लोकगीते - पाळणे

लोकसाहित्यातले काही मासले येथे देण्याबद्दल मागे चर्चा झाली होती. (संत-पंत-तंत)

आमच्या जुन्या वाड्याच्या माळ्यावर हस्तलिखित पुस्तकाची काही पाने सापडली. त्यात काही देवतांचे पाळणे आहेत. आजूबाजूला पडलेल्या साहित्यावरून ही पाने १००-१२५ वर्षे जुनी असावीत असे वाटते. उपक्रमाच्या धोरणात बसत असल्यास त्यातील सर्व पाळणे या धाग्यात देण्याचा विचार करतो आहे. पहिली दोन पाने गहाळ असल्यामुळे संकलन करणार्‍याबद्दल काही माहीत नाही.

- - -
रामाचा पाळणा
जोजोजोजो रे कुलभुषणा ॥ दशरथनंदना ॥ निद्राकरिबाळा ॥ मनमोहनारामालक्ष्मणा ॥ धृ० ॥
पाळणा लावियेला अयोध्येंसी ॥ दशरथाचे वंशीं पुत्र जन्मले हृषिकेशी ॥ कौसल्येचे कुशीं ॥ १ ॥
रत्नजडीत पालख ॥ झळके अमोलिक ॥ वर ते पहुडले कुळदीप ॥ त्रिभुवननायक ॥ २ ॥
हालवी कौसल्या सुंदरी ॥ धरूनी हस्तीं दोरी ॥ पुष्पे वर्षती सुरवर ॥ गर्जति जैजैकार ॥ ३ ॥
विश्वव्यापका रघुराया ॥ निद्रा करि रे सखया ॥ तुजवरी कुरवंडी करूनिया ॥ सांडिन आपुली काया ॥ ४ ॥
येउन वसिष्ट सत्वर ॥ सांगे जन्मांतर ॥ राम परब्रह्म साचार ॥ सातवा अवतार ॥ ५ ॥
याग रक्षुनियांअबधारा ॥ मारुनि निशाचरा ॥ जाईल सीतेच्या स्वयंवरा ॥ उत्धरि गौतमदारा ॥ ६ ॥
परणील जानकीस्वरूपा ॥ भंगुनियां शिवचापा ॥ रावण लज्जित महाकोपा ॥ नव्हे पण हा सोपा ॥ ७ ॥
सिंधूजडोहीं अवलीला ॥ नामें तरिली शिळा ॥ त्यांवर उतरूनी दयाळा ॥ नेशी वान्नरमेळा ॥ ८ ॥
समुळ मर्दुनी रावण ॥ स्थापिला बिभीषण ॥ देव सोडविले संपूर्ण ॥ आनंदेल त्रिभुवन ॥ ९ ॥
ऐशीं चरित्रे अपार ॥ करील मनोहर ॥ इतुकें ऐकोनी ॥ उत्तरा राहिलें रघुवीर ॥ १० ॥
रामभावाचा भुकेला ॥ भक्ता अधिन झाला ॥ दासविठ्ठले ऐकिला ॥ पाळणा गाईला ॥ ११ ॥
- - -

टिपा : या हस्तलिखितात खंड (॥ ॥) वेगळे लिहिले असले तरी शब्द जोडूनच लिहिले आहेत (॥ वरतेपहुडलेकुळदीप ॥), ते वर मी सुटे करून लिहिले आहेत (॥ वर ते पहुडले कुळदीप ॥). एकदोन अक्षरे जीर्ण पाना फाटल्यामुळे दिसत नाहीत, ती कल्पनेने वर करड्या ठशात लिहिली आहेत. "उत्धरि" हा जसाच्या-तसा उतरवला आहे.

- - -

प्रश्न १ : पाळणा गायची काही विशिष्ट चाल असते का? येथे नेमका काय छंद आहे, ते मला ओळखू येत नाही.
प्रश्न २ : दासविठ्ठल हा कवी प्रसिद्ध आहे का?

- - -
पाळण्यातल्या बाळाचे भविष्य वर्तवणार्‍या वसिष्टाच्या तोंडून संक्षिप्त रामायण वदवून घेणे कल्पक आहे. त्यामुळे बाळाला लडिवाळपणे "जोजो" म्हणता म्हणता, त्याच्या मोठेपणचे महापौरुष प्रसंग सांगता येतात.

लेखनविषय: दुवे:

Comments

पाळणा

रामनवमीला आमच्या घरातील राममंदिरात हा पाळणा मी रामजन्माच्यावेळी दोरीने हलवत असे. त्यावेळी किर्तनकार हा पाळणा म्हणत असे. इथे हा पाळणा उपलब्ध आहे. त्यानुसार लयबद्धता जमते. गावातल्या बाजाराच्या दिवशी (सोमवारी) पाळणा म्हणणारा एक फिरस्ती पेटीवर वेगळा पाळणा म्हणत असे. लोक त्याला पैसे पेटीवर टाकत.

पहिल्या दिवशी.....
जु बाळा जु जु
दुसर्‍या दिवशी ..
जु बाळा जु जु
दृष्य आणि धुन डोक्यात आहे
जगाच्या पाठीवर चित्रपटात अशा पेटीवाल्या फिरस्त्यांचे गाणे आहे धनंजयाला आठवेल ते.

प्रकाश घाटपांडे

कॉलेजात असतानाचे विडंबन

कॉलेजात असताना लोकप्रिय पाळणागीतांचे विडंबन ऐकले होते ते साधारण असे होते

जो बाळा जो जो रे जो
पहिल्या दिवशी रेडा कापला
कुत्र्यामांजरांनी भरला वाडा
कावळा म्हणतो खरकटं वाढा
जो बाळा जो जो रे जो

पुढच्या ओळी या अर्वाच्य होत्या (आणि आठवतही नाहीत) त्यामुळे इथेच पुरे. असे साधारण नऊ दिवसांचे गीत होते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

दास विठ्ठल

तंजावर सरस्वतीमहाल ग्रंथालयातील हस्तलिखितांच्या सूचीच्या खंड क्रमांक दोन मधील माहिती:
दास विठ्ठल (काळ अनुपलब्ध), पदकार, बहुसंख्य रचना अमुद्रित, पाळणे आणि पदपदांतरे.
अजून एक दास विठ्ठल गुरु गोविंद नावाचा कवी होऊन गेला, पण पाळणे लिहिणारा तो हा नव्हे.-वाचक्‍नवी

 
^ वर