कृष्णधवल (पीत) जग

एका वैज्ञानिक प्रदर्शनामध्ये 'दृष्टीभ्रम' या विषयावरील सुरेख प्रात्यक्षिके पाहिली. "दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं." या उक्तीची मजेदार उदाहरणे एक एक करून पहायची आणि
त्यामागील शास्त्रीय कारणे समजावून घेऊन पुढे जायचे अशा पध्दतीने त्यांची मांडणी केलेली होती. त्यातल्या एका केबिनमध्ये थोडासा आडोसा करून अंधारात एक टेबल ठेवले होते.
त्याच्या उजव्या व डाव्या भागावर दोन वेगळ्या दिव्यांच्या प्रकाशाचे झोत पाडले होते आणि मधोमध एक पडदा लावून त्या भागांना वेगवेगळे केले होते. टेबलावर ठेवलेले चित्र डाव्या
बाजूला सरकवले की ते छान रंगीबेरंगी दिसायचे आणि तेच चित्र उजव्या बाजूला सरकवले की पन्नास वर्षे पूर्वीचे पिवळे पडलेले कृष्णधवल छायाचित्र वाटायचे. प्रकाशलहरींच्या गुणधर्मांची थोडीफार ओळख असल्याने मला त्याचे शास्त्रीय कारण फलक न वाचताच लक्षात आले होते आणि त्याचे आश्चर्य वाटले नाही. त्यामुळे माझ्या मनात वेगळेच विचार आले.

कांही लोक त्यांच्याकडे असलेल्या वस्तू, त्यांची माणसे आणि ते स्वतः यांच्याबद्दल भरभरून बोलत असतात. त्यांची तोंडभर प्रशंसा करतांना त्यातल्या चांगलेपणाचे बारकावे ते व्यवस्थित उलगडून दाखवतात. त्यांच्या कौतुक करण्याच्या कौशल्याचेच आपल्याला कौतुक वाटते. पण विषय बदलला की लगेच त्यांची चर्या बदलते. उत्तम कथाविषय असलेला एकादा चित्रपट पाहिलात कां असे विचारताच, "शी! त्यातला कसला तो टकल्या नायक आणि नकटी नायिका ?" असे उत्तर येते. एकादे अप्रतिम गाणे ऐकल्यावर त्यात कुठेतरी आलेली थोडीशी खरखर तेवढी त्यांना बोचते आणि कोणा हुषार माणसाला त्याच्या कर्तबगारीमुळे बढती मिळाल्याची बातमी ऐकून "त्याच्या मेव्हण्याच्या सासुरवाडीजवळ त्याच्या खातेप्रमुखाच्या जावयाचे काका राहतात ना, म्हणून!" किंवा "चांगला आपल्या श्यामरावांना हा वरचा हुद्दा मिळायची संधी होती, पण हा मेला तडफडला ना मध्येच! " अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून येते. अशा बोलण्यातून त्यांना कांही फायदा होत असेल किंवा त्यात त्यांचा कांही अंतस्थ हेतू असतो असेही दिसत नाही. त्यामुळे हे लोक असे कां वागतात याचे मला कोडे पडायचे.

एकरंगी प्रकाशकिरण (मोनोक्रोमॅटिक लाइट) या विषयावरचे ते प्रात्यक्षिक पाहतांना मला या प्रश्नाचे उत्तर सापडले. सात रंगांच्या असंख्य छटांचे वेगवेगळ्या कंपनसंख्येचे किरण
सूर्यप्रकाशात असतात. ते सर्व मिळून त्याचा पांढरा रंग बनतो. हे सारे किरण जेंव्हा लाल चुटुक रंगाच्या फुलावर किंवा हिरव्या गार पानावर पडतात तेंव्हा ते रंग सोडून इतर सर्व रंगांचे
प्रकाश किरण त्यांत शोषले जातात आणि अनुक्रमे तांबड्या व हिरव्या रंगांचे किरण तेवढे फूल आणि पान यांतून चहू बाजूंना परावर्तित होतात. ते किरण आपल्या डोळ्यापर्यंत पोचल्यामुळे आपल्याला त्यांच्या रंगांचा बोध होतो. पण फक्त पिवळ्या रंगाच्या एकाच कंपनसंख्येचे किरण त्या गोष्टींवर पडले तर ते सारे किरण पूर्णपणे शोषले जातात आणि त्या वस्तू आपल्याला दिसत नाहीत. त्यांच्या आजूबाजूला असलेल्या पांढर्‍या किंवा पिवळ्या रंगांच्या इतर गोष्टींवरून पिवळ्या रंगांचे किरण परावर्तित होतात त्यामुळे आपल्याला त्या व्यवस्थित दिसतात. लाल व हिरव्या रंगाच्या वस्तूंवरून कसल्याच रंगाचे किरण येत नसल्यामुळे त्यांचा फक्त आकार तेवढा काळ्या रंगात दिसतो. काळा हा एक रंग नाही, त्यात प्रकाशकिरणांचा संपूर्ण अभाव असतो. प्रकाशकिरणांच्या या गुणधर्माचा उपयोग वर दिलेल्या चमत्कारात केला होता. टेबलाच्या एका बाजूवर पांढर्‍या रंगाच्या आणि दुसर्‍या बाजूवर पिवळ्या रंगाच्या प्रकाशाचा झोत सोडलेला होता.

आत्मकेंद्रित प्रवृत्तीच्या लोकांच्या बाबतीत कांहीचे असेच घडते. आपल्या स्वतःच्या गडद रंगात ते नेहमीच इतके डुंबलेले असतात की फक्त त्या रंगातल्या सर्व गोष्टी तेवढ्या त्यांना ठळकपणे दिसतात पण जीवनाचे इतर रंग त्यांच्या मनापर्यंत पोचू शकत नाहीत. त्यामुळे ते स्वतःवर नेहमी खूष असतात पण इतरांचे चांगले गुण त्यांच्या ध्यानात येत नाहीत कारण ते त्यांना दिसतच नाहीत. आपला रंग सोडून इतर सगळ्या रंगातल्या गोष्टी त्यांना काळ्या दिसतात किंवा त्यांच्या लेखी त्या अस्तित्वातच नसतात.

अशा लोकांची ओळख पटणे तसे सोपे आहे. त्यांच्यासोबत तुम्ही बसले असतांना ते कोणाशी दूरध्वनीवर बोलत असतील तर ते काय बोलत आहेत ते तुम्हाला ऐकू येत असते आणि पलीकडची व्यक्ती काय म्हणते आहे याबद्दल कुतूहल वाटते. पण फोन ठेवल्यानंतर त्याबद्दल अवाक्षरही न काढता "मी त्याला असं सांगितलं." असे म्हणून स्वतः बोललेली वाक्येच त्या व्यक्ती पुन्हा तुम्हाला ऐकवतील. दुसर्‍या बाजूच्या व्यक्तीने काय सांगितले याचे त्यांना फारसे महत्व वाटलेले नसते, कदाचित त्यांनी ते पूर्ण ऐकलेलेसुध्दा नसते आणि जेवढे ऐकले असेल त्यात सांगण्यासारखे कांही असेल असे त्यांना वाटत नाही. अशा लोकांबरोबर होणारा आपला संवाद हा बहुधा त्यांच्या बाजूने एकपात्री असतो. त्यातली आपली भूमिका फक्त श्रोत्याची असते आणि अशी दोन माणसे एकमेकांना भेटली तर तो दुहेरी एकपात्री संवाद ऐकतांना इतरांची खूप करमणूक होते.

आत्मकेंद्रित व्यक्तींना चित्रपट पहायला, देवदर्शनासाठी किंवा प्रेक्षणीय स्थळी असे कुठे ही बाहेर जायचे असो, घरातून निघण्यापूर्वी आपल्या पायाच्या नखांपासून केसांच्या बटांपर्यंत त्या स्वतःला न्याहाळून घेतात, जातांना कोणता पोशाख घालायचा यावर दहादा विचार करून ते ठरवतात आणि आपण सर्वांग सुंदर सुरेख दिसत आहोत याची मनोमन खात्री करून घेतात. आपण कांही तरी 'पाहण्या'साठी किंवा देवाचे 'दर्शन घेण्या'साठी निघालो आहोत अशी त्या लोकांची भूमिका नसतेच. सिनेमातली पात्रे आपल्याला पाहण्यासाठी पडद्यावर येत आहेत, आपले "रूप पाहता लोचनी, सुख जाले वो साजणी" म्हणण्यासाठी विठोबा खोळंबून विटेवर उभा आहे किंवा आपला नवा पोशाख पाहण्यासाठी मावळणारा सूर्य आसुसला आहे अशी त्यांची समजूत असावी. पर्यटन करतांना बहुतेक वेळा त्यांच्या गळ्यात कॅमेरा असतो. आयुष्यात क्वचित पहायला मिळणारी सौंदर्यस्थळे छायाचित्रात सामावून घेऊन पुन्हा पुन्हा ती पहावीत अशी इच्छा मात्र त्यांना नसते. सूर्योदय आणि सूर्यास्त रोजच होत असले तरी एकाद्या निसर्गरम्य ठिकाणी ते पहाण्यात खास मजा असते. क्षणाक्षणाला रंग बदलत जाणारे फक्त मोजके क्षण दिसणारे ते अद्भुत दृष्य डोळे भरून पाहून घ्यावे असे आपल्याला वाटते. पण ही मंडळी मात्र "अरे तू इथे उभा रहा, केस किती विस्कटले आहेत ते नीट कर, खिशातून काय डोकावते आहे ते बघ, पायाखाली काय पडलं आहे ते बाजूला कर, इकडे कॅमेर्‍याकडे पहा." वगैरे सांगत एकमेकांचे फोटो काढून घेण्यात तो वेळ घालवतात. त्यांच्या छायाचित्रांमधल्या एकाद्या कोपर्‍यात 'मावळत्या दिनकरा'ला थोडीशी जागा मिळाली तर ते त्याचे नशीब !

या लोकांकडे गेल्यावर ते आपला छायाचित्रांचा संग्रह नक्की दाखवतात. पण ते पाहतांना मला मात्र आपले हंसू आवरता येत नाही. त्यातल्या अथपासून इतीपर्यंत प्रत्येक पानावर त्यांची किंवा त्यांच्या बबड्या छबड्यांची दात विचकून हंसणारी थोबाडेच तेवढी दिसतात. पार्श्वभूमीवर कोठे प्रतापगडाचा बुरुज, महालक्ष्मीच्या देवळाचा कळस, घुमटाशिवाय ताजमहाल किंवा इंडिया गेटचा एक तुकडा दिसलाच तरी कॅमेर्‍याचा फोकस चेहेर्‍यावर असल्यामुळे ते प्रेक्षणीय स्थळ जेमतेम ओळखता येते. पण या महाभागांनी या स्थळांना भेट दिली होती याचा पुरावा जवळ बाळगणे आणि लोकांना तो दाखवणे एवढाच त्यांच्या आल्बमचा हेतू असतो. त्यांनी भेट दिल्यामुळे त्या सुप्रसिध्द जागांना अधिक महत्व प्राप्त झाले असाच त्यांच्या बोलण्याचा नूर असतो.

आत्मकेंद्रित लोकांचे वागणे आणि मोनोक्रोमॅटिक लाइटमध्ये दिसणारी चित्रे यातले साम्य लक्षात आल्यानंतर मी माझ्या संपर्कात येणार्‍या लोकांच्या वागण्याकडे त्या नजरेने पहायला लागलो. पाहिलेल्यातल्या बहुसंख्य व्यक्ती निदान कांही अंशी तरी कृष्णधवल जगातच वावरत असतात असे दिसते. कोठलीही गोष्ट आपली की परकी हे पाहून झाल्यावर त्यानुसार ती चांगली वा वाईट, खरी की खोटी, बरोबर की चूक वगैरे ठरवून तिला काळी किंवा सफेद अशा दोनच श्रेणीत घालण्याची बहुतेक लोकांना घाई असते. तिच्याकडे त्रयस्थ नजरेने पाहिल्यास तिच्यातल्या विविध रंगांच्या अनेक मनमोहक छटा दिसतात हे सांगून त्यांना पटतच नाही. हे माणसांचे जग खरेच असे असते की हा सुध्दा माझा दृष्टीभ्रम आहे?

लेखनविषय: दुवे:

Comments

गमतीदार स्फुट आवडले

व्यक्तीचा जीवनविषयक दृष्टिकोनाला रंगीत प्रकाशाचे भौतिकशास्त्राची उपमा सुरेख रंगवून विषद केली आहे.

(जीवनविषयक "दृष्टिकोन" या शब्दातच प्रकाश-भौतिकीचे रूपक आहे, नाही का?)

(खालील विसुनाना यांची सूचना मला पटली नाही, तरी निव्वळ चुकलेली वाटत नाही. येथे नव्हे तरी दुसर्‍या चर्चेत विचारार्ह वाटते - "स्वतःच्या मनातल्या वैचारिक ऊहापोहाच्या बाबतीत ललित-प्रधान लेखन असे कसे ठरवावे?"
रंजन हा लेखनाचा प्रमुख हेतू असेल, इतका प्रमुख की तत्त्वचर्चा गौण होते, तर लेखन ललित-प्रधान अशा दिशेने माझी कच्ची भूमिका आहे. किती रंजन-हेतुक लेखन चालेल - या बाबतीत वेगवेगळ्या संपादकांची सीमा वेगवेगळी असू शकते. श्री. घारे यांचा लेख विकिपेडियावरती मुळीच चालणार नाही, असे वाटते. पण उपक्रम संकेतस्थळावर ललित-वैचारिक लेख पूर्वीपासून येत आहेत. [मुख्य पृष्ठावरील "वैचारिक" मथळ्याखाली काही लेख संपादकीय/स्वतःच्या मनातले विचार सांगणे या प्रकारचे आहेत, आणि रंजक पद्धतीने लिहिलेले आहेत.]
म्हणून माझ्या मते तरी हा लेख उपक्रमावरील बाकी लेखांच्या जोडीने उभा राहू शकतो. खरे तर कल्पित-अनुभव (फिक्शन) नसलेला कुठलाही निबंध उपक्रमावर येऊ शकतो, असे मला उपक्रमावरील लेख बघून वाटते, आणि अशा धोरणाला माझा कुठलाच विरोध नाही. माझे स्वतःचे उपक्रमावरील पुष्कळसे लेखन माझ्याच कच्च्या मतांची चर्चा आहे. लेखन धोरणाच्या छटा अर्थातच उपक्रम संकेतस्थळाचे मालक आणि संपादन मंडळ यांनाच ठरवता येणार.)

ह्म्...

कोठलीही गोष्ट आपली की परकी हे पाहून झाल्यावर त्यानुसार ती चांगली वा वाईट, खरी की खोटी, बरोबर की चूक वगैरे ठरवून तिला काळी किंवा सफेद अशा दोनच श्रेणीत घालण्याची बहुतेक लोकांना घाई असते.
+१. वाक्य आवडले!
लेख छान झाला आहे.
(अंतर्मुख करणारा वगैरेचा मला सध्या कंटाळा आला आहे. त्याच्या जागी जरा दुसरे शब्द सुचवा रे!) :-)

-सौरभ.
==================

सर्व आयांनी जर आपापल्या मुलांना लहानपणीच योग्य शिकवण दिली, तर जगात युद्धं कशाला होतील? सर्व संस्कृती आयांच्याच हातात नसते काय?

सुरेख

कोठलीही गोष्ट आपली की परकी हे पाहून झाल्यावर त्यानुसार ती चांगली वा वाईट, खरी की खोटी, बरोबर की चूक वगैरे ठरवून तिला काळी किंवा सफेद अशा दोनच श्रेणीत घालण्याची बहुतेक लोकांना घाई असते. तिच्याकडे त्रयस्थ नजरेने पाहिल्यास तिच्यातल्या विविध रंगांच्या अनेक मनमोहक छटा दिसतात हे सांगून त्यांना पटतच नाही.

सहमत आहे. हा दृष्टीभ्रम नसावा असे वाटते. ठरवण्याची यादी मात्र वाढू शकते. स्वदेशी की परदेशी, माझ्या प्रांतातली की बाहेरची, माझ्या भाषेतील की परभाषेतील. तथाकथित भारतीय संस्कृतीमध्ये बसत नाही म्हणून कित्येक सुरेख चित्रपटांना आपण मुकलो आहोत. कारण एकदा भारतीय संस्कृतीचा चष्मा लावला की सगळे जग तसेच दिसायला लागते.
सुरेख लेख. आवडला.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

लेखकमहाशय आणि संपादकहो...

लेख चांगला असला तरी 'आत्मकेंद्रित व्यक्ती' या विषयावरचा हा लेख माहितीपूर्ण नसून ललित-गद्य आहे असे निदर्शनास आणून देऊ इच्छितो. कृपया विचार व्हावा.

असहमत

माझ्या मते हा लेख विचार/स्फुट या विभागात येतो. हा ललित आहे असे वाटत नाही. लेखकाने एका पदार्थविज्ञानाच्या प्रयोगावरून काढता येणारे निष्कर्ष रोजच्या जगातही कसे लागू पडतात याबद्दल आपले विचार व्यक्त केले आहेत.

आता ललित म्हणजे नेमके काय यावर एक फर्मास चर्चा होउन जाउदे.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

हे बाकी ब्येष्ट

आता ललित म्हणजे नेमके काय यावर एक फर्मास चर्चा होउन जाउदे.

राजेंद्र , काय मनातलं बोल्ला राव!

प्रकाश घाटपांडे

:-)

आमच्यासारखेच समविचारी इथे आहेत हे पाहून मस्त वाटले. :)

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

नेमके काय?

लेख चांगला असला तरी 'आत्मकेंद्रित व्यक्ती' या विषयावरचा हा लेख माहितीपूर्ण नसून ललित-गद्य आहे असे निदर्शनास आणून देऊ इच्छितो. कृपया विचार व्हावा.

प्रतिसाद देणार्‍या सर्व वाचकांचा मी आभारी आहे. मात्र वर दिलेल्या प्रतिसादावर कसला विचार करावा तेच मला समजले नाही. इतका लहानसा लेख माहितीपूर्ण नसणारच. तो गद्य स्वरूपात आहे हे उघडच आहे. राहता राहिले 'ललित'. तसा दावा मी केलेला नाही. खरे सांगायचे झाले तर मी मनात येईल तसे लिहीत जातो. त्याला कोठल्याही चौकटीत बसवायचा प्रयत्न करत नाही. उपक्रमच्या नियमानुसार वर्गवारी करावीच लागते म्हणून त्यातल्या त्यात बरे वाटले असे 'विज्ञान', 'विचार', 'स्फुट' हे शब्द निवडले.

दृष्टीभ्रम

हे माणसांचे जग खरेच असे असते की हा सुध्दा माझा दृष्टीभ्रम आहे?

हा ही दृष्टीभ्रमच म्हणायचा.वास्तवाकडे वेगळ्या नजरेने पाहिल्यास तो भ्रम वाटू शकतो किंवा भ्रमाकडे वेगळ्या नजरेने पाहिल्यास ते वास्तव वाटु शकते. म्हणजे भ्रम् कि वास्तव हे आपल्या दृष्टीवर आहे.
अभ्यास- भ्रम म्हणजे काय? वास्तव म्हणजे काय? दृष्टी म्हणजे काय?
आपण काय शिकलात? भ्रम, वास्तव, दृष्टी
निष्कर्ष- दृष्ट्यभ्रास्तव

ह घ्या सां न ल
प्रकाश घाटपांडे

व्वा !

लेख आवडला !

-दिलीप बिरुटे

वा! एकदम मस्त!

वा! एकदमच मस्त...

कोठलीही गोष्ट आपली की परकी हे पाहून झाल्यावर त्यानुसार ती चांगली वा वाईट, खरी की खोटी, बरोबर की चूक वगैरे ठरवून तिला काळी किंवा सफेद अशा दोनच श्रेणीत घालण्याची बहुतेक लोकांना घाई असते. तिच्याकडे त्रयस्थ नजरेने पाहिल्यास तिच्यातल्या विविध रंगांच्या अनेक मनमोहक छटा दिसतात हे सांगून त्यांना पटतच नाही.

हे तर कोटेबल कोट्स मधे टाकावे असे वाक्य!.. मस्त!

हे वाचून काहि स्वैर विचार डोकावले ते जसे डोकावले तसे मांडतो आहे:

आपण प्रत्येक गोष्टीला असे वर्गीकृत का करू पाहतो. कारण माझ्यामते लहानपणापासून आपल्याला हेच शिकवले असते की हि गोष्ट चांगली, व हि गोष्ट वाईट. हे पाप आहे आणि हे असे करणे हे पुण्याचे काम आहे. हे चुक आहे तेव्हा हे बरोबर असणार...
आपले बालपण आठवा. इयत्ता दुसरीपासूनच एक प्रश्न आपल्यासमोर येतो "विरुद्धार्थी" शब्द सांगा. या प्रश्नांतून मुलांवर बिंबवले जाते की प्रत्येक छटेला एक विरूद्ध छटा असते. 'चांगले'च्या विरुद्ध 'सांगता येत नाहि असे' हे उत्तर चुक ठरते, "बरोबर"चा विरुद्धार्थी "चुक"च असते.

माझ्यामते खरंतर काळा रंग जसा कोणत्याहि रंगाचा अभाव आहे तसे काळे कृत्य हे "कोणत्याहि कृत्याचा अभाव" हे असले पाहिजे मात्र एखाद्या कृत्याला "काळे" असे वर्गीकरण करायला समाज, लोक, आम्हि व पर्यायाने मी सतत तयार असतो

असो..
लेखन खूप आवडले

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

मस्त

लेख आवडला.

मस्त लेख

लेख आवडला. माणसांच्या वागण्याकडे बारकाईने पाहून नीरिक्षणे मांडणे मला आवडते :)

एका संकेतस्थळावर लेख माहितीपूर्ण ठरेल तर दुसर्‍यावर ललित. पार्श्वभूमी कोणती आहे यावर सुद्धा रंग कसे दिसणार हे ठरते.

१८% ग्रे रंगाच्या पार्श्वभूमीवर इतर रंग डोळ्याला योग्य सॅच्युरेशनचे दिसतात. आपला दृष्टीकोन पूर्वग्रह रहित झाला तर जग वेगळ्या रंगात दिसू लागेल असे वाटते.
--(कृष्णमूर्तींचा चाहता) लिखाळ.

 
^ वर