डॉ. आनंद यादव यांनी माफी मागितली

डॉ आनंद यादव यांनी संतसुर्य तुकाराम या लिहिलेल्या कादंबरीतील तथाकथित बदनामीकारक मजकूरा बाबत त्यांनी तुकारामांच्या चरणी लीन होउन माफी मागितली. तुकोबांवर माझी नितांत श्रद्धा असे प्रतिपादन करुन श्री यादव म्हणाले कि माझ्या हातून काही चूक झालेली असल्यास तुकाराम महाराजांच्या पायी माफी मागण्यात मला धन्यता वाटेल. आमच्या मनात असा प्रश्न आहे कि जर आनंद यादव हे नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नसते तर हा वाद एवढा चिघळला असता काय? आनंद यादव याठिकाणी दबावाला बळी पडले काय? जनमानस नावाचा प्रकार हाताळणे इतक अवघड असत कि त्यात जरा काही वेगळा सुर लावला कि तो द्रोह ठरतो. आता हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. समजा हे एखाद्या ब्राह्मण साहित्यिकाने लिहिले असते तर याला जातीय रंग आला असता?
मंडळी आपल्याला काय वाटत?

Comments

हेच आश्चर्य आहे ...

जवळजवळ गेल्या ८ दिवसात ह्या प्रकरणाबद्दल विवीध प्रतिक्रिया व मतमतांतरे येत होती तेव्हा एकाही साहित्यीकाची "कणखर अथवा सुस्पष्ट" अशी प्रतिक्रिया आली नाही.
पण् आता सर्व घडुन "गेल्यावर" ह्या प्रतिक्रिया येण्याला काही अर्थ नाही ...

" जो बुंद से गयी वो हौद से नहीं आती ...!!!"

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

बाशिंग

हा गोंधळ चालू असताना शंकर सारडा बाशिंग बांधून तयार आहेत. कोणत्याही प्रकारची साहित्य निमिर्ती करताना किंवा एखाद्या थोर पुरुषाबद्दल लिहिताना काही पथ्ये पाळणे आवश्यक असते असे मत त्यांनी व्यक्त केले. आपल्या साहित्यिकांची जर हीच लायकी असेल तर त्यांचे साहित्य वाचायचे तरी कशाला असा प्रश्न पडतो आहे.
----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.

सगळ्या मुद्यांवर वरती चर्चा झालीच आहे...

मात्र आनंद यादवांचा संघर्ष अजून संपलेला नाही एवढेच म्हणावेसे वाटते.

:-( सौरभ.

==================

माफीनामा

तुकारामांच्या अपमानाबद्दल माफी मागितल्यावर साहीत्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे प्रकरण वारकर्‍यांनी लावून धरण्याचे कारण काय? बंडातात्या कर्‍हाडकर/सदानंद मोरे यांना विधानसभेचे तिकीट मिळणार असल्याचा संशय येतो. कारण समजायला कदाचित ३-४ महीने जावे लागतील. सदानंद मोरे यांच्यबद्दल अधिक संशोधनाची गरज आहे. मागे 'साधना' मध्ये त्यांची ग प्र प्रधानांशी की कुणाशीतरी झालेली जुगलबंदी वाचनात आली होती. त्यावरुन एकंदरीत अपरिपक्व व्यक्तिमत्त्व आहे असे वाटले होते. तो विषयही ज्ञानेश्वर होता. बंडातात्या कर्‍हाडकर/सदानंद मोरे यांच्यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. (बंडातात्या कर्‍हाडकर/सदानंद मोरे/विनायक(राव!) मेटे मंडळींना मोठे करण्याच्या प्रयत्नात असलेल्या 'राष्ट्रवादी सकाळ'वरही लक्ष आहे.)

मटामध्ये आक्षेपार्हे म्हणून दिलेला भाग हा टीव्हीवर दाखवलेल्या उतार्‍यांपेक्षा वेगळा आहे. टीव्हीवर उजव्यापानावर मधला परिच्छेद दाखवत त्यात बाईशी संबंधित वाक्ये होती. नीट वाचता आली नव्हती.

यादवांचा राजीनामा अनपेक्षित होता. बुद्धिवाद आणि झुंडशाही यात झुंडांचा विजय झाला आहे.

विठ्ठला पांडुरंगा..अरेच्च्या चुकलंच. विट्ठलराव पांडुरंगसाहेब आपल्यालाच काळजी.

यादवतात्या कर्‍हाडकर

खरंय!!!

प्रतिसाद आवडला. विठ्ठलराव जिंकले, विठाई हरली.

बिपिन कार्यकर्ते

कीव..

तुकोबांबद्दल उलटसुलट लिहिणार्‍या, 'उचलली लेखणी - लावली कागदाला!' या पद्धतीने लिहिणार्‍या यादवांची कीव करावी तितकी थोडीच!

त्यांच्या पुस्तकातील ९३ व ९४ पानांवर त्यांनी तुकोबांवर जी मुक्ताफळे उधळली आहेत ती पाहिल्यावर यादवांचा सामान्य वकूब लक्षात येतो. आणि तो ध्यानी येऊन त्यांना क्षमा करावीशी वाटते!

असो..

आपला,
(वारकरी) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

काहीही

तुकोबांबद्दल उलटसुलट लिहिणार्‍या, 'उचलली लेखणी - लावली कागदाला!' या पद्धतीने लिहिणार्‍या यादवांची कीव करावी तितकी थोडीच!

कोणाला काहीही लिहिण्याची परवानगी आहे. आणि त्यांनी काही उलटसुलट लिहिले असले तरी हे ठरवणारे हे पुंड कोण?

त्यांच्या पुस्तकातील ९३ व ९४ पानांवर त्यांनी तुकोबांवर जी मुक्ताफळे उधळली आहेत ती पाहिल्यावर यादवांचा सामान्य वकूब लक्षात येतो. आणि तो ध्यानी येऊन त्यांना क्षमा करावीशी वाटते!

चला बरे झाले! यादवांना निदान क्षमाप्राप्ती तरी झाली!


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

प्र् का टा आ

प्र् का टा आ

विद्याधर

तात्याबा

अहो, माणसाला देव मानले की त्याच्या चुका गायब होऊन जातात. त्या एखाद्याने लिहिल्या तर त्याचा वकूब काढला जातो आणि कीव केली जाते.

आपण क्षमा केली याचा विशेष आनंद झाला. वारकर्‍यांनीही असेच करायला हवे होते.

-राजीव.

साधना साप्ताहिकाची प्रतिक्रिया

आनंद यादव यांची माघार ही तर ऐतिहासिक चूक! हे साधना साप्ताहिक २१ फेब्रु २००९ च्या संपाकीय पान नं ३ वर वाचता येईल.
प्रकाश घाटपांडे

साधनामधील लेख आवडला

साधनामधील लेख आवडला. इथे लिंक दिल्याबद्दल धन्यवाद.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

जयंत पवार यांचा लेख

मटामध्ये आलेला जयंत पवार यांचा लेखही छान आहे. वारकऱ्यांचे बजरंग दल होत आहे ही दुःखद बाब आहे.
मटामध्ये आलेला जयंत पवार यांचा लेखही छान आहे. वारकऱ्यांचे बजरंग दल होत आहे ही दुःखद बाब आहे.
मटामध्ये आलेला जयंत पवार यांचा लेखही छान आहे. वारकऱ्यांचे बजरंग दल होत आहे ही दुःखद बाब आहे.
मटामध्ये आलेला जयंत पवार यांचा लेखही छान आहे. वारकऱ्यांचे बजरंग दल होत आहे ही दुःखद बाब आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4278353.cms

आपला,
(वारकरी) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

उत्त्तम लेख

जयंत पवारांचा लेख उत्तम. सदानंद मोरे यांच्या प्रतिक्रियांचे अन्वयार्थ पवारांनी चांगले सांगितले. सदानंद मोरे स्वतःला तुकारामांचे वंशज समजतात. त्यांच्या लोकमान्य ते महात्मा या पुस्तकाबद्दल गोविंद तळवळकर व मोरे यांच्यात चांगलेच वाक् युद्ध साधनाच्या व्यासपीठावर मागील वर्षी गाजले होते.
प्रकाश घाटपांडे

सदानंद मोरे यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र टाईम्समधूनः

'माफी मिळवून संमेलनाध्यक्षाच्या विक्रमाचे सिंहासन शाबूत ठेवण्यात आनंद यादव यशस्वी झाले असते तर कोणाबद्दल काहीही लिहिले तरी माफी मागून त्यातून सुटता येते, असा चुकीचा संदेश जाऊन समाजात असा नवमाफियावाद प्रस्थापित झाला असता', अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी यादवांना माफ न करण्याच्या वारकऱ्यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.
आनंद यादव राजीनामा प्रकरणातील वारकऱ्यांच्या भूमिकेबद्दल 'महाराष्ट्र टाइम्स'कडे पत्र पाठवून डॉ. मोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या पत्रात ते म्हणतात, 'वारकऱ्यांकडूनच काय पण कोणाही संवेदनशील उदारमतवादी वाचकाकडून क्षमाशीलतेची, सौजन्याची व सवलतीची अपेक्षा करण्याच्या लायकीची 'संतसूर्य तुकाराम' ही कादंबरीच मुळात नव्हती.
आपली कादंबरी म्हणजे संशोधनावर आधारित असलेली वास्तववादी कृती आहे, असे नमूद करणाऱ्या यादवांच्या या दाव्याचा समाचार घेताना डॉ. मोरे म्हणतात, 'पारू, गंगी, शांती या मुलींना तुकोबा उधार माल देत, हात हातात घेण्याचा 'आंबटशौक' पुरवीत, भविष्य पाहाण्याच्या निमित्ताने हातात गोळी ठेवण्याचा बहाणा करीत, ही (व अशी अनेक) वास्तवे कोणत्या संशोधनातून उपलब्ध झाली, असा प्रश्ान् विचारणाऱ्या वारकऱ्यांना यादवांनी, तुम्हास कादंबरी कशी वाचायची हे कळत नाही, असे सुनावले होते.

-----------------

कादंबरीत खरेच असे लिहिले असेल तर यादव यांना असे लिहिण्याची काय गरज होती हे खरेच समजत नाही. तुकारामांच्या चरित्रावर असे शिंतोडे उडवण्याचा त्यांना अधिकार नाही. तुकारामांच्या आयुष्यातील घडलेल्या गोष्टींचे पुरावे गेली कित्येक वर्षे कोणालाही मिळालेले नाहीत. शासकीय चरित्र व गाथा, नेमाडे, चित्रे यांनी तुकारामांविषयक लिहिलेली पुस्तके व तुकारामांच्या अभंगातूनही तुकारामांच्या आंबटशौकाबद्दल कधी असे क्लू मिळालेले नाहीत. आनंद यादव यांचा या कादंबरीच्या निमित्ताने पाय घसरला होता असे खेदाने म्हणावेसे वाटते. त्यांनी तुकारामांवरील आरोपांबाबत स्पष्टीकरण व पुरावे द्यायला हवे होते. वारकर्‍यांचा राग समजण्यासारखा आहे. (मात्र त्यांच्या झुंडशाहीला माझा विरोध आहे. )


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

यापुर्वीची प्रतिक्रिया

बदनामीकारक मजकुर नेमका कोणता? या बाबत जी मजकुराची पाने दाखवली गेली त्यात हा मजकुर नाही. या पुर्वीच्या प्रतिक्रियांमध्ये त्याचा उल्लेख नाही.

त्यांनी तुकारामांवरील आरोपांबाबत स्पष्टीकरण व पुरावे द्यायला हवे होते.

कोणत्याही ऐतिहासिक कादंबरीला हा निकष लावल्यास कादंबरी ही कादंबरी होउ शकणार नाही. ऐतिहासिक कादंबरी म्हणजे इतिहास नव्हे. पण लोकांना ऐतिहासिक कादंबरी हाच सत्य इतिहास वाटतो. कादंबरी हा माल असल्याने तो रोचक व्हावा यासाठी मालमसाला घातला जातो.

वारकर्‍यांचा राग समजण्यासारखा आहे. (मात्र त्यांच्या झुंडशाहीला माझा विरोध आहे. )

हेच म्हणतो.
प्रकाश घाटपांडे

बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर

कादंबरी हा कल्पनाविलासावर आधारितसाहित्यप्रकार असला तरी ऐतिहासिक अथवा चरित्रात्मक कादंबरी लिहिताना तिच्या मजकुरातील ऐतिहासिक तथ्ये /दावे / वातावरण निर्मिती उपलब्ध पुराव्यावर पूर्णपणे तावून सुलाखून घेतलेली असलीच पाहिजेत. तसेच हे पुरावे प्रथम दर्जाच्या ऐतिहासिक साधनांवर आधारलेले असावेत.
(नाहीतर आज आपण जसे पौराणिक -रामायण-महाभारतातील 'प्रक्षिप्त' मजकुराच्या नावाने शंख करतो तसा तो पुढे या ऐतिहासिक व्यक्तींच्या चरित्राबाबतही होईल. उदा. 'अशीच आमुची आई असती ' ही छ. शिवरायांवरील आख्यायिका घुसली आहेच!)

इतकेच काय? 'पल्प फिक्शन' किंवा 'सायन्स फिक्शन' लिहिणारे अनेक पाश्चिमात्य लेखक त्या कादंबरीच्या तपशीलांवर वर्षानुवर्षे संशोधन करतात. हे लेखन अभिजात लेखनाच्या पातळीवरचे समजले जात नसले तरी वाचकांना त्याच्या तपशीलात चूक आढळू नये म्हणून बारकाईने शोध केला जातो.

ऐतिहासिक कादंबरीच्या संशोधनाबाबतीत 'विल्यम डालरिंपल' ची 'द लास्ट मोघल' पहाण्यालायक आहे.
असे असताना, भारतात मात्र आपल्याच प्रसिद्ध चरित्रनायकांवर कादंबरी लिहिताना संशोधनात आळशीपणा अक्षम्य आहे.
तुकारामांच्या चारित्र्याबद्दल काही लिहिण्यापूर्वी असे 'सज्जड' पुरावे आनंद यादवांकडे असणे जरूरीचे होते. तसे पुरावे असते तर त्यांच्यावर ही नामुष्कीची वेळ आली नसती.
"कथा - कादंबरी आहे, काहीही ठोकून दिले तर चालते" असा पवित्रा घ्यायचा असता तर संत तुकाराम महाराजांवर नावानिशी कादंबरी लिहिण्यापेक्षा एका काल्पनिक संतावर कादंबरी लिहायची होती. शिवाय " या कादंबरीतील पात्रांचे कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी साधर्म्य आढळल्यास तो योगायोग समजावा" असे प्रकटन ठळक शब्दात द्यायला हवे होते.

ज्याअर्थी आनंद यादवांनी माफी मागितली त्याअर्थी त्यांच्याकडे आपल्या लेखनाचे समर्थन करणारे पुरावे नाहीत. एक जबाबदार साहित्यिक म्हणून समाजातील कोणत्याही वास्तव व्यक्तीवर लेखन करताना त्याबद्दल शहानिशा करून घेणे गरजेचे आहे.
अन्यथा ते 'न' पंतप्रधानांचे 'म' नावाच्या व्हाईसरॉयच्या पत्नीशी संबंध होते अशी भूमका उठवणारे सवंग लेखन ठरते.

एक साहित्यिक या नात्याने आपली जबाबदारी पूर्ण न केल्यास अशा व्यक्तीने साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्विकारणेही योग्य नाही.

अवांतर -
आनंद यादवांचे कादंबरीतील वादग्रस्त विधानांचे स्पष्टीकरण म्हणजे एखाद्या चित्रपट अभिनेत्रीने तिच्या पडद्यावरील शरीर प्रदर्शनाचे चित्रपट कथेची मागणी म्हणून समर्थन करण्यासारखे आहे.

पटले नाही

कादंबरी हा कल्पनाविलासावर आधारितसाहित्यप्रकार असला तरी ऐतिहासिक अथवा चरित्रात्मक कादंबरी लिहिताना तिच्या मजकुरातील ऐतिहासिक तथ्ये /दावे / वातावरण निर्मिती उपलब्ध पुराव्यावर पूर्णपणे तावून सुलाखून घेतलेली असलीच पाहिजेत.

विसुनाना, हे काही पटले नाही. मुळात कादंबरीचा आपल्याकडे मराठीत साधारणतः अर्थ कल्पित कथा या अर्थाने हा शब्द रुढ झाला असावा. माणसाला गोष्ट वा कथा सांगण्याचा, ऐकण्याचा नाद तसा जूनाच आहे. तेव्हा अशा अनेक कथा आहेत ज्या मौखिक परंपरेने आपण एकमेकांना सांगत आलो, तेव्हा मुळ कथेत किती तरी बदल झालेला असतो. तेव्हा मुळ कथा काय होती याचा फारसा विचार न करता मला वाटतं आपण ती कथा इंजॉय करत असतो. तेव्हा अशाही काही महापुरुषांच्या कथा असाव्यात ज्या ब-याच खर्‍या आणि तितक्याच खोट्या असाव्यात. तेव्हा 'संतसूर्य तुकाराम' कादंबरी तशीच एक कथा म्हणून तिचा आस्वाद घेतला पाहिजे. काटेकोरपणे ऐतिहासिक म्हणता येणार नाही पण ऐतिहासिक पुरुषांभोवती जेव्हा एखादे कथानक फिरते तेव्हा असलेल्या नसलेल्या गोष्टी (लेखक लिहितो म्हणून)सापडतात. मराठी वाडःमयाच्या इतिहासात त्याबाबतचे एक उदाहरण सांगता येईल की, घाशीराम कोतवाल ( मी वाचलेले नाही, केवळ माहिती ) ही कादंबरी ऐतिहासिक कथांच्या, दंतकथांसारखी आहे. घाशीराम या एका ऐतिहासिक व्यक्तीभोवती अनेक चमत्कारिक, वर्णनात्मक,शास्त्रीय भाग येतो म्हणून ती ऐतिहासिक म्हणता येणार नाही. लोकांच्या मनोरंजनासाठी त्या गोष्टी लेखकाने लिहिलेल्या असतात. तेव्हा ऐतिहासिक महापुरुषांच्याबद्दल लेखन करतांना ( कांदबरी असेल तर ) ते ऐतिहासिक दस्तऐवजांसह लिहावे हे काही पटत नाही . मात्र लेखन करतांना ऐतिहासिक वातावरण, पात्रे, वर्णन, हे सर्व उभे करण्याचे कसब लेखकाजवळ असले की ते लेखन मनोरंजक होते इतकेच मला सांगायचे आहे, त्यासाठी ऐतिहासिक दस्तऐवजांचा हट्ट धरु नये असे प्रामाणिकपणे वाटते.

-दिलीप बिरुटे

सहमत

बदनामीकारक मजकुर नेमका कोणता? या बाबत जी मजकुराची पाने दाखवली गेली त्यात हा मजकुर नाही. या पुर्वीच्या प्रतिक्रियांमध्ये त्याचा उल्लेख नाही.

ज्या पानांवरून गदारोळ झाला त्यामध्ये हे उल्लेख नाहीत.

----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.

पारू, गंगी आणि शांती

म.टा. मध्ये ही पाने दाखवली नव्हती, पण संदर्भांशिवाय यादवांनी असे लेखन करणे गैर आहे. ही कादंबरी वाचलेली नसल्याने आणि उलटसुलट उतारे दाखवले गेल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर अधिक बोलणे योग्य दिसत नाही. एखाद्याकडे हे पुस्तक असेल तर त्यांनी शहानिशा करावी.

एक गोष्ट खटकली. पारू, गंगी आणि शांती ही तद्दन फिल्मी नावे आहेत. सतराव्या शतकात अशी नावे वापरली जात नसावीत असे वाटते. चू. भू. दे. घे.

पारू, गंगी आणि शांती : तद्दन थापेबाजी

श्री. लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांचे 'श्री तुकाराम चरित्र' वाचताना ते अत्यंत नावाजलेल्या, कर्तव्यदक्ष, धर्मपरायण, विठोबाभक्त घराण्यात जन्माला आले होते आणि त्यांच्या घराण्याकडे देहू बाजारपेठेचे वंशपरंपरागत 'महाजन' पद चालत आलेले होते असे दिसले.
जिज्ञासूंनी 'प्रकरण दुसरे : पूर्वपीठिका' वाचावे.(पुस्तकातील पान ४७. स्कॅनिंगचे पान ६८)
पांगारकरांचा हा ग्रंथ महिपतीच्या तुकोबा चरित्राबरोबरच (महिपतीची संतचरित्रे ऐतिहासिक कसोटीवर योग्य मानली गेली आहेत.) इतर असंख्य ऐतिहासिक साधनांवर आधारलेला असल्याने अधिकृत मानता येईल.

अशा घराण्यात त्याकाळी असले अचकट-विचकट चाळे करणे, स्त्री-लंपट वागणे हे सर्वथैव निषिद्ध असावे. तसेच असे नावानिशी (पारू, गंगी आणि शांती) वर्णन देणे हे केवळ कोण्या विकृत मेंदूतील कल्पनाच असू शकते. मटातले उतारेही भंपक आहेत. तुकारामबुवांना आलेले वैराग्य हे त्यांचे पूर्वचिंतन आणि वयाच्या एकविसाव्या वर्षी भोगावा लागलेला महादुष्काळ (इ.स्. १६२८,२९ आणि ३०), प्रथम पत्नी आणि मुलाचा मृत्यू , दिवाळखोरी या सार्‍यांचा एकत्रित परिपाक होता. पूर्वी केलेल्या दुष्कृत्यांचा पश्चात्ताप होऊन त्यांना वैराग्य आले असे म्हणणे निराधार आहे.

आनंद यादवांनी असे लेखन का आणि कशाच्या आधारावर केले असावे? असा प्रश्न पडतो.

अगदी सहमत

विसुनानांशी अगदी सहमत आहे.

माझ्या माहितीप्रमाणे महिपतींच्या लेखनाव्यतिरिक्त तुकारामांबाबत विश्वासार्ह वाटावे असे मूळ लेखन उपलब्ध नाही. नेमाडे यांनी लिहिलेल्या छोटेखानी चरित्रामध्ये तुकाराम हे अत्यंत प्रामाणिक, सच्छील, कर्तव्यदक्ष, भोळे आणि सज्जन गृहस्थ होते. त्याकाळातील भयंकर दुष्काळामध्ये पहिली पत्नी आणि मुले गेल्यानंतर त्यांचा संसारातील रस कमी झाला. त्यातच (प्रामाणिकपणामुळे) व्यवसायातही दिवाळखोरी आली व सगळे कुटुंब अन्नाला मोताद झाले व तुकोबा देवभक्तीकडे वळले. मात्र यादव यांना अभिप्रेत असलेला विकृतपणा तुकारामांनी केला नाही.

यादवांसारख्या लेखकांनी (कदाचित आपले पुस्तक खपावे म्हणून) केलेला हा स्वस्तपणा घृणास्पद आहे. त्यांनी पुरावे जाहीर करावेत किंवा आता शांत राहावे. या प्रसंगात त्यांची सत्त्वपरीक्षा झाली आहे आणि ते नापास झाले आहेत. :)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

परकीय शक्ती

मला यात परकीय शक्तींचा हात असल्याचा संशय येतोय. :-))(हळूच घ्या)

एकंदरीत यादवांनी लिहिताना हात सैल सोडला आहेच. त्याबद्दल योग्य मार्गाने सरकारी कारवाई करता आली असती. वारकर्‍यांनी माफीची अपेक्षा करणे योग्यच वाटते. फक्त साहीत्य संमेलनाच्या तोंडावर हा वाद कसा निर्माण झाला याचे उत्तर मिळत नाही.

कादंबरी कधी प्रकाशित झाली होती याबद्दल कोणी माहिती देईल काय? याधीही किर्कोळ स्वरुपात याच् कादंबरीबवरून वाद झाला होता आणि तेव्हा या कादंबरीची एक प्रत वारकरी संघाच्या मोरे मंडळींना दिली असल्याचे यादव यांचे प्रतिपादन वाचनात आले होते.

अभिजित यादव
कर्‍हाड.

तंबी दुराई

या विषयावरील तंबी दुराई यांचे दोन फुल एक हाफ वाचनीय आहे. :०

http://www.loksatta.com/daily/20090322/lr06.htm


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अगदी सुंदर

अरेरावी भाषा

आपुलाची धोशा
इंद्रायणी काठी
तण माजे

जीवा लागे माझ्या
पदत्याग तुझा
अनिष्ट ना चिंती
चित्त माझे

विशेष आवडले
प्रकाश घाटपांडे

 
^ वर