राजा की गद्दी (मडीकेरी)

गेल्या डिसेंबरात कर्नाटक राज्याच्या दक्षिणेकडील "मडीकेरी" या थंड हवेच्या ठिकाणी गेलो होतो. तिथे राजा की गद्दी / रॉयल टोंब या नावाच्या जुळ्या वास्तु पाहण्यात आल्या. मी आतापर्यंतच्या माझ्या प्रवासात (जो अत्यंत कमी आहे) येथे दिसलेले काहि तपशील याआधी कधीच पाहिले नव्हते. त्यामुळे त्या अनुशंगाने जे काहि प्रश्न डोक्यात आहेत त्यासंबंधी चर्चा करण्याचा हेतु इथे आहे.

सर्वप्रथम तिथे लिहिलेल्या सरकारी बोर्डावरील माहिती अशी
==========
रॉयल टोंबः
इंडो-सार्सेनिक पद्धतीने बांधलेल्या ह्या वास्तुला गद्दी अथवा टोंब् म्हणतात. कोडवा राजघराण्याने बांधलेल्या वास्तुपैकी काहि मोजक्या टिकलेल्या वास्तुपैकी हि एक वास्तु आहे. येथील मधील टोंब राजा दोड्डावीरराजेंद्र आणि त्याच्या राणीचा आहे. तर उजवीकडील टोंब राजा लिंगराजेंद्राच्या स्मृतीप्रित्यर्थ त्याचा पुत्र चिकवीरराजेंद्र यांने १८२० मधे बांधला आहे. इथे डावीकडे अजून एक वास्तु आहे ती राजाचा पुजारी रुद्रप्पाने १८३४ मधे बांधुन घेतली.

हे राजे आणि कोडगु जंगलातील व भोवतीची त्यांची प्रजा शिवभक्त असल्याने या वास्तुमधे शंकराची स्थापना केली आहे. मुख्य प्रवेशद्वारापाशी तसेच चारहि मिनारांवर शंकराचे वाहन नंदी याचा पाहरा आहे.
============
कोडवा लोकांबद्दल (इतिहास): [संदर्भ विकी]
१. दोड्डावीरराजेंद्र हा वीरपुरुष होता. हैदर अली आणि पुढे टिपु सुलतानाने कोडगु प्रांत बळकावला व या राजाला कैद केले. तेव्हा या राजाने कैदेतुन पळुन, पुन्हा टीपुशी लढून आपला प्रांत मुक्त केला.
उपकहाणी अशी की टीपुला हा प्रांत राखणे तसेहि जड होते. त्याची पाठ फिरते ना फिरते इथेली प्रजा टीपुच्या सैन्याला सळो का पळो करून सोडत असत. टिपुने मग हजारो जणांना श्रीरंगपट्टणमला नेऊन मुसलमान बनवणे चालु केले. भारतातील अनेक प्रांताप्रमाणे जेव्हा ही प्रजा माघारी आली तेव्हा हिंदु कोडवांनी त्यांना आपल्यात घेतले नाहि. ते कोडगु प्रांतातच राहिले मात्र् त्यांना कोडवा-मपिलि म्हणू लागले

२. याउलट त्याचा नातु चिक्कवीरराजेंद्र अतिशय निर्दयी राजा होता. आपल्या कोडवा प्रजेला त्यांने छळायला सुरवात केली. त्यानिमित्ताने इंग्रजांनी त्याला हाकलुन सत्ता ताब्यात घेतली

आता मला पडलेले प्रश्न

१. विकीवरील माहिती व्यतीरिक्त या कोडवा लोकांबद्दल काहि विषेश माहिती आहे का? इथे एक अख्खी वास्तु पुजार्‍याला बांधुन दिलेली दिसते. पुजार्‍यांना इतका मान देणारी प्रथा प्रथमच पाहिली.
२. इंडोसार्सेनिक मंदीरांची वैशिष्ट्ये काय? सार्सेनिक आणि इंडोसार्सेनिक मधे फरक काय?
३. इथे प्रत्येक वास्तुच्या प्रवेशद्वारावर हातात डमरु आणि त्रिशुळ घेतलेला मात्र पायाखाली भुजंग असलेला पुतळा आहे तो कोणाचा असेल?

४. येथील चित्रांमधे जे साधु कोरले आहेत त्यांना मुकुट दाखवले आहेत. (क्वचित मोत्याची माळ वगैरेही गळ्यात आहे). (अगदी कमंडलुधारी काठी घेतलेल्या साधुच्या डोक्यावरहि मुकुट आहे). भारतात साधु क्षत्रियांप्रमाणे मुकुट, आभुषणे वापरत असत का?

५. प्रत्येक खिडकीवर पुढील आकृती आहे. कोणाला कन्नड (अथवा कोडवा टिक्क?) येत असल्यास त्याचा अर्थ काय ते सांगु शकेल का? (का आपल्या "श्री" सारखे काहि आहे?)

६. पुढील चित्रांत दाखवलेला कोंबडासदृश प्राणी/पक्षी (मात्र तुरा नाहि, चेहरा घोड्यासारखा वाटतो, आणि झुपकेदार शेपुट आहे) ओळखता येतोय का? असल्यास तो नामशेष झाला आहे का? कारण हा पक्षी तिथे बर्‍याच ठिकाणी कोरलेला दिसला.

चित्रे भरदुपारी काढल्याने अतिप्रकाशात न्हाली आहेत.. क्षमस्व!

यानिमित्ताने काहि प्रमाणात टिपुसुलतानच्या वेळच्या मानी हिंदु राज्यांबद्दलहि वाचायला आवडेल.मात्र तो मुख्य चर्चाविषय नाहि

लेखनविषय: दुवे:

Comments

प्रश्न ५

मी आत्ताच कन्नड वाचू शकणार्‍या मित्राशी बोललो. त्याच्या माहितीप्रमाणे कोडवा लोकांची स्वतंत्र लिपी नाही आणि ते अक्षर कन्नडमधील वी किंवा पी सारखे दिसते.

प्र. ५.

प्र. ५.

तो कन्नडम् लिपीमध्ये ವಿ (वि) आहे.

कन्नडम् लिपीमध्ये पि 'ಪಿ' असा दिसतो. वरील चित्रातले अक्षर वरकरणी ಫಿ (फि) वाटू शकते, पण नीट पाहिल्यास ते फि नाही हे कळते.

कन्नडम् लिपीमध्ये ವಿ (वि) फॉर विरुपाक्ष.

हैयो हैयैयो!

दोडप्पा-चिकप्पा

ऋषीकेश, आणखी फोटो लाव. लेखही त्रोटक आहे. तू तेथे बरेच काही पाहिले असशील तेही लिही. या मंदिराचे आणखीही काही फोटो पाहिले होते त्यामुळे उत्सुकता वाढली आहे.

राजा दोड्डावीरराजेंद्र आणि त्याच्या राणीचा आहे. तर उजवीकडील टोंब राजा लिंगराजेंद्राच्या स्मृतीप्रित्यर्थ त्याचा पुत्र चिकवीरराजेंद्र यांने १८२० मधे बांधला आहे.

यातील दोड्ड आणि चिक यांचा अर्थ मोठा आणि लहान असा होतो. नात्यातील मोठे-लहानपणा दाखवण्यासाठी याचा वापर होतो. उदा. कर्नाटकात मोठ्या काकाला दोड्डप्पा काकीला दोड्डम्मा, लहान काकाला चिक्कप्पा आणि काकीला चिक्कम्मा म्हणतात.

आता काही माहिती दे. प्रतिसादांतून चर्चा करूया.

१. हा रॉयल टोम्ब प्रकार काय आहे? म्हणजे समाधीसदृश काही किंवा कसे?

२. तू दिलेल्या फोटोंवरून मंदिर इंडो-सार्सेनिक आहे किंवा कसे ते कळत नाही. मूळ मंदिराच्या इमारतीचे फोटो लाव. व्हीटी स्टेशनची इमारत इंडो-सार्सेनिक पद्धतीची आहे असे म्हणतात.

३. साधूंची जी चित्रे आहेत त्यातील डावीकडील चित्रात मला तो साधू असल्यासारखा वाटला नाही. त्याच्या अंगावर जानवे नाही. (त्याच्यामागे बाईही दाखवली आहे. ;-) हा राजा असावा काय?) उजवीकडील साधू असावा त्याच्या अंगात जानवे आहे पण डोक्यावर मुकुट आहे असे वाटले नाही पण हे जरा चित्र स्पष्ट न दिसल्याने होत असावे. जरा खुलासा कर.

सहावा फोटो व्यालाचा असावा. ते अनेक ठिकाणी का येते? रॉयल सिम्बॉल आहे किंवा कसे ते पाहायला हवे.

इंडो-सार्सेनिकबद्दल माहिती येथे मिळेलच. :-)

द. भारतात पुजार्‍यांना विशेष महत्त्व असते ही गोष्ट खरी आहे. एक उदाहरण द्यायचे झाले तर - आमच्या कुटुंबाचे मूळ गाव आहे तेथे त्यांच्या इस्टेटीवर एक देऊळ आहे. फारा वर्षांपूर्वी तिथे माझ्या सासर्‍यांचे वडिल स्वतः पूजा करत. नंतर कुटुंब वाढले, पांगले. आता त्या देवळाची खरी मालकी आणि त्या देवळाच्या आजूबाजूच्या थोड्या परिसराची , तेथील घर, मळा इ. ची मालकी, देवळाच्या पुजार्‍याकडे आहे. देवळात कोणताही उत्सव असेल तर जरी आमच्या कुटुंबांकडून (सध्या माझे काही दीर ते करतात) करवून घेतला जातो परंतु त्या उत्सवाचा अर्धा खर्च हे पुजारी आपल्या स्वतःच्या पैशांतून स्वखुशीने आणि आनंदाने करतात.

सध्या या मंदिराचा जीर्णोद्धार केला जात आहे. त्यासाठी संपूर्ण कुटुंबाने खर्च दिला. बांधकाम सुरू आहे. मे महिन्यात उत्सव आहे. मला वाटते द. भारतीय मंडळी जरा जास्तच धार्मिक असल्याने हे होते. यामागे, जो मंदिराची सेवा करतो, रक्षण करतो आणि आपल्या अपरोक्ष आपल्यासाठी प्रार्थना करतो त्याच्या प्रति आपण कृतज्ञ राहणे गरजेचे आहे अशी भावना असते. :-)

काहि माहिती

यातील दोड्ड आणि चिक यांचा अर्थ मोठा आणि लहान असा होतो. नात्यातील मोठे-लहानपणा दाखवण्यासाठी याचा वापर होतो. उदा. कर्नाटकात मोठ्या काकाला दोड्डप्पा काकीला दोड्डम्मा, लहान काकाला चिक्कप्पा आणि काकीला चिक्कम्मा म्हणतात.

इथे मात्र ते लहान मोठे भाऊ नसुन वडील -मुलगा आहेत

आता काही माहिती दे. प्रतिसादांतून चर्चा करूया.

१. हा रॉयल टोम्ब प्रकार काय आहे? म्हणजे समाधीसदृश काही किंवा कसे?

हे टोम्ब काहि वास्तुंचा गुच्छ (?) आहे. यात दोन शिवमंदीरे आहेत. तर एक पुजार्‍याने बांधलेले मंदीर आहे. बाकी दोन टिपू सुलतानाच्याबरोबर लढताना शहिद झालेल्या दोघांची स्मारके आहेत (स्मारके व पुजार्‍याच्या मंदीराचा फोटो नाहि)

२. तू दिलेल्या फोटोंवरून मंदिर इंडो-सार्सेनिक आहे किंवा कसे ते कळत नाही. मूळ मंदिराच्या इमारतीचे फोटो लाव. व्हीटी स्टेशनची इमारत इंडो-सार्सेनिक पद्धतीची आहे असे म्हणतात.

हा मंदीराचा फोटो.

गुगलून इंडो सार्सेनिक बर्‍याच इमारती मिळाल्या पण मग सार्सेनिक आणि इंडो-सारर्सेनिक मधे फरक काय राहिला ते कळेना. (बरं इंडियातील सार्सेनिक वास्तु म्हणावं तर या शैतीत जगभरात बांधलेल्या वास्तु येतात)

३. उजवीकडील साधू असावा त्याच्या अंगात जानवे आहे पण डोक्यावर मुकुट आहे असे वाटले नाही पण हे जरा चित्र स्पष्ट न दिसल्याने होत असावे. जरा खुलासा कर.

या चित्रात उजवीकडे साधु आहे हे नक्की. त्याच्या एका हातात कमंडलु आहे, दुसर्‍या हातात काठी. गळ्यात तीनपदरी जानवे आहे (हे तीनपदरी कसे तोहि प्रश्न आहेच). शिवाय गळ्यात मोत्याची माळ, डोक्यावर मुकुट (मुकुट पारंपारिक पद्धतीचा शंकाकृती नसुन बसका मोत्याने सजवलेला व वरून उघडा असा वाटतो. त्यातुन साधुच्या जटा बाहेर आल्या आहेत)

सहावा फोटो व्यालाचा असावा. ते अनेक ठिकाणी का येते? रॉयल सिम्बॉल आहे किंवा कसे ते पाहायला हवे.

घोडा आणि कोंबडा असलेला व्यालहि असतो हे बघुन गंमत वाटली. असो, असेनाका बापडा ;)

अजून एक. प्रश्न पाच मधे दिसणारी (श्री/वी/पी सदृश) आकृती/अक्षरे अगदी काहि किर्तीमुखांच्या मस्तकी देखील आरूढ आहेत:

काहि इतर फोटोज:

वेळ होईल तशी इतर ऐकीव माहिती देखील टंकेन.. तुर्तास घाईत आहे

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

गद्दी

चि.क्र.५
मला कानडी येत नाही. पण माझ्या एका मित्राचा अंदाज ते "श्री" असावे.
चि.क्र.६
हा स्टाईलाइज्ड् मोर वाटतो.
चि.क्र. ४
सर्वसाधारपणे ऋषी दाखवताना एका हातात पोथी असते. ती नाही व डोक्यावर जटामुकुट नाही. तेंव्हा साधू नसावा.
इन्डो सार्सेनिक
इमारती असतात. देवळे प्रथमच ऐकतो आहे. काश्मीरमधील देवळे गोथीक पद्धतीची आहेत, पण ते नंतर.

शरद

सखोल माहिती

ह्या विषयावरील सखोल माहितीसाठी सौ. कविता कल्याण ह्यांच्याशी संपर्क करावा. माझ्या कल्पनेप्रमाणे त्या नक्की आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात.

Kavitha Kalyan's
Email
Blog
Photo album
_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

सुरेख

उत्तम दुवा. धन्यवाद!

ऋषिकेश,

चर्चा चांगली आहे. माहिती विशेष नाही, पण वाचते आहे.

उत्तम

उत्तम चर्चा आणि प्रतिसाद. वाचन चालू आहे.
चित्रे छान आली आहेत की रे. मला तरी ओव्हरएक्सपोझर वाटत नाहिये.

----

इंडो-सार्सेनिक

सार्सेनिक (इस्लामी) वास्तुशिल्पात हिंदूंच्या देवतांची पूजा होत असल्यास त्याला इंडो-सार्सेनिक असे म्हटले जात असावे.(/ असावे काय?)
रायगडावरील शंभू महादेवाचे देऊळ (जगदीश्वर) याच पद्धतीचे आहे. दुरून पाहिल्यास ती मशीदच असावी असे भासते.-

पण देवळासमोर नंदी आणि आतमध्ये मारुती आणि शिवलिंग आहे -

असे नसावे.

सार्सेनिक (इस्लामी) वास्तुशिल्पात हिंदूंच्या देवतांची पूजा होत असल्यास त्याला इंडो-सार्सेनिक असे म्हटले जात असावे.(/ असावे काय?)

असे वाटत नाहि. कारण इथे दिलेल्या माहितीवरून हे बांधकाम देवळांबरोबर इतर अनेक इमारतींसाठी वापरले आहे. तेही केवळ भारतात नसून अगदी मलेशिया, इंग्लंड सगळीकडे दिसते.

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

इंडो-सारासेनिक नसून दख्खनी-इस्लामी शैली असावी

सुंदर चित्रे!

या देवळाच्या स्थापत्याची शैली दख्खनेतील भारतीय इस्लामी शैली आहे असे वाटते.
त्याचे वर्णन येथे सापडले (दुवा). पण दुव्यावरच्या उदाहरणात कुठलेच देऊळ नाही. तरी राजा की गद्दी, आणि विसुनाना यांनी दाखवलेले रायगडावरील देऊळ - दोन्ही त्याच शैलीतील वाटतात.

इंडो-सारासेनिक शैली ही भारतातील इंग्रजांची. यात कुठे सरळ "प्लेन" भिंत म्हणून दिसत नाही. दख्खनेतील इस्लामी शैलीमधील भिंती त्या मानाने "प्लेन" साधेपणाला मान देतात.

यात मला लक्षात आलेले वैशिष्ट्य म्हणजे १. घुमट २. मिनारांवर चढवलेल्या घुमट्या ३. ४-बाजूंची सिमेट्री, आणि चार कोपर्‍यातले मिनार ४. घुमटाभोवती कमळाच्या पाकळ्यांसारखी महिरप ५. बारीक-तपशील-नसलेल्या मोकळ्या भिंती

(हे केवळ निरीक्षण. पण याविषयी माझा काही अभ्यास नाही.)

रोचक!... मात्र...

तुमचे निरिक्षण रोचक आहे.
मात्र तिथे सरकारी बोर्डावर स्पष्टपणे इंडो-सार्सेनिक लिहिलेले आठवत होते. योगायोग असा की ट्रेक आलेल्या इतरांकडे फोटो आहेत का याची विचारणा केली होती आणि त्या बोर्डाचा फोटो आजच मिळाला आहे.

अश्याठिकाणी सरकारी बोर्ड काहितरी अभ्यासकरून / तज्ञाला विचारूनच लावले जात असावेत हे गृहितक आहे.

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

मात्र + मात्र (दुहेरी रोचक)

इंडो सॅरासेनिक शब्दाचे दोन अर्थ दिसतात.

(आता सुरुवातीलाच असे मान्य करूया की हा शब्द बराच जुना इंग्रजी शब्द आहे, त्यामुळे शब्द म्हणून तो प्राचीन भारतीय शब्द नाही.)

गूगलावर पूर्णपाठ्य असलेली पुस्तके शोधता या शब्दाचे दोन अर्थ सापडले.

१. हिंदू आणि मुसलमान शैलींचा संकर करून युरोपियन स्थापत्यकारांनी निर्माण केलेल्या इमारती
दुवा अ : अ बर्डस् आयव्ह्यू ऑफ पिक्चरेस्क इंडिया, लेखक - सर रिचर्ड टेंपल, [इंडियाचा अर्थमंत्री, बंगालचा लेफ्टनंट गव्हर्नर, मुंबईचा गव्हर्नर], १८९८, पान १८९
दुवा आ : इंडियन आर्किटेचर, लेखक - अर्नेस्ट बिन्फील्ड हॅवेल, १९१३, पान २३०
दुवा इ: कोलोनियलिझम अँड द ऑब्जेक्ट, लेखक - बॅरिंजर आणि फ्लिन, पान ५५, १९९८)

२. हिंदू आणि मुसलमान शैलींचा संकर होऊन निर्माण केलेल्या (मग त्या इंग्रजांच्या पूर्वीच्या का असेनात) अशा इमारती
दुवा अ : लॉर्ड कर्झन इन इंडिया, लेखक - लॉर्ड कर्झन, १९०६, पान १८८
दुवा आ : थिंग्स इंडियन, लेखक - विल्यम क्रुक, १९०६, पान ३३५

तर हा शब्द या दोन्ही अर्थांनी वापरलेला दिसतो. या दोन वापरांसाठी दोन शब्द हवेत असे मला वाटते. (कारण या दोन उपयुक्त आणि वेगवेगळ्या कल्पना आहेत.) त्यामुळे पूर्वीप्रमाणेच मी अर्थ-१ च्या संदर्भात "इंडो सॅरॅसेनिक" शब्द वापरत जाईन असे वाटते. पूर्वीच्या शैलीला हिंदुस्तानी-मुसलमान शैली, किंवा उत्तरेकडची हिंदू-मुगल शैली, किंवा दख्खनेची बाहमनी शैली अशी सुयोग्य वर्णनात्मक नावे वापरण्यास हरकत नाही.

अर्थात येथील स्थापत्यशास्त्र शिकलेल्यांनी सांगितले, की भारतातील कॉलेजात अमुक किंवा तमुक अर्थाने शब्द वापरतात, तर मी तो तसाच वापरेन.

ब्रह्मराक्षस आणि ओंकारेश्वर मंदिर

ऋषीकेश, मडिकेरीबद्दल वाचताना ओंकारेश्वर मंदिराचा उल्लेख सतत दिसला परंतु लेखात तसा स्पष्ट उल्लेख नाही. या ओंकारेश्वर मंदिरातही तुझे जाणे झाले होते का?

या मंदिराची आख्यायिका येथे सापडेल. वाचनीय आहे. :-)

दुसरे म्हणजे, या कोडवा राजांचे दफन होत असे का? म्हणजे येथे केवळ समाधी आहे की शरीर पुरलेले आहे? (दफन होत असेल तर असे कसे हा प्रश्न पडला.)

 
^ वर