माझ्या संग्रहातील पुस्तके - १

प्रास्ताविक: वाचनाची आवड असलेल्या आपल्या सर्वांच्या घरी नेहमीची लोकप्रिय पुस्तके तर असतातच, पण आपल्याकडे आपल्याला आवडलेली अशी काही खास पुस्तके असतात. आपली अभिरुची, आपले अनुभव आणि आपली जीवनविषय दृष्टी (बापरे! भाषा अगदीच 'सत्यकथे'ची झाली!) यावर अवलंबून आपल्याला त्या पुस्तकांनी भुरळ घातलेली असते. मग ही पुस्तके बेस्टसेलर्स किंवा टीकाकारांनी प्रशंसा केलेली असतीलच, असे नाही, पण हा आपला अगदी खाजगी, स्वत:ची स्वाक्षरी असलेला संग्रह असतो.
अशा, जराशा अपरिचित पुस्तकांचा परिचय करुन देण्यासाठी या मालिकेचा संकल्प सोडला आहे. यात वेळोवेळी सुजाण प्रगल्भ वाचकांनी भर घालावी आणि उद्याच्या वाचकवर्गासाठी हा एक डेटाबेस तयार व्हावा, अशी यामागची कल्पना आहे.

गदिमांच्या सहवासात

ग. दि. उर्फ अण्णा माडगूळकर हे एक बहुपेडी, चौखूर उधळलेले व्यक्तिमत्व होते. ज्यांच्या लेखणीला जन्मजातच प्रतिभेचा स्पर्श झालेला असतो आणि ज्यांच्या रचना पाहून 'हे केवळ प्रयाससाध्य असणे शक्य नाही' अशी भावना मनात येते अशा लेखकांपैकी एक म्हणजे गदिमा. गदिमांच्या बहुस्पर्शी व्यक्तिमत्वामुळे त्यांचा लोकसंग्रहही जबरदस्त असाच होता. त्यांच्या सावलीत वाढलेल्या पिढीबद्दल बोलतांना पु. ल. देशपांड्यांनी अभिमानाने ' वी आर माडगुळकर बॉईज' असे अभिमानाने म्हटले आहे. मधुकर गोपाळ उर्फ बाबा पाठक हे असेच गदिमांच्या तालमीत तयार झालेले. बाबांचे वडील हे अण्णांचे शिक्षक. पण ही फक्त बाबा आणि अण्णांमधील नात्याची सुरुवात झाली. त्यानंतरचा या दोघांचा एकत्र आणि दीर्घ प्रवास चित्रित करणारे 'गदिमांच्या सहवासात' हे पाठकांचे पुस्तक माझ्या संग्रहात आहे.
उत्कर्ष प्रकाशनाचे दोन -अडीचशे पानांचे पुस्तक म्हणजे पाठकांनी सोप्यातल्या झोपाळ्यावर बसून पान जमवता जमवता वाचकांशी घरगुती भाषेत मारलेल्या गप्पाच आहेत. औंधच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थीदशेपासून प्रथितयश कथा, चित्रपटलेखक, गीतकार, 'गीतरामायण'कार ग. दि. माडगूळकरांचा हा प्रवास उंचसखल खडबडीत रस्त्यावरुन बैलगाडीतून झाला आहे. या प्रवासात आसपास ग्रामीण कथेत असते तशी गर्द वनराई, निळ्याशार पाण्याचे डोह आणि पाडाला आलेल्या आंब्याची झाडे नाहीत, तर माडगुळ्याच्या परिसरातला भकास, वैराण आणि रखरखीत माळ आहे. या प्रवासात कधी बैलाचे वेसण धरुन तर कधी माडगूळकरांच्या डोक्यावर सावलीची छत्री धरुन पाठकांनी या गोष्टी सांगितल्या आहेत.मधुकर पाठकांची शैली अगदी गोष्टीवेल्हाळ, घरगुती आहे.गदिमा आणि व्यंकटेश माडगूळकरांमध्ये झालेल्या वादानंतर अण्णा व्यंकटेशाला फार बोलले हे म्हणताना पाठक 'झेंडू फुटंस्तवर बोलले' असे लिहितात. हा अगदी सांगली कोल्हापूरकडचा शब्द. कोल्हापुरी बोलण्याचे पाठकांनी असे बरेच हुबेहूब उल्लेख केले आहेत. 'बरं हायसा न्हवं? पोरंबाळं? ठीक?' हे खास गावाकडलं बोलणं.
अण्णा कितीही प्रसिद्ध, सिद्धहस्त वगैरे असले तरी मनानं ते शेवटपर्यंत अल्लडच राहिले. अण्णांबरोबर जमणारे त्यांचे साहित्यीक मित्रही तसेच. ही मंडळी साहित्यीक चर्चा वगैरे करत, पण बर्‍याच वेळा वात्रटपणाही करत. वाह्यात बोलत, हसता हसता लोळत, एकमेकांना मिठ्या मारत. भजी, पाव, सँपल,मिसळ,भडंग असलं अरबटचरबट खात, पानावर पान जमवत आणि खिडकीतून पिचकार्‍या मारत असे पाठक लिहितात, तेंव्हा त्या प्रतिभावान व्यक्तींचा 'प्रौढत्वी निज शैषवास जपणे' हा कवीचा बाणा दिसू लागतो. बरोबरच्या माणसाला गमतीत येऊन चित्रविचित्र नावांनी बोलावणं ही अशीच एक गंमत.माडगूळकर आणि पु.भा.भाव्यांची जगावेगळी मैत्री तर प्रसिद्धच आहे. एकमेकाला चित्रविचित्र नावांनी बोलावणं, दंगामस्ती करणं आणि कधीकधी चिरडीला येऊन लहान मुलांसारखी भांडणं करणं असे उल्लेख बर्‍याच लेखकांनी केलेले आहेत. पाठकांच्या पुस्तकातही अशा गमतीजमती आहेत. माडगूळकरांचे समोर सदा बापट दिसला की 'सदा बापट, जेंव्हा बघावा तेंव्हा बापट! कधी पटवर्धन नाही, की पाटणकर नाही, सदा बापट!' असे म्हणणे हा तसलाच प्रकार. राम गबालेंचे आणि अण्णांचे काय गुपित होते कुणास ठाऊक, पण गमतीत आले की अण्णा गबालेंना बायकी आवाज काढून 'अरे राम, रे राम... तुझ्यासाठी मी दडपे पोहे, की रे, करुन ठेवले होते!" असे म्हणून खळखळून हसत. धुमाळला म्हणण्याचे अण्णांचे पालुपद, 'यार धूमल, तुम्हारा हिंदी में बहुत नाम है यार' हे असे. अशा अनेक किश्श्यांनी हे पुस्तक कमालीचे मनोरंजक झाले आहे. एरवीही प्रसिद्ध व्यक्तींच्या खाजगी आयुष्यात डोकावून बघणे कितीही शिष्टाचाराला सोडून असले तरी हा मोह टाळता येणे कठीण असते. पाठकांच्या पुस्तकात माडगूळकरांबरोबरच गोविंदराव घाणेकर, सुधीर फडके, राजा परांजपे, राजा ठाकूर अशा अनेक प्रतिभावान व्यक्तींचे आणि त्यांच्या परस्परसंबंधांचे मनोहारी चित्रण आहे. यातल्या काही व्यक्तींच्या व्यसनांचे उल्लेख आणि हंसा वाडकरांच्या आयुष्यातला एक खाजगी प्रसंग सोडला तर या पुस्तकात 'तसे' खमंग, चुरचुरीत असे काही नाही. पण एखादे पुस्तक, तेही साहित्य - सिनेमा व्यवसायातील माणसाशी संबंधीत असे पुस्तक - चांगले असण्यासाठी तसले काही आवश्यक नसते, हेच जणू पाठकांनी या पुस्तकाद्वारे सिद्ध केले आहे.
या पुस्तकाच्या निमित्ताने आता भूतकाळात जमा झालेल्या एका विलक्षण प्रतिभावान आणि समाजमानसाची नाडी ओळखलेल्या व्यक्तीचे नव्हे तर पिढीचे चित्र आपल्यासमोर उभे रहाते. या कंपूमधले सगळेच एकाहून एक श्रेष्ठ होते. दामले फत्तेलाल जोडीतले साहेबराव फत्तेलाल यांच्याविषयीचा एक प्रसंग पाठकांनी सांगितला आहे. 'जशास तसे' मध्ये जात्याला टाकी लावत बसलेली डोंबारीण असा सीन बघून साहेबराव म्हणाले, 'बाई.. त्यातनं डोंबारीण, मुक्यानं कशी टाकी लावेल? तिच्या तोंडात शब्द नसले तरी चालतील, पण ती गाणारी. नाचणारी जमात आहे, काहीतरी ततनं ततनं ततनं ननं असं गुणगुणणारच...' किती बारीक आणि अचूक निरिक्षण आहे हे!
भाषांवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर जागोजागीच्या बोलीभाषा, त्यांतले खटके यांचा सूक्ष्म अभ्यास असला पाहिजे. माड्गूळकरांचा फक्त संतसाहित्याचाच अभ्यास होता असे नव्हे, पण महाराष्ट्रात सर्वत्र बोलल्या जाणार्‍या स्थानिक गावठी भाषांचीही त्यांना माहिती होती. पाठकांनाही अशी भाषांची चांगली जाण आहे. मिरजेच्या मेकपमन बारगीरशी बोलताना माडगूळकर मुसलमानी हिंदीत बोलत. त्यांच्या तोंडची पाठकांनी वर्णन केलेली ' बारगीर, सावकार को काय को मेकप किया है, रे?' अशी वाक्ये ऐकून मजा वाटते.गमतीत येऊन माडगूळच्या बामणाच्या पत्र्यासमोरच्या मातीत गमतीगमतीत कुस्ती खेळणार्‍या माडगूळकरांना आणि अप्पाला बंडामास्तर म्हणतो ते ' गड्यांनो, कुस्ती व्हायची तर ती शिस्तीत झाली पाहिजे..' यातला 'शिस्तीत' या खास गावरान शब्द. पाठकांनी अशा गमती जागोजागी केल्या आहेत. असे हे गमतीदार आणि कमालीचे मनोरंजक असे पुस्तक माझ्या संग्रहात आहे.

Comments

उ त्त म!!!

जराशा अपरिचित पुस्तकांचा परिचय करुन देण्यासाठी या मालिकेचा संकल्प सोडला आहे

त्वरेने आणि ठरावीक कालखंडातूनच हा संकल्प पूर्ण व्हावा ही इच्छा.
पहिलाच लेख उ त्त म!!! पुढच्यांची प्रतीक्षा.

अरे वा

अरेवा अशी ठेवणीतली पुस्तक बाहेर काढा कि राव! पुस्तक जरी आमच्या च्याने वाचुन नाही झाले तरी आपण दिलेला परिचय लक्शात राहिल.
प्रकाश घाटपांडे

असेच

पुस्तक जरी आमच्या च्याने वाचुन नाही झाले तरी आपण दिलेला परिचय लक्शात राहिल.
असेच म्हणतो. अगदी स्तुत्य उपक्रम. सगळी उत्तमोत्तम पुस्तके सगळ्यांना वाचणे शक्य होतेच असे नाही. या निमित्तने आपण काय-काय मिस करत आहोत ते कळले तरी खूप.

----
काय? तुम्ही चित्रपट पाहिलेत? आणि वर फोटोही काढलेत? स्वतःला भौतिकशास्त्रज्ञ कसे म्हणवते तुम्हाला?

सहमत

सहमत...

फारच छान उपक्रम. पहिला भाग सुरेख झाला आहे. यानिमित्ताने अनेक नव्या पुस्तकांची ओळख होईल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

उत्तम लेख

संजोपरावांच्या खास शैलीतला एक कसदार लेख. आदर्श पुस्तक परिचय कसा असावा याचे उदाहरण. माडगूळकरांच्या पुस्तकातून त्यांच्याबद्दलचे अनेक किस्से अगदी "क्लोज् अप्" अशा चित्रदर्शी शैलीतून पहावयास मिळतील असे परिचयावरून दिसते आहे. पुस्तक "बुक" करायला हवे. प्रकाशनाचे नाव आणि जमल्यास आवृत्तीचे वर्ष संजोपरावांनी द्यावे असे सुचवतो.

पुस्तकाबद्दल वाचताना , या परिचयाचा आस्वाद घेताना आणखी जाणवलेली एक गोष्ट म्हणजे , एखाद्या विस्मृतीत गेलेल्या (किंवा अतिशय वेगाने विस्मृतीत जात चाललेल्या) काळातल्या एका मानकर्‍याबद्दल हे पुस्तक आहे. पटकन् एक मजेदार विचार मनात आला : माझ्यापेक्षा १० वर्षांपेक्षाही लहान असलेल्या व्यक्तींना या पुस्तकातून काय मिळेल ? (त्याहून जास्त लहान असलेल्या , पंचवीशीतल्या व्यक्तींबद्दल या संदर्भात विचारही करणे आता अशक्य !) माडगूळकर हे सुप्रसिद्ध हे खरे ; पण राजा बरगीर , राम गबाले , फत्तेलाल , दामले ही नावे तरी या लोकांनी ऐकलेली असतील काय ? लक्षांत घ्या , मी पुस्तकाच्या किंवा त्याच्या परिचयाच्या गुणवत्तेचे श्रेय कमी करत नाही , तर अगदी काहीच दशकांपूर्वी प्रसिद्धीच्या झोतात , रंगमंचाच्या मध्यभागी उभ्या असलेल्या व्यक्तींचा विसर किती झपाट्याने पडू शकतो याबद्दल जे वाटले ते लिहीले आहे. या पुस्तकाच्या नि त्याच्या परिचयाच्या निमित्ताने या काळाला , त्यांच्या खुमासदार मराठी भाषेच्या नमुन्यांना , जगण्याच्या शैलीला उजाळा मिळाला.

बाकी खुद्द माडगूळकरांकडून (थोरली नि धाकली पाती) त्या काळाबद्दल , त्यांच्या कुटुंबाबद्दल पुष्कळ लिहिले गेले आहे. व्यक्तिचित्रे , आठवणी , स्फुटलेख अशा स्वरूपाची पुस्तकेच या दोघांमधे मिळून सुमारे १५-२० निघतील. पुलंचा गदिमांच्या वरचा सुरेख लेखही य संदर्भात आठवतो. माडगूळकरांनी आपल्या आईचा गौरवग्रंथ काढला होता. त्या माऊलीचा त्याग पूर्णपणे शिरोधार्य मानूनही , सुमारे ४०० पानांच्या लेखाचे पुस्तक थोडे कंटाळवाणे होते असा (पण थोड्या उपरोधिक शैलीतला ) उल्लेख जीए-सुनीताबाई पत्रव्यवहारात आढळतो.

मनोरंजनमूल्य

पटकन् एक मजेदार विचार मनात आला : माझ्यापेक्षा १० वर्षांपेक्षाही लहान असलेल्या व्यक्तींना या पुस्तकातून काय मिळेल ? (त्याहून जास्त लहान असलेल्या , पंचवीशीतल्या व्यक्तींबद्दल या संदर्भात विचारही करणे आता अशक्य !) माडगूळकर हे सुप्रसिद्ध हे खरे ; पण राजा बरगीर , राम गबाले , फत्तेलाल , दामले ही नावे तरी या लोकांनी ऐकलेली असतील काय ?

बरगीर, फत्तेलाल, दामले ही नावे मीदेखील ऐकलेली नाहीत. मात्र तरीही पुस्तकाचे मनोरंजनमूल्य कमी होऊ नये असे वाटते. आचार्य अत्रे आणि पु भा भावे यांच्या प्रसिद्ध वादाबद्दलचे आदेश विरुद्ध अत्रे हे पुस्तक मी वाचले तेव्हा मला फक्त अत्रे माहीत होते. पुस्तकातील अनेक संदर्भ हे थेट समजणारे नव्हते मात्र तरीही पुस्तकाने आनंद दिला व नंतर संदर्भही लागले.

अनेक परदेशी लेखकांनी लिहिलेल्या आत्मचरित्रपर व तत्सम पुस्तकांतील व्यक्तींची माहिती असणे नेहमीच शक्य नसते. मात्र तरीही पुस्तकवाचनात त्याचा अडथळा येत नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

शांताराम आठवले

यांचे एक असेच प्रभातमधल्या काळावरचे एक सुरेख पुस्तक लहानपणी वाचले होते. आता नावही आठवत नाही पण "आधी बीज एकले" हे त्यांनी लिहीलेले गाणे होते, पण ते अनेकदा लोकांना संत तुकारामांचे पद असावे असे वाटायचे त्यासंबंधीची त्यांनी लिहीलेली आठवण या पुस्तकात होती.

जरी हा काळ जुना असला तरी लेखकाच्या शैलीमुळे ते कालातीत लिखाण होऊ शकते.

आधी बीज एकले

http://www.aathavanitli-gani.com/Song%20Html/868.htm

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

तपशील

उत्कर्ष प्रकाशन,पुणे ४, आवृत्ती दुसरी, मे २००१, २१३ पाने, किंमत दीडशे रुपये
मुक्तसुनीतांच्या म्हणण्यात तथ्य आहे. पण तसे बघायला गेले तर काहीच अढळ, अक्षय असे असत नाही. काळाच्या रेट्यात भलेभलेही वाहून जातात. आणि यात शल्य वाटण्यासारखे काही नाही / नसावे, असे मला वाटते. माझ्या / आपल्या पिढीला माहिती असणारे हे लोक, म्हणून त्यांच्याविषयीच्या पुस्तकांशी जवळीक वाटते हे खरेच, पण माझ्या मते गदिमा हे व्यक्तिमत्व अजिबात माहितीही नाही असे (मुक्तसुनीतांच्या म्हणण्यानुसार आज पंचविशीत असणारे) काही लोक असतील, तर त्यांनाही हे पुस्तक वाचून हे कोण आणि काय व्यक्तिमत्व होते, असे कुतूहल वाटावे, असे हे पुस्तक आहे, असे मला वाटते. यातच लेखकाचे यश आहे, असेही मला वाटते.
सन्जोप राव

श्री. माडगुळकर ह्यांच्या परिवारापैकी.

मध्यंतरी मुंबईत एक ट्याक्सीवाला भेटला होता. मला (मराठीत बोलताना) बघून तो आश्चर्यचकीत झाला होता. (माझ्याकडे बघितल्यावर ह्या प्राण्याला बापजन्मात मराठी बोलता येणार नाही अशी लोकांची समजूत होते!) मला कशीकाय बुवा मराठी येते असे त्याने विचारले, आणि पुढे गप्पांच्या ओघात त्याने असे सांगितले की तो मराठी साहित्यकर्ता श्री. माडगुळकर ह्यांच्या परिवारापैकी आहे. १९६५ च्या आसपास तो येऊन मुंबईत स्थिरावला, नंतर त्याने इस्लाम् धर्म स्वीकारला वगैरे वगैरे. मला काही त्याचे बोलणे मनावर घ्यावेसे इतके खरे वाटले नाही. परंतु त्याला छान उतारे मन:पाठ होते, आणि इच्छित ठिकाणी पोहोचवेपर्यंत त्याने चांगलीच करमणूक केली.

ता.क.: म्हमद र्‍हेमान् भाई माडगुळकर असे त्याचे नाव सांगितलेले माझे स्मरणात आहे.

हैयो हैयैयो!

मराठी परिवार

(माझ्याकडे बघितल्यावर ह्या प्राण्याला बापजन्मात मराठी बोलता येणार नाही अशी लोकांची समजूत होते!)

आपल्या आयडी कडे बघुन आम्हालाही तसच वाटल होतं. (खोट कशाला बोलु?)
माडगुळकर हे गावावरुन पडलेले आडनाव असल्याने तो परिवारापैकी असण हे त्याला नक्कीच अभिमानस्पद वाटले असणार.

प्रकाश घाटपांडे

आणखी एक

या मालिकेत सर्वांचे स्वागत आहे. घाटपांडे आणि राजेंद्र यांनी म्हटल्याप्रमाणे सगळ्यांना सगळे वाचणे शक्य होत नाही. प्रत्येकाने / जमेल त्याने आपल्याला आवडलेल्या आणि तशा अपरिचित पुस्तकाविषयी लिहिले तर हा संकल्प सोडल्याचे सार्थक होईल. बेस्टसेलर्स किंवा सर्वपरिचित पुस्तकांविषयी शक्यतो लिहू नये. ती पुस्तके बहुतेकांनी वाचलेली असतातच.
सन्जोप राव

माझीया जातीचा मज भेटो कोणी.

ज्याना पुस्तकांची आवड आहे आणि पुस्तक परिचय, परिक्षण अथवा समिक्षा लिहिण्याचीही आवड आहे अशांनी आठवड्यात एका पुस्तकावर जरी लिहिले तर वर्षात अंदाजे ५० लेख होतील. किमान २० तर व्ह्यायलाच हवे. असे ५/७ जण जरी आले तर मराठीत हाही प्रकार रुळायला वेळ लागणार नाही.

त्यामुळे जी काही पुस्तके आवडत जातील त्यावर लिहित जाणे हेच श्रेयस्कर.

जात

इथे जात कशाला हवी? अशाने जात जाणार कशी? गांधींचे अभ्यासक आणि जात? हे पटले नाही बॉ.


तुकरामांचा अभंग आहे.

माझीया जातीचा मज भेटो कोणी हा संत तुकरामाचा प्रसिद्ध अभंग आहे. माझ्या आवडीचा व्यक्ति मला भेटो असे ते विनवणीच पांडुरंगाकडे करत आहेत.

बुद्धाने " अनित्य जाति संस्कार" असे पद सांगितले आहे. येथे जाति म्हणजे जन्मांतरीचा संस्कार असा आहे.

सध्या आपण जो अर्थ घेतला आहे तोही उचितच आहे जसे जाती म्हणजे मराठा, ब्राह्मण, माळी, न्हावी इत्यादी.

एकाच शब्दाचे अर्थ काळानुसार कसे बदलत जातात याचाच विचार माझ्या मनात चालु आहे.

मुख्य मुद्दा म्हणजे पुस्तकाच्या आवडीच्या लोकांचा गट बनणे हाच अभिप्रेत आहे.

कधी जमल्यास आपण आमच्याही संकेतस्थळाला भेट देऊ शकता अर्थात तेथे सध्या गजबज नाही हेही तितकेच खरे आहे. ( www.pustakvishwa.com).

उपक्रमावर या प्रकारचे ( पुस्तकपरिक्षण इत्यादी ) निर्माण व्हावे हीच सदिच्छा आणि प्रयत्न).

जात

माफ करा पण आम्हाला जात म्हटलं की आरक्षण आणि वाद आठवतात. आमचा नाईलाज आहे. उगाच विषयांतर होते.


दुरुस्ती

तुकारामांच्या अभंगाविषयीची तुमची माहिती बरोबर आहे.
मात्र
"भेटणे" ह्याक्रियापदासाठी अनेक खेड्यांत अजूनही "मिळणे" हे क्रियापद वापरतात.

हे निरीक्षण उलटे आहे. मिळणे या क्रियापदासाठी भेटणे हे क्रियापद वापरले जाते.

उदा. दुकानात ही वस्तू भेटेल का वगैरे. (मिळेल ऐवजी).
मात्र मित्राला भेटायला चाललो आहे असेच म्हणतात. मित्राला मिळायला चाललो आहे असे नाही.

आपला,
(गावकरी) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मी तरी ऐकलेले नाही

राम्या व इतर मित्रान्ला जाऊन मिळालो असे म्हटले तर ते योग्य वाटते. पण राम्या मिळाला हे चुकीचे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

असेच

मिळणे या क्रियापदासाठी भेटणे हे क्रियापद वापरले जाते.
असेच मलाही वाटते. देवळापाशी राम्या 'मिळाला' हे मीही ऐकलेले नाही. 'थंडी लयी, म्हून दिवसातून तीनदा रम भेटते' (संदर्भः गलोलः अनंत मनोहर, अधिक तपशीलासाठी याच सदरावर लक्ष ठेवा!) हे वाचलेले / असे ऐकलेले आहे.
सन्जोप राव

.

.

खोटे असे म्हटलेले नाही

'भेटणे' ला मिळणे' असे म्हटले जाते हे खोटे आहे असे मी (तरी) म्हटलेले नाही. असे असणे अगदीच शक्य आहे. माझ्या ज्ञानापेक्षा माझ्या अज्ञानाच्या कक्षा अधिक रुंद असल्याने असे असणे अगदी शक्य आहे. प्रॉबेबल, इव्हन पॉसिबल!
सन्जोप राव

"भेटो".

हा हा हा

तुकारामाचा अभंग मूळ "माझिया जातीचा मज मिळो कोणी" असा वाचल्याचा आठवतो.

मी कुणाच्या बाजूने?

संजोप, तू कुणाच्या बाजूने ? भेटो, की मिळो ?
मी कुणाच्या बाजूने? कुणाच्याच नाही. किंवा 'मिळालो' की सांगतो...
सन्जोप राव

वाचतो आहे....

पु.म.ग्रं मध्ये शनिवारी मिळाले. प्रथमावृत्ती जानेवारी १९८२ची आहे. मूल्य ३५ रुपये. शिवाय प्रथमावृत्ती मॅजेस्टिकने काढलेली आहे.
अर्धेमुर्धेच वाचून झाले आहे मात्र तुम्ही म्हणता तसे गमतीदार आणि कमालीचे मनोरंजक आहे.
अण्णांच्या मित्रमंडळींच्या राबत्याविषयी तुम्ही लिहलेच आहे. हा परिच्छेद मुळातूनच वाचण्यासारखा आहे.

"पानावर पान जमवत आणि खिडकीतून पिचकार्‍या मारत. आमच्या खिडकीसमोरची जमीन लालभडक झाली होती. कितीही पाऊस पडला, तरी तिचा तो साहित्यिक लालपणा थोडासुद्धा फिकटला नाही."

पुस्तकात अगदी जुनी पुराणी बरीच छायाचित्रेही आहेत. जमलं तर इथे टाकेन.
पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद सन्जोप राव.

-सौरभ.
==================

जरुर

पुस्तकात अगदी जुनी पुराणी बरीच छायाचित्रेही आहेत. जमलं तर इथे टाकेन.
हे तर सोन्याहून पिवळे होईल. जरुर टाका.
धन्यवाद.
सन्जोप राव

छान!

पुस्तकपरीचय आवडला आणि लेखमालिकेची कल्पनाही. पुढील लेखांच्या प्रतीक्षेत आहे.

+१

हेच म्हणतो.

काही छायाचित्रे....


प्रपंचच्या सेटवर कॅमेरामन कामत, मधुकर पाठक, राजा परांजपे, कुसुम देशपांडे, घाणेकर, गदिमा, अमर शेख व सुलोचना


’प्रपंच’ व्हॅंकूव्हर च्या फिल्म फेस्टिव्हलला जाणार, म्हणून आनंद व्यक्त करताना मधुकर पाठक, गदिमा, पु.ल. व सी. रामचंद्र.

पुढचं पाऊल च्या सेटवर अंबपकर, गदिमा, पु. ल. देशपांडे व राजा परांजपे.

पुढचं पाऊल मध्ये पु.ल. आणि राजा परांजपे

अण्णा (गदिमा) व राजा परांजपे

गदिमा क्रिकेट खेळताना.

एन्जॉय करा लेको!

-सौरभ.
==================

मस्त

सौरभशेठ,

फारच छान छायाचित्रे. पुलंची चित्रे झकास आली आहेत. भारदस्त व्यक्तिमत्त्व म्हणजे काय याचे उदाहरण म्हणजे गदिमा.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सुंदर

सुंदर छायाचित्रे. अनेक आभार.

----
काय? तुम्ही चित्रपट पाहिलेत? आणि वर फोटोही काढलेत? स्वतःला भौतिकशास्त्रज्ञ कसे म्हणवते तुम्हाला?

अनामिका, राजाभाऊ आणि विषयांतर

गदिमा आणि राजा परांजपे दोघेही तर्जनी आणि अंगठीच्या बोटात धरून सिग्रेटी फुंकतानाचे छायाचित्र आवडले
अंगठीच्या बोटाला अनामिका असे म्हणतात असे वाटते. अनामिकेपासून निघणारी एक नस (नर्व्ह) थेट हृदयापर्यंत जाते म्हणून अनामिकेत अंगठी घालण्याची प्रथा आहे असेही म्हणतात. (जसे की कानाच्या पाळीच्या मागच्या बाजूला असणारी एक नस निस्सारणाची भावना प्रबळ करते, म्हणून काही विशिष्ट विधी करतांना कानावर जानवे ठेवण्याची प्रथा होती. कानाची पाळी पिरगाळल्यास रक्तदाब कमी होतो असे काही प्रयोगांत आढळून आले आहे. लग्नात वधूच्या भावाने कान पिळायची प्रथा असते, त्यामागेही हेच कारण असेल का?)
या छायाचित्रात माडगूळकर हे अनामिका आणि करंगळी यांमधील बेचक्यात धरुन सिग्रेट ओढत आहेत, तर राजाभाऊंनी दोन्ही हातांची चुंबळ करुन चिलीम ओढावी तशी सिग्रेट धरली आहे, त्यामुळे कुणी कुणाची नक्कल करतो आहे, असे वाटत नाही.
('बाल की खाल निकालना' हे नवे धोरण स्वीकारलेला)
सन्जोप राव

"भिन्न"

This comment has been moved here.

 
^ वर