माझे नाडी ग्रंथ भविष्य लेखन कार्य भाग २

माझे नाडी ग्रंथ भविष्य लेखन कार्य
भाग २

‘तू ज्योतिषी नाहीस पण भविष्य कथनावर पुस्तक लिहिले आहेस’ इति – नाडी ग्रंथ महर्षी विश्वामित्र उर्फ कौशिक !

आधी लिहिल्याप्रमाणे नाडीभविष्यावर माझ्याहातून पुस्तके लिहिली जाणार असा उल्लेख नव्हता. पण काही काळाने तो का नव्हता याचा खुलासा कसा झाला त्याचा किस्सा. सर्वप्रथम प्रकाशित पुस्तकाच्या प्रती घेऊन मी विविध नाडी शास्त्रींना भेटत असे व त्यांना एक प्रत भेट देत असे. असाच एकदा वडपळणी भागातील डॉ. ओम उलगनाथन यांच्या ईरटै नाडी केंद्राला भेट द्यायला पोहोचलो. सोबत माझी बहीण जयश्री रानडेही होती. आम्ही नुकतेच जवळच्या सरवना नावाच्या प्रसिद्ध हॉटेलात जेवण करून केंद्राच्या बाहेर सोप्यात तेथे ठेवलेल्या टीव्हीवर चाललेली क्रिकेट मॅच पहात बसलो होतो. आत नाडी वाचन चालले होते, असे आत चालू एअरकंडिशनरच्या आवाजावरून कळत होते. त्याआधी अनेकदा ठरवूनही उलगनाथनजींची भेट होण्याचा योग आला नव्हता. दरवाजा अशा काचेचा होता की आत बसलेल्यांना बाहेरचे दिसावे. त्यामुळे आम्हाला थांबलेले पाहून दोनदा निरोप आले की आज भेटू शकत नाही परत केंव्हातरी यावे. मी तरीही तसाच बसून राहिलो. आज त्यांना भेटल्याशिवाय परतायचे नाही असा माझा निर्धार होता. तेवढ्यात बाहेरच्या भागात केळीच्या पानांची जेवणासाठी मांडामांड चालू झाली. तेंव्हा जेवणाला ते बाहेर येणारच असा माझा अंदाज होता. म्हणून मी क्रिकेट मॅच पाहात असल्याचा बहाणा करत थांबलो. बहीण माझ्या चेंगटपणाला वैतागली. तेवढ्यात ‘आत या’ असे बोलावणे आले. दरवाजा उघडून आत गेलो, तर तेथे ७-८ जण बसलेले होते. डॉ. ओम उलगनाथन मोठ्या टेबलाच्या मागे बसले होते. त्यांच्या घोगऱ्या तमिळ आवाजात बंबईया टाईप इंग्रजीत म्हणाले, ‘प्लीज गो. नो टाईम’. मी त्यांना म्हणालो, ‘आपल्याला पाहायची खूप इच्छा होती. म्हणून थांबलो होतो. बराय चलतो’. असे म्हणून मी परत जाण्याला दरवाजा उघडला. पण तो तसाच सोडून पाठ वळवून त्यांना म्हणालो, ‘आपण परवानगी दिलीत व या बसलेल्यांची हरकत नसेल तर चालू कथनाचा आनंद घेऊ इच्छितो’. त्यांची आपापसात चर्चा झाली. होकार मिळाला. खुर्च्यांची व्यवस्था झाली. आम्ही स्थानापन्न झालो. आमच्या येण्याने थांबलेले वाचन पुन्हा चालू झाले. ओम उलगनाथन पट्टीत पाहून एकदोन ओळी वाचत व नंतर त्याचे स्पष्टीकरण देत. असे एकदोनदा झाल्यावर सर्व जमलेले आमच्याकडे पाहून माना डोलावू लागले. एक दोघांनी तोंडाने ‘च्यक-च्यक’ आवाज काढले. ‘वा क्या बात है’ अशा अर्थाचे हातवारे झाले. आम्हाला काही कळेना. बसलेल्यांपैकी एकांनी इंग्रजीत सांगायला सुरवात केली की या नाडीचे महर्षी विश्वामित्र उर्फ कौशिक, नाडी वाचक उलगनाथनना उद्देशून म्हणताहेत की या दोन साक्षींची आम्ही वाट पहात होतो. आणि तू त्यांना परत जायला सांगत होतास? विचार त्याला की त्याचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास नाही तरी त्याने नाडी भविष्यावर पुस्तक लिहिले आहे की नाही ते? तो सेनेतील उच्च अधिकारी आहे. विचार खरे आहे की नाही ते? त्यानंतर तशी विचारणा झाली. त्यावर माझे हवाईदलातील व्हिजिटींग कार्ड उलगनाथन यांच्या हातात देत, मी भारतीय वायुसेनेतील विंग कमांडर पदावरील वरिष्ठ अधिकारी आहे असे सांगताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. माझ्याकडील मराठीतील नाडी भविष्य पुस्तकाची एक प्रत त्यांना सुपुर्त केली. मला ज्योतिष शास्त्रातील काहीही कळत नाही तरीही नाडी भविष्याच्या माझ्या अनुभवावर आधारित हे पुस्तक माझ्याकडून लिहिले गेले आहे. ती मी महर्षींची कृपाच मानतो असे म्हणालो. ‘काही वेळापुर्वी जेवणात हवे ते मिळाले की नाही’ असे मला विचारले गेले. मी ‘हो’ म्हटले. कारण सरवना हॉटेलात जेवताना पोळ्या मिळणार नाहीत म्हणून उद्धटपणे सांगितले गेले होते. त्यावरून मी स्टाफवर जरा गरम झालो होतो. या छोट्याशा गोष्टीचा अचुक उल्लेख ऐकून आत्ता-इथे महर्षींच्या उपस्थितीचा व सुक्ष्म निरीक्षणाचा पडताळा मिळाला. पुढे ती बैठक सलग ५ तास चालली होती. (त्या वेळच्या भविष्य कथनाचा किस्सा नंतरच्या पुस्तकात सविस्तर नमूद आहे) बाहेर वाढलेली पाने तशीच बराच वेळ पडली होती. वाचनात माझ्या हातून नाडी ग्रंथ भविष्यावर अनेक तऱ्हेने लेखनकार्य घडणार असल्याचे सूचित केले गेले. त्या शिवाय नाडी भविष्याला नावे ठेवणाऱ्यांना समर्पक उत्तरे दिली जातील. शिवाय सध्या नाडी कथनात निर्माण झालेले अपप्रयोग थांबवण्यासाठी ही माझा उपयोग भविष्यकाळात केला जाणार असल्याचे सूचित केले गेले. तथापि असे या नाडी ग्रंथ भविष्यावर तो लेखन करील असा पूर्व उल्लेख कुठल्याच महर्षींनी न करण्यामागे त्याला स्वाभाविकपणे या लेखनाला प्रवृत्त केले जावे असे म्हटले गेले. या निमित्ताने मला माझ्या भावी कार्याची दिशा कळली व पूर्वलिखित भविष्य कथनातील लेखनकार्याच्या टाळलेल्या उल्लेखामागचा उद्देश ही कळला.
सा. सह्याद्रीतील त्या एका लेखाने मला अनेकांच्या प्रतिक्रिया मिळाल्या. सर्वांचा सूर होता की या विषयावर आणखी लिहा असा होता. मलाही एका लेखाने समाधान न होता वाचकांना अनेक शंका-प्रश्न पडतील त्याचे निराकरण होणे आवश्यक आहे असे वाटून मी पुढे लिहित गेलो.

लेखनविषय: दुवे:

Comments

प्रश्न

आपला लेख वाचनीय आहे. माझा नाडीशास्त्रावर तीळमात्र विश्वास नाही पण तो मुद्दा गौण आहे. खालील वाक्य कळले नाही.

आत नाडी वाचन चालले होते, असे आत चालू एअरकंडिशनरच्या आवाजावरून कळत होते.

एअरकंडिशनरच्या आवाजावरून आत कोणीतरी बसलेले आहे हे कळते पण नाडी वाचन चालू आहे हे कसे कळले?

नवीनच

एअरकंडिशनरच्या आवाजावरून आत कोणीतरी बसलेले आहे हे कळते

अरेच्या हे मला माहित नव्हते. खोलीत कोणी असेल तर एअरकंडिशनचा आवाज वेगळा येतो का? असल्यास त्यामागे काय कारण आहे?

हा आवाज स्प्लीट एसी, एसी डक्ट वगैरे प्रकारातहि आढळतो का?

ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)

'कळते' ऐवजी 'कदाचित कळू शकेल'

अरेच्या हे मला माहित नव्हते

मलासूद्धा माहीत नाही. 'कळते' ऐवजी 'कदाचित कळू शकेल' असे वाचावे.

काही प्रस्तावना आणि माहिती

या लेखमालेच्या सुरुवातीला काही प्रस्तावना आणि माहिती देणे आवश्यक वाटते.

उदा. या संहितेबद्दल माहिती, हीच संहिता का?, लेखका बद्दल माहिती, लिखाणाचा कालावधी, आक्षेप, मतांतरे, आक्षेपांना उत्तरे इत्यादी. यामुळे वाचकाची मनोभूमीकाही तयार होते.
ज्यांना यात रस नाही ते आपोआपच दूर राहतील.

डॉ. ओम उलगनाथन हे कोण? यांचे नक्की कार्य काय? कुठे?
ईरटै नाडी केंद्र नक्की कुठे आहे?

आपला
गुंडोपंत

कर्णपिशाच्च ? ;)

लहानपणी ऐकल्याप्रमाणे -
"कर्णपिशाच्च" म्हणून काहीतरी असते आणि ते ज्योतिषाच्या कानात जातकाची किंवा उपस्थितांची इत्थंभूत माहिती सांगते.
विशेषतः कोकणात ही पिशाच्चे मोठ्या प्रमाणावर आढळतात.

वर वर्णन केलेला प्रकार - त्रयस्थ व्यक्तीच्या नाडीपट्टीत आगंतुकाची माहिती परभारेच उमटणे - हे असे कर्णपिशाच्च प्रकरण वाटते.

या प्रतिसादाकडे भयकथालेखिकांनी (<-सदरहू स्त्रीलिंगी उल्लेख केवळ समानतेच्या दृष्टीने :)) कथाबीज म्हणून आणि अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांनी (<- हे रूप स्त्री-पुरुष दोघांनाही चालेल ;)) सश्रद्धतेने पहावे ही नम्र विनंती.

लेखमाले संबंधी प्रस्तावना व अन्य उपयुक्त माहिती

प्रिय गुंडोपंत व अन्य वाचक हो,
आपण माझे लेखन वाचून प्रतिक्रिया पाठवता त्याबद्दल धन्यवाद. नाडी ग्रंथांवर माझे लिखाण झालेले आहे. ते ज्यांनी आधी वाचले आहे त्यांना नाडीवरील प्रस्तावनेची गरज नसावी. तथापि ज्यांना या विषयाची ओळख या लेखाने होत आहे त्यांना नक्कीच पुर्व कल्पना असणे गरजेचे आहे. ती काही काळाने सवडीने पुर्ण करीन.

कर्णपिशाच, संमोहनाचा प्रभाव आणि नाडी ग्रंथ

वाचकहो,
कर्णपिशाचा चा हा प्रकार असावा का किंवा संमोहनाचा प्रभाव असावा का यावर बरेच लेखन झाले आहे. ते तसे नाही हे त्याचे उत्तर आहे. ते कसे याचा सविस्तर वृतांत कर्णपिशाचासाठी नाडी ग्रंथ भविष्य आवृत्ती 4 व संमोहनाचा प्रभाव यासाठी आगामी आवृत्ती 5 मधील लेख वाचावेत.

 
^ वर