उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
राहू-केतू
तुषार
December 23, 2008 - 6:03 pm
राहू आणि केतू हे फक्त ज्योतिष-शास्त्रात्तील कल्पना आहेत की ते भौतिक-दृष्ट्या अस्तित्वात आहेत?
जाणकारांनी वैद्न्यानिक आणि अध्यात्मिक दोन्ही दृष्टिकोनांतून प्रकाश टाकावा.
तसेच भौतिक असल्यास, त्याचे महत्व(significance) काय?
दुवे:
Comments
खगोलशास्त्रीय कल्पना आहेत खर्या
"भौतिक" म्हणजे तुमच्या मनात काय अर्थ आहे ते ठाऊक नाही.
या खगोलशास्त्रातल्या गणितातल्या कल्पना आहेत.
चंद्राची (पृथ्वीभोवतीची) कक्षा आणि पृथ्वीची (सूर्याभोवतीची) कक्षा या दोन्ही कक्षा वेगवेगळ्या प्रतलांत आहेत.
म्हणूनच प्रत्येक अमावास्येला सूर्यग्रहण होत नाही, आणि प्रत्येक पूर्णिमेला चंद्रग्रहण होत नाही - कक्षा एकमेकांना कलल्या असल्यामुळे बहुतेक महिन्यांत चंद्राची सावली पृथ्वीवर पडत नाही, पृथ्वीची चंद्रावर पडत नाही.
पण चंद्राची आणि सूर्याची भासमान कक्षा दोन ठिकाणी एकमेकांना छेद देतात. ते बिंदू आहेत, त्यांच्यावर "कधीकधी" सूर्य आणि चंद्र असू शकतात. आपापल्या कक्षेत फिरता-फिरता चंद्र किंवा सूर्य या बिंदूंवर नसले, तर या भौमितिक बिंदूंवरती विशेष असे काहीही नसते, पण तरी ते आकाशात भौमितिक गणिताने शोधून काढता येतातच. (हे बिंदू "भौतिक" आहेत की नाहीत, तो अर्थ तुमचा तुम्ही लावा.) म्हणजे आकाशाच्या मानचित्रावर कक्षांच्या रेघा काढून त्यांचा छेदबिंदू चितारता येतो. हे दोने छेदबिंदू दररोज वेगळ्या ठिकाणी असतात - म्हणजे आकाशात "मार्गक्रमण" करत असतात.
या बिंदूंना "राहू आणि केतू" असे नामकरण केलेले आहे. राहू आणि केतू (म्हणजे हे गणिती बिंदू) आकाशात "मार्गक्रमण" करतात. आकाशात मार्गक्रमण करणार्या सर्व गोष्टींना (मग त्या गणिती का असेनात) पृथ्वी-स्थिर खगोलशास्त्रात "ग्रह" म्हणतात. (पृथ्वी-स्थिर खगोल-गणितात सूर्य हा "ग्रह" आहे, यात काहीच चूक नाही.)
राहू आणि केतूंचे महत्त्व येणेप्रमाणे :
जर सूर्य आणि चंद्र मार्गक्रमण करताकरता एकाच दिवशी पैकी एकाच छेदबिंदूवरती पोचले, तर सूर्य चंद्राच्या आड झाकला जातो, सूर्यग्रहण होते.
सूर्य एका छेदबिंदूपाशी असला, आणि त्याच वेळी चंद्र दुसर्या छेदबिंदूपाशी असला तर चंद्रावर पृथ्वीची सावली पडते, आणि चंद्रग्रहण होते.
राहू /केतू या फलज्योतिषातल्याही कल्पना आहेत. पण त्यांचे महत्त्व वेगवेगळ्या देशांत वेगवेगळे आहे.
धन्यवाद, धनंजयभाऊ
तुषार काळभोर
धन्यवाद!
खरंच खूप सोपं करून सांगितलं तुम्ही.
ग्रहणांचा संबंध् राहू-केतूंशी लावला जातो ते महिती होतं, पण ते खगोलशास्त्रीय-दृष्ट्या ही बरोबर आहे हे नव्हतं माहिती.
धन्यवाद
राहु केतु या संकल्पना द्विमितीत समजावुन घेता येणे अवघड असते. कधी कधी चुकीची चित्र ही गोंधळ वाढवतात. एके ठिकाणी मी पृथ्वीची कक्षा व चंद्राची कक्षा हा छेदन् बिंदु पृथ्वीचाच कक्षेवर दाखवलेला पाहिला होता.
या चित्रात कल्पना स्वच्छ होतात. मेष संपात व वसंत संपात या equinox च्या चित्राशी साम्य असल्याने काहींचा गोंधळ उडु शकतो.
प्रकाश घाटपांडे
मेष संपात?
तुम्हाला शरद संपात म्हणायचे आहे का? कारण माझ्या माहितीप्रमाणे शरद आणि वसंत असे दोन संपात बिंदू असतात आणि दोन्ही वेळा दिवस-रात्र जवळजवळ सारखी असते.
चतुरंग
होय
आपली माहिती बरोबर आहे. मेष संपात= वसंत सपांत सायन मेषारंभ येथुन चालू होतो. शरद संपात = तुला संपात. संपात बिंदु हा परांचन गती मुळे चल असतो. थोडक्यात निरयन म्हणजे अयनविरहित विचारात राशिचक्राचा आरंभ बिंदु हा स्थिर व विवक्षित मानला आहे. (तो बिंदु कुठला? यावर वाद आहेत.)परंतु सायन म्हणजे स - अयन विचारात तो वर्षाला ५०.२ विकला अयनिक वृत्तावर मागे मागे सरकतो. हा विवक्षीत बिंदु व सद्यस्थितीतील वसंत संपात यातील अंतर म्हणजेच सध्याचे अयनांश. पंचांग या लेखात त्याची माहिती आहे.
प्रकाश घाटपांडे
संपात म्हणजे काय
संपात म्हणजे काय? चतुरंग आणि प्रकाशराव दोघांनाही हा शब्द समजत आहे म्हणजे काहीतरी अर्थपूर्ण संकल्पना दिसते.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
पातबिंदु
संपात् म्हणजे पातबिंदु (node) म्हणजेच (equinox) दोन बांगड्या एकमेकात (अर्थात एक थोडी कमी साईझची) अडकवल्या कि जे छेदनबिंदु तयार होतात ते.
राहु केतु हे पातबिंदु आहेत. परंतु ग्रहणासाठी ते महत्वाचे असल्याने त्यांना महत्व आहे.
प्रकाश घाटपांडे
उत्तम प्रतिसाद!
फार आवडला प्रतिसाद.
आपला
गुंडोपंत
सहमत
गुंडोपंतांशी सहमत.
धनंजयरावांनी सोप्या शब्दात माहिती दिली आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
चर्चा
सहमत. पण मी जरा गोंधळलो आहे. चर्चा प्रस्तावातल्या प्रतिसादापेक्षा हा वेगळा लेख म्हणून जास्त चांगला वाटेल.