अर्ध्या र चे काय करायचे?

अधिकार्‍याचे हा शब्द बहुधा चुकीचा असून तो अधिकाऱ्याचे असा लिहिला पाहिजे. मनोगताचा शुद्धिचिकित्सक "अधिकार्‍याचे" आणि "अधिकाऱ्याचे" दोन्ही शब्द शुद्ध दाखवतो पण लोकसत्तासारखी आघाडीची वृत्तपत्रेदेखील हा शब्द "अधिकाऱ्याचे" असाच लिहितात. मग चंद्रकोरीतला अर्धा र वापरायचा नाही का? कारण चंद्रकोरीतला अर्धा र वापरून गुगलमध्ये "करणार्‍याचे" हा शब्द शोधला तर "करणार्याचे" या शब्दाची पाने दिसतात.
http://tinyurl.com/l48mya

करणाऱ्याचे हा शब्द गुगलमध्ये वेगळी पाने दाखवतो.
http://tinyurl.com/mohlht

युनिकोडच्या मानकामध्ये अर्ध्या रला र्‍ कोणतेही संकेताक्षर मला सापडले नाही.
आर आर्‍य आर्य
aaraya aaRya aarya

गुगलच्या दृष्टीने दुसरा शब्द "आर्‍य" आणि तिसरा "आर्य" सारखाच आहे. पण मराठीत खोर्‍याने आणि खोर्याने हे दोन वेगळे शब्द आहेत. थोडक्यात रफारातला र आणि चंद्रकोरीतला र हे दोन्ही अर्धे र असले तरी वेगळे आहेत, याची दखल युनिकोडमध्ये नीट घेतली गेलेली दिसत नाही. तेव्हा "शिकविणार्‍याचे" या ऐवजी "शिकविणाऱ्याचे" असे वाचायची सवय करून घ्यावी लागेल असे वाटते. उपक्रमावर बरेच तज्ज्ञ आहेत ते अधिक मार्गदर्शन करू शकतील असे वाटते.

हीच गोष्ट अर्ध्या ट ठ ड ढ ची आहे.
मोठय़ा शब्द बरोबर आहे की पाय मोडलेला मोठ्या ? (माडय़ा की माड्या)

एकात नुक्ता असलेला य़ वापरला आहे तर दुसऱ्यात साधा य वापरला आहे. अनेक मोठी वृत्तपत्रे नुक्ता वापरून मोठय़ा लिहितात. पण मनोगतावर मोठ्या (पाय मोडका ठ) शब्द शुद्ध मानला आहे. याबाबतीत नक्की कोण बरोबर आहे? ही सर्व उठाठेव आत्ताच करण्याची गरज म्हणजे शब्दसंपदेत नेमके कोणते शब्द जमा करायचे याबाबतीत माझ्यासकट इतर काही सहकारीही गोंधळात असावेत असे वाटते.

युनिकोड मानकात साधा र असा दिसतो.
http://tinyurl.com/n47slp

त्याचा पाय मोडायला हे अक्षर जोडावे लागते. पण मग त्याचा रफार होतो.
http://tinyurl.com/lb6hkn

नुक्ता र असा दिसतो आणि त्याचा पाय मोडला तर हवा असलेला चंद्रकोरीतला नव्हे पण त्याअर्थाचा अर्धा र मिळतो.
http://tinyurl.com/mcrvfn

Comments

अर्धा र

वर्ड मधे देवनागरी टंकलेखन करताना भाषाइंडियाचा इंडिक १ हा टंकसंच वापरला आणि कॅपिटल आर व वाय टाईप केल्यास 'दुसर्‍यातला' सारखा अर्धा र टंकलेखित होतो. नेहमीचा आर आणि वाय टाईप केल्यास 'पर्यंत' सारखा अर्धा र टंकलेखित होतो. परंतु ही फाइल ओपन ऑफिस मधे उघडली तर 'दुसर् यातला' असे टंकलेखन दिसते. याशिवाय पीडीएफ फाईल बनविल्यास आणखी विचित्र टंकलेखन् दिसते. असे का व्हावे? कोणास काही सांगत येईल का?
चन्द्रशेखर

जिव्हाळ्याचा विषय

इतके दिवस ऱ्य आणि र्‍य मधला फरक हा मी केवळ फाँटमधल्या दोषांमुळे येतो असे मानत होतो. विशेषतः अक्षर समूहातील फाँट किंवा सीडॅक योगेश वगळता [मायक्रोसॉफ्टचा मंगल किंवा ओपन सोर्सच्या लोहित सह] इतर सर्व फाँटांवर देवनागरी अक्षरे फारच वाईट दिसत होती. ( लोकसत्ताचा जुना मिलेनियम वरुण छान होता. मात्र तो युनिकोड नव्हता. लोकमतची अक्षरेही ठसठशीत आहेत.)

युनिकोडच्या मानकांमधे र्‍य मधील अर्ध्या र ला स्थान नाही हे पाहून वाईट वाटले. त्याचबरोबर मनोगतावर ऱ्य ला योग्य मानण्याचा प्रकार हा तांत्रिक दोष असावा असे वाटते. त्याचे अनुभवातून आलेले थोडे स्पष्टीकरण असे - मी एससीआयएम वापरून टंकलेखन करतो तेव्हा ऱ्य [इनस्क्रिप्टमधील कीस्ट्रोक - Jd/] हा र्‍य सारखा दिसतो मात्र माझा काँप्युटर वगळता इतरांना तो ऱ्य असाच दिसतो. मात्र इंडिक इनपुट वापरुन लिहिले तेव्हा तर ते मलाही ऱ्य असेच दिसते. याबाबत थोडी शोधाशोध करुन पाहिली तर र् साठीची एससीआयएम टेबल एंट्री ही <200d> अशी आहे असे कळले. जी ऱ् पेक्षा अर्थातच वेगळी आहे.

इनस्क्रिप्ट हे फोनेटिक टंकपद्धतीपेक्षा अधिक शास्त्रशुद्ध आणि प्रमाणित असूनही त्यात या मर्यादा आहेत हे महत्त्वाचे. इतर सर्व टंकन पद्धतींची स्वतःची वेगळी चूल आहे. त्यामुळे फोनेटिक असलेल्या बोलनागरी, बरहा, इंडिक इनपुट मधील फोनेटिक पर्याय, गूगल ट्रान्सलिटरेशन, क्विल्सपॅड की काहीतरी, मटाची टंकलेखन पद्धत किंवा गमभन यांचे कीस्ट्रोक पूर्णपणे वेगळे आहेत. त्यातही गमभन अधिक सोयीचे (सवयीमुळे) वाटत होते. सध्या फोनेटिक टंकलेखन पूर्णपणे बंद केल्याने मला इनस्क्रिप्टच सोयीचे वाटते.

एससीआयएममधील कीस्ट्रोक आपल्या सोयीनुसार बदलता येत असल्याने मी R साठी ऱ् ऐवजी र् सेट केला आहे. (मला या अंकांचे अर्थ किंवा तांत्रिक महत्त्व माहीत नाही.)

तुमचा दुसरा प्रश्न फारच सोपा आहे. मला वाटते मराठीमध्ये नुक्ता नाही त्यामुळे ठ्य हे योग्य आहे. ठय़ चा उच्चार ठ+य असाच होईल असे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

युनिकोड मध्ये चंद्रकोरी सारख्या अर्ध्या र ला स्थान हवेच

का-यांनी व कार्यांनी हे व असे शब्द मराठीत पूर्णतः वेगळे आहेत. युनिकोड मध्ये चंद्रकोरीसारखा अर्धा र वापरण्याची सुविधा नाही हे नव्याने माहित झाले. मी अर्ध्या र साठी डॅश (-) चा पर्याय आतापर्यंत वापरत होतो. परंतु मराठीचे सौष्ठव टंकलेखनात टिकवायचे असेल तर एकतर सा-यांनी याला साऱ्यांनी असा पर्याय सर्वमान्या व्हायला हवा किंवा युनिकोडच्या सुधारीत रुपात अर्ध्या र च्या पारंपरिक रुपाचा समावेश व्हायला हवा. माझ्या मते दूसरा मार्ग जास्त सोयीस्कर राहील. तोपर्यंत जरी शंभर टक्के बरोबर नसले तरी साध्यर्म्याचा फायदा घेतांना अर्ध्या र साठी डॅश (-) चा पर्याय वापरायला हरकत नसावी.

अर्ध्या र ऐवजी संयोगचिन्ह?

अधिकार्‍याचे हा शब्द बहुधा चुकीचा असून तो अधिकाऱ्याचे असा लिहिला पाहिजे. माझ्या संगणकावर दोन्ही 'र्‍या' सारखेच दिसताहेत. मनोगतावर चंद्रकोरीसारखा अर्धा र व्यवस्थित टंकता येतो. युनिकोड, बरहा वगैरे फ़ॉन्ट अमराठी माणसांनी बनवले आहेत; त्यांना अनाघात उच्चाराचा अर्धा 'र' माहीत नसावा. ज्यांना फ़ॉन्ट बनवता येतात त्यांना, आपल्या दुर्दैवाने, मराठी येत नाही आणि याउलट. हिंदीतही हा अनाघात र मला र्‍योरी(म्ह. रेवडी) या एकाच शब्दात सापडला. मराठीतसुद्धा हा चंद्राकार 'र' जोडून फक्त र्‍य आणि र्‍ह ही दोनच अक्षरे बनतात.
तरीदेखील अर्धा 'र' लिहिण्यासाठी विग्रहचिन्ह वापरणे मराठी मनाला कधीच पटणारे नाही.
युनिकोडमध्ये नुक्ताधारी य, र, आणि ळ आहेत, पण मराठीत आवश्यकता पडते त्या च आणि झ या नुक्ताधारी अक्षरांची सोय नाही. जोपर्यंत मराठीचा जाणकार फ़ॉन्ट्‌स बनवणार नाही, तोपर्यंत हे असेच चालणार. --वाचक्‍नवी

युनिकोड-बरहा हे फाँट नाहीत

युनिकोड किंवा बरहा हे फाँट नाहीत. युनिकोड हे डेटाबेसमध्ये अक्षरे साठवण्याचे व पानांवर दाखवण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान आहे. बरहा/गमभन/ व तत्सम प्लगिन हे विवक्षित कळा दाबल्यानंतर केवळ विशिष्ट अक्षरसमूह निर्माण करण्याचे काम करतात (उदा. S+h दाबल्यानंतर श साठीचा कोड निर्माण करणे वगैरे.)

या कोडांना कसे दाखवायचे हे फाँट ठरवतो. ज्याच्याशी या टंकनप्रणालींचा संबंध नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सहमत

अर्धा 'र' लिहिण्यासाठी विग्रहचिन्ह वापरणे मराठी मनाला कधीच पटणारे नाही.

जोपर्यंत मराठीचा जाणकार फ़ॉन्ट्‌स बनवणार नाही, तोपर्यंत हे असेच चालणार.

सहमत आहे.
युनिकोड बनवणाऱ्यांमध्ये सहभागी असणारे मराठी लोक असतीलच. (कारण मराठी माणसे बहूदा सगळ्या क्रिएटीव्हटीमध्ये असतातच, निदान मराठीबद्दलच्या तरी.) परंतु त्यांची सुक्ष्म जाण कमी पडत असावी. जाणकारांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना मदत करायला हवी.

युनिकोडातला र

प्रमाण युनिकोडातली बहुतेक अक्षरे हिंदी वळणाची आहेत. ती वापरून सुबक मराठी लिहिता येत नाही. उदाहरणार्थ:
क या अक्षराचे पोट आणि पार्श्वभाग जमिनीला टेकलेले असतात आणि ते अक्षर ढेरपोट्या यक्षासारखे दिसते.(म्हणून मी त्याला यक्षातला क हे नाव दिले आहे!). त्यामुळे त्याला पोटाखाली र जोडायला जागाच नसते. तोच प्रकार 'ख'चा. ख्रिस्ती(ख्‌+र्‌+इ) हा शब्द लिहिताच येत नाही. हिंदीत ईसाई म्हणतात, त्यामुळे त्यांना ख्रची गरज नाही. हिंदी म, फ, व, ब ही अशीच अक्षरे. हिंदीतला र आतल्या गाठीचा असतो, मराठीत र ची गाठ बाहेरून आत अशी देतात. या कारणाने एखाद्या पाटीवर रंगवलेला हिंदी र बेढब दिसतो. हिंदी मुलखात 'काम चालू रस्ता बंद' साठी 'रस्ता रोको' अशी पाटी असते, ती लांबून 'ग्ग्ता गेको' अशीच दिसते. अशी पाटी अनेक वर्षे माझ्या पाहण्यात येत असे.
हिंदी लिपी आणि मराठी लिपी यांतला मुख्य फरक म्हणजे हिंदी लिहिताना अगोदर शिरोरेषा काढतात आणि मग हात न उचलता खाली अक्षर काढतात. मराठीसाठी या उलट. हिंदी 'क' काढताना आधी शिरोरेषा मग तिला उभा लंब, मग खालून वर जाऊन लंबाच्या दोन्ही बाजूला दोन गाठी. असे केले की यक्षातला क उमटतो. हिंदीत ध-भ या अक्षरांना गाठ नसते. त्याऐवजी असते एक न काढलेली शिरोरेषा. ती रिकामी जागा दिसली तर ध-भ अन्यथा घ-म.
जोपर्यंत मराठी लिपीतज्ज्ञ देवनागरी फ़ॉन्ट्‌सचे आलेखन करत नाही तोवर हिंदी फ़ॉन्ट वापरावेत, दुसरा उपाय नाही.--वाचक्‍नवी

शून्य-रुंदीचे कॅरॅक्टर

युनिकोड (आवृत्ती २.०) मध्ये "र"पुढे शून्य रुंदीचा सांधा [ZWNJ - Zero-width joiner] असला तर चंद्रकोरीसारखा (र्‍) आकार उमटतो. पुढे विराम चिह्न (् U+094D) असेल तर डोक्यावरचा रफार (र्य) उमटतो. (अर्थात युनिकोडला पटावरती दाखवणार्‍या प्रणालीला ही सूचना ठाऊक असली पाहिजे.) अशा रीतीने दोन्ही आकारांच्या अर्ध्या "र"साठी एकच युनिकोड चिह्नसंख्या आहे - U+0930

ISCII प्रमाणाच्या अनुसार "ऱ" (खाली टिंब असलेला र U+0931. Name, DEVANAGARI LETTER RRA) असे एक चिह्न आहे आणि त्याच्यापुढे विराम चिह्न (् U+094D) असेल तर चंद्रकोरीसारखा (र्‍) आकार उमटतो.

अधिक माहितीसाठी या दुव्यावरील पान ३०४-३०६ (पीडीएफ वरील पान १२-१४) बघावे.

(तुमच्या संगणकावर चढवलेल्या प्रणाली "रेंडरर"नुसार तुम्हाला टिंब असलेला किंवा चंद्रकोरीसारखा र दिसेल.)

विरामचिन्ह

श्री. धनंजय ज्याला विरामचिन्ह(्) म्हणताहेत त्याला आम्ही हलन्‍त चिन्ह म्हणतो. मराठीत सर्वच पंक्च्युएशन मार्कांना विरामचिन्हे म्हणत असल्याने धनंजय ज्या विशिष्ट अर्थाने विरामचिन्ह हा शब्द वापरत आहेत, तो अर्थ अनेकांना अपरिचित असेल. मला तरी काही वर्षांपूर्वीपर्यंत हा अर्थ माहीत नव्हता.
धनंजयांनी एवढी उदाहरणे देऊनसुद्धा माझ्या संगणकाच्या पडद्यावर चंद्रकोरीसम अर्धा र उमटलेलाच नाही. त्याचे तसे उमटणे न्याहाळकाप्रती वेगवेगळे असावे.--वाचक्‍नवी

अर्धा र

खालील पद्धतीने टंकलेखन केल्यास अर्धा र (तिसर्‍याला, आणि विपर्यास) दोन्ही रित्या नीट लिहिता येतो.
अर्थात मी इंडिक 1 हा टंकसंच वापरतो.

तिसर्‍याला हा शब्द लिहिण्यासाठी मी टी+आय+एस+ए+कॅपिटल आर+वाय+ए+ए+एल+ए
असे टंकलेखन करतो.

विपर्यास लिहिण्यासाठी मी व्ही+आय+पी+ए+आर+वाय+ए+ए+एस+ए असे टंकलेखन करतो
.

फायरफॉक्स, वर्ड 2003 आणि ओपन ऑफिस 3.0 या सर्वात ही पद्धत व्यवस्थित चालते.

चन्द्रशेखर

समाधानकारक स्पष्टीकरण

धनंजय यांनी नेमके स्पष्टीकरण दिले आहे.

एकच फाँट असतानाही विंडोज़ आणि लायनक्स प्रणाल्यांवर ह्या र+य चा नेहमी गोंधळ होत असे.

झीरो विड्थ नॉन जॉईनर वापरुन र् + &#8204;+ य लिहिले तर असे दिसतेः- र्‌य
झीरो विड्थ जॉईनर वापरुन र् + &#8205;+ य लिहिले तर असे दिसतेः र्‍य
झीरो विड्थ स्पेस वापरुन र् + &#8203;+ य लिहिले तर असे दिसतेः र्​य

अर्थात ही तिन्ही झीरो विड्थ् अक्षरे नॉन प्रिंटेबल असल्याने आणि गूगल एचटीएमएल पानांवर शोधयंत्र चालवत असल्याने गूगलला अधिकाऱ्याला आणि अधिकार्‍याला हे शब्द सारखेच दिसले यात नवल नाही.

अनेक दिवसांपासूनची शंका दूर झाली. आता हवा तो ऱ्या हवा तेव्हा लिहिणे शक्य होईल.

हर्‍या नार्‍या झिंदाबाद
हर्​या नार्​या झिंदाबाद
हर्‌या नार्‌या झिंदाबाद


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

पुस्ती

माझ्या प्रतिसादातील तिन्ही ऱ्य/र्‍य दुसर्‍या (विंडोज़) संगणकावर तपासून पाहिले असता पहिले आणि तिसरे जोडाक्षर सारखेच दिसत आहे. मात्र माझ्या (लायनक्स) संगणकावर ही तिन्ही जोडाक्षरे वेगळी दिसत आहेत.

मात्र धनंजय यांनी सांगितलेले किंचित चुकीचे आहे. zwj आणि zwnj यामुळे ही जोडाक्षरे वेगवेगळी दिसत आहेत. (त्यांनी zwnj-zwj असे एकत्रित लिहिल्याने दोन्हींचा अर्थ एकच होतो असा त्यांच्या म्हणण्याचा मी अर्थ लावला.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आपल्याला देवनागरी टंक बनवता येणे

येथे टंक बनवता येत नाहीत या विषयी काही चर्चा आली आहे म्हणून -

ऑटोकॅड हे रेखांकनाचे आणि कोरल ड्रॉ हे व्हेक्टर (आणि आता रास्टरही एडिटर) या दोन्ही मध्ये वेगवेगळे फाँटस् बनवता येतात. ऍडोबच्या इलस्ट्रेटर विषयी कल्पना नाही.

मात्र त्या साठी सुलेखनची काही तरी पार्श्वभूमी आवश्यक आहे हे निश्चित. मी खूप काळापूर्वी असा श्री लिपीचा टंक सुधारून (?) पाहिला आहे. आणि तो चालला होता. मात्र तो युनिकोड नव्हता. दुर्दैवाने कोरल ड्रॉ ११व्या व्हर्जन पर्यंत तरी युनिकोड ओळखतच नाही. मात्र १२व्या संस्करणात आता युनिकोड ओळखते. त्याला काही मर्यादा आहेत असे कळते.

ऑटोकॅड चे सध्या मला माहिती नाही. आता पूर्ण संपर्क सुटल्याने आणि वेळही मिळेनासा झाल्याने अपडेट राहणे शक्य होत नाहीये.

टंक बनवण्यासाठी सध्या महत्त्वाचे सॉफ्टवेअर म्हणजे फॉन्टलॅब. हे माझ्या कडे नाही परंतु याचा ऍक्सेस मिळवू शकेन असे वाटते.

तरीही कुणाला असे टंक बनवण्यात रस असेल, तर मी सहभागी व्हायला तयार आहे.
युनिकोड टंक कसे बनवायचे याची काही माहिती युनिकोड ने मायक्रोसॉफ्टच्या या स्थळावर आहे असे म्हंटले आहे.

मासॉ. ने देवनागरी फाँटस् कसे बनवता येतील याची माहिती येथे दिली आहेच.

(वेळेचे कसे करायचे ते पाहता येईल, काही तरी जमवतो. यात रस असलेल्यांची एखादी आंतरजाल सभा होऊ शकली तर हे शक्यही होईल असे वाटते.)

-निनाद

एकमेकां सहाय्य करु..

युनिकोडमधील त्रुटी मधे एकदा लक्षात आली होती.. पण ती मी माझ्या टंकनाची त्रुटी समजून गप्प होतो :)

मराठी येणारे लोक फाँट बनवत नाहित व याउलट हे खरेच. मात्र खरंच एका व्यक्तीस दोन्हि येण्याची गरज आहे का? जे फाँट बनवतात त्यांनी मराठी येणार्‍या तज्ञ लोकांची मदत घेतली किंवा अश्या लोकांनी आपणहून देऊ केली तर एक परिपूर्ण फाँट बनेलसे वाटते.

(फाँट बनविता न येणारा व मराठीचा तज्ञ नसणारा) ऋषिकेश
------------------
ऐकावं ते नवलच: उपक्रम हे एकमेव संस्थळ आहे जिथे सिंह प्रतिसाद वगैरे द्यायला येतात

र्‍य!

मी लहानपणापासून र्‍य हा असाच वाचत/लिहीत आलोय. त्यामुळे मला तरी ह्या र्‍य मध्ये काही दोष दिसत नाहीये.
दुसर्‍या पद्धतीचा र्+य हा फक्त हल्ली काही संकेतस्थळांवर लिहीलेला पाहतोय.
मनोगताच्या संपादन खिडकीत र्‍य टंकून तो इथे चिकटवल्यावर ऱ्य असा दिसतोय.
अर्थात मी काही ह्या विषयातला तज्ञ नाही त्यामुळे ह्यापेक्षा अधिक भाष्य नाही करू शकत.

ता.क.
ऱ्य=rxy
र्‍य=r^y असे बरहामध्ये लिहीता येतेय.

मात्र बर्‍याच लोकांना तो फरक दिसत नाहीये असे का हे मात्र एक कोडे आहे.

<

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

दोन र्‍य

प्रमोद देवांच्या प्रतिसादात दोन र्‌ दिसताहेत, मथळ्यात चंद्रकोरीसारखा एक, आणि दुसरा, विग्रहचिन्हासारखा(-), मजकुरात. हे कसे शक्य झाले? मथळ्यातला र कापूनही मला तो अन्यत्र डकवता येत नाही आहे. (या सबंध पानावर पहिल्यांदा अस्सल मराठी अर्धा र, मथळ्यात का होईना, बघायला मिळाला!)--वाचक्‍नवी

फाँटचा दोष

लोकप्रिय मराठी संकेतस्थळांसोबत (मनोगत, उपक्रम, मायबोली वगैरे) जोडला जाणारा फाँट सीडॅक योगेश हा आहे. त्यामध्ये र्‍य हे जोडाक्षर तितकेसे सुबक दाखवत नसल्याने तुम्हाला ही अडचण येत असावी. अक्षर समूहातील काही फाँटांमध्ये ही जोडाक्षरे सुबक दिसत आहेत. सवडीने ह्या जोडाक्षरांची चित्रे लावीन.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

फ़ॉन्टचा दोष नसावा.

ज्या चौकटीत प्रतिसादाचा विषय लिहितात तिथे अर्धा र व्यवस्थित येतो, मजकुरामध्ये येत नाही. त्या‍अर्थी, हा फ़ॉन्टचा दोष नसून दुसरा कसलातरी असला पाहिजे. मनोगत आणि उपक्रम यांचे फ़ॉन्ट एक नसावेत. कारण तिथे छापता येणारी अनेक अक्षरे इथे येत नाहीत आणि इथली काही, तिथे उमटत नाहीत. --वाचक्‍नवी

अडचण समजली

तुमची अडचण समजली. त्याचे कारणही मला अंदाजाने माहीत आहे. थोडा सवडीने प्रतिसाद देतो.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

र्‍य आण ऱ्य

वर दाखवलेले दोन्ही बरहाद्वारे लिहीले र्‍य(r^y) आणि ऱ्य(rxy) मला माझ्या संगणकात प्रतिसादाच्या खिडकीतही

व्यवस्थित दिसताहेत मग इतर अनेकांना का दिसत नसावेत?
ह्यामागे कोणते तांत्रिक कारण असावे?

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

मथळ्यातले निळे र आणि मजकु..

माझ्या संगणकाच्या पडद्यावर--प्रतिसादाच्या विषयाच्या ठिकाणी लिहिलेल्या दोन्ही निळ्या र्‍य मधील 'र' चंद्रकोरीसारखे, आणि मजकुरातले काळे 'डॅश'सारखे. खिडकीतले (१) नुक्तावाला पायमोडका र आणि पूर्ण य, आणि (२)चंद्रकोर जोडलेला य. मी कळफलकावर बरहाद्वारे आर्‌एक्सवाय टंकले की डॅश जोडलेला य उमटतो. आणि आर्^वाय् टंकले तरी तोच डॅशवाला अर्धा र आणि य.
माझे म्हणणे हेच आहे, की या विसंगतींचे कारण फ़ॉन्ट्‌स नसून, न्याहाळक आणि संकेतस्थळ आहे. एकाच पद्धतीने काढलेले दोन अर्धे र मथळ्यात आणि मजकुरात वेगवेगळे का दिसावेत? दोन वेगळ्या पद्धतीने बरहा वापरून लिहिलेले र एकसारखेच का उमटतात?--वाचक्‍नवी

 
^ वर