२१ वे शतक आणि भारतीय संस्कृती- भाग २

भारतीय आहाराला चौरस आहार मानले जाते. तुम्ही जर आपला आहार खोलवर जाउन पाहिला तर तुम्हाला असे दिसेल की, त्यात कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे, ई. ह्याचे योग्य मिश्रण आहे. त्याबरोबरच आयुर्वेदात वर्णन केलेले व सणवाराला खाण्याचे पदार्थ पाहिले असता, त्या त्या ऋतूत मानवाला आरोग्यास मदत होइल असे पदार्थ सुचवलेले आहेत. इतका बारीक अभ्यास कोणत्या संस्कृतीत आहे?

विचार करा, जेव्हा "अग्री"कल्चर" हे एक कल्चर नव्हते, तेव्हाचा मानव खाद्यपदार्थ कोणते असावेत, कोणते नसावेत ह्याचा कसा निर्णय घेत असेल? अर्थातच प्रयोगातून आणि वेळ्प्रसंगी जीवाची किंमत मोजून तो ते शिकला असेल. आज लाखो वनस्पती भूतलावर असतांना आपल्याला ह्याचे ज्ञान झाले आहे की, काय खावे आणि काय खाउ नये. आपल्याला आज नेमके माहित आहे की कोणत्या भाज्या, धान्ये, औषधी वनस्पती, फळे, फळभाज्या खाव्यात; काय खाल्यावर बाधते, वगैरे. नुसतेच हेच नव्हे तर ते पदार्थ भाजून, उकडून, तळून, कच्चे कसे खायचे ह्याचेही ज्ञान झाले. ह्या ज्ञानामागे अनेक अज्ञात माणसांनी वेळप्रसंगी जीव गमावला असेल ह्याची कल्पना असणे आवश्यक आहे.

हे ज्या संस्कृतीत घडले नाही त्या संस्कृतीत मांसाहाराच्या वेगवेगळ्या पदार्थांपलिकडे त्यांची झेप गेली नाही. [मांसाहार वाइट की चांगला हा ह्या लेखाचा विषय नाही]. एस्किमोला समोर दिसतोय तो रेन्डियर; तो मांसभक्षी नाही; त्याला काय भ्यायचे; मग मारा त्याला आणि खा- हे ठरवायला काय डोके लागते?

शेती जेव्हा एक संस्कृती बनली, तेव्हा मानवाने समाजात कसे रहायचे ह्याचे ज्ञान मिळवले होते. अशावेळी, एखाद्या धान्याची लागवड कशी करायची ह्याचा विचार त्याने केला असेल व अग्रीकल्चर जन्माला आले असेल. धान्य साठवायचे कसे हे तो शिकला असेल. परंतू त्याही पुढे जाउन, भारतीय संस्कृतीत चौरस आहारचे मॉडेल ज्यांनी मांडले त्यांना नुसत्या अग्रीकल्चरच्याही वरचे ज्ञान असलेच पाहिजे.

२१ व्या शतकात जाउ पहाणाऱ्या मानवाला नुसते चवदार पदार्थ [ह्या एकाच गुणाला किंमत असलेले] खायची जेव्हा इच्छा होते तेव्हा तो स्वतःला "आधूनिक" समजतो असे दिसते. उच्च अशी भारतीय खाद्यसंस्कृती सोडून जगण्याला २१ व्या शतकात जाणे असे असेल तर ते चुकीचे आहे असे नाही का तुम्हाला वाटत? खरे म्हणजे काय खावे आणि कसे खावे ह्याचे साधे ज्ञानही आजच्या कित्येकांना नाही, कारण त्याने फूकट मिळालेले समृद्ध ज्ञान फेकून दिले आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

अहो

त्रास दादा/ताई,
जरा दमाने. आधीच्या फ्री हीट तशाच आहेत अजून. :)

----

फ्री हीट

मी नोबॉल टाकलेलेच नाहीत. :-)

रास

तुमची-आमची रास बहुधा एकच असावी का हो? भविष्य आम्हालाही लागू पडते आहे असे वाटते. :)

----

टग्याकडे दुर्लक्ष करा अणि मला माहिती द्या

आजकाल फ़ळे व भाज्या भरपूर खा असे सांगितले जात आहे. मी आज बाजारात मिळ णारी फ़ळे व भाज्या देतो व त्यातील किती
आयुर्वेदात आहेत यांची माहिती द्याल का ?
कांदा, बटाटा, पालक, अळू, फ़रसबी, शेवगा, भुईमुग, सूर्यफ़ूलाचे बी, सोया, मका, साबुदाणा, गवार, चाकवत, अंजीर, काजू,
सफ़रचंद, अननस, स्टॉबेरी, चिक्कू, पपई, अक्रोड, बदाम, करडई, लसूण, कोथिंबीर.
आणि हो, मला अजून न समजेला प्रश्न, आयुर्वेदात म्हणजे नक्की कोणत्या ग्रंथात हो ? तीन चार नावे ?
[समित्पाणी] शरद

और

भारतीय आहाराला चौरस आहार मानले जाते. तुम्ही जर आपला आहार खोलवर जाउन पाहिला तर तुम्हाला असे दिसेल की, त्यात कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे, ई. ह्याचे योग्य मिश्रण आहे.
और ये लगा सिक्सर! कधी, कुठे, कसे मानले जाते हे सांगितले तर आम्हां मूढ रिकामटेकड्यांची सोय होईल. गरमगरम भजी, पुर्‍या, बटाट्याची भाजी, पुरणपोळी, वरण-भात + साजूक तूप, आणि मग जिलबी/गुलाबजाम/श्रीखंड हा कुठल्याही सणाचा नॉर्मल मेन्यू आहे. ह्यांच्या क्यालरी मोजायच्या तर संगणक वापरावा लागेल. आणि या आहारात खोलवर कसे जायचे ते ही सांगा.

इतका बारीक अभ्यास कोणत्या संस्कृतीत आहे?

बाकीच्या किती संस्कृतींचा तुलनात्मक अभ्यास केला आहे?

परंतू त्याही पुढे जाउन, भारतीय संस्कृतीत चौरस आहारचे मॉडेल ज्यांनी मांडले त्यांना नुसत्या अग्रीकल्चरच्याही वरचे ज्ञान असलेच पाहिजे.
परत मॉडेल. कुठे, कुणी, कधी मांडले ते सांगावे. आणि ऍग्रीकल्चरच्या वरचे म्हणजे कोणते ज्ञान?

२१ व्या शतकात जाउ पहाणाऱ्या मानवाला नुसते चवदार पदार्थ [ह्या एकाच गुणाला किंमत असलेले] खायची जेव्हा इच्छा होते तेव्हा तो स्वतःला "आधूनिक" समजतो असे दिसते.
असहमत. आमचे आजोबा* सकाळी उठल्या उठल्या वाडगाभर/ताटभर/बशीभर जिलब्या (मिटक्या मारीत) हादडायचे हे वाक्य बरेचदा ऐकले आहे.

*गरजूंनी आपापले आजोबा आठवून भांड्यांचे आकार बदलावेत. याबद्दल अधिक माहिती इथे. (माहिती आजोबांबद्दल नसून भांड्यांबद्दल आहे याची कृपया नोंद घ्यावी.)

----
"Is there a pinkish hue?" -- George Costanza

आँ नं.२

हे ज्या संस्कृतीत घडले नाही त्या संस्कृतीत मांसाहाराच्या वेगवेगळ्या पदार्थांपलिकडे त्यांची झेप गेली नाही. एस्किमोला समोर दिसतोय तो रेन्डियर; तो मांसभक्षी नाही; त्याला काय भ्यायचे; मग मारा त्याला आणि खा- हे ठरवायला काय डोके लागते?

खरेच की. दुसरे म्हणजे एस्किमो शिवाय जगात इतरत्र लोक राहतात की. द. अमेरिकेत राहतात, आफ्रिकेत राहतात, मध्य आशियात राहतात. ते आर्य नावाचे मनुष्यप्राणी भारतात आले. ते गायी वगैरे खायचे म्हणे. त्यांच्या डोक्यांचे काय? त्यांनी विचारक्षमता एस्किमोंकडून उसनी घेतली होती बहुतेक. मूर्ख लेकाचे.

एस्किमोंना त्यांच्या प्रदेशात भातशेती, फळफळावळ, भाजीपाला यांची लागवड करता आली असते. बथ्थड डोक्याचे लोक ना, अक्कल असती तर शेती करते. खरेच आहे, प्राण्यांना मारून खायला कसली अक्कल लागते.

शरद् यांचे बिंदुगामी प्रश्न

कोलंबसापुढील दर्यावर्दींनी भारतात आणलेली फळे आणि भाज्या, या भारतात आज लोकप्रिय आहेत.

त्रास यांच्या लेखनासारखे लेखन अधूनमधून आपण वाचतो. प्रत्येक वेळी मुद्देसूद उत्तरे लिहिणे कंटाळवाणे होते.

त्रास जे अन्न भारतीय म्हणून खातात त्याबद्दल त्यांना अभिमान वाटतो. पण ज्या प्रकारे अननस, मिरची, टोमॅटो वगैरे भारतीय पदार्थ समजले जातात, त्याच प्रकारे पुढच्या पिढीत तंदूरी बर्गर वगैरे (अफगान+पाश्चिमात्य असे न मानता) भारतीय पाककृती मानल्या जातील. पुढील पिढीतले अभिमानी लोक या पदार्थांना भारतीय अभिमानाने खातील.

ज्यांना आरोग्यदायक आणि स्वादिष्ट अन्न खाताना प्रसन्न वाटते, या उसन्या अभिमानाची गरज वाटत नाही, त्यांनीही तसे अन्न खावे.

अभिमानामुळे जर मन प्रसन्न होत असेल, तर चांगलेच आहे. प्रसन्न मनाने खाल्लेले अन्न अंगाला मानवते, असे माझी एक काकू म्हणते, आणि मला ते खरोखर पटते. अन्न परदेशी आहे, असे म्हणून खाताना जर न्यूनभाव वाटत असेल, तर तसे मारून-मुतकून खाऊ नये. (आपद्धर्म असेल तरच खावे - भा.सं.मुद्रित धोरण.)

"प्रसन्न होऊन जेवावे, हिरमुसून जेवू नये" या मुद्द्यापुरते येथे मी त्रास यांचे समर्थन करत आहे.

धन्यवाद त्रास!

मी दोनहि लेख वाचले आणि त्रास यांच्या निरिक्षणाचे मला विलक्षण कौतुक वाटले. भारतीयांनी जगाला दिलेल्या विविध प्रकारच्या देणग्या पाहून अभिमानाने छाती भरून आली. आजुबाजुला दिसणारे यकिंचित अभारतीय जंतु आमच्या देणगीवर जगताना पाहून त्यांची दया आली. भारतीय संस्कृती नसती तर बाकी जगातील लोक शिकार करत हिंडत आहेत, एक दिवस फक्त चिकन, दुसर्‍या दिवशी फक्त पोर्क असे अन्न खात आहेत, योग न केल्यान पोटं सुटली आहेत-आजारी आहेत, विवाहसंस्था-सण-शेती-काव्य-संगीत-साहित्य-काम-शिल्पकला-चित्रकला यापैकी काहिहि नसल्याने अस्ताव्यस्त जीवन जगत आहेत हे प्रकर्षाने जाणवले.
आयुर्वेद, खगोलशस्त्र, वगैरेसारखी कुटील शास्त्रांबद्दल विचारहि नको करायला.

खरच त्रास राव/ताई, तुम्हि आम्हाला आपल्या संस्कृतीची हि ओळख करून देऊन आमचे डोळे उघडले आहेत.. आपले अजून असे लेखन येऊ द्यात (म्हणजे विकांत तरी मजेत जाईल ;) )

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

 
^ वर