बर्फ व पाणी!

फोर्थ डायमेन्शन - 12

बर्फ व पाणी!

सतराव्या शतकातल्या मीराबेन नावाच्या एका सामान्य महिलेची ही गोष्ट आहे. मीराबेन आयुष्यभर राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशातील एका लहानश्या खेडयातच वाढलेली, राहिलेली. कुशाग्र बुध्दीच्या मीराबेनला जगरहाटीची थोडी फार कल्पना होती. व्यवहारज्ञानाचा फार मोठा साठा तिच्याकडे होता. तिला सहजासहजी कुणी फसवू शकत नव्हते.
अशीच एके दिवशी चुलीसमोर स्वैपाक करत असताना बाहेरच्या अंगणातून तिला अचानक गलका ऐकू येऊ लागला. बाहेर येऊन बघते तर तिचा एक नातेवाईक आला होता व घरातले सर्व लहान मोठे त्याच्या अवती भोवती जमले होते. हा महावीर चार-पाच वर्षापूर्वी हिमालयातील गंगोत्री व जमुनोत्रीच्या यात्रेला गेला होता. व तेथून (धडधाकट!) परत आला म्हणून सर्व जण एकाचवेळी बोलू लागले. जेवणाच्या वेळी तो यात्रेतील मजेदार व रोमांचकारी अनुभव सांगू लागला.
नेहमीप्रमाणे त्याच्या रसाळ भाषेतील प्रवासवर्णनात चोर-लुटारूंचे भयानक प्रसंग, दाट जंगलातील हिंसपशूंच्या शिकारी कथा, वाटेतल्या गावातील चित्रविचित्र रीतीरिवाज, महावीरची स्वत:ची प्रौढी... अशा अनेक गोष्टींचा मालमसाला होता. सर्व लहानथोरांना ते सर्व ऐकताना मजा वाटत होती. परंतु मीराबेनला अत्यंत नवलाईची गोष्ट वाटली; ती म्हणजे महावीरने उल्लेख केलेल्या बर्फ नावाचा एक वेगळा प्रकार. मी ज्या प्रदेशात गेलो तेथे भयानक थंडी पडली होती. माझे हात-पाय गारठले. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे नदीचे पाणी दगडासारखे घट्ट झाले होते. पाणी व बर्फ यांच्या मधल्या अवस्थेचा कुठेही मागमूस नव्हता. बर्फावरून वाहणारे थोडेसे पाणी मात्र बर्फाइतके थंड नव्हते! बर्फ हा प्रकारच मीराबेनला कोडयात टाकला. असले काहीही कुणाच्या तोंडून यापूर्वी आतापर्यंत कधी ऐकलेले तिला आठवत नव्हते. कधी बघितलेही नव्हते.
महावीर काहीतरी फेकाफेकी करत आहे असेच तिला वाटल्यामुळे चारचौघात तिने त्याला फटकारले नाही. कारण महावीर जे काही सांगत होता त्याचा तिला तिच्या आतापर्यंतच्या आयुष्यात कधीच अनुभवाला आला नव्हता. तिचा भुता-खेतावर अजिबात विश्वास नव्हता. गोष्टितल्या आग ओकणाऱ्या राक्षसावर विश्वास नव्हता. तिचा चमत्कारावर, दैवीपिशाच शक्तीवर विश्वास नव्हता. त्याच प्रमाणे पाणी दगडासारखे टणक होऊ शकते यावरही विश्वास ठेवायला ती तयार नव्हती. महावीर हा अगदी जवळचा नातेवाईक असला किंवा त्याने हे सर्व शपथेपूर्वक सांगितले तरी त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवायला ती तयार नव्हती. तिला तिच्यातील समंजसपणाचा रास्त अभिमान होता.
(Source: On Miracles: An Essay Concerning Human Understanding, David hume -1748)
वरील परिच्छेद वाचत असतानाच मीराबेनचा बर्फाविषयीचा अविश्वास योग्यआहे का? असे वाटण्याची शक्यता आहे. कारण मीराबेनची बर्फासंबंधीगची कल्पना पूर्ण चुकीची आहे असेच आता वाटू लागेल. महावीरच्या बर्फाविषयीच्या अनुभवाला गोष्टीतल्या आग ओकणाऱ्या राक्षसाच्या कथानुभवाशी जोडण्याचा प्रयत्न मीराबेन करत होती, हे चुकीचे वाटेल. तिला किंवा महावीरला पाण्याच्या गोठणांकापाशी(Melting point) काय घडते, याची पुसटशीसुध्दा कल्पना नव्हती. महावीर हिमालयातून बर्फ काही आणून दाखऊ शकत नव्हता व राजस्थानच्या वाळवंटात पाणी गोठणांक गाठणे शक्य नव्हते. त्यामुळे मीराबेनला बर्फ म्हणजे काही तरी चमत्कार वा दैवी शक्तीचा करिष्मा असावा असेच वाटण्याची शक्यता जास्त.
काही वेळा आपण सत्यघटनेविषयीसुध्दा चुकत असतो. त्याकडे संशयाने बघतो. तसाच काहीसा प्रकार येथे घडलेला असेल. त्या अर्थाने बघितल्यास मीराबेन चुकत आहे, असेच म्हणावे लागेल. अनेक वेळा गैरसमजुतीमुळे आपल्यालाही सत्य काय ते कळत नाही. उदाहरणार्थ आपल्या ई-मेल बॉक्समध्ये अनेक वेळा झटकन श्रीमंत व्हा या अर्थाचे अनेक ई-मेल येत असतात. मी अमुक, अमुक अमुक देशाचा आहे. माझ्या एका मयत नातेवाईकाची गडगंज संपत्ती स्विस बँकेने अडकून ठेवली आहे. माझे सरकार ते फ्से काढू देत नाही. तुम्ही जर तुमचा पत्ता, फोन नंबर, तुमच्या बँकेतील खाते व्र।मांक, इ.इ. कळवल्यास ते तुमच्या बँकेच्या खात्यावर येतील. व त्यातील थोडा हिस्सा मी तुम्हाला देतो व उरलेले मी घेतो. अशा आशयाचे अनेक ई-मेल स्पॅम म्हणून डिलीट करून आपण मोकळे होतो. त्याचा कधीच आपण विचार करत नाही. परंतु अशा प्रकारच्या हजारो लाखो इ-मेलफ्की एखादा ई-मेल खरा निघाल्यास आपण श्रीमंत होण्याची एक अपूर्व संधी वाया घालवतो. कदाचित त्या विशिष्ट ई-मेलमध्ये काही लबाडी नसेल. खरोखरच एखाद्याच्या नातेवाईकाची अपार संपत्ती स्विस बँकेमध्ये अडकून पडलेली असेलही. आपण मात्र चिकित्सक विचार करण्याच्या सवयीमुळे त्यात काहीतरी लबाडी आहे असे समजून त्याची दखल घेत नाही व चालून आलेल्या लक्ष्मीला परस्पर हाकलून देतो.
हाच तर्क सामान्यपणे मीराबेनच्या प्रश्नालाही लागू होऊ शकेल. आपल्याला जे काही सत्य म्हणून सांगितले जाते, ते सर्व खरे मानू नये, हा एक अलिखित नियम आपण तंतोतंत पाळत असतो. आम्ही दैवी शक्तीच्या बळाने अधांतरी तरंगू शकतो, चालू असलेले घडयाळ लांबून पाहून बंद पाडू शकतो, मन:शक्तीने स्टीलचे चमचे वाकवू शकताे, इत्यादी चमत्कारिक दावे करणाऱ्याविषयी संशयाने बघण्यात काहीही चूक नाही. ज्ञात नैसर्गिक नियमांच्या अनुभवांच्या विरोधातील दाव्यावर विश्वास ठेवू नये हे विधान आपण आपल्या पूर्वानुभवावरून, आपल्याला मिळालेल्या ज्ञानामधून करत असतो. यापूर्वीचे असले चित्र-विचित्र दावे खोटे ठरले आहेत किंवा त्यात काहीतरी काळेबेरे, हातचलाखी, लबाडी, फसवणूक असू शकते याची पुरेपूर खात्री आपल्याला असते. असे दावे करणारे लबाड आहेत असे आपण शंभर टक्के खात्रीने म्हणत नसलो तरी त्यांनी केलेले दावे कुठल्या तरी चुकीच्या तर्कावर आधारलेले असू शकतील असे आपण नक्कीच म्हणू शकतो. परंतु अशाच एखाद्यानी केलेला दावा खरा निघाल्यास आपल्याला पूर्वग्रहदृष्टी बाजूला ठेऊन पुनर्विचार करावा लागेल. आपल्या विश्वासाला तडा जातो म्हणून ते नाकारण्यात अर्थ नाही. नाही तर तो दावा नाकारण्यासाठी वा दावा खोटा पाडण्यासाठी सबळ, भक्कम व नि:संशय पुरावे द्यावे लागतील.
परंतु पुराव्याच्या अभावी मीराबेनच्या समस्येत भरच पडेल. नात्यातल्या अगदी जवळच्या माणसाने चक्षुर्वैसत्यम् म्हणून सांगितले असले तरी तिच्या अनुभवविश्वात (व कल्पनेच्या विश्वातसुध्दा!) बर्फ हा प्रकार कधीच नसेल. पाणी हा द्रव पदार्थ दगडासारखा घनपदार्थ होऊ शकतो हे तिला दैवी चमत्कार वाटेल. व दैवी चमत्कारावर विश्वास ठेवायला तिची अजिबात तयारी नाही. तरीसुध्दा तिच्याकडे पुरावे नसल्यामुळे महावीरच्या शब्दावर (निदान काही काळ तरी!) विश्वास ठेवावाच लागेल. कारण बर्फ होत असलेल्या ठिकाणी ती कधीच गेली नाही वा बर्फ कशामुळे होते याचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पुरावे तिच्याकडे नाहीत. यासंबंधीचे तिचे अनुभव, तिची जाण तोकडे आहेत. महावीरवर विश्वास न ठेवल्यास तिच्या ज्ञानात भर पडणार नाही हे मात्र नक्की!
ज्ञानातला कमीपणा स्वीकारून अज्ञानातील सुख मानावे की आपली फसगत होऊ नये म्हणून महावीरवर, बर्फ या कल्पनेवर (कायमचाच!) अविश्वास दाखवावा?

लेखनविषय: दुवे:

Comments

विचार

हम्म. विचार करायला हवा.
उत्तम मांडणी. विचार करून प्रतिसाद देतो.

या बाबतीत माझे विचार अन्यत्र. बहुतेक असहमत.

या बाबतीत माझे विचार मी अन्यत्र मांडले आहेत.

विज्ञानाबाबत माझी पूर्वपीठिका या लेखातील मुद्दा क्र्. २चे स्पष्टीकरण बघावे.

मनुष्यांनी सत्य-असत्य म्हणून उच्चारलेली विधाने प्रचंड संख्येने आहेत, त्यांच्यापैकी बहुतेक मी आजवर कधीच ऐकली नाहीत. पैकी काही खरी असतील आणि काही खोटी असतील. त्यांच्याविषयी माझे "खरे" किंवा "खोटे" असे कुठलेच मत असायचे कारण नाही. याला "विश्वास"ही म्हणत नाहीत आणि "अविश्वास"ही म्हणत नाहीत.

माझ्यापुढे जर कोणी विधान केले -
"झुमरीतलैया गावात राजन नामक हिंदी गाण्यांचा शौकीन आहे."
किंवा
"अरुंधती तार्‍याचे पाच ग्रह आहेत."
याविषयी माझी कुठलीच धारणा नाही. "सत्य" नाही, की "असत्य" नाही.
पण कुणाला जर या विषयी खूप आस्था असेल तर त्यांना माझ्या उत्तराने समाधान होणार नाही. मी "सत्य" म्हणायला नकार देतो, म्हणून माझ्यावर आरोप करेल की "धनंजय अविश्वास ठेवतो." हा भावूक आरोप ठीक नाही, कारण मी "असत्य" म्हणायलाही नकार देतो.

मीराबेनला "डोंगरावर बर्फ आहे" हे विधान आणि मला "अरुंधती तार्‍याचे पाच ग्रह आहेत" हे एकच प्रकारचे.

प्रभाकर नानावटी यांनी विधानांबद्दल विश्वास/अविश्वास असे दोहोंपैकीच काही असले पाहिजे, असे गृहीतक मानले आहे.

ते म्हणतात :

तरीसुध्दा तिच्याकडे पुरावे नसल्यामुळे महावीरच्या शब्दावर (निदान काही काळ तरी!) विश्वास ठेवावाच लागेल. कारण बर्फ होत असलेल्या ठिकाणी ती कधीच गेली नाही वा बर्फ कशामुळे होते याचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पुरावे तिच्याकडे नाहीत.

म्हणजे मला काही काळासाठी "अरुंधती तार्‍याचे ५ ग्रह आहेत" या विधानावर काही काळासाठी विश्वास ठेवावा लागेल? पण त्याच वेळी कोणी दुसर्‍याने विधान केले की "अरुंधती तार्‍याचा एकही ग्रह नाही" त्यावरही काही काळासाठी विश्वास ठेवावा लागेल! हे दोन्ही "विश्वास" परस्पर विसंगत आहेत, त्याचे काय करायचे? तर हे शक्य नाही. कुठलाच पुरावा शक्य नाही तोवर अरुंधती तार्‍याच्या ग्रहांबद्दल मी उदासीन आहे. विश्वास/अविश्वास/उदासीन असे कमीतकमी तिहेरी वर्गीकरण आवश्यक आहे. अशा तिहेरी वर्गीकरणाच्या आगीने लेखात सांगितलेली समस्या बर्फासारखी वितळून वाहून जाईल.

- - -

मात्र ज्या नव्या विधानांनी माझे वागणे बदलणे अपेक्षित असते, त्यांच्याबद्दल मात्र मी असा उदासीन असू शकत नाही.

उदाहरणार्थ :
"सुंता केली नाहीस तर तू नरकात जाशील आणि तुला खूप वेदना होतील. म्हणून आता सुंता करून घे." (किंवा वरील लेखात स्विस बँकेचे 'स्पॅम' उदाहरण).
या ठिकाणी माझ्याकडून कुठलीतरी कृती अपेक्षित आहे, आणि त्यापासून कुठलासा हवाहवासा/नकोनकोसा परिणाम अपेक्षित आहे.

यांच्याबद्दल माझे तर्कशुद्ध मत असे :
"सुंता न केल्यामुळे होणार्‍या नरकवेदनेचे महत्त्व मला कृती करण्याइतपत वाटत नाही"
सामान्य भाषेत हेच वाक्य
"मला सुंता न केल्यास नरकवेदना होते, यावर विश्वास नाही."
सामान्य भाषेत आपण तर्कशुद्ध वकिली भाषा वापरू शकत नाही, ते ठीकच आहे. "तू नरक कुठे बघितला आहेस, तो मीराबेनच्या बर्फासारखा खरा आहे" असे शाब्दिक कचाट्यात पकडायची कोणाला आस्था असेल, तर मगच वकिली भाषा लागेल. नाहीतर सामान्य विधान रोजवापरासाठी पुरेसे तर्कशुद्ध आहे.

- - -

महावीरवर विश्वास न ठेवल्यास तिच्या ज्ञानात भर पडणार नाही हे मात्र नक्की!

हे एक फसवे वाक्य आहे. कधीतरी ज्ञानात भर पडावी म्हणून मग कुठल्या वाक्यावर विश्वास ठेवू म्हणता - "अरुंधती तार्‍याला ५ ग्रह आहेत", की "शून्य ग्रह आहेत"?

जगात मिळवण्यासाठी ज्ञान अमर्याद आहे. माझे आयुष्य मर्यादित आहे. म्हणून कुठले ज्ञान मिळवावे त्याबद्दल विशेष उत्सूकता किंवा जीवनसंदर्भ लागते. भारताच्या प्राचीन न्यायशास्त्रात या कल्पनेला "संदेह" म्हणतात. चर्चा करणार्‍यांना कुठल्या विषयाबद्दल संदेह वाटत नसला तर उगाच सत्यशोधनाची वृथाकृती करू नये. म्हणूनच न्यायशास्त्रातील चर्चेस्या सुरुवातील संदेह स्पष्ट सांगितला जातो. (न्यायवाले-नसलेले, पण तर्कशास्त्र उत्तम जाणणारे शंकराचार्यसुद्धा संदेह नेहमी स्पष्ट करतात, मगच वादविवाद सुरू करतात.)

हल्लीच्या कोर्टकचेरीतसुद्धा उगाच कुठल्या वाटेल त्या प्रश्नाबद्दल पुरावे देऊन-खंडन करून खटले भरता येत नाहीत. फिर्यादीला "स्टँडिंग" किंवा "ग्राउंड्स" लागतात. झुमरीतलैया येथील राजन याची फर्माईश विविधभारती ऐकवत नाही, अशी तक्रार धनंजयला कोर्टात नेता येत नाही. या बाबतीत सत्य सिद्ध होऊन धनंजयला काही फरक पडतो, हे आधी कोर्टाला सिद्ध करून दाखवावे लागते, मगच मुद्द्याच्या सत्य-असत्याबद्दल पुरावे बघता येतात.

जर महावीरला "बर्फ आहे" असे मीराबेनला पटवायचे असेल, तर तिला आधी हे समजावून सांगायला पाहिजे, की "बर्फ आहे/नाही" असे मानून तिला काय फरक पडणार आहे.

मांडणी

आणि त्यामागचा विचार आवडला. अर्थात, ज्ञानसंपादनाच्या आणि संपर्काच्या साधनांत क्रांती झाल्यामुळे मीराबेनला भेडसावणारी (एखाद्याचे कथन पडताळून पाहण्याची) समस्या पुष्कळशा प्रमाणात कमी झाली आहे. तरीही आपल्या सामूहिक बुद्धीच्या पलीकडे अद्याप कितीतरी गोष्टी अनाकलनीय आहेत हे अमान्य करण्यात काहीच अर्थ नाही. पण हा कागदावर मांडलेला सैद्धांतिक भाग झाला. दहापैकी नऊवेळा आपल्याला पूर्वानुभवावरून महावीरसारख्या व्यक्तीचा अंतःस्थ हेतू ओळखता येणं शक्य आहे. त्यावरून वेगळी माहिती आपल्या अनुभवापलीकडचे ज्ञान म्हणून स्वीकारायची की संभाव्य फसगत टाळण्यासाठी अधिक दक्ष राहायचे हा निर्णय त्या त्या व्यक्ती आणि प्रसंगावर अवलंबून असावा.

एक छोटे उदाहरण द्यायचे तर अलीकडे रेकी किंवा 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चे क्लासेस घ्या म्हणून तुमच्या घरी येणार्‍या व्यक्तींचे म्हणता येईल. या दोन्ही गोष्टींचे काही फायदे माझ्या ज्ञात माहितीच्या पलीकडले आहेत हे मान्य करण्यात काहीच अडचण नाही. पण मग (तथाकथित) वैज्ञानिक माहितीच्या आवरणाखाली एखादा महागडा कोर्स गळ्यात मारण्याचा प्रयत्न होतो (आर्ट ऑफ लिव्हिंग) किंवा काही अति'रेकी' फायदे सांगितले जातात (जसं की, तुमच्या घराबाहेर दोन माणसं भांडत असतील तर त्यांना रेकी देऊन तुम्ही ते थांबवू शकता. किंवा डिस्टन्स रेकीने तुमच्यापासून हजारो मैल दूर असणार्‍या व्यक्तीची डोकेदुखी बरी करू शकता) तेव्हा मनात 'काढिते फणा शंका' होणे, हे पूर्णपणे गैरलागू म्हणता येणार नाही.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

अवांतर: स्विस बँकेच्या (स्पॅम) उदाहरणाबद्दल...

अनेक वेळा गैरसमजुतीमुळे आपल्यालाही सत्य काय ते कळत नाही. उदाहरणार्थ आपल्या ई-मेल बॉक्समध्ये अनेक वेळा झटकन श्रीमंत व्हा या अर्थाचे अनेक ई-मेल येत असतात. मी अमुक, अमुक अमुक देशाचा आहे. माझ्या एका मयत नातेवाईकाची गडगंज संपत्ती स्विस बँकेने अडकून ठेवली आहे. माझे सरकार ते फ्से काढू देत नाही. तुम्ही जर तुमचा पत्ता, फोन नंबर, तुमच्या बँकेतील खाते व्र।मांक, इ.इ. कळवल्यास ते तुमच्या बँकेच्या खात्यावर येतील. व त्यातील थोडा हिस्सा मी तुम्हाला देतो व उरलेले मी घेतो. अशा आशयाचे अनेक ई-मेल स्पॅम म्हणून डिलीट करून आपण मोकळे होतो. त्याचा कधीच आपण विचार करत नाही. परंतु अशा प्रकारच्या हजारो लाखो इ-मेलफ्की एखादा ई-मेल खरा निघाल्यास आपण श्रीमंत होण्याची एक अपूर्व संधी वाया घालवतो. कदाचित त्या विशिष्ट ई-मेलमध्ये काही लबाडी नसेल. खरोखरच एखाद्याच्या नातेवाईकाची अपार संपत्ती स्विस बँकेमध्ये अडकून पडलेली असेलही. आपण मात्र चिकित्सक विचार करण्याच्या सवयीमुळे त्यात काहीतरी लबाडी आहे असे समजून त्याची दखल घेत नाही व चालून आलेल्या लक्ष्मीला परस्पर हाकलून देतो.

काहीसे समांतर उदाहरण घेऊ.

माझ्याकडे दोन (काट्यांची ऍनालॉग - डिजिटल नव्हेत!) घड्याळे आहेत. त्यांपैकी एक घड्याळ सदैव पाच मिनिटे पुढे असते (हे मला माहीत आहे), तर दुसरे घड्याळ हे कायमचे बंद पडलेले आहे (हेही मला माहीत आहे).

पैकी सदैव पाच मिनिटे पुढे असलेले घड्याळ मला आयुष्यात कधीही बरोबर वेळ दाखवणार नाही. तर कायमचे बंद पडलेले घड्याळ दररोज दिवसातून दोनदा अचूक वेळ दाखवेल.

या कारणाकरिता मी सदैव पाच मिनिटे पुढे असलेल्या घड्याळाकडे दुर्लक्ष करून कायमचे बंद पडलेल्या घड्याळावर विसंबून राहण्याचे ठरवले आहे.

काय म्हणता?

हाहा

उदाहरण आवडले. (गप्पा मारताना कोणालाही सांगण्यासारखे असे सोपे आहे.)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अवांतर - राजस्थानात गोठणांक...

महावीर हिमालयातून बर्फ काही आणून दाखऊ शकत नव्हता व राजस्थानच्या वाळवंटात पाणी गोठणांक गाठणे शक्य नव्हते.

बर्फाबद्दल माहीत नाही, परंतु राजस्थानच्या वाळवंटात हिवाळ्यात नित्य नाही तरी क्वचित्प्रसंगी मध्यरात्रीकडे किंवा उत्तररात्री गोठणांक गाठला जात असल्याचे अंधुकसे आठवते. (चूभूद्याघ्या.)

प्रतिसाद

धनंजय यांनी योग्य भाषेत प्रतिसाद दिलाच आहे. ज्या गावाला जायचे नाही त्याचा पत्ता विचारु नये अशी एक सोपी म्हण आहे. हिमालयात बर्फ असल्याने मीराबेनला तुमच्या लेखातील वर्णनानुसार काहीही फरक पडणार नाही.

समजा हिमालयात बर्फ आहे ही माहिती कळली किंवा पाणी घट्ट होत नाही ही समजूत तिने मनाशी कायमच ठेवली तरी तिला भाकऱ्याच बडवायलाच लागणार. त्यादृष्टीने ही माहिती गौण स्वरुपाची आहे.

मात्र बर्फ नावाचा एक थंडगार प्रकार असतो आणि ते पाण्याचेच एक हानीकारक नसलेले उपयुक्त रुप आहे हे तिच्या लक्षात आले तर हे बर्फ वापरुन राजस्थानातील प्रचंड उन्हाळा वगैरे लक्षात घेता घरच्याघरी बर्फ तयार करण्याची युक्ती वापरुन छानपैकी लिंबू सरबत किंवा आईस्क्रीम बनवून विकण्याचा छोटा कुटीरोद्योग तिने सुरु केला तर स्विस बँकेत ठेवण्याइतपत नसला तरी महावीरचा खिसा खुळखुळेल इतका पैसा तिला मिळवणे शक्य होईल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

रोचक आणि चतुर

विचारांची रोचक आणि चतुर मांडणी.

एखाद्या गोष्टीवर विश्वास का ठेवावा किंवा का बसतो हेच मुळात व्यक्तीसापेक्ष आहे असे वाटते. अगदी वीजेने घरात बल्ब लाऊन रात्री उजेड मिळतो हे काहिंना जितके विश्वास ठेवण्यास कठीण आहे तितकेच काहि मंडळींना वीजेशिवाय मनुष्य जगु शकतो हे!
तेव्हा विश्वास ठेवावा का अविश्वास व्यक्त करावा का दुर्लक्ष करावे हा व्यक्तीच्या विचारपद्धतीचा भाग आहे..

मात्र विश्वास ठेवला नाहि म्हणजे ज्ञानास मुकलो हे मात्र पटत नाही.. पूर्ण विश्वास अथवा पूर्ण अविश्वास असेल तर प्रश्न तिथेच मिटतो.. मात्र जर दोन्हीच्या मधली स्थिती असेल (जशी मीराबेनची आहे) तर ज्ञानोपासनेस वाव आहे असे वाटते.

अश्या स्थीतीमधे एखाद्याला हे सत्य की असत्य याची शहानिशा करायची आहे तेव्हा त्यास सत्य मानणार्‍यांनी व प्रसंगी असत्य मानणार्‍यांनी दोघांनी त्यास सहकार्य केले तर त्याच्या ज्ञानात भर पडेल.
वर मीराबेनला अविश्वास वाटत नाहि आणि विश्वासहि नाहि अश्यावेळी महावीरला तिला हिमालयात घेऊन जाऊन बर्फ दाखवता आला पाहिजे तर ते सत्य आहे असे तीला पटेल.
मात्र जर महावीरने.."मी सांगतो ना की तिथे बर्फ आहे.. म्हणजे आहे.. फक्त माझ्या सांगण्यावरून तू मान्य कर की पाणी घनरूपात असते" अशी हठवादी भुमिका घेतली तर मीराबेनचा विश्वास बसेलसे वाटत नाहि.

ऋषिकेश
------------------
स्वतः मनुष्य असल्याने माझा विश्वास होता की संकेतस्थळांवर फक्त मनुष्य वावरतात. हल्लीच कळले की काहि जंगली श्वापदेहि आहेत

विश्वास व अविश्वास यांच्याबरोबरच संदेह/संशय

विश्वास व अविश्वास यांच्याबरोबरच संदेह/संशय यालाही आपल्या विचारप्रक्रियेत स्थान देत असल्यास आयुष्यातील अनेक समस्या सहजपणे सुटतील.नेमके तेच घडत नाही.आपण नेहमीच टोकाचीच भूमिका घेण्याच्या प्रयत्नात असतो. फलजोतिष, नाडीजोतिष,पर्यायी उपचार पद्धती, चमत्कार, दैवी कृपा, नशीब, मेमरी एनहान्सर्स्, चेन मार्केटिंग, माडी जडेजाचे एक का तीन इत्यादी अनेक प्रकारच्या (संशयास्पद!)विषयाबद्दल आपली मतं ठाम असतात. परंतु यांच्याबद्दल आपल्या मनात थोडासा जरी संशय येत असल्यास आपले विचारचक्र फिरू लागते. थोडेसे वैचारिक कष्ट घेण्याची तयारी असल्यास नेमके 'तथ्य' काय आहे, 'सत्य' काय असू शकेल, याची कल्पना येऊ शकते. केवळ भावना, अनुभव, ऐकीव माहिती, शब्दप्रामाण्य, व्यक्तीप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, आक्रमकपणे करत असलेल्या प्रचाराची भुरळ, इत्यादीवर विसंबून न राहता नीरक्षीर (विवेक) बुद्धीने अशा प्रकारच्या गोष्टी नक्कीच तपासता येतील. आपल्यातील उपजत शहाणपण, विवेकीविचार, चिकित्सकपणा, वैज्ञानिक दृष्टिकोन, इत्यादींच्या मदतीने आपण या प्रकारांची शहानिशा करू शकतो. परंतु त्यासाठी फक्त You shouldn't accept the things as they are!
मीराबेनच्या मनात बर्फाविषयी संशय आला यातूनच तिच्या ज्ञानसंपादनेचे दरवाजे उघडतील. परिस्थितीमुळे ती जरी भाकरी थापण्यात आयुष्य घालवत असली तरी बर्फ हा प्रकार तिला आव्हान देणारा ठरत आहे. तिने थोडेसे प्रयत्न केल्यास 'सत्य' परिस्थिती काय असेल याची तिला नक्कीच जाणीव होईल.तिच्यात हेकेखोरपणा नसल्यास महावीरच्या विधानांची फेरचौकशी करेल व निष्कर्षापर्यंत पोचू शकेल.
आपल्या समोरचा प्रश्न सत्य की असत्य हा नसून आपण सत्य जाणून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत की नाही हा आहे.

कबूल.. मात्र...

तिच्यात हेकेखोरपणा नसल्यास महावीरच्या विधानांची फेरचौकशी करेल व निष्कर्षापर्यंत पोचू शकेल.

कबूल.. मात्र जर महावीर हेकेखोर असला आणि त्याने शहानिशा करण्यास नकार दिला तर!!??.. ज्योतिषशास्त्रादिंच्या बाबतीत हेच होते आहे.. शहनिशा करणार्‍यासाठी/पुढे ज्योतिषी टेस्ट द्यायला तयार नाहित

ऋषिकेश
------------------
आपले ते टंकनदोष दुसर्‍याच्या त्या प्राथमिक चुका

तिप्पट पैसे....

स्पॅम मेल्सवरुन सध्या गाजत असलेले माडी जडेजाचे उदाहरण आठवले. याची चर्चा व्हायला हवी.

-सौरभ.

==================

हे काय आहे

मला दुर्दैवाने स्प्याम मेल येत नाहीत. हे उदाहरण काय आहे कळेल का?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

काय राव?

स्पॅम मेल्सवरुन म्हणजे स्पॅम मेलमधून नाही बरे! स्पॅम मेल या विषयावरुन मला हे उदाहरण आठवले असा अर्थ घ्यावा! ओके?

(रुपये पाव पट करुन देणारा) सौरभ. :-)

==================

हाच

ज्ञानातला कमीपणा स्वीकारून अज्ञानातील सुख मानावे की आपली फसगत होऊ नये म्हणून महावीरवर, बर्फ या कल्पनेवर (कायमचाच!) अविश्वास दाखवावा?

प्रश्न नाडीग्रंथशास्त्राच्या बाबतीत सुद्धा का नाही लागू होऊ शकणार?

आपण पाहिला नाही म्हणून बर्फच अस्तित्वात नाही असे म्हणणे आणि नाडीग्रंथशास्त्र न अनुभवताच त्यावर प्रच्छन्न टीका करणे सारखेच असे मी मानते.

--------------------------X--X-------------------------------
अरे मानसा मानसा, तुझी नियत बेकार |
तुझ्याहून बरं, गोठ्यातलं जनावर ||
मतलबासाठी मान मानुस डोलये |
इनामाच्यासाठी कुत्रा शेपुट हालये ||

माहिती आणि कृती

मला वाटते धनंजय यांच्या प्रतिसादात त्याचे उत्तर आहे.

जेव्हा एखाद्या माहितीच्या आधारे आपण काही कृती करणार असू तर त्या माहितीची सत्यासत्यता पडताळून पाहणे आवश्यक ठरते. म्हणजे ती मीराबेन या बर्फ असतो या माहितीचा वापर करून काही कृती करणार असेल तर ती माहिती खरी की चुकीची हे जाणून घेणे तिच्या साठी आवश्यक आहे.

 
^ वर