माझ्या संग्रहातील पुस्तके -९ प्रकाशवाटा

प्रकाश आमटेंच्या 'प्रकाशवाटा' या पुस्तकावर लिहावेसे वाटताच मी स्वतःला फार भावुक होऊन भाबडेपणाने काही न लिहिण्याविषयी बजावले. या पुस्तकावर तर लिहायचे, पण ते शक्यतो वस्तुनिष्ठ राहून, या तयारीने मी हे पुस्तक वाचायला घेतले. पुस्तक वाचून संपताना मात्र या पुस्तकावर गदगदूनच लिहिले पाहिजे, अशी काहीशी मनाची धारणा झाली. (आणि मग तेवढी गदगद आपल्याला लिखाणात आणता येईल की नाही, याविषयी मनात शंका निर्माण झाली!) तुमच्याआमच्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी असतील, कथाकवितांमधील उडते पतंग असतील, तर वाहून न जाता (श्री. पु. भागवतांप्रमाणे!) तटस्थपणे हे वाक्य बरे आहे, ही उपमा चुकली आहे, हा शेवटचा पीळ ओ. हेन्रीसारखा, अशी चिकित्सा करता येते. आमटेंचे हे पुस्तक कोणत्याही चिकित्सेपलीकडचे आहे. काही काही लिखाणांत 'आयुष्य नावाच्या जनावराचा वास' इतका तीव्र असतो, की मग त्या लिखाणाला शैली, कलाकुसर वगैरेंच्या कुबड्यांची गरज भासत नाही. 'वो खलिश कहां से होती, जो जिगर के पार होता' सारखे ते लेखन आपल्याला भेदून जाते.
प्रकाशवाटा' हे मॅगसेसे पुरस्कार विजेते प्रकाश आमटे यांनी त्यांच्या हेमलकशाच्या 'लोकबिरादरी प्रकल्पा'तल्या अनुभवांवर लिहिलेले पुस्तक. वस्तुतः विलक्षण कर्तबगार माणसांच्या मुलांना फक्त आपले अस्तित्व टिकवून ठेवणे हेच मोठे आव्हान असते. गांधींपासून गावसकरपर्यंत अशी उदाहरणे आहेत. ब्रॅडमनच्या मुलाने आपले आडनाव यासाठी बदलले म्हणतात. बाबा आमटे हे असेच एक आभाळउंच नाव. आमटेंची मुले सामान्य आयुष्य जगती, तर त्यांना त्याचे ओझेच झाले असते. प्रकाश आणि विकास या आमटेंच्या मुलांनी बाकी बाबांनी सुरु केलेले काम पुढे नेले आहे, वाढवले आहे. अशाच एका कामाची लोकविलक्षण कहाणी म्हणजे 'प्रकाशवाटा'.
१९७३ साली सुरु झालेल्या लोकबिरादरी प्रकल्पाची त्या काळातली वर्णने वाचताना अंगावर शहारा येतो. आसपास घनदाट, रौद्र जंगल, अत्यंत विषम हवामान, वीज, पाणी, रस्ते... यातलं काहीही नाही, राहायला घर सोडाच, झोपडीही नाही, सपाट जागाही नाही, आणि ज्या माडिया गोंड आदिवासींच्या विकासासाठी हे हाताच्या बोटांवर मोजण्याइतके काही वेडे तरुण लोक घरदार सोडून या जंगलात राहायला आले, ते, भूक, रोगराई, अंधश्रद्धा यांच्या विळख्यात सापडलेले, शहरीकरणाचे वारेही न लागलेले , अतीमागासलेले आदिवासी लोक. अशा अवस्थेत नुसते पोकळ आदर्श आणि ''काहीतरी' करुन दाखवायचं आहे' अशी बालीश जिद्द कामाला येत नाही. जंगल हे पर्यटकांना कितीही मोहक वाटत असलं तरी शेवटी ही मोहकता जोवर मनात रात्रीचे डाकबंगल्यातले गरम पांघरुण शाबूत आहे, तोवरच कायम असते. निसर्गाच्या भीषण स्वरुपाशी सामना करताना सगळी शारीरिक आणि मानसिक ताकद पणाला लागते. अशा समग्र ताकदीनिशी हे झपाटलेले लोक कामाला लागले आणि सगळ्या अडीअडचणींवर मात करुन हेमलकशाचे आजचे जे रुप आहे, ते त्यांनी साकार केले. आणि या अडीअडचणींचे स्वरुप जरी पाहिले, तरी या लोकांना प्रेरित करणारी ती कोणती लोकविलक्षण शक्ती आहे, असा प्रश्न पडतो.
भामरागड हा विभाग महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश यांच्या सीमेवरचा भाग. आनंदवनापासून साधारण २५० कि.मि. अंतर. रस्ते जवळजवळ नाहीतच, म्हणून हे अंतर पार करायला चक्क दोन दिवस लागायचे. सगळा भाग घनदाट जंगलाने व्यापलेला. हे जंगल रम्य असले तरी भयानक होते. प्रचंड पाऊस, प्रचंड थंडी आणि प्रचंड उन्हाळा. काही ठिकाणी सूर्यप्रकाश जमिनीवर पोचणार नाही इतकी घनदाट झाडी. जंगली पशुपक्षी, विषारी सापविंचू, पुरात वाटेल येईल ते गिळंकृत करणार्‍या नद्या. इथले स्थानिक म्हणजे माडिया गोंड लोक. समाजाच्या मूळ प्रवाहापासून कैक योजने दूर असलेली ही अतिमागास आदिवासी जमात. शिक्षण नाही, उपजीविकेचा निश्चित असा मार्ग नाही, लोकसंपर्क नाही आणि कागदोपत्री महाराष्ट्रात असूनही मराठी भाषेचा गंध नाही. स्थानिक माडिया बोलीभाषा ही मराठीपेक्षा संपूर्ण वेगळी अशी भाषा आहे. मागासलेपण इतके, की अंगभर कपडे घातलेला शहरी माणूस पाहिला की आधी हे लोक घाबरुन चक्क पळूनच जात.
अशा रानटी जागेवर जाऊन आदिवासींच्या विकासासाठी काहीतरी करणे हे बाबा आमटेंसारखा माणूसच करु जाणे. बाबांचे वाढते वय बघून भामरागड प्रकल्पाचे जबाबदारी प्रकाश आमटेंनी स्वीकारली. त्यांचे नुकतेच लग्न झाले होते आणि या दुर्गम भागात त्यांच्याबरोबर यायला त्यांच्या उच्च्शिक्षित पत्नी मंदाताई बिनतक्रार नव्हे तर आनंदाने तयार झाल्या! कुठल्या मुशीतून असले लोक तयार होतात, कोण जाणे! हेमलकसा भागातली जमीन सरकारने या प्रकल्पासाठी देऊ केली आणि काही मोजक्या सहकार्‍यांबरोबर प्रकाश आमटे इथे आले. इथल्या अडचणींना तर अंतच नव्हता. प्रकल्पासाठी सपाट जमीन आणि राहायला तंबू ठोकायचे म्हणून साफसफाई करायला सुरवात केली, तर वनखात्याच्या लोकांनी मनाई केली. त्या काळातल्या आमटेंच्या कामाची कल्पना केली तरी हादरुन जायला होते. वीज नाही, पाणी नाही, राहायला जागा नाही, माणसंही नाहीत. होतं ते फक्त जंगल, त्यात लपून बसलेले आदिवासी आणि प्राणी. आनंदवनात रोगमुक्त झालेले, पण तरीही समाजानं अव्हेरलेले काही कार्यकर्ते हेमलकशाला आले होते. त्यांच्या मदतीनं प्रकाश आमटेंनी काम सुरु केलं. पण ज्यांच्या विकासासाठी हे काम सुरु केलं होतं ते आदिवासी या शहरी लोकांकडे फिरकतच नव्हते. मग माडिया भाषा शिकणं आलं, आदिवासींचा विश्वास संपादन करणं आलं, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करणं आलं...
आणि या वैद्यकीय उपचारांचे स्वरुप तर भीती वाटावी असे आहे. माडियांची जीवनशैली - हा शब्दतरी त्यांच्या बाबतीत लागू पडतो की नाही, कुणास ठाऊक- इतकी आदिम की प्रत्येक जण प्रचंड कुपोषणाचा बळी पडलेला असे.आंबील, भात आणि मिळेल ते प्राणी एवढंच अन्न. खायच्या प्राण्यांत अगदी मुंग्याही. दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या एका मध्यमवयीन माणसाचं वजन केवळ २३ किलो होतं हे वाचल्यानंतर आपल्या हातातला घास तसाच राहातो.मलेरिया, सेरेब्रल मलेरिया, झाडांवरुन पडून हातपाय मोडणं, अस्वलाच्या हल्ल्यात जखमी होणं असल्या या माडियांच्या समस्या. अस्वलाच्या हल्ल्याची आमट्यांनी वर्णन केलेली एक कथा मनावर एक कधीही न पुसणारा डाग पाडून जाते. डाग म्हणजे केवळ एक ठिपका नव्हे, तर एखादे लोखंडी अवजार लालभडक होईपर्यंत तापवून दिलेला चरचरीत डाग.
अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेला एक माडिया उपचारांसाठी आला. त्याच्या चेहर्‍याचा ओठांपासूनचा टाळूपर्यंतचा भाग अस्वलाने एखादे फळ सोलावे, तसा सोलून काढला होता. (त्या चेहर्‍याचा फोटो तर डोळ्यांसमोरुन जाता जात नाही). डोळे फुटलेले, संपूर्ण आंधळा झालेला तो माणूस शुद्धीवर होता, आपल्यावर हल्ला कसा झाला ते सांगत होता. जखमेत माती, पालापाचोळा गेलेला. ती जखम बघून एक शिकाऊ डॉक्टरला तर चक्करच आली.आमटेंनी हळूहळू ती जखम स्चच्छ केली. जखम शिवायची म्हटले तर भूल कुठेकुठे म्हणून द्यायची, म्हणून भूल न देताच त्याचा फाटलेला चेहरा शिवायला सुरवात केली. जखमेवर घातलेले दीडशे टाके पूर्ण होईतो तो माडिया शांतपणे सहन करत बसला होता. चार-पाच दिवसांत तो बरा होऊन चालत आपल्या घरी गेला.
पण ही कथा इथे संपत नाही. त्याचे दोन्ही डोळे फुटले होते, त्यामुळे त्याला शिकार, जुजबी शेती असलं काही करणं शक्य नव्हतं. अशा बिन उपयोगाच्या माणसाला कोण आणि कसे पोसणार? त्याच्या नातेवाईकांनी त्याला खायला देणं कमी केलं, आणि उपासमारीनं तो माणूस दोन वर्षांत मरण पावला.
दुसरी अशीच एक कथा आहे ती कॉलर्‍याच्या साथीची. बांबूतोडीच्या कंत्राटदाराने जंगलात हजारो मजूर बांबू तोडण्याच्या कामावर आणले, पण त्यांच्यासाठी स्वच्छतागृहे वगैरेंची व्यवस्था करण्याची त्याला काही गरजच भासली नाही. त्या लोकांनी प्रातर्विधीसाठी नदीचा वापर करायला सुरवात केली, आणि नदीचं पाणी भयानक प्रदूषित झालं. माडियांच्या वस्त्यांमध्ये कॉलर्‍याची साथ पसरली. एका रात्रीत तीनशे लोक आमट्यांकडे उपचारासाठी आले.एक बाई आपल्या लहान मुलाला घेऊन आली. उपचारांनंतर मुलाला थोडं बरं वाटायला लागल्यावर ती मुलाला तिथंच ठेवून परत जायला निघाली. तिथल्या कार्यकर्त्यांनी तिला मुलाला पूर्ण बरं वाटेपर्यंत थांबायला सांगितलं. त्यावर ती बाई म्हणाली, "माझा नवरा काल या लागणीनं मेला. दोन मुलांना लागण झाली. त्या दोन्ही मुलांना घेऊन मी इकडं यायला निघाले, तर एक मुलगा वाटेतच गेला. त्याला झाडाखाली ठेवून मी इकडे आले. आता परत जाऊन त्याला पुरुन येते."
'प्रकाशवाटा' मध्ये असे मनाचे तुकडे करणारे अनेक प्रसंग आहेत.अत्यंत बिकट परिस्थितीतून, जिवावर बेतणार्‍या प्रसंगांतून, सर्पदंश, मधमाशांचा, बिबट्याचा हल्ला, या सगळ्यांतून झगडत झगडत शेवटी जिवंत राहून हेमलकशाला इस्पितळ, शाळा सुरु करणार्‍या काही झपाटलेल्या लोकांची ही कहाणी आहे. बाबा आमटेंनी सुरु केलेली ही चळवळ आता त्यांची तिसरी पिढी सांभाळते आहे, अधिक समर्थपणे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सांभाळते आहे - आमटेंच्या कथनात या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे. हे एकट्यादुकट्याने करायचे काम नव्हे, याचा आमटे विनयपूर्वक उल्लेख करतात. हा - त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर - 'जगन्नाथाचा रथ' ओढण्यात अनेक लोकांचा, संस्थांचा हातभार लागला आहे. त्यातली बरीचशी नावे आपल्याला अपरिचित आहेत - म्हणजे आपल्या परिचितांपैकी फारशा कुणाचे इकडे लक्ष गेलेले दिसत नाही. 'पु.ल. देशपांडे फाऊंडेशन' सारखे सन्माननीय अपवाद सोडले तर. आणखी एक सुखद धक्का देऊन जाणारे नाव म्हणजे नाना पाटेकरचे. नानाने फारसा गाजावाजा न करत या कामाला गेल्या काही वर्षांत तीसेक लाख रुपये दिले आहेत, हे वाचून त्याच्याविषयीचे मतच बदलून जाते. (तसे ते 'प्रहार' बघूनही बदलले होते म्हणा!)
पुस्तक वाचून होताहोता डोक्यात विचारांचा 'गल्बला' सुरु होतो. उत्तम पुस्तकाचे हे एक गमक मानले जाते म्हणे. पण त्यातला सगळ्यात अस्वस्थ करुन जाणारा विचार हा, की कोणतेही मोठे आर्थिक पाठबळ नाही, मनुष्यबळ नाही - अशा अवस्थेत चार लोक हे इतके आभाळाइतके मोठे काम करु शकतात. शासकीय उदासीनता ही तर आता आपण गृहीतच धरली आहे ('ग्रेट भेट्' मध्ये निखिल वागळेंशी बोलताना आमटेंनी याचे एक उदाहरण दिले होते. मॅगसेसे पुरस्कार विजेत्या आमटेंचे नक्की काम काय आहे, आणि ते कुठे आहे, याचा मंत्रालयात पत्ता नाही. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर शासकीय अभिनंदन आले ते आनंदवनाच्या पत्त्यावर - आणि तेही कुष्ठरोगी पुनर्वसनाचे काम केल्याबद्दल!) समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे. एक जुनी उपमा वापरायची तर 'समुद्रातून एखादी जलपरी सुळकांडी मारुन वर यावी आणि समुद्राकडे पाठ करुन बकाबका भेळ खात बसलेल्या हजारो लोकांचे तिकडे लक्षही जाऊ नये' असे काहीसे होते आहे. यातले चित्र थोडेसे - अगदी थोडेसे जरी वेगळे असते, तर हे चार लोक कायकाय करु शकले असते? मग लक्षात येते की सरकार आणि समाज यांच्यात थोडीशी जरी संवेदनशीलता शाबूत असती, तर असले प्रश्नच उद्भवले नसते. प्रकाश आमट्यांनी लिहिले आहे की हेमलकशाच्या जंगलातले बहुतेक पक्षी तिथल्या आदिवासींनी खाऊन संपवले आहेत; अगदी चिमण्या कावळेही. जर आपण थोडेसे अधिक जागृत असतो, तर हजारो आदिवासींबरोबरच हे लाखो पशु-पक्षीही वाचले असते!
एका बाजूला आमट्यांच्या कामाचा अभिमान वाटावा, आणि दुसर्‍या बाजूला स्वतःची लाज वाटावी अशा दोन्ही भावना एकाच वेळी मनात जागवणारे हे पुस्तक माझ्या संग्रहात आहे.
प्रकाशवाटा
डॉ. प्रकाश आमटे
शब्दांकन: सीमा भानू
समकालीन प्रकाशन
१५६ पृष्ठे
किंमत २०० रुपये

Comments

अप्रतिम

पुस्तक वाचलेले नाहि .. मात्र परिक्षण इतके सुंदर उतरले आहे की वाचताना शहारा यावा..

हे पुस्तक नुसते मिळवून वाचलेच पाहिजे असे नाही तर विकतही घेतले पाहिजे असे वाटले..

एका अविरत काम करणार्‍या माणसाच्या पुस्तकाची तितकीच मनस्वी ओळख करून दिल्याबद्द्ल आभार

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे.- सन्जोप राव

सुंदर

पुस्तक वाचलेले नाहि .. मात्र परीक्षण इतके सुंदर उतरले आहे की वाचताना शहारा यावा..

हे पुस्तक नुसते मिळवून वाचलेच पाहिजे असे नाही तर विकतही घेतले पाहिजे असे वाटले..

एका अविरत काम करणार्‍या माणसाच्या पुस्तकाची तितकीच मनस्वी ओळख करून दिल्याबद्दल आभार

अगदी असेच म्हणतो. फार सुरेख परीक्षण रावसाहेब.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

+१

हेच म्हणतो. बाकी अधिक काहीही लिहू शकत नाही. परिपूर्ण लिखाण.

मन सुन्न करणारे पुस्तक

पुस्तक वाचताना अंगावर काटा येतो. मुंबईत बसुन माहाराष्ट्रातल्या आदिवासींची "माणुस" म्हणून कसे जगतात ह्याची आपल्याला कल्पना ही नसते. आमटे कुटूंब, आदिवासींना "माणसात" आणण्याचा प्रयन्त करतात हे खरेच खुप कौतुकास्पद आहे. ३-४ आठवड्यांपुर्वी "स्टार माझा" वाहिनीवर प्रकाश आमटे आणि मंदाताई आमट्यांची मुलाखत ऐकण्यात आली. त्यात त्यांनी माडिया समाजाचा पहिला डॉक्टर कसा घडला आणि तो आता मोठ्या पगाराच्या नोकर्‍या सोडून, तो कसा आता आपल्या समाजाची त्यांच्यात राहुन सेवा करत आहे हे सांगितले. त्यांच्या स्वतःच्या तोंडुन काही प्रसंग ऐकले आणि त्यांच्या व्यथा ही कळल्या. हिंमत न हारता ते अविरत समाजसेवेचे काम करते आहे.

सरकार ने

सरकार ने आपला सरकारीपणा दाखवावा आणि काही काम करावे या साठी जनता (किंवा एक माणूस ) सरकारला वेठीस धरू शकतो काय? असल्यास कसे? इथल्या लोकांना नशीबाने आमटे मिळाले. बाकी मागास ठिकाणी कोण? (ख्रिश्चन मिशनरी?) आणि आमट्यांनाही सरकारी मदत ही होऊच शकते की. त्यांना नाही करायची तर कुणाला करायची? (जाचच वाटतो सरकारी मदतीचा अनेकदा)

परीक्षण, पुस्तक, जीवनानुभव आणि दांपत्य

परीक्षण, पुस्तक, जीवनानुभव आणि डॉ. प्रकाश-डॉ. मंदाकिनी दांपत्य - हे सारेच शंभर नंबरी सोने आहे.हे पुस्तक वाचलेले नाही. आता मिळवून वाचतो.

("काही काही लिखाणांत 'आयुष्य नावाच्या जनावराचा वास' इतका तीव्र असतो, की मग त्या लिखाणाला शैली, कलाकुसर वगैरेंच्या कुबड्यांची गरज भासत नाही." हे वाक्य आवडले. थोडे क्लीशे बोलायचे तर -"काही काही लेखन हे मुळातच कस्तुरी असल्याने त्यावर शैली, कलाकुसर वगैरे अत्तरे फवारण्याची गरज भासत नाही." )

पूर्वीही 'ई-अनुभव' मासिकात (कदाचित याच पुस्तकातील काही भाग इथे) त्यांच्या अनुभवांबद्दल वाचले होते. (ज्यांना ताबडतोब पुस्तक मिळणे शक्य नाही त्यांनी 'दुधाची तहान ताकावर'या न्यायाने ते वाचावे.)

त्यापेक्षाही प्रत्यक्ष हेमलकशाला जाऊन यावे असे खूप मनात येते. कळत्या वयातल्या मुलाला आणि खरेतर स्वतःलाही खरे 'समाजकार्य' म्हणजे काय? ते प्रत्यक्ष दाखवावे असे खूप वाटते. इथे लोकबिरादरी प्रकल्पाबद्दल.

आभार आणि श्रेयअव्हेर

हे दोन महत्वाचे दुवे दिल्याबद्दल अनेक आभार, विसुनाना.
'आयुष्य नावाच्या जनावराचा वास' आणि 'समुद्राकाठी बकाबका भेळ खाणारी माणसे' या उपमा सुंदर आहेत, पण त्या मुळात माझ्या नाहीत, हे स्पष्ट करावेसे वाटते.
ज्यांना ज्यांना शक्य आहे, त्यांनी हे पुस्तक विकत घ्यावे असे आवाहन या निमित्ताने करतो.
सन्जोप राव
उर्ध्वबाहु:प्रवक्षामि न कश्चित् श्रुणोती मे!

या ओळी कोणाच्या आहेत?

आयुष्य नावाच्या जनावराचा वास' आणि 'समुद्राकाठी बकाबका भेळ खाणारी माणसे' या?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

ओळी

या जीएंच्या ओळी आहेत. माझ्या आठवणीप्रमाणे त्यांच्या पत्रांमधून .

बरोबर

बरोबर आहे. 'तो' उल्लेख झाला की विषयांतर होते. या लेखात मला ते नको होते.
सन्जोप राव
उर्ध्वबाहु:प्रवक्षामि न कश्चित् श्रुणोती मे!

अनुभव

परीक्षण, पुस्तक, जीवनानुभव आणि डॉ. प्रकाश-डॉ. मंदाकिनी दांपत्य - हे सारेच शंभर नंबरी सोने आहे.हे पुस्तक वाचलेले नाही. आता मिळवून वाचतो.
- सहमत आहे.

अनुभवच्या दिवाळी अंकात हा भाग वाचला होता. गळ्यापासून पोटापर्यंत एकेक फासळी मोजून घ्यावी अशा हलाखीत असलेल्या रुग्णाला तपासतानाचं छायाचित्र धक्का देऊन जाणारं. केव्हिन कार्टरच्या सुदानमधल्या त्या कुप्रसिद्ध छायाचित्रातून (मरणप्राय मुलगी आणि गिधाड) दिसणारी परिस्थिती आपल्याच राज्यात काही भागात अजूनही असल्याची जाणीव करून देणारं.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

छान...

एका उत्तुंग कार्याची आणि सुंदर पुस्तकाची ओळख छान आहे. विसुनानांनी दिलेली लिंकही छानच. आता हे पुस्तक पूर्ण वाचावेच लागणार. काही दिवसांपूर्वी आयबीएन-लोकमत वर् आमटेदांपत्याची सुंदर मुलाखत झाली होती. ती इथे पहायला मिळेल.

http://www.ibnlokmat.tv/programdetails.php?id=65922&channelid=331

बिपिन कार्यकर्ते

उत्कृष्ट शब्दांकन केलेले पुस्तक-परीक्षण

पुस्तक वाचण्यापूर्वी पुस्तकाची झलक दाखवणारे परीक्षण फारच आवडले.
अस्वलाने सोललेल्या माणसाला वैद्यकशास्त्राने तात्पुरते वाचवले, पण मग उपासमारीने मारले ही घटना डोळ्यांत अंजन घालणारी आहे.
वैद्यक आणि समाजसुधारणा या दोघांची सांगड घालू शकणारे प्रकाश आमट्यांसारखे थोडेच.

(हालाखीतही अशी मनोभावे सेवा करणारी "मिशनरी" वृत्ती ख्रिस्तप्रेमाशिवाय, किमानपक्षी ईशप्रेमाशिवाय, शक्य नाही, असे माझ्या काही मित्रामैत्रिणींचे मत आहे. त्यांच्या मताचे समर्थन म्हणजे दरिद्री भागांत झोकून काम करणार्‍यांपैकी धर्मप्रसाराविषयी प्रचंड आत्मीयतेने झपाटलेल्या लोकांचीच संख्या मोठी आहे. परंतु प्रकाश आमट्यांचे उदाहरण बघून जाणवते, की धर्मप्रसाराची ओढ ही एकमेव स्फूर्ती नाही. इतर मानव्य भावनांनाही सेवाभावाचे रूप घेऊन प्रकट होता येते, ही आशा बळावते.)

वाह सुंदर्!

परिक्षण फार सुंदर आले आहे!
या पुस्तकाची झलक इथे पाहायला मिळेल..

झलक

झलक म्हणून दिलेला दुवा फारच छान आहे. धन्यवाद, भाग्यश्री.
सन्जोप राव
उर्ध्वबाहु:प्रवक्षामि न कश्चित् श्रुणोती मे!

लघुपट

प्रकल्पाविषयी माहिती देणारा 'प्रकाशवाटा' हा लघुपट देखील उपलब्ध आहे. पुण्यात झालेल्या कार्यक्रमाचे वेळी ती सीडी उपलब्ध होती.
प्रकाश घाटपांडे

कार्य

सगळे पक्षी आदिवासींनी खाऊन टाकले हे वाचून आश्चर्य वाटले. आणि वाईटही वाटले. अस्वलाच्या हल्ल्याचे वर्णन वाचून पुस्तक वाचवेल की नाही अशी शंका आली पण हा लेख वाचून हेमलकशाला जाऊन यावे असेही वाटू लागले आहे!

क्रुर

सगळे पक्षी आदिवासींनी खाऊन टाकले हे वाचून आश्चर्य वाटले.

आश्चर्य काही नाही. मी जव्हार - मोखाडा भागात होते तेव्हा कावळा आणि साळुंखी सोडून आकाशात एकही पक्षी पाहिला नाही. पण त्याही पेक्षा भीषण म्हणजे त्यांच्या पक्ष्यांना पकडायच्या पद्धती. अगदी रासवट.
--------------------------X--X-------------------------------
गडद जांभळं, भरलं आभाळ,
मृगातल्या सावल्यांना, बिलोरी भोवळ
खोलवरी चिंब बाई, मातीला दरवळ ||

गरज

समर्पित कार्य करणार्‍यांची : इतरेजनांकडून वनवासी नागविले जात आहेत ह्यात शंका नाही. अनेक ठिकाणी किलोला भाव किलोचा ह्या न्यायाने भोपळ्याच्या बदल्यात मीठ, काजुबियांच्या बदल्यात वाटाणे, वनौषधींच्या बदल्यात खारी बिस्किटे असे व्यवहार चालतात. ते पाहून वाईट वाटते. उदा. अनेक भय्या लोक सप्टेंबरच्या मध्यावर साधारण रु. १ प्रति किलो दराने मीठाच्या गोण्या खरेदी करतात. पालघरहून टेंपो निघतो आणि संपूर्ण ठाणे वनवासी भाग फिरून त्या बदल्यात भोपळे गोळा करतो.

अर्थात ह्या गोष्टीला दुसरी बाजू सुद्धा आहे १) भोपळ्याच्या बिया जमिनीवर फेकल्या की पुढल्या पावसाळ्यात आपोआप भोपळ्याचे वेल येतात. त्यासाठी विशेष काही करावे लागत नाही. त्यावर वर्षभराला पुरेल इतके मीठ मिळणे ही पर्वणीच. २) अगदी रु. ५ प्रति किलो देऊन आपण भोपळा खरेदी केला तरी त्या नगद रकमेचा उपयोग दारू आणि इतर फालतु गोष्टींसाठी होण्याचीच शक्यता जास्त. कोणतीही वस्तु मग तो पैसा का असेना त्याचा साठा करण्याची वृत्ती नाही.

--------------------------X--X-------------------------------
गडद जांभळं, भरलं आभाळ,
मृगातल्या सावल्यांना, बिलोरी भोवळ
खोलवरी चिंब बाई, मातीला दरवळ ||

 
^ वर