पर्यावरणाचे रक्षणकर्ते - 3

फोर्थ डायमेन्शन - 17

पर्यावरणाचे रक्षणकर्ते - 3
बलबीरसिंग सिचेवालची नदी-स्वच्छता मोहिम
ओंकार धर्मादाय ट्रस्टचे बलबीरसिंग सीचेवाल यांना शीख धर्मग्रंथ ग्रंथसाहिब यातील फक्त दोन-चार ओळी कायमचे स्मरणात आहेत: वारा हा गुरू, पाणी म्हणजे पिता, व पृ्थ्वी ही आई. हरितक्रांतीमुळे गेल्या 40-50 वर्षात पंजाब राज्यातील अन्नधान्याच्या उत्पादनाने उच्चांक गाठला आहे. परंतु याच कालावधीत पंजाबमधील रावी, झेलम, सिंधू, बियास इत्यादी प्रमुख नद्यासकट इतर छोटे मोठे उपनद्या, पाण्याचे प्रवाह, व भूगर्भातील पाण्याचे साठेसुध्दा प्रदूषणयुक्त झालेले आहेत. औद्योगिक व कृषी रसायनामुळे या नद्यांमधील पाणी दूषित झालेले आहेत. 160 किमी दूर वाहणारी कालीबेहन ही नदी, एके काळी शीख धार्मिकांसाठी अत्यंत पवित्र होती. परंतु गेली पंचवीस वर्षे तिच्या काठावरील सहा शहरे व चाळीस खेडयातील गटारांना नदीच्या वाहत्या पात्रात सोडल्यामुळे नदीचा काही भाग वाळून गेला आहे. काठावरील शेती सुकून गेल्या आहेत. दूषित पाणी जमिनीत झिरपल्यामुळे भूगर्भातील पाण्यात विषारी पदार्थांचा शिरकाव झाला. कुठलेही पाणी पिण्यायोग्य राहिले नाही. दूषित पाणी पिणारे रोगग्रस्त होत आहेत. व प्रसंगी हेच पाणी त्यांचा जीव घेवू शकते.
बलबीरसिंग यानी पाच वर्षापूर्वी नदी स्वच्छता मोहिम हाती घेतली. शीख परंपरेतील कारसेवा याची जोड देत सीचेवाल व त्याच्या सहयोगी मित्रांनी मिळून शेकडो स्वयंसेवकांची फळी उभी केली. कालीबेहन नदीला स्वच्छ करणे किती गरजेचे आहे हे खेडयातील रहिवाश्यांना पटवून देण्यात यशस्वी झाले. शेती औजारांचाच वापर करून नदीच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या शेवाळांचा व इतर वनस्पतींचा नायनाट करू लागले. नदीच्या काठावर ठिकठिकाणी बांध घातले. सर्वांच्या सहकारामुळे व परिश्रमामुळे नदी बघता बघता स्वच्छ होवू लागली. परंतु राजकीय पुढारी, स्थानिक पंचायती सदस्य, व इतर काही समाजकंटक बलबीरसिंगच्या नदीच्या पात्रात दूषित पाणी सोडू नये या विनंतीला वाटाण्याच्या अक्षता दाखवू लागले. दुष्टहेतूने विरोध करू लागले. अर्ज विनंत्यांना धुडकावू लागले. बलबीरसिंगने याविरूध्द लढा दिला. चळवळ उभी केली. सर्वात प्रथम खेडयातील रहिवाश्यानीच नदीत कचरा टाकू नये यासंबंधी प्रबोधन त्यानी केले. ग्रामस्थांना हळू हळू सिचवालचे म्हणणे पटू लागले. काठावरील काही खेडयातील ग्रामस्थ पूर्वापार चालत आलेल्या पारंपरिक निचराव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करू लागले. काही शासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने धरणाच्या कालव्यातील पाणी नदीत सोडल्यामुळे बघता बघता नदी स्वच्छ होऊ लागली. नदीच्या पात्रातील मूळ जलस्रोत पुन्हा एकदा काम करू लागले. झरे वाहू लागले. बारमाही वाहत्या पाण्याच्या उपलब्धतेमुळे जीव वैविध्याला उधाण आले. सृष्टी सौंदर्य बहरू लागले. खेडयातील रहिवाशी सहकुटुंब सहलीला म्हणून सुट्टीच्या दिवशी नदीच्या काठी येवू लागले.
आज कालीबेहन नदी पूर्ण क्षमतेने वाहत आहे. शीखधार्मिक बिनदिक्कतपणे तेथे आंघोळ करू शकतात. पाणी पिऊ शकतात. सीचेवालच्या अथक प्रयत्नामुळे नदीत मोठया प्रमाणात मासे जिवंत आहेत. नदीत मासेमारी करण्यास सक्त मनाई आहे. काठावरील प्रदूषित करणाऱ्या उद्योगांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.
मनात आणल्यास एक सामान्य माणूससुध्दा पर्यावरण रक्षणासाठी किती काम करू शकतो हेच सीचेवाल यानी दाखवून दिले आहे. याची प्रेरणा घेऊन राज्यातील अनेक ठिकाणी उत्स्फूर्तपणे नदी स्वच्छता मोहिम जोर धरू लागली आहे.
मोहंमद दिलावरचे चिमणींची घरटे
निर्वंश होत चाललेल्या वाघांना वाचवण्यासाठी व्याघ्र प्रकल्पावर करोडो रुपये खर्च करावे अशी आग्रही मांडणी करणाऱ्यांना मोहंमद दिलावर याची चिमण्या वाचवा ही हाक अगदीच मिळमिळीत वाटू लागेल. कॉलेजमध्ये पर्यावरण विषय शिकविणाऱ्या या प्राध्यापकाने व्याघ्रप्रकल्पातील गलेलठ्ठ पगाराची नोकरीला नकार देऊन प्रसिध्द पक्षीतज्ञ डॉ. सलीम अलीचा वारसा पुढे चालवण्यात जास्त उत्साह दाखवत आहे. नाशिक येथे चिमण्यांना वाचवण्यासाठी त्याच्या डोळयासमोर एक प्रकल्प असून स्वत:लाच त्या प्रकल्पाची आर्थिक जवाबदारी उचलावी लागत आहे.
चिमण्या-कावळयांची गोष्ट ऐकत लहानांचे मोठे झालेल्या पिढीला चिमणी हा पक्षी निर्वंश होणार तर नाही ना याची धास्ती वाटत आहे. ब्रिटनमधील चिमण्या एव्हाना नष्ट झाले ही बातमी ऐकून आपल्या देशातही तसेच होईल ही भीती त्याच्या मनात बसली. यासाठी काही परिणामकारक वैज्ञानिक उपाय शोधणे अत्यंत गरजेचे आहे याचा त्यानी ध्यास घेतला. शहरी भागातील चिमण्यांचे अस्तित्व धोक्यात असल्याबद्दलचा इंडियन कौन्सिल ऑफ अग्रिकल्चरल रिसर्च या संस्थेचा अहवाल वाचल्यानंतर त्यानी तातडीचे उपाय म्हणून कार्य करू लागला.
शहरात बेसुमार वाढलेले कॉंक्रीटचे जंगल, आकसणाऱ्या सार्वजनिक बागा, व इतर मोकळया जागांच्या अभावामुळे चिमण्यांना जिवंत राहणे, घरटी बांधणे, अंडी घालणे या मूलभूत गोष्टी जमेनासे झालेले आहेत. चिमण्यांना घरटी नाहीत, हीच फार मोठी समस्या आहे. त्याचबरोबर पिकावर मारणाऱ्या कीटकनाशकांचा अती उपयोगसुध्दा चिमण्यांची अंडी नष्ट करण्यात व चिमण्यांची संख्या घटविण्यात कारणीभूत ठरत आहेत. चिमण्यांची पिल्लं मरत आहेत.
एके दिवशी टेलिफोनच्या खांबावरील स्विच बॉक्समध्ये एक चिमणी घरटे बांधत असताना मी पाहिले. ते बघून मदत करावेसे वाटले. यासाठी नाममात्र खर्चामध्ये मी एक लाकडी खोकी तयार करून घेतली. खोकीला झाडावर लटकून ठेवले. काही दिवसातच चिमणीने त्यात आपले घरटे बांधले. माझा प्रयोग यशस्वी झाला. दिलावरच्या प्रयोगाच्या सुरुवातीची ही कहाणी आहे. चिमण्यासाठी ना नफा ना तोटा या तत्त्वाप्रमाणे त्यानी हजारेक लाकडी खोके तयार करून घेतल्या. व शहरातील पक्षीप्रेमींना मदतीसाठी आवाहन केले. त्याच्या या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. व चिमण्यांना हक्काचे सुरक्षित घर मिळाले.
गंमत म्हणजे घरटी विकत घेतलेल्या कुटुंबातील लहान मुलामुलींना चिमण्यांचा लळा लागला. ही मुलं आता दिलावरच्या प्रकल्पात सहभागी होत आहेत. त्यांना चिमण्यांना वाढवणे हा छंद जडला आहे. यासाठी शासनाच्या पाठिंब्याची अत्यंत गरज आहे. परंतु या नगण्य छोटया पक्ष्यांसाठी आर्थिक तरतूद मागणे फार जिकिरीचे ठरत आहे. कारण वाघासारखे प्रसिध्दीचे वलय चिमण्याभोवती नाही. परंतु लहानांनाच चिमण्यांचा चिवचिवाट नीटपणे ऐकू येतो, कळू शकतो, मोठयांना नाही. जर वेळीच आपण उपाय न केल्यास चिमण्यांचे अस्तित्व फक्त गोष्टीतच राहील असा गर्भित इशारा मोहंमद दिलावर देत आहे.

Comments

फार छान

प्रभाकरपंत
आपली हे लेख मालिका फारच छान आहे. वाचून बरे वाटले. आणखी येऊद्यात.
चन्द्रशेखर

असेच....

म्हणतो.......
==================

मस्त!

लेखमालेतील आणखी एक आशादायी पुष्प..

आमच्या घराच्या खिडकीच्या लाकडी पेल्मेटवर(वळचण?) एक चिमणी दरवर्षी घरटे बांधायची. माझी आजी तेव्हा म्हणायची की "जेव्हा ही चिमणी घरटं बांधायचं थांबवेल तेव्हा आपण ऐन मुंबई शहरात आलो असं समजायचं"
पुढे दहिसरमधे जोरात बांधकामं सुरू झाली, काँक्रीटचे रस्ते आले, मोठाले पुल आले, चार पदरी रेल्वे झाली वगैरे वगैरे बरीच सुधारणा झाली .. त्या दरम्यान चिमणीने घरटं बांधणं कधीच सोडून दिलं होतं. :(

(चिमणा) ऋषिकेश

उत्तम.

प्रभाकरपंत,
लेखमालिका अतिशय चांगली आहे. स्फूर्ती घेण्याजोग्या कामाची तुम्ही ओळख करुन देत आहात.
आणखी लिहा.
--लिखाळ.

म्हणुनच

स्फूर्ती घेण्याजोग्या कामाची तुम्ही ओळख करुन देत आहात.

म्हणुनच प्रभाकरपंतांना आम्ही उपक्रमी बनवण्याचा घाट घातला.

प्रकाश घाटपांडे

 
^ वर