गीतरामायण - गदिमांचे काव्यमय मनोगत

गदिमा आणि बाबूजी या गीतकार-गायक जोडीने मराठी संगीताचे कधीही न संपणारे एक नवे युग निर्माण केले. मराठी रसिकांना आपल्या अनेक दर्जेदार गाण्यांनी मंत्रमुग्ध केले, तरीही 'गीतरामायण' च्या उल्लेखाखेरीज त्यांच्या विषयीच्या बोलण्याला पूर्णत्व येतच नाही.

कवीश्रेष्ठ ग. दि. माडगुळकर यांचे स्व:ताच्या गीतरामायणा विषयीचे हे काव्यमय मनोगत...

अजाणतेपनी माता घाली बाळघुटि,
बीज धर्माच्या द्रुमाचे कण कण गेले पोटि

छंद जाणतेपणीचा तीर्थे काव्याची धुंडिली
कुण्या एक्या भाग्यवेळी पूजा रामाची मांडली..

देव वाणीतील ओज शितळले माझ्या ओठी,
वाल्मिकिच्या भास्कराचे झाले चांदणे मराठी...

झंकारल्या कंठवीणा आले चांदण्याला सुर
भाव माधुर्याला आला ’महाराष्ट्रि’ महापूर...

चंद्रभारल्या जीवाला नाही कशाचीच चाड
मला कशाला मोजता.....
मला कशाला मोजता.....मी ..तो.... भारलेले झाड..

गदिमांचे 'प्रत्ययकारी शब्द' आणि बाबूजींचा 'अजोड स्वर' यांच्या संयोगातून घडलेल्या या अजरामर मराठी कलाकृतीसाठी आपण ह्या दोघांचे आजन्म ऋणी राहू....

सुनील....

लेखनविषय: दुवे:

Comments

सुरेख..

चंद्रभारल्या जीवाला नाही कशाचीच चाड
मला कशाला मोजता.....
मला कशाला मोजता.....मी ..तो.... भारलेले झाड..

अप्रतिम!

गदिमांचे 'प्रत्ययकारी शब्द' आणि बाबूजींचा 'अजोड स्वर' यांच्या संयोगातून घडलेल्या या अजरामर मराठी कलाकृतीसाठी आपण ह्या दोघांचे आजन्म ऋणी राहू....

हेच म्हणतो..

आपला,
(गीतरामायणभक्त) तात्या.

गीत'रामायण' मंतरलेले

गीत रामायण आपल्या गावा़कडे रेडीओवर ऐकत असू. आपला रामनवमी उत्सव लई भारी असायचा. सारवलेले मंदिराचे प्रांगण, मांडव डहाळे टाकून, सडा टाकून सजवलेले अंगण व ओटा, त्यावर पडलेली मोगरा,जाई व पारिजातकाची फुले , रामजन्माला आलेली गावकर्‍यांची अलोट गर्दी. दत्तु आरोट्याचा लाउस्पीकर लाऊन त्यावर रामजन्माचे किर्तन होई.त्याने गीतरामायणाची यल्पी( ग्रामोफोनची लांब तबकडी) पण आणली होती. राम सीता लक्षमण यांच्या मूर्तींना इतके विलक्षण पद्ध्तीने सजवले जाई कि मुर्तीतला राम हा जणु खरा धनुर्धारी रामच भासे. (रामाच्या अलंकाराची , वस्त्रप्रावरणाची वेगळी पेटीच् होती) पण हा उत्सव खरे तर भाउबंदकीतल्या ईर्षेतून व्हायचा . राममंदीर घाटपांड्यांचे कि सार्वजनिक असा तो वाद दोन पिढ्या चालला होता. त्याची कागदपत्रे इतिहासही अयोध्येच्या राममंदिरासारखा वादग्रस्त होता तसेच रोचक होता तो शेवटपर्यंत खर्‍या अर्थाने मला समजला नाही. मंदिर? त्या संबंधीत असलेली जमीन? त्याचा व जनामास्तर यांचा संबंध?(जनामास्तर आमच्या गटातले) आपल्या पक्षातले कोण शत्रू पक्षातले कोण? असे अचंबित प्रश्न मला त्या काळी पडत. मी काही विचारले की अजुन तू लहान आहे असे उत्तर मिळे.कोर्टात आमचे चुलत आजोबा या मंदिराच्या मुर्ती या कै. लक्ष्मीबाई हरी (कोम) जाधव यांनी बसवलेल्या आहेत असे प्रतिपादन करित.( हे कंसातील कोम काय दर्शवायचे कुणास ठाउक?) आमचे आजोबा म्हणत कि हे मंदिर सर्व घाटपांड्यांचे आहे. ते राममंदिर आमचे घर आणि आमच्या चुलत आजोबांचे घर यात सँडविच झाले होते. कोर्टात वाद प्रतिवाद वर्षानुवरषे चालूच होते.मंदिरालगत एक आड असा जुन्या कागदपत्रात उल्लेख होता. त्याची खातरजमा करण्यासाठी न्यायमुर्ती स्वत: आले होते. आयताकृती मंदिराच्या डायगोनली अपोझिट दोन आड होते एक आमचा व एक चुलत आजोबांचा.(जुडवा भाई सारखे) न्यायमुर्ती चक्रावून गेले खरा आड कोणता?(इकड आड तिकडे विहिर अशी अवस्था) शेवटी तो निकाल वडिलांचे हयातीत आमच्या बाजूने लागला आणि वडिल म्हणाले " आता मंदिर सार्वजनिक झाले तरी हरकत नाही. शेवटी देव सर्वांचाच आहे. तसही मंदिर हे सर्वांसाठी खुलच होते"
प्रकाश घाटपांडे

राम-मंदिर

प्रकाश साहेब...,

आम्ही ह्या मंदिरात शाखेच्या कामानिमित्त जमायचो. पण देवाला कोर्टाची आणि कोर्टाला देवाची पायरी चढायला लावणारी ही गोष्ट काही औरच....

मुरलीधर नानांच्या घरात देखील रामाचे छोटेखानी मंदिर आहे . त्यामुळे गावांत आणि सबंध पंचक्रोशित आमच्या अस्मितेत 'राम-चौकावाले' ही विशेष भर पडली. पण ते हे मंदिर नानांच्या राहत्या घरात असल्याने तुमच्यासारखा प्रसंग उद्भवला नाही. उलट त्यामुळे रामाला आमच्या बरोबर परत एकदा याची देही-याची डोळा टि. व्हि. वर 'रामायण' पाहण्याची सोय झाली होती.

पण आता नानांकडे "तुम्ही रामाच्या मंदिराचा राहते घर म्हणून आजतागायात उपयोग का केला ?" अशी नोटिस घेऊन एखादा न्यायमूर्ति आला तर????

वा वा / ऋणनिर्देश !

सुनिल महोदय,
आपण फार सुंदर वेचा येथे दिलात.
या योगे इतर उपक्रमी सुद्धा गीतरामायणा बद्दल काही लिहितील आणि या विषयाचे पैलू समोर येतील. त्यासाठी उत्सूक आहे.

पण..
आपण वरिल वेचा आणि त्या आधीची वाक्ये 'नक्षत्रांचे देणे - सुधीर फडके' या कार्यक्रमातून निवेदकाच्या निवेदनातून सही सही उधृत केले आहे असे मला वाटते. तर आपण तसा ऋणनिर्देश केलात तर अजून योग्य होईल. हे माझे मत. राग मानू नका.
--लिखाळ.

नेहमी फॉरिनच्या देशांत टूर चे दौरे करित असल्याने मी मराठी फारसे वाचत नाही :) (वार्‍यावरची वरात- पुल)

तुमचा ग्रह योग्य आहे, पण पूर्ण बरोबर सुद्धा नाही.

नमस्कार लिखाळ साहेब,
तुमचा ग्रह योग्य आहे, पण पूर्ण बरोबर सुद्धा नाही. कारण जे जे शब्द आपल्या कानी वा वाचनी पडतात त्यातूनच लिखाण निर्माण होते. 'नक्षत्रांचे देणे' च काय पण आतापर्यंत जे जे बाबूजी आणि गदिमां किंवा अन्य मराठिकारांविषयी एकत आणि वाचत आलो त्याबाहेरचे यात काहीच नाही.

असेच मी याअगोदर उषःकाल होता होता ह्या रचेनेविषयी उपक्रमावर बोललो होतो. तुमच्या माहितीकरिता ते पुन्हा येथे देत आहे.

एक हाडाचे पत्रकार, ज्येष्ठ लेखक, आणि ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष - श्री. अरुण साधू यांच्या 'सिंहासन' ह्या राजकीय कादंबरीवर अधारीत जब्बार पटेल यांच्या 'सिंहासन' मधील हे चित्रपट गीत...

शाळेच्या समूहगीत स्पर्धेत ९वी (ब) तर्फे आम्ही हे कळकळीने गायलो होतो. साहित्य, संगीत, कला, आपले सामाजिक अन राजकिय प्रश्न, यांची जस-जशी जास्त ओळख होत गेली तस-तसे या गाण्याचा खोल अर्थ उलगडत गेला. त्यामुळेच की काय सरांनी हेच गाणे आमच्यासाठी निवडले असावे. मिळालेले बक्षिसाचे तब्बल २५ रू. दर-गुरूवारी दत्तांचा वार साजरा करण्यासाठी लागणारया खर्चासाठी वापरण्याचा मास्तरी आदेश लगेच मिळाला ही गोष्ट वेगळी.

आम्ही चार किरणांची ही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली

तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती
आम्हावरी संसाराची उडे धूळ माती
आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली

उभा देश झाला आता एक बंदीशाला
जिथे देवकीचा पान्हा दूधाने जळाला
कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली

धुमसतात अजुनि विझल्या चितांचे निखारे
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली

अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली.......उषःकाल होता होता, काळरात्र झाली

गझल सम्राट सुरेश भट यांचे वास्तवाची जाणीव करून देणारे जळजळीत प्रखर शब्द, १९८० च्या सुमाराची ही ज्वलंत चाल अगदी अलीकडील वाटावी ही पं. हृदयनाथ मंगेशकर यांची संगीती-जादू आणि आशाताईंचा थेट काळजाला साद घालणारा आवाज, यामुळे हे गीत फक्त गाणे किंवा कलाकृती नाही तर एक 'सामाजिक सत्य' व 'विचार' म्हणून त्याच्या कर्त्यांनी पेटविलेल्या मशालीच्या रूपाणे मराठी मना-मनांत कायम तेवत राहिल.

शब्द भले वाचून, एकूण आलेले असतील त्यांना आपल्या भाषेत मांडण्याचाच हा निखळ प्रयत्न!!

....सुनील

 
^ वर