पती, पत्नी और 'वह'

फोर्थ डायमेन्शन - 14

पती, पत्नी और 'वह'
श्रीयश व नीताच्या लग्नाचा आज दहावा वाढदिवस होता. त्यांच्या लग्नाला प्रेमविवाहच म्हणायला हवे. इंटरनेटवरून आवश्यक माहिती गोळा करून दहा-बारा जुजबी भेटीतच त्यांना एकमेकाबद्दल आपुलकी वाटू लागली. आई- वडिलांच्या संमतीनेच हा विवाह झाला होता. त्यांच्या संसारात तक्रार करण्यास काही जागा नव्हती. एक मुलगा, एक मुलगी. चौकोनी कुटुंब. श्रीयश व नीता दोघेही कमवणारे. चांगला पगार. दृष्ट लागण्यासारखा त्यांचा संसार होता. कुठेही कसलीही कमतरता नव्हती. नीता स्वत:ची नोकरी संभाळून मुलांच्याकडे अत्यंत बारकाईने लक्ष देत होती. त्यामुळे श्रीयशला कुठलीही कौटुंबिक जवाबदारी नव्हती.
अलिकडे मात्र श्रीयशला या वैवाहिक जीवनाचाच कंटाळा आला होता. काहीही करण्यास उत्साह नसे. नीताबरोबरचे लैंगिक संबंधसुध्दा अगदी तुरळक झाले होते. 'त्या' तही त्याला उत्साह नसे. असे का होत आहे याचे नेमके कारणही त्याला सापडत नव्हते. यावर शेवटचा उपाय म्हणून नीताला घटस्फोट देणे हे काही त्याच्या मनाला पटत नव्हते. कारण तिच्या सोज्वळ वागण्यात, भरभरून प्रेम करण्यात थोडीसुध्दा चूक सापडत नव्हती. शिवाय घटस्फोटानंतर आपल्या लाडक्यांचे होणाऱ्या आबाळाची, हाल-अपेष्टांची तो कल्पनाही करू शकत नव्हता.
इतर काही मित्राप्रमाणे श्रीयशसुध्दा एखाद्या परस्त्रीबरोबर विवाहबाहृ संबंध (लफडी!) ठेऊन स्वत:च्या वैवाहिक जीवनाचा गाडा मार्गावर आणू शकला असता. काही गरजा बायको पूर्ण करणार व इतर 'गरजा' ती परस्त्री पूर्ण करणार हा विचारसुध्दा त्याच्या मनाला अतीव वेदना देणारा होता. नीताचा विश्वासघात करणे ही कल्पनाच त्याला शिसारी आणणारी वाटत होती. त्याच्या काही मित्रांच्या बायकांना नवऱ्यांच्या लफडी माहित असूनसुध्दा त्या कानाडोळा करत होत्या. परंतु नीता असे करू शकेल याची त्याला खात्री नव्हती. मुळातच आपण आपली समस्या तिला स्पष्टपणे सांगू शकू का याबद्दलच त्याच्या मनात शंका होती. त्यामुळे तो स्वत: अशा हताश अवस्थेत कुढत कुढत दिवस काढत होता.
याच अवस्थेत असताना चाळे म्हणून इंटरनेटवर सर्फिंग करत असताना अचानकपणे एका पॉप अपमधून व्हर्च्युअल हॅपिनेस कंपनीची साइट बघायला मिळाली. (एकदा अनुभव घेऊनच पहा! ) ती साइट अफलातून होती याबद्दल त्याला अजिबात संशय नव्हता. कंपनीने भासमय लैंगिक सुखाचा प्रस्ताव ठेवला होता. इतर प्रकारच्या सायबर सेक्सप्रमाणे केवळ कामोद्दीपनाचा हा प्रस्ताव नव्हता. ही कंपनी सदृशीकरणातून एका सुंदर (व अनुभवी!) 'स्त्री' बरोबर झोपल्याचा अनुभव देण्याचे आश्वासन देत होती. लैंगिक संबंधातून मिळणाऱ्या अत्युच्च आनंदासाठी या कंपनीने काही विशेष तंत्र वापरले होते. त्यामुळे आपण खरोखरच एका स्त्रीबरोबर मधुचंद्राची रात्र काढत आहोत असा भास त्यातून निर्माण होणार होता. कंपनीच्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवल्यास व कंपनी दिलेला शब्द पूर्णपणे पाळत असल्यास श्रीयशच्या सर्व समस्या चुटकीसरशी सुटणार होत्या. यात कुठलाही विश्वासघात नव्हता. कुणालाही दुखवायचे नव्हते. वैवाहिक जीवनात निराश झालेल्या श्रीयशसारख्यांना त्यांच्या लैंंगिक सुखाला पुनश्च हरीॐ करण्यास कंपनी मदत करणार होती. त्यामुळे चालून आलेल्या या नामी संधीला नकार फक्त मूर्खच देऊ शकला असता!
---- ------ ------- ------- -------- ------ --------- ------
पती-पत्नी एकमेकाशी (मरेस्तोपर्यंत!) एकनिष्ठ राहावे याची अपेक्षाच का केली जाते? काहींच्या मते एकनिष्ठतेचा एवढा बाऊ करू नये. कदाचित एकनिष्ठतेचे हे भूत सांस्कृतिक दबावामुळे आपल्या मानगुटीवर (कायमचे!) बसलेले असावे. किंवा एक पत्नी / पती व्रताच्या जाचक बंधनातून हे आलेले असावे. कामवासना ही शारीरिक भूक/ इच्छा असून प्रेमासारख्या भावनिक व नाजूक संवेदनाशी त्याचा संबंध जोडू नये, लैंगिक सुख व प्रेम या दोन्ही गोष्टी सर्वस्वी वेगळे असून त्यांची सरमिसळ करू नये, व शारीरिक संबंधामधून प्रेमाचे मोजमाप करणे मूर्खपणाचे ठरेल, असे अनेकाना वाटते.
एक पत्नीत्व/पतीत्व संस्कृतीचेच अपत्य असल्यास ती आपल्या मनात तळ ठोकून आहे. एखाद्या तिऱ्हाइताबरोबर आपला पती /आपली पत्नी शय्यासुख घेत असल्यास मुक्तप्रेमाचे गुणगान गाणारेसुध्दा अजिबात सहन करणार नाहीत. संस्कृतीचा हा भग्नावशेष मनोविकार या सदरात मोडणारा असून त्यावर मात करण्याची अत्यंत गरज आहे. एके काळी स्वैराचारातून समाजाची घडी पूर्णपणे विसकटल्यामुळे एकनिष्ठतेच्या कृत्रिम बंधनाची गरज त्या समाजाला भासली असावी. परंतु आता माणूस सुज्ञ झालेला असल्यामुळे एकनिष्ठता व स्वैराचार यातून मिळणाऱ्या फायदे-तोटयांचा हिशोब तो नक्कीच ठेऊ शकेल. व त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करू शकेल. त्यामुळे एकनिष्ठतेच्या आणा-शपथेंची आता खरोखरच गरज नाही. या कृत्रिम बंधनातून हा समाज मुक्त व्हायला हवा.
एकनिष्ठता ही बहुतेकांची समस्या असल्यास त्याचा एवढा त्रास आपल्याला का म्हणून व्हावा? असे अनेकांना वाटत असते. इतरासारखे आपणही कुढत कुढत आयुष्य ढकलण्यास का हरकत असावी? परंतु या त्रासातून बाहेर पडण्यासाठी व्हर्च्युअल हॅपिनेस कंपनी पुरवत असलेल्या जोडीदाराचा का विचार करू नये? असेही मनात येईल. मात्र अशा पर्यायाबाबत आपले नेमके विचार काय असतील याचा ऊहापोह करणे सर्वांच्या हिताचे ठरेल. या विचारमंथनातून आपल्या समोर असलेल्या समस्याचे नेमके स्वरूप काय आहे हे स्पष्ट होईल.
सायबर सेक्सबाबतीत आपली काहीच अडचण नसल्यास पती/पत्नी व्यतिरिक्त एका जोडीदारात भावनिक गुंतवणूक करणे इष्ट ठरेल का? या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. आपण सर्व नेहमीच आपले घनिष्ट संबंध व भावनिक गुंतवणूक फक्त एकाच व्यक्तीत करत असतो, करू इच्छितो. त्यात इतर कुणीही सहभागी झालेले आपल्याला आवडणार नाही. कारण मुळातच आपण सर्व पारंपरिक एक पत्नी/एक पती व्रताच्या रूढीने घट्ट बांधलेलो आहोत. ही मगरमिठी लवकर सुटणारी नाही.
परंतु सायबरसारख्या भासमय जगातील आभासी व्यक्तीशी घनिष्ठ संबंध जोडत असल्यास आपण कुठल्याही रूढी-परंपरेच्या मर्यादेबाहेर जात नाही याची हमी देऊ शकतो. (मनातल्या मनातच अनेक सुंदर स्त्रियांशी लैंगिक संबंध आपण ठेवतच असतो की! त्याला कुणाचीच आडकाठी नसते.) मुळातच आपण एका तिऱ्हाइताच्या शोधात आहोत ही समस्या नसून आपण आता असलेल्या भावनिक संबंधापासून दूर दूर जात आहोत, आताचे संबंध तोडण्याच्या पावित्र्यात आहोत ही खरी समस्या आहे. मग असे संबंध आभासी/जिवंत व्यक्ती, मन गुंगवून ठेवणारा एखादा छंद, पुस्तक वाचन, ऑफिसचे काम, इत्यादीशी जोडलेले असले तरी तो संबंध एकनिष्ठतेला धक्का देणारी ठरेल. श्रीयशचा सायबर कंपनीचा ग्राहक होण्याची इच्छाच नीताशी प्रतारणा करण्याची तयारी दर्शवते. हळू हळू नीताशी लैंगिक संबंध तोडण्याइतपत त्याची मजल जावू शकते.
विवाहबाह्य संबंधाची इच्छा वैवाहिक जीवनातील समस्याचे लक्षण असून ते काही मूळ कारण नव्हे. श्रीयश जेव्हा व्हर्च्युअल हॅपिनेसवर लॉग ऑन करून एका आभासी प्रेमिकाशी शय्यासोबत करण्याच्या प्रयत्नात असतो, त्याच क्षणी श्रीयश-नीताच्या दांपत्य जीवनाच्या अंताची सुरुवात होते. कंपनीच्या संकेतस्थळावर लॉगिंग करणे म्हणजेच स्वत:च्या वैवाहिक जीवनातील पराभवाची कबूली देण्यासारखी असून वैवाहिक जीवनाच्या समस्यांचा शोध न घेता समस्यापासून दूर पळून जाणे असा अर्थ त्यातून निघू शकतो.
वास्तव जगात एकनिष्ठतेची समस्या डोकेदुखीची असते. कारण मुळातच ती फार गुंतागुंतीची आहे. त्यातही संगणकावरील आभासी जगातील कृत्रिम संबंधाचाही ज्याना तिटकारा वाटतो, त्यांचा खऱ्या-खुऱ्या हाडा-मांसाच्या व्यक्तीच्या संबंधाला तीव्र विरोध असणार, हे मात्र नक्की. श्रीयशची सायबरविश्वातील शय्यासोबतीची आस्था पुन्हा एकदा आपल्याला याविषयी असलेल्या मतांचा पुनर्विचार करण्यास भाग पाडत आहे.
कदाचित या समस्येला खऱ्या अर्थाने कुठलेही उत्तर नसेलही!

लेखनविषय: दुवे:

Comments

थोडासा गमतीदार, थोडासा विचारप्रवर्तक

थोडासा गमतीदार, थोडासा विचारप्रवर्तक लेख.

विवाहबाह्य संबंधाची इच्छा वैवाहिक जीवनातील समस्याचे लक्षण असून ते काही मूळ कारण नव्हे.

हं - नेम्का अर्थ समजला का, असा विचार करतो आहे. (मला वाटते की हे वाक्य एक "टॉटॉलॉजी" आहे - शब्दार्थाश्रित सत्य आहे.)

असे वाक्य चालेल का? -
अनेकांशी संबंध ठेवायची इच्छा ही एका व्यक्तीशी असलेल्या संबंधातील समस्येचे लक्षण असून ते काही मूळ कारण नव्हे.
तर हे तितकेसे स्पष्ट पटत नाही.

नाहीतरी सार्वत्रिक वैवाहिक एकनिष्ठता ही उत्तम कल्पना आपल्या समाजात नवीन आहे. विवाहित स्त्रीने एकनिष्ठ असावे ही कल्पना जुनी आहे, मान्य. मात्र हिंदू पुरुषांना स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत अनेक लग्ने करता येत असत. माझ्या पणजोबांच्या पिढीपर्यंत सुशिक्षित समाजातही द्विभार्या-कुटुंबाची तुरळक उदाहरणे दिसत (विशेषतः पहिल्या विवाहानंतर संतती नाही झाली तर). आजही खेड्यांमध्ये काही सधन लोक अनेक घरोबे अगदी उघडपणे मांडतात. (मुसलमान पुरुष कायद्याने अनेक स्त्रियांशी एका वेळी विवाह करू शकतात, तेही आहेच. प्रत्यक्षात काही सधन पुरुषच असे विवाह करतात.) या सर्व प्रकारांत समस्या म्हणाल तर न्याय्यतेची आहे. पण वैवाहिक जीवनातील समस्या आहे असे म्हणणे मला अप्रस्तुत वाटते.

श्रीयश व नीता यांना दोघांनाही सुखी आणि समृद्ध आयुष्य लाभो, या शुभेच्छा.

छान

फोर्थ डायमेन्शन नेहेमी दुसर्‍या तिसर्‍या नाहि तर एकदम चौथ्याच विचारात टाकते हे नक्की. आभासी बहुपत्नीत्त्व/ आभासी बहुपतीत्त्व ह्या नव्या संज्ञेने विचारात टाकले आहे.

(आभासमुक्त)ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

वा !

लेख स्फोटक 'विषयावर' आहे.
आमच्या ऋष्या शी सहमत अगदी चौथाच विचार म्हणायचा हा!
भारी आहे!

आपला
गुंडोपंत

समस्यापुर्ती

श्रीयशची सायबरविश्वातील शय्यासोबतीची आस्था पुन्हा एकदा आपल्याला याविषयी असलेल्या मतांचा पुनर्विचार करण्यास भाग पाडत आहे.
कदाचित या समस्येला खऱ्या अर्थाने कुठलेही उत्तर नसेलही!

कदाचित या समस्येला सर्वमान्य असे कुठलेही उत्तर नसेलही. ही अवस्था मेंदुत तयार होते पण समस्या म्हणुन जगात येते ती सामाजिक परिस्थितीमुळे. लैंगिक प्रेरणेचे शमन वा दमन हा भाग नैतिकतेशी जोडला असल्याने त्याविषयीची 'सापेक्ष' गुंतागुंत दीर्घकाल चालत राहणार. राम हा एकपत्नी होता. रामायणात त्याच्या या 'एक'निष्ठेमुळे त्याला काही 'अडचणी' आल्या का? याचा शोध रामायणात घेतला पाहिजे
प्रकाश घाटपांडे

एक सोपा उपाय

नामस्मरण करा. सर्व समस्या सुटतील! हाहा
चन्द्रशेखर

अतिशय महत्वाच्या व जिव्हाळ्याच्या विषयावरील लेख

श्री. नानवटी यांचे प्रथम् हा लेख लिहिल्याबद्दल अभिनंदन.अतिशय महत्वपूर्ण विषयावरचा हा लेख आहे असे मला वाटते. लैंगिक संबंध बर्‍याच काळ ठेवणार्‍या प्रत्येक जोडप्याला, लैंगिक संबंधात तोचतोचपणा आला, की ही समस्या कमी जास्त प्रमाणात भेडसावतेच. नानवटींच्या श्रीयशला ती जरा जास्त प्रमाणात भेडसावते आहे असे वाटते. पण या समस्येचे निराकरण करण्याच्या ऐवजी व्हर्चुअल किंवा सायबर सेक्सचा त्याने केलेला उपाय त्याची समस्या अधिकच बिकट करील असे वाटते. 'ऍट् द बेस्ट' ही एक तात्पुरती वेदनाशामक गोळी होऊ शकेल. ओषध नाही.
ही समस्या बर्‍याच कारणांनी उत्पन्न होते असे वाटते.प्रत्येकाच्या मनात त्याला आकर्षण वाटणारा एक पार्टनर असतो. त्या पार्टनरचे प्रत्यक्ष रूप जसजशी वर्षे जातात तसतसे बदलते. उदाहरणार्थ, स्त्रीचे बेढब रित्या स्थूल होणे, पुरुषाचे पोट प्रमाणाबाहेर सुटणे किंवा त्याला टक्कल पडणे. असे झाले की त्या व्यक्तीचे आपल्या जोडीदारावर जरी प्रेम असले तरी लैंगिक संबंध त्याला नको वाटतात. या शिवाय जागेची अडचण, मुले मोठी झाल्यामुळे संबंधात येणारा चोरटेपणा, एका पार्टनरची हट्टी (Adamant) व काहीही बदलाला तयार न होण्याची वृत्ती या सारखी अनेक कारणे पण असू शकतात.
या समस्येचे योग्य निराकरण करण्याचा योग्य उपाय म्हणजे त्या जोडप्याने आपल्या संबंधात नवीनपण आणणे.हा नवीनपणा आणण्यासाठी दोघांनी स्वतःला जास्त आकर्षक बनवणे( उदाहरणार्थ स्त्रीने केस कापणे, पुरुषाने पोट कमी करणे) हे ही आवश्यक असते. या शिवाय, दोघांचेच कार्यक्रम आखणे (नाटक सिनेमा, पोहायला जाणे, लग्नाचा वाढदिवसासाठी परगावाला जाणे ) हे ही महत्वाचे बनते. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्यक्ष संबंधातही नाविन्य आणणे गरजेचे असते. या उपायांनी बहुतेक जोडप्यांचे संबंध परत निरामय बनतात.
श्रीयश् आणि नीता यांनी हे उपाय करून पहावेत. तरीही जर समस्या तशीच राहिली तर तज्ञांचा सल्ला घेण्याशिवाय पर्याय उरत नाही.
चन्द्रशेखर

छान

छान!
आपला प्रतिसाद आवडला.
संबंधातील ताजेपणा टिकवण्यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न करणे आणि त्यांचे सातत्य राखणे महत्त्वाचे आहे.

आपला
सहमत
गुंडोपंत

ढोबळ निरीक्षण तसेच मिडलाईफ क्रायसिस

हा नवीनपणा आणण्यासाठी दोघांनी स्वतःला जास्त आकर्षक बनवणे( उदाहरणार्थ स्त्रीने केस कापणे, पुरुषाने पोट कमी करणे) हे ही आवश्यक असते.

हे निरीक्षण किंवा उपाय योग्य असला आणि अंमलात आणण्याजोगा असला तरी बराच ढोबळ आहे कारण असे असते तर अनेक रूपवान स्त्रियांचे नवरे दुसर्‍या स्त्रीकडे न बघते किंवा अनेक हँडसम नवर्‍यांच्या बायका दुसर्‍या पुरूषाची अपेक्षा न ठेवत्या. एक उदाहरण सांगायचे झाले तर प्रिन्सेस डायनासारखी बायको असताना चार्ल्सला कॅमिला न आवडती. (माझ्यामते डायना ही कॅमिलापेक्षा दिसण्यात उजवी असून तिने लग्नानंतर केसही कापले होते. :-))

येथे सार्वत्रिक समस्या अशी आहे की अनेक वर्षांच्या सहवासानंतर आपल्याला समोरच्या व्यक्तीतील असलेले/ नसलेले दोषच अधिक दिसू शकतात. हल्लीच वाचनात आलेल्या एका लेखात लग्नापूर्वी आपली/ला प्रेयसी/ प्रियकर हा जगात एकमेव आहे किंवा त्याच्याशिवाय आपण जगूच शकणार नाही असे म्हणणारी माणसे लग्नानंतर वर्षा दोनवर्षांत -

"केवढा घोरतो हा, याच्यासोबत एका खोलीत रात्री झोपणेही शक्य नाही" किंवा "सतत स्वयंपाकघरात राहून अंगाला मसाल्यांचे वास येतात तुझ्या. प्लीज दूर जा." असे म्हणू लागतात. अशावेळी संबंधात नवीनपणा आणला तरी तो सतत राहू शकत नाही किंवा सतत नवीनपणा आणण्यासाठी काय करत राहावे याचा उपाय मिळेलच असे सांगता येत नाही. उदाहरणार्थ, आज केस कापले, उद्या पन्नाशीत शॉर्टस्कर्ट घालून फिरू का? किंवा टक्कल पडले म्हणून विग घालून फिरू का? असे प्रश्न नजरेआड करता येणार नाहीत. तेव्हा हे तात्पुरते उपाय आहेत. ते जोडप्यांनी करावेतच पण ते कायमस्वरूपी उपाय ठरू शकत नाहीत.

एखादा माणूस का आवडतो आणि का आवडेनासा होतो याबाबत चटकन ठोकताळे मांडता येत नाहीत. जया बुटकी वाटली म्हणून अमिताभला उंच रेखा हवी झाली असे स्पष्ट ठोकताळे मांडता येत नाहीत आणि मांडले तर त्यावर उपाय असेलच असे नाही कारण तुमचा जोडीदार सर्वगुणसंपन्न असणे अशक्य आहे.

लग्नबाह्य संबंध हे लग्नव्यवस्था अंमलात आली त्याक्षणीच निर्माण झाले असावेत. :-) वैयक्तिक निर्बंध, जोडीदारातील गुण शोधणे आणि त्यांची कदर करणे (उद्या श्रीयश आजारी पडला तर सेवेला ती भासमय जगातील आभासी व्यक्ती येणार नसते) आणि त्या जोडीला वरील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे जोडीदाराची आपल्यातील रूची कायम रहावी म्हणून प्रयत्न करणे हे आवश्यक आहे.

आता राहिला प्रश्न एकनिष्ठतेचा तर लग्न हे दोघांत होते. तो एक करार मानला जातो. त्याचा पायाच एकमेकांशी सुखा-दु:खात एकनिष्ठ राहण्यासाठी असतो. तेथे दोघांनी मिळून एकजुटीने एकनिष्ठ न राहण्याचा निर्णय घेतला तर प्रश्नाची संहती कमी होऊ शकेल. (प्रश्न मिटणार नाही कारण लग्नात केवळ पती-पत्नीच येत नसून त्यांच्या संततीही येतात आणि त्यांना असे आईबाप नको असणे किंवा त्यांची लाज, तिटकारा वाटणे शक्य आहे.) परंतु, असे सामंजस्याने निर्णय होत नाहीत असे वाटते. झाले तर उत्तम आहे.

एक पत्नी / पती व्रताच्या जाचक बंधनातून हे आलेले असावे.

हम्म! लग्नाचे बंधन जाचक वाटू शकेल परंतु एक पत्नी/पतीचे व्रत खरेच जाचक आहे का? म्हणजे कोणता नवरा (किंवा पुरूष) एकावेळी दोन बायका सांभाळण्याची हिम्मत करू शकतो किंवा कोणती बाई दोन नवरे सहन करू शकते ;-) ते जाणून घ्यायला आवडेल. माझ्यामते, बहुतांश पुरूषांना एक बायको आणि अनेक मैत्रिणी (बायांच्याबाबतीत उलट) असेच संबंध हवे असावेत. :-)

या संपूर्ण लेखात दुर्लक्षिला गेलेला मुद्दा मिडलाईफ क्रायसिसचा. तरुण मंडळींमध्ये एकनिष्ठ राहण्याची भावना जितकी दिसते, त्यापेक्षा ती मध्यमवयात ओसरत चालल्याची जाणीव अनेकांना होते. आपले वय वाढत चालल्याने आपल्यातील आकर्षण कमी तर होऊ लागले नाही ना या असुरक्षिततेच्या भावनेतून अनेकांना आपला जोडीदार सोडून इतर माणसांचा किंवा भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास हवाहवासा वाटू लागतो. यातील सर्वांनाच शारीरिक संबंध हवे असतात असे नाही. काहीजण रोमँटिक संबंधांवर समाधानी राहतात. (स्वप्नात कोण काय करतो त्याच्याशी मला व्यक्तिशः काही देणेघेणे नाही.) :-) बर्‍याचदा आपल्यातील चार्म (मराठी?) अद्यापही ओसरला नाही ही आत्मसुखाची जाणीव मिळवण्यास लोक उत्सुक असतात. मला वाटते ही फेझ (मराठी?) कालांतराने ओसरत असावी. परंतु, या काळातही जोडीदाराने समंजसपणा दाखवला तर तो संबंधांत उपयुक्त ठरत असावा.

हा लेख आणि मिड्लाइफ क्रायसिस

मी माझ्या प्रतिसादात जी उदाहरणे दिली आहेत ती केवळ उदाहरणे आहेत. सुचविलेले उपाय नाहीत याची कृपया नोंद घ्यावी. काय बदल करावयाचे ते प्रत्येक जोडप्याने मिळून ठरवायचे असते. प्रत्येकाला आकर्षण वाटणारी गोष्ट निरनिराळी असते त्याचे जनरलायझेशन करता येत नाही. बायकोच्या अंगाला मसाल्याचे वास येत असतील तर् स्नान करणे हा सोपा उपाय आहे. घोरू नये म्हणून वैद्यकीय उपाय आता आहेत.
या लेखाचा विषय Loss of Sexual appetite हा आहे. मिडलाइफ क्रायसिस हा या लेखाचा विषयच नाही. त्यावर आपण नवीन लेख लिहिल्यास स्वतंत्र चर्चा करता येईल.
चन्द्रशेखर

हा लेख आणि मिडलाईफ क्रायसिस

मी माझ्या प्रतिसादात जी उदाहरणे दिली आहेत ती केवळ उदाहरणे आहेत. सुचविलेले उपाय नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.

याचा विसर पडल्याचे माझ्या प्रतिसादातून कोठेही प्रतीत होते असे मला वाटत नाही. माझे म्हणणे एवढेच आहे की एखाद्याने दुसर्‍याला न आवडून घ्यायचे ठरवले तर कितीही प्रयत्न केले तरी ते पुरेसे नसतात.

प्रत्येकाला आकर्षण वाटणारी गोष्ट निरनिराळी असते त्याचे जनरलायझेशन करता येत नाही. बायकोच्या अंगाला मसाल्याचे वास येत असतील तर् स्नान करणे हा सोपा उपाय आहे. घोरू नये म्हणून वैद्यकीय उपाय आता आहेत.

पहिल्या वाक्याशी सहमतच आहे. दुसर्‍या वाक्याबद्दल मीही उदाहरणेच दिली. ते उपाय केले म्हणून कायमस्वरूपी इलाज मिळाला असे नाही.

या लेखाचा विषय Loss of Sexual appetite हा आहे.

नाही. हा लेखाचा विषय नाही. लेखाचा विषय लॉस ऑफ सेक्शुअल ऍपेटाईट टोवर्डस् योर स्पाऊस हा आहे.

मिडलाइफ क्रायसिस हा या लेखाचा विषयच नाही. त्यावर आपण नवीन लेख लिहिल्यास स्वतंत्र चर्चा करता येईल.

आपल्या जोडीदाराबाबत (किंवा स्वतंत्र) लॉस ऑफ सेक्शुअल ऍपेटाईट हा मिडलाईफ क्रायसिसचाच एक हिस्सा मानला जातो. येथेही श्रीयश ही व्यक्ती मध्यमवयीन आहे असा लेख वाचून माझा अंदाज झाला. चू. भू. दे. घे. त्यामुळे मी विषयाबाहेर काही लिहित आहे असे मला वाटत नाही तेव्हा उगीचच वेगळा स्वतंत्र लेख लिहिण्याची गरज वाटत नाही. जी काही चर्चा आहे ती येथेच करता येईल.

सहमत

त्यामुळे मी विषयाबाहेर काही लिहित आहे असे मला वाटत नाही तेव्हा उगीचच वेगळा स्वतंत्र लेख लिहिण्याची गरज वाटत नाही. जी काही चर्चा आहे ती येथेच करता येईल.

सहमत. तसेच प्रतिसादातील आशयाशीही सहमत. काही वेळा 'निरुपाय' हाच उपाय.
प्रकाश घाटपांडे

 
^ वर