तेलही गेलं... (भाग २)

१९५०च्या सुमारास अमेरिका जगातला सर्वात मोठा तेल उत्पादक देश होता. प्रचंड मोठे तेल साठे त्यावेळेस अमेरिकेच्या तेल कंपन्यांना सापडले होते आणि त्या देणगीवरच १९५० पासून पुढे अमेरिकेची औद्योगिक आणि व्यावहारिक भरभराट वेगवान गतीनं झाली होती. आणि ही देणगी आपल्याला जणू अनंतापर्यंत मिळाली आहे अशाच भ्रामक समजूतीत अमेरिकन शास्त्रज्ञ, उद्योजक आणि राज्यकर्ते त्यावेळी (आणि जवळ जवळ आत्तापर्यंत) मशगुल होते. पण याहीवेळी शेलमध्ये काम करणारा एक भूगर्भ तज्ञ दूरदृष्टी असलेला होता आणि त्याचं नाव होतं मेरियन किंग हबर्ट.

१९५६ मध्ये हबर्टच्या लक्षात आलं होतं की अमेरिकेतल्या तेलाचं उत्पादन एका विशिष्ठ वेळी उच्चतम पातळीवर पोहोचणार आहे आणि त्यानंतर ज्याप्रमाणात उत्पादन वाढत गेलं त्याच प्रमाणात ते घटतही जाणार आहे. म्हणजेच याचा ग्राफ घंटेच्या आकाराचा असेल. आणि या बरोबरच हबर्टनं हेही सिद्ध करून दाखवलं की १९७० हीच ती विशिष्ठ वेळ आहे ज्या सुमारास अमेरिकेचं तेल उत्पादन पराकोटीला पोहोचलेलं असेल आणि तिथपासून ते उतरंडीला लागेल.

शेलनं, जिथं हबर्ट काम करायचा, हबर्टचं संशोधन बाहेर येऊ न देण्यासाठी खूप धडपड केली, हबर्टवर दडपणं आणली. कारण त्यांना त्यांच्या शेअर्सच्या किंमती घसरण्याची भीती वाटत होती. पण सत्य बाहेर आल्यावाचून राहिलं नाही. १९७० पासून अमेरिकेच्या तेल आणि वायूच्या झऱ्यांना ओहोटी लागली आणि प्रत्येक वर्षी आयात केलं जाणारं तेलाचं प्रमाण वाढत जायला लागलं. हबर्टच्याच पद्धतीनं मग संपूर्ण जगाचं तेल उत्पादन पराकोटीला कधी पोहोचेल यावर अभ्यास केला गेला. आणि तेल पराकोटीच्या या अभ्यासावरून तेलाचं उत्पादन कसं घटत जाईल याचे आडाखे बांधले गेले.

या सर्वच आभ्यासांनी थोड्याफार फरकानी असं दाखवलं की साधारणपणे २००० ते २०१० च्या दरम्यान जग तेल उत्पादन 'तेल पराकोटीला' पोहोचेल आणि मग तिथून हे प्रमाण कमी कमी होत जाईल. याचा दुसरा अर्थ असा की समजा २००० साली आपण 'तेल पराकोटीला' पोहोचणार असं समजलं तर, १९७० साली तेलाचं उत्पादन जेवढं होतं तेवढंच ते २०३० साली पण असेल. खालील आलेख (आलेख क्र. १) बघितल्यावर हे पटकन लक्षात येईल.

पण त्याच बरोबर २००० साली आपण 'तेल पराकोटीला' पोहोचणार असं समजलं तर, १९७० साली ज्या प्रमाणात या तेलाची गरज असेल त्याच्या कित्येक पटीनी जास्त गरज २०३० साली असेल. याची मुख्य कारणं म्हणजे २०३० साली १९७०च्या तिप्पट झालेली लोकसंख्या, लोकांच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये झालेली वाढ, औद्योगिक भरभराटीमुळे वाढलेलं तेल-अवलंबन. त्यामुळे त्यावेळी जागतिक पातळीवर तेलाची गरज आणि तेल उत्पादन यातली तफावत फार मोठी असणार आहेत. आणि याचा दुसरा अर्थ म्हणजे तेलाच्या किंमती आभाळाला भिडतील, गरिब देश अक्षरशः भिकेला लागतील आणि अर्थातच त्याचे आंतरराष्ट्रीय राजकारणावर होणारे परिणामही भयानक असतील. भारतासारख्या तेलाची प्रचंड गरज असलेल्या आर्थिक सत्तेला तर तिच्या निकडीच्या दहा टक्के तेल जरी कमी मिळालं तरीही ही संस्था संपूर्ण मोडकळीस येण्यास ते पुरेसं ठरू शकेल.

तेल उत्पादन घसरणीला लागल्यानंतर (आणि आता घसरण चालू झालीच आहे असं समजायला पुरेसे शास्त्रीय पुरावे उपलब्ध आहेत) दरवर्षी सर्वसाधारणपणे ३ ते ४% उत्पादनात घट येत जाईल असं समजायला काही हरकत नाही. बऱ्याचश्या भूगर्भ शास्त्रज्ञांच्या अभ्यासाप्रमाणे जागतिक 'तेल पराकोटी' २००५लाच होऊन गेलीये. आणि उरलेल्यांच्या मते ती साधारण २००५ ते २०१० या दरम्यान कधीतरी होणार आहे. हे सगळं जर का खरं असेल (जी शक्यता सगळ्यात जास्त आहे) तर पुढच्या चार पाच वर्षात आपल्याला याचे दणके बसायला सुरूवात होईल हे गृहीत धरायला हरकत नाही. आणि या घसरगुंडीवरून आपण जस जसे खाली यायला लागू तस तसे आपण औद्योगिक-पश्चात अश्मयुगाच्या जवळ जवळ जाण्याची शक्यताही वाढत जाईल.

'तेल पराकोटीची' ही गोष्ट म्हणजे धनदांडगे उत्पादकांच्या आणि पावट्या राजकारण्यांच्या बेफिकिरीचं आणि नालायकपणाचं उत्तम उदाहरण आहे. अमेरिकेतल्या तेल उत्पादनाला १९७०पासून ओहोटी लागेल हे हबर्टनं त्यापूर्वी वीस वर्षं आधीच सांगितलं होतं. आणि तसंच झालं. १९७०पासून पुढे प्रत्येक वर्षी अमेरिकेच्या तेल उत्पादनात घटतच गेलंय आणि आयात वाढतच गेलीये. अलास्कामध्ये अमेरिकेला अचानक सापडलेल्या १३०कोटी पिंपांच्या तेल साठ्यानंही अमेरिकेच्या तेल पराकोटीत फारसा काहीच फरक पडला नाही. अमेरिकेच्या तेल पराकोटी, तेल उत्पादन आणि आयात यातल्या फरकासाठी खालील आलेख (आलेख क्र. २)मुद्दाम बघा म्हणजे हे सारं चटकन लक्षात येईल.

- क्रमश:

Graph No 1
Graph No 2

Comments

चांगली माहीती

या लेखातपण चांगली माहीती आहे. मात्र क्रमशः असला तरी अपूर्ण वाटला. तरी देखील काही विधानांसंबंधात...(येथे जे मी मुद्दे मांडत आहेत ते केवळ वेगळी माहीती म्हणून लिहीत आहे जी थोडीशी वर दिलेल्या माहीतीला विरोधाभास वाटू शकते.माझा अतिरीक्त तेल वापराला आणि निसर्ग संपत्ती वाटेल तशी उधळायला विरोधच आहे. )

१९५६ मध्ये हबर्टच्या लक्षात आलं होतं की अमेरिकेतल्या तेलाचं उत्पादन एका विशिष्ठ वेळी उच्चतम पातळीवर पोहोचणार आहे आणि त्यानंतर ज्याप्रमाणात उत्पादन वाढत गेलं त्याच प्रमाणात ते घटतही जाणार आहे.

ह्या संशोधनात माझ्या अंदाजाप्रमाणे, तेलाचे मूलभूत स्त्रोत जे तत्कालीन तंत्रज्ञानाने काढणे शक्य होते यावर आधारीत निष्कर्ष काढलेले आहेत. आता दगडाखालील तेल आणि ते काढण्याचे "मायक्रो/नॅनो" तंत्रज्ञान खूपच बदलेले आहे.

१९७०पासून पुढे प्रत्येक वर्षी अमेरिकेच्या तेल उत्पादनात घटतच गेलंय आणि आयात वाढतच गेलीये. अलास्कामध्ये अमेरिकेला अचानक सापडलेल्या १३०कोटी पिंपांच्या तेल साठ्यानंही अमेरिकेच्या तेल पराकोटीत फारसा काहीच फरक पडला नाही.

अलास्का नॅचरल वाईल्डलाईफ रेफ्युज् (ऍन्वार) हा भाग १९७० च्या आधीपासूनच "प्रोटेक्टेड लँड" म्हणून तेल उत्खननासाठी बंद केला गेला होता. सध्या बूश सरकारने तो उघडण्याचा बराच प्रयत्न केला पण हवे तसे त्यांना यश आले नाही. तेच अमेरिकेच्या सागरीकिनार्‍यावरील साठ्यांच्या संदर्भात लागू होते.

माहिती

आता दगडाखालील तेल आणि ते काढण्याचे "मायक्रो/नॅनो" तंत्रज्ञान खूपच बदलेले आहे.
तुमचं म्हणणं बरोबर आहे पण तेल साठ्यांचं प्रमाण बदललेलं नाही. तेल काढण्याचं तंत्रज्ञान जेवढं अद्ययावत होत जाईल तेवढा त्या तेलाचा EROEI चांगला होत जाईल. दुसरं म्हणजे हबर्टच्या शिवाय अगदी अलिकडच्या काळातील तंत्रज्ञांनी सुध्दा २०१०च्या पूर्वी तेल पराकोटी होऊन जाईल हे मान्य केलंय. कॅलिफोर्निया इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील भौतिक शास्त्रज्ञ डेव्हिड गूनस्टाईन यांचं "द एंड ऑफ ऑईल"हे पुस्तक २००५च्या सुमारास प्रकाशित झालंय. "द एंड ऑफ ऑईल" तेल पराकोटी विषयातलं एक सगळ्यात चांगलं पुस्तक म्हणून समजलं जातं. यातही गूनस्टाईननं संदिग्ध पणे २०१०च्या पूर्वी तेल पराकोटी होऊन जाईल असं प्रतिपादित केलंय.

अलास्का नॅचरल वाईल्डलाईफ रेफ्युज् (ऍन्वार) हा भाग १९७० च्या आधीपासूनच "प्रोटेक्टेड लँड" म्हणून तेल उत्खननासाठी बंद केला गेला होता.

नाही, मी ज्या अलास्कन तेल साठ्याबद्दल लिहिलंय ते अलास्कातील प्रुधो बे तेल क्षेत्राबद्दल आहे. विकिवर http://en.wikipedia.org/wiki/Prudhoe_Bay_oil_field या ठिकाणी त्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती मिळू शकेल.

धन्यवाद!

भाग

चांगला लेख. आलेख १ आणि २ माहितीपूर्ण आहेत. या संबंधी कुठचा विदा वापरला गेला आहे याचे संदर्भ दिले जावे ही विनंती. पुढच्या भागांबद्दल उत्सुकता आहे.

विदा

विदा म्हणजे काय?

मिलिंद

विदा

विदा म्हणजे ज्याला मराठीत आपण सगळे डेटा म्हणतो ते. विदा हा संकेतस्थळीय शब्द आहे. फार सिरीयसली घेऊ नये. ः)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

विद्

विद् म्हणजे जाणणे (म्हणून विद्या वगैरे)
त्यावरून डेटा अशा अर्थाने विदा हा शब्द प्रचलित झाला.

आपला
गुंडोपंत

लेखमाला

लेखमाला चांगलीच होत आहे. माहितीत भर पडत आहे. पर्यायी उर्जा शोधणे हे फार अशक्य आहे असे ही वाटत नाही. तेलाचा वापर राजकारणासाठी होतो आहे हे तर ज्ञातच आहे. भारतासारख्या देशाने पर्यायी उर्जेचा शक्य तेवढा वापर आणि संशोधन करायला हवे. खास करुन सौरउर्जा, पवनउर्जा. सागरी वनस्पतींपासून उर्जा मिळवायचे ठरवल्यास आणि त्यावर यशस्वी संशोधन झाल्यास कदाचित चित्र खुपच बदलेल.

एक शंका: पृथ्वीच्या ७० भुभागावर पाणी आहे हे शाळेत असल्यापासून आपण शिकत आलो. मग आज जे तेलाचे साठे आहेत, ते जमीनीवर किती आहेत आणि सागरी भागात किती आहेत? आपण असे समजु की जागतीक तापमान वाढीने पाण्याची पातळी वाढणार आहेच. भुभाग कमी होणार. पण एक वेळ अशी येईल की पाणी सर्वत्र होईन १००% भुभाग हा पाण्या खाली असेल. पण असे होण्यासाठी पृथ्वीचा आकार एखाद्या चेंडु सारखा आणि एकदम नितळ हवा. तो नाही हे आपल्याला माहोत आहे. मग पृथ्वीच्या पृष्ठभागामध्ये बदल होणारच ना? काहि भाग नष्ट होतील तर काही नव्याने तयार होतील. उद्याची पृथ्वी आणि उद्याचा मानव आपल्याला हवे तसे नसतील. पण नवे असतील हे नक्की. पर्यायी उर्जांचा सखोल अभ्यास आणि ताबडतोब उपाय कदाचित वेगळ काही चित्र तयार करु शकतील.
हर हिमनद्या वितळु लागल्या तर त्याचा आत्ताच विचार करुन, सागराकडे वाहत जाण्यार्‍या पाण्याचा विचार करुन उर्जा निर्मितीचे आडाखे तयार करता येतील का?

उत्तम लेखमाला

ज्ञानात भर पडत आहे.

लेखमाला आवडली

भाग १ व २ एकत्र वाचले. माहितीत भर पडली. अमेरिकेत जोपर्यंत पर्यायी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था रुळत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणे कठिण वाटते आणि चीन, भारतातील लोकसंख्येचा आकडा खाली येत नाही तोपर्यंतही हेच.

 
^ वर