शंकासुर - १

मराठी विवाह निमंत्रण पत्रिकेत श्रीकृपेरून असे का लिहितात? श्रीकृपेरून असे का बरे लिहित नाहीत? जर श्रीने कृपा करून असे म्हणायाचे असेल तर श्रीकृपा करून असे का लिहिले जात नाहीत? कोणीतरी कृपया ह्याविषयी सविस्तर सांगावे.

आपला,
शिरीष / श्रीईश

Comments

शब्दयोगी अव्यय

करिता आणि करून - "कर" धातूपासून आलेले हे शब्दयोगी अव्यय आता कारकवाचक (याला काही लोक "विभक्तिप्रत्यय" म्हणतात) झालेले आहेत.

श्रीकृपे-करिता = (संप्रदानार्थ) "श्रीकृपेसाठी" असे रूप आधुनिक मराठीत अधिक वापरात आहे
श्रीकृपे-करून = (करणार्थ) "श्रीकृपेने" किंवा "श्रीकृपेमुळे" अशी रूपे आधुनिक मराठीत अधिक वापरात आहेत.

या शब्दांचा "कर" धातूशी असलेला व्युत्पत्तिजन्य अर्थ-संबंध जवळजवळ नाहिसा झाला आहे.
"कर" धातूचे त्या प्रकारचे रूप "करता/करिता" असे वैकल्पिक आहे, पण संप्रदानार्थ "करिता" असेच वापरतात.

सविस्तर

ऊहापोह केल्याबद्दल आपले आभार. छान विवेचन केले आहे आपण.

कारकप्रत्यय?

>>करिता आणि करून - "कर" धातूपासून आलेले हे शब्दयोगी अव्यय आता कारकवाचक (याला काही लोक "विभक्तिप्रत्यय" म्हणतात) झालेले आहेत. <<
करून हे एक पूर्वकालवाचक(ल्यबन्त) आहे. त्याशिवाय ते करितासारखे एक शब्दयोगी अव्ययही आहे. पण हे दोनही शब्द कारकवाचक(विभक्तिप्रत्यय) केव्हापासून झाले?
करणार्थ ने एं शी आणि नी ही ई शीं आणि संप्रदानार्थ स ला तें स ला ना तें हेच विभक्तिप्रत्यय समजले जातात, करिता आणि करूनला अजून तो मान मिळालेला ऐकला नाही.
जसे अपादानार्थ प्रत्यय ऊन आणि हून एवढेच. परंतु जवळजवळ तशाच अर्थाचा 'पासून' हा अजूनही शब्दयोगी अव्यय समजला जातो, तसेच करिता-करून बाबत असावे असे मला वाटते.
असे असले तरी मूळ शंकासुर 'कृपे' या एकारान्त रूपाबद्दल होता. ते अर्थात 'कृपा'चे प्रत्ययापूर्वी किंवा शब्दयोगी अव्ययापूर्वी झालेले सामान्य रूप एवढेच शंकासमाधान त्यासाठी पुरेसे होते. आणि शिवाय, हा अर्थ वरून या अव्ययामुळे मिळणार नाही, हेही लिहिणे आवश्यक होते. (त्यावरून, माझेवरून, घरावरून, जागेवरून, अंतरावरून या शब्दांत वरून म्हणजे कारणास्तव, विषयी, समोरून, उंचीवरून, पासून, संबंधी वगैरे. यातलाच कुठलाच अर्थ 'कृपेवरून'मधल्या वरूनला लागू पडत नाही.)--वाचक्‍नवी.

अशी यादी पाठ करवून घेतात खरी

स, ला, ते, स, ला, ना, ते अशी यादी पाठ करवून घेतात खरी. तरी पाठांतरावर शाळेतल्या पहिल्या काही यत्तांमध्येच भर द्यावा, त्यानंतर व्याख्या-परिभाषांवर द्यावा, असे मला वाटते. (पतंजलींचे असेच काही मत आहे, असे दिसते. पाणिनींनी दिलेल्या याद्या त्यांनी व्याख्या-परिभाषांवर तपासून घेतल्यात.)

कारक हे अर्थ-अनुसरून ओळखायचे असतात. एखाद्या पदाचा वाक्यातील क्रियापदाशी संबंध बघून, तो थेट असला तर कारक संबंध ओळखायचा.

मी मुलीला भेटवस्तू आणली.
मी मुलीसाठी भेटवस्तू आणली.
मी मुलीकरिता भेटवस्तू आणली.

या उदाहरणांत फक्त पहिल्या वाक्यात "मुली"चा थेट कारकसंबंध "आणली"शी लागतो, पुढच्या दोन वाक्यांमध्ये लागत नाही, असे म्हणणे योग्य वाटत नाही. तुम्हाला योग्य वाटते का?

"मी तुमच्याकरिता श्रीकृपेकरून निमंत्रण आणले आहे" येथे "तुमच्याकरिता" संप्रदानार्थ नाही, आणि "श्रीकृपेकरून" करणार्थ नाही असे म्हणणे म्हणजे कारकांची व्याख्या विना-नियम संकुचित करणे होय. आता व्याकरणातली (किंवा कुठल्याही वैज्ञानिक शाखेतली) कुठलीही संकल्पना बदलायला माझी ना नाही. पण "कारक" संकल्पना आहे तशी मानल्यामुळे भाषेचे वर्णन करण्यात जी सोय आहे, ती संकल्पना अनियमित रीतीने बदलली तर गैरसोय होईल. (सोय होईल, असे वाटल्यास मला समजावून सांगावे.)

म्हणूनच वरील प्रतिसादात "कारकवाचक शब्दयोगी अव्यय" असे म्हटले आहे.

विभक्तिप्रत्ययांची घोकलेली यादी बेबंद आणि अप्रमाण आहे. एखादा प्रत्यय त्या यादीत स्थानापन्न होतो की नाही कुठली व्याख्या घेऊन ठरवलेले आहे? मराठीत विभक्तिसंख्या किती आहे, याबद्दल व्याकरणकारांमध्ये एकमत नाही. दोन ते आठच्या दरम्यान असे वेगवेगळे आकडे वेगवेगळ्या व्याकरणकारांनी सुचवले आहेत.

वरील प्रतिसादात विभक्तिप्रत्ययांबद्दल मत माझे नाही. (मराठीत दोन तरी विभक्ती आहेतच, कदाचित तीन किंवा चार असतील, कारके मात्र सहा तरी आहेत, असे माझे मत आहे.) काही लोक (म्हणजे मी नव्हे हे अध्याहृत*) कारकवाचक प्रत्ययांना विभक्तिप्रत्यय म्हणतात, असे मी (कंसात टंकून) म्हटले आहे. त्या लोकांनी असे करू नये, असे माझे मत आहे. वाक्यातील पदांचा एकमेकांशी संबंध सांगणारी कारके, आणि पदाची वेगवेगळी रूपे सांगणारे विभक्तिप्रत्यय (त्यांची संख्या कितीका असेना) या दोहोंमध्ये फरक करणे हे भाषेच्या वर्णनासाठी सोयिस्कर आहे, असे माझे मत आहे.

चर्चाप्रस्तावकाराच्या समाधानासाठी काय पुरेसे होते, हे चर्चाकारच सांगू शकतील. मला असे वाटले, की त्यांना अर्थाबाबत संदेह होता. तुम्हाला वाटले की त्यांना सामान्यरूपाबद्दल संदेह आहे. या दोनपैकी चर्चाकारांची शंका असेल तर त्यांचे फावलेच आहे. (त्यांनी खाली यनावाला यांच्या "जेणेकरून" उदाहरणामुळे नीट समजले असे म्हटले आहे.)

*संस्कृत वादविवादात्मक ग्रंथांत "केचन वदन्ति..." असा पक्ष सांगितला, की लेखकापेक्षा वेगळ्या लोकांचे मत सांगितले जाते. मराठीतही तसा अर्थ घ्यावा, असे मला स्वयंस्पष्ट वाटते.

जेणेकरून,तेणेकरून

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
करून या शब्दयोगी अव्ययाचा उपयोग ,क्वचित् का होईना, अजून केला जातो. निमंत्रण पत्रिकेत 'श्रीकृपेकरून' असे लिहिले जातेच, पण पुढील प्रकारची वाक्येही ऐकली,वाचली आहेत.:
" गावकर्‍यांनी पावसाचे पाणी अडवावे. जमिनीत जिरवावे.जेणेकरून भूजलपातळी वाढेल.मग पावसाळ्यात पाण्याची उणीव पडणार नाही."

छान उदाहरण

गावकर्‍यांनी पावसाचे पाणी अडवावे. जमिनीत जिरवावे.जेणेकरून भूजलपातळी वाढेल.मग पावसाळ्यात पाण्याची उणीव पडणार नाही

अगदी चपखल उदाहरण दिले आहे तुम्ही....अर्थ अगदी स्पष्ट होऊन जातो.

अवांतरः To शीर्षासन,
चर्चा-प्रस्तावाचे शीर्षक शंकासूर-१ असे आहे. म्हणजे तुम्ही शंकांची मालिका घेऊन येताय की काय? ;-)

आपण

उदाहरण दिल्यामुळे आता नीट कळले. धन्यवाद.

च्यालेंज

बर्‍याच गावाकडच्या पत्रिकांमध्ये भरपूर बाबासो असतात. हा शब्द बाबासो आणि त्याला जोडून अजून एक (ा ) काना असा का लिहला जातो?
जाणकारांनी मार्गदर्शन करावेच! :-)

बाबासोरभ

==================

संक्षेपचिह्न

हे पूर्वीचे संक्षेपचिह्न आहे. (आजकाल "." किंवा "०" चिह्न वापरतात.)

अर्थात बाबासाहेबांना ते माहीतच होते, आणि त्यांचा त्यांच्या मिष्किल विनोदबुद्धीचा सौरभ दरवळला.

असे लिहिण्यात

मोडीचा प्रभाव असण्याची शक्यता असावी का?

रावसो। , कुं।

रावसोl, कुंl, ही अनुक्रमे रावसाहेब, कंपनी या शब्दांची लघुरूपे होती. --वाचक्‍नवी

अवांतर

शंकासुर - १ म्हणजे ही शंकांची मालिका आहे का?
----
"Is there a pinkish hue?" -- George Costanza
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

हो.

मी मराठी भाषेचा थोडाफार अभ्यास करतो आहे. सोबत थोडी उर्दु भाषासुद्धा शिकत आहे (लिपी नव्हे). शंका येतील तसतश्या विचारत जाईन म्हणतो.

 
^ वर