सूडबुद्धि

सूडबुद्धि चांगली की वाईट असं कोणालाही विचारलं तर बहुतेकजण सूडबुद्धि वाईट असंच सांगतील. मात्र प्रत्यक्षांत सूडबुद्धीला आपल्या मनात थारा न देणारे कितीजण आढळतील याबद्दल शंकाच आहे.

कुणी आपल्याला त्रास दिला किंवा आपलं काही वाईट केलं आणि तो अन्याय असला तरी पुष्कळदा आपल्याला ती गोष्ट सहन करावी लागते. तिथल्या तिथे त्याचा प्रतिकार करणं शक्य होत नाही. अशा वेळी आपण नंतर हिशोब करू असा विचार करतो. त्याला इतर लोक सूडबुद्धि म्हणतात. आपलं अहित करणार्‍याला आपल्यासारखाच त्रास व्हावा असा आपण प्रयत्न करतो. त्याला सूडबुद्धीनी वागणं म्हणतात. आपलं अहित करणार्‍याला दुसरीकडून त्रास झाला की आपल्याला न्याय मिळाल्याचा आनंद होतो.

माझ्या ओळखीचे एक उच्चपदस्थ अधिकारी आहेत. अतिशय मनमोकळे व सुस्वभावी. एकदा गप्पांच्या ओघांत ते म्हणाले, "माझे पूर्वींचे निवृत्त झालेले साहेब त्यांच्या सुनेची मी बदली करू नये म्हणून मला भेटायला येतात आणि माझ्या समोरच्या खुर्चीत बसून आर्जवं करतात तेव्हा मला खूप बरं वाटतं". या त्यांच्या साहेबांनी त्यांना त्यांचे वरिष्ठ असताना फार त्रास दिला होता.

स्मरणशक्तीचं वरदान (किंवा शाप?) असलेल्या माणसाच्या बाबतीत सूडबुद्धि अनैसर्गिक आहे असं म्हणता येणार नाही. इतिहासात व पुराणकाळात माणसं सूडबुद्धीनी वागल्याची अनेक उदाहरणं आहेत. त्यांतील काही व्यक्ती पूजनीय व आदरणीय समजल्या जातात. रणांगणावर रथाचं रुतलेलं चाक काढताना अर्जुनाला धर्मानी युद्ध कर असं सांगणार्‍या कर्णाला द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगी त्यानी काढलेल्या उद्गारांचा संदर्भ देऊन तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म असं विचारणारा श्रीकृष्ण आठवा. (गीतेतही त्यानी अर्जुनाला सूड घेऊ नकोस असा उपदेश केलेला नाही). महाभारत हा एक सूडाचा इतिहास आहे असं काहींचं मत आहे. पण कल्पना करा, पांडवांनी द्रौपदी वस्त्रहरणाचा सूड घेतला नसता तर काय झालं असतं? महाभारत दुर्योधनाच्या वंशजांनी लिहिलं असतं आणि त्यात द्रौपदी वस्त्रहरणाचं समर्थन केलं गेलं असतं. त्यातून परिस्थितीनी दास बनलेल्या पुरुषाच्या स्त्रीचं वस्त्रहरण करण्यास हरकत नाही असा संदेश पुढच्या पिढ्यांना मिळाला असता व आज तुरळकपणे होणारे वस्त्रहरणाचे प्रकार राजरोस झाले असते.

सूड घेण्याच्या नैसर्गिक इच्छेमुळे निंद्य वर्तणूक करू पाहणार्‍याला भविष्यात आपल्याला शिक्षा होईल की काय अशी भीति वाटत राहते व काही दुष्कृत्यं मुळातच नाहीशी होतात. एकानी गाय मारली म्हणून दुसर्‍यानी वासरू मारू नये असा उपदेश ज्यांची गाय मारली गेलेली नसते अशांकडून केला जातो. पण वासरू असणार्‍याला सूडाची भीति असेल तर गाय मारण्यापूर्वी तो दहा वेळा विचार करील.

आपल्यावर अन्याय झालाय् या भावनेतून निर्माण होणारी सूडाची आग शमवण्याचा एक सन्माननीय मार्ग आहे. आपल्यासारखाच अन्याय दुसर्‍या व्यक्तीवर होत असेल व ती व्यक्ती असहाय असेल तर तिला न्याय मिळवून देणं. या ठिकाणी आपण स्वत: गुंतलेलो नसल्यामुळे अलिप्तपणे विचार करून कृती करू शकतो. त्यात भावनेमुळे विचारप्रक्रियेत येणारा अडथळा नसल्यामुळे यशस्वी होऊन सूडाची आग शांत होण्याची शक्यता अधिक असते. शिवाय मोठेपणा मिळतो तो वेगळाच.

तात्पर्य? ....... कोणालाही सूडबुद्धीने न वागण्याचा उपदेश करू नये.

Comments

जालावरची सूडबुद्धी

या लेखाच्या अप्रतिम 'टायमिंग'चे कौतुक वाटते. प्रत्यक्ष जीवनात सूडबुद्धी किती अपरिहार्य आहे हे कळायचे असेल तर आंतरजालावर चालणारी सूडबुद्धीची कारस्थाने बघावीत. निव्वळ वैरभावना घेऊन व्यक्तीकेंद्रित टीका, जुने हिशेब चुकते करणे, वेगवेगळे कंपू स्थापन करणे ( व त्यात धन्यता मानणे) हे पाहिले की सूडभावनेचा स्वीकार केल्याशिवाय जालवावर अशक्य आहे असे वाटू लागते. आंतरजाल ही प्रत्यक्ष जीवनाचीच एक आभासी आवृत्ती असल्याने जे येथे खरे आहे , ते प्रत्यक्ष जीवनातही खरे असावे असे वाटू लागते.
सन्जोप राव

बापरे

बरीचशी विधाने सरसकट वाटली आणि पटली नाहीत.

सामान्यतः सुडाचा मूळ विरोध करण्याचे कारण आयुष्याचे ते एकच लक्ष्य होऊन जाते आणि ही गोष्ट इष्ट नसते. शिवाय प्रत्येकाच्या अपमानाच्या कल्पना वेगळ्या असल्याने मला जो अपमान वाटेल तो इतरांना वाटेलच असे नाही, जो इतरांना वाटेल तो मला वाटेलच असे नाही, यामुळे सुडाची भावना एखाद्याच्या मनात कधी आणि किती प्रमाणात तयार होईल माहिती नाही.


पण वासरू असणार्‍याला सूडाची भीति असेल तर गाय मारण्यापूर्वी तो दहा वेळा विचार करील.

कोणीही यावे टपली मारून जावे असे नसावे इतपत आपण सामर्थ्यवान असावे असे म्हणणे ठीक वाटते, पण येथे एका व्यक्तीने घेण्याच्या सुडापेक्षा शासन (सुव्यवस्था) असणे महत्त्वाचे आहे. ती असल्यास वासरू असणारा काळजी घेईल असे म्हणता येते.

स्मरणशक्तीचं वरदान (किंवा शाप?) असलेल्या माणसाच्या बाबतीत सूडबुद्धि अनैसर्गिक आहे असं म्हणता येणार नाही.
आपल्यावर झालेल्या अन्यायाची जाणीव असणे आणि ते पुन्हा होऊ नयेत म्हणून प्रयत्न करणे, अशा त्रास देणार्‍या व्यक्तीला तत्कालिन समाजमान्य अशा शासनयंत्रणेकरवी शासन देणे, ह्यापलिकडे स्वतःच्या हातात प्राप्त झालेल्या शक्तीचा वापर करून अशा व्यक्तीवर स्वतः सूड घेणे, किंवा दुसर्‍या कोणाकडून अशा व्यक्तीवर अन्याय झालेला पाहून सुडाचे समाधान मिळवणे हे आयुष्याची युद्धभूमी/वाळवंट करायचे असले तर ठीकच आहे. पण हल्लीच्या काळात बर्‍याच जणांना हे परवडणारे नाही. त्यापेक्षा अधिक करण्यासारख्या गोष्टी आजूबाजूला दिसत असतात, आपली शक्ती काही चांगल्या कामांमध्ये गुंतवावी.

आपल्यासारखाच अन्याय दुसर्‍या व्यक्तीवर होत असेल व ती व्यक्ती असहाय असेल तर तिला न्याय मिळवून देणं.

हे मी वर म्हटल्याप्रमाणेच आहे, शक्ती चांगल्या कामी गुंतवणे महत्त्वाचे आहे. पण ते करीत असतानाही अन्यायाच्या भावनेतून बाहेर पडणे/त्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. नाहीतर अनेक लोक आयुष्यभर बाळगलेल्या असल्या तीव्र भावनांमुळे स्वतःच्या पायावर धोंडे पाडून घेताना पाहिलेले आहेत.

विरंगुळा

असे वर्गीकरण बघितल्यामुळे नेमका प्रतिसाद काय द्यावा हे कळत नाही.

दंड कितपत प्रतिबंधक असतो, आधी दुखावलेल्याला कितपत मनःशांती देतो, त्याचे फायचे-तोटे... हे तसे गंभीर मुद्दे हाताळलेले दिसतात.

पण शेवट "सूड घ्यावा" (सूड न घेण्याबद्दल कोणालाही सांगू नये) अशा निष्कर्षाप्रत लेखक येतात, तो अतिशयोक्त टोकाचा आहे, की व्यंग्यपूर्ण आहे, की गंभीर आहे हे सांगता येत नाही.

"सूड घ्याच" असे सरळ अर्थाने म्हटले असेल, तर इतक्या थोडक्यात पटण्यासारखे नाही. "सूड घ्याच" हे जर व्यंग्यपूर्ण उलट अर्थाने म्हटले असेल, तर आदल्या परिच्छेदांतून तो निष्कर्ष निघत नाही. म्हणजे जर "संदर्भानुसार कधीकधी सूड घेणे हे योग्य धोरण असू शकते" असा मध्यममार्ग जर लेखकाला सांगायचा असेल, तर तसे स्पष्ट होत नाही.

पण शैली मजेदार आहे, आवडली.

तिसराच सूड घेतो.

व्वा ! लेख आवडला. दुखावल्याची भावना असल्यामुळे सूड घ्यावा वाटतो. कधी-कधी कारण नसतांना कोणाचा तरी सूड घ्यावा वाटतो. ( असे का वाटते कोणास ठाऊक )

>>आपल्यावर अन्याय झालाय् या भावनेतून निर्माण होणारी सूडाची आग शमवण्याचा एक सन्माननीय मार्ग आहे. आपल्यासारखाच अन्याय दुसर्‍या व्यक्तीवर होत असेल व ती व्यक्ती असहाय असेल तर तिला न्याय मिळवून देणं.

हम्म पटले. उदाहरण द्यायचे झाले तर दुसर्‍यांचे प्रतिसाद उडवले जाते, तेव्हा आम्ही खुदुखुदु हसतो. पण स्वतःवर प्रसंग आल्यावर सूड घेण्याची प्रवृत्ती उफाळून येते. तेव्हा दुसर्‍याला न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे थोडं पटायला लागले आहे.

उपक्रमवर डिलीट होणारे प्रतिसादांचे प्रमाण पाहता, टंकण्याचे सुद्धा कष्ट घ्यावे वाटत नाही

आवडले

हम्म पटले. उदाहरण द्यायचे झाले तर दुसर्‍यांचे प्रतिसाद उडवले जाते, तेव्हा आम्ही खुदुखुदु हसतो. पण स्वतःवर प्रसंग आल्यावर सूड घेण्याची प्रवृत्ती उफाळून येते. तेव्हा दुसर्‍याला न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे थोडं पटायला लागले आहे.

हे आवडले. पश्चात्ताप ही पापाचे परिमार्जन करण्याची पहिली पायरी आहे असे म्हटले आहे हे यासाठीच. ;)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

प्रतिशोध

कदाचित म्हणुनच सूड घेण्याला प्रतिशोध असा शब्द विद्वानांनी / बुद्धीदांडग्यांनी वापरला असावा. शोध- प्रतिशोधाचे चक्र चालूच असते.कुणी वाहक तर कुणी बळी. मला कधी कधी ते निसर्ग चक्रच वाटते
प्रकाश घाटपांडे

परतफेड आणि सूड घेणे

जशास तसे या न्यायाने एकाद्याकडून जशी वागणूक आपल्याला मिळाली तशीच वागणूक त्याला देणे हे समर्थनीय ठरू शकते. आपल्यालासुद्धा अशाच प्रकारे वागवले जाईल या भीतीने माणसाच्या वर्तनावर वचक राहू शकतो आणि ही चांगली गोष्ट आहे. पण सूड घेण्याच्या भरात आपण तिसर्‍याच व्यक्तीवर अन्याय केला तर ते कधीही समर्थनीय ठरत नाही. अतिरेक्यांच्या हिंसक कारवाया अशा प्रकारात मोडतात हे एक उदाहरण झाले.

 
^ वर