वाचू आनंदे

वाचू आनंदे

जर आपल्या घरीं ८ ते १२ वयोगटातील मुले मुली असतील अथवा
आपण ६० पेक्षा जास्त वयोगटातील असाल अथवा
आपणाला वेळ आहे ( किंवा फ़ार नाही ) पण काय वाचावे याचा नक्की अंदाज नसेल तर ( थोडक्यात सर्व मराठी वाचकांसाठी )
आपल्या घरी आवष्यक अशी पुस्तके म्हणजे " वाचू आनंदे ".

सर्वश्री माधुरी पुरंदरे व नंदिता वागळे या दोघींनी संकलित केलेली ही चार पुस्तके बालगट आणि कुमारगट अशा दोन वयोगटातील मुलां-मुलींकरिता आहेत. संकलनामागची कल्पना त्यांच्या शब्दात देणे उचित. " तुम्ही विचाराल, वाचायच कशासाठी ? माझे साधे उत्तर आहे- आनंदासाठी. वाचनातून खूप आनंद मिळतो आणि तो कधी संपत नाही, शिळा होत नाही. वाचनातून ज्ञान मिळतं, माहिती मिळते पण ते नंतरचे. वाचनात रमायला जमले की मग ते बाकीचे सहज, आपसूक आपल्यापर्यंत येते.शब्दांमधून वाहणारा आनंदाचा झरा सापडला की एक विलक्षण सुंदर दुनिया आपल्यासमोर खुली होते, मग कळत नकळत आपल्याभोवतालचा निसर्ग, भोवतीची माणसं- आपलं सगळ जगच जास्त छान दिसावयाला लागतं..... भाषेची निरनिराळी रुपं तुम्हाला दिसतील. समाजाचे निरनिराळ्या काळातलं दर्शन तुम्हाला घडेल...... समाजातील माणसं वेगवेगळ्या परिस्थितीत जगत असतात, त्यांची सुखंदुख:खं, विचार, भावना, पद्धती तुम्हाला कळतील. .... आपलंही मन विशाल होतं, समजुतदार होतं. ... पुस्तकांसारखीच चित्रही आवडतात... शब्दांमधून जसं जग दिसतं, जाणवतं, तसंच ते रंगरेषांमधूनही जाणवतं.. ते मनोहारीही असतं....य़ा निमित्तानं आपल्या देशातल्या काही चित्रकार-शिल्पकारांच्या कलेशी तुमचा थोडाफ़ार परिचय होईल. "

कितपत जमलं आहे दोघींना ? माझ्या मते चांगल्यापैकी. जवळ्जवळ दोनशे गद्य ,सव्वाशे पद्य उतारे व तीनशे चित्र पुस्तकांत आहेत. निवड काळजीपूर्वक व रसिकतेने केली आहे. ७००-८०० वर्षांमधील मराठीतील सार मुलांकरिता काढणे सोपे नाही व जे काढले आहे ते सगळ्यांना पसंत पडेलच असेही नाही. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती. पण माझी खात्री आहे की आपल्यापैकी कोणीही " मुलांनी वाचावे " अशा लेखकांची/ कवींची यादी केली तर त्यातील किमान ८० टक्के लेखक/ कवी या पुस्तकात सापडतील. आता थोडे धाडसी विधान.
मुलांचे सोडा, मला आवडणारे लेखक / कवी यांची यादी करा.त्यामधीलही ७०-८० टक्के येथे सापडतील.

पुस्तकांची विभागणी घर-गाव-प्रदेश, रस्ते-प्रवास,शिक्षण, व्यवसाय-समाजजीवन,कला, भाषा, निसर्ग,प्राणिसृष्टी, बालपण. कुटुंब, इत्यादी गटांमध्ये केली आहे. काही उदाहरणे मी पुढे देणारच आहे.(आपणास कल्पना यावी म्हणून.मुलांकरिता उतारे पुरेत, मोठ्यांनी संपूर्ण कलाकृती पहावी या साठी.) कला विभागात तीन-एकशे चित्रे आहेत. त्यातली काही देण्याचा विचार आहे.किती वाढवावयाचे ते प्रतिसादांवरून ठरवू.

तर आतापर्यंत तुमच्या लक्षात आले असेल की आपल्या घरात ८ ते १२ वर्षे वयोगटातील मुले-मुली असतील तर ही पुस्तके का आवष्यक म्हणतो ते. ६० वरील वयोगटातील व्यक्तींना जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. आचार्य म्हणतात त्याप्रमाणे पेढा नाही तरी त्याच्या तुकड्याचा आस्वाद घेता येईल. वेळ असेल तर दर वर्षीच्या पुस्तक खरेदीची यादी करावयास उपयोगी पडेल. नसेल तर आपण काय गमावत आहोत ते तरी कळेल. हा झाला वाङ्मयाबद्दलचा आढावा.

कलाविभागात प्रत्येक चित्राबरोबर चित्रकाराचे नाव आणि प्रकार(उदा. जलरंग, मैथिली लोककला इ.) दिले आहे. भारतीय कलापरंपरा,चित्रकारांचा परिचय व आधुनिक कलाविचार असे छोटेखानी लेखही आहेत.कुमारांना कलेच्या दालनात प्रवेश करतांना पुरेशी शिदोरी आहे.

उदाहरणे द्यावयाची म्हणजे उताऱ्यातला उतारा. नखभर काजूकतली. पण इलाज नाही.उपक्रमवरील " जपणूक आपल्या ठेव्याची " या विषयाशी जवळीक असणारा श्री. श्री.बा. जोशी यांचा " विसरलेला "खेळ"कर वारसा " या लेखातील काही भाग :

दूरदर्शनमधील एका चर्चेत असा उल्लेख होता की "हुतुतु " हा खेळ प्राचीन असून महाभारतात त्याचा उल्लेख आहे. शोध घेतला पण मला तरी त्याचा सुगावा लागला नाही. असे किती तरी खेळ लुप्त झाले.१८६० मध्ये प्रसिद्ध झालेल्या शब्दरत्नावलीमध्येनोंद केलेले खेळ पहा. अकुटेदुकुटे, इरगी मिरगी, खिचकुला, खुंटाफ़ळी, गायचाळा,घार्मोर, टिपरघाई, दडकुली, हुरकुंड,आसूमासू, मृदुंगपाट,इत्यादी.काय होते या खेळांचे स्वरूप ? त्यांचे नियम काय होते ? अजून कुठे खेळले जातात का? यात भर घालता येईल. चोरगली, सुरसुर, चिरपाटी, भिंतपाणी, हातपोळी, भोरभेंडी, काचकिवडा, फ़रेतरे वगैरे.हुतुतुला शंभर वर्षांपूर्वी दम-दम-दम असे म्हणत तर बंगालमध्ये कपाटी- कपाटी. यच खेळाला गुडगुडी, हुडसाब, चंडाजी, सुरबड्डी, किलासर अशीही नावे होती.मुलींच्या खेळातला कल्पनाविलास नि शीघ्रकवित्व मन मोहवून टाकणारे.

चहा बाई चह! गवती चहा ! मैत्रिणी मैत्रिणींची फ़ुगडी पहा !!
किंवा " बटाट्याची भाजी ! आंबली कशी ! थोराची सून दमली कशी !!
उंच उंच बुचडे, पुणेकरणी ! कासोट्याच्या पट्ट्या, सातारकरणी!! आडव्या चिऱ्या वाईकरणी !!
जाई बाई जाइ ! रानोमाळी जाई ! माझ्याशी फ़ुगडी खेळते! कानडी बाई !!
किरीतन म्हशी खेळातले गाणॆ :
आडातला कासरा ! तोच माझा सासरा !
परड्यातला चाफ़ा ! तोच माझा बापा !
पांघुरणातली पिसू ! तीच मझी सासू !
दुधावरची साई ! तीच माझी आई !

यातील अंत:करणाचा नकळत उमटलेला उमाडलेला स्वर कसा काळजात भिडतो.

खेळ हा सुद्धा आपला सांस्कृतिक वारसा आहे. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात अजूनही कुठेकुठे हे खेळ खेळले जात असतील.त्यांच्या चित्रफ़िती, ध्वनीफ़िती बनवाव्यात, खेळांचे एखादे म्युझिअम करावे, त्यांचे नियम-कानू लिहून ठेवावेत, असे फ़ार वाटते.

शरद

Comments

हेच म्हणतो

खेळ हा सुद्धा आपला सांस्कृतिक वारसा आहे. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात अजूनही कुठेकुठे हे खेळ खेळले जात असतील.त्यांच्या चित्रफ़िती, ध्वनीफ़िती बनवाव्यात, खेळांचे एखादे म्युझिअम करावे, त्यांचे नियम-कानू लिहून ठेवावेत, असे फ़ार वाटते.

हेच म्हणतो. ऋषीकेश च्या आजी आजोबांच्या वस्तुच्या मालिकेतला चा हा भाग आहे असे मला वाटते.आमच्या कडे मोक्षपट नावाचा एक खेळ होता. त्याचे साम्य हे सापशिडी या खेळाशी आहे. प्रत्येक घराला काही नावे होती . शेवटचे घर म्हणजे मोक्ष.मधली घरांची नावे काहीच आठवत नाहीत.पण अध्यात्मिक होती. मूळ पट अत्यंत जीर्णावस्थेत असल्याने वडिलांनी ड्रॉईंग कागदावर त्याची प्रतिकृती तयार करुन ठेवली होती.
प्रकाश घाटपांडे

स्कॅन करून द्या ना

प्रकाशराव,

मोक्षपट ही काय सुंदर कल्पना आहे.

आम्हालाही हा मोक्षपट स्कॅन करून उपलब्ध करून द्या ना!

आपला
गुंडोपंत

नाश पावली

ती प्रतिकृती देखील नाश पावली.
प्रकाश घाटपांडे

मोक्ष

काय दैवदुर्विलास आहे हा?
मोक्षाच्या खेळालाच मोक्ष मिळावा ?
:)

आपला
गुंडोपंत

छोटेखानी ओळख आवडली

शिवाय मुलींच्या खेळांमधली गाणी गमतीदार तरी कौटुंबिक जिव्हाळ्याची वाटली.

वाचू आनंदे वाचनीय आणि संग्रहणीय आहे, असे जाणवते.

छान ओळख!

माझ्याकडे ह्याचे चारही भाग आहेत. बाल आणि कुमार वाचकांना उद्देशुन लेख/कविता संकलीत केले असले तरी दर्जेदार लेख/कविता निवडल्याने सर्वांनीच वाचण्या सारखे आहेत. पुस्तकांची रचना बरीचशी शालेय पाठ्यपुस्तकांसारखी असली तरी आकर्षक बांधणी तसेच भरपूर चित्रे ह्यामुळे अजीबात रटाळ वाटत नाही. शाळेच्या अभ्यासक्रमात अशीच पुस्तके पाठ्यपुस्तके म्हणून नेमली तर बर्‍याच जणांना मराठी वाचनाची गोडी लागेल असे वाटते. एकंदरीत छान उपक्रम!

 
^ वर