पर्यावरणाचे रक्षणकर्ते - 2

फोर्थ डायमेन्शन - 16
पर्यावरणाचे रक्षणकर्ते - 2
ऍनी लिओनार्डची स्टोरी ऑफ स्टफ

तुम्हाला एखाद्याने
कचऱ्याविषयी काही वाईट-चांगले सांगण्याचा प्रयत्न करू लागल्यास, तो आपला विषय नव्हे वा त्यात काय विशेष म्हणत तोंड फिरवाल. परंतु अतुल पेठे दिग्दर्शित कचरा कुंडी हा लघुपट पहात असताना कचरा उचलणाऱ्यांच्या जीवनाविषयी त्यांच्या राहणीमानावि

षयी उत्सुकता वाढू लागते. संवेदनशील मनाला ते सर्व भिडू लागते. तिरस्काराचा, उदासीनतेचा तो विषय आहे हे मत हळू हळू बदलू लागते. समाजव्यवस्थेला अत्यंत उपयुक्त असलेल्या या घटकाविषयी आपलेही काही देणे-घेणे आहे याची जाणीव होऊ लागते.
हाच आशय घेऊन ऍनी लिओनार्ड या दिग्दर्शिकेने स्टोरी ऑफ स्टफ नावाचे इंटरनेटवरील वीक्षकांसाठी ऑन लाइन लघुपट तयार केला आहे. 2007 साली प्रदर्शित झालेला हा लघुपट आतापर्यंत 30 ला़खाहून जास्त वीक्षकांनी पाहिला असून कचऱ्याची विल्हेवाट आपली संवेदना जागवू शकते हे पुन्हा एकदा सिध्द करून दाखविले आहे. लघुपट बघत असताना वीक्षकाला कचऱ्याच्या डोळयासमोर नको वाटणारा कचरा भावनांना हात घालतो. याच भावनेच्या भरात वीक्षक आपली हरवलेली कर्तव्यबुध्दी पुन्हा मिळवतो. कर्तव्याची जाण होवू लागते. लघुपट बघून झाल्यानंतर हा कचरा डोळेआड करणारी एक क्षुल्लक गोष्ट म्हणून न राहता पर्यावरणरक्षणाचा एक अत्यंत महत्वाचा घटक वाटू लागतो.

विनोदी अंगाने व व्यगंचित्रांच्या माद्यमातून पुढे पुढे सरकत जाणाऱ्या या लघुपटात कचरा येतो कुठून, साठतो कसा, कचरा तयार होतो कसा, कचऱ्यात काय काय असू शकते, कुणा-कुणाच्या आयुष्यावर कचरा कसा परिणाम करतो, कचऱ्याचे नंतर काय होते, त्याची विल्हेवाट कशी लागते, इत्यादी बारीक-सारीक गोष्टीवर ऍनीने टिप्पणी केली आहे. या गोष्टी आपल्या नित्य परिचयाचे असून सुध्दा ऍनीच्या नजरेतून कचऱ्याकडे पाहत असताना आताची ही निचरा व्यवस्था कित्येक विरोधाभासानी, मूर्खपणानी भरलेली आहे, हे लक्षात येऊ लागते.
पर्यावरणासंबंधातील आरोग्य व कायदेशीर बाजू मांडण्यासाठी ग्लोबल ऍंटीइन्सिनिरेटर ऍलायन्स, हेल्थ केर विदाउट हार्म, ग्रीनपीस इंटरनॅशनल, फंडर्स वर्कशॉप फॉर सस्टेनेबल प्रॉडक्शन ऍंड कन्सम्प्शन इत्यादी संघटनेमधून गेली तीस वर्षे ऍनी लिओनार्ड प्रयत्न करत आहे. ऍनी जगाच्या कानाकोपऱ्यात प्रवास करत वाढत्या चंगळवादामुळे पर्यावरणावर होत असलेल्या दुष्परिणामाविरुध्द आवाज उठवित आहे. म्हणूनच कचऱ्याविषयी ऍनी जेव्हा सांगण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा प्रेक्षक उठून न जाता मनापासून तिचे म्हणणे ऐकून घेत असतात.
जॅक सिमचे टॉयलेट्स
जॅक सिमला मानवी विष्टेविषयी गप्पा मारण्यास अजिबात कंटाळा येत नाही. सिंगापूरच्या या रहिवाश्याला रोज आपण किती विष्टा बाहेर टाकतो याचा विचार प्रत्येकाने करायलाच हवे असे वाटते. मला भेटलेल्या प्रत्येकाला मी नेहमीच तू किती वेळा जेवतोस, काय काय खातोस असे प्रश्न विचारत असतो. प्रत्येकाला याचे उत्तर माहित असते व ते पटकन उत्तर देतात. परंतु तुम्ही किती वेळा शौचाला जाता असे विचारल्यास उत्तर देण्यास टाळाटाळ करतात, मागे पुढे पाहतात. शौचाविषयीची माहिती चारचौघात बोलण्यासाठी नसते, असाच बहुतेकांचा ग्रह झालेला आहे.
शौचव्यवस्थेतील हेळसांडपणामुळे विकसनशील व अविकसित देशांची आरोग्य व्यवस्था कोलमडत आहे. 260 कोटी लोकांना उघडयावर शौचाला बसावे लागते. त्यामुळे भूजलावर परिणाम होऊन दूषित पाण्यामुळे दर वर्षी सुमारे वीस लाख लोकांना मृत्युस कवटाळावे लागते. खेडयातील रहिवाश्याना याविषयाकडे गांभीर्याने बघायला हवे हेच सुचत नाही. याविषयी आपण काहीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी आपला हेका सोडत नाहीत. मुळात काहीही ऐकून घ्यायलाच तयार होत नाहीत. विसंगत, अतार्किक, व गैरलागू मुद्दे पुढे करून याविषयीच्या निष्क्रियतेवर पडदा टाकण्याच्या प्रयत्नात असतात.
सिम स्वत: सिव्हिल इंजिनीयर व बिल्डर असल्यामुळे त्यानी 2001 साली वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशन - WTO ( WTO - वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन नव्हे!) या स्वयंसेवी संस्थेची स्थापना करून टॉयलेटविषयी प्रबोधन करत आहे. घरोघरी संडास असणे ही सुसंस्कृततेची व प्रतिष्ठेची खूण आहे हे बिंबवण्याच्या प्रयत्नात ही संस्था कार्य करत आहे. टॉयलेट्सचे मार्केटिंग करणे हेच या संस्थेचे उद्दिष्ट आहे. ज्या प्रकारे प्रत्येकाला आपल्याकडे मोबाइल फोन असावा, आय पॉड वा ईफोन असावा यासाठी उत्सुकता असतो त्याप्रकारे प्रत्येकाला आपापल्या घरी फंक्शनल संडास असावा असे मनापासून वाटायला हवे.
सिमच्या संस्थेच्या डोळयापुढे जाहिरातीतल्याप्रमाणे फॅशनेबल टॉयलेट्सचे - ज्यात गरम पाण्याचे फवारे, सुमधुर संगीत, दरवळणारा सुगंधी वास, नेत्रसुखद रंगसंगती इ.इ. - स्वप्न नसून शौच व्यवस्थेच्या मूळ उद्देशाला धक्का न लावणारी व अत्यंत स्वस्त अशी किंमत असे स्वप्न आहे. मोफत संडास ही कल्पना राबवण्यात त्याला रुची नाही. कारण अशा प्रकारे फुकट बांधलेले संडास शेवटी बकरी-शेळी बांधण्यासाठीचा गोठा, वा अडगळीचे सामान टाकण्यासाठीची जागा अशी होऊन जाते याची त्या संस्थेला पूर्ण कल्पना आहे. संडास शौचासाठीच वापरण्यासाठी असून त्याचा योग्य वापर केल्यास आरोग्यरक्षण होते व त्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे, असे या संस्थेला वाटते. वापरणाऱ्याची खात्री झाल्याशिवाय व त्याला मूळ हेतू पूर्णपणे पटल्याशिवाय संडासांचा दुरुपयोग टाळणे शक्य नाही. शौचव्यवस्था जीवनव्यवहाराचा अविभाज्य अंग आहे हे मनात भिनल्याविना वापरणाऱ्यांच्या मानसिकतेत व प्रचलित व्यवस्थेत बदल होणे शक्य नाही.
जॅक सिमच्या मूळ संस्थेचे 50 देशामध्ये 133 सदस्य संस्था आहेत. मध्यवर्ती संस्था खत उत्पादकांशी चर्चा करत असून मानवी विष्टेची विल्हेवाट लावण्याबरोबरच पीक उत्पादनात वाढ करणे कितपत शक्य आहे याचा अभ्यास व त्यासाठी योजना आखत आहे. जागतिक आरोग्य संस्थेच्या एका अंदाजानुसार मलनि:सारणासाठी केलेल्या प्रत्येक एक डॉलरच्या गुंतवणुकीमुळे सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेसाठी केलेल्या तरतुदीत 9 डॉलर्स एवढी गुंतवणूक कमी करणे शक्य आहे. त्यामुळे अनेक देशांनी पुढाकार घेतला असून याविषयी युध्दपातळीवर काम करत आहेत. आपल्या येथेसुध्दा हगणदारीमुक्त गाव ही योजना राबवली जात आहे व त्याचे इष्ट परिणाम दिसून येत आहेत. यावरून जॅक सिमचे घरोघरी शौचकूप हे स्वप्न नजिकच्या काळात पूर्ण होण्याची शक्यता वाढली आहे.

Comments

अतुल

अतुल पेठेंच्या लघुपटाचे नाव कचरा कोंडी असे आहे.

शौचालयाचा विचार करताना त्याच्या योग्य मॉडेलचाही विचार झाला पाहीजे. सध्याच्या Septic tank model मुळे डासांची अतोनात उत्पत्ती होउन आणखी त्रास वाढला आहे.

आपण शहरवासीयांनी केलेल्या कचर्‍याचे काय होते आणि त्याचे काय दुष्परीणाम होताहेत हे पहायचे असेल तर पुण्याच्या उरळी 'देवाची(?)' या गावामधील कचरा डेपोवर एक फेरी टाकावी आणि त्या गावातील 'पिण्याच्या पाण्याच्या' विहिरीतील एक घोट घेऊन पहावा.

अवांतरः शहरवासीयांसाठी अश्या सहली ठेवल्या तर कचर्‍याचे प्रमाण कमी होईल का ?

उरुळी देवाची

माझी मुलगी संज्ञाने तिच्या अक्षरनंदन शाळेच्या पर्यावरणाच्या प्रोजेक्ट साठी उरुळी देवाची येथील कचर्‍या डेपोला भेट देउन माहिती गोळा केली होती. तेथील हे फोटा पहा
Picture 011
Picture 013
Picture 002
प्रकाश घाटपांडे

देवाची उरुळी

या कचर्‍याची सध्याची उंची फक्त १५ मिटर (३ मजली इमारतीपेक्षा जास्त ) आहे!

 
^ वर