पंचांग

right
पंचांग

"पंचांग सोपे सुमंगल स्वभावे भिंतीवरी कालनिर्णय असावे". अशा जाहिराती वर्षाच्या शेवटी नववर्षाचे स्वागत करताना विविध माध्यमातून ऐकत असतो,पहात असतो. पण हा कालनिर्णय नसून कालनिर्देशनाचा प्रकार आहे.निर्णय घेणारे तुम्ही कोण लागून गेले? तुम्हाला जर तुमची जन्मतारीख विचारली आणि तुम्ही जर त्याला ' माझा जन्म भारतीय सौर दिनांक अमुक अमुक रोजी झाला' किंवा भाद्रपद कृष्ण चतुर्थी शके १८८४ रोजी झाला 'असे सांगितले तर तो नक्कीच भारतीय असून सुद्धा विक्षिप्त नजरेने तुमच्या कडे बघेल.

मानव जसा उत्क्रांत होत गेला तस तशी त्याला दैनंदिन व्यवहारासाठी कालमापनाची व कालनिर्देशनाची गरज निर्माण झाली. शिकार ते शेती या प्रवासात शेती हा मुख्य मानवी जीवनाचे अंग झाल्याने निसर्गाच मानवी जीवनाशी नातं सांगणारे दिवस रात्र, उन, पाउस, थंडी, वारा,सागरातील भरती ओहोटी याचा अवकाशातील विशिष्ट ग्रह ता-यांच्या स्थितीशी संबंध हळूहळू लक्षात येउ लागला. समाजजीवनातील सर्व कृत्ये ही अप्रत्यक्षरित्या शेतीशीच निगडीत होउ लागली. इजिप्तमध्ये नाईल नदीच्या पुराशी लोकजीवन अवलंबून होते. त्यामुळे या संबंधांचे निरिक्षण करुन त्यावरुन काही आडाखे बांधता येउ लागले.यातूनच ज्योतिषशास्त्राचा म्हणजे आताच्या खगोलशास्त्रीय भागाचा उगम झाला.
पंचांग हा कालनिर्देशनाचा ज्योतिषशास्त्रीय भाग आणि ज्योतिष हे धर्माच पारंपारिक अंग म्हणून पंचाग प्रचलित झाले ते धार्मिक कृत्याचा दैनंदिन जीवनात आचरण्यासाठी असलेल्या कालनिर्देशनाच्या गरजेपोटीच. पंचांगाची पाच अंगे म्हणजे १) तिथी २) नक्षत्र ३) वार ४) योग ५) करण भारतीय ज्योतिर्गणित हे पृथ्वी केंद्रबिंदू मानून तयार झाले असल्याने सूर्य हा तारा असला तरी त्याला ग्रहाप्रमाणे स्थान देउन तो चल झाला आहे. चंद्र व सूर्य यांच्यात पृथ्वी सापेक्ष बारा अंशाचे अंतर पडण्यास जो कालावधी लागतो त्याला तिथी म्हणतात. चंद्र हा पृथ्वीभोवती २९.५ दिवसात प्रदक्षिणा पूर्ण करतो. तरी व्यवहारात तिथी ३० या पुर्णांकात घेतल्या आहेत. तिथी हे पंचांगाचे बरेच जुने अंग आहे. इ.स.१४०० वर्षी तिथी व नक्षत्र ही दोनच अंगे प्रचारात होती.पंचांगात एखादी तिथी दोनदा आलेली असते तर एखाद्या तिथीचा क्षय झालेला असतो. याचे कारण चंद्र व पृथ्वी यांची गती कधी थोडी कमी तर कधी थोडी जास्त असते.सूर्योदयाच्या वेळी जी तिथी असते. ती त्या दिवसाची तिथी म्हणून पंचांगात दिलेली असते. एखादी तिथी सूर्योदयानंतर चालू होते व दुसर्‍या दिवशीच्या सूर्योदयापूर्वी संपते.त्यामुळे त्या तिथीचा क्षय होतो. एखादी तिथीबाबत ती दुसर्‍या दिवशीच्या सूर्योदयानंतर संपते त्यामुळे त्या तिथीची वृद्धी होते. थोडक्यात लॉज मधल्या चेक आउट टाईमप्रमाणे ही गणना होते. तिथीचा संबंध हा धार्मिक कृत्याशी संबंधित असल्याने तिथी सूर्योदयापासून दुसर्‍या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत मानली जाते. संकष्टी, अंगारिका चतुर्थी हे शब्द आपण नेहमी ऐकतो. दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. ही चतुर्थी मंगळवारी आली कि झाली अंगारिका.
प्रत्येक तिथीला एक देवता पण बहाल केली आहे. चतुर्थीची देवता गणेश ही आहे. अमावस्येची देवता पितर ही आहे. नक्षत्र म्हणजे अवकाशातील विशिष्ट तारका अथवा तारकासमूहाचे पट्टे. त्यातील ठळक तार्‍याला त्या नक्षत्राचा योगतारा म्हणतात. पण हे झाले स्थूल मानाने. अवकाश गोल म्हणजे एक कलिंगड आहे असे मानले तर त्याचे समान २७ खाप करायचे.म्हणजे एक फोड झाली १३ अंश २० कलांची. थोडक्यात अवकाशगोलातील १३ अंश २० कलांचा दक्षिणोत्तर पट्टा म्हणजे नक्षत्र. चंद्र २९.५ दिवसात या २७ नक्षत्रांची प्रदक्षिणा पूर्ण करतो. एखादे धार्मिक कृत्य अमुकामुक नक्षत्रावर करावे असे म्हणतात त्यावेळी चंद्र त्या नक्षत्रात असताना करावे असा अर्थ अभिप्रेत असतो. जन्मनक्षत्र याचा अर्थ तुमच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते नक्षत्र. पंचांगातील वार हे अंग मात्र उशीरा प्रचलीत झाले. हे अंग मूळ भारतीयांचे नव्हे. ते आपल्याकडे इ.स.५०० ते १००० वर्षांपूर्वी आले. ते खाल्डियन,इजिप्शियन वा ग्रीक संस्कृतीकडून आपल्याकडे आले असावेत. महाभारतात वार अस्तित्वात नव्हते असे भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास या ग्रंथाचे कर्ते शं.बा.दिक्षित सांगतात. होरा या कालविभागापासून वाराची उत्पत्ती झाली. एक अहोरात्रचे २४ समान भाग केले असता.एक भाग म्हणजे होरा. हल्लीच्या तास या अर्थाने. प्रत्येक होर्‍याला कुठलातरी ग्रह अधिपती असतो. त्याचे नांव वाराला दिले आहे.योग व करण ही पंचांगाची अंगे व्यवहारात अजिबात उपयोगाची नाही. चंद्र व सूर्य यांच्या संयुक्त गतीची बेरीज १३ अंश २० कला होण्यास जेवढा कालावधी लागेल त्याला योग म्हणतात.असे एकूण २७ योग म्हणजे नक्षत्राइतकेच आहेत. करण हा पण असाच कालावधी आहे तिथीचा अर्धा भाग म्हणजे करण असे एकूण सात करणे आहेत. शिवाय अजून ४ करणे आहेत. एखाद्या तिथीचा पूर्वार्ध म्हणजे एक करण व उत्तरार्ध म्हणजे एक करण. या योग आणि करण यांची नावे उच्चारायची म्हणजे जड जीभ असणार्‍या माणसाचे काम नव्हे.

पंचागातील इतर कालमापक संज्ञा म्हणजे संवत्सर, मास, घटी, पळे. बारा चांद्र मासांचे एक संवत्सर. एक चांद्रमास २९.५ दिवसांचा. अशी ६० संवत्सरे आहेत.अशी आवर्तने चालू असतात. एक सौर वर्ष म्हणजे ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिट व ४५ सेकंदचे आहे. चांद्र मासानुसार वर्ष ढोबळपणे ३५४ दिवसांचे होते.तर सौर मानाने येणार्‍या ११ दिवसांचा फरक भरुन काढण्यासाठी दर तीन वर्षांनी एका महिन्याची भर घालतात.यालाच अधिक मास म्हणतात. दुष्काळात तेरावा महिना अशी जी म्हण आहे त्यातला तेरावा महिना म्हणजेच हा अधिक महिना.घटी पळे या गूढ वाटणार्‍या कालमापक संज्ञा हल्ली पंचांगात कलाक मिनिटात देतात. २४ तास म्हणजे ६० घटिका,१ तास म्हणजे २|| घटिका व एक मिनिट म्हणजे २|| पळे, एक सेकंद म्हणजे २|| विपळे. आताचे पंचांगक्रर्ते हे सर्व गणित नॉटिकल अल्मानॅक वरुन तास मिनिटे सेकंद या परिमाणात करतात. पूर्वी राजे राजवाड्यांच्याकडे एक घंगाळ ( पाण्याचे साठवणूक करणारे एक विशिष्ट प्रकारचे मोठे भांडे) असे. त्यात पाणी विशिष्ट पातळीपर्यंत भरले जाई. त्यात एक विशिष्ट आकाराचे छिद्र असलेले एक छोटे पात्र असे. त्याला घटिका पात्र म्हणत त्यातून पाणी हळू हळू आत शिरत असे. ते पूर्ण भरले की बुडत असे. तेव्हा घटिका भरली असे म्हणत. त्यासाठी स्वतंत्र माणूस नेमला जाई. उज्जैन ला वेधशाळा होती. तेथे वालुकायंत्र, छायायंत्र अशी कालमापनाची विविध यंत्रे असतं. जगभरात वेगवेगळ्या पद्धतीच्या काल गणना आहेत. इजिप्तमध्ये पिरॆमिडच्या टोकाची छाया कशी पडते यावरुन दिवस किती गेला व किती राहिला हे ठरवत असत. म्हणजे एक प्रकारचे छायायंत्रच झाले. मध्ययुगिन काळात चीन मध्ये एक दोरी घेउन विशिष्ट अंतरावर गाठी मारत, दोरीचे जळते टोक प्रत्येक गाठीपर्यंत आल्यावर किति काळ झाला हे ठरवत. युरोप मध्ये त्याच काळात मेणबत्ती किती जळाली यावरुन दिवस किती झाला हे ठरवले जात असे. कारण साधे आहे चर्चमध्ये मेणबत्तीचा वापर सहज उपलब्ध होता. आजही खेडेगावात सवसांच्या टायमाला, दिवस कासराभर वर आला आसन तव्हा, माथ्यावर आला होता, कोंबड आरवायच्या टायमाला अशा वर्णनातून दिनमानाचे भाग जुन्या काळातले लोक सांगतात.

पंचांगातील पौराणिक कालगणना
६० वर्षे (संवत्सरे) = १ संवत्सर चक्र
३६० संवत्सरे म्हणजे अथवा मानवी वर्षे = १ दिव्य वर्ष
१२०० दिव्य वर्षे = १ कलियुग
२४०० दिव्यवर्षे = १ द्वापार युग
३६०० दिव्य वर्षे= १ त्रेता युग
४८०० दिव्य वर्षे= १ कृत युग
४ युगे = १ महायुग
७१ महायुगे = १ मनु
१४ मनु= १ कल्प (ब्रह्मदेवाचा एक दिवस)
३६००० कल्प= ब्रह्मदेवाचे पुर्ण आयुष्य
१००० ब्रह्माची आयुष्ये=१ विष्णुची घटका
१००० विष्णुच्या घटिका म्हणजे १ शिवनिमिष
१००० शिवनिमिष = १ महामाया निमिष

पंचांगवादाचे स्वरुप
आपल्याकडे निरनिराळी पंचांगे प्रचारात आहेत. गुजराथ मध्ये जन्मभूमी पंचांग, वैदर्भिय राजंदेकर पंचांग, सोलापूरचे दाते पंचांग, रुईकर पंचांग, लाटकर पंचांग,ढवळे पंचांग, टिळक पंचाग इत्यादि नावे प्रसिद्ध आहेत, पण पंचांगाचे मुख्य पक्ष दोनच. सायन आणि निरयन. अगदी रिपब्लिकन आणि डेमोक्रॆटिक पक्षासारखे.निरयन पक्षाचे म्हणणे असे कि क्रांतीवृत्तावरिल एक विवक्षित बिंदु. हा स्थिर बिंदु मानून ते राशीचक्राचे आरंभस्थान मानावे. त्यानुसार पंचांगाचे गणित असावे. सायन पक्षाचे म्हणणे हा संपात बिंदुच मुळी स्थिर नसल्याने आरंभस्थान हे चल आहे. त्याचे चलन हे वर्षाला सरासरी ५०.२ विकला असे आहे. निरयन पक्षात पुन्हा उपपक्ष आहेतच. कोणता विवक्षित बिंदु आरंभस्थान मानावे? झीटा किंवा रैवत पक्ष, ग्रहलाघव, चित्रा, मद्रास या प्रत्येक उपपक्षाचा आरम्भस्थान वेगळे आहे. हा वाद गेली शंभर वर्ष चालूच आहे. लोकमान्य टिळक हे झीटा अथवा रैवत पक्षाच्या शुद्धपंचांग प्रवर्तक मंडळाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष होते.हे पंचांग केरुनाना छत्रे व आबासाहेब पटवर्धन इ.स. १८६५ पासून चालू केले. त्यांच्या गणितानुसार रेवती नक्षत्रातील झीटा पिशियम तारा हे आरंभस्थान मानले आहे. सध्या टिळक पंचांग म्हणून ते ओळखले जाते. चित्रा पक्षाचे म्हणणे आरंभस्थान हे चित्रा नक्षत्राच्या समोरील १८० अंश विरुद्ध असलेला बिंदु हा शके २१२ मध्ये वसंतसंपात बिंदु होता. या पक्षाचे मुख्य समर्थक बेळगावचे भास्कराचार्य ज्योतिषी, पुण्याचे गोपाळ बळवंत जोशी. सध्या सोलापूरचे दाते पंचांग हे चित्रा पक्षाचे आहे. एकच एक पंचांग असावे यासाठी बरेच प्रयत्न झाले. परंतु समन्वय होऊ शकला नाही. ते निर्णय फक्त त्या त्या अधिवेशनापुरतेच राहिले. आरंभ स्थिर मानलेला संपात बिंदु आणी चल असलेला संपात बिंदु यातील अंतर म्हणजेच अयनांश. सरकारमान्य चित्रा पक्षाचे अयनांश हे २००७ मध्ये २३अंश ५७ कला २० विकला असे आहेत.

पंचांग

भारतीय सौर पंचांग
भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर राष्ट्राला सुट्सुटीत सोपे असे दैनंदिन कॆलेंडर असावे अशी गरज निर्माण झाली कारण अशा प्रकारची पंचांगे ही सरकारी अथवा व्यवहारात उपयोगी आणणे अतिशय गैरसोयीचे होते.प्रत्येक पंचांगानुसार धार्मिक सण पण वेगवेगळे येउ लागले. टिळक पंचांगानुसार दिवाळी वेगळ्या दिवशी येते तर दाते पंचांगानुसार वेगळी येते. शिवाय प्रादेशिक पंचांगानुसार निर्माण होणारी प्रादेशिक चालीरिति जपणारी अस्मिता. या सर्वांना सामावून घेणाया एखाद्या कॆलेंडरमध्ये आपली सांस्कृतिक प्रतिमा जपली पाहिजे. राष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण झाली पाहिजे. या दृष्टिकोणातून भारत सरकारने १९५२ साली डॊ. मेघनाथ सहा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.प्रा. ए.सी. बॆनर्जी वाईस चॆन्सल्र अलहाबाद. डॊ के.एल.द्फ्तरी नागपूर, श्री ज.स. करंदीकर पुणे, डॊ गोरखप्रसाद. प्रा.र.वि. वैद्य उज्जैन, श्री एन.सी लाहिरी कलकत्त्ता हे दिग्गज त्या समितीत होते. त्यांनी भारतातील वेगवेगळ्या ठीकाणी चालणारा०या सुमारे ६० प्रकारच्या पंचांगांचा अभ्यास केला.तिने तीन वर्षात अभ्यास करुन एक अहवाल सादर केला. यात सुचवलेली दिनदर्शिका म्हणजेच भारतीय सौर कॆलेंडर. यात सरकारी कामकाजासाठी दिवस अथवा वार हा मध्यरात्रीपासून चालू होतो. पण धार्मिक कारणासाठी मात्र सूर्योदयापासून दिवसाचा व वाराचा प्रारंभ करावा. वर्षगणना शालिवाहन शकाचीच चालू ठेवावी.
१) चैत्र ३०/३१ दिवस २२ मार्च/ २१ मार्च (लिप इयर असताना)
२) वैशाख ३१ दिवस
३) ज्येष्ट ३१ दिवस
४) आषाढ ३१ दिवस
५) श्रावण ३१
६) भाद्रपद ३१
७) आश्विन ३०
८) कार्तिक ३०
९) मार्गशीर्ष ३०
१०) पौष ३०
११) माघ ३०
१२) फाल्गुन ३०

हे भारतीय सौर कॆलेंडर आकाशवाणी,दूरदर्शन, सरकारी गॆझेट यात फक्त उल्लेख या स्वरुपात असतात. ते सुद्धा कायद्याने बंधनकारक आहे म्हणून. पंचांगात पारशी सन, हिजरी सन तसेच त्यातील महिने दिलेले असतात.पारशी वर्ष पर्शिया (इराण) येथे चालू झाले. ३० दिवसांचा महिना व १२ महिन्याचे वर्ष. सौर वर्षाशी मेळ घालण्याच्या सोयीसाठी पुढ्चे वर्ष हे ५ दिवसानंतर चालू होते. या ५ दिवसांना पारशी लोक गाथा म्हणतात. पारशी वर्षाचे महिने असे १) फरवदिन २) अर्दिबेहस्त ३) खुदार्द ४) तीर ५) अमरदाद ६) शेहेरवार ७) मेहेर ८) आबान ९) आदर १०) दय ११) बेहमन १२) अस्पंदाद हिजरी सन हा मोगल साम्राज्य आल्यापासून चालू झाला. मूळ अरबस्तानातले. महंमद पैगंबर यांनी मक्केहून ज्या दिवशी मदिनेला पलायन केले त्याची आठवण म्हणून खलिफ उमर याने हा
सन सुरु केला आहे. तो दिवस म्हणजे गुरुवार १५ जुलै ६२२. मुस्लिमांचा दिवस धार्मिक दृष्ट्या सूर्यास्ताला चालू होतो व दुसया दिवशीच्या सूर्यास्ताला संपतो. बारा चांद्रमहिन्याचे एक वर्ष असल्याने व सौरवर्षाशी मेळ घालण्याची भानगड नसल्याने. त्यांचा वर्षारंभ हा १० दिवस दर वर्षी मागे जातो. त्यामुळे ताबूत ३३ वर्षातून सर्व ऋतूतून फिरतो. इसवी सनानुसार एखाद्याचे वय ३३ असेल तर हिजरी सनानुसार त्याचे वय ३४ वर्षे असते. हिजरी सनातील महिने असे १) मोहरम २) रा सफर ३) रबिलावल ४) रबिलाखर ५) जमादिलावल ६) जमादिलाखर ७) रज्जब ८) साबान ९) रमजान १०) सव्वाल ११) जिल्काद १२) जिल्हेज
विक्रम संवत हे मालवांचा राजा विक्रमादित्य याच्या नावाने चालू झाला तर शालिवाहन शक हा सातवाहन राज्यांच्या काळात चालू झाला. सर्वसामान्यपणे जेते राजे आपल्या अथवा वंशाच्या नावाने काहीतरी अस्तित्व चालू इतिहासाच्या पानावर असावे अशी इच्छा व्यक्त क्ररित व त्याची अंमलबजावणी ही राजज्योतिषी व भाट यांच्यावर सोपवीत. आज देखिल ही फार काही वेगळे घडते आहे असे नाही. चौकाचे, रस्त्याचे,विद्यापीठाचे, पूलाचे, इमारतीचे विमानतळाचे, टर्मिनस चे नामकरण हे आपापल्या स्फूर्तीस्थानांनी व्हावीत यासाठी रक्तपात होतात.

पंचांग धार्मिक प्रथमोपचाराची पेटी.
कुठलही काम करताना देवाधर्माचा कौल घेतलेला बरा असतो. कधी तो मांत्रिक तांत्रिकाच्या माध्यमातून तर कधी पुजारी,बडवे,गुरव यांच्या माध्यमातून. गर्भादान संस्कार, बारसे, मुंज, विवाह, गुणमेलन,मुहूर्त, सण वार, व्रत वैकल्य,मकर संक्रांत, ग्रह उपासना, नवग्रह स्तोत्र,चंद्र व सूर्य ग्रहणे,ग्रहपीडा, दाने व जप.भूमीपूजन,पायाभरणी,गृहप्रवेश, वास्तुशांती , अशौच निर्णय, हवामान व पर्जन्यविचार, नांगरणी पेरणी पासून ते धान्य भरण्यापर्यंत,संत महंतांच्या जयंत्या पुण्यतिथ्या, जत्रा, यात्रा. मासिक भविष्य, राजकीय व सामाजिक भविष्ये, धर्मशास्त्रीय शंका समाधान, ब्राह्मणातील शाखा उपशाखा, त्यांचे गोत्र वंशावळ, ९६ कुळी मराठा समाजातील वंश गोत्र देवक. ज्योतिर्गणितासाठी आवश्यक असलेला ग्रहगती, रोज पहाटे साडेपाच वाजताची ग्रहस्थिती, गणिताची आकडेमोड वाचवणारी रेडिमेड कोष्टके. दशा, अंतर्दशा, लग्नसाधना, नवमांश, अवकहडा चक्र, राशींचे घात चक्र इ. अशा एक ना अनेक गोष्टींचा माहिती कोष म्हणजे पंचांग.गरजेप्रमाणे त्यात बदल होत गेले.कालबाह्य प्रथा परंपरा यांना धर्मशास्त्राचाच आधार देउन समयोचित पर्याय देण्याचे शहाणपण देखिल काही पंचांगांनी केलं.उदाहरणार्थ गणपतीची मूर्ती ही धातूची असावी किंवा शाडूची असावी. गणेश विसर्जन प्रदूषित नदीत न करता बाद्ली च्या पाण्यात करुन ते पाणी झाडांना घालावे. निर्माल्य हे नदीत न टाकता त्याचे झाडांसाठीच कांपोस्ट खत तयार होऊ शकते.ते झाडालाच घालावे. तरी देखील पुलावरून एखादी होंडा. मर्सीडीस गाडी जाताना थांबते, एखादा माणूस उतरतो निर्माल्य असलेली प्लास्टीकची पिशवी नदीत भिरकावतो आणि पुढील मार्गक्रमणा करतो.
राजेराजवाड्यांच्या काळात दरबारात राजज्योतिषी असे. तो वर्षारंभी पंचांगाची पूजा करुन राजास संवत्सरफल कथन करुन सांगे. राज्यावर काही संकट, पूर, अतिवृष्टी. दुष्काळ, आदि नैसर्गिक संकटांची काय चाहूल लागते आहे? ते सांगत असे. राजा त्याला योग्य बिदागी देत असे. त्यातून त्याचा उदरनिर्वाह चालत असे.ज्योतिषाचा सत्कार करुन त्याजकडून वर्षफल श्रवण करावे म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल असे संवत्सरफलातच म्हटले आहे. आज सुद्धा खेडेगावात भिक्षुकी करणारा ब्राह्मण समाज वासरात लंगडी गाय शहाणी या न्यायाने पंचांगाद्वारे लग्न, मुहुर्त, सत्यनारायण पूजा, अभिषेक, नावरास काढून देणे, धार्मिक कृत्यांचा व्यवहारपयोगी अन्वयार्थ काढून देणे इत्यादि कामे करत असतो. लोक त्याला त्यामोबदल्यात धान्य, भाजीपाला, दूध, पैसे इत्यादि मोबदला देतात. एक
प्रकारची बलुतेदारीच म्हणा ना.त्यावर त्याची गुजराण चालते.त्यामुळे पंचांग हे ज्योतिषी कम भिक्षुकाचे पोटापाण्याचे साधन बनले. कर्मसंकट आले कि कायदेशीर कचाट्यातून पळवाटा शोधून मार्ग काढणारा वकील आणी धर्मसंकट आले कि त्यावर धर्मशास्त्रीय तोडगा काढून सुटका करणारे धर्ममार्तंड एकाच प्रकारचे.संकटाचे उपद्रवमूल्य किती? यावर मोबदला ठरतॊ आणि मोबदला किती मिळणार यावर पळवाटा व तोडगे यातील अन्वयार्थ व फेरफार ठरतात. शिवाजी महाराजांची देखील यातून सुटका झाली नाही. राज्याभिषेकाच्या वेळी स्थानिक धर्मपंडिता ऐवजी त्यांनी सरळ काशीहून गागाभट्ट आयात केले. घरात प्रथमोपचाराची जशी औषधे असतात तसा धार्मिक अंगाचा प्रथमोपचार म्हणून बहुतेकवेळा घरात टांगलेले दिसते.

पंचांगाचे सुलभीकरण
पंचांगाचे स्वरुप व प्रकृती त्यामुळे पंचांग ही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी झाली. कालानुसार दैनंदिन गरजांची मर्यादा बदलली. मक्तेदारी वाढल्यामुळे पंचांग ज्या जनसामान्यांसाठी निर्माण झालं तिथ ते रुजण अवघड झाले. व्यावसायिकदृष्ट्या या गोष्टीचा खपावर परिणाम होउ लागला.म्हणूनच पंचांगाचे सुलभीकरण होणे गरजेचे झाले. घटिका पळे दैनंदिन जीवनाचा भाग नसल्याने कलाक मिनिटे पंचांगात येउ लागली. संस्कृतचं प्राकृतीकरण झाले, ज्योतिर्गणितेच्या सुलभतेसाठी सुर्योदयीन ग्रहाच्या स्थितीऐवजी पहाटे साडेपाचचे स्पष्ट ग्रह देण्यात आले. धर्मशास्त्रार्थ सुलभपणे सांगितला गेला. त्यामुळे विशिष्ट गटाची मक्तेदारी काही प्रमाणात मोडली. पंचांगाचा अर्थ लोकांना समजायला थोड सोप झालं. सध्या विज्ञानाच्या प्रगतीमुळे लोकांचे दैनंदिन जीवन गतिमान झाले आहे.धार्मिक कृत्याचे संक्षिप्तिकरण झाले. महत्वाच्या वाटणा-या धार्मिक गोष्टींसाठी पंचांग धुंडाळ्ण्यापेक्षा तीच माहीती दिनदर्शिकेत उपलब्ध होणे गरजेचे वाटू लागले.याचं नेमक निरीक्षण केले ते जयंतराव साळगावकरांनी व त्यातूनच त्यांनी सुमंगल पब्लिकेशन काढून पंचांग,मेनू, दैनंदिन कामातील विविध गरजेच्या माहितीचे टिपण.पाककृती, राशीभविष्य, मान्यवरांचे काही लेख अशा आविष्कारांची दिनदर्शिका तयार केली अन ती अल्पावधित लोकप्रिय झाली. आज अशा प्रकारच्या अनेक दिनदर्शीका बाजारात आहेत. आता पंचांग आणि भविष्य हे मोबाईलवर सशुल्क सुविधा म्हणून देखील उपलब्ध आहे. संकष्टि चतुर्थीचा उपवास लक्षात न राहिल्यामुळे मोडू नये म्हणून रिमाईंडर पण लावता येतात. म्हणजे कालनिर्णय आता मोबाईलवर पण आले आहे. पोपटवाला ज्योतिषाकडे पण हातात
एक जुनेपाने पंचांग असते. पोपटाने भविष्याची चिठ्ठी उचलणे आणि पंचाग याचा अर्थाअर्थी काहीच संबंध नसतो. पण पंचांग हे ज्योतिषाचा ट्रेड मार्क झाला आहे.

प्राचीन रोमन कॆलेंडर ते आताचे ग्रेगरियन कॆलेंडर

इंग्रजी कॆलेंडर इसवी सनाची सुरवात जिझस ख्राईस्टच्या जन्मापासून झाली असे म्हणतात पण ते चुकीचे आहे. ख्रिस्ताची जन्म व मृत्यू या बाबत बरीच मतमतांतरे आहेत. प्राचीन रोमन वर्षगणनेत ज्युलियस सीझरने सुधारणा करुन सौर वर्षमान प्रचारात आणले. त्यासाठी काही बदल देखिल करावे लागले होते. इ.स. पूर्व ४५ वे वर्षी वर्षाचे दिवस ४४५ दिवसांचे धरावे लागले होते. तेव्हा सुद्धा २५ डिसेंबरला वर्षारंभ पकडायचा कि १ जानेवारी असा प्रश्न पडलाच होता.ज्युलियस वर्षमान हे ३६५ दिवस ६ तासांचे धरले होते. म्हणजे खRया सौरवर्षापेक्षा ११ मिनिटे १४ सेकंद अधिक धरले गेले. त्यामुळे इ.स. १५८२ पर्यंत १० दिवसांचे अंतर पडले. ते अंतर भरुन काढण्यासाठी १३ वा पोप ग्रेगरी याने नियम करुन ४ आक्टोबर १५८२ नंतर येणाया दिवसास १५ आक्टोंबर १५८२ असे संबोधले गेले. दर चौथ्या लीप ईयर चा नियम तसाच ठेवला. सध्याच्या कालगणनेनुसार सौरवर्षापेक्षा २६ सेकंद अधिक असते. त्यामुळे सध्याच्या कालगणनेनुसार ३००० वर्षांनी एक दिवस फरक पडण्यास कारणीभूत होईल. ज्युलियस सीझरने १-३-५-७ हे महिने ३१ दिवसांचे व ४-६-८-१०-१२ हे महिने ३० दिवसांचे ठरविले होते. पुढे ऒगस्टस सीझर याला ही वाटणी मान्य झाली नाही.ज्युलियस च्या जुलै महिन्याला ३१ दिवस आणि आपल्या नावाच्या ऒगस्ट महिन्याला मात्र ३० दिवस ही गोष्ट ऒगस्टसला आवडली नाही. त्याने ऒगस्ट महिन्याला पण ३१ दिवस बहाल केले. त्या ऐवजी फेब्रुवारी महिन्याच्या २९ दिवसातील एक दिवस काढून घेतला.हेच ते सध्याचे इंग्रजी कॆलेन्डर प्रचारात आहे. जिथे जिथे इंग्रजांच्या वसाहती होत्या तिथे ते रुजलं गेलं आणि अंगवळणी पडले. राष्ट्र संघाच्या योजनेत समिति १९२३ साली नेमली व त्यात ग्रेगरियन गणनेत वाटणाया अडचणीचे निराकरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कॆलेंडर तयार करण्यात आले. त्यात १३ महिन्यांचे वर्ष व २८ दिवसांचा मास सुचवला. पण तो वार तारीख यांचा मेळ राखण्यास व्यावहारिक दृष्ट्या असमर्थ ठरले.
त्यामुळे सध्याचे ग्रेगरियन कॆलेंडर सुटसुटीत व अंगवळणी पडल्याने इ.स. ३००० पर्यंत तरी कालनिर्देशनाची चिंता नाही.

आंतरराष्ट्रिय कालगणना
सन १९२५ सालापासून शून्य रेखांशावरील ग्रिनीच या लंडन जवळिल शहराची स्थानिक वेळ ही आंतरराष्ट्रिय प्रमाणित वेळ म्हणून मान्यता पावली. त्या हिशोबाने भारताची प्रमाण वेळ ही ८२.५ पूर्व रेखांशावरील स्थानिक वेळ असल्याने ग्रिनिच पेक्षा साडेपाच तासाने पुढे आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ग्रिनिच ला मध्यान्हीचे बारा वाजले असतील त्या वेळी भारतात दुपारचे साडेपाच वाजले असतील. हे झालं वेळेबद्दल. पण वाराचे काय? त्यासाठी १८० अंश वृत्ताच्या जवळ समांतर अशी पॆसिफिक समुद्रातून जाणारी काल्पनिक रेषा निश्चित केली.ती ओलांडताना पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असाल तर पुढचा वार धरावा. पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असेल तर मागचा वार धरावा. त्याला आंतरराष्ट्रिय वार रेषा म्हणून मान्यता आहे. त्यावरुन विमान किवा जहाजे जाताना आपापली घड्याळे त्या ठिकाणी सुनिश्चित करावी लागतात. आता या गोष्टी स्वयंचलित होतात.२०२० साली महासत्तेचे स्वप्न बघणाया भारताने सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय कालगणनेचा विचार करण्या ऐवजी भारतातील जनगणनेचा विचार केला तरी खूप झाले.

लेखनविषय: दुवे:

Comments

वा

वा छान.
आपण बरीच उपयुक्त माहिती या लेखात दिली आहे. ती पचवायला दोन तीन वेळा लेख वाचायला लागणार.

सायन निरयन बद्दल वरवर पाहता सायन पद्धतीचे मापन बरोबर आहे की काय असे वाटले. ( काहीच कळत नसल्याने, मला बरेच काही कळते असा अनेकदा माझा समज होतो.)

हे जुलै आणि ऑगस्ट च्या दिवसांच्या संख्यानिश्चितीची मजा आवडली.

वाय २ के सरखी आता वाय ३ के ही नवीन समस्या मात्र मजेदार.

--- (तरतरीत जिभेचा) लिखाळ.

यंदा श्रावण पाळावा म्हणतो ! त्याला साखळीला बांधावे की पिंजर्‍यात ठेवावे याचा निर्णय होत नाहीये :)

सुरेख लेख

लेख उत्तम आहे. अतिशय आवडला. तरी घाईत वाचला. असे लेख काळजीपूर्वक वाचावे लागतात. मलाही लेख २-३ दा वाचावा लागेल असे वाटते, परंतु तो दोनतीनदा वाचण्याजोगाच आहे.

सकाळी साडेपाचबद्दल वाचून मजा वाटली. आमच्याकडे वर्षातले ८ महिने सकाळी साडेपाचला मध्यरात्र असते. तरी गुरुजी तेच पंचांग वापरतात. :)

आता काही शंका/कुशंका/ प्रश्नः

१. बारा चांद्र मासांचे एक संवत्सर. एक चांद्रमास २९.५ दिवसांचा. अशी ६० संवत्सरे आहेत.

यांतील अशी ६० संवत्सरे आहेत याचा विशेष अर्थ कळला नाही. ६० ही संख्या का आणि कशासाठी निश्चित केली किंवा पुढच्या ३६०, १२००? याचे काही गणित किंवा स्पष्टीकरण येते का? तसेच कृतयुगांपासून कलियुगाची वर्षे कमी कमी का होत जातात?

२. पळे, घटिका यांच्यासह एक शब्द वापरला जातो तो म्हणजे प्रहर. एका दिवसाचे ४ प्रहर असतात का? ते कसे ठरवले जातात? म्हणजे सूर्याच्या चालण्यावर सकाळ, दुपार असे असतात असे वाटते पण नेमके कसे?

३. कालनिर्णय वापरते ते पंचांग कोणते? निरयन की सायन?

४. पितर ही देवता कोणती? तिच्याबद्दल थोडे अधिक सांगता येईल का? (हा प्रश्न थोडा विषयांतरीत आहे परंतु उत्तर माहितीपूर्ण असावे असे वाटते. :) )

प्रश्नांतून अघोर अज्ञान दिसून येत असल्यास क्षमस्व!

प्रहर

२. पळे, घटिका यांच्यासह एक शब्द वापरला जातो तो म्हणजे प्रहर. एका दिवसाचे ४ प्रहर असतात का? ते कसे ठरवले जातात? म्हणजे सूर्याच्या चालण्यावर सकाळ, दुपार असे असतात असे वाटते पण नेमके कसे?

दिवसाचे ४ प्रहर असतात. तीन तासाचा एक प्रहर. रात्रंदिवस म्हणजे अष्टौप्रहर म्हणजेच आट त्रिक चोवीस तास. पण ते केवळ उल्लेखापुरतेच्.

कालनिर्णय वापरते ते पंचांग कोणते? निरयन की सायन?

कालनिर्णय हे निरयन पंचांग आहे. राफेल चे एफमेरीज हे खर्‍या अर्थाचे सायन पंचांग असते. पाश्चात्य ज्योतिष हे सायनाधारित आहे.

पितर ही देवता कोणती? तिच्याबद्दल थोडे अधिक सांगता येईल का? (

सर्वपित्री अमावस्या म्हणजे भाद्रपद अमावस्या. पितरांचे श्राद्ध त्यावेळी करतात. पितर या देवते विषयि अधिक माहिती नाही. पण देव, देवता, भूत प्रेत, पिशाच्च ,समंध, मुंजा, वेताळ, हडळ, चेटकीण, इ पैकी प्रेत या देवतेचा तो अपभ्रंश असावा. [तेहतीस कोटी संख्या आहे म्हणतात.]

बाकी टग्या यांनी सांगितलेले बरोबर आहे. अनेक गोष्टींना का? असे विचारले तर त्याचे केवळ तर्काधारेच उत्तर द्यावे लागते. पंचांगातील इतर बरीचशी माहिती ही गतानुगतिक उल्लेख आहेत.
प्रकाश घाटपांडे

पितर

सर्वपित्री अमावस्या म्हणजे भाद्रपद अमावस्या. पितरांचे श्राद्ध त्यावेळी करतात. पितर या देवते विषयि अधिक माहिती नाही.

मला वाटते, (परत तर्काधारे) की "पितर" हा शब्द "पितृ" शब्दावरून आला असावा. सर्वपित्रीला वडिलांच्या बाजूने पूर्वजांची आठवण ठेवण्यासाठी पूजा आहे. भाद्रपदातील कृष्ण पंधरवडा हा संपूर्ण त्यासाठी असतो म्हणून त्याला पितृपंधरवडा असे म्हणतात. ज्यांना श्राद्धे करायची असतात पण जे योग्य तिथीला करू शकत नाहीत त्यांना ह्या पंधरवड्यातील त्या तिथीस करू शकतात .

या तर्काला अजून एक गंमतशीर संदर्भ म्हणजे चि.वि. जोश्यांचे "चिमणराव" - त्याला सर्वपित्रीसाठी सुट्टी साहेबाला मागायची असते म्हणून इंग्रजी अर्जात लिहीतो की , "Tomorrow is all fathers night"!

पितर

मला वाटते, (परत तर्काधारे) की "पितर" हा शब्द "पितृ" शब्दावरून आला असावा. सर्वपित्रीला वडिलांच्या बाजूने पूर्वजांची आठवण ठेवण्यासाठी पूजा आहे. भाद्रपदातील कृष्ण पंधरवडा हा संपूर्ण त्यासाठी असतो म्हणून त्याला पितृपंधरवडा असे म्हणतात. ज्यांना श्राद्धे करायची असतात पण जे योग्य तिथीला करू शकत नाहीत त्यांना ह्या पंधरवड्यातील त्या तिथीस करू शकतात

आपली मांडणी तर्कशुद्ध आहे तसेच विवादास्पद नाही. पाप्याचे पितर हा शब्द कसा आला असावा?

त्याला सर्वपित्रीसाठी सुट्टी साहेबाला मागायची असते म्हणून इंग्रजी अर्जात लिहीतो की , "Tomorrow is all fathers night"!

आमच्या पोलिस खात्यात सा.सु ( साप्ताहिक सुटी) बंद चा फतवा ( आदेश) हे दीर्घ काळ असतो. सासु भोगायला साहेबाची परवानगी लागते. सासु भोगली नाही तर त्याचा साठ रुपये मोबदला (आता सव्वाशे)मिळण्या साठी विहित नमुन्यात अर्ज करावा लागतो. त्यात सासु न उपभोगण्याचे कारण अशा कॉलम मध्ये " सा.सु बंद चा आदेश" असे लिहितात. ज्या दिवशी तुम्ही साप्ताहिक सुटी उपभोगता अशा दिवशी व्यक्तिगत शासकीय दैनंदिनीत 'सासु भोगली 'असे लिहितात.( विराम चिन्ह विसरतात) एखाद्या वाहतूक पोलिसाने पकडले आणि पन्नास ऐवजी शंभर मागितले तर त्याचे आहार भत्ता ( सलग दहा तासापेक्शा अधिक काम केल्याने उपहार करण्यासाठी मिळणारा भत्ता) {पुर्वी पाच आता तीस रुपये } व सासु बिले आली नाहीत असे समजावे. आता पोलिसांना सासु थोड्या थोड्या प्रमाणात उपभोगायला मिळू लागल्या आहेत.{पुर्वीच्या मानाने}

प्रकाश घाटपांडे

पाप्याचे पितर

पाप्याचे पितर हा शब्द कसा आला असावा?

श्राद्धाच्या वेळी पितरांना गरम भात इ. चा पिंड देतात (नक्की काय काय ते माहित नाही) त्यावर पितर जगतात. जो मनुष्य आपल्या पितरांना असा भोग देत नाही, तो मनुष्य पापी आणि त्याचे बिच्चारे पितर उपाशी (त्यामुळे अशक्त :). त्यावरुन पाप्याचे पितर अशी म्हण आली असावी असा आमचा कयास.

गीतेमध्ये कोठेतरी पितरांचा उल्लेख आहे आणि निरुपणामध्ये टिळकांनी पितरांचा अर्थ 'उन अन्न (भात) ज्यांना दिला जातो ते' असा दिला आहे. मी ते वाचून योग्य शब्दात येथे द्यायचा प्रयत्न करिन. पण भावार्थ लक्षात होता तसे लिहिले. चूभूद्याघ्या.

--लिखाळ.

काहीच कळत नसल्याने, मला बरेच काही कळते असा अनेकदा माझा समज होतो.

६० च का?

६० ला १,२,३,४,५,६,१०,१२,१५,२०,३० या संख्यांनी पूर्ण भाग जातो. थोडक्यात याचे १,२,३,४,५,६.. पूर्णांकार भाग करणे सहज शक्य आहे. रोमनांना याचे विशेष कौतुक. याच कारणाने वर्तुळ ३६० अंशाचे. घड्याळ ६० सेकंदा, मिनिटांचे.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

वा!

इजिप्तमध्ये नाईल नदीच्या पुराशी लोकजीवन अवलंबून होते. त्यामुळे या संबंधांचे निरिक्षण करुन त्यावरुन काही आडाखे बांधता येउ लागले.यातूनच ज्योतिषशास्त्राचा म्हणजे आताच्या खगोलशास्त्रीय भागाचा उगम झाला.

हा सिद्धांत मुळात कुणी मांडला हे पण कळले तर बरे.म्हणजे सायटेशन सायटेशन!
आणी जरी असे मानले तरी त्यावर भारतीयांनी जे काही तर्क उभे केले आहेत ते पाहिल्यावर चाट पडायला होतं. मला मनापासून शंका येते की इतके तर्क उभे करण्यासाठी तेथे 'मुळातच काही' असावे लागते. मुख्य माहितीचीच उधारी करून असे कसे करता येते कुणास ठाऊक!

योग व करण ही पंचांगाची अंगे व्यवहारात अजिबात उपयोगाची नाही.

ज्योतिषाच्या दृष्टीकोनातून अतिशय विवादास्पद वाक्य!

पण पंचांगाचे मुख्य पक्ष दोनच. सायन आणि निरयन. अगदी रिपब्लिकन आणि डेमोक्रॆटिक पक्षासारखे. वा काहीच्या काहीच भन्नाट उपमा! अगदी सही!! जिओ!!!

तसा धार्मिक अंगाचा प्रथमोपचार
क्याबात यासाठे तर तुम्हाला आमचा सलाम!

अवकाश गोल म्हणजे एक कलिंगड आहे असे मानले तर त्याचे समान २७ खाप करायचे.म्हणजे एक फोड झाली १३ अंश २० कलांची.
वा ! किती सोप्या भाषेत छान समजावून दिला आपण हा भाग! खुप आवडले!
पंचांगातील पौराणिक कालगणना
६० वर्षे (संवत्सरे) = १ संवत्सर चक्र
३६० संवत्सरे म्हणजे अथवा मानवी वर्षे = १ दिव्य वर्ष
१२०० दिव्य वर्षे = १ कलियुग
२४०० दिव्यवर्षे = १ द्वापार युग
३६०० दिव्य वर्षे= १ त्रेता युग
४८०० दिव्य वर्षे= १ कृत युग
४ युगे = १ महायुग
७१ महायुगे = १ मनु
१४ मनु= १ कल्प (ब्रह्मदेवाचा एक दिवस)
३६००० कल्प= ब्रह्मदेवाचे पुर्ण आयुष्य
१००० ब्रह्माची आयुष्ये=१ विष्णुची घटका
१००० विष्णुच्या घटिका म्हणजे १ शिवनिमिष
१००० शिवनिमिष = १ महामाया निमिष

हे वाचले असता प्र्वजांनी काळाचा किती मोठा भाग मोजण्याचा प्रयत्न केला आहे हे कळते. हे सगळे कसे सुचले असेल हा तर्क कसा कसा पुर्ण होत गेला असेल याचा विचारही करवत नाही. या सगळ्यात दोन चारशे वर्षे हा काही काळच नाही असे वाटते. त्यापुढे मानवी आयुष्य तर एक बिंदुरूपही दिसत नाही. आणी तरीही आपल्याला आपले नाव 'टिकण्याची' काय खाज असते नाही?

सूर्योदयापासून दिवसाचा व वाराचा प्रारंभ करावा. हे मागे ही आले होते. याव्हे कारण म्हणजे वाराचे सुरुवात दिवसाच्या पहिल्या होर्‍यापासून होते. मात्र जगात अजून कोठे अशी पद्धत आहे का याचा काही माग मला तरी लागला नाही.

धर्मशास्त्रार्थ सुलभपणे सांगितला गेला. त्यामुळे विशिष्ट गटाची मक्तेदारी काही प्रमाणात मोडली. पंचांगाचा अर्थ लोकांना समजायला थोड सोप झालं.

काही प्रमाणात मोडली हे बाकी खरं आहे!

असो, लेख अतिशय आवडला. माहीतीपुर्ण आहे. मुखपृष्ठावर आलाच पाहिजे असा आहे.
अप्रतिम लेखाबद्दल घाटपदंडे साहेबांचे अभिनंदन!

असेच अजून येवू देत!

आपला
गुंडोपंत

सायटेशन

इजिप्तमध्ये नाईल नदीच्या पुराशी लोकजीवन अवलंबून होते. त्यामुळे या संबंधांचे निरिक्षण करुन त्यावरुन काही आडाखे बांधता येउ लागले.यातूनच ज्योतिषशास्त्राचा म्हणजे आताच्या खगोलशास्त्रीय भागाचा उगम झाला.

हा सिद्धांत मुळात कुणी मांडला हे पण कळले तर बरे.म्हणजे सायटेशन सायटेशन!
आणी जरी असे मानले तरी त्यावर भारतीयांनी जे काही तर्क उभे केले आहेत ते पाहिल्यावर चाट पडायला होतं. मला मनापासून शंका येते की इतके तर्क उभे करण्यासाठी तेथे 'मुळातच काही' असावे लागते. मुख्य माहितीचीच उधारी करून असे कसे करता येते कुणास ठाऊक!

हा सिद्धांत नसून संहिता स्कंधाचा भाग आहे. जिज्ञासूंसाठी अधिक माहिती चे काही संदर्भ
१) खगोलशास्त्राचा इतिहास (ज्योति:शास्त्रासह) संपादक- ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर वरदा बूक्स
२) ज्योतिर्वैभव - त्र्यं.गो. ढवळे प्रकाशक - देशमुख आणि कं १९५६
३)पंचांग शुद्धिरहस्य - प्रो वि.ब. नाईक केसरी प्रकाशन
४) पंचांगाची ओळख वा.ह. राजंदेकर अकोला
५) सुलभ ज्योतिषशास्त्र संपादक कृ. वि.सोमण ढवळे प्रकाशन
६) ज्योतिर्विलास शं बा दिक्षित पुनर्मुद्रण प्रतिभा प्रतिष्ठान मुंबई १९९२ किं ३५रु.(स्वस्त ग्रंथमाला योजनांतर्गत)
७) कालमापन श्री . द. तथा काकासाहेब अवचट सौभाग्य प्रकाशन सदाशिव पेठ पुणे १९८७
८) भारताची नवी कालगणना (पंचांग) ले. चाणक्य १९५७ सरोज साहित्य ८६५ सदाशिव पेठ पुणे २ किं चार आणे
९) भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास शं.बा.दिक्षित वरदा बूक्स ४००/-
१०) पंचांग म्हणजे काय व संक्षेपात पंचांगवाद ले प्रा. र.वि. वैद्य अनाथ विद्यार्थि गृह प्रकाशन पुणे
११) नक्षत्रलोक पं महादेवशास्त्री जोशी

बहुसंख्य पुस्तके बाजारात उपलब्ध नाहीत.
(माझ्याकडे आहेत टुकटुक)
प्रकाश घाटपांडे

पुस्तके

बहुसंख्य पुस्तके बाजारात उपलब्ध नाहीत.
(माझ्याकडे आहेत टुकटुक)

cool!

दुर्मीळ पुस्तके आहेत आहेत वाचून खरेच टुकटुक झाले!

छानच आहे लेख

>>>पंचांग धार्मिक प्रथमोपचाराची पेटी

एकदम सही बात...

एकंदरीत उपक्रमावरील "टॉप २५" किंवा "बेस्ट् ___"मधे नक्कीच असणारा एक माहीतीपुर्ण लेख

धन्यवाद घाटपांडेसाहेब.

असेच

हेच म्हणतो.
अतिशय सुंदर लेख.

टॉप १०

उपक्रम टॉप १० मधला लेख. संग्रहणीय - कालातीत ज्ञान. वा!वा!

अवांतरः
हा लेख कोणत्याही मासिकात (विशेषतः दिवाळी अंकात) सहज घेतील.
घाटपांडेसाहेब, अहो कशाला 'अंनिस'च्या नादाला लागलात? मस्तपैकी फलज्योतिष सांगायचेत. पंडित घाटपांडे शास्त्री म्हणून नावारूपाला आला असतात - बघा, अजूनही वेळ गेलेली नाही. ;) (हे ह. घ्या.)

दिवाळी अंक?

हा लेख कोणत्याही मासिकात (विशेषतः दिवाळी अंकात) सहज घेतील.

म्हणजे? कोणत्या दिवाळी अंकाचे काम सुरु आहे? ;) (ह. घ्या.)

फलज्योतिष

घाटपांडेसाहेब, अहो कशाला 'अंनिस'च्या नादाला लागलात? मस्तपैकी फलज्योतिष सांगायचेत. पंडित घाटपांडे शास्त्री म्हणून नावारूपाला आला असतात - बघा, अजूनही वेळ गेलेली नाही. ;) (हे ह. घ्या.)

अहो कदाचीत घाटपांडेसाहेबांनी अनीसचे भविष्य पाहीले असेल आणि तेजी येऊ शकेल असे वाटल्याने त्यांच्या नादी लागले! (हे पण अवांतर आणि ह.घ्या.)

अगदी असेच..

उपक्रम टॉप १० मधला लेख. संग्रहणीय - कालातीत ज्ञान. वा!वा!

योग

योग व करण ही पंचांगाची अंगे व्यवहारात अजिबात उपयोगाची नाही.

ज्योतिषाच्या दृष्टीकोनातून अतिशय विवादास्पद वाक्य!

फलज्योतिषाच्या दृष्टिने म्हणत असाल तर फलज्योतिषातील केंद्र,नवपंचम, त्रिरेकदश, समस्प्तक,षडाष्टक वगैर योग हे वेगळे .त्याचा पंचांगातील योगाशी संबंध नाही.
Astrology म्हणजे फलज्योतिष
astronomy म्हणजे ज्योतिष
लोकांच्या मनात संभ्रम येथेच तयार होतो. अधिक माहिती साठी " ज्योतिषा कडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातून सुसंवाद." वाचावे.
सदर पुस्तकाचा मुक्तस्त्रोत करायचा आहे. पण माझ्या संगणकात ते krishna.ttf या फुकट फाँट मध्ये टंकित आहे ते Unicode मध्ये कसे करायचे ते मला कुणी सांगत नाही . ज्यांना ते वाचण्यात रस आहे त्यांना मी सदर फाँट व त्यातील टंकित सहपत्र विरोपाने पाठवू शकतो. पण युनिकोड मध्ये असते तर इथेच नेविजाप्र म्हणून अपलोड करता आले असते. आमचे तांत्रिक ज्ञान तोकडे आहे. ते प्रगल्भित करण्यासाठी काय करावे असा प्रश्न माझ्या समोर सध्या आहे.

प्रकाश घाटपांडे

जोरदार्

जोरदार लेख हाये बरं का ! वाचाला जरशीक टैम लागतू
आता गाववाल्यानी पंचागाबदूल काय बी सवाल केला त माहा जवाब रेडी हाये.

बाबूराव

वा घाटपांडे साहेब !

घाटपांडे साहेब,
पंचागाबद्दलची माहिती आवडली,त्याला दिलेला आधूनिक टच आवडला.त्याच बरोबर पोलिस हा चांगला साहित्यिक असतो हे माहित होते,पण फलज्योतिष,मांत्रिक,तांत्रिक असे कितीतरी विषय सुंदर हाताळणारा,ब्लॉगवर व्हीआरएस.ची मजेशीर,विचार करायला लावणारे विविध कारणे सांगणारा, बिनतारी जगतातला उपनिरिक्षक या निमित्ताने अधिक भावला .

प्रतिसाद गुपचूप डिलीट करणे हा संपादक मंडळाच्या अधिकाराचा अतिरेक आहे, असे प्रा.डॉ.दिलीप बिरुटेंना वाटते.

"बेहतरीन" लेख

परत एकदा हिन्दी शब्दा बद्दल माफ़ी, पण "बेहतरीन" शब्दच मला मिळाला (मराठी भाषे चे माझे ज्ञान तोकडे़ आहे हे मी आधीच मान्य केले आहे)
फ़ारच उत्तम लेख वाचायला दिला घाटपांडे साहेबांनी, पंचांग ह्या बद्दल मला काहीही माहित नव्हते, पण आता बरेच काही माहित झाले आहे, इतका मोठा लेख वाचायला आणि समजायला मला वेळ लागेल, म्ह्णून संगणकात "सेव" करून ठेवून घेतला आहे... ह्या विस्तृत आणि ज्ञानवर्धक लेख बद्दल परत एकदा माझी "बधाई" घ्या...

घाटपांडे साहेब : आपण दिलेल्या वायपी सिंह यांच्या इंटरव्यू वाल्या दुव्या चे हिन्दी अनुवाद माझ्या अनुदिनी वर केले आहे, त्या बद्दल ही आभार...
http://sureshchiplunkar.blogspot.com

 
^ वर