डॉ. आनंद यादव यांनी माफी मागितली

डॉ आनंद यादव यांनी संतसुर्य तुकाराम या लिहिलेल्या कादंबरीतील तथाकथित बदनामीकारक मजकूरा बाबत त्यांनी तुकारामांच्या चरणी लीन होउन माफी मागितली. तुकोबांवर माझी नितांत श्रद्धा असे प्रतिपादन करुन श्री यादव म्हणाले कि माझ्या हातून काही चूक झालेली असल्यास तुकाराम महाराजांच्या पायी माफी मागण्यात मला धन्यता वाटेल. आमच्या मनात असा प्रश्न आहे कि जर आनंद यादव हे नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नसते तर हा वाद एवढा चिघळला असता काय? आनंद यादव याठिकाणी दबावाला बळी पडले काय? जनमानस नावाचा प्रकार हाताळणे इतक अवघड असत कि त्यात जरा काही वेगळा सुर लावला कि तो द्रोह ठरतो. आता हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. समजा हे एखाद्या ब्राह्मण साहित्यिकाने लिहिले असते तर याला जातीय रंग आला असता?
मंडळी आपल्याला काय वाटत?

Comments

काही गरज नव्हती माफी मागण्याची

डॉ. आनंद यादवांनी माफी वगैरे काही मागावयाची गरज नव्हती. बदनामी करणारा मजकूर आम्हाला तरी वाटत नव्हता. पण वारकर्‍यांनी हा प्रश्न इतका काय कसा लावून धरला तेच कळले नाही. आनंद यादव हे नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यामुळेच हा वाद चिघळला. आनंद यादव दबावाला बळी पडले, जनमानस हाताळणे अवघडच असते असे वरील प्रकरणावरुन वाटते.

>>एखाद्या ब्राह्मण साहित्यिकाने लिहिले असते तर याला जातीय रंग आला असता?
आला असता !

-दिलीप बिरुटे

``हा लेखनस्वातंत्र्याचा बळी !?''

``निवडून आलेल्या अध्यक्षाला राजीनामा द्यावा लागणे, हे अत्यंत दुर्दैवी असून हा मराठी माणसाचा अपमान आहे ''
'' त्यांना राजीनामा मागे घेण्याची विनंतीही आम्ही केली होती. ''- डॉ. वि.भा. देशपांडे

मराठी माणसाचा अपमान

मराठी माणसाचा रोज अपमान होऊ लागला आहे. (मराठी माणसाला मानच नाही त्याचा अपमान कसा होईल? -संपादक). मराठी माणसांनो जागे व्हा आणि सनातनधर्माशिवाय दुसरे काही कोणी लिहित असेल तर त्याला ठोकून काढा. (धर्मासाठी मेलात तर २७ अप्सरा तुमच्या समोर नाचतील, गातील - संपादक.)

आवरा हो तुमच्या संपादकांना. वात आणला आहे त्यांनी.

-राजीव.

शंका

धर्मासाठी मेलात तर २७ अप्सरा तुमच्या समोर नाचतील, गातील - संपादक.

२७ हा आकडा कसा आला असेल? १७ किंवा ३७ का नाही?
स्वगत : अप्सरा आहेत ना? मग झाले तर. २७ किंवा ३७, काय फरक पडतो? हा बघा आलोच. जय महाराष्ट्र!

----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.

हम्म!

आमच्या मनात असा प्रश्न आहे कि जर आनंद यादव हे नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नसते तर हा वाद एवढा चिघळला असता काय?

बहुधा नसता.

आनंद यादव याठिकाणी दबावाला बळी पडले काय?

नेमका कसला दबाव? साहित्य संमेलनाची खुर्ची निसटायचा का? अध्यक्षपदाची चिंता नसती तर माफी मागण्याची गरज उपरोक्त उतार्‍यात दिसत नाही.

हे एखाद्या ब्राह्मण साहित्यिकाने लिहिले असते तर याला जातीय रंग आला असता?

बहुधा आला असता असे वाटते.

अवांतरः तुकाराम महाराजांचा एकेरी उल्लेख? इतकी हिम्मत कशी करवली यादवांना? ;-)

सहमत

अध्यक्षपदाची चिंता नसती तर माफी मागण्याची गरज उपरोक्त उतार्‍यात दिसत नाही.

आनंद यादव यांनी अध्यक्षपद गेले तरी चालेल पण मी माफी मागणार नाही आणि उतारेही गाळणार नाही अशी भूमिका घ्यायला हवी होती. जर ते उतारे अपमानास्पद नव्हते मग पुस्तकातून का वगळले? माफी मागायचीही गरज नव्हती.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

असं कसं ???

>>जर ते उतारे अपमानास्पद नव्हते मग पुस्तकातून का वगळले? माफी मागायचीही गरज नव्हती.
कसं शक्य आहे ते कर्णा ???
उलट सध्या पटकन माफी मागुन प्रकरणावर पडदा टाकला ते बरे केले डॉ. यादवांनी ...

आपले इथल्या मॉरल पोलीस, स्वयंघोषीत संस्कृतीरक्षक, संत परंपरेचे हिंसक पाईक, डाऊ प्रकरणानंतर वारकरी व पर्यायाने बंडातात्या कराडकर महाराजांच्या मागे उभी राहिलेली शिवसेना, समस्त "वार"करी समजाचा जनक्षोभ वगैरे बद्दल् काय् मत् आहे ?
ह्या लोकांशी तात्विक चर्चा करुन त्यांना ह्यात काही "आक्षेपार्ह्य नाही" हे पटवुन देणे शक्य आहे काय ?
हा प्रयत्न असफल झाल्यास होणार्‍या राड्याची व पर्यायाने डॉ. यादवांना असणार्‍या धोक्याची आपल्याला कल्पना असेलच ...

मी तर् म्हणतो की मुर्खांशी वाद घालण्यापेक्षा साफ माफी मागुन टाकली ते बरे झाले, तशीच वेळ आली असती तर् यादवांच्या मागे कुणी माईचा लाल उभा नसता राहिला, मग अशा परिस्थीतीत लढण्यात काय हाशिल ???

अवांतर :
माफीनाम्यानंतर ८२ वर्षे वय असलेल्या डॉ. यादवांना देहुतल्या सो कॉल्ड महाराज व वारकरी लोकांनी जी धक्काबुकी/मारहाण केली ( अशा बातम्या आम्ही वाचल्या ) त्याबद्दल आपले काय मत आहे ? मग जर माफीच मागीतली नसती तर हे प्रकरण कुठवर गेले असते ह्याचा अंदाज येतो आहे.

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

प्रतिसाद (मला असे वाटते)

उलट सध्या पटकन माफी मागुन प्रकरणावर पडदा टाकला ते बरे केले डॉ. यादवांनी ...

फक्त वारकर्‍यांच्या आंदोलनाच्या इशार्‍यामुळे यादव यांनी सारवासारवी करण्यासारखी भूमिका घेतली. त्यांनी आणखी थोडे ताणून धरायला हवे होते. त्याचवेळी कौतिकराव ठाले पाटलांचा अमेरिकेचा जेटलॅग गेला असेल तर साहित्य महामंडळाची अधिकृत भूमिका काय आहे हे पुढे यायला हवे होते. या एकंदर प्रकारातील तुकारामांच्या बदनामीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यात निश्चितच यादव यांना न्याय मिळाला असता. (अरुंधती रॉय, चंद्रकांत काकोडकर, विजय तेंडुलकर यांच्यासह अनेकांना मिळाला आहे.) साहित्य संमेलन हा एक महोत्सव असतो. सरकारला या संमेलनाला संरक्षण देणे क्रमप्राप्त होते. तिथे टाळाटाळ करता आली नसती. किंबहुना या प्रकरणात आणखी काही घडले असते (खरंच मारहाण झाली असती तर? वगैरे तर तो सरकारच्या मोठ्या नाचक्कीचा प्रकार होता.) कदाचित सरकारनेच आपले पोलीसबळ वापरुन वारकर्‍यांचे आंदोलन मोडून काढले असते.

आपले इथल्या मॉरल पोलीस, स्वयंघोषीत संस्कृतीरक्षक, संत परंपरेचे हिंसक पाईक, डाऊ प्रकरणानंतर वारकरी व पर्यायाने बंडातात्या कराडकर महाराजांच्या मागे उभी राहिलेली शिवसेना, समस्त "वार"करी समजाचा जनक्षोभ वगैरे बद्दल् काय् मत् आहे ?
ह्या लोकांशी तात्विक चर्चा करुन त्यांना ह्यात काही "आक्षेपार्ह्य नाही" हे पटवुन देणे शक्य आहे काय ?
हा प्रयत्न असफल झाल्यास होणार्‍या राड्याची व पर्यायाने डॉ. यादवांना असणार्‍या धोक्याची आपल्याला कल्पना असेलच ...

हो. धोका आहे हे खरेच. पण जिवाला धोका वगैरे मला तरी अतिशयोक्ती वाटते. मात्र या पुंड वारकर्‍यांची झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली आहे आणि ते आता आणखी आचरट मागण्या करु लागतील असे वाटते

मी तर् म्हणतो की मुर्खांशी वाद घालण्यापेक्षा साफ माफी मागुन टाकली ते बरे झाले, तशीच वेळ आली असती तर् यादवांच्या मागे कुणी माईचा लाल उभा नसता राहिला, मग अशा परिस्थीतीत लढण्यात काय हाशिल ???

यादवांनी सुरुवातीलाच पुस्तकातील प्रकरणे गाळण्याचा व माफी मागण्याचा निर्णय घेतला. कदाचित त्यावेळीच इतर साहित्यिकांच्या मनात, यादवांची बाजू घेऊनही पुढे न जाणे यादवांनीच माघार घेतली तर काय अशी शंका उत्पन्न होणे शक्य आहे. जर यादव यांनी सुरुवातीलाच शेंडी तुटो वा पारंबी तुटो अशी भूमिका घेतली असती व खंबीरपणाचा प्रत्यय दिला असता तर निदान काही साहित्यिक तरी मागे उभे राहिले असते असे वाटते. माझ्या माहितीप्रमाणे झुंडगिरीचे अगदी लायसन असलेल्या व भरात असलेल्या शिवसेनेच्या आंदोलनाच्या काळातही तेंडुलकरांच्या बाजूने माधव आचवल वगैरे अनेक साहित्यिक निर्भिडपणे उभे राहिले होते. (पुण्यात सखाराम बाईंडरविरोधी आंदोलन हे काँग्रेस-शिवसेना-भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने झाले होते. इथे वारकर्‍यांच्या आंदोलनाला महासंघ-ब्रिगेड वगैरे वानरसेना वगळता कोणी जाहीर पाठिंबा दिला आहे असे वाटत नाही. अगदी शिवसेनेनेही पाठिंबा दिल्याचे वाचले नाही. कदाचित उद्या संजय राऊत हे हिंदूंच्या भावनाही महत्त्वाच्या अशी भूमिका घेणारा अग्रलेख लिहितील असे मनापासून वाटत असले तरी.)

अवांतर :
माफीनाम्यानंतर ८२ वर्षे वय असलेल्या डॉ. यादवांना देहुतल्या सो कॉल्ड महाराज व वारकरी लोकांनी जी धक्काबुकी/मारहाण केली ( अशा बातम्या आम्ही वाचल्या ) त्याबद्दल आपले काय मत आहे ? मग जर माफीच मागीतली नसती तर हे प्रकरण कुठवर गेले असते ह्याचा अंदाज येतो आहे.

ही (न झालेली) मारहाण निषेधार्ह आहे. पेपरातील बातमीप्रमाणे त्यांच्यावर धावून आले होते. कदाचित हा दम देण्याचा/डोळे वटारण्याचा प्रकार असू शकतो.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आताही आहेच.

जातीय रंग आताही आलेला आहेच. यात जातीचे अनेक गणितं आहेत. यादव यांच्या कादंबरीने भावना दुखाविलेल्या एका वकिलाने पाठविलेल्या नोटीसीची प्रत माझ्याकडे आहे. त्यात यादव यांच्या जातीचा आणि खानदानाचा ज्या प्रकारे उद्धार केला आहे, ते पाहून साक्षात तुकारामांनी आत्महत्या केली असती.

सुधारणा

तुकोबांवर माझी नितांत श्रद्धा असा दुवा हवा होता.
प्रकाश घाटपांडे

वाईट वाटतंय..

बातमीत म्हटल्याप्रमाणे ''वारकऱ्यांशी चर्चा होत असताना त्यांच्यापैकी एक जण यादव यांच्या अंगावर धावून आले; मात्र धक्काबुक्की किंवा मारहाण झालेली नाही''

च्यायला वाईट वाटतंय ! संत तुकाराम महाराजांचा खून झाला होता म्हणतात. (कोणत्या पुस्तकात वाचलेले होते, पुस्तक आठवत नाही.) पण आता लोकांच्या दहशतीमुळे असे म्हणावे लागेल की, एक सुंदर सजवलेले विमान आले होते आणि त्यात बसून संत तुकाराम वैकुंठाला गेले.

-दिलीप बिरुटे
(माळकरी)

माफी कसली?

तो वादग्रस्त भाग वाचला होता आधीही. मला त्यात काहीही वादग्रस्त वगैरे वाटलेच नव्हते. यादवांनी माफी वगैरे मागायची गरज नव्हती. अजून एक साहित्यिक झुंडशाहीला बळी पडला.

आमच्या मनात असा प्रश्न आहे कि जर आनंद यादव हे नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नसते तर हा वाद एवढा चिघळला असता काय?

मला असे वाटते की या प्रकरणात साहित्य संमेलनाचा थोडा असला तरी तितकासा संबंध नसावा. कुठेतरी असंही वाचलंय की तुकोबांचे सध्याचे वंशज यांचा या सगळ्या प्रकरणात खूपच मोठा सहभाग आहे आणि काही राजकारणीही असण्याची शक्यता आहे.

आनंद यादव याठिकाणी दबावाला बळी पडले काय?

उघड आहे. नक्कीच दबावाला बळी पडले. गेली कित्येक वर्षे वारकरी समाज खूपच संघटित आहे (सगळ्या दिंड्या, वार्‍या अतिशय सुनियोजित असतात. तसेच नुकतेच झालेले डाऊ प्रकरण आणि त्या निमित्ताने प्रकाशात आलेले ह.भ.प. बंडातात्या कराडकर इ.इ.). ग्रामिण भागात त्यांचे अस्तित्व, प्राबल्य आहेच. त्यामुळेच यादवांना याची दखल घ्यावीच लागली असावी. जेव्हा या वादाला तोंड फुटले होते तेव्हा यादवांची पहिली प्रतिक्रिया खूपच त्वेषाची आणि संतापाची आली होती. त्या प्रतिक्रियेपासून माफी मागण्यापर्यंतचा यादवांचा प्रवास हा नैसर्गिक असू शकत नाही. त्यांची या आधी मागितलेली माफीही नामंजूर झाली होती. आणि ही माफीही नामंजूर झाली आहे बहुतेक.

हे एखाद्या ब्राह्मण साहित्यिकाने लिहिले असते तर याला जातीय रंग आला असता?

जातीय रंग तर तसाही आहेच. पण यादव ब्राह्मण असते तर त्वेषाची धार अजूनही हजारपटीने वाढली असती, नक्की. वारकरी संप्रदायात जातपात वगैरे नसते, भागवतधर्म वगैरे हे सगळे आजच्या घडीला तर थोतांड आहे. आणि असे वाटते की पूर्वी ब्राह्मणांनी केलेले उद्योग आता ब्राह्मणेतर (तथाकथित) सवर्ण जाती करत आहेत. पात्रं बदलली आहेत, संवाद तेच आहेत. नाटक चिरंतन चालूच राहील.

माझे मत : यादवांनी जरी खरंच निंदाजनक लिहिलं असतं तरी प्रकरणाचा असा झुंडशाहीद्वारे निकाल लागणे हे निषेधार्हच वाटले असते मला.

बिपिन कार्यकर्ते

राजकारण

हा सगळा प्रकार समोर असलेल्या निवडणूका लक्शात ठेवून केलेल्या आहेत.( आठवा: जेम्स् लेन) मागच्या वेळी आबा पाटलांनी भांडारकर संस्थेवर ह्ल्ला बोल केले होते. आत मराठा आरक्श्णाचा मुद्दा झेपत नाही म्हणून मराठेतरांवर आरोप करून मराठा लॉबी आपल्या बाजुला वळवण्याचे प्रकार सुरु आहे.

विद्याधर

मत

वरच्या प्रतिसादांमध्ये सर्व मुद्दे आले आहेत. मुळातच आधी लिहिले तर माफी कशाला मागायची? आणि स्वतःचा अभिमान मिरवणारे वारकरी हिंसक का बनतात? हिच का संतांची शिकवण? राजीनामा देऊन काय होणार आहे?
आम्ही भारतीय ना, नको तिथे तत्व आणि आदर्शवाद आणून आपली भक्ति, युक्ति आणि शक्ति नको त्या प्रकारे खर्च करतो. (अरेच्या, हा एक चर्चेचा मुद्दाच झाला कि काय?)






मराठी साहित्यिकांची उदासीनता

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
खरे तर डॉ.आनंद यादव यांची काहीही चूक नसता वारकरीसंघटनेने आपल्या उपद्रवमूल्याच्या बलावर त्यांना त्यांचे पुस्तक मागे घ्यायला आणि क्षमायाचना करायला भाग पाडले आहे. आनंद यादव यांनी मोठ्या मनाने या दोन्ही गोष्टी पार पाडल्या तरी वारकर्‍यांचे समाधान नाही. आता डॉ. यादव यांनी नियोजित संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारू नये असा त्यांनी हट्ट धरला आहे. मला वाटते डॉ.यादव यांचे कोणी हितशत्रू या सर्व प्रकरणाच्या मागे असावेत.
आता वारकरी संघटनेने फतवा काढला आहे की संतांविषयी कोणी काहीही लिहू नये.लिहिल्यास ते वारकरी समितीकडे सादर करावे आणि समितीने संमती दिली तरच ते प्रसिद्ध करावे. जसा काही सर्व संतसाहित्यावर वारकर्‍यांचाच अधिकार आहे! आणि संतांच्या चारित्र्याचे रक्षण करण्याचे उत्तरदायित्व वारकर्‍यांच्या शिरावर आहे !!
एव्हढे झाले तरी पुरोगामी म्हणवणार्‍या मराठी साहित्यिकांतील कोणीही या विरुद्ध चकार शब्द उच्चारत नाही याचे आश्चर्य वाटते.

अगदी हेच

एव्हढे झाले तरी पुरोगामी म्हणवणार्‍या मराठी साहित्यिकांतील कोणीही या विरुद्ध चकार शब्द उच्चारत नाही याचे आश्चर्य वाटते.

चूक नसताना माफी मागायला लावणे आणि त्याकरता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दावणीला लावणे यांत वारकर्‍यांचा हेतू कळत नाही. इथे त्यापेक्षा मोठे राजकारण शिजते आहे असे वाटले. यादव यांनी अशा साहित्यिकांचे अध्यक्षपद का भूषवावे किंवा भूषवावे का? असा प्रश्नही पडला.

नकली वारकरी

एक तर आनंद यादव यांनी माफीच मागायला नको होती असे माझे मत आहे. त्यांच्या माफीमुळेच हे नकली वारकरी चेकाळले आणि आता काहीही मागण्या करायला लागले आहेत. वारकरी संघटना ही धारकरी संघटनेप्रमाणे का वागत आहे कळत नाही. सध्या मराठी साहित्यिक गप्प बसले आहेत हेही आश्चर्यकारक आणि खेदजनक आहे.

साहित्य संमेलनाशी वारकऱ्यांचा काय संबंध आहे? त्यांच्या भावना दुखावल्या होत्या माफीने ते प्रकरण संपायला हवे होते. उद्या आनंद यादव यांनी पुणे जिल्ह्यात राहू नये असा आदेश ते काढतील. संतांविषयी काहीही लिहिण्यासाठी कोणालाही वारकरी समितीच्या परवानगीची गरज नाही. तुकारामांनी ज्ञानेश्वरांविषयी लिहिताना वारकरी समितीचीय परवानगी घेतली होती का?

तुका म्हणे ऐशा नरां, मोजून माराव्या पैजारा.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

नक्कीच..

ह्यामागे निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार असले पाहिजेत.
इतर नामांकित साहित्यिकांचे तोंड बंद असणे हे देखिल अनाकलनीय आहे. बहुदा त्यांचीही ह्या सर्व गोष्टीना मूकसंमती असावी असे वाटतेय. ह्यालाच म्हणतात...मौनम्‌ सर्वार्थ साधनं.
आपण कितीही पुढारलो,सुसंस्कृत झालो असा धोशा लावला तरी जाती-वर्ग कलहातून अजून कुणीच सुटलेले नाही हेच अंतिम सत्त्य आहे.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

माफी मागायची गरज नव्हती

वरील प्रतिसादकर्त्यांशी सहमत.

वारकर्‍यांच्या संघटनेचा सेन्सॉर बोर्ड असावा ही कल्पना धोकादायक आहे.

आज भारत सरकार वेगवेगळ्या धर्मातील लोकांना भिऊन पुस्तकांवर बंदी आणतात. (हिंदू-मुसलमान-ख्रिस्ती तीन्ही धर्मांना दुखवणारी पुस्तके बहिष्कृत केली आहेत.) पण सरकारच्या सेन्सॉरविरुद्ध घटनेच्या कलमांनुसार विरोध करता येतो - देर असला तरी अंधेर कधीकधी नसतो. (अरुंधती रॉय तुम्हाला आवडो, ना आवडो. तिच्या एका पुस्तका सरकारने बंदी आणली होती, आणि न्यायालयाच्या आदेशाने ती बंदी उठवली गेली.)

पण कुठल्यातरी स्वयंसेवी/असार्वजनिक-म्हणून-खाजगी सेन्सॉर बोर्डच्या विरोधात काय वरचे कोर्ट?

(येथे वारकरी संघटनेने विरोध करूच नये, असे माझे मत नाही. वारकरी संघटनेच्या इमारतींमधील पुस्तकालयांमध्ये हे पुस्तक विकत घेण्यास बंदी केल्यासही हरकत नाही. निषेध नोंदवण्यासही हरकत नाही. प्रश्न पुस्तक बाजारात उपलब्ध असण्याबाबत आहे.)

आनंद यादव यांची अन्य काही पुस्तके मी हल्लीच विकत घेतली आहेत. आता वाटते, हेसुद्धा पुस्तक आवर्जून विकत घ्यायला हवे होते.

परत

परत तोच मुद्दा येतो. आपल्या भारतीयांच्याच भावना इतक्या कोमल का? कुठेही काही झाले की निषेध करून मारामारी, जाळपोळ करायला आपण सर्वात पुढे का? तरी बरेच दिवस सर्व पुतळे शाबूत आहेत ते एक बरे.

----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.

यात काय नवीन?

हं.. राजकारण का अशी गोष्ट आहे जी कोणत्याही मुद्द्यावरून होऊ शकते .. जे घडतंय त्यात नवीन काहिच नाहि :(
बाकी माफी मागायची गरज नव्हती या व इतर वरील प्रतिसादांशी सहमत

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

सर्वांशी सहमत

अजानुकर्ण आणि इतर म्हणातात तसे माफी मागायची गरज नव्हती असे मलाही वाटते पण बिपीन म्हणतात तसे झुंडशाहीच्या दबावातून मागीतलेली माफीही असू शकते. काहीही असो पण झालेला प्रसंग वाचून अतिशय खेद वाटला.

मूळ

सर्वप्रथम मी वरील प्रतिसादांशी सहमत आहेच. जरी असे कुठेतरी वाटले की यादवांना असले काहीसे लिहून यादवी माजेल हे समजले कसे नाही, तरी :-)

भारताला आपण जगातील सर्वात मोठी (लोकसंख्येने) लोकशाही म्हणतो खरे आणि त्यात बर्‍याच अंशी तथ्यही असते, पण सेन्सॉरशीपच्या बाबतीत पण आपण जगातली सर्वात मोठी (लोकसंख्या आणि भूभाग) सेन्सॉरशिप आहोत असे वाटते.

मात्र असे का व्हावे यावर विचार करायचा झाला तर त्याला माझ्या लेखी उत्तर एकच मिळेल की मतांचे राजकारण करताना लावलेली वाईट सवय. एकदा घसरगुंडीवर बसले की खालीच जाणार...

सुरवात कधीपासून ते माहीत नाही, पण २०-३० वर्षातील काही उदाहरणे पहा:

प्रथम - सलमान रश्दीचे "सेटानीक व्हर्सेस" - सर्वात प्रथम भारतात बंदी
नंतर - आंबेडकरांचे रीडल्स - त्यातील रामावरील मुद्दे आणि मला वाटते आनंद दिघे आणि इतरांनी केलेला "आवाज". (आक्षेप सरकारी पैशाने छापल्यामुळे वाढला. तरी देखील "यातील विचाराशी सरकार सहमत असेलच असे नाही" अशा अर्थी लिहून ते लेखन ठेव्हण्यात आले.)
नंतर - अरूण शौरींचे आंबेडकरांवरील लेखन - बंदी घातली का काय झाले माहीत नाही, पण तसाच गाजावाजा.
जेम्स लेनचे शिवाजीवरील तारे आणि त्यानंतर करण्यात आलेली भांडारकर इन्स्टीट्यूटची नासाडी आली.
असे अजूनपण असतील...त्यात आता वारकरीपण आले...

वास्तवीक या सर्वावर एकच उपाय आहे, तो म्हणजे खर्‍याअर्थी लेखन/विचार स्वातंत्र्य देणे. जर कोणी बदनामी करणारे, वादग्रस्त लेखन केले तर त्यासाठी बुद्धीवादाला बुद्धीवादाने आव्हान करणे हाच एक उपाय ठेवला पाहीजे असे वाटते.

दा विंची

पण २०-३० वर्षातील काही उदाहरणे पहा:

दा विंची कोड प्रसिद्ध झाल्यावर इटलीसारख्या कट्टर कॅथोलिक देशातही लोक (आणि पोप) आरामात होते पण भारतातील किरिस्तावांच्या भावना लगेच दुखावल्या.

----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.

मी विचारच करत होतो...

दा विंची कोड प्रसिद्ध झाल्यावर इटलीसारख्या कट्टर कॅथोलिक देशातही लोक (आणि पोप) आरामात होते पण भारतातील किरिस्तावांच्या भावना लगेच दुखावल्या.

मी विचारच करत होतो, अमर आहे, अकबर आहे, अँथनी का नाही त्याचा....धन्यवाद!

बाकी "दा विन्ची" विरोधात अमेरिकेतील/युरोपातील किरीस्तावांनी डॉक्युमेंटरीज काढल्या, पुस्तके लिहीली पण बंदी घाला म्हणले नाही.

आणि परत - सेटानिक व्हर्सेसवर भारतसरकारने (इंदिरा गांधी) बंदी घालेपर्यंत इराणमधे खोमेनीला जर सगळ्यात आवडता लेखक कुठला म्हणून विचारला तर सलमान रश्दी असे उत्तर मिळायचे. नंतर मात्र आजतागायत सलमान रश्दीला अंगरक्षकांना घेऊन हिंडावे लागत आहे. नक्की काय साधले कोणास ठाऊक...

हे पुंड वारकरी सगळ्या वारक-यांचे प्रतिनिधी नाहितच

वारक-यांनी ज्याप्रकारे तुकारामावर मालकी हक्क सांगायला सुरूवात केलीय तो प्रकार घृणास्पद आहे. यादव देहूला गेल्यावर तुकारामांचे एक वंशज(प्रश्नार्थक) त्यांच्या अंगावर धावून गेल्याचेही वाचनात आले. एका संवेदनशील साहित्यिकाला ही असली निगरगठ्ठ वागणूक देणारे पून्हा स्वतःला तुकारामांचे वंशज कसे म्हणवतात हा मोठा प्रश्न आहे. तुकारामांच्या तथाकथित बदनामीचा बाऊ करणारे हे सगळे किर्तनकार (वारकरी नव्हे) खरे तर तुकारामांच्या जीवनप्रंसंग आणि तत्वज्ञानावर पोटे भरणारे क्षुल्लक जीव आहेत. तुकारामांचा खरा वारकरी ना या पोटभ-यांना ओळखतो ना आनंद यादवांना. एकदा का अखिल भारतीय (प्रश्नार्थक) साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले की एखाद्या हिंदूला काशी झाल्यावर व मुसलमानाला हज झाल्यावर जसे सार्थक वाटते तसे साहित्यिकाला वाटते. या स्वतःच्या साहित्यिक प्रवासाचे सार्थक करून घेण्यापायी आनंद यादवांनी वारक-यांच्या पायी घातलेले लोटांगणही तितकेच निषेधार्ह आहे. आनंद यादवांच्या साहित्याला दाद देणा-या लाखो वाचकांच्या भावनांना पायदळी तुडवून यादवांनी साहित्यातले, विवेकातले अक्षर सुद्धा माहित नसलेल्या असाहित्यिक शक्तींच्या पूंडपणाला व साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदावरील अवाजवी प्रेमाला बळी पडून आपले लिखाण मागे घेतले हे अतिच झाले. साहित्यिक वर्तुळातूनही तटस्थपणाचा मानभावीपणा आणून या मुद्दयाला पद्धतशीर हवा दिली जाते आहे. छत्रपतींना मराठ्यांनी, टिळक,सावरकरांना ब्राह्मणांनी, आबेंडकरांना महारांनी आधिच आपल्या वर्तुळात कोंडून टाकले आहे. आता यानंतर निदान या वारक-यांना तरी संतांना ताब्यात घेण्यापासून रोखायला हवे.

सत्य असत्याशी
मन केले ग्वाही
मानियले नाही
लोकमता

प्रतिनिधित्व

एका संवेदनशील साहित्यिकाला ही असली निगरगठ्ठ वागणूक देणारे पून्हा स्वतःला तुकारामांचे वंशज कसे म्हणवतात हा मोठा प्रश्न आहे.

वंशज म्हणजे विचारांचे वारसदार नव्हेत.

तुकारामांच्या तथाकथित बदनामीचा बाऊ करणारे हे सगळे किर्तनकार (वारकरी नव्हे) खरे तर तुकारामांच्या जीवनप्रंसंग आणि तत्वज्ञानावर पोटे भरणारे क्षुल्लक जीव आहेत.

चला! तुकारामांमुळे काही जीवांची पोट भरण्याची सोय झाली.

एकदा का अखिल भारतीय (प्रश्नार्थक) साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले की एखाद्या हिंदूला काशी झाल्यावर व मुसलमानाला हज झाल्यावर जसे सार्थक वाटते तसे साहित्यिकाला वाटते.

सहमत आहे

या स्वतःच्या साहित्यिक प्रवासाचे सार्थक करून घेण्यापायी आनंद यादवांनी वारक-यांच्या पायी घातलेले लोटांगणही तितकेच निषेधार्ह आहे. आनंद यादवांच्या साहित्याला दाद देणा-या लाखो वाचकांच्या भावनांना पायदळी तुडवून यादवांनी साहित्यातले, विवेकातले अक्षर सुद्धा माहित नसलेल्या असाहित्यिक शक्तींच्या पूंडपणाला व साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदावरील अवाजवी प्रेमाला बळी पडून आपले लिखाण मागे घेतले हे अतिच झाले. साहित्यिक वर्तुळातूनही तटस्थपणाचा मानभावीपणा आणून या मुद्दयाला पद्धतशीर हवा दिली जाते आहे.

छोट्या डॉन ने यातील असहायता चांगली सांगितली आहे.असहायतेपोटी केलेली तडजोड ही अस्तित्वाच्या लढाई साठी केलेला तह असतो. उपद्रवमुल्या पुढे तात्विक चर्चा निरर्थक ठरते. पंचतंत्रातल्या पाणवठ्यावर पाणी प्यायला आलेल्या सिंहाची गोष्ट पुसट आठवते. उष्टे पाणी प्रवाहाच्या विरुद्ध कसे असु शकते हा प्रश्न गैरलागु असतो.वारकर्‍यांनी "वार" करतो तो वारकरी अशी नवी व्याख्या केली आहे.

हे पुंड वारकरी सगळ्या वारक-यांचे प्रतिनिधी नाहितच

असे खरे वारकरी (म्हणजे खोटे कोण? हा प्रश्न सुप्तावस्थेत) म्हणणार नाहीत. त्यांनाही उपद्रवमुल्याचा धोका आहेच.

आता यानंतर निदान या वारक-यांना तरी संतांना ताब्यात घेण्यापासून रोखायला हवे.

ग्यानबा तुकाराम हा द्वंद्व समास आता जातीत केव्हाच विभागायला सुरुवात झाली आहे. आम्हाला ग्यानबा तुकारामाच्या जोडीला नको ही भुमिका आता घेउ लागले आहेत.
संतांचा एकेरी उल्लेख ही बाब उपद्रवमुल्याची तांत्रिक बाजु आहे. खेडेगावात अनेक मुलांची नावे ज्ञानेश्वर तुकाराम असतात. ती संतांवरुनच ठेवलेली असतात. व्यवहारात ए नेन्या, ए तुक्या अशी हाका सर्रास मारली जाते. हा ज्ञानेश्वरांचा किंवा तुकारामांचा अवमान आहे असे वारकरी संप्रदायात कधीही समजले गेले नाहि. त्यांच्याच मुलांची ती नावे असायची. ज्ञानेश्वर रद्दी डेपो किंवा तुकाराम सायकल् मार्ट अशी दुकानांची नावे कुणाला गैर वाटली नाहीत.
प्रकाश घाटपांडे

सहमत आहे

हे पुंड वारकरी सगळ्या वारक-यांचे प्रतिनिधी नाहितच

सहमत. मला माहीत असलेले वारकरी असे नाहीत.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हे म्हणजे

हे म्हणजे अहो सगळे मुसलमान अतिरेकी नसतात हो. असे सांगण्यासारखे आहे. अथवा सगळे राजकिय पक्ष/राजकारणी एकसारखे नसतात हो असे आहे. तसे हे काही वारकर्‍यांमुळे वारकरी ब्रँड बदनाम होतोय असे म्हणायचे आहे का?






त्यात चुकीचे काय आहे.

सगळे मुसलमान अतिरेकी नसतातच. इरफान पठाण, शाहरुख खान, सलमान खान, एपीजे अब्दुल कलाम वगैरे लोक अतिरेकी असल्याचे ऐकलेले नाही. हे आंदोलन करणारे लोक वारकरी नाहीतच. बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे तुकारामांच्या अभंगांवर पोट भरणारे लोक आहेत. त्यांची झुंडशाही चालू द्यायला नको.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मग कोण?

हे आंदोलन करणारे लोक वारकरी नाहीतच.

मग कोण आहेत? इतर वारकरी मग गप्प का आहेत? जसे इथे साहित्यीकांबद्दल लिहिले जात आहेत कि ते गप्प आहेत. तर मग हे आंदोलनकर्ते जर वारकरी नाहीतच तर मग खरे वारकरी का गप्प आहेत? ज्या प्रकारच्या आंदोलनाची धमकी दिली जात आहे, त्यासाठी लागणारे हजारो वारकरी कोण आहेत?






कोण आहेत

मग कोण आहेत?
हे आहेत पोटपुजे कीर्तनकार.

इतर वारकरी मग गप्प का आहेत?
कारण वारकऱ्यांनी मोठ्या मनाने यादवांनाही माफ करुन टाकले असेल आणि या पुंडांनाही.

जसे इथे साहित्यीकांबद्दल लिहिले जात आहेत कि ते गप्प आहेत. तर मग हे आंदोलनकर्ते जर वारकरी नाहीतच तर मग खरे वारकरी का गप्प आहेत? ज्या प्रकारच्या आंदोलनाची धमकी दिली जात आहे, त्यासाठी लागणारे हजारो वारकरी कोण आहेत?
त्यासाठी ट्रक भरुन माणसे आणली जातील आणि त्यांना गंध-बुक्का लावून वारकऱ्यांचे सोंग उभे केले जाईल. अवघा हिंदू पेटून उठेल असे सामना मध्ये म्हणतात तीच ही पुंड वारकऱ्यांची ष्टाईल आहे असे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

राजीनामा

आनंद यादव यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे आत्ताच वाचले.

च्या मारी, फायर काढला दुखावल्या भावना, स्लमडॉगमध्ये रामाचे दर्शन झाले दुखावल्या भावना. ही कसली लोकशाही? ही तर झुंडशाही.
----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.

अरेरे

अरेरे .. ऐकुन वाईट वाटले.. रागहि आला.

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

राग नको

या सर्व प्रकारात साहित्यिकांनी त्यांची बाजू उचलून धरायला हवी होती पण तेथे सर्वच उल्हास दिसला. अशा साहित्यिकांचे अध्यक्षपद भूषवायची गरज नसावी.

असो. भारतात ही झुंडशाही सर्वत्रच दिसते. संकेतस्थळेही याला अपवाद नाहीत असे पाहिले आहे.

साहित्यिकांनी बाजू उचलली नाही

साहित्यिकांनी बाजू उचलली नाही याला कदाचित एक कारण असावे की बहुतेक साहित्यिक हे ब्राम्हण आहेत व प्रकरणाला लगेच जातीयवादी रंग आला असता. त्यातही द.मा.मिरासदारांची वारकरी संघटनेची सेन्सॉरशिप ही हास्यास्पद कल्पना आहे ही प्रतिक्रिया आणि राम शेवाळकरांची यादव यांनी थोडे काळजीपूर्वक लिहायला हवे होते मात्र एकदा माफी मागितल्यानंतर संबंधितांनी विषयावर पडदा टाकायला हवा होता अशा गुळमुळीत का होईना प्रतिक्रिया आल्याच.

मात्र मराठी साहित्यिक बोटचेपे आहेत यावर शिक्कामोर्तब झाले. :)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

साहित्यीकांचा काय दोष?

झुंडशाही आणि गुंडगीरी राजकिय स्वार्थासाठी वापरुन आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेला धाब्यावर बसवुन हे करवले जात असेल तर पांढरपेषा साहित्यीक कशाला विषाची परिक्षा बघतील. आजपर्यंतच्या अनुभवांमधुन, जर काही अंगाशी आल्यास कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणा संपूर्ण संरक्षण पुरवते असे दिसून येत नाही. त्यामुळे निर्भिडपणा ऐवजी बोटचेपेपणा दिसला तर त्यात काय आश्चर्य.

सहमत

कोणी काय केले वा करायला हवे होते याची चर्चा करायला ठिक आहे. पण ज्याची जळते त्याला कळते असे म्हणतात. पराभव दिसत असताना तह काय वाईट. निदान त्या वार-कर्‍यांना कळू देत. वारकर्‍यांना संतांनी काय शिकवण दिली? वार - करी तो राज-करी. कुठे गेले सगळे राजकारणी आता? कुठे गेला मराठी साहित्याचा अभिमान? साले सगळे आदर्शवादाची गोळी घेउन गप्प बसले आहेत.
पुण्यात येणार्‍या वार्‍यांचे आम्हाला लांबून का होईन कौतुक होते. पण आता ह्यांचे हे असले उद्योग बघुन ते गेले. आम्ही कोणी महान नाही. पण आम-जनता नक्कीच आहोत. यांना नक्की काय हवे आहे? भावना दुखावल्या म्हणून राजीनामा, औद्योगिकरण नको, देवाच्या नावाने टाळ कुटायची सोडून यांना राजकारणाचा विटाळ झालाय.

अवांतरः संकेतस्थळांवर सुद्धा असला आचरट अतिरेक सुरु असताना अशाच सदस्यांना धुमाकुळ घालायला परवानगी देत वर आणि संपादकांनी इतर प्रतिवाद करणार्‍या सदस्यांना ताकिद दिल्याची उदाहरणे सुद्धा आहेतच. त्यामुळे कोणी काय करायला हवे होते याच्या गप्पा मारणे ठिक आहे. शेवटी परिस्थीती नुसार प्रत्येकजण निर्णय घेतो. तसा त्यांनी घेतला जो त्यांना योग्य वाटला. त्यात यादव आणि इतर साहित्यिक सगळेच आले.






आम्ही कोण म्हणून काय पुसता

आम्ही कोण म्हणून काय पुसता आम्ही असू लाडके असे केशवसुतांनी साहित्यिकांबद्दल म्हटले आहे.

साहित्यिक आणि सामान्य पांढरपेशे लोक यामध्ये फरक आहे.
साहित्यिक किंवा कलाकारांना होणारा त्रास आज सुरु झालेला नाही. ज्या तुकारामांच्या पुस्तकावरुन हे रामायण घडले त्या तुकारामांनाही त्रास देणारे मंबाजी होते. म्हणून तुकारामांनी मंबाजीपुढे लोटांगण घातले नाही. काही दशकांपूर्वी तेंडुलकर-लागू-सारंग यांना सखाराम बाईंडर प्रकरणावरुन त्रास देणारी शिवसेना होतीच की नाही. त्यावेळीही असे हल्ले झाले होते. जर असे हल्ले वगैरे नको असेल तर मग साहित्यिकांचे प्रतिनिधित्त्व करण्याची जबाबदारी कशाला अंगावर घ्यायची? आपली पुस्तके पाडून पैसे मिळवावेत. (नाही तरी पुस्तकांचा खप वाढवण्याव्यतिरिक्त साहित्य संमेलनाचे असे काय मोठे काम आहे कळत नाही. )


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सहमत आहे

साहित्यिक आणि सामान्य पांढरपेशे लोक यामध्ये फरक आहे.

असायलाच हवा. नाहीतर स्वतःला साहित्यिक वगैरे म्हणवून घेऊ नये कारण मग ते फक्त एक होता राजा, एक होती राणी आणि त्यांच्या राज्यात लक्ष्मी भरी पाणी इतकेच लिहिण्याच्या लायकीचे राहीले. जरा काही वेगळे लिहिले की आपल्यावर हल्ले होतील याची त्यांना भीती वाटू लागली असेल तर ते कसले साहित्य प्रसवणार असा प्रश्न पडला.

ही जातीनिशी साहित्यिकी कशाला

साहित्यिकांनी बाजू उचलली नाही याला कदाचित एक कारण असावे की बहुतेक साहित्यिक हे ब्राम्हण आहेत व प्रकरणाला लगेच जातीयवादी रंग आला असता.
स्वतःला साहित्यिक म्हणवणा-या समस्त धूरीणांनी आपल्या मेंदूला चिकटलेली जात वगळून वागायची अपेक्षा त्याच्या असामान्यत्वाला धरून करायला काय हरकत आहे. मराठे खवळतील म्हणून ब्राह्मणांनी आणि आपली जातीनिष्ठा दाखवण्यासाठी मराठ्यांनी यादवांची बाजू घेतली नाही असे असेल तर विवेकाची चाड असल्याची शेखी मिरवणे तरी साहित्यिकांनी बंद करावे. अर्थात येणा-या संकटाला घाबरून अळीमिळीगूपचिळी करणारे हे साहित्यिक अशा एखाद्या प्रसंगात स्वतःच्या जातीचा उदोउदो करायला मात्र मागे हटत नाहित. लोकसत्तावाल्यांनी यादवांचा पत्ता शनिवारपेठेतला दिला आहे. आता वाटते यादवांनी घर बदलायला हवे. त्यांचे पूरते वि.रा.शिंदे झालेच आता. वि.रा.नी आयुष्य घालवले ना धड मराठ्यांचे झाले ना महारांचे. यादवही ना कोल्हापूरचे ना पूण्याचे. चला अशा लोकांची संख्या वाढायलाच हवी. शेवटी जात हे काही स्वत्व नाही ही तरी अक्कल येईल.

फायर आणि वॉटरसुद्धा!

नंदिता-शबानाफेम फ़ायरने भावना दुखावल्या होत्या असे म्हणण्यापेक्षा लोकांना चित्रपटाचा विषय निषिद्ध वाटला होता हे म्हणणे जास्त उचित होईल. पण त्याअगोदर भावना खरोखरच दुखावल्या होत्या त्या मीरा नायरच्या वॉटरमधील 'काशीनिवासी परित्यक्ता विधवांची दयनीय स्थिती 'दाखवण्यामुळे. --वाचक्‍नवी

अरेरे!!!

वाईट नक्कीच वाटले. पण प्रियाली म्हणते ते पण खरेच आहे. "षंढांचा राजा" होण्यात काय मतलब आहे? जो तो आपल्या लायकीप्रमाणे भोगतो. यादवांनी पहिल्यापासूनच स्वाभिमान दाखवायला हवा होता.

बिपिन कार्यकर्ते

+१

यादवांनी पहिल्यापासूनच स्वाभिमान दाखवायला हवा होता.

हेच म्हणतो !

पवारांचा राजीनामा

यादवांनी आरूढ न झालेल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणे म्हणजे शरद पवारांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यासारखे आहे. जर पवारांच्या तोंडून 'संत तुकाराममहाराज ' याऐवजी नुसतेच 'संत तुकाराम' किंवा 'तुकाराम महाराज' असा उल्लेख झालाच तर त्यांच्यावर तीच पाळी येणार आहे, तेव्हा त्यांनी सावध राहावे. यापुढे संतांवर चित्रपट-नाटक-कादंबरी काढणे-लिहिणे तर सोडूनच द्या, पण कुणी लेखही लिहायला धजावणार नाही!
लोकांच्या भावना(?) इतक्या नाजूक झाल्या आहेत की त्या फट्‌ म्हणता दुखावतात. पोस्टरवर उभ्या दाखवलेल्या अमिताभ बच्चनच्या गुडघ्याच्या उंचीवर काब्याचे चित्र रंगवणे, नाटकाचे नाव 'पती माझे छत्रपती' ठेवणे, अकबराला जोधा नावाची (नसलेली ?) हिंदू बायको दाखवणे, मंगल पांडेला मिशा असणे आणि त्याचे एका नर्तकीशी लफडे दाखवणे, यांमुळे संबंध नसलेल्यांच्याही भावना दुखावल्या. .लोलितामुळे इंग्‍लंडमधील लॉर्डांन्‍च्या, जेम्स लेनच्या पुस्तकामुळे संभाजीप्रेमींच्या, अरुण शोरींच्या पुस्तकांमुळे आंबेडकरअनुयायांच्या आणि शिखांच्या, तस्लिमा नसरीनच्या लज्जेमुळे बंगलादेशीय मुसलमानांच्या, 'मी गोडसे बोलतोय्‌'मुळे हल्लागुल्ला करायला टपलेल्या राजकीय गुंडांच्या, येशू ख्रिस्तावरील नाटकामुळे केरळीय किरिस्तावांच्या आणि विशेषत: त्यांच्या नन्सच्या आणि सलमान रश्दींच्या सैतानिक व्हर्सेसमुळे भारत सरकारच्या भावना दुखावल्याची उदाहरणे अगदी ताजी आहेत. त्यांत आता वारकर्‍यांच्या दुखर्‍या भावनांची भर पडली आहे.--वाचक्‍नवी

सहमत आहे

यादव यांनी आधीपासूनच कणखर भूमिका घ्यायला हवी होती.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

दया पवारांच्या "बलुतं"मधून

ही त्यांच्या शालेय वयातील गोष्ट.

त्यांना तालुक्यातील मागास समाजाच्या वसतीगृहात प्रवेश मिळाला होता. तिथल्या कोळी जातीच्या मुलांसाठी हा महार मुलगा खालच्या जातीतला, म्हणून त्याला जेवण्यासाठी जेवणखोलीबाहेर बसवले. मुलगा हिरमुसून बाहेर बसला. आता त्यांना वाटते, की विरोध दाखवायला हवा होता, बहुतेक फरक पडला असता. पण त्यावेळी जमले नाही. "विद्रोही कविता लिहिणे सोपे असते." असे ते लिहितात. एकाकी कृती करताना भीती वाटते, हे ते कबूल करतात - मला पटते.

आनंद यादव यांनी सुरुवातीला "आपण काहीच चूक केली नाही" असे ठणकावून सांगितले. पण त्यांना वाटावा तितका पाठिंबा मिळाला नाही. म्हणून एकाकी वार सहन करण्याऐवजी त्यांनी माघार घेतलेली दिसते. ८४ वर्षाच्या वयात सुद्धा एक महिनाभर त्यांनी कणखर राहायचा प्रयत्न केला, हे कौतुकास्पद आहे. मला वाटते "त्यांना मुळीच स्वाभिमान नाही", असे म्हणणे मलातरी जमणार नाही.

यादवांचा राजीनामा

डॉ. आनंद यादव यांचा संमेलनाध्यक्षपदाचा राजीनामा
मटामध्ये आलेली ही बातमी वाचा.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

मला वाटते

यादव यांनी माफी मागायला नको होती. "मी झुंडशाहीचा निषेध नोंदवतो. मात्र मी स्वतःच्या जीवाला जपतो. म्हणून राजीनामा देत आहे." अशा अर्थाचे विधान केले असते म्हणजे काम झाले असते.

साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद मानाचे खरे ; पण यादव यांचे कर्तृत्व सिद्ध व्हायला अध्यक्षपदाची गरज नाही. त्यांचे चार खंडी आत्मचरित्रच खरे तर पुरेसे आहे. अध्यक्षपदाची शान एवीतेवी गेलीच आहे. माफीसत्र टाळले असते तर त्यांची स्वतःची प्रतिमाही अकलंकित रहाती आणि धक्काबुक्कीचा त्रासही वाचला असता.

प्रतिक्रिया

आता सगळे झाल्यावर साहित्यिकांच्या मागाहून प्रतिक्रिया येत आहेत. ह्या बघा.

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

 
^ वर