चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण

ग्रहणे आणि त्यांचा तथाकथित प्रभाव या विषयावर उपक्रमावर चर्चा चालली होती. या चर्चेमध्ये आलेल्या प्रतिसादात कांही मूलभूत प्रश्न विचारून सभासदांनी या विषयाबद्दल आपली जिज्ञासा प्रकट केली आहे. माझ्या कल्पनेप्रमाणे हा संपूर्णपणे वेगळा विषय असल्यामुळे एका स्वतंत्र लेखात त्याबद्दल थोडक्यात माहिती देत आहे.

चंद्राचे स्थान
ग्रहण

सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांची प्रमाणबध्द प्रतिकृती (स्केल्ड मॉडेल) बनवायची असेल तर ब्रेबोर्न स्टेडियमएवढी जागा घ्यावी लागेल. त्याच्या मधोमध मोठ्या लाल भोपळ्याएवढा सूर्य ठेवावा, बाउंडरीलाइनवर वाटाण्याच्या आकाराची पृथ्वी आणि तिच्यापासून वीतभर अंतरावर मोहरीएवढा चंद्र असेल. साधारणपणे एवढ्या अंतरावरून हा चंद्र पृथ्वीभोवती महिन्यातून एक फेरी मारेल पण चंद्राला सोबतीला घेऊन पृथ्वी बाउंडरीलाइनवरून सूर्याभोवती वर्षातून एक प्रदक्षिणा घालेल. हा वेग चंद्गाच्या वेगापेक्षा अनेकपटीने जास्त असतो. त्यामुळे चंद्र पृथ्वीच्या आजूबाजूने राहून वळणावळणाच्या मार्गाने सूर्याभोवती फिरतो आहे असे स्टेडियममधल्या प्रेक्षकाला (दुर्बिणीतून पाहिले तर) दिसेल.

अमावास्येच्य़ा दिवशी पृथ्वीच्या सूर्याकडच्या बाजूला चंद्र असल्यामुळे सूर्यप्रकाशाने उजळलेला त्याचा अर्धा भाग पृथ्वीवरून दिसतच नाही, त्या दिवशीसुध्दा तो जागेवर असला तरी आपल्यासाठी अदृष्य असतो. पौर्णिमेच्या रात्री तो पृथ्वीच्या पलीकडल्या बाजूला असल्यामुळे त्याच्या जेवढ्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो तो पूर्णपणे पृथ्वीवरून दिसत असल्यामुळे त्याचे पूर्ण वर्तुळाकार बिंब दिसते. इतर दिवशी आपल्याला पृथ्वीवरून त्याचा प्रकाशमान भाग फक्त अंशतः दिसल्यामुळे चंद्राच्या कला दिसतात. पौर्णिमेच्या दिवशी (खरे तर रात्रीच्या वेळी) सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये पृथ्वी आली तर तिची सावली चंद्रावर जिथे पडेल तो भाग प्रकाशमान होणार नाही आणि आपल्याला दिसणार नाही. याला चंद्रग्रहण म्हणतात. अमावास्येला पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्ये चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर जिथे पडेल त्या भागात सूर्य निदान अंशतः झाकला गेल्यामुळे त्याचे पूर्णबिंब दिसणार नाही. हे सूर्यग्रहण झाले. सूर्य जर पूर्णपणे झाकला गेला तर ते खग्रास ग्रहण होते.

वरील चित्राप्रमाणे पाहता दर पौर्णिमेला चंद्रग्रहण आणि दर अमावास्येला सूर्यग्रहण लागायला हवे. पुन्हा एकदा प्रतिकृतीकडे वळल्यास ब्रेबोर्न स्टेडियमच्या समतल जमीनीवरून तो वाटाणा आणि मोहरी त्या दीप्तीमान लाल भोपळ्याच्या भोंवती फिरले आणि केवळ त्या भोपळ्यापासून त्यांचेवर प्रकाश पडत असला तर त्यांच्या सांवल्या एकमेकीवर पडणारच. पण प्रत्यक्षात आकाशातल्या चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा थोडी तिरपी असते. तिच्यात आणि पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा यात ५ अंशाचा कोन आहे. म्हणजेच प्रतिकृतीमधला वाटाणा जर सपाट जमीनीवरून भोपळ्याभोवती फिरत असेल, तर मोहरी कधी त्याच्या वरच्या बाजूला तर कधी खालच्या बाजूला असेल. ते तीघे एका सरळ रेषेत येणार नाहीत. त्याच प्रमाणे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी दर अमावास्येला किंवा पौर्णिमेला एका सरळ रेषेत येत नाहीत. पण हे खालीवर करतांना अधूनमधून ती मोहरी जमीनीच्या पातळीवर येत राहते, तसाच चंद्रसुध्दा पृथ्वीची कक्षा असलेल्या प्रतलावर येतो. जर पौर्णिमेला किंवा अमावास्येला हे घडले तर मात्र कांही काळासाठी हे तीन्ही गोल एका सरळ रेषेत येतात आणि चंद्र किंवा सूर्याला ग्रहण लागते. इतर कोणत्याही तिथीला हे तीघे कधीही एका रेषेत येऊ शकतच नाहीत.

चंद्र हा पृथ्वीपेक्षा आकाराने लहान आहे आणि त्याची सावली लहान लहान होत जाऊन पृथ्वीवरील एका छोट्याशा जागेवर पडते. त्यामुळे सूर्यग्रहण फक्त तेवढ्या भागातच दिसते, ते सगळीकडे दिसत नाही. त्यातही कांही ठिकाणी सूर्यबिंब पूर्णपणे झाकले गेल्यामुळे खग्रास ग्रहण लागते तर बाजूच्या मोठ्या प्रदेशात ते अर्धवटच झाकले गेल्यामुळे खंडग्रास ग्रहण लागते. पृथ्वीच्या उरलेल्या भागात ते दिसतच नाही. सूर्याचे आणि चंद्राचे बिंब पृथ्वीवरून साधारण एकाच आकाराचे दिसते. त्यामुळे च्ंद्राच्या बिंबामुळे सूर्याचे बिंब कांही क्षणापुरतेच झाकले जाते. अशा प्रकारे खग्रास सूर्यग्रहण अगदी थोडा वेळ टिकते. त्यानंतर लगेच चमचमती हि-याची अंगठी (डायमंड रिंग) दिसते.

चंद्राला मात्र स्वतःचा प्रकाश नसतोच. त्यामुळे पृथ्वीच्या सावलीमुळे त्याचा जो भाग अंधारात राहतो तो पृथ्वीवरून कोठूनच दिसत नाही. पृथ्वीवरील ज्या भागात त्यावेळी चंद्र आकाशात दिसतो त्या सर्व जागी त्याचा आकार साधारणपणे एकसारखाच दिसतो. पृथ्वीची सावली चंद्राच्या आकाराच्या तीन चार पट मोठी असल्यामुळे चंद्राला लागलेले ग्रहण जास्त सावकाशपणे चालते. या प्रकारे चंद्रग्रहण पृथ्वीवर सगळीकडे एकसारखेच दिसते, फक्त त्याची स्थानिक वेळ आणि आकाशातली चंद्राची जागा वेगवेगळ्या जागी वेगळी असते. वरील चित्रात जी गडद सावली दाखवली आहे ती जिथे पडते त्या भागात ग्रहण दिसते. जी हलक्या रंगाची सावली आहे, ती जिथे पडते त्या भागात येणारे प्रकाशकिरण संख्येने कमी झाल्यामुळे अंधुकपणा येतो. या अवस्थेला ग्रहणाचे वेध लागले असे म्हणतात.
-----------------------------------------------------------------------------------------

आता उपस्थित झालेल्या कांही प्रश्नांची उत्तरे

एकाच वर्षात, कॅलेंडर ईअर किंवा सलग बारा महिन्यांचा काल यात, तीन ग्रहणे येतात काय ?
- येऊ शकतात. बहुतेक दर वर्षी दोन किंवा तीन ग्रहणे येतातच. या वर्षी निदान चारपाच तरी ग्रहणे आहेत. त्यातले एक आधीच येऊन गेले, आणखी तीन लवकरच येणार आहेत, डिसेंबरपर्यंत कदाचित आणखी एकादे येईल.

एकाच महिन्यात, कॅलेंडरमंथमध्ये किंवा सलग तीस दिवसांचा काल यात, तीन ग्रहणे येतात काय ?
- ज्या अमावास्येला सूर्यग्रहण लागते त्याच्या आधीच्या किंवा नंतरच्या पौर्णिमेला बहुतेक वेळी चंद्रग्रहण असते. त्यामुळे सलग दोन ग्रहणे नेहमी येतात. सलग तीन ग्रहणे येण्याची घटना फार क्वचित घडते. या वर्षी ७ जुलै, २१ जुलै आणि ५ ऑगस्ट या दिवशी लागोपाठ तीन ग्रहणे येत आहेत. यातील पहिले आणि तिसरे चंद्रग्रहण असून दुसरे सूर्यग्रहण आहे. भारतीय पंचांग पध्दतीमध्ये प्रतिपदेला महिना सुरू होतो आणि आपल्याकडे अमावास्येला तर उत्तर भारतात पौर्णिमेला तो संपतो. या काळात फक्त एकच पौर्णिमा आणि एकच अमावास्या धरली जाते त्यामुळे तीन ग्रहणे येणे अशक्य आहे. ३१ दिवसांच्या इंग्रजी महिन्यात दोन अमावास्या किंवा पौर्णिमा येणे शक्य आहे कारण यांच्या दरम्यानचा कालावधी फक्त २९ किंवा ३० दिवसांचा असतो. ज्या महिन्यात दोन पौर्णिमा (फुल मूनडे) येतात त्यातील दुस-याला 'ब्ल्यू मून' म्हणतात. तो क्वचित कधी तरी येतो यामुळे 'वन्स इन अ ब्ल्यू मून' हा वाक्प्रचार पडला आहे. अशा क्वचित कधी तरी येणा-या महिन्यात तीन तीन ग्रहणे लागण्याचा योग अतीशयच दुर्मिळ असेल.

केवळ कालगणनापद्धतीच्या चमत्कृतीमुळे येणार्‍या एकाहून अधिक पौर्णिमा अथवा अमावास्या या खगोलशास्त्रीयदृष्ट्या एकाहून अधिक पौर्णिमा अथवा अमावास्या मानता येणार नाहीत असे वाटते. (पुन्हा चूभूद्याघ्या.)
- अगदी बरोबर.
यावर श्री वाचनक्वी यांनी यावर असा खुलासा केला आहे.
तिथीचा क्षय: आजच्या सूर्योदयाच्यावेळी जर प्रथमा असेल, आणि जर त्या दिवसभराच्या काळात द्वितीया लागून संपली आणि उद्याच्या सूर्योदयाला तृतीया लागलेली असली, तर द्वितीयेचा क्षय झाला असे समजतात.
वृद्धी: नुकतीच सुरू झालेली प्रथमा जेव्हा पुढच्या सूर्योदयालाही शिल्लक असते तेव्हा लागोपाठ दोन दिवस सूर्योदयाला प्रथमा असल्याने, तिची वृद्धी झाली असे समजण्यात येते. प्रत्यकात कुठलीही तिथी गाळली जात नाही किंवा दोनदा येत नाही.
तिथीचा क्षय वा वृद्धी होण्याचे मुख्य कारण चंद्राची चंचल वा स्थिरगती. चंद्र २४ तासात कमीतकमी साडेअकरा अंश तर जास्तीतजास्त सव्वापंधरा अंश चालतो. जेव्हा चंद्राची गती अत्यंत जलद असेल तेव्हा तिथीचा(आणि नक्षत्राचाही!) क्षय होतो आणि अतिशय मंद असेल तेव्हा वृद्धी. रवीपासून चंद्राचे १२ अंश अंतर पूर्ण झाले की एक तिथी पूर्ण झाली. एकूण अंश ३६०, म्हणून महिन्यात ३० तिथ्या असतात.
सूर्य कोणत्याही राशीत असो, त्यापासून चंद्र जितक्या अंश अंतरावर असेल त्या अंतरावरून तिथी ठरते. अमावास्येला सूर्य-चंद्र एकत्र असतात. चंद्र सूर्याच्या १२ अंश पुढे गेला की एक तिथी संपते. सूर्यास्ताच्या वेळी चंद्र डोक्यावर आला की त्या क्षणी सप्तमी संपून अष्टमी लागली असे समजावे. पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आकाशाचे १५ भाग करावेत. बरोब्बर सूर्यास्ताला चंद्र ज्या क्रमांकाच्या भागात असेल ती (शुक्लपक्षातली) तिथी. कृष्णपक्षात सूर्योदयाच्या वेळी चंद्र ज्या क्रमांकाच्या भागात असेल तो क्रमांक ३० मधून वजा केला की त्यावेळची तिथी मिळते.
किचकट आहे, पण याहून कुणी सोपे करून सांगितले तर बरे होईल.--वाचक्‍नवी
- - - - - - एक लहानसा प्रयत्न करतो आहे. रोज आकाशात उगवणारा चंद्र आदल्या दिवसाहून ५० मिनिटे उशीरा उगवतो हे आपल्याला दिसते, त्याचप्रमाणे तो रोज वेगळ्या नक्षत्रात असल्याचे पंचांगात लिहिले असते. ज्यांना थोडेफार ज्ञान आणि निरीक्षण करण्याची संवय असेल त्यांना आकाशात तसे प्रत्यक्षात दिसतेसुध्दा. आकाशगोलाच्या एकूण ३६० अंशाचा एक सत्तावीसावा भाग म्हणजे सरासरी सुमारे १३ अंशाने चंद्र दररोज राशीचक्रात पुढे सरकतो. सूर्यदेखील रोज सरासरी १ अंशाने पुढे सरकत असल्यामुळे चंद्र त्याच्यापासून सुमारे १२ अंशाने दूर जात असतो. पंचांगाच्या नियमानुसार दर बारा अंशांच्या टप्प्याला तिथी बदलते. चंद्र हा पृथ्वीभोवती फिरताफिरताच सूर्याभोवती फिरत असतो, तसेच त्याची कक्षा लंबवर्तुळाकार असल्यामुळे त्याचा वेग कमीजास्त होत असतो. या सर्वांमुळे चंद्राला सूर्यापासून बारा अंश दूर जाण्यासाठी कधी एकवीस बावीस तास लागतात तर कधी ते चोवीसाहून जास्त लागतात. जर सूर्योदयानंतर लगेच तिथी बदलली आणि त्यानंतर बावीस तासात ती पुन्हा बदलली तर तोपर्यंत पुढील दिवस उगवत नाही. त्यामुळे तिचा क्षय होतो. त्याचप्रमाणे एका दिवशी सूर्योदयाच्या थोडे आधी नवी तिथी लागली आणि ती पंचवीस तास टिकली तर दुसरे दिवशीसुध्दा तीच असते. यावेळी त्या तिथीची वृध्दी होते.
------------------------------------------------------------------------------

मूळ चर्चा भविष्यकथनावर होती. यामुळे ही सविस्तर माहिती त्या जागी देणे मला अप्रस्तुत वाटल्याने हा वेगळा लेख लिहिला आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

चित्रांमुळे समजायला सोपे

नेहमीसारखेच वाचायला प्रवाही आणि चित्रांमुळे समजायला सोपे असे स्पष्टीकरण.

समजायला सोपे

अशा प्रकारे विषय समजावून सांगितल्यास विषयाचे नीटपणे आकलन होऊ शकते.
धन्यवाद!

सहमत / सारांश

बर्‍याच संकल्पनांबद्दल - एका वाचनात डोक्यात लख्ख प्रकाश पडला असा दावा निश्चितच करू शकणार नाही, परंतु - अगोदर 'असे (किंवा या नावाचे) काहीतरी असते' अशा पुसटशा माहितीहून अधिक काहीही नव्हते, त्या मानाने त्यामागील कारणमीमांसेबद्दल थोडीथोडी कल्पना हा लेख वाचून येऊ लागली आहे, एवढे निश्चित. (अधिक लख्ख प्रकाश हा बहुधा केवळ विषयाच्या सखोल अभ्यासाने - विषयात तेवढे सखोल स्वारस्य असल्यास - शक्य व्हावा.) सामान्य वाचकांस उद्देशून आणि सामान्य वाचकांच्या शंकानिरसनाच्या उद्देशाने लिहिलेला हा लेख विषयाची केवळ तोंडओळख यापेक्षाही अधिक काही आणि सामान्य वाचकास सहज कळेल अशा स्वरूपात देण्यात यशस्वी झाला आहे, असे म्हणावेसे वाटते.

सारांश म्हणून, मला या लेखातून जे आकलन झाले, त्यातील महत्त्वाचे मुद्दे असे:
- सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण होण्यासाठी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे एका रेषेत येणे आवश्यक आहे, आणि असे केवळ पौर्णिमेस किंवा अमावास्येसच होऊ शकते. (पण होतेच असे नाही.)
- चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या कक्षेच्या पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेशी असलेल्या कलामुळे, प्रत्येक पौर्णिमेस अथवा अमावास्येस सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे एका रेषेत येत नाहीत. (जेव्हा येतात, तेव्हा ग्रहण होते.)
- चंद्राच्या पृथ्वीवरील सावलीच्या तुलनेत पृथ्वीची चंद्रावरील सावली ही खूपच मोठी असल्यामुळे चंद्रग्रहण हे सूर्यग्रहणाच्या तुलनेत अधिक काळ टिकते.
- चंद्राला स्वतःचा प्रकाश नसल्यामुळे पृथ्वीच्या सावलीमुळे झाकलेला त्याचा भाग पृथ्वीवरून कोठूनही दिसत नाही, त्यामुळे चंद्रग्रहण हे पृथ्वीवरून कोठूनही (स्थानिक वेळेप्रमाणे) दिसू शकते.
- चंद्राची पृथ्वीवरील सावली ही (तुलनेने लहान आकारामुळे) पृथ्वीचा थोडाच भाग व्यापू शकत असल्यामुळे (आणि केवळ सावली पडलेल्या भागातच सूर्यग्रहण दिसत असल्यामुळे) सूर्यग्रहण हे पृथ्वीच्या मर्यादित भागातूनच दिसू शकते.
- सूर्याचे आणि चंद्राचे बिंब हे पृथ्वीवरून साधारणपणे सारख्याच आकाराचे दिसत असल्यामुळे चंद्रबिंब हे कधीकधी सूर्यबिंबास पूर्णपणे झाकू शकते. असे झाल्यास खग्रास सूर्यग्रहण दिसते. चंद्रबिंबाने सूर्यबिंबास केवळ अंशतःच झाकल्यास खंडग्रास सूर्यग्रहण दिसते. सूर्यग्रहणाचे वेळी एकाच वेळी काही भागांत चंद्रबिंबाने सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकल्यामुळे अशा भागांत खग्रास सूर्यग्रहण तर इतर काही भागात अंशतःच झाकल्यामुळे अशा भागांत खंडग्रास सूर्यग्रहण दिसू शकते.
- तिथी ही चंद्राच्या सूर्याला सापेक्ष स्थितीच्या दैनंदिन बदलावरून ठरते. बारा अंशाचा बदल झाल्यावर तिथी बदलते. मात्र सूर्योदयाच्या वेळची तिथी ही संपूर्ण दिवसाची तिथी मानली जाते. (हे बरोबर कळले काय?)
- चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची गती हा चंद्राच्या सूर्याला सापेक्ष गतीचा एक भाग (component) असल्यामुळे, आणि चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा लंबवर्तुळाकार असल्यामुळे, परिणामी चंद्राची सूर्याला सापेक्ष स्थिती बदलण्याचा वेग स्थिर नाही. (या भागाचा तपशील अंधुकसा कळला, तपशिलावर अधिक विचार करावा लागेल, परंतु हा वेग स्थिर नाही एवढे निश्चित कळले.) परिणामी, चंद्राच्या सूर्याला सापेक्ष स्थितीत बारा अंशाचा बदल होण्यासाठी कधी सूर्योदय-ते-सूर्योदय काळापेक्षा अधिक तर कधी सूर्योदय-ते-सूर्योदय काळापेक्षा कमी वेळ लागू शकतो. (सूर्योदय-ते-सूर्योदय काळही स्थिर नसतो हा आणखी एक भाग.) त्यामुळे 'सूर्योदयाच्या वेळची तिथी ती दिवसाची तिथी' या तत्त्वाप्रमाणे, कधी एखाद्या सूर्योदयास आदल्या दिवशीच्या सूर्योदयाच्या वेळचीच तिथी चालू राहू शकते (आणि म्हणून लागोपाठ दोन दिवस तीच तिथी येते, म्हणजेच तिथीची वृद्धी होते), तर कधी आदल्या दिवशीच्या सूर्योदयानंतर परंतु त्या दिवशीच्या सूर्योदयाआधी दोनदा तिथी बदलल्याने सूर्योदयाच्या वेळी आदल्या सूर्योदयाच्या तिथीनंतरची तिथी गाळली जाऊन एकदम त्यापुढची तिथी येते (म्हणजेच आदल्या दिवशीनंतरची क्रमाने येणारी तिथी गायब होऊन त्यापुढची तिथी येते, म्हणजेच तिथीचा क्षय होतो). (हा भाग बरोबर कळला काय?)

खास दिनविशेष

- तिथी ही चंद्राच्या सूर्याला सापेक्ष स्थितीच्या दैनंदिन बदलावरून ठरते. बारा अंशाचा बदल झाल्यावर तिथी बदलते. मात्र सूर्योदयाच्या वेळची तिथी ही संपूर्ण दिवसाची तिथी मानली जाते. (हे बरोबर कळले काय?)

मलाही असेच वाटते. परंतु क्षय झालेल्या तिथीला एकादा सणवार किंवा व्रतवैकल्य असेल तर ते रद्द होत नाही. सूर्योदयानंतर ज्या वेळेत ती तिथी असते त्या वेळेत त्याविषयीची कर्मे केली जातात. अमुक इतके वाजल्यानंतर गणपतीची स्थापना करायची वगैरे सांगितले जाते कारण सूर्योदयाच्या वेळी तृतिया असते आणि चतुर्थी काही वेळानंतर लागते. पंचांगात अनेक वेळा दोन एकादशा दाखवतात, तेंव्हा वृद्धी असतेच असे नाही. या बाबतीत वेगवेगळ्या गोष्टी निरनिराळ्या परंपरेनुसार केल्या जातात. अशा प्रकारच्या अनिश्चिततेमुळेच रोजच्या वापरात पंचांगाचा उपयोग मागे पडला आणि इंग्रजी कॅलेंडर लोकप्रिय झाले असावे.

शंका

(सर्वप्रथम, एक स्पष्टीकरण: माझ्या वरील प्रतिसादातील 'हे बरोबर कळले काय?' हा लाल अक्षरांतील मजकूर 'या भागाचे आकलन मला योग्य प्रकारे झाले काय, ते कृपया सांगावे' अशा अर्थी घ्यावा.)

क्षय झालेल्या तिथीला एकादा सणवार किंवा व्रतवैकल्य असेल तर ते रद्द होत नाही. सूर्योदयानंतर ज्या वेळेत ती तिथी असते त्या वेळेत त्याविषयीची कर्मे केली जातात. अमुक इतके वाजल्यानंतर गणपतीची स्थापना करायची वगैरे सांगितले जाते कारण सूर्योदयाच्या वेळी तृतिया असते आणि चतुर्थी काही वेळानंतर लागते.

हा भाग व्यवस्थित कळला.

पंचांगात अनेक वेळा दोन एकादशा दाखवतात, तेंव्हा वृद्धी असतेच असे नाही. या बाबतीत वेगवेगळ्या गोष्टी निरनिराळ्या परंपरेनुसार केल्या जातात.

हा भाग कळला नाही. कृपया अधिक स्पष्ट करू शकाल काय?

अशा प्रकारच्या अनिश्चिततेमुळेच रोजच्या वापरात पंचांगाचा उपयोग मागे पडला आणि इंग्रजी कॅलेंडर लोकप्रिय झाले असावे.

काहीसा सहमतीकडे कल आहे.

'अधिक महिना' हाही पंचांगातला असाच आणखी एक अनिश्चित प्रकार मानता यावा. बहुधा (शेतीच्या दृष्टिकोनातून ऋतू दरवर्षी साधारणतः त्याच वेळी यावेत या दृष्टीने) चांद्रपंचांगाची सौरवर्षाशी सांगड घालण्यासाठी एक पंचांगदुरुस्ती (correction) म्हणून हा मार्ग अवलंबण्यात येत असावा की काय, अशी शंका येते.

पाश्चात्य कॅलेंडरातही पंचांगदुरुस्त्या होत नाहीत असे नाही, परंतु त्या तुलनेने कमी असाव्यात, त्यामुळे (आणि विशेषतः त्यातील एकाच आवृत्तीचे आज जागतिकीकरण झालेले असल्यामुळे) लोकांच्या पचनी पडण्यास सोप्या जात असाव्यात, आणि त्यामुळे आजचे जागतिक ("इंग्रजी") कॅलेंडर लोकप्रिय असावे. परंतु हाही प्रकार नेहमी तेवढा असंदिग्ध होता असे वाटत नाही.

एक सौर वर्ष हे तीनशेपासष्ट संपूर्ण दिवसांचे होत नसून तीनशेपासष्ट दिवसांनंतरही वर्ष पूर्ण होण्यास दिवसाचा काही अपूर्ण भाग बाकी असतो, हे या विविध दुरुस्त्यांचे मूळ आहे. त्यातून परत अशा दुरुस्त्या युरोपात आणि नंतर अमेरिकेतसुद्धा वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या वेळी लागू झाल्याने भूतकाळात तारखांचे झालेले घोळ प्रसिद्ध आहेत.

लीपवर्षातील लीप दिवस ही अशी एक प्राथमिक दुरुस्ती मानता यावी. परंतु ही दुरुस्तीसुद्धा अचूक न निघाल्याने त्याच्या नियमात (विशेषतः शतकाचे वर्ष हे लीपवर्ष धरावे की नाही या मुद्द्यावरून) वेळोवेळी बदल केले गेले. तरीही अजून काही त्रुटी असल्याचे व शतकानुशतके अशी त्रुटी साचत गेल्याचे लक्षात आल्याने, त्याची दुरुस्ती म्हणून युरोपातील विविध देशांत वेगवेगळ्या वेळी एका ठराविक वर्षातील एका ठराविक महिन्यातील दहा ते तेरा दिवस गाळले गेले. (सर्वप्रथम पोपच्या हुकुमावरून १५८२मध्ये युरोपातील स्पेन व पोर्तुगालसह काही कॅथॉलिक देशांत ऑक्टोबरातील दहा दिवस वगळण्यात आले, तर सर्वात शेवटी ग्रीसमध्ये १९२३ साली फेब्रुवारीतील अखेरचे तेरा दिवस वगळण्यात आले. रशियातील कम्युनिस्ट राज्यक्रांती यशस्वी झाल्यानंतर १९१८ साली फेब्रुवारीतील तेरा दिवस वगळण्यात आले. ब्रिटिश साम्राज्यात आणि वसाहतींत आणि तत्कालीन अमेरिकेत १७५२ साली ३ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर हे अकरा दिवस वगळण्यात आले. अलास्का प्रदेश अमेरिकेने रशियाकडून विकत घेतल्यानंतर १८६७ साली अलास्कामध्ये ७ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर असे अकरा दिवस वगळण्यात आले.) या दुरुस्तीची अंमलबजावणी वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या वेळी करण्यात आल्याने, मध्यंतरीच्या काळात (१) वेगवेगळ्या देशांत एकाच दिवशी वेगवेगळी तारीख असणे, आणि (२) एका देशात गाळण्यात आलेली एखादी तारीख ही दुसर्‍या देशात वैध तारीख असणे, या दोन्ही गोष्टी शक्य आहेत. (१५८२ ते १७५२च्या दरम्यानच्या काळात हिंदुस्थानातील पोर्तुगीज वसाहतींत आणि त्यांच्या सान्निध्यात असणार्‍या ब्रिटिश वसाहतींत वेगवेगळी कॅलेंडरे लागू होती काय, आणि तशी ती असल्यास अशा प्रदेशांच्या परस्परव्यवहारांत आणि तेथील ऐतिहासिक दस्तऐवजांमधील तारखांच्या नोंदींत या बाबीमुळे फरक पडत असल्यास काय फरक पडत होता याचा तपास करणे रोचक ठरेल.)

अवांतर: रशियातील कम्युनिस्ट राज्यक्रांती झाली तेव्हा रशिया (आणि ग्रीससारखे काही थोडे देश) वगळता पाश्चात्य कॅलेंडर पाळणार्‍या उर्वरित जगाच्या बहुतेक भागांत दुरुस्त केलेले नवीन कॅलेंडर लागू होते. त्या नवीन कॅलेंडराप्रमाणे ही क्रांती झाली तेव्हा नोव्हेंबर महिना चालू होता. रशियात मात्र तेव्हा (आणि राज्यक्रांती यशस्वी होऊन नवीन सरकारने फतवा काढून बदलेपर्यंत) जुनेच कॅलेंडर चालू होते, आणि त्या जुन्या कॅलेंडराप्रमाणे ऑक्टोबर महिना चालू असल्यामुळे या राज्यक्रांतीस 'ऑक्टोबर क्रांती' म्हटले जाते. 'रशियातील ऑक्टोबर क्रांती नोव्हेंबरात झाली' असा एक 'रशियन विनोद' एके काळी प्रचलित असल्याबद्दल ऐकलेले आहे.

वर्षाची सुरुवात कोणत्या दिवसापासून धरायची, याच्याबद्दलच्या नियमाची अंमलबजावणीसुद्धा वेगवेगळ्या देशांत फतव्याने वर्षाच्या मध्येच कधीतरी झाल्याने जानेवारी-ते-डिसेंबर कालावधीमधली एखादी तारीख एखाद्या सालातली तर त्याच्या पुढल्या दिवसाची तारीख त्यापुढील सालातली, असेही प्रकार झालेले आहेत, असे कळते. अधिक तपशील शोधावे लागतील.

(ग्रेगोरियन कॅलेंडरातील वैचित्र्याबद्दलचे बरेचसे तपशील विकीवरून आणि आंतरजालावरील विविध अन्य स्रोतांवरून साभार.)

बरोबर कळणे

एक गोष्ट आधीच स्पष्ट करायला हवी. मी या विषयाचे कधीच शास्त्रोक्त शिक्षण घेतलेले नाही. अवांतर वाचनातून मला जेवढे उमगले त्याच्या आधाराने मी लिहितो.
आपण केलेल्या सारांशावरून मला जेवढे अभिप्रेत होते ते बहुतेक करून आपल्याला समजले असावे असे मला वाटते. (हा माझ्या लिखाणाचा गुण आहे की आपल्या आकलनशक्तीचा? कदाचित दोघांच्या कंपनसंख्या जुळत असाव्यात.)
मी दिलेल्या प्रतिसादात क्षय तिथीबद्दल थोडे स्पष्टीकरण करून अधिक माहिती दिली आहे.
कालनिर्णयात दिल्याप्रमाणे १६ ऑगस्टला श्रावण कृ.१०/११ आणि १७ ऑगस्टला श्रावण कृ.१२ असे लिहिले आहे. तसेच त्यांच्या समोर अनुक्रमे स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशी असेसुध्दा लिहिले आहे. यातील कोणत्याच दिवशी सूर्योदयाच्या वेळी एकादशी ही तिथी नाही. हा परंपरागत पध्दतीचा भाग आहे.

आपण ग्रेगोरियन कॅलेंडरबद्दल सुंदर माहिती दिली आहे. माझ्या मते त्याचा एक स्वतंत्र लेख होऊ शकेल. अशा प्रकारचा लेख अधिक महिन्यावर लिहिण्याचा माझा विचार आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर ही फक्त दुरुस्तीच नाही तर त्यामागे तात्विक बैठक आहे ती सविस्तर विशद करणे आवश्यक आहे.

आपल्या प्रतिसादाबद्दल आभार

स्मार्त एकादशी आणि भागवत.

दशमी, एकादशी अगर द्वादशीचा क्षय किंवा द्वादशीची वृद्धी असेल तर, अथवा एकादशीच्या सूर्योदयापूर्वीच्या दीड तासात जर दशमी आली असेल तर बहुधा, दोन एकादश्या येतात.
१. एकादशीच्या सूर्योदयापूर्वीच्या दीड तासात दशमी असली तर, दशमी किंवा एकादशीचा क्षय असतो; क्वचित्काळी नवमीचाही क्षय असतो. तेव्हा, द्वादशीच्या दिवशी भागवत व त्याच्या पूर्वदिवशी स्मार्त एकादशी घ्यावी.
२. द्वादश्या जर दोन असतील तर पहिल्या द्वादशीच्या दिवशी भागवत आणि त्याच्या पूर्वदिनी स्मार्त एकादशी समजावी.
३. द्वादशीचा क्षय झाला असेल तर, एकादशी व द्वादशीच्या युग्मादिवशी भागवत आणि त्याच्या आदल्या दिवशी स्मार्त एकादशी धरतात.
४. एकादश्या जर दोन असतील तर दोन्ही पक्षांनी दुसरी एकादशी धरावी.
५. वरील चार अपवादांखेरीजकरून, साधारणपणे सूर्योदयासमयी जी एकादशी येते ती दोन्ही पक्षांची समजावी.--वाचक्‍नवी

अनिश्चित अधिकमास?

>>'अधिक महिना' हाही पंचांगातला असाच आणखी एक अनिश्चित प्रकार मानता यावा. बहुधा (शेतीच्या दृष्टिकोनातून ऋतू दरवर्षी साधारणतः त्याच वेळी यावेत या दृष्टीने) चांद्रपंचांगाची सौरवर्षाशी सांगड घालण्यासाठी एक पंचांगदुरुस्ती (correction) म्हणून हा मार्ग अवलंबण्यात येत असावा की काय, अशी शंका येते.<<
चान्द्रवर्ष ३५४ तर सूर्यवर्ष ३६५ दिवसांचे. ११ दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी दर ३३ महिन्यांनी (अचूक सांगायचे तर ३२ महिने १६ दिवस ९६ मिनिटांनी) अधिकमास येतो.
सूर्य दर महिन्याला एका राशीत प्रवेश करतो. ज्या दिवशी तो हे करतो त्या दिवसाला संक्रांत म्हणतात. (आपल्याला फक्त मकरसंक्रान्त, आणि फार तर कर्कसंक्रान्त माहीत असते.) पण एखादा चान्द्रमास असा येतो की त्या महिन्यात एकही संक्रान्त येत नाही. त्या महिन्याला क्षयमास म्हणतात. असला महिना कार्तिक, मार्गशीर्ष किंवा पौष यांच्यापैकीच एक असतो. त्या क्षयमासाच्या आधी एक आणि नंतर एक अधिकमास येतो. त्याला पुढच्या महिन्याचे नाव दिले जाते. अर्थात कार्तिक, मार्गशीर्ष व पौष ह्या तीन महिन्यांत आणि माघ महिन्यात कधीही अधिकमास येत नाही. एकदा क्षयमास आल्यानंतर पुन्हा १४१ वर्षांनी आणि क्वचित्‌ १९ वर्षांनी तोच क्षयमास येतो. जो महिना पूर्वी अधिक मास म्हणून आला होता तो महिना साधारणपणे १९ वर्षांनी परत अधिकमास म्हणून येतो.--वाचक्‍नवी

मान्य!

चान्द्रवर्ष ३५४ तर सूर्यवर्ष ३६५ दिवसांचे. ११ दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी दर ३३ महिन्यांनी (अचूक सांगायचे तर ३२ महिने १६ दिवस ९६ मिनिटांनी) अधिकमास येतो.

अधिकमास हा अनियमित नाही (आणि म्हणून अनिश्चितही नाही) हे मान्य.

मात्र, लीपदिवसाच्या तुलनेने तो सामान्य मनुष्यास समजावयास अधिक कठीण आहे असे वाटते.

लीप दिवस हा ठराविक (म्हणजे चार) वर्षांनी एका ठराविक दिवशी (म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारीनंतरच्या दिवशी) येतो. (चालू नियमाप्रमाणे चारशेने भाग न जाणारी शतकवर्षे हा याला अपवाद आहे हे खरे; परंतु सामान्य मनुष्याच्या आयुष्यात असा अपवाद फार तर एकदा येण्याची शक्यता असल्याने सामान्य मनुष्याच्या दृष्टीने त्यामु़ळे फरक पडू नये.)

मात्र अधिकमास ही सामान्य मनुष्याच्या आयुष्यात तुलनेने वारंवार घडणारी गोष्ट असल्यामुळे, आणि एका ठराविक महिन्यानंतर येत नसल्याने, सामान्य मनुष्यास (त्याचे गणित मांडता येणे शक्य असले तरी, आणि कदाचित ते गणित नेमके कसे मांडावे हे कळत नसल्यामुळे) अनिश्चित भासण्यासारखी घटना आहे खरी.

ब्लू मून: अवांतर / गंमत

३१ दिवसांच्या इंग्रजी महिन्यात दोन अमावास्या किंवा पौर्णिमा येणे शक्य आहे कारण यांच्या दरम्यानचा कालावधी फक्त २९ किंवा ३० दिवसांचा असतो. ज्या महिन्यात दोन पौर्णिमा (फुल मूनडे) येतात त्यातील दुस-याला 'ब्ल्यू मून' म्हणतात. तो क्वचित कधी तरी येतो यामुळे 'वन्स इन अ ब्ल्यू मून' हा वाक्प्रचार पडला आहे.

आमच्या कँपसवर 'ब्लू मून' नावाचे एक उपाहारगृह होते. तेथे मिळणार्‍या सामोशांना बहुधा त्रिभुवनात तोड नसावी. मिल्कशेक्सही बर्‍यापैकी स्वस्त आणि मस्त मिळत. त्यामुळे (वसतिगृहावरील सर्वच विद्यार्थ्यांप्रमाणे) आम्हीही जवळजवळ प्रत्येक संध्याकाळी तेथे (मोढे टाकून) पडीक असू.

मात्र घरी चुकून खर्चाचा हिशेब देण्याची कधी वेळ आलीच (ती येऊ देणे शक्यतो टाळण्याचाच प्रयत्न असे, पण तरीही कधी जमले नाही आणि आलीच), तर 'काही नाही, संध्याकाळी वन्स इन अ ब्लू मून कधी बाहेर जाऊन सामोसे खातो' म्हणण्याची चांगली सोय होती.

बरोबर

आमच्या वसतिगृहाजवळ अमावास्या आणि पौर्णिमा अशा सहेतुक नावांची दोन हॉटेले होती. आम्हीही (वैशालीला खातो या धर्तीवर) बाहेर फक्त अमावास्या पौर्णिमेला खातो असे पालकांना सांगायचो


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

कंकणाकृती सूर्यग्रहण

खग्रास आणि खंडग्रास सूर्यग्रहणांप्रमाणेच, कंकणाकृती सूर्यग्रहण हाही सूर्यग्रहणाचा एक प्रकार असल्याचे शाळेत शिकत असताना वाचले होते.

- कंकणाकृती सूर्यग्रहण हे नेमक्या कोणत्या परिस्थितीत होऊ शकते याचे स्पष्टीकरण कोणी देऊ शकल्यास बरे होईल.
- खग्रास सूर्यग्रहण ही कंकणाकृती सूर्यग्रहणाची एक विशेष आवृत्ती (special case) मानता येईल काय?

कंकणाकृती सूर्यग्रहण

पृथ्वीपासून सूर्याचे सरासरी अंतर पृथ्वीपासून चंद्राचे सरासरी अंतराच्या सुमारे चारशे पट आहे आणि सूर्याचा व्यास चंद्राच्या व्यासाच्या सुमारे चारशे पट इतका आहे. त्यामुळे पृथ्वीवरून दोघांची बिंबे साधारण एकाच आकाराची दिसतात. परंतु पृथ्वी आणि चंद्र या दोघांचीही भ्रमणे लंबगोलाकृती कक्षेत होत असल्यामुळे ही अंतरे कमी जास्त होत असतात आणि त्यानुसार त्यांच्या बिंबांचा आकार मोठा किंवा लहान होतो. ज्या वेळी पृथ्वी पासून सूर्य सर्वात जवळ असेल आणि चंद्र जास्तीत जास्त दूर असेल त्यावेळी ग्रहण लागले तर चंद्राची तबकडी सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही आणि सूर्याचा आकार बांगडीसारखा दिसतो.

उत्तरे

मनात असलेल्या काही प्रश्नांची उत्तरे ह्या लेखा द्वारे मिळाली.

कंकणाकृती

छान लेख..बर्‍याच शंका दूर झाल्या.
कंकणाकृती सूर्यग्रहण कोठून दिसते?(म्हणजे भारतातून दिसते का?)तसेच कधी दिसते हे समजायला काहि गणित करता येईल का? मलातरी लहानपणापासून झालेल्या ग्रहणांमधे कंकणाकृती ग्रहण बघितलेले आठवत नाही

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

माहिती

पृथ्वीवरून दिसणारा सूर्य आणि चंद्र यांचा सरासरी आकार समान असतो हे मी वर लिहिलेले आहेच. त्यामुळे कधी चंद्राचे बिंब मोठे असते आणि त्यामुळे सूर्याचे बिंब संपूर्णपणे झाकले जाऊन त्याला खग्रास ग्रहण लागते आणि कधी चंद्राचे बिंब लहान असल्यामुळे कंकणाकृती ग्रहण लागते. ही दोन्ही एकाच प्रकारची ग्रहणे असून फारच थोड्या जागी दिसतात. इतर बहुतेक ठिकाणी ही दोन्ही बिंबे बरोबर एकावर एक येत नाहीत त्यामुळे खंडग्रास ग्रहणच जास्त जागांवरून दिसते.
या वर्षी २६ जानेवारीला झालेले कंकणाकृती ग्रहण दक्षिण भारतात दिसले होते, सन २०१० मध्ये १५ जानेवारीला अशा प्रकारचे ग्रहण लागणार असून तेसुद्धा भारतात दिसेल. ग्रहणांविषयी अधिक माहिती या दुव्यावर पहावी.
ग्रहणे

वा!

रे वा.. अगदी उपयुक्त दुवा!
धन्यु घारेसर!

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

अजून थोडी माहिती

http://mr.upakram.org/node/1565

येथे अजून थोडी महिती मिळेल.
या ठिकाणी स्वीकारार्ह आहे की नाही माहित नाही, पण उपयोगी नक्कीच आहे.

चांगली माहिती

ही माहिती ग्रहणाशी संबंधित अशीच आहे. राहू आणि केतू हे नेहमी परस्परांच्या विरुद्ध स्थानावरच का असतात याचा उलगडा सुद्धा यातून होतो. भौमितिक शास्त्रातल्या गुंतागुंतीच्या गणिताने काढता येणारे हे बिंदू प्राचीन काळी कसे ठरवत असावेत या गोष्टीचे कौतुकमिश्रित आश्चर्य वाटते. अर्थातच हे शास्त्र त्या कळात प्रगत अवस्थेत असणार.
कुंडलीतल्या कोणत्या घरात राहू किंवा केतू आहे यावरून ग्रहणाचा काळ कसा ठरवता येतो याची माहिती मिळेल काय?

राहू, केतू आणि ग्रहणे.

प्रत्येक रास ३० अंशाची. राहूचे प्रभावक्षेत्र ३० अंशाचे. म्हणजे सूर्य राहूच्या १५ अंश इतका जवळ आला की राहूच्या क्षेत्रात आला. सूर्य महिन्यात एक रास, म्हणजे ३० अंश चालतो. राहू सुमारे २ अंश, म्हणजे वर्षाला १९-२० अंश. आजची राहू/केतू आणि सूर्य आणि चंद्र याची रास समजली की. किती दिवसांनी सूर्य राहूच्या जवळ, आणि त्याच वेळी चंद्र राहूनजीक(सूर्यग्रहण) किंवा केतूजवळ(चंद्रग्रहण) पोहोचेल हे सहज काढता येते.
एका महिन्याच्या काळात (सुमारे ३१ दिवस) सूर्य+राहू एका घरात असताना, चन्द्र+केतू एका घरात दोनदा येऊ शकतील. (चन्द्र एका महिन्यात ३६० अंश चालतो.) त्याशिवाय राहू+सूर्य+चन्द्र अशी स्थितीही त्या महिन्यादरम्यान एकदा येऊ शकेल. त्यामुळे एका महिन्यात चंद्र, मग सूर्य आणि नंतर परत चंद्रगहण येऊ शकते. असेच सूर्य केतूजवळ आला की होऊ शकेल. त्यामुळे वर्षातून जास्तीत जास्त ६ग्रहणे होऊ शकतील. प्रत्यक्षात पाचाहून जास्त ग्रहणे झाल्याचे उदाहरण असल्याचे माहीत नाही. --वाचक्‍नवी

 
^ वर