विश्वकर्म्याचे चार भुज - १

आपल्याभोवती दिसणारे जग कोणी निर्माण केले असावे ? हा प्रश्न, मानव त्याला बुध्दीमत्ता प्राप्त झाल्यापासून स्वत:ला विचारतो आहे. पाश्चिमात्य जगातील प्लुटो , ऍरिस्टॉटल आणि कांट यांच्यासारख्या तत्वज्ञान्यांचे ग्रंथ किंवा आपले वेदग्रंथ हे सर्व या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. हे जग परमेश्वराने बनवले असावे असे मानले जाते. अर्थात हिंदू तत्वज्ञानी यावर असा प्रश्न विचारतातच की जर परमेश्वराने हे विश्व बनवले असले तर त्याला कोणी निर्माण केले ? परंतु या वादात न शिरता आपण असे धरून चालू की परमेश्वराने किंवा दुसर्‍या कोणीतरी हे विश्व निर्माण केले किंवा कदाचित त्याची निर्मिती आपोआपच झाली. असे जरी असले तरी ह्या विश्वाचा कारभार कोण चालवतो किंवा त्यावर नियंत्रण कोणाचे आहे हा प्रश्न उरतोच. धर्मग्रंथांनुसार, हे कार्यही परमेश्वरच करतो असे मानले जाते. काही अर्वाचीन भौतिकी शास्त्रज्ञ मात्र असे मानतात की हे जग अशा पध्दतीने निर्माण केले गेले आहे की विश्व व्यापार स्वयंचलितपणेच चालू राहील.

कोणत्याही गोष्टीच्या निर्मितीसाठी सुटे भाग, बल आणि आराखडा या तीन घटकांची आवश्यकता असते. घर बनवायचे असले तर विटा, सिमेंट, वाळू यांच्यासारखे सुटे भाग, कर्मचार्‍यांचे श्रम बल, अणि अभियंत्याने बनवलेला आराखडा हे आवश्यक असतात. हे असले तरच ते घर उभे रहाते. या शिवाय, या निर्मितीसाठी हे तिन्ही घटक, योग्य वेळी उपलब्ध असणेही आवश्यक असते. कर्मचारी उपलब्ध आहेत पण वाळू, सिमेंट नाही किंवा हे सगळे आहे पण आराखडाच तयार नाही अशा परिस्थितीत घराची निर्मिती होणे शक्य नसते. म्हणजे हे ओघानेच आले की जगाची निर्मिती होण्यासाठी हे तिन्ही घटक, निर्मिती कालातच आवश्यक होते व ते उपलब्धही योग्य वेळीच झाले असले पाहिजेत. या घटकांपैकी, भावी जगाचा आराखडा करणारा आराखडाकार कोण ? व त्याने तो कधी, केंव्हा व कसा केला ? हा वाद तत्वज्ञान्यांनी किंवा धर्ममार्तंडांनी करावा, त्यात आपण सर्वसामान्यांनी पडण्यात अर्थ नाही.

कोणत्या सुटया भागांपासून या जगाची निर्मिती झाली असावी ? हा प्रश्न कमीत कमी गेली अडीच हजार वर्षे तरी मानवी मनाला पडतो आहे. इ. स. पूर्व 400 वर्षे या कालात एक ग्रीक तत्ववेत्ता ' डेमोक्रायटस ' याने प्रथम 'अणू' या सुटया भागापासून सर्व पदार्थ बनले असावेत अशी कल्पना मांडली होती. परंतु नंतरच्या कालातील प्रख्यात तत्ववेता 'अरिस्टॉटल' याला ही कल्पना मान्य न झाल्यामुळे ती काहीशी मागे पडली. अठराव्या शतकातील एक ब्रिटिश रसायन शास्त्रज्ञ जॉन डाल्टन याने सादर केलेल्या 'मॉलिक्यूल्स' बद्दलच्या काही कल्पना व शेवटी आइनस्टाईनने एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीस दिलेला प्रायोगिक पुरावा यामुळे 'अणू' हा सर्व पदार्थांचा मूल सुटा भाग आहे हे सर्वमान्य झाले. असे असले तरी काही शास्त्रज्ञ 'अणू' ला अंतर्गत रचना असावी अशा मताचे होते. इ.स. 1911 मध्ये एक ब्रिटिश शास्त्रज्ञ 'अर्नस्ट रदरफर्ड' याने दाखवून दिले की 'अणू' हा पदार्थाचा मूलभूत असा सुटा भाग नसून तो एक गाभा व त्या गाभ्याभोवती सतत फिरत राहणार्‍या 'इलेक्ट्रॉन्स' या मूल कणांपासून बनलेला आहे. प्रथम अशी कल्पना होती की अणूचा गाभा हा ऋण विद्युतभारित इलेक्ट्रॉन्स व धन विद्युत भारित प्रोटॉन्स या मूल कणांपासून बनलेला असावा. परंतु 1932 मध्ये दुसरा एक ब्रिटिश शास्त्रज्ञ 'जेम्स चॅडविक' याने दाखवले की अणूचा गाभा हा प्रोटॉन्स, व त्यांचेच वस्तुमान असलेल्या पण कोणताही विद्युत भार नसलेल्या 'न्यूट्रॉन्स' या तिसर्‍या प्रकारच्या सूक्ष्म कणांपासून बनलेला असतो. या शोधामुळे जगातील सर्व पदार्थ, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स या सुटया भागांपासून बनले आहेत असे मानले जाऊ लागले.

1960 च्या दशकात कॅलटेक विद्यापीठातील शास्त्रज्ञ 'मरे जेल-मान' व इतर काही शास्त्रज्ञांनी हे शोधून काढले की प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स हे मूल कण नसून ते 'क्वार्क्स' या मूलकणांच्या त्रिकुटाने बनलेले असतात. सध्याच्या प्रचलित ज्ञानाप्रमाणे असे मानले जाते की सहा प्रकारचे 'क्वार्क्स' व इलेक्ट्रॉन्स यांपासून सर्व पदार्थ बनलेले आहेत.या सहापैकी दोन प्रकारच्या क्वार्क्सचे 'उर्ध्व क्वार्क'आणि 'अध क्वार्क' असे नामकरण केले गेलेले आहे व ज्या गुणधर्मामुळे क्वार्क्सचे हे प्रकार पडतात त्या गुणधर्माला 'क्वार्क्सचा स्वाद' असे म्हणण्याची प्रथा आहे. उर्ध्व स्वादाचा क्वार्क +2/3 एवढा धन विद्युत भारित असतो तर अध स्वादाचा क्वार्क -1/3 एवढा ऋण विद्युत भारित असतो. एका प्रोटॉन मध्ये दोन उर्ध्व क्वार्क व एक अध क्वार्क एकमेकाला चिकटून असतात. यामुळे प्रोटॉन +1 एवढा धन विद्युत भारित होतो. न्यूट्रॉन मधे दोन अध क्वार्क व एक उर्ध्व क्वार्क एकमेकाला चिकटलेल्या अवस्थेत असतात व यामुळे न्यूट्रॉन्सना कोणताही विद्युत भार नसतो. क्वार्क्स आणि इलेक्ट्रॉन्स यांच्याशिवाय , अस्तित्वात असलेले अनेक प्रकारचे मूल कण शोधून काढण्यातही शास्त्रज्ञांना यश आले आहे. परंतु बाकीचे हे सर्व कण अल्पजीवी असतात व थोडयाच कालात नष्ट पावतात. सहा प्रकारचे ' क्वार्क्स ' व इलेक्ट्रॉन्स यांचे एकत्रितरित्या 'फर्मियॉन्स ' असे नामकरण केले जाते व सर्व चराचराचे हेच सुटे भाग आहेत असे म्हणता येते.

कोणत्याही गोष्टीचा कारभार सुरळीतपणे चालण्यासाठी एक यंत्रणा आवश्यक असते. एखादी कचेरी , उत्पादन करणारा एखादा कारखाना , संगणक किंवा मानवी शरीर ही याची उत्तम उदाहरणे आहेत. या यंत्रणेचे दोन आवश्यक घटक, नियंत्रण प्रणाली व श्रम बल हे असतात. कचेरीचा किंवा कारखान्याचा कारभार चालवण्यासाठी व्यवस्थापनाचे नियंत्रण आवश्यक असते. मुख्य नियंत्रक व त्याचे सहकारी ही जबाबदारी पार पाडतात या व्यतिरिक्त तेथे काम करणारे कर्मचारी आपले श्रम बल या यंत्रणेस उपलब्ध करून देतात. या उलट संगणक किंवा मानवी शरीर यांची निर्मिती अशीच केलेली असते की त्याचे कार्य स्वनियंत्रितपणे पार पडावे. विद्युत उर्जा बल मिळाले व काय करावयाचे आहे हे समजले म्हणजे संगणक आपले कार्य कोणत्याही नियंत्रणाशिवाय अत्यंत कुशलतेने पार पाडतो. मानवी शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या 'जीन्स' मधील दुहेरी सर्पिल आकाराच्या डी.एन.ए. साखळया, शरीराची निर्मिती व कार्य यावर पूर्ण नियंत्रण ठेवतात. खाद्यान्नाच्या स्वरूपातील उर्जा बल मात्र या पेशींना मिळणे आवश्यक असते. याच पध्दतीने विचार केला तर असे लक्षात येते की जगाचा किंवा विश्वाचा व्यापार चालू ठेवायचा म्हणजे सुध्दा अशी एखादी यंत्रणा लागणारच. आता या यंत्रणेवर, मुख्य नियंत्रक या नात्याने, परमेश्वर नियंत्रण ठेवतो की ही यंत्रणा संगणक किंवा मानवी शरीर यांसारखी स्वनियंत्रित आहे, या वादात आपण पडण्यात अर्थ नाही. हे कार्यक्षेत्र परत तत्वज्ञान्यांचे किंवा धर्म मार्तंडांचे आहे. मात्र जगाच्या निर्मितीसाठी व निर्माण झाल्यावर त्याचा कारभार चालू राहण्यासाठी आवश्यक बल हे कोठून येते अणि त्याचे स्वरूप काय आहे हे समजावून घेणे शक्य वाटते.

भाग २

लेखनविषय: दुवे:

Comments

काही तपशील बरोबर नाहीत

डॅमॉक्रिटॉसचे अणू आणि डॅल्टनचे अणू या दोन शब्दांमध्ये काहीतरी व्युत्पत्तिजन्य साम्य आहे, खरे. पण त्या दोन कल्पनांमध्ये वैज्ञानिक असे काय साम्य आहे?

> शेवटी आइनस्टाईनने एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीस दिलेला
> प्रायोगिक पुरावा यामुळे 'अणू' हा सर्व पदार्थांचा मूल सुटा भाग आहे
> हे सर्वमान्य झाले.
याबद्दल अधिक माहिती द्याल काय? आइन्स्टाइनने दिलेला प्रायोगिक पुरावा कोणता?

विश्वकर्म्याचे चार भुज - १

कोणत्याही पदार्थाचा आणखी विघटन न करता येणारा घटक म्हणजे अणू, एवढेच साम्य या दोन कल्पनांच्यात आहे.
आइनस्टाइन च्या ब्राउनियन मोशन या संशोधनासंबंधी आपण वाचन केल्यास आपले शंकानिरसन व्हावे.
चन्द्रशेखर

धन्यवाद

ब्राउनियन मोशनबद्दल तुमचे म्हणणे योग्य आहे. याबद्दल आइन्स्टाइनने गणित सोडवले.

पण याबाबतीत सुद्धा आइन्स्टाइन यांनी केले ते गणिती वर्णन होय. ब्राउनियन मोशनचे (पाण्यात तरंगणार्‍या पराग-कणांच्या हेलकावत फिरण्याचे) चक्षुर्वै वर्णन प्रथम केले ते १८२७मध्ये रॉबर्ट ब्राउन याने. अणू आणि रेणू ही एकके मानल्यास परागकण किंवा धूळ-कणांच्या हेलकावण्याचे वर्णन गणितासह करता येते. म्हणजे आइन्स्टाइन यांनी दिलेली ही सिद्धता एक गणिती सिद्धता आहे. (हे योग्यच आहे.)

परंतु, अणू-रेणूंसाठी ही प्रथम गणिती सिद्धता नव्हे.

त्याच प्रमाणे गी लुसाक आणि आव्होगाद्रो यांच्या कायद्यांचे गणितही आहे. गी लुसाकच्या गणिताप्रमाणे दोन वायूंचा संयोग होतो, तेव्हा त्यांच्या घनफळाचे गुणोत्तर (रेशो) एकच असतो. आव्होगाद्रोच्या गणिताप्रमाणे वायूचा दाब, त्याचे तापमान, आणि घनफळ त्यातील "अणू/रेणूंच्या" संख्येवर अवलंबून आहेत. अशा प्रकारे या गणितांमध्ये अणू आणि रेणू ही एकके मानल्यास संयोग, दाब, वगैरेंचे वर्णन गणितासह करता येते. म्हणजे ही सिद्धता एक गणिती सिद्धता आहे. (हे योग्यच आहे.)

अशा प्रकारे अणू-रेणूंची गणिती सिद्धता आइन्स्टाइनपूर्वी शंभर-एक वर्षे आधीच झाली होती. आइन्स्टाइननेसुद्धा एक नवीन गणिती सिद्धता दिली. आइन्स्टाइनचे हे कार्य अत्यंत प्रशंसनीय आहे, आणि रँडम-वॉकची गणितपद्धती या कार्यासाठी आइन्स्टाइनने वापरली, तिचे उपयोग खूपच आहेत. ही सर्व प्रशंसा योग्य असली तरी अणू-रेणूंबद्दल प्रथम गणिती सिद्धता देणारा मात्र आइन्स्टाइन नव्हे. डाल्टन/गी लुसाक/आव्होगाद्रो काळातले वैज्ञानिक होत.

(परंतु मुख्य लेखात "ब्राउनियन मोशन" हा उल्लेख आला असता तर वरील स्पष्टीकरण मी विचारले नसते. हेसुद्धा खरेच.)

ब्राउनियन हेलकावे सूक्ष्मदर्शकाखाली बघताना आपण कणाशी एक-एक रेणूची टक्कर बघत नसतो. डोळ्यांना ५०-१०० मायक्रोसेकंद काळ सर्व एक-समयासारखा वाटतो (म्हणूनच चित्रपट बघताना वेगवेगळी सरकती चित्रे दिसत नाहीत.) त्या काळात तरंगत्या धुळीच्या कणाला हजारोंनी टकरा सारख्या होत असतात. पण उजवी-डावीकडून होणार्‍या टकरांचा हिशोब प्रत्येक क्षणाक्षणाला जमत नाही, केवळ सरासरी जमतो. म्हणून धुळीचा कण हेलकावतो. पण डोळ्यांना जाणवणारा प्रत्येक हेलकावा म्हणजे एक टक्कर नव्हे, तर कित्येक टकरांमधील क्षणिक असमतोल.

तुमचे लेखन चांगले आहे, स्पष्टीकरण विचारले म्हणून निराश होऊ नका, अधिक जोमाने लिहा ही विनंती.

विश्वकर्म्याचे चार भुज - १

निराश होण्याचा प्रश्नच येत नाही. हे काही माझे संशोधन नाही. मी पुष्कळ ठिकाणाहून ही माहिती जमा करून संकलित करण्याचे काम केले आहे. त्यात तृटी रहाण्याच्या खूप शक्यता आहेत. त्यामुळेच आपल्या प्रतिसादाबद्दल मी आपला आभारी आहे.
चंद्रशेखर

 
^ वर