शब्दकारांसाठी मार्गदर्शक तत्वे व प्रनेवि

अजय सु. भागवत, पुणे. [ajaybhagwat@marathishabda.com]

http://www.marathishabda.com/shabda/?page_id=221

v भाषा
कोणतीही भाषा त्यातील स्वर व व्यंजने ह्यापासुन तयार झालेल्या शब्दांमुळे वाक्यांपर्यंत पोहोचते. भाषेत जितके जास्त शब्द तितकी तिची समृद्धी जास्त. त्यातही हे शब्द जर एक स्वतंत्र व नेमका अर्थ प्रतित करणारे असतील तर त्या भाषेचे सामर्थ्य अधिकच जाणवते. माझ्या माहितीप्रमाणे "आप" ह्या शब्दाचा अर्थ पावसाच्या थेंबाच्या ढगांपासून पृथ्वी पर्यंत पोहोचण्याच्या मधल्या स्थितीसाठी वापरला जाऊ शकतो. त्यानंतर त्याचे "पाणी" होते. हे शब्द समृद्धीचे एक ऊदाहरण. "एसोटेरिक" हा इंग्लिश शब्द "एखाद्या विषयाचे खास ज्ञान व आवड असलेल्या काही व्यक्तींचा समुह" यासाठी वापरतात. अशा नेमक्या व परिणामकारक शब्दांमुळे भाषा अत्यंत समृद्ध बनते.

अशी समृद्धी टप्प्याटप्प्यानेच येते. भाषेच्या प्रगतीत इतर भाषांमधून घेण्यात येणाऱ्या शब्दांचाही खूप मोठा वाटा असतो. इंग्लिश मधे अनेक शब्द युरोपातील अनेक भाषांमधून जसेच्यातसे अथवा संस्कार करून घेतले आहेत. फ्रेंच भाषेने इंग्लिशला अनेक शब्द बहाल केले आहेत. लॅटीन व ग्रीक भाषेच्या इंग्लिशला दिलेल्या देणग्यांबद्दल तर आपण जाणतोच.

अनेकदा आपल्याला काही शब्द जगातील बहुतांश भाषेत जवळपास सारखेच असल्याचा प्रत्यय येतो. पथ-पाथ, माता-मदर, भातृ-ब्रदर, असे काही शब्द व एक ते दहा अंकांना जगातील अनेक भाषांमधे काय म्हणतात हे पाहिल्यास खूप सारखेपणा दिसून येतो. ह्या ठिकाणी सारखेपणा म्हणजे एखादा शब्द आपल्याकडे दंत्य किंवा ओष्ठ्य अक्षरापासून सुरुवात करत असेल तर जवळपास तो त्याच प्रकारच्या शब्दांपासून इतर भाषांमधेही सुरु होतो.

असे मानले जाते की मानवाचा प्रवास दक्षिण आफ्रिकेतून जगभर झाला. अशी कल्पना करा की, सुरुवातीला त्याची जी एक भाषा असेल, ती हळुहळू एकाएका समुहाबरोबर जगभर विखूरतांना त्यातील मुळ भाषेतील शब्द जवळपास तसेच राहून स्थानिक परिस्थितीनुसार जे जे नवीन शब्द तयार झाले त्यामुळे एक भाषा दुसरीपेक्षा वेगळी झाली असेल. जे शब्द त्यांच्या मुळ भाषेतून आले ते बहूतांश तसेच राहीले व त्यामुळे आपल्याला ते सारखेच वाटत असावेत.

पुढे ज्या भाषा अधिक विकसत गेल्या त्यात महत्वाची कामगिरी त्या त्या भाषेतील तज्ञांनी केली व त्या भाषेला व्याकरण, लिपी मिळाली. हे ज्या भाषांत झाले नाही अशा कित्येक भाषा आजही फक्त बोलल्या जातात पण त्यांना लिपी नाही. ऊदा. कर्नाटकात बोलली जाणारी तुळू भाषा.

v शब्द
हे सगळे काहीही असले तरी प्रत्येक भाषेचा गाभा एकच- शब्द!

शब्द ज्यांनी कोणी तयार केले त्यामागे त्यांचे जे काही हेतू असतील, त्यातील सर्वात महत्वाचा हेतू हा "संभाषण" करण्यास सहाय्य करतील असे शब्द करण्याचाच असेल. त्यामुळे मानवीसमुहाचे ज्ञान जसजसे वाढत गेले तसतसे ते नवज्ञान इतरांपर्यंत जाण्यासाठी नवीन शब्दांची निर्मिती आवश्यक झाली.

नवीन शब्द तयार करणे हे एक वैशिष्ठ्यपूर्ण ज्ञान आहे. एखाद्या शब्दाची व्युत्पत्ति कशी झाली हे पाहीले असता आपल्याला एक निश्चीत सुत्र मिळते. ते सुत्र आपल्याला त्या शब्दाच्या गाभ्यापर्यंत पोहोचवते. एकदा गाभा कळाला की, त्यापासून आणखी नवे शब्द तयार करता येतात. शब्दांच्या उत्पत्तिबाबत अभ्यास करणाऱ्या शाखेला शब्द व्युत्पत्तिशास्त्र ("इटिमॉलजी" तसेच ईतर काही शाखा, ऊदा- लेक्सीकॉलजी) म्हंटले जाते. हा विषय शब्दांबद्दल खूप आवड व जिज्ञासा निर्माण करतो. ह्या जिज्ञासेमुळेच मी मराठीशब्द.कॉम हे कोजळ (वेबसाईट) तयार केले आहे.

मी मराठी भाषातज्ञ नाही व माझा मराठीचा अभ्यास १० वीच्या मराठीच्या परीक्षेनंतर पूर्णपणे थांबला. नंतरच्या २५ वर्षात मी कधीही मराठीत लिहीले नाही, त्यामुळे माझे मराठी शुद्धलेखन, माझे अक्षर (की ज्याबद्दल मला अभिमान होता) ह्याचा पूर्णपणे ऱ्हास झाला. पण मला जे मराठीचे ज्ञान आहे त्यानुसार मी हा लेख शब्दनिर्मीती बद्दल एक जाणीव व्हावी ह्या दॄष्टीने लिहीण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मराठी भाषेत नवीन शब्द निर्मीती शास्त्रशुद्ध पद्धतीने व्हावी हा एकमेव हेतू ह्या लेखामागे आहे. मी भाषातज्ञ नसल्यामुळे ह्या लेखात काही चुका अनवधानाने झाल्या असतील तर माफी असावी व आपण त्या चुका मला कळवल्यात तर मी त्याचा आनंदाने स्वीकार करीन. हा लेख वाचतांना तो एका आधुनिक सामान्य मराठी भाषकाने त्याला मराठीबद्दल काय वाटते ते विचार व्यक्त करण्यासाठी लिहीला आहे असे समजून वाचला तर माझे विचार आपणांपर्यंत योग्यरीतीने पोहोचतील असे वाटते.

v ह्या लेखाचा सारांश असा आहे:
१. शब्द म्हणजे काय? ह्याची एक चर्चा शब्दाच्या व्याख्येपासून सुरुवात करून केली आहे.

२. त्या व्याख्येबद्दल सखोल चर्चा केली आहे.

३. एखादा शब्द मराठी आहे की नाही हे त्या व्याख्येनुसार कसे ठरवता येईल त्याबाबत चर्चा केली आहे.

४. मराठी भाषेसमोरची आव्हाने कोणती हे व्यक्त केले आहे.

५. लेखाच्या शेवटी, पुढे कसे जाता येईल ह्याबाबत विचार मांडलेले आहेत.

पुढेजाण्याआधी, ज्ञात-अज्ञात अशा सर्वजणांना मी नमन करतो की ज्यांनी, नवीन मराठी शब्द निर्मीती केली आहे, करत आहेत.

v मराठी शब्द: व्याख्या
खाली मी ६ व्याख्या मुद्दाम दिल्या आहेत. त्या व्याख्या क्रमाक्रमाने प्रगत करत नेल्या आहेत.

१. मराठी स्वर व व्यंजने ह्यांच्या संयोगाने उत्पन्न झालेल्या कोणत्याही रचनेला शब्द असे म्हणता येते.

२. मराठी स्वर व व्यंजने ह्यांच्या संयोगाने उत्पन्न झालेल्या अर्थपूर्ण रचनेला शब्द असे म्हणता येते.

३. मराठी स्वर व व्यंजने ह्यांच्या संयोगाने उत्पन्न झालेली अशी अर्थपूर्ण रचना की जी मराठी व्याकरणाच्या नियमांना बांधिल आहे.

४. मराठी स्वर व व्यंजने ह्यांच्या संयोगाने उत्पन्न झालेली अशी अर्थपूर्ण रचना की ज्यायोगे मराठी व्यक्ती, कुटूंब, समुह अथवा समाज एकमेकाशी संभाषण करु शकतील.

५. मराठी स्वर व व्यंजने ह्यांच्या संयोगाने व मराठी व्याकरणांच्या नियमांना अनुसरुन उत्पन्न झालेली अशी अर्थपूर्ण रचना की ज्यायोगे मराठी व्यक्ती, कुटूंब, समुह अथवा समाज एकमेकांशी संभाषण करु शकतील.

६. मराठी स्वर व व्यंजने ह्यांच्या संयोगाने व मराठी व्याकरणांच्या नियमांना अनुसरुन उत्पन्न झालेली अशी अर्थपूर्ण रचना की ज्यायोगे मराठी व्यक्ती, कुटूंब, समुह अथवा समाज एकमेकांशी सर्व-संभाषण करु शकतील.

मराठी शब्दाची व्याख्या करणे हे तितकेसे सोपे नसले तरी मला जे म्हणायचे आहे ते ६व्या व्याख्येने बऱ्यापैकी ग्रहण केले आहे असे वाटते. [माझ्या एका अमेरीकन मित्राला जर मी ही व्याख्या समजावून सांगितली तर तो म्हणेल, "ठिस देफ़िनितिओन विल्ल च्रच्क उन्देर इत्स वोन वेइघ्त.." :-)]

६व्या व्याख्येत ठळकपणे मांडलेल्या सुत्रांबद्दल थोडे बोलुया. ही व्याख्या "मराठी स्वर व व्यंजने", "मराठी व्याकरण", "अर्थपूर्ण रचना", "सर्व-संभाषण" अशा मुख्य चार सुत्रांना गुंफते. हे प्रत्येक सुत्र खाली विस्तृत केले आहे.

Ø "मराठी स्वर व व्यंजने"
मराठीत खालील स्वर व व्यंजने आहेत:-

स्वर:

अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ॠ, ऌ, ऍ, ए, ऐ, ऎ ऑ, ऒ, औ, ऍं, अं, अः

व्यंजने:

क, ख, ग, घ, ङ | च, छ, ज, झ, ग, ञ | ट, फ, ठ, ड, ढ, ण | त, थ, द, ध, न, ऩ | प, फ, ब, भ, म | य, र, ल, ळ, व, | श, ष, स, ह, ज्ञ

स्वर व व्यंजने ह्याच्या संयोगाने आपण व्यंजनांची विविध रूपे निर्मितो- अक्षरे व बाराखडी. ६व्या व्याख्येत हा संदर्भ घेतला आहे. मराठी शब्द ह्या स्वर व व्यंजनांच्या विविध रूपांपासून (अक्षरे व बाराखडी) तयार होतात. [आपण देवनागरी लिपीचा वापर करुन ते लिहीतो.] म्हणजेच मराठी शब्द असा की जो मराठी स्वर व व्यंजनांनी बनलेला आहे.

Ø मराठी व्याकरण

मराठी शब्द असा की ज्याला मराठी व्याकरणाचे सर्व नियम लागू होतात.

नाम, सर्वनाम, कर्ता, कर्म, विशेषण, क्रियाविशेषण, अव्यय, क्रियापद अशा प्रमुख प्रकारात तो मोडतो.

त्याची भूत, भविष्य, वर्तमान व ह्या काळांच्या स्थितीनुसार निर्माण होणारी रुपे आहेत.

त्याची स्त्रीलिंग, पुलिंग, नपुसकलिंग अशी रूपे आहेत.

त्याची एकवचन व अनेकवचन अशीही रूपे आहेत.

त्याची होकारार्थी व नकारार्थी रुपे आहेत.

व्याकरणाचे वरील सामान्य नियम ज्या शब्दाला लागू होतात, तो मराठी शब्द.

Ø अर्थपूर्ण रचना

अर्थपूर्ण रचना अशी की जी शब्दातील भाव व्यक्त करु शकते.

"रद्दड" म्हंटल्यावर तो शब्द नेमके भाव आपल्यापर्यंत पोहोचवतो. कारण तो शब्द "रद्दी" ह्या मुळ शब्दापासुन तयार झालाय व आपल्याला त्याशब्दाचा स्वत:चा असा एक अर्थ माहीत आहे. "आणि त्याचा चेहरा लालीलाल झाला"... मधे "लालीलाल" चा अर्थ आपल्यासमोर आपसुक पोहोचतो.

अर्थपूर्ण रचनेचे आणखी एक विशेषण असे सांगता येईल की असा शब्द की जो एका मुळ शब्दरचनेशी निगडीत असतो. ऊदा. फांदी, पान, फळ, फूल, खोड, पानगळ, वठणे, पारंब्या, मुळ, हे शब्द "झाड" ह्या मुळ शब्दरचनेशी निगडीत आहेत. आपल्याला "पानगळ" म्हंटले की आणखी वेगळे काही सांगावे लागत नाही.

खूरपणी, मशागत, लागवड, तोडणी, म्हंटले की आपण कशाबद्दल बोलतो आहे ते "कळते". ह्या "कळवण्याच्या" सामर्थ्याला अर्थपूर्ण रचना म्हणता येईल.

मराठी शब्द जे की त्यांच्यातुन आपल्याला कळते.

Ø सर्व-संभाषण

बोलणे, लिहिणे, ऐकणे, वाचणे, शिकणे, शिकवणे, विचारणे, ई. क्रियांतून जे घडते ते सर्व-संभाषण.

गरजेनुसार एखाद्या मराठी भाषिकाने वरील कोणत्याही संभाषण साधनांचा वापर करतांना अपेक्षित विचार पोहोचवण्यासाठी जे शब्द वापरले ते मराठी शब्द.

एखाद्या मराठी भाषिकाने एखाद्या व्यक्तीशी, समुहाशी, समाजाशी परिणामकारक संवाद साधण्यासाठी ज्या शब्दांचा वापर केला ते मराठी शब्द.

हे सुत्र समजावून घेतांना, त्याचा आधीच्या तिन्ही सुत्रांशी असलेला संबंधसुद्धा लक्षात घेतला पाहिजे.

वरील चारही सुत्रे एकमेकांत विणली तरच ६व्या व्याख्येचा अपेक्षित अर्थ आपल्याला "मराठी शब्द" कशास म्हणता येईल ते सांगतो.

आता आपण ही व्याख्या चालवुन पाहू.

मी जर "ट्रबल" हा इंग्लिश शब्द आत्ता लिहिला आहे तसा देवनागरी लिपीत लिहिला की, तो वरील चार सुत्रांची कसोटी पार करतो का पाहू. माझ्यामते हा शब्द ४ पैकी ३ कसोट्या पार करतो पण मराठी व्याकरणाची कसोटी नाही.

१. ट्रबल हा शब्द देवनागरी लिपीत लिहिला, की तो आपली पहिली कसोटी पार करतो. कारण हा शब्द मराठी स्वर व व्यंजनांनी बनला आहे.

२. ट्रबल हा शब्द वाक्यात वापरला की त्याचा अर्थ कळू शकतो. ऊदा. "अरे, तो खूप ट्रबल मधे आहे, त्याने ज्या पतपेढीत आयुष्यभराची कमाई ठेवली होती, ती पतपेढी बुडाली". ज्यांना ट्रबल ह्या मुळ इंग्लिश शब्दाचा अर्थ माहिती नसेल त्यालाही थोडीफार त्या शब्दाची जाणीव होईलच. म्हणजेच हा शब्द "अर्थपूर्ण" आहे असेच म्हणता येईल. ही कसोटीही पार झाली.

३. असे समजू की वरील संवाद दोन व्यक्तीतला होता. ज्याने हे वाक्य व ट्रबल हा शब्द ऐकला त्याला सांगणाऱ्याने त्याले जे सांगायचे होते ते परिणामकारकतेने सांगितले. म्हणजेच "सर्व-संभाषणाची" ही कसोटीही पार झाली.

४. व्याकरणाची कसोटी का पार होत नाही ते पाहुया.

"अरे, त्याच्या समोर अडचणींचा डोंगर उभा आहे." ह्या वाक्यात "अडचण" ह्याचा समानार्थी "ट्रबल" हा शब्द टाकून पाहू. "अरे, त्याच्या समोर "ट्रबलींचा" डोंगर उभा आहे." असे आपण म्हणतो का? त्याऐवजी, आपण "अरे, त्याच्या समोर खूप ट्रबल्स आहेत." असे म्हणतो. मुळ ट्रबलचे अनेकवचन करतांना आपण त्या शब्दाचे इंग्लिश अनेकवचन घेतो. म्हणजेच ही कसोटी नापार.

व्याकरणाची कसोटी पार न झाल्यामुळे मी असे म्हणू शकतो की, ट्रबल हा शब्द मराठी शब्द नाही.

आपण असेही म्हणू शकतो की, "ट्रबल" ह्या शब्दावर मराठी संस्करण न झाल्यामुळे सध्यातरी तो मराठी शब्द नाही.

हे असे म्हणायचे कारण म्हणजे, मराठी भाषेत इतर अनेक भाषांतुन अनेक शब्द आले आहेत. पर्शियन भाषेतील अनेक शब्द मोगल काळात मराठीत आले व आज मराठी भाषेत त्या शब्दांची अनेक रूपे पहावयास मिळतात. मोगलांच्या काळात मराठीवर जे परिणाम झाले, तेच आज इंग्लिश मुळे होतायेत. जो पर्यंत त्या इंग्लिश शब्दांची मराठी रूपे आपण वापरत नाही, ऊदा. डॉक्टर-डॉक्टरांचे-डॉक्टरांनी, सायकल-सायकली-सायकलींचे-सायकलींचा, तोपर्यंत आपण अशुद्ध मराठीच बोलतो आहोत असे म्हणता येईल.

मुद्दा हा की, जर एखादा परकीय शब्द आपल्याला मराठीत वापरायचा असेल तर त्याशब्दाचे मराठीकरण वरील चार सुत्रांचा वापर करून केला तर ते योग्य दिशेने टाकलेले पाऊल ठरेल.

v मराठी भाषेसमोरील आव्हाने व प्रश्न:

मराठीला जी आव्हाने आहेत, तीच आज भारतातील किंवा इंग्लिशेतर अनेक भाषांसमोर असतील. (माझी खात्री आहे की ह्या यादीत चायनीज भाषा नसेल). ही आव्हाने म्हणजेच खालील काही मानसिक, तांत्रिक प्रश्न.

१. हा प्रश्न एखाद्या भाषेने दुसऱ्या भाषेवर केलेल्या सांस्कृतिक आक्रमणाचा नसुन, हा प्रश्न ज्या भाषेवर आक्रमण होत आहे त्याभाषिकांनी होणारे बदल तंत्रशुद्धतेने न घडवून आणल्याने भाषेचे जे एक अशुद्ध रूप निर्माण झाले आहे, त्याचा आहे. हा प्रश्न ह्याबाबतची जागरुकता नसल्याचा आहे.

२. हा प्रश्न आपण इंग्लिश शिकतांना जी काळजी घेतो तीच काळजी मराठी नीट सर्व-संभाषणासाठी न घेण्याचा आहे.

३. हा प्रश्न एखाद्या प्रसिद्ध अमराठी व्यक्तीने मराठीत एखाद-दुसरे वाक्य बोलले तरी टाळ्या-शिट्या वाजवून दाखवलेल्या मानसिक दुर्बलतेचा आहे.

४. हा प्रश्न ऊदा. एखाद्या खाणेरीत (उपहारगृहात, रेस्तराँत) गेल्यावर मराठी अभिमानाने न बोलता तोडक्यामोडक्या अशुद्ध इंग्लिश मधे बोलून मराठीपण झाकण्याचा आहे.

५. हा प्रश्न आम्ही बोलतो तीच शुद्ध मराठी व ग्रामीण मराठीला "ग्रामीण" ह्या एकाच वेष्टणात गुंडाळून सर्वात प्रथम त्या मराठी भाषाप्रवाहांशी संकर न करण्याचा आहे. कोकणी, कोल्हापुरी, सोलापुरी, मराठवाडी, विदर्भी, सातारी, खांदेशी, ई. भाषाप्रवाहातील (डायलेक्ट) अनेक सुंदर मराठी शब्दांना दूर ठेवण्याचा आहे.

६. ह्यानंतर हा प्रश्न शब्दांच्या मदतीसाठी इतर भारतिय भाषांशी संकर न करता फक्त इंग्लिशशी करण्याच्या मानसिकतेचा आहे.

एक छोटीशी घटना सांगून मी हा मुद्दा संपवतो. १९९४ ला मी पॅरीसला गेलो असतांना मला पॅरीस विमानतळाला जाण्यास ३ जणांचे रेल्वे तिकीट (मराठी संस्करण झालेला हा एक इंग्लिश शब्द) काढण्यासाठी गेलो. तिकीट देणाऱ्या महिलेला इंग्लिशमधे मी विमानतळाचे तिकीट मागितले. जाणीवपूर्वक मी माझ्या वाक्यात "चार्ल्स-द-गॉल" असा शब्द टाकला होता व बोलतांना बोटांनी मुद्दाम ३ बोटे दाखवत होतो. ती महिला ढीम्म. पुन्हा पुन्हा सांगूनही ती काहीच हालचाल करेना, तेंव्हा माझ्या मागच्या फ्रेंच महिलेच्या काय जे लक्षात यायचे होते ते आले. ती पुढे आली व मला कुठे जायचे आहे ते विचारून, फ्रेंचमधे त्या तिकीटवालीला सांगून मला तिकीट काढून दिले. ह्याप्रसंगाआधी गेल्या दोन दिवसात असे अनेक प्रसंग माझ्यावर आले होते व रस्ता विचारतांना, खरेदी करतांना, सगळीकडे इंग्लिश बोलले की प्रतिसाद अमित्र असायचा. पण एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याकडून, जिथे पर्यटन हा एक मुख्य व्यवसाय आहे, अशी वागणूक अपेक्षित नव्हती. तरीसुद्धा जे काही झाले, त्यामागे त्यांची त्यांच्या भाषेबद्दलची आग्रहाची भूमिका चांगलीच लक्षात राहिली. नुकत्याच झालेल्या बिजींग ऑलिंपीकमधे त्यांच्या अध्यक्षांनी चायनीजमधे केलेले भाषण आपण सर्वांनी ऐकले-पाहिले.

v पुढे काय?

पुढे काय हे जाणण्याआधी, एक चर्चा करूया. महाराष्ट्राची जी काही लोकसंख्या आज आहे, त्यात "मराठी" भाषक किती असतील? ह्याचर्चेपुरते असे मानू की ते, लोकसंख्येच्या ६०% आहेत. ह्या ६०% पैकी, कितीजण त्यांच्या रोजच्या जगण्यासाठी अशी मराठी बोलतात की जी इंग्लिश शब्द न वापरता बोलूच शकत नाहियेत? ५%? १०%? ही संख्या कदाचित १०% च्या आसपास असेल. इतर लोक आजही त्यांची मराठी बोलून त्यांचे रोजचे व्यवहार पुरे करतायत. पण, त्यांच्यावरही बरेच आक्रमण होते आहे आणि जसजसे नवीन तंत्रज्ञान हे त्या उरलेल्या लोकांपर्यंत पोहोचेल, तसतसे त्यांची भाषा बदलायला सुरूवात होइल. ऊदा, "मोबाईल फोन" च्या वापराबरोबर येणारे "रीचार्ज", "एस.एम.एस", "डायल ट्यून" "प्लॅन" असे शब्द त्यांना वापरण्यावाचून चालणार नाही. तरीसुद्धा, बोली मराठी खऱ्याअर्थी जिवंत असेल तर ती खेड्यांमधेच- जिथे जागतीकीकरणांची झळ अजुन कमीच पोहोचली आहे. (खतांच्या आणि किटकनाशकांच्या मजेशीर नावांमुळे ते वारे पोहोचल्याचे जाणवत होते पण आता वेग वाढणार..)

मुद्दा १- नवीन शब्द निर्माण करतांना, तो शब्द कितीजण वापरणार आहेत त्याप्रमाणे त्यावरून त्याचे महत्व ठरवता येईल.

दुसरा मुद्दा आहे तो मुळ मराठीतील शब्दांचा योग्य जागी नेमका वापर करण्याचा. जर एखाद्या स्थितीसाठी शब्दच नसेल तर तो निर्माण करण्याचा. ऊदा. (कदाचित माझेच मराठीचे ज्ञान कमी असेल म्हणूनही मला असे शब्द आहेत की नाही माहित नाही. पण एक ऊदाहरण म्हणुन ह्याकडे पाहावे.)

मला जर "आवड" ह्या शब्दाचा वेगवेगळ्या स्थितीसाठी वापर करायचा असेल तो शब्द तोकडा पडतो.

"त्याला गणिताची आवड जरा कमीच आहे"

"त्याला गणित आवडते"

"त्याला गणित बरेच आवडते"

"त्याला गणित खूप आवडते"

"गणित म्हणजे त्याचा अत्यंत आवडीचा विषय."

वरील वाक्यामधे आवड ह्या शब्दाची चपखल बसतील अशी रुपे हवी आहेत की जी एखाद्याच्या आवडीच्या पातळीचा नेमका अर्थ पोहोचवतील.

हे असे असणे केवळ भाषेच्या सौंदर्यासाठीच आवश्यक नसुन काही व्यवहारीक कारणांसाठीही आवश्यक आहे. ऊदा, एखाद्या वृत्तपत्रात सरासरी ५०००० शब्द रोज छापावे लागतात. त्याऐवजी जर नेमके शब्द वापरल्यामुळे १०% जागेची बचत होत असेल तर त्याचे अनेक फायदे होऊ शकतील. जागेच्या बचतीबरोबरच मनुष्यतासांची बचतही महत्वाची असेल- लिहिणाऱ्याच्या व वाचणाऱ्याच्या.

मुद्दा २: जुन्या काही शब्दांची पुनर्बांधणी हा भाषेच्या विकासासाठी आवश्यक घटक आहे.

मध्यंतरी दै. सकाळमधे एका महोदयांनी, शाळांमधे मराठी शिकवतांना ती "साहित्याच्या" मदतीने शिकवण्याच्या एकांगी शिक्षणपद्धतीबद्दल खूप मार्मिक विचार मांडले होते. ह्यामुळे "भाषेचा" अभ्यास मागे पडून भाषेचा वापर फक्त समोर येतो पण पाया कच्चाच राहतो असे योग्य विचार मांडले होते.

एम. ए मराठीचा (एम. ए. ला मराठी शब्द का वापरत नाहीत?) अभ्यासक्रम तपासला असता त्यामधे "शब्द व्युत्पत्ति शास्त्राचा" उल्लेख दिसला नाही.

मुद्दा ३: शब्द निर्मीती हा एक आवश्यक विषय मानून त्याचा शाळांमधूनच अभ्यास सुरू झाला पाहिजे.

खरे म्हणजे ह्याविषयावर अजुन बरेच लिहिता येईल. वरील लेख ह्याविषयावरची सुरुवात आहे असे मानून येथेच थांबतो.

लेखनविषय: दुवे:

Comments

मोठा आवाका

अनेक निष्कर्ष फार विचारपूर्वक मांडले आहेत.

पण सारांशाचे मुद्दे पुन्हा समजावून सांगाल काय?
"आवड" शब्दाचे वेगवेगळे प्रयोग मला ठीक वाटले, त्यामुळे शब्दनिर्मितीची निकड (या उदाहरणावरून) कळली नाही.

मुद्दा २ असा मांडता येईल का - "रोजवापरातल्या आणि उपयोगी भाषेची शब्दसंपदा वाढत असते." मग ती जुन्या शब्दांची पुनर्बांधणी करून होत असेल, दुसर्‍या भाषेतले शब्द आत्मसात करून होत असेल...

मुद्दा ३ बद्दल थोडासा सहमत आहे, बराच साशंक आहे. (येथे शब्दनिर्मिती म्हणजे "सुंदर->सुंदरपणा/सौंदर्य" सारखे "क्यूट->क्यूटपणा/??क्यौट्य??" याबद्दल शाळेत काही मार्गदर्शन मिळाल्यास बरे. पण काही सोपे शब्द निर्माण करण्यासाठी असामान्य प्रतिभा लागते. आचार्य प्र. के. अत्र्यांच्या प्रतिभेचे उदाहरण बस थांबते तो "थांबा" (=बसस्टॉप). तरी शाळेत प्रत्येक विद्यार्थी तो छाप मानून नवनिर्मिती करू लागला तर नामुष्कीचा प्रसंग येईल. ...विमान उडते/उतरते ते ठिकाण (रनवे) "उड्डा/उतरा" किंवा पोस्ट-ऑफिसातल्या लिहिण्याच्या फळीला "लिख्खा"... असे शब्द मराठीभाषक स्वीकारणार तर नाहीच. पण शाळाशिक्षकाला अशा विद्यार्थ्यांच्या नव-शब्द भरलेल्या वह्या तपासणे, "हा शब्द का चालणार नाही, तो का चालेल" असे सांगणे फारच कठिण जाईल.

व्युत्पत्तिशास्त्राचा अभ्यास महाविद्यालयात, विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात व्हावा, याबद्दल सहमत आहे.

श्री. धनंजय ह्यांच्या अभिप्रायाला प्रतिसाद

तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

>>
मुद्दा २ असा मांडता येईल का - "रोजवापरातल्या आणि उपयोगी भाषेची शब्दसंपदा वाढत असते." मग ती जुन्या शब्दांची पुनर्बांधणी करून होत असेल, दुसर्‍या भाषेतले शब्द आत्मसात करून होत असेल...
<<

होय, त्याचा असाही अर्थ होऊ शकतो. मला नेमके असे म्हणायचे आहे की, "जर हे असे केले की ते अतिशय परिणामकारक होऊ शकते." ह्यावाक्यात "अतिशय परिणामकारक" हे दोन शब्द एकच अर्थ निर्माण करण्यासाठी खर्ची पडलेत; हे जर टाळता आले तर उत्तम. आणखी एक उदाहरण- "तुझे गाणे फार फार फार छान झाले"

>>
मुद्दा ३ बद्दल थोडासा सहमत आहे, बराच साशंक आहे. (येथे शब्दनिर्मिती म्हणजे "सुंदर->सुंदरपणा/सौंदर्य" सारखे "क्यूट->क्यूटपणा/??क्यौट्य??" याबद्दल शाळेत काही मार्गदर्शन मिळाल्यास बरे. पण काही सोपे शब्द निर्माण करण्यासाठी असामान्य प्रतिभा लागते. आचार्य प्र. के. अत्र्यांच्या प्रतिभेचे उदाहरण बस थांबते तो "थांबा" (=बसस्टॉप). तरी शाळेत प्रत्येक विद्यार्थी तो छाप मानून नवनिर्मिती करू लागला तर नामुष्कीचा प्रसंग येईल. ...विमान उडते/उतरते ते ठिकाण (रनवे) "उड्डा/उतरा" किंवा पोस्ट-ऑफिसातल्या लिहिण्याच्या फळीला "लिख्खा"... असे शब्द मराठीभाषक स्वीकारणार तर नाहीच. पण शाळाशिक्षकाला अशा विद्यार्थ्यांच्या नव-शब्द भरलेल्या वह्या तपासणे, "हा शब्द का चालणार नाही, तो का चालेल" असे सांगणे फारच कठिण जाईल.
<<

शाळापातळीवर शब्दनिर्मीतीची बीजे टाकता आलीत तर बरे असे वाटते. त्यात शब्द म्हणजे काय, ते कसे निर्माण होतात, अशा अनुषंगाने घेतले तरी पुष्कळ. मुलांना शब्दांकडे अधिक शास्त्रीय द्रॄष्टीने पाहता येईल एवढेच अपेक्षित आहे. नाहीतर होते काय की, एखाद्याने शब्द निर्माण केला की त्यावर अनेकजण तुटून पडतात व त्यांची मते बऱ्याचदा भावनिक असतात. माझ्यामते शब्दांकडे फक्त संदेश पोहोचवण्याचे अक्षर ह्या द्रॄष्टीने पाहता आले पाहीजे. त्याची व्याकरणाच्या मदतीने विविध रुपे तयार केली की झाले.
>>
पण काही सोपे शब्द निर्माण करण्यासाठी असामान्य प्रतिभा लागते.
<<

तुमच्याशी मी पुर्णपणे सहमत आहे आणि म्हणूनच मी ह्या कलेकडे ६५ वी कला म्हणून पाहतो.

गाणे

तुझे गाणे फार फार फार छान झाले
मी हे वाक्य असे म्हणेन, "तुझे गाणे लई छान झाले" किंवा लईनंतर छान शब्द जरा विचित्र वाटत असेल तर "तुझे गाणे लई झ्याक/भारी झाले". आता इथे अडचण ही की हे शब्द बोलीभाषेतील आहेत. तथाकथित प्रमाणभाषेत हे बसतात किवा नाही हे मला माहीत नाही. पण नेमक्या भावना व्यक्त करण्यासाठी हे शब्द चपखल आहेत असे मला वाटते.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

चाबूक, रंपाट

किंवा मग वैशालीचा भन्नाट. याहीपेक्षा तोडलंस मित्रा/मैत्रिणे... हे सगळ्यात संक्षिप्त!

(पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत) सौरभ

==================

स्त्रीबद्दल आपल्याला धास्ती वाटते. कारण एकतर कोणत्याही स्त्रीला पुरुषाकडे खाऊ की गिळू असं रोखू़न पाहता येतं.

अरे खरेच की

कट्टा संस्कृतीमध्ये यासाठी बरेच शब्द आहेत. उदा. तो वाईट/उच्च/त्रास गातो.
अवधूत 'टांगा पलटी, घोडे फरार' असेही म्हणतो. :)

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

कट्टा संस्कृती

बोली भाषेतील लोकप्रिय शब्द व कोकणी, कोल्हापुरी, सोलापुरी, मराठवाडी, विदर्भी, सातारी, खांदेशी, इ. भाषाप्रवाहातील (डायलेक्ट) अनेक सुंदर मराठी शब्दांना प्रमाणीत भाषेत लवकरात लवकर स्थान मिळाले की मराठी भाषा विकासास चालना मिळेल.

+१

मुळ लेख अभ्यासपुर्ण आहे. मात्र मला काहि ठिकाणी संदिग्धता / असहमती वाटली. वेळ मिळाला की (तर) विस्तृत प्रतिसाद देतो.
मात्र

बोली भाषेतील लोकप्रिय शब्द व कोकणी, कोल्हापुरी, सोलापुरी, मराठवाडी, विदर्भी, सातारी, खांदेशी, इ. भाषाप्रवाहातील (डायलेक्ट) अनेक सुंदर मराठी शब्दांना प्रमाणीत भाषेत लवकरात लवकर स्थान मिळाले की मराठी भाषा विकासास चालना मिळेल.

+१... अगदी १००% सहमत

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

+१

बोली भाषेतील लोकप्रिय शब्द व कोकणी, कोल्हापुरी, सोलापुरी, मराठवाडी, विदर्भी, सातारी, खांदेशी, इ. भाषाप्रवाहातील (डायलेक्ट) अनेक सुंदर मराठी शब्दांना प्रमाणीत भाषेत लवकरात लवकर स्थान मिळाले की मराठी भाषा विकासास चालना मिळेल.

आजवरच्या अनेक भाषाशुद्धीवरच्या चर्चांमध्ये हा विचार इथे पहिल्यांदाच मांडला गेला आहे असे वाटते. संपूर्ण सहमत आहे.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

विचार चांगला आहे परंतु

बोली भाषेतील लोकप्रिय शब्द व कोकणी, कोल्हापुरी, सोलापुरी, मराठवाडी, विदर्भी, सातारी, खांदेशी, इ. भाषाप्रवाहातील (डायलेक्ट) अनेक सुंदर मराठी शब्दांना प्रमाणीत भाषेत लवकरात लवकर स्थान मिळाले की मराठी भाषा विकासास चालना मिळेल.

बोली भाषेतील लोकप्रिय शब्द प्रमाणित करणे हा विचार चांगला आहे परंतु व्यावहारिक वाटला नाही. उदा. खांदेशी भाषेतील शब्द तो प्रदेश सोडून किती जणांना कळतो आणि किती जणांच्या तोंडी रुळतो हा प्रश्न आहे. मला आवडणारा एक कोकणी शब्द घेऊ -सुशेगात.

आता या शब्दाचा अर्थ गोवेकर सोडून फारजणांना माहित असावा असे वाटत नाही. त्यामुळे एखादेवेळेस हा शब्द कानावरून गेला आणि त्याचा अर्थ जाणून घेतला तरी तो रुळेल असे म्हणता येत नाही. कोणताही शब्द रुळण्यासाठी तो वापरात येणे आवश्यक आहे. जसे, मोघली किंवा मुसलमानी सत्तेत इनाम हा शब्द रुळला. तो कागदोपत्री असल्याने, रोजच्या भाषेत (सुरुवातीला सत्ताधार्‍यांकडून का होईना) वापरात आल्याने लोकांत रुजला. ट्रबल या शब्दाचेही असेच. संपूर्ण महाराष्ट्राला इनाम आणि ट्रबल हे शब्द जितक्या प्रमाणात कळतील तेवढे रंपट, सुशेगात कळणार नाहीत. परंतु, मुंबय्या हिंदी मात्र त्यामानाने अधिक लोकांना कळेल कारण प्रसिद्धीमाध्यमातून होणार्‍या शब्दांचा भडिमार.

विदा या संकेतस्थळांवर प्रसिद्ध असणार्‍या शब्दाबद्दलही असेच. चार संकेतस्थळे सोडून हा शब्द कोणाला माहित नसावा. ज्यांना तो माहित आहे ते ही आपल्या रोजच्या बोलीभाषेत विदागार वगैरे शब्द वापरत नसावेत असे वाटते.

शब्द तेच प्रचलित होतात जे सतत कानावर पडतात आणि व्यवहारात वापरले जातात.

इतर भाषाप्रवाहांशी संकर

भाषा आपल्याला अनुवंशीकतेने मिळत नाही. [संदर्भ- शुभानन गांगल]. ती शिकावीच लागते. आई आपल्याला ती सुरुवात करुन देते. शाळेत धड्याखाली नव्या शब्दांची ओळख करुन दिली जाते. आपण वाचतो, शिकतो, भाषेत शब्दांचा वापर कसा करायचा शिकतो. प्रमाणीत + बोली दोन्ही मिळुन आपण ५००० ते १०००० शब्दांपेक्षा जास्त शब्द वापरत नसू. पण मराठीत त्याही पेक्षा जास्त शब्द आहेतच. [ईंग्रजीतही हाच प्रकार. नेटिव्ह ईंग्लिशमाणुसही हेच करतो]. नवे शब्द अशासाठी हवे आहेत की, नव्यातंत्रद्न्याबरोबर आलेल्या शब्दांना आपल्याकडे प्रतिशब्द नाहीत हा पहिला प्रश्न, तर दुसरा प्रश्न नेमक्या शब्दांचा अभावाचा- आपल्या माहितीतल्या संचयातील. [संदर्भ- "फार फार छान" गाणे.... व मुळ लेखातील "आवड" संदर्भातील परीच्छेद वाचावा]. ह्यातील प्रश्न क्र. २ कदाचित महाराष्ट्रातील इतर भाषाप्रवाहांशी संकर करुन सोडवता येईल असा पर्याय/विचार मांडला आहे. असे न करता जेंव्हा मराठी माणुस ईंग्रजीचा आधार घेतो तेव्हा यातना होतात.

नेमकी यातना कशाबद्दल?

मराठीत फारसी, अरबी, तमिळ शब्दही आहेत. तर मग त्यांच्यामुळेही यातना होतात की फक्त इंग्रजी शब्दांमुळे यातना होतात?

नवे शब्द अशासाठी हवे आहेत की, नव्यातंत्रद्न्याबरोबर आलेल्या शब्दांना आपल्याकडे प्रतिशब्द नाहीत हा पहिला प्रश्न, तर दुसरा प्रश्न नेमक्या शब्दांचा अभावाचा- आपल्या माहितीतल्या संचयातील.

हे शब्द प्रमाण मराठीत नसतील तर बोलीभाषेत कसे असावेत? यावर थोडा प्रकाश टाकावा. बोलीभाषांतून नव्या तंत्रज्ञानासाठी शब्द मिळतील ही आशा थोडी भाबडी वाटली.

नेमकी यातना कशाबद्दल?

नवे शब्द अशासाठी हवे आहेत की, नव्यातंत्रद्न्याबरोबर आलेल्या शब्दांना आपल्याकडे प्रतिशब्द नाहीत हा पहिला प्रश्न, तर दुसरा प्रश्न नेमक्या शब्दांचा अभावाचा- आपल्या माहितीतल्या संचयातील.
ह्यातील प्रश्न क्र. २ कदाचित महाराष्ट्रातील इतर भाषाप्रवाहांशी संकर करुन सोडवता येईल असा पर्याय/विचार मांडला आहे

बोलीभाषांतून नव्या तंत्रज्ञानासाठी शब्द मिळतील असे मलाही वाटत नाही. त्यासाठी अगदी नवे शब्द अत्यंत कल्पकतेने तयार् करावे लागतील.

बोलीभाषेतील शब्द

बोलीभाषेतले शब्द प्रमाण भाषेत आले तर प्रमाण भाषेतली शब्दसंख्या वाढेल, एवढाच फायदा. पण जोपर्यंत तो शब्द प्रमाण भाषेत नसलेली वेगळी संकल्पना, किंवा अर्थाची वेगळी छटा दाखवत नसेल तोपर्यंत अशा शब्दामुळे मराठी भाषेचा असा काय विकास होणार आहे? इंग्रजीतून आपण जेव्हा शब्द घेतो तेव्हा त्यांतून ध्वनित होणारा अर्थ मराठीतल्या कुठल्याही एका शब्दाने सांगता येत नाही. आणि त्यामुळे असेच इंग्रजी शब्द रूढ होतात. संस्कृतमधून बनवून घेतलेले शब्दसुद्धा अशाच कारणासाठी मराठीमधे सामील होतात. (तमिऴ सोडून)इतर भारतीय भाषा आणि मराठी साधारणपणे एकाच पातळीवर आहेत त्यामुळे जे शब्द मराठीत, तसेच समांतर अर्थाचे शब्द त्या भाषांमध्ये. त्यामुळे असले शब्द आयात करून मराठीचा फारसा लाभ होणार नाही. --वाचक्‍नवी

० वी कला

सुधारणा- हे वाक्य- "तुमच्याशी मी पुर्णपणे सहमत आहे आणि म्हणूनच मी ह्या कलेकडे ६५ वी कला म्हणून पाहतो." असे वाचावे- "तुमच्याशी मी पुर्णपणे सहमत आहे आणि म्हणूनच मी ह्या कलेकडे ० वी कला (सर्व प्रथम भाषा मग बाकी सगळे) म्हणून पाहतो.

आफ़्रिकेतून निघालेल्या माणसांची भाषा

या जनसमुहाला भाषा नव्हतीच. भाषा ही फ़ार नंतरची गोष्ट आहे.
शरद

संदर्भ

याबद्दल कृपया संदर्भ देऊ शकाल काय? भाषांचा उगम आणि उत्क्रांती हा विषय रोचक पण तितकाच गहन आहे.
आफ्रिकेतील काही जमाती अजूनही तोंडाने 'क्लिक' असा आवाज काढून संभाषण करतात. ही क्लिक भाषा म्हणून ओळखली जाते. पण ही भाषा उत्क्रांतीच्या क्रमात कुठे बसते, तिचा इतरा भाषांशी संबंध आहे किंवा कसे याबद्दल सध्या काय निष्कर्ष आहेत हे बघायला हवे.
----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

केरळ

केरळ मधील एका (रहस्यमय) धार्मिक समारंभात, प्राचीन वेदिक मंत्रोच्चारांबरोबरच (भारतातील सध्याच्या कुठल्याही भाषेशी साधर्म्य नसणारे व त्या अर्थी निरर्थक) उच्चार डिस्कव्हरीवरील कार्यक्रमात पाहण्यात/ऐकण्यात आले. यांचा उगम अफ्रिकेत व उच्चारांचे साधर्म्य प्राण्यांच्या/पक्षांच्या आवाजाशी असल्याचा निष्कर्ष ही याच कार्यक्रमात होता.

अवांतर १: वेदांच्या मौखिक परंपरेचे याच कार्यक्रमाक कौतुक केले गेल्याचेही पाहण्यात आले.
अवांतर २: द्रविड भारतीय उपखंडात सुमारे ६०,००० वर्षांपूर्वी आले असा त्याचा समज आहे. आर्य सुमारे ३०,०००.

पीबीएस

वर एक कार्यक्रम सोमवारी झाला. त्यातही हीच थेट माहिती मिळाली. अमेरिकेतल्या लोकांना याच कार्यक्रमातील पुढचे भाग येत्या दोन सोमवारीही पहायला मिळू शकतात (१२ आणि १९).

वा!

दुव्यावरील पाच मिनिटांची चित्रफित पाहिली. मस्त आहे. अनेक आभार.
असे रोचक दुवे एका ठिकाणी ठेवता आले तर खूपच छान होईल.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

क्लिक भाषा

माझ्या द्न्यानात तुम्ही दिलेल्या संदर्भामुळे खूप भर पडली. धन्यवाद.

आफ़्रिकेतून निघालेल्या माणसांची भाषा

उत्क्रांतीच्या चक्रातून जातांना मानव हा सुरुवातीला शरीरबोली, काही आवाज- तोंडाने, अथवा वस्तूंच्या आघाताने निर्माण करीत असणारच. तीच त्यांची सुरुवातीची भाषा.
ज्याप्रमाणे ईतर प्राणी करतात, त्याप्रमाणे मानव काहीतरी संवाद करत असेलच. निसर्गात त्याही वेळी आवाज उत्पन्न होत असेलच- वारा, समुद्राच्या लाटा, पशु-पक्षी, किडे, बाळाच्या रडण्याचा आवाज, ई ह्यासर्वांपासुन मानवाला आवाजाचे द्न्यान झाले असावे.
अनेक पक्षाची नावे ते ज्याप्रमाणे आवाज काढतात त्याप्रमाणे आहे- काssव वरुन कावळा, क्रो ई. अगदी तान्ह्या बाळाने माणसाला अनेक शब्द दिले असावेत- त्याच्या रडण्यातुन, ओरडण्यातुन. आई हा शब्द तर तसाच तयार झाला असावा. ज्याप्रमाणे देहाला नांव दिले की, ती त्या देहाची ऒळख- नांव- होते, त्याच प्रमाणे प्रत्येक समोर दिसणाऱ्या वस्तूला, सजीवाला, काहीतरी "ओळख" दिली असता संवाद साधता येतो हे जेव्हा मानवाला नक्की कळाले असेल तेंव्हा खऱ्याअर्थाने भाषानिर्मीती सुरु झाली असावी. व्याकरण, लिपी ही तर आत्ताची प्रगती.

फ्रेंच-मराठी तुलना

लेखात पॅरिसची आठवण सांगितली आहे. इतरही चर्चांमध्ये युरोपियन देशांचे उदाहरण त्यांच्या भाषेच्या अभिमानाबद्दल दिले जाते.
फ्रेंच भाषा फ्रान्सव्यतिरिक्त आणखी २९ देशांची अधिकृत भाषा आहे. फ्रेंच लोकांना कुठलाही विषय शिकताना इतर भाषेचा आधार घ्यावा लागत नाही. जर एका देशाची भाषा अशी असेल तर त्यांना तिचा वापर करणे सोईचे वाटणे साहजिक आहे. मराठी ही एका प्रांताची भाषा आहे. मराठी भाषिकांची संख्या या तुलनेत फारच मर्यादित आहे. जर मराठी भारताची भाषा असती तर ही तुलना सयुक्तिक ठरली असती.
----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

फ्रेंच-मराठी तुलना

जगातील पहिल्या २० भाषा विकिपीडियावर पहा.

धन्यवाद

दुव्याबद्दल धन्यवाद. फ्रेंच भाषिकांची संख्या मराठी भाषिकांच्या जवळजवळ दुप्पट आहे. संख्या हा मुद्दा कदाचित तितका प्रभावी ठरू नये. पण इतर मुद्दे लागू आहेत असे वाटते.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

अत्यंत नम्र विनंती

ह्यालेखाबद्दल मला तुम्ही खालील प्रकारे मदत करु शकता. ह्यामुळे आपल्या सगळ्यांना काहीतरी चांगले निर्माण करता येईल ह्यासाठी ही अत्यंत नम्र विनंती-

१. तटस्थ बाजू: मी जे विचार मांडले आहेत, त्यावर एका विलग व दुसऱ्या दृष्टीकोनातून पाहून, विचार मांडावेत. ह्यामुळे इतरांनाही हा लेख वेगवेगळ्या बाजूंनी पाहता येईल व त्यामुळे आपल्या संवादाची उंची वाढेल. माझ्याविचारांच्याही पुढे जाऊन तुमचे विचार मांडावेत व लेखात मांडलेले मुद्दे एका नव्या प्रकाशाखाली येऊद्यात ते अशा प्रमाणे की, त्यामुळे आपल्याला एक नवी माहीती मिळेल.

२. तुलना: ह्या लेखात मांडलेले मुद्दे तुमच्या वाचनात इतरत्र आले असतील तर त्यांच्याशी ह्या लेखातील मुद्दे तुलना करुन पाहा. ह्या लेखातील विचारांची त्रुटी, वेगळेपणा, साधर्म्य, अशी तुलना करुन ते मांडावेत.

३. अ/सहमती: तुम्ही कशाशी सहमत आहात, कशाशी नाही ते स्पष्टपणे लिहावे.

४. प्रश्न: तुम्हाला अधिक माहीती हवी असल्यास प्रश्न विचारावेत

५. तसेच मी कोणते मुद्दे विचारात घेतले नाहीत, जे मुद्दे मांडलेत त्यात सुस्पष्टपणाचा अभाव आहे का?, मुद्द्याच्या शेवटी स्पष्टपणे उकल होते का? मुद्दे काही सीमांमधेच अडकून पडले आहेत का? त्यांची सीमा [स्कोप] कशाप्रकारे वाढवता येईल?

६. सर्वात शेवटी, हाच लेख/एखादा मुद्दा तुम्ही लिहीला असता तर कसा लिहीला असता?

धन्यवाद.

यातील काही मुद्दे

मी एका लेखमालेत हाताळले आहेत.
"व्याकरणमहाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण"

काही मुद्दे प्रतिसाद-उपप्रतिसादात आलेले आहेत.

त्या लेखमालेचे उद्दिष्ट्य थोडे वेगळे होते, त्यामुळे तुमच्या प्रश्नांना मुद्द्यास-मुद्दा उत्तरे मिळणार नाहीत, क्षमस्व.

तळे दाखवणारी तुमच्यासारखी माणसे

माझे एक ई-मित्र, श्री. अनिल पेंढारकर परवा म्हणाले, "पाणी वाढणारे अनेकजण भेटतात पण तळे दाखवणारी तुमच्यासारखी माणसे विरळाच." आज हेच वाक्य तुमच्याबद्दल लागू होते आहे.
~तळ्याकाठी बसून खोलीची व्याप्ती बघणारा- मी!

सहमतीच्या डोंगरात बारीकसारीक असहमती

प्रथम : तुमच्या संकेतस्थळावरची पाने चाळली आणि तुम्ही केलेल्या कार्याबद्दल अप्रूप वाटले. अभिनंदन! पुढील असहमतीचे मुद्दे तसे किरकोळ आहेत, तरी ते मांडताना मुळातली ही प्रशंसा झाकोळली जाऊ नये.

१. भाषेतून अनेक अर्थच्छटा बोलणार्‍याकडून ऐकणार्‍याकडे पोचाव्यात यात संभाषणाची श्रीमंती आहे. त्यामुळे बोलणार्‍याच्या/लिहिणार्‍याच्या भांडारात असे नेमके शब्द असल्यास फारच चांगले. सहमत.

१अ. सहमतीत किंचित असहमतीचा सूर
खरे तर जिवंत भाषांमध्ये असे कामसू शब्द तयार झाल्यावाचून राहात नाहीत. बटाटा कुस्करला, खिसला (किसला), चिरला, (पुरणयंत्रातून) काढला/वाटला - सर्व प्रकारांत बटाट्याचे लहान कण होतात. पण प्रत्येक प्रक्रियेतून रांधलेल्या पदार्थाची चव वेगळी असते, त्यामुळे त्या अर्थच्छटा एकमेकांना नेमक्या सांगणे रोजच्या उपयोगाच्या आहेत. त्या अर्थच्छटांसाठी वेगवेगळे शब्द कोण्या सुगरणीने मराठीला बहाल केले कोणास ठाऊक, पण त्यांची गरज असल्यामुळे त्यांचा उपयोग होतो, आणि अजून तरी ते शब्दही उपयोगात आहेत. त्यामुळे एखादा शब्द निर्माण करण्यापूर्वी त्या अर्थच्छटांची निकड आहे, असा विचार करणे आवश्यक आहे. आजीच्या सांगण्यावरून अन्न "गॅसवर शिजवण्या"त आणि "चुलीवर शिजवण्या"त फरक आहे. तर त्या दोन अर्थांसाठी विशेष शब्दनिर्मितीची गरज आहे काय? माझ्या मते तो फरक सांगण्याची निकड जवळजवळ कधीच भासणार नाही. कोणी मुद्दामून शब्द निर्माण केलेत तर ते रूढ होणार नाहीत. त्यामुळे तुमच्यासारख्या उत्साही, अभ्यासू शब्दनिर्मात्याने शब्द निर्माण करण्यापूर्वी प्रत्येक शब्दाबद्दल हा विचार जरूर करावा, नाहीतर काही शब्दांच्या बाबतीत निराशा पदरात पडेल.

१आ. शब्दमाळेतून अर्थच्छटा :
"आवड" बाबतीत तुमचे उदाहरण मला पटलेले नाही.
तशी कमीच आवड <->बरीच आवड<->खूप आवड<->अत्यंत आवड
या ठिकाणी वेगवेगळे शब्द असावेत याबाबत मी असहमत आहे.

तशी कमीच सहमती<->बरीच सहमती<->खूप सहमती<->पूर्ण सहमती
थोडीशी किळस <->बरीच किळस<->खूप किळस<->अत्यंत किळस

अशा प्रकारे तेच शब्द वेगवेगळ्या संदर्भात माळून त्या संदर्भाला योग अर्थच्छटा निर्माण करता येते. थोड्या अवयवांच्या जोडणीच्या वैविध्याने (combinatorial variety ने) अफाट प्रमाणात अर्थच्छटा सांगता येण्यातही भाषेचे वैभव आहे. अशा बाबतीत तरतमभावाऐवजी समजा मी वेगवेगळे शब्द केले : "आवड, आमोद, रुची, प्रीती" तर उलट तोटाच आहे. शब्द माळून जो तरतमभाव स्पष्ट कळतो (ती अर्थच्छटा जर सांगायची असेल) तर ती अर्थच्छटा स्पष्ट दिसून येणार नाही. तसे होऊ नये. "रुची" आणि "आवड" यात "फार-फार/लई" असे कुठले नाते नाही. त्यांच्या अर्थच्छटा वेगवेगळ्या दिशांनी जातात, म्हणूनच ते दोन्ही शब्द मराठीत टिकू शकले आहेत.

२ असहमती : पुढे ज्या भाषा अधिक विकसत गेल्या त्यात महत्वाची कामगिरी त्या त्या भाषेतील तज्ञांनी केली व त्या भाषेला व्याकरण, मिळाले. या बाबत असहमत. (लिपीबाबत सहमत.)
भाषेला व्याकरण स्वयंभू असते. "कोकणी ही लिखित भाषा नाही म्हणून तिला व्याकरण नाही" अशी संभावना काही लोक करत असत! मनुष्याच्या कंठ-तोंडातून असंख्य आवाज निघतात. पैकी काही ध्वनी "माळल्यासारखे" (म्हणजे केवळ "च्", "ईऽ", "स्स्" पेक्षा लांबलचक ध्वनिमाळा) असतात, आणि त्याने बोलणार्‍याकडून ऐकणार्‍याला संदेशन होतो. अर्थातच ते ध्वनी माळण्यासाठी बोलणारा काही अंतःस्थ तंत्र (कोडिंग) वापरत असावा, आणि ऐकणारा काही तंत्र [बहुधा तेच तंत्र उलट क्रमाने] वापरून अर्थ ओळखत असावा (डिकोडिंग). याच अंतःस्थ तंत्राला व्याकरण म्हणतात. बोलणार्‍याला-ऐकणार्‍याला जरी ते तंत्र अंतःस्थ-सुलभ असले, तरी ते शब्दांत सांगणे बरेच कठिण असते - म्हणून कदाचित शाळेत ते क्लिष्ट वाटते.

लिपी ही काही भाषांना चिकटलेले, चांगलेच उपयोगी उपांग आहे. लिपी ही उपयोगी असली तर पुरे, त्यापेक्षा परिपूर्ण असायची गरज नसते. इंग्रजीसाठी रोमन भाषेची लिपी वापरतात. रोमन लिपीत ५-६ स्वरचिह्ने आहेत. इंग्रजी भाषेत २०-एक स्वर-उच्चार आहेत. पण ५ स्वरचिह्नांनी काम भागते ना? चालवून घ्या - इंग्रजीचे तितके काही बिघडत नाही. मराठीसाठीसुद्धा देवनागरीतली स्वरचिन्हे कमी पडतात, (आणि काही उपयोगी नाहीत! - ॠ, लृ...) पण जे आहे त्याने काम भागते ना? ठीक आहे, तेवढ्यासाठी नवीन लिपी घडवायची गरज नाही.

३. शब्दाची व्याख्या :
बराच सहमत. "अर्थपूर्ण"चा अर्थ "संभाषणात/संदेशनात सक्षम" असा घेतला तर व्याख्या ३ पुरेशी आहे. पुढे जंजाळ वाढवले तर तुमचा मित्र म्हटल्याप्रमाणे "बोजडपणामुळे व्याख्येला तडा जातो!"

४. मराठीतले स्वर आणि व्यंजने :
याविषयी उपक्रमावर राधिका यांनी एक लेखमाला लिहिली आहे -
वर्णमाला
माझी मते राधिका यांना बरीचशी मिळती-जुळती आहेत. फरक तिथल्या प्रतिसाद-उपप्रतिसादांत सापडतील. ऍ, ऑ, हे तुम्ही समाविष्ट केलेत त्याबद्दल तुमच्याशी सहमत आहे. त्याचप्रमाणे तुमच्या यादीत च़, ज़, झ़ सुद्धा समाविष्ट करावेत. "ज्ञ" हे एक लेखी चिह्न आहे, त्याचा मराठीत उच्चार "द्न्य" असा होतो, ते समाविष्ट करू नये... वगैरे बारीक-सारीक मल्लीनाथी.

५. मराठी व्याकरण - बरीचशी असहमती
तुम्ही शाळेत शिकवलेल्या व्याकरणातून हे वर्णन केले आहे खरे. पण हे इंग्रजीचे अंधानुकरण आहे, असे माझे मत आहे. याबाबत मी फार विचार केलेला नाही, ही मते कच्ची आहेत.
मराठीत दोन (किंवा तीन) प्रकारचे कोशगत (लेक्सिकल) शब्द असतात.
१. धातू
२. नामे
३. ? अव्यये ? (संस्कृतात अव्यये ही वेगळी नाहीत, पण मराठीत वेगळी असावीत असे माझे मत आहे. )

शिवाय
४. "प्रत्यय" आणि
५. "उपसर्ग"
हे परतंत्र शब्दप्रकार आहेत. यांचे अर्थ कोशगत नसून म्रराठी व्याकरणजन्य आहे. वगैरे.

खरे तर तुमच्या शब्दनिर्मितीच्या प्रपंचात या गुंत्यात पडायची काहीच गरज नाही.
१. लिंग, २. वचन, ३. विभक्तीचे सामान्यरूप, ४. धातू असल्यास आख्यातप्रत्यय : यांच्यासाठी मराठीतले खास प्रत्यय आहेत. नवशब्द या प्रकारे लोक वापरतील तेव्हा तो मराठीत रुळला, अशी कामचलाऊ चाचणी मला योग्य वाटते.
"हा पेपर्सचा गठ्ठा" रुळलेला शब्द नाही;
"हा पेपरांचा गठ्ठा" रुळलेला शब्द आहे. पण पेपर्सचा/पेपरांचा शब्दप्रयोग लोकांना विचारून तपासायचा - शब्दनिर्माता काय स्वतःच्या निर्मीतीच्या बाजूने पक्षपात करेल!

६. अर्थपूर्ण रचना (थोडीशी सहमती)
तुम्हाला साधित शब्द आवडतात असे दिसते - तुमचे उदाहरण पान+गळ = पानगळ.
त्या मानाने कोणाच्यातरी शाळेत काही मुलांना "फद्या" म्हणायचे, त्याचा अर्थ लगेच कळून येत नाही. त्या शाळेतील कट्ट्यावर जाऊन विचारावा लागेल.
साधित शब्दांतून अर्थाबाबत काही निर्देश मिळतो, हे चांगले आहे - सहमत. पण जर नवीन वेगळीच अर्थच्छटा प्रकाशित करायची असेल तर एवढे पुरेसे नाही.
उदाहरण : सावरकरांचा शब्द "प्रतिवेदन"="रिपोर्ट करणे" (सध्याच्या मराठीत "अहवाल सादर करणे" किंवा "हालहवाल सांगणे")
प्रति=उलट; वेदन=माहिती देणे, यातून अर्थाबद्दल काही तरी संकेत मिळतो जरूर, पण अर्थच्छटा खरे तर कळत नाही. अशा शब्दाची अर्थच्छटा रुळवायची असेल तर त्या शब्दाच्या वापराशिवाय गत्यंतर नाही. असे दिसते, की "अहवाल सादर करणे" किंवा "हालहवाल सांगणे" यांच्यात ज्या वेगवेगळ्या अर्थच्छटा आहेत, त्या महत्त्वाच्या होत्या, त्या टिकल्या.

शब्दांच्या नवनिर्मितीबाबत सावरकरसाहित्याचा अभ्यास उपयुक्त ठरावा. एवढी प्रचंड प्रतिभा होती. पण त्यांचेसुद्धा काही शब्द मराठीभाषकाने आत्मसात केले नाहीत. कुठले केलेत, कुठले नकारलेत - या अभ्यासाने नव्या दमाच्या शब्दनिर्मात्याला काही प्रबोधन मिळू शकेल.

७. बोलीभाषांतील शब्द अधिक प्रचारात आणणे - पूर्णपणे सहमत

"ग्रामीण" ... कोकणी, कोल्हापुरी, सोलापुरी, मराठवाडी, विदर्भी, सातारी, खांदेशी, ई. भाषाप्रवाहातील (डायलेक्ट) अनेक सुंदर मराठी शब्दांना (...प्रमाणमराठीत वापरले पाहिजे).

यासाठी मात्र वर्तमानपत्रातील स्तंभलेखक आणि प्रतिभावंत साहित्यिकांनी मनावर घेतले तर फार चांगले. प्रियाली म्हणतात ते खरेच आहे. मी एकदा "सुशेगाद" शब्द वापरला तर संदेशन होणार नाही, माझाच तोटा होईल. पण एखाद्या सुंदर कवितेत पाडगांवकरांनी वापरला, आशाताईंनी ते गीत गायले, तर हळूहळू महाराष्ट्रभरातला मराठी माणूस तो शब्द ओळखू लागेल. अहिराणीतले काही थोडे खास शब्द मला माहीत असतील, तर बहिणाबाईंच्या ओव्यांनी हरखून गेल्यामुळे. महाराष्ट्रातल्या कलाकारांनी मनावर घेतले, तर त्यांच्यात्यांच्या भागातले ठेवणीतले शब्द आपल्याला सगळ्यांना परिचयाचे होतील - त्या अर्थच्छटांची आपल्यालाही गरज वाटू लागेल.

८. मराठी भाषेपुढील प्रश्न :

१. हा प्रश्न एखाद्या भाषेने दुसऱ्या भाषेवर केलेल्या सांस्कृतिक आक्रमणाचा नसुन, हा प्रश्न ज्या भाषेवर आक्रमण होत आहे त्याभाषिकांनी होणारे बदल तंत्रशुद्धतेने न घडवून आणल्याने भाषेचे जे एक अशुद्ध रूप निर्माण झाले आहे, त्याचा आहे. हा प्रश्न ह्याबाबतची जागरुकता नसल्याचा आहे.

थोडाफार सहमत.

२. हा प्रश्न आपण इंग्लिश शिकतांना जी काळजी घेतो तीच काळजी मराठी नीट सर्व-संभाषणासाठी न घेण्याचा आहे.

कसदार शिक्षण हवे खरे. (बहुतेक शाळांत ना मराठीत कसदार शिक्षण असते, ना इंग्रजीत. त्यापेक्षा कुठल्या एका भाषेत तरी कसदार असावे. सर्वोत्तम हे की दोन-तीन भाषांत कसदार शिक्षण असावे.)

३. हा प्रश्न एखाद्या प्रसिद्ध अमराठी व्यक्तीने मराठीत एखाद-दुसरे वाक्य बोलले तरी टाळ्या-शिट्या वाजवून दाखवलेल्या मानसिक दुर्बलतेचा आहे.

मुद्दा असंबद्ध वाटला. प्रसिद्ध अमराठी व्यक्तीने मराठी चाहत्यांबद्दल या प्रकारे आपुलकी दाखवली, तर चाहत्याने दाद दिल्यास काय वाईट?

४. हा प्रश्न ऊदा. एखाद्या खाणेरीत (उपहारगृहात, रेस्तराँत) गेल्यावर मराठी अभिमानाने न बोलता तोडक्यामोडक्या अशुद्ध इंग्लिश मधे बोलून मराठीपण झाकण्याचा आहे.

व्यापाराच्या बाबतीत संदेशन कार्यक्षम असणे महत्त्वाचे. खानावळ (खाणेरी?) चालवणारा मराठी उत्तम बोलत असेल, तर मराठीत बोलावे. आपण त्याची भाषा उत्तम बोलत असू, पण तो मराठी उत्तम बोलत नसेल, तर त्याच्या भाषेत बोलावे. आपण आणि तो एकमेकांच्या भाषा नीट बोलत नसू, तर मोडक्यातोडक्या जोडभाषेत बोलावे. आमच्या इस्पितळात सहा जागतिक भाषांत लिहिलेला फलक आहे. "त्याच्या भाषेत बोलण्याचा पेशंटचा हक्क आहे", आणि जगातील प्रमुख भाषांमधले दुभाषे इसितळात नोकरीला आहेत. इंग्रजी-अभिमानाने किंवा फ्रेंच-अभिमानाने कोणाचा इलाज चुकला तर त्या भाषाप्रौढीने तोटाच झाला म्हणावे... "यात 'चिकन/बीफ/पोर्क' आहे का असे विचारणार नाही, 'कोंबडी/गाय/डुक्कर' असेच विचारीन" असे कोणी शाकाहारी म्हणाला, आणि खानावळ मालकाला नीट समजले नाही, तर तोटा कोणाचा झाला?

५. ...ग्रामीण ... कोकणी, कोल्हापुरी, सोलापुरी, मराठवाडी, विदर्भी, सातारी, खांदेशी, ई.

सहमत

६. ह्यानंतर हा प्रश्न शब्दांच्या मदतीसाठी इतर भारतिय भाषांशी संकर न करता फक्त इंग्लिशशी करण्याच्या मानसिकतेचा आहे.

बराचसा सहमत. वेगळी कुठली भारतीय भाषा येत असेल तर त्यातील ठेवणीतल्या शब्दाची मजा कळेल, ते शब्द मराठीत येतील, या अर्थी सहमत. म्हणून मराठीभाषकांपैकी काही लोकांना अन्य भारतीय भाषा आवर्जून याव्यात. (मराठीत बरेच हिंदी/उर्दू शब्द आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही म्हणता तशी मानसिकता अट्टहासाने खूप लोकांची असेल असे वाटत नाही.)

कसदार टिप्पणी

तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल शतशः रुणी. उत्तम टिकेमुळे आत्ता कुठे लेखाच्या प्रयोजनाला फळ धरु लागल्याचे दिसतेय. ह्यावर विस्तृत प्रतिसाद मी यथावकाश देईन.
राजेन्द्र, प्रियाली, तो, ऋषिकेष तुमच्या प्रतिसादही तितकाच महत्वाचा असून मी सुधारीत लेखनात त्याची नोंद घेईन.

सहमत + पुरवणी

सुंदर प्रतिसाद. बराचसा सहमत. माझे प्रतिसाद टंकण्याचे कष्ट वाचवल्याबद्दल धनंजय यांचे आभार.
काहि पुरवणी मते व स्वचित असहमती आहे ती अशी:

खरे तर जिवंत भाषांमध्ये असे कामसू शब्द तयार झाल्यावाचून राहात नाहीत.

+१
मात्र असे शब्द तयार होणे आणि आयात होणे यामधे लागणारा वेळ जर बराच जास्त असेल तर आयात झालेला परभाषिक शब्द वापरला जातो. बटाट्याचेच उदाहरण द्यायचे तर किसणे/चिरणे/वाटणे/भरडणे आहे मात्र मायक्रोवेव्ह करणे ला अजूनहि ना मराठी शब्द आहे ना इंग्रजी रुळला आहे तरीही इंग्रजी शब्दच वापरला जातो (काहिसा नाईलाज). अश्या ठिकाणी प्रस्तुत लेखकासारख्या उत्साही व अभ्यासु व्युत्पत्तीकाराची गरज आहे/भासेल असे वाटते.

त्यामुळे तुमच्यासारख्या उत्साही, अभ्यासू शब्दनिर्मात्याने शब्द निर्माण करण्यापूर्वी प्रत्येक शब्दाबद्दल हा विचार जरूर करावा, नाहीतर काही शब्दांच्या बाबतीत निराशा पदरात पडेल.

कबुल मात्र याचा व्यत्यास पाळु नळे.. म्हणजे जरी सगळे शब्द रुळणार नसतील तरी निर्मिती थांबवू नये

"आवड" बाबतीत तुमचे उदाहरण मला पटलेले नाही.

सहमत आणि शब्दसमुह वापरण्याने येणारी लवचिकता मला जास्त महत्त्वाची वाटते / आवडते.

शब्दांच्या नवनिर्मितीबाबत सावरकरसाहित्याचा अभ्यास उपयुक्त ठरावा. एवढी प्रचंड प्रतिभा होती. पण त्यांचेसुद्धा काही शब्द मराठीभाषकाने आत्मसात केले नाहीत. कुठले केलेत, कुठले नकारलेत - या अभ्यासाने नव्या दमाच्या शब्दनिर्मात्याला काही प्रबोधन मिळू शकेल.

फक्त सावरकरच नाहि तर काहि लोकप्रिय लेखक, मर्ढेकरांसारखे कविंतांबरोबर शब्द प्रसवणारे कवी यांकडून नवे दर्जेदार शब्द मिळतील. तसेच काहि शासकीय पुस्तिकाही चाळाव्यात काहि प्रतिशब्द कसे असू नयेत यासाठी ;)

३. हा प्रश्न एखाद्या प्रसिद्ध अमराठी व्यक्तीने मराठीत एखाद-दुसरे वाक्य बोलले तरी टाळ्या-शिट्या वाजवून दाखवलेल्या मानसिक दुर्बलतेचा आहे.

मुद्दा असंबद्ध वाटला. प्रसिद्ध अमराठी व्यक्तीने मराठी चाहत्यांबद्दल या प्रकारे आपुलकी दाखवली, तर चाहत्याने दाद दिल्यास काय वाईट?

+१ सहमत

बाकी बर्‍याचशा प्रतिक्रीयेशी सहमत

»
ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

मायक्रोवेव्ह

मध्यंतरी मायक्रोवेव्ह म्हणजे काय, त्याचे कार्य कसे चालते, वगैरे ह्याबद्दल एक पुस्तक चाळले होते (ब्राऊजिंग). त्यात दिल्याप्रमाणे पदार्थातील पाण्याच्या अंशामधे रेडिओ तरंगांनी वीजनिर्मीती होते व त्यामुळे पदार्थात उष्णता निर्माण होउन तो भाजला जातो. त्यामुळे मला मायक्रोवेव्ह मधे पदार्थ करण्याच्या प्रक्रियेला वीजणे म्हणावेसे वाटते.
बटाटा वीजणे/वीजुन घे, वीजला का? त्यावर स्वादानुसार मीठ टाकून वीजुन घ्यावा. अरे, वाक्यात उपयोग् होतो की! :-)

लेख धरसोड करत वाचला !

लेख फार थोडा समजला . एक तर पूर्ण लेखाचा उद्देश मला अजूनही कळला नाही, स्पष्ट लिहिल्याबद्दल क्षमस्व !
तरिही एक विचारायचे होते, शासनस्तरावर काही नियमांना मान्यता मिळते आणि त्या नियमांच्या द्वारे आपले भाषिक व्यवहार पूढे वाटचाल करतात. आता प्रथम ज्या स्वरांचा उल्लेख केला त्याबद्दल ऍ, ए, ऐ, ऎ ऑ, ऒ, यातले ' अ' वर अर्धचंद्र आणि 'ऑ' यांचा स्वरांमधे समावेश माहित आहे. पण हे ''ए, ऐ'' असे असतांना 'ए' वर दोन मात्रे मागे आम्ही चर्चाही केली होती. त्यात 'ए' वर दोन मात्रे टाकल्याने शब्दात कोणते बदल होतात ते जर सांगितले तर बरे होईल असे वाटते. ( इथे काहीच बदल होत नाहीत असे मला म्हणायचे आहे.)

मुद्दा १- नवीन शब्द निर्माण करतांना, तो शब्द कितीजण वापरणार आहेत त्याप्रमाणे त्यावरून त्याचे महत्व ठरवता येईल.

एखादा शब्द किती लोक वापरणार आहेत यावरुन नवीन शब्द तयार होतो असे नसावे तर, कोणत्या सहज सोप्या शब्दावरुन भाषिक व्यवहार (संदेशन) लोकांचे पूर्ण होतात त्यावरुन तो शब्द भाषेत रुढ होत असावा असे वाटते.

मुद्दा २: जुन्या काही शब्दांची पुनर्बांधणी हा भाषेच्या विकासासाठी आवश्यक घटक आहे.
'जुने जाऊ द्या मरणालागुनी......जुन्या शब्दातून शब्दांची पुनर्बांधणी हा भाषेच्या विकासासाठी क्लीष्ट घटक वाटतो. उलट नवे शब्द,भाषेला गती देतात असे वाटते.

एम. ए मराठीचा (एम. ए. ला मराठी शब्द का वापरत नाहीत?) अभ्यासक्रम तपासला असता त्यामधे "शब्द व्युत्पत्ति शास्त्राचा" उल्लेख दिसला नाही.
बीएच्याच (मराठी ) अभ्यासक्रमात : भाषेचे स्वरुप, भाषाभ्यास पद्धती, स्वन-स्वनिम विचार( इथे शब्दांच्या उच्चारांचा, निर्मितीचा विचार केलेला आहे) रुपिमविचार, वाक्यविचार, अर्थविचार, मराठी भाषेची पूर्वपिठिका, मराठी भाषेची उत्पत्ती, मराठीचे कालिक भेद...असे प्रकरणे आहेत.
एम. ए. भाग दोन लाही 'भाषा विज्ञान आणि मराठी भाषेचा इतिहास' हा पेपर आहेच..त्यात व्युत्तपत्तीचाही विचार मांडलेला दिसतो. (डॉ.बा.आ.मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादेत हा अभ्यासक्रम आहे)

शब्द निर्मीती हा एक आवश्यक विषय मानून त्याचा शाळांमधूनच अभ्यास सुरू झाला पाहिजे.

हा मुद्दा शंभर टक्के मान्य !!!

अजून एकदा लेख वाचून काढल्यानंतर काही भर टाकता आली तर टाकेन ! तुर्तास इतकेच ! चुभूदेघे.

-दिलीप बिरुटे

लेखाचा उद्देश

लेखाचा उद्देश: लेखात लिहिल्याप्रमाणे हा आहे-

मी मराठी भाषातज्ञ नाही व माझा मराठीचा अभ्यास १० वीच्या मराठीच्या परीक्षेनंतर पूर्णपणे थांबला. नंतरच्या २५ वर्षात मी कधीही मराठीत लिहीले नाही, त्यामुळे माझे मराठी शुद्धलेखन, माझे अक्षर (की ज्याबद्दल मला अभिमान होता) ह्याचा पूर्णपणे ऱ्हास झाला. पण मला जे मराठीचे ज्ञान आहे त्यानुसार मी हा लेख शब्दनिर्मीती बद्दल एक जाणीव व्हावी ह्या दॄष्टीने लिहीण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मराठी भाषेत नवीन शब्द निर्मीती शास्त्रशुद्ध पद्धतीने व्हावी हा एकमेव हेतू ह्या लेखामागे आहे. मी भाषातज्ञ नसल्यामुळे ह्या लेखात काही चुका अनवधानाने झाल्या असतील तर माफी असावी व आपण त्या चुका मला कळवल्यात तर मी त्याचा आनंदाने स्वीकार करीन. हा लेख वाचतांना तो एका आधुनिक सामान्य मराठी भाषकाने त्याला मराठीबद्दल काय वाटते ते विचार व्यक्त करण्यासाठी लिहीला आहे असे समजून वाचला तर माझे विचार आपणांपर्यंत योग्यरीतीने पोहोचतील असे वाटते.

मराठी भाषेत नवीन शब्द निर्मीती शास्त्रशुद्ध पद्धतीने का व्हावी? - एखाद्याने नवा शब्द निर्माण केला की, त्यावर सगळे तुटून पडतात. अगदी वाचकांच्या मनोगतात पत्रे येतात. कुणाला संस्कृतच्या मदतीने शब्द हवा असतो/नसतो, कुणाला लांबलचक शब्द ना/आवडतात, ई, ई. ह्यात काहीतरी एकत्रीतपणा यावा असे वाटते. शब्दनिर्मीतीचे काही नियम असावेत असे वाटते- जसे व्याकरणाचे आहेत.

ह्यासाठी शब्द म्हणजे काय ह्याची व्याख्या करण्याचा एक प्रयत्न केला आहे. ही व्याख्या भाषापंडीतांनी मानणे/न मानणे गौण आहे, कारण तो हेतू येथे नाही पण मराठी शब्दाची व्याख्या असणे /ठरवणे हा ह्या लेखाचा मुळ हेतू नक्कीच आहे. तसेच ही एक चर्चेची सुरुवात आहे आणि कसदार चर्चेसाठी एक संदर्भ असावा ह्याहेतूने मी मला जमेल अशी एक व्याख्या केली आहे.

व्याख्येत स्वर आणि व्यंजनाचा एक सर्वमान्य संच आहे असे मानता येइल ते मी लिहीलेलेच असावेत असा आशय नाही. माझ्या पुरते हे पुरेसे आहे-
<स्वर आणि व्यंजनांची उदहरणे>

मुद्दा १- नवीन शब्द निर्माण करतांना, तो शब्द कितीजण वापरणार आहेत त्याप्रमाणे त्यावरून त्याचे महत्व ठरवता येईल.

एखादा शब्द किती लोक वापरणार आहेत यावरुन नवीन शब्द तयार होतो असे नसावे तर, कोणत्या सहज सोप्या शब्दावरुन भाषिक व्यवहार (संदेशन) लोकांचे पूर्ण होतात त्यावरुन तो शब्द भाषेत रुढ होत असावा असे वाटते.

येथे हे अपेक्षीत आहे- एकदम शेकडो मराठी शब्द निर्माण करण्याची वेळ आली तर अग्रक्रम कसा ठरवायचा ह्यासाठी तो मुद्दा मांडला आहे.

मुद्दा २: जुन्या काही शब्दांची पुनर्बांधणी हा भाषेच्या विकासासाठी आवश्यक घटक आहे.
'जुने जाऊ द्या मरणालागुनी......जुन्या शब्दातून शब्दांची पुनर्बांधणी हा भाषेच्या विकासासाठी क्लीष्ट घटक वाटतो. उलट नवे शब्द,भाषेला गती देतात असे वाटते.

माझ्यामते दोन्हीही तितकेच अवघड आहे...वर लिहिल्याप्रमाणे.

बी. ए. ला शब्दनिर्मीती शिकवली जाते ह्यामाहीतीबद्दल आभार.
शब्दनिर्मीतीची बीजे शाळेतूनच टाकणे गरजेचे आहे ह्याबद्दल सगळ्याचे एकमत आहे. तुमच्या होकारात्मक उत्तरामुळे त्याला आणखी बळ मिळाले.

'ए'ला दोन मात्रे

पण हे ''ए, ऐ'' असे असतांना 'ए' वर दोन मात्रे मागे आम्ही चर्चाही केली होती. त्यात 'ए' वर दोन मात्रे टाकल्याने शब्दात कोणते बदल होतात ते जर सांगितले तर बरे होईल असे वाटते.

ऎ हा उच्चार म्हणजे ए वर दोन मात्रे नाही. तो (असलाच तर) अतिदीर्घ ए असावा. (कन्नडमध्ये तसा उच्चार व वर्णमालेत तसे चिन्ह आहे)

मात्र एक (वन), ऐक (लिसन) हे दोन उच्चार वेगळे आहेत...

ऎक असा उच्चार मराठीत नसावा असे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

असावा

दीर्घ "ए" उच्चार असावा.
वेग (दीर्घ)
वेगळा (सामान्य [सुशिक्षितच] उच्चार ह्रस्व)

तसाच ह्रस्व "आ" हा उच्चारही मराठीत आहे.
आंबा

तसाच दीर्घ "अ" उच्चारही मराठीत आहे.
तळऽ (लेखनात "तळं") येथे पहिल्या अक्षरात 'अ' ह्रस्व आहे, दुसर्‍या अक्षरात दीर्घ आहे.

'अ' अतिह्रस्वही सापडतो...
याचा आर्थ काय? (सामान्य हेल/जोर न दिलेला उच्चार)

देवनागरीत उपलब्ध चिह्नांपेक्षा मराठीत अधिक स्वर उच्चारले जातात. पण ते नेमके न लिहिल्यामुळे खूप काही अडचण भासत नाही. त्यामुळे देवनागरी लिपी बदलायची खूपखूप गरज नाही.

मराठी शब्द तयार कुणी करावे?

मराठी प्रतिशब्द असावेत अशी इच्छा बाळगणे काही चुकीचे नाही. उगीचच परभाषिक संज्ञा वापरण्यापेक्षा सहजसोपे(?) मातृभाषेतील शब्द वापरणे याला कोणाचीच आडकाठी नसावी. परंतु, असे शब्द नेमके कोणी तयार करायचे?

गुगलणे

बघा गुगलून एखादा असा प्रतिशब्द मिळतो का?
प्रकाश घाटपांडे

शब्दकारांसाठी मार्गदर्शक तत्वे

शब्दकार कोण होऊ शकते?-
ज्याला शब्द बनवायला आवडतात असे सर्व. ज्यांना गरज आहे असे सर्व. [ज्यांचे गॅरेज आहे असे सुद्धा- शॉकॉप, शॉकॉब्जर, अशा पाट्या पाहील्या असतीलच- ते खरे गरजू]. शब्दनिर्मीती ही उच्च दर्जाची कला मानली पाहिजे.

तीला/त्याला कशाचे द्न्यान आवश्यक आहे?-
मराठी संस्कृती, महाराष्ट्र, परंपरा [उतरता क्रम]

तो/ती भाषापंडीतच असणे आवश्यक आहे का?-
मुळीच नाही. असल्यास चांगले. वीर सावरकर हे उपजत भाषापंडीत होत.

"प्रश्न नेहमी विचारले जाणारे (प्रनेवि)" येथे वाचा.

विरोधाभास

शब्दकार कोण होऊ शकते?-
याच्या उत्तरामध्ये "ज्याला शब्द बनवायला आवडतात असे सर्व" आणि "शब्दनिर्मीती ही उच्च दर्जाची कला मानली पाहिजे" या दोन वाक्यांमध्ये विरोधाभास आहे असे वाटत नाही का? मला चित्र काढायला खूप आवडते पण म्हणून मी काढलेली चित्रे जहांगीर आर्ट ग्यालरीमध्ये रवीवर्माच्या चित्रांशेजारी ठेवली तर ते बरोबर होईल का?

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

उच्च दर्जाची कला

कारण त्यामुळे आवड असणार्‍याला "कुठे" पर्यंत पोहोचायला हवे ते कळण्यासाठी.

 
^ वर