गुगल क्रोम - काय असेल ?

'क्रोम'

गुगलनी 'क्रोम' ची घोषणा केली आणि एकच हलचल माजवली. कुणाला वाटले की हा हल्ला मायक्रोसॉफ्ट वर आहे त्यांच्या OS चा वाटा कमी करण्यासाठी तर कुणाला वाटले आता अ‍ॅप्लिकेशन्स नंतरची गुगलची ही नवी खेळी आहे data वर कब्जा करण्याची. गुगलने इतकी कमी माहिती (म्हणजे जवळ जवळ नाहीच) उपलब्ध केलेली आहे 'क्रोम' बद्दल की शंकाकुशंकांना नुसते उधाण आले आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने तर्क लढवून काहीतरी विचार मांडतो आहे मग आम्ही तरी त्याला अपवाद कसे असणार ? :)

गुगलने सांगितले की ही प्रणाली 'नेटबुक' म्हणजे कमी शक्तीच्या पण अत्यंत हलक्या आणि प्रामुख्याने प्रवासात वापरल्या जाणार्‍या वैयक्तिक संगणकांसाठी आहे. आता हे संगणक प्रवासातील प्रामुख्याने ई-मेल, चॅट, फोटो, ईंटरनेट ह्यासाठी उपयोगी पडतात. अर्थात त्यांच्यावर इतरही कामे करता येउ शकतील पण त्यांची शक्ती मुळात मर्यादितच असते. (ती तशी मर्यादित असण्याचे प्रमुख कारण म्हणजे वजनाला हलके आणि बराच जास्त वेळ चालणारी बॅटरी). आता अशा संगणकांमधे सध्यातरी XP ही प्रमुख आहे. एवढ्या कमी शक्तीच्या संगणकावर Vista चालणे महा-मुश्किल आणि Linux अजूनही सर्व-सामान्यांच्या पचनी पडलेली नाही - त्यामुळे मायक्रोसॉफ्टचे प्राबल्य अधिक आहे. आता अशा परिस्थितीत गुगलने ह्या 'क्रोम' प्रणालीची घोषणा करताना सांगितले की 'नेटबुक' वर वापरण्याकरिता (प्रामुख्याने) ही बनविली जात आहे. पण नेमकी काय आहे ते अजून गुलदस्त्यातच आहे.

आता हे 'सिक्रेट' शोधून काढण्यासाठी थोडा विचार करुया. गुगलच्या अजून काय सेवा आहेत ? ई-मेल, डोक्युमेंट्स, स्प्रेडशीट्स, फोटो (पिकासा), व्हिडियो (YouTube), मॅप्स, कोड (apps). ह्या सगळ्या सेवांमधे वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल्स साठवायची सुविधा आहे. ई-मेल मधे 7GB आणि पिकासामधे 1GB आणि इतर अशा मिळून साधारण 10GB जागा मोफत मिळते आहे. आता ह्या सगळ्या सेवा कशा चालतात ? म्हणजे फोटो किंवा व्हिडिओ तुमच्या कॅमेर्‍यामधून थेट गूगलकडे जात नाहीत. तुम्ही तुमच्या संगणकावर (hard drive) आधी ते उतरवून घेता आणि मग एक किंवा अनेक गुगलवर चढवता. म्हणजे तुमचा संगणक (आणि hard drive) एका मध्यस्थाचे काम करतो. आणि तुम्हाला मुद्दाम गुगलवर त्या फाईल्स चढवाव्या लागतात. तर माझा असा कयास आहे की 'क्रोम' हा 'मध्यस्थ' बनायच्या विचारात आहे.

म्हणजे थोड उलगडून सांगायच झाल तर - तुमच्या संगणकामधे काही फोल्डर्स आणि त्यात फाईल्स असतात. हे फोल्डर्स तुमच्या संगणकाच्या hard drive मधे साठविलेले असतात. क्रोम मधे 'ही hard drive' ची जागा गुगल घेणार असे मला वाटते आहे. म्हणजे तुम्ही तुमचे सदस्यनाव वगैरे दिलेत (आणि इंटरनेट जोडले असेल) की तुमच्या संगणकावर जे फोल्डर्स आणि फाईल्स दिसू लागतील ते प्रत्यक्षात साठविलेले असतील गुगलच्या स्टोरेजमधे. तिथून ती फाईल 'डाउनलोड' करुन तुमच्याच संगणकावर आहे असा आभास उत्पन्न केला जाईल. म्हणजे वापरकर्त्याच्या दृष्टीने काहीच वेगळे नसणार पण फाईलची साठवणूक मात्र 'क्लाउड' मधे (दुसरीकडेच कुठेतरी) - म्हणजे दुसर्‍या संगणकावरुन सुद्धा तुम्हाला त्याच सदस्यनावाने सगळ्या फाईल्स हाताळता येउ शकतील. संचालन प्रणाली (OS) हे सर्व तुमच्या नकळत घडवून आणेल.

आता प्रश्न येईल की ईटरनेट जोडणी नसेल तेव्हा ? पण त्यासाठी तुमच्याकडे hard drive असणे अपेक्षित आहे. (अर्थात संचालन प्रणाली OS चढवायची असेल (install) तर हार्ड ड्राईव्ह असायलाच हवी पण मग 'off-line' मोड मधे ही प्रणाली काम करेल असा माझा तर्क आहे. म्हणजे जेव्हा जाल जोडणी नसेल तेव्हा तुमच्या हार्ड ड्राईव्ह वर सर्व माहिती राहील आणि जाल जोडणी झाली की सर्व काही Sync केले जाईल 'क्लाऊड' मधल्या साठ्याबरोबर. म्हणजे परत तुम्ही तुमच्या सगळ्या फाईल्स कुठूनही हाताळायला मोकळे. :)

हे सर्व तर उत्तम आहे, पण ह्यात गुगलसाठी काय फायदा ? मला दोन फायदे दिसतात. एक म्हणजे Spread - जेवढे जास्त लोक तुमची उपकरणे वापरतील तेवढी तुमची Bargaining power (महत्त्व) जास्त. दुसरे म्हणजे मायक्रोसॉफ्टच्या ह्या क्षेत्रातील वर्चस्वाला आव्हान. इतरही अनेक फायदे होउ शकतात - गुगलच्याच इतर सेवांबरोबर अधिक चांगली जोडणी (Integration), वापरकर्त्यांच्या सवयी वगैरेंचे अचूक ज्ञान (Usage patterns), इतर सेवादात्यांना एकतर गुगलशी जुळवून घ्या किंवा नामशेष व्हा असा संदेश (Implicit threat) वगैरे वगैरे...

मला वैयक्तिकरित्या उत्सुकता आहे ती दोन गोष्टींबद्दल - एक म्हणजे ही 'क्रोम' प्रणाली Linux वर आधारित असणारे आहे आणि मुक्त-स्त्रोत - म्हणजे हे सर्व त्यांनी कसे केले हे बघायला मिळेल आणि दुसरे म्हणजे त्यांनी जाहिर केल्याप्रमाणे संपूर्णपणे नवे बाह्य रुपडे (new user interface). सध्याच Linux मधे Gnome आणि KDE असे दोन सुंदर पर्याय मिळतायेत - त्यात अजून एकाची भर पडणारे - म्हणजे आमच्यासारख्या 'फुकट्या' लोकांची चांदीच की :)

गुगलसमोर माझ्यामते प्रमुख आव्हाने दोन आहेत - एक म्हणजे हार्डवेअर संलग्नता (compatibility) आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे मूळ (संगणक) निर्माणकर्त्यांची (OEM) ही प्रणाली लोकांपर्यंत पोचवण्याची इच्छा आणि तयारी. आत्ताच Asus, Lenovo, Acer वगैरे मंडळी 'नेटबुक्स' वर खुशीने फक्त XP देतायत - अगदी एखाद्याने मागितलेच तर Linux मिळते तर आता अजून क्रोम कुठून देणार ?

पण एकंदरीत 'फुकट्यां' साठी चांगले दिवस येणार असे दिसतेय - अर्थात गुगल त्याची किंमत कशी वसूल करेल ही भीती आहेच !

Comments

पहायला हवे

अरेच्या, इतके दिवस आम्ही क्रोम म्हणजे न्याहाळक समजत होतो. अजुन थोडे उलगडता येईल का?






आता नवी संचालन प्रणाली सुद्धा

क्रोम हा ब्राउजर् आहेच, आता त्याच नावाने एक नवी संगणक संचालन प्रणाली पण आणताहेत - हा 'दुवा' पहा.

ह्या निमित्ताने, गुगल त्यांचा स्वार्थ कसा साधून घेईल ह्या विषयावर इतरांची मते जाणून घ्यायला आवडेल.

सगळे

सगळे एका माळेचे मणी.
मायक्रोसॉफ्टची उत्पादने वापरायला सोपी म्हणून लोकप्रिय झाली. पण त्यातुन हेतु धंदा हाच आहे. आता गुगल असाच वेगळा दिसणारा मार्ग अवलंबत आहे. तुम्हाला उत्पादन हवे की जाहिरातीसह उत्पादन? यावर सर्व काही अवलंबुन आहे.






स्वागतार्ह

गूगल क्रोम ओएसच्या आगमनामुळे मासॉला उघड आव्हान दिले गेले आहे. गूगलच्या बाबतीत लक्षात घेण्यासारख्या गोष्टी म्हणजे गूगल ग्राहकांच्या सोईचा विचार सर्वात आधी करते. जीमेल किंवा क्रोममध्ये अक्षरशः दररोज होणार्‍या सुधारणांवरून हे दिसून येते. दुसरे म्हणजे यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागत नाहीत. शिवाय प्रणाली मुक्त-स्त्रोत आहे. अर्थातच यात गूगलचा स्वार्थ आहेच. पण गूगलला यातून होणारा नफा प्रत्यक्ष आपल्या खिशातून न जाता जाहिराती, स्टॉक ऑप्शन या द्वारे जाईल. या निमित्ताने मासॉच्या लुटारू वृत्ती आणि बथ्थड कार्यप्रणालींना चांगला पर्याय मिळाला तर नक्कीच स्वागतार्ह आहे.

----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson

गुगल वेव्ह

सहमत आहे! गुगलचे आगामी आकर्षण गुगल वेव्ह विषयी हा व्हिडीओ पहा:

गुगलचा वाढता प्रभाव

गुगलकडे (शिवाय याहू! कडे) म्हणजे अमेरिकेकडे जगभरातील इतका (जवळजवळ सर्व) विदा असणे कितपत सुरक्षित आहे याचा विचार अन्य देशांनी करायची वेळ आली आहे असे वाटते.

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

मला वाटते

गुगलकडे (शिवाय याहू! कडे) म्हणजे अमेरिकेकडे जगभरातील इतका (जवळजवळ सर्व) विदा असणे कितपत सुरक्षित आहे याचा विचार अन्य देशांनी करायची वेळ आली आहे असे वाटते.

पण महत्त्वाचा विदा हा तर वेगळा ठेवला जाणारा प्रकार आहे ना? हा बहुदा जाला वर येते नसतो. त्यासाठी काही वेगळी व्यवस्था असायला हवी उदा. मला माझ्या कराची गोपनिय माहिती खात्याच्या 'आत शिरून' काढता येत नाही. त्याचवेळी मला कर मात्र (आता) जालावरच भरता येतो.

सर्च यंत्राकडे फक्त पत्ते आहेत. आणि ते पत्ते कुणाला कसे द्यायचे याचे तर्कशास्त्र आहे. परंतु त्या पत्त्यावर कुनाला योग्य ठिकाणी अडवले जात असेल तर त्यापुढे जाण्याचा मार्ग कुठे आहे?

निव्वळ 'कुठे काय आहे'
म्हणजे टेलिफोन डिरेक्टरी सारखी माहिती माझ्याकडे
किंवा अजून कुणाकडे असल्याने असा काय फरक पडतो?

त्यांच्या कडून गेली किंवा त्यांनी बंद केली
तर अजून कुणी तरी तत्सम उभे करू शकेतसे वाटते.

या पेक्षा अमेरिकेने तंत्रज्ञान रोखण्याचे प्रकार,
आणि एकतर्फी व्यापाराचे करार जास्त धोकादायक आहेत असे म्हणतो.

आपला
गुंडोपंत

महत्त्वाचा विदा वेगळाच

तुमचे म्हणणे बरोबर आहे गुंडोपंत की महत्त्वाचा विदा वेगळा असेलच आणि तो तसाच्यातसा जालावर चढविलाही जाणार नाही. पण वरकरणी बिन महत्त्वाचा वाटणारा विदा हा कोणाच्या ना कोणाच्या कामाचा असू शकतोच की. म्हणजे तुम्ही समजा एखाद्याला सांगितलेत की अमूक अमूक प्रणाली खूपच चांगली आहे, मी नेहेमी वापरतो तर तुमच्या गूगल मेल मधून गूगलला ही माहिती मिळू शकते आणि ते ती वापरुही शकतात. मला वाटते ऋषिकेश ह्यांना हेच अभिप्रेत असावे.

अर्थात जोपर्यंत आपण फुकट सेवांचा लाभ घेत राहू तोपर्यंत हे असेच चालणार. आणि विकत सेवा घेउनही खात्री कशाचीच नाही पण निदान थोडेफार तरी कायदेशिर संरक्षण मिळू शकेल (असे वाटते).

:)

नंदनने पाठवलेला हा गमतीदार विडीयो पहा. (याचे एकूण तीन भाग आहेत.. आजुबाजुला मिळतीलच)
गंमत सोडली तरी आता हळू हळू सिरीयसली घेणे गरजेचे आहे असे वाटु लागले आहे

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

गुगल व्हॉईस

गुगल व्हॉईस नावाचे गुगल ऍप्लिकेशन नुकतेच सुरू झाले आहे. त्या विषयी अधिक माहिती इथे. http://www.google.com/googlevoice/about.html#

नोंदणी करण्यासाठी आमंत्रण मिळवणे आवश्यक आहे. कुणी आमंत्रीत करु शकेल काय?

पर्याय

आंतरजालावर वावरणे आणि कुठलाही विदा आंतरजालावर न जाऊ देणे या परस्परविरोधी गोष्टी आहेत असे वाटते. गूगलकडे विदा असल्याबद्दल बरीच ओरड केली जाते आणि त्यात तथ्य आहेच. अर्थात याचा अर्थ बाकीच्या कंपन्या असे करत नाहीत असे नाही, पण त्यांचा वापर तुलनेने कमी होतो त्यामुळे त्यांच्याबद्दल ओरडही कमी होते. उद्या समजा गूगल बुडाली आणि तिच्या जागी दुसरी कंपनी आली तर ती ही हेच करेल. किंबहुना जास्तीत जास्त ग्राहक मिळवण्यासाठी कंपन्या कुठल्याही थराला जाऊ शकतात*.
गूगल किंवा दुसरी कुठलीही कंपनी परोपकारासाठी या सर्व सुविधा नक्कीच देत नाही. जर तुम्हाला त्यांच्या सोयी वापरायच्या असतील तर याला पर्याय नाही असे वाटते.
एक काळजी घेता येऊ शकते. तुम्ही जो वैयक्तिक विदा आंतरजालावर टाकाल तो खुला आहे असेच समजा. त्यामुळे जर ऑर्कुटात तुम्हीच तुमच्याबद्दल वैयक्तिक माहिती दिली नाहीत तर ती आंतरजालावर येणार नाही.

*या संदर्भात एका फेंच कंपनीबद्दल एका शास्त्रज्ञाने मुलाखत दिली होती. त्यानुसार कंपन्या ग्राहकांच्या चव आणि गंध यांना मनिप्युलेट करत आहेत. उदा. आइसक्रीममध्ये समुद्रकाठी येणार्‍या गंधांची रसायने मिसळणे. जेणेकरून एकदा याची सवय झाली की तुम्ही समुद्रकिनारी गेलात की पावलोव्ह इफेक्ट होऊन तुम्हाला आइसक्रीम खावेसे वाटेल. (माहिती ऐकीव, चूभूद्याघ्या.)

----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson

 
^ वर