लोकगीते - पाळणे - २

या पाळण्याच्या सुरुवातीला घनश्यामाला जोजवले आहे, पण बाकी शिवस्तुती आहे. गोकुळकृष्णाच्या घरी शंकर पाहुणा म्हणून आला आहे, अशी रम्य कल्पना आहे. त्याचे वर्णन गाणारी व्यक्ती कृष्णाला सांगत आहे. पुस्तकात बाकी सर्व पाळण्यांना "रामाचा पाळणा"/"श्रीकृष्णाचा पाळणा" वगैरे शीर्षके आहेत. या पाळण्याला मात्र शीर्षक नाही.

- - - -
जोजोजोजोजो रे घनश्यामा ॥ निज बाळी गुणधामा ॥ योगी आलासे विश्रामा ॥ तो मी दावीन तुंम्हां ॥ धृ ॥
जोगी दीसतो वीचित्र ॥ त्यास तीन नेत्र ॥ चर्मावेगळें नसे वस्त्र ॥ म्हणवी तूझा मित्र ॥ १ ॥
आंगी चर्चूनीयां विभूती ॥ अर्धांगी पार्वती ॥ वृषभारूढ तो पशुपती ॥ त्रिशूळ डमरू हातीं ॥ २ ॥
आणीक येक दयाळा ॥ कंट दिसे नीळा मस्तकिं जळ वाहे झुळझुळां ॥ नेत्रीं अग्नीज्वाळा ॥ ३ ॥
आणी नवल परी येसीं ॥ गजचर्म पाठीशीं ॥ शिक्षा लाविती दक्षासी ॥ ठकवीले देवांसीं ॥ ४ ॥
जोगी आलासे अंगणीं ॥ तुळशीवृंदावनी ॥ तुळस देखूनी नयनीं घालित लोटांगणीं ॥ ५ ॥
उभा राहे बा जगदीशा ॥ बाहेर आला पीसा ॥ योगीयां लावियलें निजध्यासा ॥ भाळीं चंद्रठसा ॥ ६ ॥
आळी घेतली न राहे जोगी दावी माय ॥ सर्पाभूषणीं तो आहे ॥ परब्रह्मीं तो पाहे ॥ ७ ॥
गोकुळीं निघालें निधान ॥ परब्रह्म तें जाण ॥ तयाचे चरणीं शरण ॥ एकाजनार्दन ॥ ८ ॥
- - - -

(यात काही द्विखंड मी जोडले आहेत ; काही चुकले आहेत असे मला वाटते, ते लाल रंगात दिले आहेत )

लेखनविषय: दुवे:

Comments

एकाजनार्दन

हे नाव अधूनमधून ऐकले आहे. या कवीबद्दल कोणी अधिक माहिती देऊ शकेल का?

एकाजनार्दन

एकाजनार्दन हा तखल्लुस संत एकनाथांनी वापरला आहे. एकनाथांचे गुरू जनार्दनस्वामी. बहुधा त्यांना मान देण्यासाठी किंवा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकनाथांनी असे केले असावे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

एकाजनार्दन

हे नाव दत्तआरतीमध्येही ऐकले आहे. "एकाजनार्दनी श्रीदत्त ध्यान".
----
काय? तुम्ही चित्रपट पाहिलेत? आणि वर फोटोही काढलेत? स्वतःला भौतिकशास्त्रज्ञ कसे म्हणवते तुम्हाला?

ओंकार स्वरूपा

'ओंकार स्वरूपा' अल्बम मधील सर्व रचना एकनाथांच्या आहेत (बरोबर?) उदाहरणार्थ,
'ओंकार स्वरूपा' मध्ये 'एका जनार्दनी गुरू परब्रह्म तयाचे पैनाम सदा मुखी' असे,
'गुरू परमात्मा परेशु, ऐसा ज्याचा दृढविश्वासु' ह्या अभंगा(?)मध्ये 'एका जनार्दनी गुरुदेव, तेथे नाही बा संशय' असे, 'रूपे सुंदर सावळा गे माये' मध्ये 'एका जनार्दनी भुलवी गौळणी' असे आले आहे. त्यावरून 'एका जनार्दनी' वापरणारे संत एकनाथच असावेत.

संत एकनाथ

संत एकनाथ आपल्या काव्याच्या शेवटी आपले नाव 'एका जनार्दन ' असे देत असत. जनार्दनस्वामी हे एकनाथांच्या गुरूंचे नाव. एकनाथांनी बर्‍याच वेगवेगळ्या प्रकारची काव्यरचना केली आहे. विट्ठलभक्तीपर अभंग, संतपदांबरोबर*, कृष्णभक्तीपर अभंग आणि गौळणी प्रसिद्ध आहेत. सांप्रदायिक भजनांतून म्हटल्या जाणार्‍या बहुसंख्य गौळणी एकनाथ महाराजांच्या असतात. शिवाय इतर चमत्कृतीपूर्ण काव्यरचनाही प्रचलित आहेत. उदाहरणार्थ हा अभंग.

संतपद = संतांची स्तुती करणारा अभंग. उदा. एकनाथ महाराजांचे धन्य आज दिन संत दर्शनाचा. संतपदे भजनाच्या शेवटी म्हटली जातात आणि प्रामुख्याने भैरवी रागात असतात. आणखी एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे "जे का रंजले गांजले".

अंगाई गीतासाठी विशेष चाल?

आवडले.. कल्पना मस्तच!
पण हे म्हणाय्चे कोणत्या चालीत बॉ?

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

 
^ वर