सखाराम बाइंडर - एक सामाजिक नाटक
तेंडुलकरांचे एक नाटक पाकिस्तानात सादर झाले, त्याविषयी उपक्रमावर चर्चा चालू आहे. (दुवा) ही सखाराम बाइंडरबद्दलची उपचर्चा वेगळी काढत आहे.
त्यातील प्रतिसादांत एक उपविषय निघाला की तेंडुलकरांची नाटके उथळ असतात (दुवा), आणि मुख्यत्वे "सखाराम बाइंडर" नाटकावर चर्चा झाली.
ही चर्चा गंभीर आणि रोचक आहे. नाटकाकडून काय अपेक्षा रसिकाने करावी. "सामाजिक नाटक" असे वर्गीकरण करावे की करू नये, इत्यादि मुद्द्यांवर वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून मंडन-खंडन करणारे प्रतिसाद येत होते. ते प्रतिसाद मुळातल्या "तें पाकिस्तानात" विष्यापासून दूर जात होते, तरी चर्चिण्यास योग्य होते. म्हणून हा चर्चाविषय काढत आहे.
मी स्वतः या ठिकाणी काही मुद्दे प्रतिसादांत देणार आहे :
१. "सामाजिक नाटक" असे वर्गीकरण करून नाटकाकडून काही अपेक्षा करावी काय? (माझे उत्तर "होय")
२. "शारदा" नाटकाशी तुलना करताना, "सखाराम"मधील कथा-विषय अपवादात्मक विकृतींबद्दल आहे काय? (माझी उत्तरे - शारदा नाटकाशी तुलना करणे योग्य आहे. तुलना करता दोघांतही अपवादात्मक विकृत संबंधाचे शब्दांकन झाले आहे, निर्भर्त्सना झाली आहे.)
३. "सखाराम बाइंडर"मधले प्रसंग असे-होऊ-शकते-विश्वासास अपात्र असल्यामुळे ती उथळ कथा आहे काय? (माझे उत्तर - त्यात कथा टोकाची आहे, पण अगतिक स्त्री आणि पुरुष यांच्यामधील संबंधांविषयी एक संकल्पना मांडली आहे. त्यातील टोकाची उदाहरणे चितारली आहेत, म्हणून कथा रंजित आहे, पण उथळ अतिरंजित मात्र मला वाटत नाही. उलट खोल प्रतीकात्मक मात्र वाटते.)
हा विचार करण्यास प्रा. दिलीप बिरुटे यांनी चालना दिली. त्यांना धन्यवाद. त्यांनी आणि बाकी उपक्रमींनी "सखाराम बाइंडर"बद्दलची आपली मते आणखी विस्ताराने येथे जरूर मांडावीत.
Comments
विषय आणि प्रसिद्धी
नाटकाचा कथाविषय, सामाजिक जाणिवा वगैरे (लांबी, रुंदी, खोली वगैरे) गोष्टींकडे लक्ष देणारे चोखंदळ प्रेक्षक कमीच असतात. सखाराम बाइंडर हे नाटक त्यातील शिवराळ भाषा, अभिरुचीहीन दृष्ये आणि भडकपणा यासाठीच सुरुवातीच्या काळात तुफान गाजले होते. त्यातल्या कलागुणांकडे किंवा सामाजिक प्रश्नांकडे लक्ष देणारे संख्येने कमीच होते, असे मला आठवते.
प्रश्न -
हे मत आहे की वार्ताकथन आहे?
म्हनजे सुरुवातीला लोक म्हणत होते की "भाषा शिवराळ आहे, दृश्ये अभिरुचीहीन आहेत, आणि भडक आहे..." असे वृत्त सांगितले जात आहे का?
की "भाषा शिवराळ आहे, दृश्ये अभिरुचीहीन आहेत, आणि भडक आहे..." असे तुमचे नाटकाविषयी मत आहे, आणि सुरुवातीला मिळालेल्या कुप्रसिद्धीचे ते कारण तुम्ही सांगत आहात.
दोन पर्यायांनी चर्चा वेगळ्या दिशेला जाईल. पहिल्या पर्यायात "लोकांना असे का वाटले" अशा प्रकारे आपण अभिरुचीच्या समाजशास्त्राचा विचार वाढत जाईल. दुसर्या पर्यायात "अभिरुची म्हणजे काय" याविषयी चर्चा होईल.
दोन्ही प्रकारची चर्चा चांगलीच.
प्रसिद्धी
स्व.विजय तेंडुलकर यांच्या प्रतिभेचा स्पर्श या नाट्यकृतीला झालेला असल्यामुळे त्यात अलौकिक कलागुण निश्चितपणे आहेत, पण लोकांची गर्दी मी वर दिलेल्या कारणामुळे होते असे ऐकले होते. मला त्या गोष्टीत स्वारस्य नव्हते. अशी प्रसिद्धी (अनौपचारिक) त्या काळी झाली असल्यामुळे मी ते नाटक थेटरात जाऊन पाहिले नव्हते. नंतर कधी तरी टीव्हीवर जेवढे दाखवले होते तेवढे पाहिले. माणसाला जी अस्वस्थ करते तीच उच्च दर्जाची कलाकृती असते असे माझे मत नाही. कदाचित त्यामुळे अस्वस्थ होण्यासाठी ते नाटक आवर्जून पाहण्याची इच्छा मला झाली नसेल.
मस्त !
>>सखाराम बाइंडर हे नाटक त्यातील शिवराळ भाषा, अभिरुचीहीन दृष्ये आणि भडकपणा यासाठीच सुरुवातीच्या काळात तुफान गाजले होते.
म्हणजे नकारात्मक विषय, अभिरुचीहीन दृष्य, शिवराळ भाषा, आणि भडकपणा यातून लेखकाला लोकप्रियता / आणि नाटकालाही गर्दी होते, अशा आशयाचा आपला प्रतिसाद मला आवडला ! :)
अवांतर : महाराष्ट्रातल्या एका मोठ्या आणि थकलेल्या वाघाने अशाच डरकाल्या घालून-घालून नुसती लोकप्रियता नव्हे तर सत्ताही मिळविल्याचे आमच्या पाहण्यात आहे. ;)
-दिलीप बिरुटे
मत
म्हणजे नकारात्मक विषय, अभिरुचीहीन दृष्य, शिवराळ भाषा, आणि भडकपणा यातून लेखकाला लोकप्रियता / आणि नाटकालाही गर्दी होते, अशा आशयाचा आपला प्रतिसाद मला आवडला ! :)
या नाटकाबाबत तशी प्रसिद्धी अगदी सुरुवातीच्या काळात झाली होती हे खरे आहे. अर्थात अगदी सुरुवातीला नव्हे. त्यामुळे रंगमंचावर लुगडे बदलण्याचा प्रसंग नंतर वगळला गेला होता. (हा प्रसंग प्रत्यक्ष पाहायला मिळाला नाही म्हणून चवताळलेल्या समीक्षकांनी सखारामविरुद्ध नवी आघाडी उघडली हा आणखी वेगळा मुद्दा.) नाटकात चंपाचे काम केलेल्या लालन सारंग या दिग्दर्शक कमलाकर सारंग यांच्या पत्नी होत. त्यामुळे सारंगांनी ठरवून अभिरुचीहीन दृश्ये देऊयात असे केले असेल असे वाटत नाही. त्याचबरोबर माधव आचवल प्रभृतींनी या नाटकाबाबत वर्तमानपत्रे/मासिके यांमध्ये अतिशय चांगले अभिप्रायही दिले होते. हे वाचूनही नाटक पाहण्यास लोक गेले असावेत.
अवांतर : महाराष्ट्रातल्या एका मोठ्या आणि थकलेल्या वाघाने अशाच डरकाल्या घालून-घालून नुसती लोकप्रियता नव्हे तर सत्ताही मिळविल्याचे आमच्या पाहण्यात आहे. ;)
पूर्णपणे सहमत!! :)) किंबहुना डरकाळ्या घालण्यासाठी वाघ असण्याचीही गरज नसते. वाघाचे कातडे पांघरले तरी पुरे. नाही का?
बोंबलणाऱ्याची बोरे खपतात पण शांत बसणाऱ्याची द्राक्षेही खपत नाहीत अशी म्हण यासाठीच आहे.
एक मूलभूत प्रश्नः
एक मूलभूत प्रश्नः
सामाजिक आणि असामाजिक असं कलाकृतींचं वर्गीकरण करता येतं का? मला वाटतं सगळ्याच कलाकृतींचा शेवटी समाजाशी संबंध असतोच असतो. एक तर समाजाच्या निरनिराळ्या अंगांचा लेखकावर झालेला परिणाम आणि त्यावर त्यानं दिलेली प्रतिक्रिया या अर्थानं निर्मितीशी असतो. आणि शिवाय कलाकृती समाजासमोर ठेवली जातेच. त्याशिवाय तिचा जन्म सुफळ होत नाही. त्या अर्थानंही समाज अपरिहार्यच ठरतो. असं असताना काही कलाकृती सामाजिक आणि काही असामाजिक असं वर्गीकरण कसं करणार? आणि तसं कशासाठी करायचं? त्यानं काय साध्य होतं?
बाइंडरबद्दलः
नाटकात लैंगिक गोष्टी उघड उघड आणि अंगावर येणार्या असल्या, तरी त्यामुळे माझ्या संस्कारांवर वगैरे विपरीत परिणाम होतो आहे, गेला बाजार माझी 'ती' भूक चाळवली जाते असे, असं मला कधी वाटलं नाही. मी ते नाटक तीन वेळा पाहिले आहे. उलट प्रत्येक वेळी नवनवीन अर्थ लागत गेले. ही माणसे अशी वागतात, कारण ती त्यांच्या परिस्थितीसमोर अगतिक आहेत, असं काहीसं वाटलं. आपण सगळेच जण असे अगतिक नसतो का? आणि तरीही जगण्याच्या ईर्ष्येनं ओरबाडून काहीतरी मिळवायला - जगायला बघत असतो. असं करताना आपलाही पाय कुणा चंपाच्या आयुष्यावर पडत असेल, आणि आपण त्याला सफाईदारपणे पापनिर्दालनाचे नाव देऊन स्वतःचे समाधान करत असू. शेवटी प्रत्येकाच्या पापाच्या आणि पुण्याच्या व्याख्या निरनिराळ्या आणि स्वतःपुरत्या लवचीकच असतात. अशा वेळी कोण बरोबर, कोण चूक हे ठरवणार तरी कसं? जगण्याची भीषण गरज आपल्या सगळ्यांवर राज्य करत नसते का?
असे अनेक प्रश्न मनाशी येत गेले. यात स्वस्त, अभिरुचिहीन, उथळ, बाजारू असं काय आहे?
सामाजिक नाटक असते का ?
>> "सामाजिक नाटक" असे वर्गीकरण करून नाटकाकडून काही अपेक्षा करावी काय?
होय,
देवलांचे 'संगीत शारदा' हे नाटक मुळात 'बालाजरठ विवाहाचे' चित्रण करते. तत्कालीन सामाजिक रुढी, परंपरा, व सामाजिक परिस्थितीचा वेध घेऊन देवलांनी नाटक उभे केले. त्याकाळी मुलींच्या विवाहाची व पसंतीची सर्व जवाबदारी वडीलांकडे होती. वडील जे ठरवतील त्याच्या गळ्यात माळ घालण्याशिवाय कन्येला पर्याय नसे. तिच्या मनाचा, मताचा, व वयाचाही विचार केला जात नव्हता. समाजातील अशा रुढींमुळे मुलींच्या जीवनाची काय अवस्था होते, याची कल्पनाच न केलेली बरी. त्यांनी हा विषय हाताळून एक प्रकारे समाज प्रबोधन केले, तेव्हा नाटकाककडून काही अपेक्षा केल्या पाहिजेत असे वाटते.
बाकी चर्चेसाठी शुभेच्छा !!! :)
-दिलीप बिरुटे
"सामाजिक" वर्गीकरण करून चर्चेस फायदा होतो काय? - होय
कलावस्तूंचे वर्गीकरण अंततोगत्वा "अनावश्यक" असते, कारण कुठल्याही वस्तूंचे वर्गीकरण अनावश्यक असते.
पदार्थांचे घन-द्रव-वायुरूप असे वर्गीकरण केले नाही तरी ते पदार्थ तितकेच अस्तित्वात राहातात. आपण वर्गीकरण बर्फाला काठिण्य, पाण्याला प्रवाह, वाफेला उडण्याचा गुण देण्यासाठी करत नाही. आपण तोंड बंद ठेवले तरी ते पदार्थ तसे असतात. मग वर्गीकरण का? संवादात वर्णनासाठी. "बर्फ टणक असतो, पाणी उघड्या भांड्यात डचमळले तरी ठेवता येते, वाफ उडून जाते" हे वर्णन एकमेकांना सांगायला, चर्चायला सोपे जावे, म्हणून "घन", "द्रव", "वायुरूप" असे वर्गीकरण आपण निर्माण करतो.
नाटककार नाटकाला का लिहितो ते ती लेखिकाच जाणो. आपण वर्गीकरण केले न केले, तरी लेखककार्य, रंगकर्म, हे होतच राहील. पण प्रेक्षक म्हणून एकमेकांशी चर्चा करायची आपली इच्छा असते. का असते ते कोणास ठाऊक. पण इच्छा असते. अशा परिस्थितीत काही वर्गीकरण केले, तर एकमेकांशी बोलायला सोय होते.
एखादे नाटक बघून आपली काय गरज पुरी होते आहे? त्याच्याबद्दल एकमेकांना कल्पना दिली नाही, तर दोन प्रेक्षकांचा संवाद निरर्थक होऊ शकतो. जर एक प्रेक्षक म्हणाला की "हे नाटक [माझ्या] अपेक्षा पुर्या करते" आणि दुसरा म्हणाला की "हे नाटक [माझ्या] अपेक्षा पुर्या करत नाही," असे समजा. जर "माझ्या" हे अध्याहृत ठेवले, तर केवळ परस्परविरोध दिसतो, आणि प्रेक्षक म्हणून एकमेकांशी संवाद साधायच्या इच्छेची कळी आधीच खुडली जाते. स्वतःच्या अपेक्षा काय आहेत, हे प्रेक्षकांनी एकमेकांना सांगितले, तर संवाद पुढे चालू राहू शकतो. सुरुवातीलाच अशक्य परस्परविरोध असल्याचा आभास हटतो.
अशा अपेक्षा सांगणे, म्हणजे वर्गीकरण होय. उदाहरणार्थ, एखादा प्रेक्षक रंजनाची अपेक्षा घेऊन नाटक बघायला जातो, एखादा प्रेक्षक उद्बोधनाची अपेक्षा घेऊन जातो, वगैरे (यादी पूर्ण नाही)... समर्थ नाटककार अशाच काही (वेगवेगळ्या) अपेक्षा आहेत असे जाणून लेखन करतो.
पैकी "सामाजिक" नाटक ही एक अपेक्षा आहे. समाजातले प्रश्न उठवणार, आणि त्यांच्याबद्दल बोलबाला घडवणार, अशी कुठल्या प्रेक्षकाची अपेक्षा असेल तर ती अपेक्षा पुरी झाली का? वगैरे याबद्दल चर्चा होऊ शकेल. नाटककाराने "आपण कुठल्या सामाजिक विषयाबद्दल बोलत आहोत" असा संकेत दिला असेल, तर या चर्चेला अधिकच महत्त्व येते. कारण अशा चर्चेतून प्रेक्षक-प्रेक्षक संवाद असा इतकाच नव्हे तर प्रेक्षक-प्रेक्षक-नाटककार असा संवाद साधायची आशा असते.
(त्याच प्रमाणे नाटककाराने "मला तुमचे रंजन करायचे आहे" असा संकेत दिला असला, तर त्या अंगाने प्रेक्षक-प्रेक्षक संवाद साधल्यास फायदा अधिक.)
तरी या संदर्भात "सामाजिक" असे वर्गीकरण आपल्या सोयीसाठी आपण करूया. असे म्हणण्यात मी मागील चर्चेत दिलीप बिरुटे यांची बाजू घेत आहे. "वर्गीकरणाची गरजच नाही" असे म्हणण्यात "प्रेक्षकाने एकमेकांना सांगण्यासाठी अपेक्षा ठेवूच नये" असा संवाद खुंटण्याचा धोका आहे.
मला वाटते की "सखाराम बाइंडर"मध्ये कोणाच्या तरी आयुष्यातले दु:ख सांगितले आहे. अधूनमधून पात्रांची सार्वजनिक तत्त्वे त्यांच्या तोंडून सांगवली आहेत (म्हणजे जीवनविषयक तत्त्वज्ञान वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून सांगितले आहे.) या नाटकात सांगितलेली काही तत्त्वे प्रेक्षकाने समाजाच्या वागणुकीला लागू करून बघावीत, वाटल्यास व्यथित व्हावे, अशी नाटककाराने आपली मनीषा सांगितलेली आहे.
(एखाद्या प्रेमकथेतल्या प्रेमी-युगुलाच्या वैयक्तिक तपशिलांत कथानक गुंग असते, त्याचे सार्वत्रीकरण करावयास नाटककार आपल्याला सांगत नाही. स्टेज आणि आयुष्यामधली धगधगीत अग्निरेखा स्पष्ट ठेवतो. तिथे मुद्दामून सामाजिक तत्त्वे-टिप्पणी बघण्यात तितके काही हशील नाही. पण "सखाराम बाइंडर" हे असे नव्हे.)
हे वर्गीकरण मी का करत आहे? दिलीप बिरुटे यांनी "शारदा" आणि "सखाराम बाइंडर"ची तुलना केली आहे, ती दोन सामाजिक नाटकांची तुलना आहे, याबाबत मी त्यांच्याशी सहमत आहे. (ही पेरू-पेरूची तुलना आहे, पेरू-संत्र्याची नव्हे.) अशी तुलना व्हावी, त्यातून संवादात प्रगती होईल, असे मला वाटते. म्हणून "सामाजिक" असे वर्गीकरण व्हावे.
पुढील प्रतिसादात "शारदा" नाटकाबद्दल अशी तुलनात्मक चर्चा मी करणार आहे. मात्र तुलनेनंतरचे माझे निष्कर्ष दिलीप बिरुटे यांच्या निष्कर्षांपेक्षा वेगले आहेत, ते तेव्हा विस्ताराने सांगेन.
दोन पैशे...
>>"शारदा" नाटकाबद्दल अशी तुलनात्मक चर्चा मी करणार आहे.
मस्त ! आवडेल चर्चा वाचायला. आणि जमलेच तर दोन पैशाची भरही घालेन.
-दिलीप बिरुटे
अपेक्षा आणि वर्गीकरण
वरील वाक्यांमुळे मी थोडासा गोंधळात पडलो आहे. आता समजा क्ष व य या दोघांच्या सामाजिक नाटकाकडून एकच अपेक्षा आहेत. अर्थातच त्यांचे एखाद्या नाटकाचे सामाजिक असे वर्गीकरण सारखेच असणार. पण क्ष ची सामाजिक विषय कसा मांडावा याविषयीची अपेक्षा य पेक्षा निराळी असल्यास वर्गीकरण बरोबर असूनही त्यापैकी एकाचा अपेक्षाभंग होऊ शकतो. मग अपेक्षा म्हणजे वर्गीकरण कसे?
अनेक टप्प्यांत?
किंवा शब्दार्थ वेगवेगळे?
ही जी काय "एकच" अपेक्षा आहे, त्याबद्दल क्ष आणि य यांच्यामध्ये चर्चा होऊ शकेल.
असे लक्षात आल्यानंतर "सामाजिक" अपेक्षा चे उपवर्गीकरण "मांडणीची अपेक्षा" या दृष्टीने करता येईल.
अपेक्षा म्हणजे वर्गीकरण ही व्याख्या नाही. वर्गीकरण म्हणजे व्यक्तींचे (एक-एक प्रत्येक नाटकाचे) वर्ग बनवणे. मग ते वर्ग यादृच्छिक (रँडम) का असेनात. हे वर्गीकरण येथे अभिप्रेत नाही. म्हणून अपेक्षा=वर्गीकरण ही सार्वत्रिक व्याख्या नाही.
साधारणपणे वर्गीकरणासाठी काही सामान्य गुण असलेल्या वस्तू एकत्र केल्या जातात. हे सामान्य गुण काही कामाचे नसले तरी चलतात - उदाहरणार्थ : संहितेत अक्षरांची संख्या विषम/सम असलेली नाटके. हेसुद्धा वर्गीकरण होय. पण येथे अभिप्रेत नाही. म्हणून अपेक्षा=वर्गीकरण ही सार्वत्रिक व्याख्या नाही.
परंतु वर्गीकरणासाठी निवडलेले गुण (क्लासिफायिंग क्वालिटी) संवाद साधणार्यांसाठी रोचक असले तर संवादाला उपयोग होतो. जोवर संवादाला मदत होते आहे, तोवर वाटेल तेवढी वर्गीकरणे आणि उपवर्गीकरणे करावीत. सम्वादाला आडचण होत असेल तर वर्गीकरणे त्यागावीत (उदाहरणार्थ : सम/विषम अक्षरसंख्या.)
अपेक्षा=उपयुक्ततेबाबत आणि आवडीबाबत पूर्वग्रह (असा येथे अर्थ घेतला, तर)
जिथे आपेक्षा आहेत तिथे वर्गीकरणे करण्यालायक आहेत. असा वरील तत्त्वाचा सारांश आहे.
- - -
तुमच्या उदाहरणातही मुख्य वर्गीकरण काय आणि उपवर्गीकरण काय, याबाबत माझे काही मत नाही.
वाटल्यास "मांडणी" हे महावर्गीकरण मानावे, आणि "सामाजिक अपेक्षा" हे उपवर्गीकरण करावे.
(अ) मांडणी - पाच-अंकी नाटक (५ अंकांची अपेक्षा), संगीत नाटक (गाण्यांची अपेक्षा), वगनाट्य...
(आ) सामाजिक अपेक्षा - आहेत/नाहीत
(इ) स्त्रीपात्रविरहित/सर्व स्त्रीपात्रे/मिश्र/एकपात्री (वेगवेगळ्या अपेक्षा)
संवादासाठी हवे ते वर्ग पाडावेत, हव्या त्या क्रमाने पाडवेत.
तुमची नाटककंपनी स्त्रीपात्रविरहित असेल, आणि त्यात उत्तम गायक असतील तर तुम्हाला इ-अ-आ अशा क्रमाने वर्गीकरण बरे.
बदलणार्या अपेक्षा
हे बरोबरच आहे. तसेच 'अपेक्षा म्हणजे वर्गीकरण ही व्याख्या नाही' हे पण योग्यच आहे. अपेक्षांच्या आधारावर वर्गीकरण आपल्याला अपेक्षित असावे. परंतु अपेक्षा सतत बदलणार्या असू शकतील. म्हणजे क्षच्या मांडणीविषयीच्या अपेक्षा नाटक चालू असताना, त्यातील आशयाचे आकलन करताना बदलू शकतील (पूर्वग्रह कदाचित सहजासहजी बदलत नसावे). प्रेक्षक आणि नाटकातील वास्तव यांचा नाटक अनुभवताना संवाद चालूच असतो. त्यामुळे नाटक पाहण्याआधीचे अपेक्षांवर आधारीत वर्गीकरण नाटक संपल्यानंतर अप्रस्तुत ठरू शकते. तेव्हा वर्गीकरणासाठी निवडलेल्या अपेक्षा या गुणापेक्षा इतर कुठला गुण (आवडीबाबत पूर्वग्रह ?) योग्य ठरू शकेल असे वाटते.
संवादसापेक्ष
संवादाच्या वेळेच्या अपेक्षा अभिप्रेत आहेत.
संवाद - येथे उपक्रम-सदस्यांमध्ये साधतो आहे, हे उदाहरण.
संवादाची वेळ नाटक बघण्यापूर्वी असेल, तर नाटक बघण्यापूर्वीची अपेक्षा.
संवादाची वेळ नाटक बघितल्यानंतरची असेल तर न्तक बघितल्यानंतरची अपेक्षा.
संवादाची वेळ नाटक बघतानाची असेल (तर अशा लोकांना आपण "अहो श्श्" असे म्हणतो).
क्ष याने नाटक आधीच बघितले असेल, य याने अजून बघितलेले नसेल, तर संवाद कठिण आहे. संवाद साधायचे फलित काय आहे? त्याबद्दल नीट विचार करून त्या दोघांनी संवादाची चौकट आखावी.
क्ष आणि य यांच्या कुठल्याच अपेक्षा समांतर नसतील, तर त्यांना संवाद साधता येणार नाही. येथे त्यांना संवाद साधायचा आहे, हे गृहीतक आहे. त्यामुळे गप्पा मारत-मारत कुठल्यातरी बाबतील त्यांना एकमेकांशी अपेक्षा जुळवता येतील असा माझा विचार आहे. गप्पा मारत-मारत त्यांना उलट जाणवले, की कुठल्याच बाबतीत त्यांना अपेक्षा जुळवता येत नाही, तर ते आपोआप विषय बोलणे बंद करतील.
(तुमचा विचार "नाटक म्हणजे काय असते" असे अस्तित्वशास्त्रातले (ऑन्टॉलॉजीमधले) आहे. ही जी काय वस्तू आहे, ती बघताना, मनन करताना बदलते का? बदलणार्या वस्तूचे वर्गीकरण कसे शक्य आहे. जे सारखेच बदलते आहे, प्रत्येकाच्या मनात वेगळ्या प्रकारे बदलते आहे, त्याबाबत संवाद शक्य तरी आहे का? हे सगळे चांगले प्रश्न आहेत. येथे माझे गृहीतक आहे, की बोलण्यालायक काहीतरी आहे. यासाठी विदा म्हणून मी "तें ... पाकिस्तानात" हा उपक्रमावरचा दुवा देतो. तिथे काही चर्चा चालू आहे, त्यात एकमेकांचे-न-पटणारे लोकही असे बोलतात जणूकाही काही एकच विषय आहे. तो संवाद पूर्णपणे निरर्थक म्हणायची नामुष्की ना येवो, म्हणून बोलण्यासारखे काही आहे, असे माझे गृहीतक आहे.)
संवादसापेक्ष अपेक्षा संवाद होतांना तरी स्थायी आहेत का?
संवादाच्या वेळच्या अपेक्षा असे जरी मानले तरीही संवाद आणि संवादकांच्या अपेक्षा यांची आंतरक्रिया घडत असल्याने पुन्हा अपेक्षाधारीत वर्गीकरण अडचणीचे वाटते. उदाहरणार्थ माझ्यात आणि आपल्यात संवाद चालू आहे पण आपला प्रतिसाद वाचल्यानंतर माझ्या या धाग्यावरील चर्चेविषयीच्या अपेक्षा बदलत आहेत. अर्थात आपण (दोघांनी) संवादाची चौकट आधी न आखल्यामुळे आणि चर्चाही संवादानुसार बदलत असल्याने हे उदाहरण तेवढे संयुक्तिक नाही.
माझे प्रश्न मला अस्तित्वशास्त्रीय वाटत नाही. माझे गृहितक नाटक बदलत नाही असे आहे. तसेच संवादासाठी आवश्यक असणारे वर्गीकरण शक्य आहे असे मला वाटते. केवळ वर्गीकरणासाठी वापरलेला गुण स्थायी असावा एवढीच माझी अपेक्षा (जी आपल्यात संवाद चालु झाल्यानंतर निर्माण झाली आहे) आहे.
"तें ... पाकिस्तानात" या धाग्यात पूर्वग्रह संवादात व्यत्यय आणत असल्यासारखे वाटते. त्यामुळेच असहमत तर असहमत अशी संवाद खुंटवणारी विधाने आढळतात.
अपेक्षा आणि अधि-अपेक्षा यांच्यात फरक करूया
मानव्य चर्चेतील उदाहरण देता येईल का?
विशिष्ट नाटकाबद्दल संवादातून अधिक माहिती कळेल तशी त्या विशिष्ट नाटकाबद्दल धारणा बदलू शकेल. पण "नाटके" याविषयी सामान्य अशा अपेक्षांची यादी त्या संवादात बदलणार नाही.
आता कोणी 'क्ष'ने मला पटवून दिले की "किंग लियर" हे शोकांत नाटक नसून सुखांत आहे. नाटकाबद्दल माझी धारणा बदलली. पण सामान्यपणे नाटकांना अंत असावेत, आणि ते अंत रसप्रधान असावेत ही माझी संवादापूर्वीची अपेक्षा संवादानंतरही स्थायी राहिली.
त्याहूनही अधि-चर्चा (मेटा-चर्चा) होऊ शकते. कोणी 'क्ष' मला पटवू शकते की नाटकांचे अंत रसप्रधान असावेत अशी अपेक्षा असू नये. पण सामान्यपणे नाटकांना अंत असावेत, ही माझी संवादापूर्वीची अपेक्षा संवादानंतरही स्थायी राहिली.
त्याहूनही अधि-चर्चा होऊ शकते. नाटके ही सुरुवात आणि अंत नसलेली अभिनयकृत्ये असतात, असे कोणी मला पटवू शकते. पण नाटके अभिनयकृत्ये असतात, ही माझी संवादापूर्वीची अपेक्षा संवादानंतरही स्थायी राहिली.
- - -
हा उपसंवाद कुठे चालला आहे? "सखाराम बाइंडर" हे सामाजिक नाटक नाही, किंवा ते सामाजिक नाटक म्हणून दुसर्या सामाजिक नाटकांशी तुलना करणे चर्चेसाठी निरुपयोगी आहे, "शारदा"शी त्याची तुलना मूलभूत कारणांसाठी होऊ नये असे वाटत असेल तर ही उपचर्चा चालू ठेवूया.
पण तुम्ही दुसर्या कुठल्या मार्गाने सामाजिक+तुलनीय आहे अशा निष्कर्षाप्रत पोचत असाल, तर तुमच्या युक्तिवादाने तो निष्कर्ष मी मान्य केला, असे समजूया. माझ्याच युक्तिवादाबद्दल माझा आग्रह नाही.
"शारदा" नाटकाशी "सखाराम"ची तुलना मूलभूत कारणासाठी नव्हे, तर कुठल्या तपशीलवार कारणामुळे होऊ शकत नसेल, असे तुम्हाला जर वाटते, तर माझ्या "शारदा" प्रतिसादाखाली उपचर्चा करूया. (तो अजून लिहायचा आहे.)
सामाजिक नाटक
त्या यादीतील अपेक्षा वर्गीकरणासाठी वापरता येतील का?
अशा अपेक्षा आहेतः {नाटकांना अंत आहेत/नाहीत, अंत रसप्रधान आहेत/नाहीत} .
आता या अपेक्षासंचाचा वापर करून संवादा अगोदर असे वर्गीकरण करता येईल: {अंत असलेली नाटके/अंत नसलेली नाटके, अंत रसप्रधान असलेली नाटके/ अंत रसप्रधान नसलेली नाटके}
क्ष ची अपेक्षा : {नाटकांना अंत असतात आणि नाटके सुखांत किंवा शोकांत असतात}
य ची अपेक्षा : {नाटकांना अंत नसतात}
क्ष आणि य यांच्यात संवाद नाटकास अंत आहे किंवा नाही या संदर्भात होत आहे.
समजा संवादादरम्यान क्ष ची अपेक्षा पुढीलप्रमाणे बदलते: {काही नाटकांना अंत नसतात}
आता संवादाआधीचे वर्गीकरण अप्रस्तुत आहे कारण आता नविन वर्गाची (काही नाटकांना अंत नसतात) आवश्यकता आहे.
'सखाराम बाइंडर' हे सामाजिक नाटक आहे कारण ते अगदीच संकुचितपणे पाहिले तरीही परित्यक्ता स्त्रीयांचे प्रश्न या सामाजिक समस्येला वाचा फोडते. त्याची दुसर्या कुठल्याही सामाजिक नाटकाशी तुलना करता येईल, असे मला वाटते. तेव्हा ही उपचर्चा* थांबवणेच योग्य आहे.
*अपेक्षांवर आधारित वर्गीकरण मला नविन विचार वाटला. त्यासंदर्भात विचार करतानाच्या गोंधळामुळेच ही उपचर्चा लांबली.
मस्त चर्चा
असे होऊ शकते का? हा भाबडा अविश्वास आहे. कालच एक बातमी वाचण्यात आली, 'टेक्सस राज्यात एका महिलेला दोन वेगवेगळ्या पुरुषांपासुन 'जुळे' झाले.'
तुर्तास इतकेच. चर्चा विषय आवडला सवडीने सविस्तर प्रतिसाद
शारदा नाटकाचा विषय - सामान्य घटना की अपवादात्मक विकृती?
वर दिलीप बिरुटे यांनी शारदा नाटकाची ओळख करूनच दिली आहे. ते म्हणतात :
शारदा नाटकाच्या कथानकाचा सारांश
हे नाटक देवलांनी १८९९ साली लिहिले. मी ते दूरदर्शनवरती १५-२० वर्षांपूर्वी बघितले. अंधुक आठवणारा त्याचा कथाभाग असा :
शारदा ही एका गरीब भटभिक्षुकाची मुलगी - बहुधा १२-१५ वर्षांची असावी. तिचे वडील तिला पैसे घेऊन एका ७५ वर्षांच्या म्हातार्याला लग्नात देण्याचा बेत आखतात. हे शारदेला नको असते. तरुण तडफदार नायक पटवून, भांडून हे लग्न मोडण्याचा प्रयत्न करतो. सर्व फोल ठरतात. शेवटच्या अंकात लग्न होत असता-असता नायकाला कळते की हा सगोत्र विवाह आहे. लग्नमंडपात हजर होऊन तो लग्न मोडवतो (कारण लग्नात पौरोहित्य करणारा भट सगोत्र विवाह सिद्ध करण्यास नकार देतो.) अगदी शेवटच्या प्रवेशात आयुष्यातून उठलेली शारदा नदीवर जीव द्यायला जात आहे, आणि नायक तिला तसे करण्यापासून परावृत्त करतो.
त्या काळात खूप लग्ने जरठ बालिका असत काय?
शारदेच्या लिखाणाचा काळ म्हणजे माझ्या आजा-पणजांचा लग्न होण्याचा काळ. या काळात जरठबालिका विवाह प्रकृती म्हणून होते, की विकृती म्हणून? काही नाही तर माझ्या आजा-पणजांची उदाहरणे बघूया - चांगले दहा-बारा विवाह मला मोजता येतात. त्यात एकही विवाह १५-७५ वयाच्या फरकाने झालेला नाही. बहुतेक विवाहांत पुरुष १८-२५ वर्षांचा होता आणि स्त्री १२-१६ वर्षांची होती. माझे कुटुंब म्हणजे काही अतिशय पुढारलेले वगैरे नव्हे. त्यांच्या जातीत सामान्यच. म्हणजे जरठ-बालिका विवाह ही प्रवृत्ती म्हणायला जागा फारशी दिसत नाही. होती ती अपवादात्मक विकृतीच. बहुतेक मुलींचे बाप हुंडा देऊन बरा नवरा मिळवता यावा म्हणून पैसे जोडत असत - मुलीला म्हातार्या नवर्याला विकायला निघणारे ते अपवादात्मक विकृत बाप होते. शारदेला विकायला काढणारा बाप किंवा ७५ वर्षांचा लंपट नवरोबा, हा संबंध समाजाचा प्रतिनिधी होऊ शकत नाही. समाजातील अपवादाने दिसणार्याचे ते एक चित्रण आहे. (हे शब्द दिलीप बिरुट्यांनी "सखाराम बाइंडर"बद्दल वापरले होते, तुलनेने ते "शारदा" नाटकालाही लागू होतात.)
नाट्यपूर्णतेसाठी समस्येचे अतिरेकी उदाहरण रंगमंचावर
वर मी म्हटले - "बहुतेक विवाहांत पुरुष १८-२५ वर्षांचा होता आणि स्त्री १२-१६ वर्षांची होती." एक उदाहरण होते की पुरुष ३५-४०चा होता, आणि स्त्री १५-१६ वर्षांची होती. हे पणजोबा-पणजीबाई दोघे कुटुंबात आवडते होते - यात वाईट वाटण्यासारखे काही कुटुंबात भाव नाहीत. लाज वगैरे तर नाहीच. असा प्रकार अतिसामान्यही नव्हता, पण पुष्कळ लोकांनी आजूबाजूला बघितला होता. "प्रातिनिधिक" असावे म्हणून देवलांनी १५*७५ ऐवजी १५*४० विवाहाबद्दल कथानक लिहायला हवे होते काय? त्यांचे त्यांनाच माहिती. पण माझ्या मते, असे मध्य-फरकाचे कथानक लिहून प्रेक्षकांत हवा तितका तिरस्कार निर्माण झाला नसता. या आवडत्या पणजोबा-पणजींबद्दल आजकालच्या पिढ्यांत आम्हाला आपुलकी वाटते, तर त्या काळात शारदा बघून काय खास वाटले असते? काही नसते वाटले - म्हटले असते, "चांगली यशस्वी होतात अशी लग्ने, उगाच बोंब मारतो हा नाटककार." वयात अतिरेकी फरक असलेले कथानक देऊन देवलांनी "हे यशस्वी होऊ शकते" अशी तिळमात्र शंका प्रेक्षकाच्या मनात उठण्यास जागा ठेवली नाही. एक वादविवादात्मक कृती म्हणून असे अतिरेकी कथानक सांगण्यात देवलांनी सर्वाधिक परिणाम साधला, असे माझे मत आहे. निर्लज्ज हावरट बापाचे वागणे दाखवून, शारदा नाटकाने मानवी जीवनातल्या विकृतींची चित्रं रंगवली, "अवघे पाउणशे वयमान" असलेल्या म्हातार्याचे बालिकेबरोबरचे लंपट विचार सांगून त्यातल्या त्यात लैंगिक संबधाबाबत बिभत्सेला महत्व दिले (निळ्या अक्षरांत "सखाराम बाइंडर"बाबत दिलीप बिरुटे यांचे शब्द).
सामान्य अन्यायाला निर्ढावलेला समाजच अतिरेकी अन्यायालाही अपवादात्मक थारा देतो
अतिरेकी विकृतीबद्दल बोलून नुसती हीन अभिरुचीच चाळवेल, कारण अशा घटना होतच नाहीत, असा देवलांनी विचार करायला हवा होता का? तर नव्हे. अशा घटना अपवादाने होत असत. अपवादाने होणार्या या अतिरेकी घटनांकडे समाज काणाडोळा करे. (करावाच लागे - कारण "चांगल्या" घरांत कमी फरकाचे १५*३५ विवाह होतच ना!) इतकेच काय, अशा बाबतीत कायद्याचा हस्तक्षेप होऊ नये, म्हणून बोलत. १९२९-१९३० मध्ये बालविवाहविरोधी सारडा कायदा (महाराष्ट्रात "शारदा" कायदा) पास झाला तेव्हा बंगालातील पंचानन तर्करत्न या शास्त्र्याने हिंदसरकारने देऊ केलेली "महामहोपाध्याय" पदवी परत केली. आंबेडकरांच्या लेखांच्या पुस्तकात काशी क्षेत्रातील धर्मसंसदेतले निर्णय दिलेले आहेत (ही धर्मसंसद बहुधा १९२९ साली झाली).
त्यामुळे असे दिसते की अपवादात्मक विकृती असली तरी समाजाच्या एखाद्या वर्गात तिचे समर्थन होत असे. समर्थन करणारे अगदी थोडे असले, तरी ते उच्चपदस्थ होते. बाकीच्यांना विकृतिबद्दल चुकचुक करून अर्धविकृती राजरोस चालू ठेवण्यास मुभा असे.
जरी देवलांनी अतिरेकी विकृतीचे चित्रण केले तरी त्यांचे लक्ष्य सामान्य परिस्थितीकडे असावे. दिलीप बिरुटे योग्यच म्हणतात
तेंडुलकरांचा सामाजिक विषय
त्याच प्रकारे तेंडुलकरांचा विषय आहे - स्त्रीला डोईवरच्या छपरासाठी श्रमाची गुलामगिरी ("चहा कर, दीड मैलावरून पाणी आण"), मारहाण ("आधीच सांगतो, ऐकले नाहीस मारेन, जायचे तर दार उघडे आहे"), लैंगिक छळ (या घरात बायको म्हणून राहावे लागेल) हे सर्व सहन करावे लागते. इथे "पतित्यक्ता" हा मुद्दा महत्त्वाचा नसावा असे मला वाटते. लक्षुमीला जरी पतीने टाकले आहे, तरी चंपी खुद्द नालायक पतीच्या घरून निघाली आहे. जितके टोकाचे अत्याचार या नाटकातल्या बायांना सहन करावे लागतात, तितके बहुतेक बायांना सहन करावे लागत नाहीत. (शारदेतले १५*७५, आणि आमच्या कुटुंबातले ते एक १५*४० कथानक लक्षात घ्या.) शारदेसारखीच बिभत्सता सुस्पष्ट करायला, शुद्ध तिरस्कार जागृत करायला तेंडुलकरांना अतिरेकी विकृत हिंसा दाखवणे ठीक होते. बहुतेक ठिकाणी बाईला "सामान्य" लैंगिक त्रास असला तर "प्रयत्न करा, बाई नांदत नाही का, सुख देत नाही का?" असल्या गुळमुळीत चर्चा होतात. तसले वाटकाढू प्रकार बंद करण्यासाठी टोकाच्या छळाचे चित्रण आवश्यक होते. देवलांना आवश्यक होते, तसे तेंडुलकरांनाही.
वास्तविक शारदेच्या गरीब कुटुंबाचा प्रश्न असतो पोटाचा. पण देवल म्हातार्याच्या लैंगिक म्हातारचळावर लक्ष केंद्रित करताना (माझ्या स्मरणात म्हातार्याच्या लोलुपतेचे प्रवेश पुष्कळ आहेत) "मुलीचा बाप" नावाच्या वृत्तीवर सडकून टीका करतात, येथील श्रद्धेवर सतत शिव्या घालतात...
याचे सामांतर्य "सखाराम बाइंडर"बाबत दिलीप बिरुटे यांनी दिलेलेच आहे -
स्त्री-पुरुष सामाजिक प्रश्नांत लैंगिक संबंधांचा विचार अपरिहार्य
लग्न आणि स्त्री-पुरुष सहवास या महत्त्वाच्या सामाजिक विषयामध्ये लैंगिक बाबींकडे दुर्लक्ष करणे अशक्य आहे. अगदी एक-दोन पिढ्यांपूर्वी सुद्धा सुनेचा छळ होण्याच्या गोष्टी आपण ऐकतो. अगदी हल्लीहल्लीसुद्धा अपवादात्मक ठिकाणी हुंड्याचे पैसे मिळाले नाहीत म्हणून पत्नीचा खून करतात. मग पतीला सुख देत नाही म्हणून छळ होणार नाही, असे कसे? चंपीच्या नवर्याने तिला मारहाण केली यात अशक्य असे काय? चंपीचे लग्न पदर येण्यापूर्वी झाले असा कथाभाग आहे. तिच्या नवर्याने तिच्या अवघड जागी कुठले इंद्रिय भरुन तिला त्रास दिला, असे म्हणण्याऐवजी तिखट भरून छळले असे म्हटले आहे. त्यात अतिरंजित असे काय आहे? (दया पवारांच्या "बलुतं" आत्मचरित्रात अशाच लहान मुलींची लग्ने होतात, आणि नवर्यांच्या मनात वैषयिक विचार येतात. एस.एल.भैरप्पांच्या आत्मचरित्रातही लहान मुलींची लग्ने होण्याच्या गोष्टी आहेत. म्हणजे आ-ब्राह्मण-महार समाजांमध्ये विसाव्या शतकात लहान मुलींची लग्ने होत आहेत. लहान मुलीशी कुठलाही लैंगिक व्यवहार म्हणजे छळच नाही का?)
नाट्यपूर्ण योगायोगांची गुंफण ही त्रुटी नाही
राहिली गोष्ट अशक्य वाटणार्या योगायोगांना गुंफण्याची. देवलांनी शरदेचे जरठलग्न होण्याचे टाळण्यासाठी "सगोत्र विवाह" हा योगायोग पुढे केला. त्यांना या संगीत नाटकाला सुखांत द्यायचा होता. "शारदेने म्हातार्याशी विवाह केला" हा सुखांत शक्य नाही. सगळे प्रयत्न करून लग्न थांबवण्यास नायक अयशस्वी झाला, हे सामान्य आयुष्य दाखवलेले आहे. पण ते तर चालूच राहाणार. नाटकाला काही अंत हवा, पडदा पडल्यावर खुर्चीतून उठताना प्रेक्षकाला "नाटकाची कथा संपली" असे निश्चित वाटले पाहिजे, ही नाटकांची रीत आहे. म्हणून "सगोत्र" योगायोगाचा सहारा.
त्याच प्रकारे लक्षुमी-चंपा या दोघी एका घरात राहाणे शक्य नाही - यांचा वाद विकोपाला जात राहाणार असे आयुष्य असते. पण नाटक नाट्यपूर्ण पद्धतीने संपवावे लागते. तेंडुलकरांनी दु:खांत निवडला - चंपीचा खून. दु:खांत नसता तर काय अंत करता आला असता? लक्षुमीला तिचा नवरा/पुतण्या सन्मानाने बोलावून घेतो? चंपीचा नवरा दारू सोडून कर्तबगार होतो?
अगदी शेवटपर्यंत कडू सत्य दाखवून नाट्यपूर्ण शेवट करणे ही देवलांचीही चूक नाही, आणि तेंडुलकरांचीही चूक नाही.
माझ्या मते चंपीच्या खुनाला प्रतीकात्मक अर्थही आहे. पण ती चर्चा वेगळ्या प्रतिसादात लिहितो.
जराशा ग्प्पा........
आपला असा सर्व मुद्यांचा वेध घेणारा प्रतिसाद आला की, फारशी विचार करायची संधी नसते. उपप्रतिसाद लिहिला तरी असे वाटते, अरे याचे उत्तर तर वर आलेच आहे असे वाटते. त्यामुळे लिहिणे राहून जाते. :)
>>त्या काळात खूप लग्ने जरठ बालिका असत काय?
म्हाता-याबरोबर सर्वच लहानमुलींचे लग्न होत नव्हते, पण समज नसलेल्या लहानमुलींचे लग्न होतच होते. म्हणजे, शारदाच्या पाच-पन्नास वर्ष अगोदर किंवा अधिक काळात कमी-अधिक प्रमाणात असे जरठ विवाह अधून-मधून होत असावे. कारण गो. ब. देवलांनी नाटकाची प्रेरणा म्हणून सांगितलेच की, ते त्यांच्या मित्राबरोबर गप्पा मारत बसले असतांना त्यांना एक बातमी कळली की, कोण्या एका सुप्रसिद्ध व वयोवृद्ध अशा संस्थानिकाचे लग्न एका अल्पवयीन मुलीशी निश्चित झाले. ती बतमी ऐकताच त्यांना काही पदं सुचली आणि पुढे संगीत शारदाचा जन्म झाला.
वरील कारण नाटक सुचण्याचे जरी असले, तरी तो काळ सामाजिक सुधारणांचा होता, चळवळींनी व्यापलेला होता. त्या काळात गो. ब. देवलांनीच असे नाटक लिहिले नाही. मुलींना विकणे, म्हातारचळ, अशा विषयांवरही नाटके लिहिल्याच जात होती. आणि त्यातून काही प्रबोधनही केल्या जात होते. असे असले तरी या नाटकाच्या मुळाशी जो पुरुषी विषयवासनेचा भाग आहे, त्याचा नेमकेपणा या नाटकातही येतोच. पुरुष म्हातारा झाला तरी त्याला लग्नाची इच्छा होणे हे सूत्र इथेही आहेच.
एक प्रश्न या निमित्ताने समोर येतो की, अशा नाटकांचे आयुष्य त्या-त्या कालखंडापूरते असते का ? म्हणजे ती समस्या संपली की ते नाटक काळाच्या पडद्याआड जाते. पण खाली लिखाळ म्हणतात तसे समस्या सुटल्या तरी मनोविकार, भावना या चिरंतन राहतात. म्हणून त्या-त्या कालखंडात ती नाटके कदाचित लोकप्रिय होत असावी. पण 'शारदा' नाटकांचा हेतू असेल ते सादर करतांना त्यात जरा सौम्यपणा येतो असे वाटते. शारदा नाटकात लेखक थेट शारदाचे आणि तिच्यावर प्रेम करणार्या त्या तरुणाचे त्यांचे प्रेम-विवाह लावू शकले असते. पण लेखकाला 'सगोत्र विवाहाचे’ निमित्त करुन लग्न लावावे लागले. कारण तेव्हा त्यांनी जर प्रेमविवाह केला असता तर तेव्हाच्या समाजाच्या दृष्टीने ते’ 'पाप’ ठरले असते. म्हणजे सामाजिक भान ठेवणे म्हणतात ते यालाच नाही का ! म्हणजे समाजातील दोष चव्हाट्यावर मांडून समाजाला योग्य मार्गावर आणण्याचा पुरस्कार अशी नाटके करतात. आणि मग शारदेच्या तुलनेत बाइंडरच्या बाबतीत वरील कसोट्या लावून पाहिल्या की विचार करावा लागतो तो नाटकाचा हेतूचा, त्यातले सामाजिक प्रश्न, त्यातील संवाद, अभिनयाचे सादरीकरण, विचार, नाटकातील प्रश्न- आणि उत्तरे, इत्यादी-इत्यादी ? नाटक म्हणजे नुसते संहिता नाही. अभिनयातून अधिक आशय व्यक्त होतो तेव्हा त्याचाही विचार या निमित्ताने केला पाहिजे, (भडकपणाच्या बाबतीत) म्हणजे बरेसचे प्रश्नांचे निराकरण होईल, आणि बर्याचशा प्रश्नांची उत्तरे आपल्याला आपोआप मिळतात असे वाटते.
>>लक्षुमीला तिचा नवरा/पुतण्या सन्मानाने बोलावून घेतो? चंपीचा नवरा दारू सोडून कर्तबगार होतो?
आणि समजा असे केलेच असते तर फार मोठा फरक झाला असता असे वाटत नाही. फक्त नाटकाचा इतर नाटकांप्रमाणे गोड शेवट झाला असता, पण लेखकाने वेगळेपणाच्या नादात जाणीवपूर्वक त्याचा दु:खद शेवट केला असे वाटते.
-दिलीप बिरुटे
मनोव्यापारावर प्रकाश टाकणारे
नमस्कार,
चर्चेचा विषय छान आहे. वरील चर्चा पुर्ण न वाचताच मी माझे मत मांडण्यासाठी प्रतिसाद लिहित आहे.
'सखारम .. ' हे नाटक मला समाजातल्या समस्येबाबत प्रातिनिधीक वगैरे वाटत नाही. ते माणसाच्या मनोव्यापारावर प्रकाश टाकणारे, त्याचे सखोल वर्णन करणारे आहे असे मला वाटले.
समाजातल्या एखाद्या समस्येबद्दल उहापोह करणारे, जागृती आणण्यास मदत करणारे असे नाटक मला प्रातिनिधिक, रूढार्थाने 'सामाजिक' वाटते. तसे पाहिले तर लेखक जे लिहितो ते बहुतांश सर्वच सामाजीक असते कारण तो समाजातच असतो. पण प्रत्येक लेखन समाजाचे प्रतिबिंब पाडून काही शिकवण देणारे नसते त्यामुळे ते सामाजिक या सदरात घालावे असे मला वाटत नाही.
नाटकताला सखाराम विकृत आहे असे वाटेल पण तो त्याचा व्यक्तीविशेष आहे. तेंडुलकरांना तो तसा मांडावा असे वाटल्याने तो तसा असेल. एक कथा या पलीकडे मला ते नाटक फार खोलवरचा सामाजिक आशाय कवेत घेणारे वाटले नाही. याचा अर्थ ते उथळ वाटले असा खचितच नाही. माणसाच्या मनोरचनेचे चित्रण करणारे, अधिकार, अगतीकता, व्यवहार या काही बाबींबाबत माणसे कसे वागू शकतात याचे चित्रण करणारे नाटक आहे.
नाटकातल्या अगतिक बाईचे मुंगळ्याशी आणि खिडकी बाहेरच्या कावळ्याशी असलेले संवाद हा मला त्या नाटकातला अतीशय उत्तम भाग वाटला. त्या स्थितीतल्या माणसाच्या मनोव्यवहाराचे उत्तम प्रकटीकरण तेंडूलकरांनी केले आहे असे मला वाटले. असे वेडगळ वाटणारे संवाद-प्रवेश चपखल बसवणे सोपे नाही असे मला वाटते.
-- लिखाळ.
पर्फेक्ट!!!
लिखाळशी पूर्ण सहमत. असेच काहीसे वाटत होते पण मांडता येत नव्हते.
बिपिन कार्यकर्ते
सखाराम बाईंडर
तेंडुलकरांची नाटके मी बघितलेली नाहीत. परंतु 'सखाराम बाईंडर' व 'शांतता..' ही आपलीमराठी वर उपलब्ध असल्याने कधीचे ही नाटके बघायची असे ठरवत होतो. कालच खास चर्चेसाठी हे नाटक बघितले. 'शांतता..' ही लवकरच बघेन.
लिखाळ यांनी म्हटल्याप्रमाणे हे नाटक सामाजिक समस्येचे प्रतिनिधीत्व करत नाही असेच मला वाटले. परंतु त्या काळात असलेल्या स्त्री-पुरुष संबंधानुसार एका कथेची (आउट ऑफ वे)मांडणी केली आहे. (आउट ऑफ वे अशासाठी, की आपल्यासारख्या मध्यमवर्गीय माणसांना, 'असे कधी घडत असु शकेल का' असे वाटत रहावे, व त्याचबरोबर घडत असेल तर त्यातला भयंकरपणा जाणवावा.)
मला हे नाटक आवडले. इथे प्रत्येक कॅरॅक्टर परिस्थितीनुसार कसे वागेल याचा सुक्ष्म विचार केला आहे. उदा. लहानपणापासुन अत्याचार होत असलेली चंपी परपुरुषासमोर लुगडे बदलायला लाजत नाही. तसेच चंपीने केर काढलेला असताना लक्ष्मी उरलेला कचरा बाहेर टाकुन देते यात चंपी व लक्ष्मी मधला फरक स्पष्ट दिसतो.
माणुस म्हणजे वासनेचे आगार हे सखारामाचे तत्वज्ञान आहे. त्यात नवरे लोक म्हणजे हरामखोर वगैरे असे त्याला वाटते. म्हणुन लग्न न करता स्वतःच्या इच्छा पुरवण्यासाठी त्याने हा मार्ग शोधला आहे. त्यामधे लक्ष्मी व चंपी ही कॅरॅक्टर्स सापडतात. शेवटी प्रत्येकाला आपला स्वार्थ जपायचा असतो. लक्ष्मी व चंपी हे परिस्थितीचे बळी असुनसुद्धा एकमेकांविरुध्दच वागतात. आणि यानुसारच कथा घडते.
सुदैवाने उथळ / अभिरुचीहीन कथा / नाटक / चित्रपटांमधे कथेचा इतका बारिकसारिक विचार केला जात नाही. त्यामुळे हे नाटक मला अजिबात उथळ वाटत नाही. हे माझे तिसर्या प्रश्नाचे उत्तर आहे. ('असे-होऊ-शकते-विश्वासास अपात्र' असल्यामुळे उथळ ठरवायचे झाले तर मॅट्रीक्स चित्रपट सुद्धा उथळ म्हटला पाहीजे, पण तसा तो अजिबात नाही हे सर्वांनाच ठाउक आहे)
- सूर्य.
विवाहव्यापारावर प्रकाश
नाटक पाह्ताना वेळोवेळी वर धनंजय यांनी नाटकाच्या सामाजिकतेविषयी जे मुद्दे मांडले आहेत त्याची प्रचिती येते. सखारामचे संवाद वेळोवेळी समकालीन समाजातील विवाहव्यवस्थेतील स्त्री व पुरूष यांच्यात असलेल्या विषम कराराची आठवण करून देतात.
नाटकाकडे कल्पकता बाजूला ठेऊन पाहिले तर काय लक्षात येते? परित्यक्ता स्त्रीयांचे सशक्त जीवन जगण्याचे मार्ग कुंठीत झाल्याने त्या सखारामचे शोषण पत्करण्यास तयार होतात. चंपा सोडून सर्व महिला परित्यक्ता आहेत. परित्यक्ता महिलांना समाजात पर्याय नाही ही सामाजिक समस्या नाटकात अधोरेखित होत आहे. पण नाटककाराने कुठल्या एका समस्येवर लक्ष केंद्रित केले आहे हे ठामपणाने सांगणे कठीण आहे.
नाटकातली पात्रे ही स्त्री-पुरुष शोषणक्रियेची प्रतीके -१
वर काही प्रतिसादक म्हणतात, की सखारामाचे पात्र एक विकृत एकुलता-एक व्यक्ती आहे, त्याला काहीच सामाजिक संदर्भ नाही. मी येथे त्याविषयी उलट मत सांगणार आहे:
स्त्रियांची पुरुषाकडून रोजची मारहाण आणि नकोसा लैंगिक उपभोग एक सामाजिक समस्या आहे
सखाराम बाइंडर हे नाटक स्त्री-पुरुष शोषण संबंधाच्या बाबतीत आहे. त्यातल्या काही बायका परित्यक्ता असतील, पण काही बाबतीत त्या सखारामाच्या पत्नीसुद्धा आहेत. लक्षुमीच्या आदलीला सखाराम मरेपर्यंत शुश्रुषा करून अग्नी देतो. लक्षुमी सखारामाच्या नावाने आपणहून काळी पोत बांधते.
रोटी-कपडा-मकान पुरुषाने पुरवायचे त्याच्या बदल्यात घरकाम-संभोग हे स्त्रीने पुरवायचे हा रोखठोक सौदा मानणारी समाजव्यवस्था एक शोषणव्यवस्था आहे. यात बिनलग्नाचा रखेली-करार हा टोकाचा उघडा-नागडा प्रकार आहे - हे बिनलग्नाचे कथानक निवडल्यामुळे नाटककाराला या शोषित-शोषक मनोवृत्तीचा जवळजवळ "अर्थशास्त्रीय-मानसशास्त्रीय" विचार करता आला आहे.
पण काही प्रमाणात "शोषणव्यवस्था" ही चौकट व्यवहारी लग्नबाजारातही लागू आहे. हुंड्याची देवाणघेवाण, पैशाबाबत छळ कमीअधिक प्रमाणात होताना आपण ऐकतो. बायकांना जाळण्याचे गुन्हे भारतात शेकडोनी घडतात. बायकोला कोंडणे, उपास घडवणे, हाणमार करणे हे प्रकार स्टोजवळ जाळण्यापेक्षा अधिक घडत असणार. लग्नाच्या नसलेल्या रखेली भारतात काही प्रमाणात असतात. वेश्या असतात. या सर्वांना छपरा-जेवणासाठी हाणमार आणि लैंगिक छळ सहन करावा लागतो. जर हुंडाबळी ही सामाजिक समस्या आहे, तर बायकांची घरच्या पुरुषाकडून हाणमार ही खचितच एक सामाजिक समस्या आहे.
मारहाण झालेल्या स्त्रीबद्दल सभ्य समाजाचे गुळमुळीत मत आहे, म्हणून मी दोन प्रमाणे देतो. एक आमच्या मध्यमवर्गीय कुटुंबातले आहे - या बाईला मी निनावी ठेऊन येथे "रमाताई" म्हणतो. रमाताईचा नवरा तिला मारहाण करत असे. तिला एक मूल झाले - म्हणजे लैंगिक संबंध होता. रमाताई काही वर्षांनी पळून घरी आली. तिचा नवरा धक्काबुक्क्या मारत तिला परत न्यायला आला, तसे तिच्या आईवडलांनी तिला रक्षण दिले. कित्येक वर्षे खूप प्रयत्न करून तिला घटस्फोट मिळवून दिला. हे चांगले आईवदाईल होत. पण ओळखीच्या लोकांत "मुलीला नांदायचा सल्ला द्यायला हवा होता. काही झाले तरी नवरा आहे" वगैरे, टीका ऐकू आली (लक्षुमी चंपीबद्दल वेगळे काय म्हणते?). म्हणजे या सभ्य लोकांना मारहाण करणार्या नवर्याचे हक्क मारल्या गेलेल्या स्त्रीच्या हक्काशी तुलायची बुद्धी होत होती. स्वतः मारहाण न करणार्या लोकांमध्ये सुद्धा हा जो मारहाणीबद्दल बधीरपणा आहे, खचितच ही एक सामाजिक समस्या आहे.
दुसरे प्रमाण आहे भारतातील दंडसंहिता. इ.स. २००६ पर्यंत पुरुषाला पत्नीचा भोग घेण्यासाठी तिची अनुमती कायद्याने आवश्यक नव्हती. इ.स. २००२ मध्ये या कायद्याचा मसुदा संसदेसमोर आला, त्यात "सारखासारखा बळजबरी करत असेल हे सिद्ध केले तरच गुन्हा" असे होते. आपल्या समाजाला स्त्रीच्या लैंगिक संबंधासाठी अनुमतीची कितपत किंमत आहे, हे यावरून दिसते. छत्र दिल्यामुळे अंगावर हक्क मिळतो (अनुमतीची गरज नाही) असे गृहीतक समाजमानसात खोल रुजले आहे. बहुतेक घरांत बळजबरी होत नाही, तरी जिथे बळजबरी होते त्याबद्दल कायदाही मऊ करणारे समाजमानस ही एक समस्याच आहे.
पत्नींची ही अवस्था तर रखेली आणि वेश्यांना कायद्याचे काहीच रक्षण नाही.
(तुलना करा : घराघरात हुंडाबळीही दिला जात नाही. पण जी काही संख्या आहे तीसुद्धा भयंकर आहे, आणि बळी न दिलेल्या बायकांचा छळ बघून बहुसंख्य समाज "सहन कर" म्हणतो, ते भयंकर आहे. एका बायको-जाळणार्या विकृत सासू-नवर्याचे चित्रण केले, तरी हुंडाबळी ही सामाजिक समस्या होते.)
घराघरात बायकांना मारहाण होत नाही, राबवले जात नाही, आणि बळजबरी होत नाही हे खरे. पण बर्याच प्रमाणात या गोष्टी घडतात. अशा बायकांच्या दु:खाबद्दल बहुसंख्य समाज उदासीन आहे - चुकचुक करून मग दुर्लक्ष करतो, हे भयंकर आहे. एका सखारामचे चित्रण केले, तरी हा शोषित-शोषक संबध सामाजिक समस्याच आहे.
नाटकातली पात्रे ही स्त्री-पुरुष शोषणक्रियेची प्रतीके -२
सखाराम बाइंडरमधली पात्रे "असे मनुष्य खरोखर असू शकतात" या कसोटीला उतरतात. त्यांना व्यक्तिमत्त्वे आहेत, म्हणून त्या भरीव त्रिमिती व्यक्ती आहेत. केवळ व्यंगचित्रांसारखी एक-द्विमिती रेखाटने नाहीत.
तरीसुद्धा एखादे नाटक दुसर्या एका पातळीवर अर्थपूर्ण असते - ते म्हणजे "ऍलेगोरी" या अर्थाने. म्हणजे भावना किंवा प्रवृत्ती पात्रात मूर्तिमंत असतात. उदाहरणार्थ कर्ण-इंद्राची कथा घेतली तर कर्ण म्हणजे मूर्तिमंत दानशूरपणा, आणि इंद्र म्हणजे मूर्तिमंत लबाडी. इंद्राची लबाडी कर्णाला कळली तरी त्याने कवच-कुंडले दान केलीत. कर्ण आणि इंद्र यांचे स्वभावविशेष उत्तम चितारलेले असले, तरी त्या कथेची अशीही एक पातळी आहे : मूर्तिमंत लबाडी ओळखू आली, तरी धोका पत्करूनही मूर्तिमंत दानशूरपणा दानत कायम ठेवतो.
(हे फक्त उदाहरण म्हणून दिलेले आहे.)
वर मी म्हटले आहे की सखाराम बाइंडर नाटक या पाच पात्रांची व्यक्तिचित्रण असले, तरी स्त्री-पुरुष यांच्यामधील शोषित-शोषक संबंधाचे प्रातिनिधिक नाट्यही आहे.
सखाराम - स्त्रीचे शोषण "रोखठोक"पणे करणारी प्रवृत्ती. कामधंदा करून पैसे मिळवून घर चालू ठेवण्याइतका कर्तबगार पुरुष. या प्रवृत्तीला पुरुषाचा घरावर हक्क काय, "बायकोसारखे राहायचे" म्हणजे नेमके काय याबद्दल स्पष्ट आणि ठाम कल्पना असतात. घरकाम करायचे, शरीरसंबंध द्यायचा. बदल्यात वर्षाला दोन लुगडी, अन्न मिळणार, पुरुषाच्या वाटेत येणार नाही ते स्वातंत्र्य - स्वतःहून चहा करून प्यायचा, वगैरे. ही प्रवृत्ती पूर्णपणे निष्प्रेम नाही. आदल्या बायकोला मिरजेच्या हॉस्पिटलात नेले होते. तिचे पिंडदान केले होते. लक्षुमी घरातून गेली तेव्हा सखाराम थोडासा हळहळला (असे तो दाऊदला सांगतो). बाईचे मन राखण्यासाठी थोडीशी सकाळची पूजाअर्चा करेल. पण बाई फार उलट उत्तरे देऊ लागली तर घराबाहेर काढील.
चंपीचा नवरा (पोलीस शिपाई) : स्त्रीचे शोषण करणार, पण कर्तबगार नाही अशी पुरुषी प्रवृत्ती. स्त्रीवरती जमेल तेव्हा हक्काने अत्याचार करणारा. पण बेकार असल्यामुळे स्त्रीवर अवलंबूनही असणारा. नालायक असल्यामुळे ही प्रवृत्ती बाईने इंगा दाखवल्यावर लाचार होते. ही प्रवृत्तीसुद्धा निष्प्रेम नाही. याला चंपी खरोखरच हवीहवीशी असते.
दाऊद : स्वतः हिंसा न करणारा बाहेरचा समाज. सखारामला बायका मिळतात त्याबद्दल थोडासा मत्सर वाटणारा. तसा मनाने चांगला. अधूनमधून सखारामला हिंसेपासून परावृत्त करणारा. पण सखाराम "चालता हो - हे माझे घर आहे" म्हणतो, तेव्हा गुमान चालता होणारा.
स्त्रीपात्रे :
शोषणाला प्रतिक्रिया ही दोन टोकाच्या पद्धतींची दाखवली आहे. एक टोकाची स्त्री ती व्यवस्था मनापासून मानून घेते, दुसर्या टोकाची स्त्री जमेल तितके बंड करते. घराबाहेर पडायचे स्वातंत्र्य समाजात नसले, तर घरकाम-संग देऊनही काहीतरी अस्तित्व राखण्याच्या दोन पद्धती.
लक्षुमी :
बाईचे घरात काय स्थान आहे, याबाबत सखारामाचे मत पूर्णपणे मान्य करते. सखारामाशी शारिरिक प्रेम नाही. "पुतण्याकडे जाईन" ही धमकी पोकळ असते, हे आधीच ठाऊक असलेली. अगतिक. निष्प्रेम नाही : देव, डोंगळा, कावळा यांच्याशी एकतर्फा संवाद करणारी. पुरुषाचा हक्क दैवी आहे अशी श्रद्धा. सखारामावर मालक म्हणून भक्ती आहे - त्याला सोयरसुतक नाही, तरी त्याच्या नावाने काळी पोत बांधते. तिचे बारीकसारीक बंड (पुतण्याकडे जाण्याचे) कोसळते, तेव्हा सखारामाबद्दल भक्ती पराकोटीला पोचते. चंपीचे स्वातंत्र्य हवे असणे, सखारामाकडून बरा सौदा मिळवणे, हे तिला पटत नाही. चंपीने नालायक नवरा सोडला, हा चंपीचा दोष मानते. (आमच्या कुटुंबातल्या "रमाताईं"नी घटस्फोट घेतला, मारहाण होत असली तरी ऍडजस्ट करून घेतले नाही, हा आमच्या "रमाताईं"चा दोष आहे मानणार्या बायका आहेत, तशी ही लक्षुमी.)
लक्षुमीचे वर्तन मारहाण सहन करणार्या बायकांमध्ये खूप दिसते. अशा कित्येक बायका वर्षानुवर्षे आपली चूक आहे, म्हणून आपल्याला मारहाण होते असे समजून घेतात. हा बहुधा "स्टॉकहोम सिंड्रोम"चा प्रकार आहे - ओलीस ठेवलेले लोक काही काळाने समजू लागतात की आपल्याला डांबून ठेवणार्या लोकांचेच बरोबर आहे.
चंपी :
अगतिकपणातही त्यातल्या त्यात बरा सौदा मिळवायचा प्रयत्न करणारी प्रवृत्ती. जमेल तितके स्वातंत्र्य मिळवायचा प्रयत्न करते. आधीचा हवालदार नवरा नको असून भोग घेत होता, पण अन्न-वस्त्र-निवारा देत नव्हता, तर तो सौदा तिला मान्य नव्हता. सखारामाबरोबर त्यातल्या त्यात ठीकठाक सौदा मिळवायचा प्रयत्न करते. (लक्षुमी कर्तव्यबुद्धीने सखारामाला अंग देते) तशी चंपी सुखासुखी अंग देत नाही. दारूने बेशुद्ध पडून मगच अंग सखारामाला देते. अगतिक झाली म्हणून सखारामाचा हक्क मनातून मान्य क्रत नाही. (लक्षुमी मात्र सखारामाचा हक्क मनातून मान्य करते.) चंपी सुद्धा निष्प्रेम नाही. पण सखाराम आणि नालायक शिपाई नवरा यांना तिने वरलेलेच नाही. (सखारामाशी एकनिष्ठतेच्या नादात लक्षुमी फक्त काल्पनिक मुंगळा-कावळा यांच्याशीच दोस्ती करते.) क्रूर नसलेला, छप्पर-अंग व्यवहार नसलेला, असा प्रेमसंबंध शोधत चंपी दाऊदकडे जाते. (आता दाऊद लायक आहे की नाही, हे सांगता येत नाही. तिथेही चंपी फसली की नाही हे आपल्याला ठाऊक नाही. दाऊद हे कामाला न लावणार्या पुरुषाचे प्रतीक आहे. "तसा मनाने चांगला, अहिंसक, समाजाचा घटक" याअधिक दाऊदचे स्वभाववर्णन नाटकात दिसत नाही.)
प्रतीकात्मक कथानक :
नाटकाचा पूर्वार्ध म्हणजे पूर्वीच्या समाजपद्धतीचे वर्णन. घराबाहेर आपल्याला स्थान नाही, म्हणून दासी-स्त्रीत्व (लक्षुमी) वाटेल ते करते. तिच्यावर खरा स्नेह करणारे म्हणजे काल्पनिक लोक (डोंगळा आणि कावळा). मालक-पुरुष (सखाराम) तिच्या मनासारख्या बारीकसारीक गोष्टी करतो (रोज देवाला गंधफूल वाहू लागतो). त्यातच तिला हक्क असल्याचा आभास होतो. ती थोडेसे बंड करते, पण ते तिच्यावरच उलटते. घराबाहेर तिला काही स्थान नाही हे सिद्ध होते.
नाटकाच्या उत्तरार्धात प्रथम स्वातंत्र्याची कुणकुण लागलेली स्त्री (चंपी) रोखठोक पुरुषाशी (सखारामशी) चक्क आपल्या बाजूने सौदा करायचा प्रयत्न करते. थोडाफार बरा सौदा मिळतो, पण तितका चांगला नाही. तिला जो काही अर्धामुर्धा अधिकार आहे, तेवढा वापरून ती दासी-स्त्रियांचे भले करते (लक्षुमीला घरी ठेवून घेते.) पण दासी-स्त्रीने पुरुषाला आधीचा सौदा दिला, तर आपल्याला मिळालेला थोडाफार-सौदा हिरावला जाईल, याची तिला थोडी कल्पना असते. दासी-स्त्री शोषक-पुरुषाला इतकी वाहिलेली असते, की ती स्वातंत्र्य-इच्छिणार्या स्त्रीचा मनोमन द्वेष करू लागते. पुरुषाला तिच्या दास्यापेक्षा थोडासा कणा असलेली स्त्री अधिक उत्साहवर्धक वाटते, याचा तिला हेवा वाटतो. तिने पुरुषाचा हक्क इतका दैवी मानला आहे, की तिला ठोकशाही-पुरुषाचे वर्तन पापी म्हणून दिसत नाही, पण स्वतंत्र-स्त्रीचे वर्तन मात्र पापी दिसते. स्वतंत्र-स्त्री सुद्धा आपल्या काबूत आहे, असे रोखठोक-पुरुषाला वाटते - त्याचा अनाठायी आत्मविश्वास-गर्व खूपच असतो. दासी-स्त्री रोखठोक-पुरुषाला सप्रमाण सिद्ध करून दाखवते, की स्वतंत्र-स्त्री त्याच्या कह्यात राहाणारी नाही. तो क्रोधाने स्वतंत्र-स्त्रीला जिवे मारतो. दासी-स्त्री त्या स्वातंत्र्याला गाडण्यास सिद्ध होते.
या शोकांतिकेत आशेचा किरण हा - रोखठोक पुरुषाला स्वतंत्र स्त्री ही अधिक आवडते, आणि स्वातंत्र्याचा खून पाडल्यावर त्याला स्वतःबद्दल घृणा वाटते.
हा आशेचा किरण आहे, म्हणून नाटक नकारात्मक नाही. थोड्याच फरकाने ही कथा घडली, तर दासी-स्त्री यशस्वी न होता ठोकशाही पुरुष स्वतंत्र स्त्रीशी रमू लागेल. बदलेल ही शक्यता ध्वनित होते. हा सखाराम, ही चंपी, हा शोकांत आहे, हे खरे. पण जग थोडेथोडे बदलले तर असा शोकांत होणार नाही.
प्रतीकात्मक सारांश मला असा काही जाणवतो :
समाजातील शोषक-पुरुष दासीवृत्तीची शोषित स्त्री मिळाली की ढोपरानी खणतात. घे-घे घेतात. पण शोषक-पुरुषांशी स्वतंत्रपणे सौदा करणारी स्त्री त्यांच्यावर काही थोडा अंकुश आणू शकते, ही प्रगती होय. पण दासीवृत्तीच्या स्त्रिया आपल्या गुलामगिरीला देवाने दिलेले पुण्य मानतात. आणि स्वतंत्र स्त्रियांना पापी मानून त्यांचा विरोध करतात. जमल्यास त्यांचा नायनाट करतात.
- - -
रूप कंवर सतीच्या वेळेला सती प्रथेच्या बाजूने कित्येक राजपूत बायकांनी आंदोलन केले. (या सर्व लक्षुम्या.) अमेरिकेत स्त्रीसंरक्षण कायद्यांविरुद्ध कित्येक बायका हे-धर्मविरोधी-आहे म्हणून आंदोलन करतात. (या सर्व लक्षुम्या.)
"लक्षुमी"प्रवृत्तीची सौम्य आवृत्ती केवळ टोकाच्या विकृत व्यक्तींमध्ये दिसत नाही, तर समाजातल्या मध्य-स्तरातही दिसते.
वर दिलीप बिरुटे यांनी निरीक्षण सांगितले आहे, की नाटककाराने लक्षुमीच्या श्रद्धेची टिंगल केली आहे. त्यांच्या निरीक्षणाशी मी सहमत आहे - नाटककाराने अशी टिंगल केली आहे. बिरुटे सर याला नाटककाराचा दोष मानतात. बहुधा नाटककाराने सर्वच प्रकारच्या श्रद्धेची टिंगल केली आहे असे बिरुटे सरांना वाटले असेल. असे असल्यास त्या मताशी मी असहमत आहे. दाऊद-सखाराम मिळून करणार्या गणेश-आरतीला नाटककाराचे समर्थन आहे. फक्त लक्षुमीच्या संकुचित श्रद्धेचीच टिंगल केली आहे. स्वतःचे दास्य स्वतःला पटवून देण्यासाठी लक्षुमीने मानलेला देव हा खोटा आहे, आणि ती श्रद्धा धिक्कार करण्यासारखीच आहे.
लक्षुमीचा खोटा देव आश्चर्यकारक ठिकाणी घुसखोरी करतो. माझी आई एक आदरणीय स्त्री आहे. कर्तबगार आहे. प्रेमळ आहे. मुली-बायकांबद्दल समानता हवी असे म्हणणारी आहे. या अशा माझ्या आईने मला लहानपणी "अबला यत्र सबला..." हा श्लोक सुभाषित म्हणून शिकवला! "स्त्री सबळ असते ... तिथे शहाण्याने राहू नये" असा काही त्या श्लोकाचा अर्थ आहे. हे एक नीच ऐतिहासिक लांछन आहे, सुभाषित नव्हे, हे मला तिथेच शिकवायला ती क्षणभर विसरली. संस्कृत ही "देवाची" भाषा, म्हणून त्याला "सुभाषित" म्हणायचे. त्या क्षणी तिच्या-माझ्यावर लक्षुमीच्या कोत्या खोट्या देवाचे भूत स्वार झाले होते.
वगळलेले पात्र
समाजही नाटकात एक पात्र असल्यासारखे वाटते का?
दाऊद
दाऊद या पात्रातून बाहेरचा समाज या शोषित-शोषक संबंधात डोकावतो. अशा सखारामांबद्दल त्याला थोडासा हेवायुक्त आदर आहे. पण स्वतः समाज इतकी हिंसा राजरोसपणे करत नाही. जमल्यास सखारामाला हिंसेपासून परावृत्त करायचा थोडाफार प्रयत्न करतो. पण सखारामाचा हक्क मूलभूत म्हणून दाऊदला मान्य आहे. सखाराम त्याला घरातून घालवतो, तेव्हा दाऊद चालता होतो.
अशा रीतीने समाज हे पात्र वगळलेले नाही.
शिवाय सर्व पात्रांकडून समाजाने त्यांना दिलेल्या वागणुकीबद्दल, समाजातील रीतिरिवाजांबद्दल टीकाटिप्पणी होते. पण ते त्या-त्या भूमिकेच्या दृष्टिकोनातून समाज कसा दिसतो ते वर्णन आहे. "पात्र" म्हणून समाजाला मूर्त करणे (ऍलेगोरी) नव्हे. बायकोला मारहाण करणार्या पुरुषाच्या दृष्टीने समाज लपूनछपून, किंवा कमी प्रमाणात त्याच्यासारखेच करतो. म्हणून समाज भेकड आहे आणि ढोंगीसुद्धा आहे. स्त्रीपात्रे दोघीही सांगतात की घराबाहेर पडल्या तर समाजात त्यांना जगायला जागा नाही. बाळपणी तिचे लग्न लावून देणार्या समाजाबद्दल चंपी क्रोध व्यक्त करते.