व्हाईट टायगर- एक सामाजिक कादंबरी

आजच्या सकाळमध्ये ही एक पुस्तक शिफारस आली आहे पुस्तकाचे नांव व्हाईट टायगर. निरंजन आगाशे हे पत्रकार असल्याने एका पत्रकाराने लिहिलेले पुस्तकाने त्यांना आकर्षित केले.ही त्यांनी केलेली ही पुस्तक शिफारस आहे आणि परिक्षणही.पत्रकाराच्या नजरेतुन असलेली ही शिफारस वाचकांच्या नजरेतुन कशी वाटते हे पहाण्यासाठी हा चर्चेचा प्रस्ताव.यासाठी शिफारसकाराची संमती घेतली आहे. मी हे पुस्तक वाचले नाही किंवा चाळलेही नाही.उपक्रमींपैकी कुणी वाचले असल्यास त्यावर अभिप्राय कळावा.
--------------------------------------------------------------------------------------------

भारतातील अंतर्विरोधांवर झोत


निरंजन आगाशे
"द व्हाईट टायगर' ही अरविंद अडिगा या लेखकाची पहिलीच कादंबरी. तिला बुकर पुरस्कार मिळाल्याने चौतीस वर्षीय पत्रकाराच्या या पुस्तकाकडे लक्ष वेधले गेले. परीक्षक समितीने या पुस्तकाची निवड करताना म्हटले होते, ""अनेक अर्थांनी ही परिपूर्ण कादंबरी आहे.''
या पुस्तकाने लेखकाविषयीच्या अपेक्षा खूपच वाढतात, असेही समितीने नमूद केले आहे. ही कादंबरी वाचल्यानंतर समितीचा हा दुसरा अभिप्राय जास्त बरोबर असल्याचे वाटते.

बलराम हलवाई या व्यक्तीची ही कहाणी. बेंगळूरुच्या दौऱ्यावर येणाऱ्या चीनच्या पंतप्रधानांना तो पत्र लिहितो आहे, अशी कल्पना लेखकाने केली आहे. या पत्रातून कहाणी उलगडत जाते. ग्रामीण भागात मजुरी करून पोट भरणाऱ्या कुटुंबात वाढणारा हा मुलगा घरच्या परिस्थितीमुळे शाळा सोडतो. चहाच्या दुकानात वेटर म्हणून काम करताना तो या खाईतून बाहेर पडण्याचे स्वप्न पाहतो. गावातील जमीनदाराच्या उच्चशिक्षित मुलाच्या ड्रायव्हरचे काम त्याला मिळते. एका छोट्याशा खेड्यातून गजबजलेल्या महानगरात येऊन बलराम धडकतो आणि मग त्याच्या आयुष्याची गाडी वेगळ्या वाटेने धावू लागते. एक वेगळेच विश्‍व त्याच्यासमोर खुले होते. आता त्याला पहिल्यापेक्षा चांगले काम मिळाले होते; परंतु त्याच्या सामाजिक प्रतिष्ठेत, दर्जात मात्र काहीच फरक पडला नव्हता. तो ड्रायव्हर म्हणून उत्तम काम करीत असला, तरी त्याला हरकाम्या म्हणूनच वागवण्यात येते. त्याचा मालक अशोक पैशाने संपन्न आणि अमेरिकेत शिक्षण घेऊन आलेला असूनही, त्याचे वर्तन सरंजामशाही मूल्यांचे कुंपण ओलांडू शकत नाही, याकडे लेखक सूचकपणे निर्देश करतात.

बलराम चालवीत असलेल्या मोटारीलाच एका व्यक्तिरेखेचे रूप देण्यात लेखक यशस्वी झाला आहे. दिल्लीतून हिंडणारी ही मोटार आणि ती चालवणाऱ्या बलरामची निरीक्षणे याद्वारे लेखक राजधानीतील उच्चभ्रूंचे जग साकार करतो. ईप्सित साध्य करण्यासाठी कुठलाच विधिनिषेध न बाळगण्याची त्यांची वृत्ती, गरीबांविषयी कमालीची तुच्छता, त्यांची चंचलता आणि भोगवाद यावर अडिगा भाष्य करतात. उच्चभ्रू वर्गाच्या दांभिकतेचे बुरखे टराटरा फाडताना अडिगा यांच्या लेखणीला धार येते. निवडणूक, न्यायव्यवस्था, सनदी नोकरशाही, उद्योगपती या सर्वच घटकांमध्ये भ्रष्टाचार हाच कसा शिष्टाचार बनू पाहतो आहे, याचे मर्मभेदक वर्णन या कादंबरीतून वाचायला मिळते. बलरामच्या काही टोकदार प्रतिक्रिया आपल्याला अंतर्मुख करतात. ड्रायव्हिंग करता-करता तो सहजपणे म्हणून जातो. दिल्लीचे रस्ते खूपच चांगले आहेत; परंतु माणसे वाईट आहेत. "इथे दर शंभर वर्षांनी गरिबांना मुक्त करणारी क्रांती होते.' ही टिप्पणी गरीबी कशी सगळ्या उलथापालथींना पुरून उरते, याचे विदारक दर्शन घडविते.

ड्रायव्हरच्या व्यवसायातील सर्वांत वाईट भाग म्हणजे मालकाची वाट पाहत उभे राहणे, ही बलरामची अशीच एक मार्मिक प्रतिक्रिया! बलराम आपले अनुभव सांगता-सांगता सहजपणे इथल्या विसंगतींवर बोट ठेवतो; मात्र या कथेत हे भाष्य काही वेळा इतक्‍या सातत्याने आणि बटबटीतपणे आपल्यासमोर येते, की कथेची स्वाभाविक लय तुटते आणि भारतातील विषमतेची दरी, भ्रष्टाचार याबद्दलच्या फक्त प्रतिक्रियाच आपण वाचत आहोत, असे क्षणभर वाचकाला वाटते.

या कादंबरीत आपल्याला भेटणारी सर्व पात्रे एकतर अतिशय गरीब किंवा उच्चभ्रू अशी आहेत. साहित्यकृतीतील व्यक्तिरेखांची निवड करण्याचा अधिकार लेखकाला असतोच, तरीही भारताचे एखादे चित्र रेखाटताना प्रचंड प्रमाणात विस्तारणाऱ्या मध्यमवर्गाचा खराखुरा प्रतिनिधी जर त्यात नसेल, तर हे चित्र अपूर्णच राहणार, असेही पुस्तक वाचताना जाणवत राहते. हे दोष असले, तरी भारतातील अंतर्विरोधांकडे ही कादंबरी आपले लक्ष वेधते, हे निश्‍चित.

------------------------------------------------
पुस्तकाचे नाव - द व्हाईट टायगर,
लेखक - अरविंद अडिगा
प्रकाशक - हार्परकॉलिन्स व इंडिया टुडे ग्रुप
पृष्ठे - ३२१. मूल्य - ३९५ रुपये
------------------------------------------------

Comments

व्वा !

पुस्तक परिचय आवडला !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डी. पी. सतीश

आयबीएनमध्ये लिहिणाऱ्या या पत्रकाराने 'द व्हाईट टायगर'ची थोडक्यातच पण चांगली वाजवली आहे.

इथे वाचा.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मराठी अनुवाद

या पुस्तकाचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे काय? आक्ख पुस्तक विंग्रजीतून वाचायच म्हन्जे लईच तरास.

मात्र या कथेत हे भाष्य काही वेळा इतक्‍या सातत्याने आणि बटबटीतपणे आपल्यासमोर येते, की कथेची स्वाभाविक लय तुटते आणि भारतातील विषमतेची दरी, भ्रष्टाचार याबद्दलच्या फक्त प्रतिक्रियाच आपण वाचत आहोत, असे क्षणभर वाचकाला वाटते.

लेखक स्वतः लिहिताना त्याच्यातला पत्रकार व संवेदनशील नागरीक हा जागा झाला असणारच.
प्रकाश घाटपांडे

गार्डियन

मी ही कादंबरी वाचलेली नाही, पण भारतीय समीक्षकांनी केलेली २-३ परीक्षणे वाचल्यावर ही कादंबरी न वाचताच सोडून दिलेली बरी, असा ग्रह होऊ लागला आहे. त्यातच प्रस्तुत लेखकाने गार्डियन या वृत्तपत्राला मुलाखत देताना, माझ्या पुस्तकातील भारताच्या वास्तववादी चित्रणामुळे देशभरात खळबळ माजेल असा दावा केला आहे.

थोडे अवांतर होईल, पण नुकताच स्लमडॉग मिलियनेअर पाहिला. एकंदर चित्रपट चांगला असला तरी पहिल्या काही मिनिटांत झोपडपट्ट्या, तिथले संडास, मोकळ्या फिरणार्‍या गायी इ. पाहून काही वर्षांपूर्वी परदेशी पर्यटकांना धारावीची एसी कारमधून सफर घडवणार्‍या टूर कंपन्यांची आठवण आली.

सरसकट सारेच भारतीय लेखक पाश्चात्य वाचकवर्गाला डोळ्यासमोर ठेवून विषमतेचे चित्रण करतात असे म्हणायचे नाही, पण एकंदरीतच या परीक्षणांतून आणि मुलाखतीतून हे पुस्तक त्या वर्गातले असावे असे वाटते.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

 
^ वर