हेलनः निसर्गाच्या कुशीतले टुमदार गाव

हेलन या नावातच सौंदर्य आहे, नजाकत आहे हे कोणा भारतीयाला सांगायला नको. अमेरिकेतील जॉर्जिया राज्याच्या उत्तरेला "चट्टाहूची राष्ट्रीय उद्यान" आहे. त्याच्या तोंडाशीच असलेल्या जंगलाला 'युनिकॉय राज्यांतर्गत उद्यान' म्हणतात. या उद्यानाला खेटून 'हेलन' नावाचे टुमदार गाव आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे विविध युरोपिय भागात असतात तशी घरे-हॉटेले आहेत. अमेरिकेत ज्याची कमतरता जाणवते त्या "गल्ल्या", खेटुन असलेली घरे, गर्दी, फेल्ट हॅटस घातलेले पुरुष, युरोपिय झगे (गाऊन्स) घातलेल्या ललना, घोडागाड्या-बग्ग्या, आनंदाने फसफसणारे पब्स, सिगार आणि गर्दी पित बसलेला म्हातारा, फिडल वाजवत गर्दीला रमवणारा वादक असे वातावरण कोणाला आवडणार नाहि. या गावाचे स्थळ हिदेखील निसर्गप्रेमिंसाठी पर्वणीच आहे. या गावाच्या जवळच बरेचसे धबधबे, अनेक लांबीचे ट्रेकिंग रुट्स, व्हाईट वॉटर राफ्टिंगपासून माऊंटन बायकिंगची संधी देणारे जंगल आहे. शिवाय खाणार्‍यांची चंगळ आहेच आणि विशेषतः चवीने पिणार्‍यांसाठी काहि वायनरीजदेखील आहेत.

आमच्याकडे एकच दिवस असल्याने ड्युक्स क्रीक फॉल नावाचा धबधबा आणि याच्या पर्यंत पोचायचा २ मैलांचा अगदी छोटासा ट्रेक करायचे ठरवले. भरपुर पाऊस असल्याने ओलाचिंब रस्ता, जंगलाचा पावसाळी गंध, नैसर्गिक ताजेपणा - ओलेपणा होताच पण पाऊस असल्याने पर्यटकांची वर्दळहि नव्हती. अर्ध्यातासाच्या पायपीटीनंतर आम्हि त्या छोट्याश्या पण सुंदर धबधब्यांच्या पायथ्याशी पोचलो.. बरेच छोटे छोटे झरे बर्‍याच उंचावरून उड्या मारत होते... फारच प्रेक्षणिय . असेच अनेक छोटे - मोठे ट्रेल या गावाजवळ आहेत.

मार्गः
अटलांटापासून आय-८५(उ.) हा राक्षसी महामार्ग पकडावा, त्यातून पुढे आय ९८५ हा राष्ट्रीय उपमहामार्ग पकडावा, पुढे जीए-११ हा अंतरराज्य महामार्ग आणि पुढे जीए-७५ हा अजून लहान रस्त्यावरून हेलनला पोचावे. रस्त्याची रुंदी आपण यांत्रिक जगातून अधिकाधिक मानवी जगात जातोय याची साक्ष पटवते.. आणि हेलनमधील गल्ल्या गाडीतून बाहेर काढून चालत गाव फिरायला भाग पाडतात

रहाण्याची सोयः
इथे अनेक हॉटेले आहेत फक्त तुम्हाला जर्मन पद्धतीच्या, स्पॅनिश पद्धतीच्या की ब्रिटीश पद्धतीच्या हाटीलात रहायचं आहे ते ठरवता यायला हवं

मदतः
गावात शिरण्यापुर्वी, हेलन वेलकम सेंटर आहे तिथून जवळपासच्या अनेक ट्रेक ट्रेल्स, धबधबे, प्रेक्षणिय स्थळे, पर्यटन स्थळे यांची माहिती विनामुल्य दिली जाते. शिवाय एखादे स्थळ आज(ठराविक दिवशी) जाणे सुरक्षित/रोचक आहे का? नसल्यास कोणता पर्याय आहे? तिथे फी आहे का? वगैरे माहिती अगदी नीट दिली जाते. शिवाय मदतीला एक स्पष्ट नकाशा दिला जातो.

काय पहालः
हेलन गाव
वायनरीज (संध्याकाळी ६ पर्यंत)
बग्गीचे प्रदर्शन (सशुल्क)
ऍना रुबी फॉल्स (१ मैल चाल)
ड्युक्स क्रीक फॉल (२ मैल चाल)
युनिकॉय स्टेट पार्क
रिचर्ड रसेल सिनीक हायवे
रेवन क्लीफ फॉल (१४ मैल चाल)
आप्लाशियन ट्रेल (जॉर्जियातुन सुरु होऊन नॉर्थ कॅरोलिनात संपणारा ३-४ दिवसांचा ट्रेल आहे अशी माहिती मिळाली)
योनाह् माऊंटन (इथे ट्रेकिंग ट्रेल आहे की नाहि माहित नाहि)

लेखनविषय: दुवे:

Comments

हेलनच ती....

शेवटी हेलनच ती.... सुंदरच असणार!!! :)

अजून फोटो टाक रे. धबधबा मस्तच आहे.

बिपिन कार्यकर्ते

मस्त...

शेवटी हेलनच ती.... सुंदरच असणार!!! :-)

ऋषिकेश, मस्त लेख!
-सौरभ.

==================

हेलन

छोटेखानी सचित्र लेख आवडला. दक्षिण कॅलिफोर्नियातही सोल्वँग नावाचे एक डॅनिश गाव आहे, त्याची आठवण आली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

मस्त्..

वा सही लेख व फोटोज!!
मलाही सोल्वांग आठवलं! तेही सुंदर आहे!

( अरेच्या.. आता मला आजुबाजुला लेखांचे विषय दिसू लागलेत.. हे सगळं लिहीता येईल की! )

अरे वा!

हे सगळं लिहीता येईल की!

अरे वा!. लिहा की.. वाट पाहतोय :)

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

हो नक्की,

नक्की लिहीन.. आम्ही जरा उशीरा संध्याकाळी गेलो होतो, फोटोही नाहीएत.. त्यामुळे एकदा परत जाऊन मग नक्की लिहीन !! :)

छान

छान लिहिलेस!
अगदी त्या वातावरणात गेल्यासारखे वाटले.

आपला
गुंडोपंत

सकाळ प्रसन्न करणारा लेख.

ऋषिकेश लेख आणि त्यातली छायाचित्रे असे दोन्ही आवडले.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

छान

वा ऋषिकेश फोटो, वर्णन आवडले.

सफर आवडली

वा ! हेलेनची सफर आवडली.

अमेरिकेत ज्याची कमतरता जाणवते त्या "गल्ल्या", खेटुन असलेली घरे, गर्दी, फेल्ट हॅटस घातलेले पुरुष, युरोपिय झगे (गाऊन्स) घातलेल्या ललना, घोडागाड्या-बग्ग्या, आनंदाने फसफसणारे पब्स, सिगार आणि गर्दी पित बसलेला म्हातारा, फिडल वाजवत गर्दीला रमवणारा वादक असे वातावरण कोणाला आवडणार नाहि.

ह्यासाठी आता जावेसे वाटते आहे.

एक शंका: हे सगळे उगीच नाटकी उभे केले आहे? की खरोखरच इथले लोक असं राहतात?

काहि खरे काहि नाटकी

प्रतिसादाबद्द्ल धन्यु!
यातील काहि गोष्टी नाटकी - मुद्दामुहुन केल्या आहेत तर काहि त्यांच्या राहण्याचा भाग आहेत असे वाटले.

जसे गल्ल्या, खेटून असलेली घरे आहेत व त्यात खरोखरचे गावकरी राहतात. घोडागाड्या, झगे- फेल्ट हॅट घालून वावरणे हा व्यावसायिकतेचा भाग वाटला तरी आता त्यांच्या अंगवळणी पडल्यासारखा वाटला.
मात्र काहि खास युरोपिय वळणाच्या - जुन्या फाँटच्या पाट्या, घरांचा चकचकीतपणा वगैरे खास नाटकी वाटले. (राहती घरे इतकी चकचकीत असली की चित्रपटाचा सेट भासु लागतो :) )

शेवटी हे एक पर्यटन स्थळ असल्याने काहि ठिकाणी कृत्रिमता जाणवते.. काहि गोष्टी मात्र सुखद वाटतात.. असेच फिरता फिरता एक विंडमिल नजरेस पडली... चक्क चालु होती तेव्हा काहि गोष्टी खरोखरच असाव्यातसे वाटते.

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

ज्ञानात भर

आम्हाला हेलन हे फक्त हिंदी सिणेमातल्या कॅब्रे करणार्‍या नटीचे नाव आहे एवढेच माहित होते. ड्युक हे सोड्याचे नाव होते.
प्रकाश घाटपांडे

हेलनची ओळख

हेलनची ओळख आवडली. जॉर्जियात तापमान बरे असल्याने या मोसमातही फिरण्याचा आनंद घेता येतो आहे याचे थोडेसे वैषम्य वाटले. ;-)

हेलन

आवडली. आधीचीही आवडली होती. ;)
हे एका शहराचे नाव असेल असे वाटले नव्हते.

----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.

वर्णन आवडले

माहितीसुद्धा उपयुक्त.

"ड" आकाराच्या (इंग्रजी "एस" आकाराच्या) रेषा असलेल्या निसर्गदृश्यांचा जमेल तेव्हा फोटो काढावा! (शेवटचा रस्त्याचा फोटो.)

छान

लहानशी ओळख आवडली.

अमेरिकेत ज्याची कमतरता जाणवते त्या "गल्ल्या", खेटुन असलेली घरे, गर्दी,

हेलन बघायला चांगले असावे (व्याकरणाचे चांगलेच लफडे झाले आहे!) पण बॉस्टनलाही अजूनही काही भाग असे आहेत - उदा. नॉर्थ एंड आणि बीकन हिल.

हा एक फोटो उदाहरणार्थ पहा. अर्थात सगळे गावच तसे नाही, पण झलक मिळू शकते.

 
^ वर