जॅझची निळाई

१९५९ साल. बरोब्बर पन्नास वर्षांपूर्वीची एक दुपार. न्यूयॉर्क मधील एका स्टुडिओत एक सुरांचा अवलिया त्याच्या सहा साथीदारांसहित आला. ती पूर्ण दुपार आणि संध्याकाळ त्यांनी एक अजरामर कलाकृती घडवण्यात घालवली. निमित्त होते 'काइंड ऑफ ब्लु' ह्या आजच्या घडीला जगातील सगळ्यात प्रसिद्ध जॅझ अल्बमची निर्मिती. आणि हा अवलिया म्हणजे 'माइल्स डेव्हिस' नावाचा संगीतकार. जॅझ संगीताच्या जगभरातील कुणाही दिवाण्याच्या संग्रहात हा एक अल्बम असलाच पाहिजे अशी ही अमर कलाकृती.

अमेरिकन किंवा पाश्चात्य संगीत म्हटलं की आपल्या समोर पहिल्यांदा येते ते रॉक आणि पॉप संगीत पण त्याचबरोबर १९ व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेच्या मातीत जन्माला आलेला एक आगळा वेगळा संगीताचा आविष्कार आणि तो म्हणजे 'जॅझ'. अफ्रिकन आणि युरोपियन अश्या दोन्ही प्रदेशातल्या संगीतातून प्रेरणा घेऊन त्यांचा अनोखा मिलाफ जॅझमध्ये करण्यात आला. गांजलेल्या, पिचलेल्या, शोषितांच्या वेदनेला वाट करून देण्यासाठी पाझरलेले सूर म्हणजे 'जॅझ'. गुलामगिरीच्या पाशात अडकलेले हजारो कृष्णवर्णीय जॅझच्या सुरात न्हाऊन निघाले. वेदनेतून झालेला कलेचा आविष्कार हा नेहमीच अतिशय सच्चा असतो व्यावसायिकतेची लागण त्याला झालेली नसते. आणि अगदी हेच दिसून येते जॅझच्या सुरांमधून. काही आठवड्यांपूर्वीच्या न्यूजवीकमध्ये एक फार छान लेख आला होता त्यातला लेखक म्हणतो की, माइल्स डेव्हीसचे सूर म्हणजे, "अनविलिंग टू काँप्रमाइज हिज आर्ट टू प्लीज ऑर अपीज. " कुणाचीही खुशमस्करी करण्यासाठी अथवा समजूत काढण्यासाठी हे सूर नकार देतात. कारण हे संगीत म्हणजे थेट त्याच्या भावनेचा आविष्कार आहे. आणि त्यामुळेच अजूनही हे सांगितं टिकून राहिले आहे. आजच्या घडीलाही ह्या अल्बमच्या आठवड्याला ५००० प्रती खपतात हा त्याचा पुरावा.

जॅझ म्हणजे नुसते सूर. शब्दांच्या पालीकडले. शब्द नसले तरी गूढ काव्य सादर करणारे सूर. माईल्स डेव्हिसच्या ह्या अल्बमने तिथेच सगळ्यांना भुरळ घातली. अगदी राष्ट्राश्यक्ष ओबामा देखिल त्यांचा आयपॉड वरती माइल्स डेव्हीसचे काइंड ऑफ ब्लू ऐकतात असे अभिमानाने सांगतात. बिल कॉस्बी नावाचा विनोदवीर तर आठवण सांगतो की त्याच्या कॉलेज जीवनात त्याला साथ केली ह्या सुरांनीच. सकाळ झाली की पहिले काम म्हणजे काइंड ऑफ ब्लु मधील त्याचे आवडते गाणे सुरू करणे आणि त्याच्या तालावर प्रत्येक दिवसाची सुरुवात करून अख्खे कॉलेज जीवन काढले.

जॅझची ओळख मलाही नुकतीच झाली. जे काय कानावर पडले ते खूप आवडले. पुन्हा पुन्हा ऐकले तेव्हा अजून आवडले. आणि त्यातुनच इतक्या सुंदर संगीतप्रकारा विषयी इतरांनाही सांगावे म्हणून हा लेख लिहावासा वाटला.

इथे ऐका काईंड ऑफ ब्लु मधील मला सगळ्यात आवडलेले गाणे : "सो व्हॉट"

Comments

चुटपुटती ओळख

जाझ या संगीत प्रकाराची अतिशय चुटपुटती ओळख करून दिली.
पण अजून वाचायला आवडेल.

काही अतिरेकी भारतीय संगीत प्रेमींच्या
माझ्या कशा ओळखी आणि ओडझुन ताणून बनवलेले गुरुवर्य वगैरे असल्या एक कल्ली लिखाणा नंतर

हा लेख म्हणजे एक छानशी झुळुकच आहे!

आपला
स्पष्ट
गुंडोपंत

सुंदर

सुंदर लेख. याआधी बरेचदा जॅझशी ओझरती भेट झाली पण बसून गप्पा मारण्याचा योग आला नाही. पण जितकी भेट झाली त्यामुळे हे प्रकरण फारच अफलातून आहे याची खात्री पटली. इटलीमध्ये माझ्या घराच्या तळमजल्यावर एक जॅझ संगीतकारांचा अड्डा होता, ते दर शनिवार-रविवार त्यांच्या कॉन्सर्टची प्रॅक्टिस करत असत. याहून चांगले घर आजपर्यंत मिळाले नाही. :-)

स्वगत : इथे जॅझ तिथे एकाहून एक सुंदर पुस्तकांची यादी आणि आयुष्य एकच. बहुत नाइन्साफी है. :प्

----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.

उत्तम

जॅझची ओळख करून देणारा लेख आवडला. 'सो व्हॉट' हे गाणेही अप्रतिम. ओबामा आणि कॉस्बीचा उल्लेख वाचून पहिल्या 'ब्लॅक प्रेसिडेंट'ने न्यूपोर्ट जॅझ फेस्टिवलमध्ये छेडलेले हे सूर आठवले -

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

जॅझ

वा... जॅझची ओळख आवडली. गुंडोपंतांचे मत आवडले.

जे काय कानावर पडले ते खूप आवडले. पुन्हा पुन्हा ऐकले तेव्हा अजून आवडले. आणि त्यातुनच इतक्या सुंदर संगीतप्रकारा विषयी इतरांनाही सांगावे म्हणून हा लेख लिहावासा वाटला.

हे सर्वात जास्त आवडले. बस, एखादे संगीत आवडायला त्यातली जाण असायलाच हवी असे कधीच वाटत नाही. मग ते भारतीय असो वा अभारतीय.






सुरेख

मस्त ओळख कोलबेरपंत. ट्रम्पेटचे सूर काही वेगळेच. :)

एक आठवण झाली. पुण्यात ईस्ट स्ट्रीट रोडवर एक बर्गर किंग आहे. (इथल्या चेनचे नाही. हा स्वतंत्र ठेला आहे.) त्याच्याकडे १९९९-२००० काळात १५ रुपयांत उत्तम बर्गर मिळायचा. दुकानात जिमी हेंड्रिक्स, बीटल्स वगैरे पाश्चात्त्य संगीतातील लोकप्रिय व्यक्तींचे मोठमोठी पोस्टर त्याच्याकडे लावलेली होती. बीटल्सची लव मी डू, आय वाना होल्ड योर ह्यांड ही गाणी पहिल्यांदा तिथेच ऐकली. मूडमध्ये असला की जॅझ गाणीही लावायचा तो. हाटेलात सिगरेटच्या धुराने अगदी कुंद वातावरण असायचे. हॉटेलचे स्वरुपही अगदी उंच स्टूल आणि लांब बाकडी असे काऊबॉय चित्रपटात दिसते त्याप्रमाणे. त्याच्या दुकानात हे वाकड्या दांडीचे ट्रम्पेट वाजवणार्‍या कोणाचा तरी फोटो होता असे आठवते. (आम्हाला त्यावेळी फक्त मायकेल जॅक्सन आणी ब्रिटनी स्पीअर्स माहिती होते :)) - पुणे टाईम्सची कृपा ) मालक मात्र एक नंबर पुणेरी होता. आमच्या चार वर्षाच्या भेटीगाठीत त्याने स्मितहास्य केल्याचे आठवत नाही.

पुढे हे दुकान कल्याणीनगरला शिफ्ट झाले त्याने रिवरफ्रंट गार्डन रेस्टारंट असे काहीतरी केले आणि सगळी रया गेली असे ऐकले आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

बर्गर किंग

पुढे हे दुकान कल्याणीनगरला शिफ्ट झाले त्याने रिवरफ्रंट गार्डन रेस्टारंट असे काहीतरी केले आणि सगळी रया गेली असे ऐकले आहे.

अरेरे...हे माहित नव्हते. १५-२० रुपयात भला मोठा बर्गर मनसोक्त हादडायला मिळायचा आणि अजानुकर्णांनी वर्णन केलेले वेगळेच वातावरण त्यामुळे ह्या बर्गर किंगमध्ये मित्रमंडळीं सोबत बर्‍याचदा जाणे व्हायचे. त्याचे हे असे झालेले ऐकुन वाईट वाटले...कालाय तस्मै नमः !

वा वा!

कोलबेर मस्तच ओळख करुन दिलीत! धन्यवाद!
हल्ली इंग्रगी गाण्यांनी मला बरीच भुरळ पाडली आहे. ऐकायलाच पाहिजेत अशी इतरही गाणी/ कलाकार सुचवावेत.

-सौरभ.

==================

ऐकायलाच पाहिजेत अशी इतरही गाणी

ऐकायलाच पाहिजेत अशी इतरही गाणी/ कलाकार सुचवावेत.

राजेंद्र ह्यांनी लिहिलेला हा लेख आणि त्यावरील प्रतिसाद पहा. भरपूर गाणी मिळतील.

दुवे

दुव्याबद्दल धन्यू, कोलबेरपंत.
यातील काही दुवे आता काम करत नसण्याची शक्यता आहे.

----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.

वाह - जॅझची धावती ओळख आणि माइल्स डेव्हिस

ध्वनिफीत मस्तच.

जॅझमध्ये सादर करता-करता संगीतनिर्मिती (इम्प्रोव्हायझेशन) हे खासच असते. (पाश्चिमात्त्य अभिजात संगीतात पूर्वी इम्प्रोव्हायझेशनला जागा होती, आता ते फार अपवादाने होते.) यामुळे काही लोकांना भारतातील अभिजात संगीताच्या सादरीकरणाशी त्याचे साधर्म्य वाटते.

(स्वरमेळाच्या बाबतीत काही ठळक फरक असले तरी ते पाश्चिमात्त्य संगीताशीच सैद्धांतिक नाते सांगते.)

या संदर्भात एनपीआर रेडियोवरती हल्लीच "माइल्स फ्रॉम इंडिया" या एका प्रकल्पाबद्दल ऐकायला मिळाले (रेडियो कार्यक्रमाचा दुवा). या संगीताची एक झलक यूट्यूबवरही ऐकायला मिळू शकेल (यूट्यूब दुवा).

लेख आवडला

जॅझ ऐकायला आवडते.
माईल्स डेव्हिसचे काही एनपीआर दुवे -
लाईव्ह परफॉर्मन्सची मजा काही औरच असेल. इथे एकदा एका बार्न्स ऍंड नोबलच्या दुकानात तरूण पोरे वाजवत होती, तेव्हा तिथे फिरत पुस्तके पाहणे वेगळीच अनुभूती देऊन गेले ते आठवले.

 
^ वर