माझ्या संग्रहातील पुस्तके - २

"माणसं अगदी सहजतेनं काही माणसांना वेगळं टाकतात. जात-धर्म-रंग-भेद... आर्थिक भेद, स्त्री-पुरुष भेद, निरोगी आणि विशिष्ट रोगांई पीडीत असणार्‍यांच्यातले भेद ...
...पण एका क्षणी हे वगळेपणच अमची शक्ती,उर्जा, चेतना बनतं आमच्या प्रत्येक तुकड्यात जीव ओतून एकसंध बनवतं ..."

ही वाक्ये आहेत "भिन्न" या कादंबरीच्या ब्लर्बमधली. लेखिका: कविता महाजन.

महाजन बाईंची आधीची गाजलेली कादंबरी "ब्र" मी वाचलेली नव्हती. त्यानंतर प्रकाशित झालेली प्रस्तुत कादंबरीच मी आधी वाचायला घेतली. अलिकडच्या काळातली लक्षांत राहिलेली , मनावर दीर्घकाळ परिणाम करणारी कादंबरी असे तिचे वर्णन उचित होईल. आता हे पुस्तक महाराष्ट्रात कितपत "बेस्टसेलर किंवा टीकाकारांनी प्रशंसा केलेले " आहे याची मला कल्पना नाही. पण माझ्यापुरते हे पुस्तक महत्त्वाचे आहे.

तर अलिकडे काही नवीन लेखकांनी लिहिलेल्या कादंबर्‍या वाचताना थोडे कडुगोड अनुभव आलेले होते. "बाकी शून्य" , "नातिचरामि" या कादंबर्‍यांनी तर पार धुलाई केलेली. (यातल्या पेठे यांच्या कादंबरीच्या (माझ्या व्यक्तिगत दृष्टीने ) अनपेक्षित अशा अपेशामुळे तर जीभ जास्त पोळलेली.) त्यामुळे , तुलनात्मक दृष्ट्या काहीशा नव्या अशा या लेखिकेची नवी कादंबरी हातात घेताना काहीसा साशंक होतो.

कर्णोपकर्णी आलेल्या , अंधुकशा माहितीनुसार हे पुस्तक "एड्स्"वर आहे इतकेच ऐकले होते. पुस्तक वाचायला घेतले आणि पहिल्या २-३ पानांत त्याने मला ताब्यात घेतले. "एड्स्"ने ग्रस्त अशा एका स्त्रीची कहाणी आणि त्या कहाणीला अनुसरून , तिच्या सहवासातल्या अन्य स्त्रियांच्या कैफियती असे , स्थूलमानाने याचे स्वरूप सांगता येईल. कादंबरीचे चार भाग आहेत. प्रत्येक भाग आत्मनिवेदनात्मक.

(डिस्क्लेमर : या पुढील परिच्छेदांत कादंबरीच्या कथानकाची वर्णने आहेत. ज्यांना भविष्यात हे पुस्तक वाचताना रसभंग होऊ द्यायचा नसेल त्यांनी टाळावे.)

"रचिता शिर्के" नावाची मध्यमवयीन , मध्यमवर्गीय नोकरदार स्त्री. तिच्या दैनंदिन आयुष्यातल्या सुखदु:खांना एका सूत्रामधे गोवत , तिला हा रोग कसा होतो , रोगाबद्दल आलेली शंका , करून घेतलेल्या , आणि पॉझिटीव्ह आलेल्या टेस्ट्स् आणि या दरम्याचे तिचे आयुष्य तिच्या स्वतःच्याच शब्दात आपल्याला वाचायला मिळते. या कादंबरीची शक्ती यात नाही की केवळ अशा अतिशय गंभीर अशा या रोगाबद्दल ती आहे. या रोगाबद्दल केवळ एका त्रयस्थ दृष्टीकोनातून , त्याच्या जीवशास्त्रीय , सामाजिक बाबींची ही थंडपणे केलेली चिकित्सा नव्हे. तशी ती असती तर ती एक कादंबरीच नसती. कादंबरी या विषयाला भिडते एका व्यक्तीच्या जगण्यातून आलेल्या अनुभवातून. मग या व्यक्तीची - इन् धिस् केस् , एका स्त्रीची - सर्व स्वभाववैशिष्ट्ये , तिच्या समस्या , तिची घुसमट या सगळ्यासगळ्याचे अगदी साक्षीभावाने केलेले चित्रण यात येते. रचिता शिर्के ही बाई कशी आहे ? तर ती शिवराळ आहे. लौकिकार्थाने उच्चमध्यमवर्गात ऊठबस करणारी , पण दर सायंकाळी पिचत पिचत , मुंबई व्हीटी ते वसई (!!) हा लोकलप्रवास करणारी - आणि मुख्य म्हणजे नवर्‍याबद्दल तीव्र घृणा - बर्‍याच अंशी ती घृणा योग्यच ठरेल - तर अशी , घृणा वाटण्याचे आयुष्य जगणारी एक बाई. सर्व उपाय थकून झाल्यावर ती शेवटी मुंबईच्या वेश्यावस्तीत जाऊन एड्स् टेस्ट् करून घेते आणि त्याचे रिझल्ट्स् पॉझिटीव्ह येतात. या अनुषंगाने , "मुंबईचा , गर्दीच्या वेळचा लोकल-प्रवास " नावाच्या एका भीषण जगाचे दर्शन आपल्याला घडते. जर का एखादा माणूस दिवसाचे पाच तास अशा जीवघेण्या घुसमटीत काढत असेल तर हे एक निराळे जग आहे , त्याला स्वतःचे असे एक डायनॅमिक् (मराठी शब्द?) आहे हे मान्य व्हावे. तर असे , एका व्यक्तीला झालेल्या रोगाच्या शोधापर्यंतचे कथानक इथवर येते.

कादंबरीच्या राहिलेल्या निवेदनांपैकी , दोन निवेदने एड्स् ग्रस्तांकरताच्या संस्थेत काम करणार्‍या कार्यकर्त्या तरुण स्त्रियांची आहेत. आणि एक निवेदन आहे पुन्हा रचिता शिर्केचे : या रोगापाई तिच्या व्यावसायिक जीवनाचा झालेला अंत, तिच्या सामाजिक , कौटुंबिक आयुष्याची वाताहत , या रोगाने पीडीत अशा आणि तिला मदत करणार्‍या इतर स्त्रियांबरोबर निर्माण झालेले स्नेहबंध आणि अखेराकडे जाणारा प्रवास यात येतो. दोन कार्यकर्त्या स्त्रियांची आत्मनिवेदनेही शुष्क , त्रयस्थ भावातून केलेली नव्हेत. त्यांच्या आयुष्याचे - अगदी इन्टीमेट् वाटावेत असे - तुकडेही यात येतात.

(डिस्क्लेमर : कथानक निवेदन समाप्त)

मला व्यक्तिशः ही कादंबरी आवडली कारण तिचे स्वरूप एका कणापुरतेही "रिपोर्ताज्" सारखे न होता , या सगळ्या भयानक अशा परिस्थितीला वेगवेगळ्या अंगानी सामोरे जाणार्‍या व्यक्तींची एक सामूहिक अशी कैफियत आहे म्हणून. या अनुषंगाने , एड्सचे भारतातले गंभीर स्वरूप , त्यात स्त्रियांना बनवले गेलेले लक्ष्य या सार्‍याचे चित्रण कुठल्याही विचार करणार्‍या माणसाला वाचनांती सुन्न करणारे - आणि या समस्येबद्दल काहीतरी करण्यास प्रवृत्त करणारे आहे. कादंबरीचे कथानक संपल्यानंतरच्या , पुस्तकाच्या शेवटच्या परिशिष्टात , एड्स् ची भारतासंदर्भातली थोडक्यात माहिती, त्यातल्या समस्यांचे बहुधांगी , जटिल स्वरूप आणि या रोगांनी पीडीत अशा व्यक्तिंकरता काम करणार्‍या संस्थांची माहितीही दिलेली आहे.

"भिन्न" : मराठी कादंबरी
लेखिका : कविता महाजन
राजहंस प्राकशन
आवृती दुसरी
पृष्ठसंख्या : ४३२
किंमत ३०० रु.

Comments

वा!

हा आपला प्रतिसाद 'माझ्या संग्रहातील पुस्तके -२' असा स्वतंत्र लेख म्हणून प्रसिद्ध् करावा. मीही उपक्रमांना तशी विनंती करत आहे.
लेख / परीक्षण आवडले.
सन्जोप राव

वा!

हा आपला प्रतिसाद 'माझ्या संग्रहातील पुस्तके -२' असा स्वतंत्र लेख म्हणून प्रसिद्ध् करावा. मीही उपक्रमांना तशी विनंती करत आहे.
लेख / परीक्षण आवडले.
सन्जोप राव

उत्तम

फार छान परीक्षण. पुस्तक वाचायलाच हवे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

छान

लेख आवडला. मागे नंदनने 'ब्र'वर असाच छान लेख लिहीला होता, तो आठवला.

----
काय? तुम्ही चित्रपट पाहिलेत? आणि वर फोटोही काढलेत? स्वतःला भौतिकशास्त्रज्ञ कसे म्हणवते तुम्हाला?

लेखिकेचा प्रतिसाद

माझ्या या टीचभर लिखाणाला आलेला , दस्तुरखुद्द लेखिकेचा प्रतिसाद इथे चिकटवत आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------
धन्यवाद ...
...
...
... "भिन्न" चा विषय माझ्या दृष्टीने एड्स हा नाहीए. एड्स हे तर केवळ एक निमित्त आहे. त्या निमित्ताने आमचे नातेसंबंध, प्रेम, लग्न, कुटुंब-व्यवस्था, मुळे अशा गोष्टींकडे वेगवेगळ्या स्तरातील बायका कसे पाहतात, याचे ते दर्शन आहे. व्यक्‍तिगत आयुष्य आणि संस्थात्मक आयुष्य यातील नाते तपासले आहे.
"भिन्न" वर टीका खूप झाली आणि नावाजलीही चांगली गेली. दोन्ही टोकांच्या प्रतिक्रिया आहेत.
3 महत्वाचे पुरस्कार मिळलेत आणि आता इंग्लीश मधे अनुवाद देखील सुरू झालाय. असे बरे चाललेय एकूण भिन्न चे...!

-------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरीचे मला झालेले आकलन तोकडे आहे आणि माझ्या एकपानी टिपणात कादंबरीच्या वेगवेगळ्या अवकाशांना मी जराही न्याय दिला नाही याची मला जाणीव होतीच. लेखिकेच्या उत्तराने त्यावर शिक्कामोर्तब झाले.

या कादंबरीवर टीकाही झाली आहे हे अंमळ रोचक वाटले. टीकेचा रोख कादंबरीच्या एकूण शैलीवर , रचनेवर असेल तर ते मला (एक वेळ) समजेल. अन्यथा कुठल्या कारणांनी टीका झाली आहे ते जाणून घ्यायला मी उत्सुक आहे.

छान!

पुस्तक परीक्षणावरुन वाचायची इच्छा झाली.

कुणाला एखादी नविन कादंबरी/ पुस्तक सुचवायचे असल्यास भिन्न चा उल्लेख नक्की करेन.

हे उत्तम

कादंबरीचे कथानक संपल्यानंतरच्या , पुस्तकाच्या शेवटच्या परिशिष्टात , एड्स् ची भारतासंदर्भातली थोडक्यात माहिती, त्यातल्या समस्यांचे बहुधांगी , जटिल स्वरूप आणि या रोगांनी पीडीत अशा व्यक्तिंकरता काम करणार्‍या संस्थांची माहितीही दिलेली आहे.

हे महत्वाचे.
लेखिकेचा प्रतिसाद ही आवडला. मुक्तसुनीत वाचनास प्रवृत्त करतात.
प्रकाश घाटपांडे

"सति" - प्रविण पाटकर

वाचक यांच्या येथील प्रतिसादाचे स्वतंत्र लेखात रूपांतर केले आहे.

 
^ वर