच्या तुलनेत) अपघाताचे प्रमाण कमी आहेत (विदा उपलब्ध नाही, दिलगिरी व्यक्त करतो) असे वाटते त्यामुळे अपघाताची शक्यता तशी कमीच वाटते.


चित्रातून वाटेल त्या हजार शब्दात व्यक्त होऊ शकणारे कोणतेही काहीतरी व्यक्त होण्यापेक्षा लेखकाला अपेक्षित असलेले नेमके व्यक्त होणे महत्त्वाचे. मात्र त्याकरिता चित्रही तेवढ्या दर्जाचे पाहिजे.

पाहणार्‍याच्या दृष्टिकोनावर चित्रांचा दर्जा आणि अर्थ अवलंबून असतो, असे अजूनही वाटते.

धन्यवाद !

-दिलीप बिरुटे

एक बारीक मतभेद

महानगर पालिकेतील ड्रायव्हरला अपघात झाल्यानंतर होणार्‍या घटनांची कल्पना असल्यामुळे, जसे, अपघाताची चौकशी , समिती नेमणे, आणि न्यायालयात प्रकरण गेले तर निवृत्तीच्या उंबरठ्यावर त्याचा निकाल लागेल, या भितीने शासकीय कार्यालयातील, महानगरपालिकेतील ड्रायव्हरांचे अपघाताचे प्रमाण कमी आहेत (विदा उपलब्ध नाही, दिलगिरी व्यक्त करतो) असे वाटते त्यामुळे अपघाताची शक्यता तशी कमीच वाटते.

ओल्या रस्त्यावरून जाणार्‍या गुळगुळीत टायर असलेल्या गाडीला ब्रेक लावल्यामुळे अपघात होण्याच्या शक्याशक्यतेच्या बाबतीत शासनाच्या नियमांपेक्षा न्यूटनसाहेबाचे नियम लागू होतात असे वाटते.

अर्थात, अपघात झाल्यावर त्याची नोंद करण्या-न करण्याच्या बाबतीत शासकीय कार्यपद्धतीचा संबंध येऊ शकतो, हे मान्य. आणि त्यामुळे महानगरपालिकेतील ड्रायवरांकडून होणार्‍या अपघातांचे प्रमाण कमी असल्याचे उपलब्ध विदा दर्शवत असणे सहज शक्य आहे.

पाहणार्‍याच्या दृष्टिकोनावर चित्रांचा दर्जा आणि अर्थ अवलंबून असतो, असे अजूनही वाटते.

सहमत.

आभारी आहे.

'गलिच्छ गाडीवर' बसलेले अवांतर कावळे

मला मात्र वाटते की, कावळ्यांना प्रवास करायला कदाचित जे परिश्रम लागतात ते 'गलिच्छ गाडीवर' बसल्यामुळे करावे लागणार नाही.

प्रा.डॉ., हे तर 'गलिच्छ गाडीवर' बसलेले अवांतर कावळे दिसतात. अशा अवांतरांना येथेही बंदी आहे काय?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

स्वल्पविरामाचे महत्व...

प्रा.डॉ. हे तर 'गलिच्छ गाडीवर' बसलेले अवांतर कावळे दिसतात.

प्रा.डॉ गलिच्छ गाडीवर बसलेले नसून, स्वच्छ सोफ्यावर बसून कावळ्यांबद्दल अवांतर प्रतिसाद लिहित आहेत. :)

>>अशा अवांतरांना येथेही बंदी आहे काय?
विषयाशी संबंधीत अवांतरांना कुठेच बंदी नसेल असे वाटते.
या अवांतरावरुन एका जर्मन लोककथेची आठवण झाली. सर्वच प्राण्यांनी कोंबडीसारखे अंडे दिले पाहिजे, असा आदेश एका राजाने काढला.चिमणी म्हणाली...असो, अवांतर होईल म्हणून आता ती कथा सांगत नाही.

-प्रा.डॉ.दिलीप कावळे

सही!

अवांतर होईल म्हणून आता ती कथा सांगत नाही.
;))
सही सर...!

आपला
गुंडोपंत

शीर्षक

हे चित्र चालत्या गाडीतून काढले आहे. कच र्‍याची गाडीपण चालती आहे. माझे स्वतःचे नाक एका हाताने दाबत (कचर्‍याच्या वासामूळे ) हा फोटो काढला आहे.

चतुर कावळा हे शीर्षक का?

चालत्या गाडीतून प्रवास करत कावळे आपले कामं साध्य करत आहे म्हणून चतुर कावळा हे शीर्षक.
२ कामं :
१) अन्नप्राशन ( जास्त कष्ट न घेता).
२) प्रवास

डोळे ओलावले

वरील चित्र पाहून आमच्या एका जुन्या आवडत्या कै. आयडीची आठवण झाली. ते आयडीधारक असते तर या चित्राचे १००० शब्दांत वर्णन करा असे म्हणाले असते. ;-)

जवळजवळ असेच

मीसुद्धा त्या वादाची आठवण झाल्याचा प्रतिसाद लिहिणार होतो. इतकेच काय, माझे मत हळूहळू बदलू लागल्याचा (आणि आपल्या सर्वांच्या मित्रवर्यांच्या मताकडे सरकू लागल्याचा) कबुलीजबाब देणार होतो.

पण वर श्री. पर्स्वेक्टिव्ह व बिरुटेसरांच्या चर्चेने काही दिशा दिली आहे.

कलानुभवामध्ये कलाकाराच्या कौशल्याचा वाटा कितपत आणि आस्वादकाच्या दृष्टिकोनाचा वाटा कितपत याबाबत चर्चा चालू आहे. ही चर्चा करण्यासाठी वरील चित्र उत्तम नमुना आहे.

सहमत / अवांतर

कलानुभवामध्ये कलाकाराच्या कौशल्याचा वाटा कितपत आणि आस्वादकाच्या दृष्टिकोनाचा वाटा कितपत याबाबत चर्चा चालू आहे. ही चर्चा करण्यासाठी वरील चित्र उत्तम नमुना आहे.

सहमत.

या मुद्द्यावरून प्रस्तुत छायाचित्र, 'हायकू' हा काव्यप्रकार आणि रोरशाश चाचणी यांची (मनोमन) तुलना करण्याचा मोह अनावर होतो. हत्ती आणि सहा आंधळ्यांचे रूपकही आठवते.

अवांतर:

हैदराबादच्या सालारजंग वस्तुसंग्रहालयात (चूभूद्याघ्या) एक शिल्प आहे असे ऐकून आहे. एका बाजूने पाहिले असता ते एका लावण्यवतीचे शिल्प आहे, तर दुसर्‍या बाजूने पाहिले असता ते एका शूर योद्ध्याचे शिल्प आहे, असे काहीसे ऐकल्याचे आठवते.

या शिल्पाबद्दल एक आख्यायिका ऐकलेली आहे, ती या संदर्भात आठवली. ती अशी:

एकदा दोन मित्र (वेगवेगळे) प्रस्तुत वस्तुसंग्रहालय पहावयास गेले असता या शिल्पापाशी त्यांची गाठ पडते. मात्र भेटीच्या वेळी ते शिल्पाच्या परस्परविरुद्ध बाजूंस उभे असतात. एक म्हणतो, "वाहवा! लावण्यवतीचे शिल्प काय अप्रतिम बनवले आहे कलाकाराने!" दुसरा म्हणतो, "काय आंधळाबिंधळा झालास काय? अरे, हे तर एका उमद्या आणि शूर योद्ध्याचे अप्रतिम शिल्प आहे!" पहिला म्हणतो, "काय मला वेड्यात काढायला बघतोस काय?" दुसरा म्हणतो, "नाही, तूच मला मूर्खात काढायला बघतो आहेस!" झाले, दोघेही तलवारी उपसतात आणि दोघांची तेथेच जुंपते. दोघेही घायाळ होऊन मारामारीच्या सुरुवातीला होते त्याच्या विरुद्ध बाजूला पडतात. आणि मग दोघांचे सहज शिल्पाकडे लक्ष जाते आणि दोघांनाही दुसरा कशाबद्दल बोलत आहे ते लक्षात येऊन आपापली चूक कळते. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.

एका वेगळ्या चर्चेच्या संदर्भात, ईश्वराबाबत आपले असेच काहीसे होत असावे काय?

आणि सापेक्षता, सापेक्षता म्हणतात, ती हीच असावी काय?

काऊ कोकताहे

शेरिल काऊ कोकताहे

पैल तो गे काऊ कोकताहे

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

काऊ माझा भाऊ

मार्टिन क्रो आणि जेफ क्रो या दोघा बंधूंना विसरलेले दिसता... तसे ते कोक(ल)त नाहीत म्हणा पण पैल तो गे काऊ ठोकताहे असे म्हणता येईल.

रसेल क्रोही आहेच. :-)

अवांतर:

मार्टिन क्रो आणि जेफ क्रो या दोघा बंधूंना विसरलेले दिसता... तसे ते कोक(ल)त नाहीत म्हणा पण पैल तो गे काऊ ठोकताहे असे म्हणता येईल.

खरेच की. विसरायला नको होते त्यांना. विशेषतः मार्टीन काऊ चांगलाच शैलीदार धडाकेबाज फलंदाज होता.

कावळा

कावळा आणि गलिच्छ कचरा (गाडी) त्याच्यासोबत नव्या ठीकाणी जाणे (कचरापेटीवर) इतकाच संकुचित अर्थ ह्या चित्रात आहे का?

प्रथितयश, यशस्वी/प्रसिद्ध स्त्रीच्या प्रभावाखाली, तिच्या नावाच्या झगमगाटात, ती जेथे जाईल तेथे तिच्या 'बॉय'प्रमाणे फरफटत जाणार्‍या, किंचितसे दुर्लक्षित जीवन जगणार्‍या पुरुषाच्या (उदा. अबोली चित्रपटातील वर्षा उसगावकरच्या पतीचे काम केलेल्या विजय गोखल्यांनी रंगवलेली व्यक्तिरेखा) मनातील हे चित्र असू शकत नाही का?

माझ्या मते, डोक्यात फिट्ट बसलेल्या समाजमान्य अर्थांपलीकडचे विचार करण्याच्या व्यापकतेचा अभाव, हे मी म्हणत असलेल्या टाइपकास्टिंगचे कारण असावे.
(जिज्ञासू)बेसनलाडू

पटले नाही

प्रथितयश, यशस्वी/प्रसिद्ध स्त्रीच्या प्रभावाखाली, तिच्या नावाच्या झगमगाटात, ती जेथे जाईल तेथे तिच्या 'बॉय'प्रमाणे फरफटत जाणार्‍या, किंचितसे दुर्लक्षित जीवन जगणार्‍या पुरुषाच्या (उदा. अबोली चित्रपटातील वर्षा उसगावकरच्या पतीचे काम केलेल्या विजय गोखल्यांनी रंगवलेली व्यक्तिरेखा) मनातील हे चित्र असू शकत नाही का?

प्रथितयश किंवा प्रसिद्ध स्त्रीकरिता कचर्‍याच्या गाडीचे रूपक पटले नाही. मुख्य म्हणजे, आजवर केलेल्या कचर्‍याच्या गाड्यांच्या अल्पनिरीक्षणावरून कचर्‍याच्या गाडीच्या नावाचा झगमगाट असू शकतो असे वाटत नाही. (अर्थात, पुरेशा अनुभवाअभावी ठामपणे बोलू शकत नाही. चूभूद्याघ्या.)

कलात्मक दृष्टी

हो मान्य आहे. पण त्यासाठी कलात्मक दृष्टी असावी लागते.

कचरागाडी हे आणखी एका कचरापेटीकडे नेणारे निव्वळ साधन आहे असे (परावलंबी) कावळ्याच्या पर्स्पेक्टिवमधून पाहिल्यास दिसून येईल. त्यामुळेच हे चित्र म्हणजे त्या (परावलंबी) पुरुषाचेही मनोगत/व्यथा असू शकेल, या शक्यतेचाही जरूर विचार व्हावा.

माझा मुद्दा हाच आहे की रूढार्थाने/सकृतदर्शनी जाणवणारे अर्थ विचारत घेऊन एकदिशा विचारसरणी अवलंबण्यापेक्षा वेगळा विचार जाणवण्यासाठी थोडे कष्ट घेतल्यास उत्तम!

(कलासक्त) बेसनलाडू

आध्यात्मिक?

कचरागाडी हे आणखी एका कचरापेटीकडे नेणारे निव्वळ साधन आहे असे (परावलंबी) कावळ्याच्या पर्स्पेक्टिवमधून पाहिल्यास दिसून येईल.

हे थोडे आध्यात्मिक आहे काय? जन्म-मृत्यू, चौर्‍याऐशी लक्ष योनी वगैरेंच्या फेर्‍यासारखे? हे मुमुक्षूचे मनोगत असावे काय?

अरे पण मग त्या कावळ्याला दोन पंख आहेत ना? मग तो उडून का जात नाही? की 'तुझे आहे तुजपाशी, परि तू जागा विसरलाशी' हेच या चित्रातून समर्पकपणे सुचवायचे आहे?

माझा मुद्दा हाच आहे की रूढार्थाने/सकृतदर्शनी जाणवणारे अर्थ विचारत घेऊन एकदिशा विचारसरणी अवलंबण्यापेक्षा वेगळा विचार जाणवण्यासाठी थोडे कष्ट घेतल्यास उत्तम!

सहमत.

चर्चाचा

कचरा गाडी, कावळा ह्यावर चांगली चर्चा चालु आहे. चालु द्या....

सध्या कचरा उचलणार्‍या घंटा गाडी साठी नाशिक मध्ये १ कोटीची लाच ही चर्चा चांगलीच गाजत आहे. कावळ्याचा त्यात काही सहभाग आहे का?

नक्की सांगता येत नाही

सध्या कचरा उचलणार्‍या घंटा गाडी साठी नाशिक मध्ये १ कोटीची लाच ही चर्चा चांगलीच गाजत आहे. कावळ्याचा त्यात काही सहभाग आहे का?

कावळा बसण्याचा आणि ढलपी तुटण्याचा संबंध तसा पुरातन (आणि सनातन) असल्याकारणाने, कावळ्याचा यातही काही संबंध असण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही.

उलटपक्षी, कावळ्याच्या शापाने गाय मरत नसण्याबद्दलची (किंवा, दुसर्‍या शब्दांत, 'काऊ'च्या शापाने Cow मरत नसण्याबद्दलची) किंवदंताही सर्वश्रुत आहे.

दोन्ही बाजूंकडून येणार्‍या 'पुराव्यां'च्या प्रकाशात, याबद्दल निश्चित असा कोणताही निष्कर्ष काढणे धाडसाचे आहे, असे वाटते.

- (संभ्रमित) पर्स्पेक्टिव.

कावळ्याची आंघोळ

मस्त

कावळ्याच्या आंघोळीचा फोटो मस्तच आला आहे. म्हणजे कावळासुद्धा आंघोळ करतोतर!

असेच

म्हणतो. फोटू आणि व्हिडिओ मस्त.

बाकी इतके निळे आणि स्वच्छ पाणी दिसल्यावर काऊने डुबकी मारली यात नवल नाही.

----

असेच - मस्त

मस्त

(पण हा ग्रॅकल नावाचा पक्षी असावा.)

शक्यता नाकरता येत नाही, पण...

...त्या कचर्‍याच्या गाडीवरील पक्षी तरी कावळाच होता की अन्य कोणी होता, हे नेमके कोण पहावयास गेले आहे?

(कावळा म्हणून खपवून घ्यायला निदान माझी तरी हरकत नाही. (पाहणार्‍याच्या 'पर्स्पेक्टिव'वर अवलंबून असावे, नाही का?))

बाय द वे, आमच्या 'काऊ'ची मंमं:

काय बेटा सुदैवी कावळा आहे!

निळ्याशार पाण्यात कावळ्याला आंघोळ करताना बघून भारी मौज वाटली. हा कावळा तिथलाच (भूमिपुत्र कावळा) की बाहेरून आलेला आहे? माहिती मिळाल्यास आनंद होईल. ममं करतानाची चित्रफितही मस्त बरं का! काय बेटा सुदैवी कावळा आहे!

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

कल्पना नाही

हा कावळा तिथलाच (भूमिपुत्र कावळा) की बाहेरून आलेला आहे?

हा मुळात कावळा आहे की नाही याबद्दल शंका उपस्थित होत असता हा कावळा भूमिपुत्र आहे अथवा नाही हा प्रश्न अप्रस्तुत असावा, असे वाटते.

उलटपक्षी, पर्यटनस्थळी - त्यातही बहुदेशीय पर्यटकांनी गजबजलेल्या स्थळी - सापडल्याकारणाने हा जो कोणी काकसदृश पक्षी आहे, त्याच्या राष्ट्रीयत्वाबद्दलचा प्रश्न रास्त असावा, असेही वाटते. दुर्दैवाने चौकशीअभावी अधिक माहिती उपलब्ध नाही. (तरीही भूमिपुत्र असावा अशी अटकळ आहे.)

कावळा नसला तरी...

मुळात कावळा आहे की नाही याबद्दल शंका उपस्थित होत असता हा कावळा भूमिपुत्र आहे अथवा नाही हा प्रश्न अप्रस्तुत असावा, असे वाटते.

कावळा नसतांना कोणत्या तरी पक्षाला कावळा म्हणून ग्रहीत धरुन केलेली चर्चा चालते, तर यानिमित्ताने कावळा भूमीपुत्र असेल की नसेल हा प्रश्न अप्रस्तुत असण्याचे कारण नसावे, असे वाटते. भूमीपूत्र कावळे तितके काव-काव करीत नाहीत, बाहेरचे कावळे जास्त काव-काव करतात असा एक दिशा देणारा विचार त्यांच्या चिंतनात कदाचित असेल असे वाटते.

स्वगतः (उपक्रमवर अशा कै च्या कै चर्चा करत राहिलो तर एक दिवस वेड नक्की लागेल असे वाटते.)

जागतिक तथ्य

भूमीपूत्र कावळे तितके काव-काव करीत नाहीत, बाहेरचे कावळे जास्त काव-काव करतात असा एक दिशा देणारा विचार त्यांच्या चिंतनात कदाचित असेल असे वाटते.

'आतले' आणि 'बाहेरचे' याच्या व्याख्या पाहणार्‍याच्या 'पर्स्पेक्टिव'वर अवलंबून आहेत, असे सुचवावेसे वाटते. 'बाहेरच्यां'च्या नावाने काव-काव करण्याची (माणसांच्या भाषेत 'खडे फोडण्याची') काकवृत्ती बहुधा जागतिक असावी.

उपक्रमवर अशा कै च्या कै चर्चा करत राहिलो तर एक दिवस वेड नक्की लागेल असे वाटते.

विधानामागील दुर्दम्य आशावाद वाखाणण्याजोगा आहे. मनापासून दाद द्यावीशी वाटते.

ग्रहितके....

'बाहेरच्यां'च्या नावाने काव-काव करण्याची (माणसांच्या भाषेत 'खडे फोडण्याची') काकवृत्ती बहुधा जागतिक असावी.

बाहेरच्यांनाही आतल्यांच्या नावाने काव-काव करण्याची (माणसाच्या भाषेत 'नावे ठेवण्याची')वृत्ती आपोआप येत असावी असे वाटते. अर्थात व्याख्या आणि विचार व्यक्तीच्या 'पर्स्पेक्टिव'वर अवलंबून असते, हे मान्य.

विधानामागील दुर्दम्य आशावाद वाखाणण्याजोगा आहे. मनापासून दाद द्यावीशी वाटते.

धन्यवाद !!!

सहमत

बाहेरच्यांनाही आतल्यांच्या नावाने काव-काव करण्याची (माणसाच्या भाषेत 'नावे ठेवण्याची')वृत्ती आपोआप येत असावी असे वाटते. अर्थात व्याख्या आणि विचार व्यक्तीच्या 'पर्स्पेक्टिव'वर अवलंबून असते, हे मान्य.

दुसर्‍या विधानाबद्दलच्या सहमतीबरोबर पहिल्या वाक्याबद्दलची सहमती ही ओघाने (किंबहुना व्याख्येने) आली. Quod Erat Demonstrandum. असो.

माहिती

काऊच्या आंघोळीच्या चित्र आणि विडियोबद्दल:
माझ्याकडे कॅनन पॉवरशॉट ए७२०आयएस की कोणतासा डिजिटल कॅमेरा आहे. (घरी गेल्यावर पाहून खात्री करून घ्यावी लागेल.)

काऊच्या मंमंच्या विडियोबद्दल:
माझ्याकडे तूर्तास सोनी-एरिक्सनचा डब्ल्यू७६०ए हा मोबाईल फोन आहे. (विस्तृत माहिती: मोबाईल फोनचा रंग लाल आहे.)

अवांतर: काऊचे चित्र आणि विडियो आवडल्यास माझ्याकडे रस्त्यावर भटकणार्‍या भूभूचाही फोटो आहे, तो पुढच्या वेळेस चिकटवावा म्हणतो.

अतिअवांतर: माझ्याकडे कोडॅकचा पी-८५० हा डिजिटल कॅमेरासुद्धा आहे. त्या कॅमेर्‍याने टिपलेली छायाचित्रे अथवा चलत्चित्रे चिकटवताना माहिती म्हणून या बाबीचा पुनरुल्लेख जरूर करेन. (विस्तृत माहिती: कॅनन पॉवरशॉट कॅमेर्‍याचा रंग चंदेरी तर कोडॅक कॅमेर्‍याचा रंग काळा आहे.)

आभार

काऊच्या आंघोळीच्या फोटो आणि विडियोमध्ये एखाद्या नटीच्या आंघोळीच्या फोटो अथवा विडियोहूनही अधिक रस घेऊन भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.

आभार मानतो

काऊच्या आंघोळीच्या फोटो आणि विडियोमध्ये एखाद्या नटीच्या आंघोळीच्या फोटो अथवा विडियोहूनही अधिक रस घेऊन भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.

नटीच्या आंघोळीच्या फोटोचा कावळ्याशी काय संबंध ते कळले नाही. कृपया समजावून सांगावे. तसेच, शास्त्रीय काकगायनाचा एखादा विडियो मिळाल्यास उत्तम. रसास्वादासहित हा विडियो आल्यास सोन्याहून पिवळे! भूभूचा विडियोही द्यावा. पण सध्या 'स्वाइन फ्लू'च्या अनुषंगाने एखादा डुकराचा विडियोही दिल्यास अधिक प्रासंगिक ठरेल, असे वाटते.

ह्या चित्रफितींच्या निमित्ताने अतिशय मौलिक अशी (भूमिपुत्र कावळे, उपरे कावळे, दुर्दम्य आशावाद वगैरे) चर्चा घडली. कावळ्याच्या आंघोळीचा व मंमंचा विडियो दिल्याबद्दल एक वाचक म्हणून मी आपले आभार मानतो.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

पोच

नटीच्या आंघोळीच्या फोटोचा कावळ्याशी काय संबंध ते कळले नाही. कृपया समजावून सांगावे.

'उत्सव', 'सत्यं शिवं सुंदरम्' वगैरे चित्रपट पाहिले असल्यास (किंवा किमानपक्षी त्यांबद्दल ऐकले असल्यास) आणि त्यांच्या लोकप्रियतेस कारणीभूत ठरलेल्या विविध घटकांबद्दल जराशीही कल्पना असल्यास 'नटीच्या आंघोळीचे चित्रण' यात अनेक सामान्य प्रेक्षकांस असणारा रस सहजगत्या लक्षात यावा. अशा प्रकारे नटीच्या आंघोळीच्या चित्रणात सामान्य प्रेक्षकांकडून अपेक्षित असलेल्या रसाच्या तुलनेत काऊच्या आंघोळीच्या चित्रणात रसिकांनी दाखवलेला रस अपेक्षेपेक्षाही अधिक होता, एवढेच सुचवायचे होते. येथील वाचकांच्या असामान्य रसिकतेस आणि उच्च अभिरुचीस त्याबद्दल मनापासून दाद द्यावीशी वाटते. (कृपया 'सत्यं शिवं सुंदरम्' या चित्रपटाची प्रस्तुत संकेतस्थळावरील त्याच नावाच्या चर्चेशी गफलत करू नये. त्या चर्चेत असे कोणतेही चित्रण सापडणार नाही, अशी पूर्वसूचना देणे येथे प्रस्तुत वाटते.)

तसेच, शास्त्रीय काकगायनाचा एखादा विडियो मिळाल्यास उत्तम. रसास्वादासहित हा विडियो आल्यास सोन्याहून पिवळे!

अथक प्रयत्न करूनही असे चित्रीकरण करण्यासाठी तूर्तास संधी मिळू शकली नाही याबद्दल आत्यंतिक खेद वाटतो. मात्र अशा संधीच्या शक्य तितक्या मागावर राहण्याचे आश्वासन देऊ इच्छितो. रसिकांचा संतोष हेच आमचे समाधान.

भूभूचा विडियोही द्यावा.

चित्रीकरणाचा विषय असलेल्या भूभूची धावती दृष्टिभेट चालत्या बसच्या खिडकीतून झाल्यामुळे चलत्चित्रीकरणास वेळ मिळू शकला नाही, याबद्दल क्षमस्व. पुन्हा अशी संधी मिळाल्यास जरूर चित्रीकरण करेन आणि रसिकांच्या सेवेसि सादर करेन.

पण सध्या 'स्वाइन फ्लू'च्या अनुषंगाने एखादा डुकराचा विडियोही दिल्यास अधिक प्रासंगिक ठरेल, असे वाटते.

या अत्यंत उत्कृष्ट सुचवणीबद्दल मी आपला आभारी आहे. किंबहुना अशा प्रकारचा एखादा जुना विडियो माझ्या फायलींत चाळल्यास सहज मिळू शकेल असे वाटते. मात्र हा विडियो जुना असल्याने आणि त्यातूनही त्यातील डुकरांना स्वाईन फ्लू झालेला नसण्याची शक्यता अधिक असल्याकारणाने कदाचित तो प्रासंगिक ठरू नये, आणि म्हणून प्रस्तुत ठरू नये, असे वाटते. तरीही योजना विचाराधीन आहे, आणि आगामी प्रकल्पांच्या यादीत शेवटी त्याची भर टाकण्यात आलेली आहे.

ह्या चित्रफितींच्या निमित्ताने अतिशय मौलिक अशी (भूमिपुत्र कावळे, उपरे कावळे, दुर्दम्य आशावाद वगैरे) चर्चा घडली. कावळ्याच्या आंघोळीचा व मंमंचा विडियो दिल्याबद्दल एक वाचक म्हणून मी आपले आभार मानतो.

एखाद्या अतिशय सामान्य गोष्टीतून (उदाहरणादाखल, प्रस्तुत चर्चेतील कचर्‍याच्या गाडीवरील कावळ्यांच्या चित्रातून) अनेकदा आयुष्यातील गहन गूढे उकलत जातात, याची आज आयुष्यात पुन्हा एकदा प्रचीती आली. त्या मूळ छायाचित्राच्या कर्त्रीचे त्याबद्दल मनापासून आभार.

 
^ वर