वैश्विक शेकोटी!!

मागच्या दोन चार आठवड्यात मुंबईतल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यामुळे आपण त्याहीपेक्षा एका मोठ्या आणि संपूर्ण जगाला ग्रासून टाकणाऱ्या एका महाभयंकर हल्ल्याला थोडसं विस्मृतीत टाकलं होतं. पण ही विस्मृती लवकरच क्षणभंगूर ठरणार आहे आणि या हल्ल्याच्या दाहकतेत पुन्हा एकदा आपण होरपळून निघणार आहोत. तुमच्या एव्हाना लक्षात आलंच असेल की हा हल्ला म्हणजेच मागचे काही महिने थैमान घालत असलेलं जागतिक आर्थिक महासंकट. या संदर्भात परवा रेक्स वायलर या सृष्टी विज्ञान लेखकाचा एक लेख वाचण्यात आला. या लेखात रेक्सनं जागतिक आर्थिक संकटाकडे बघण्याचा एक संपूर्ण नवा दृष्टिकोन दिलाय. खालील लेख म्हणजे रेक्सच्या याच लेखाचं स्वैर रुपांतर.

जागतिक आर्थिक महासंकट तुमच्या मते काय फक्त डेरिव्हेटिवज आणि सबप्राईम च्या गडबड घोटाळ्यामुळेच उदभवलंय? मोठमोठ्या आर्थिक कंपन्यांनी केलेल्या अफरातफरी, चुकीचे व्यवहार, लालची आणि अधाशीपणा या सगळ्या गोष्टींनाच आपण आजच्या या संकटा मागची खरी कारणं म्हणून गृहीत धरतो. जगभरातले अर्थतज्ञ, पंडित, रथी महारथी सारेच असाच डंका पिटतात. पण याच्या पलिकडे जाऊन या राक्षसाला उभा करणाऱ्या खऱ्या कारणांकडे आपण कधी बघितलंय? अर्थकारणासाठी ज्या काही मूलभूत गोष्टी आवश्यक असतात त्या म्हणजे जमीन, उर्जा, हरित आच्छादनं, क्षार आणि समुद्र. आर्थिक महासंकट आणि हे मूलभूत घटक यांचा अर्थाअर्थी काही संबंध असेल असा विचारही याबाबतीत डंका पिटणाऱ्यांनी कधी केला नाहीये. चराचर सृष्टीच्या संदर्भात कागदोपत्री होणाऱ्या या आर्थिक देवाण घेवाणी खरं तर केवळ दांभिक, पोकळ आणि फारच वरवरच्याच असतात. इतकंच काय या देवाण-घेवाणी, हे सौदे, हे वायदे आणि या फसवा-फसवी सुद्धा या साऱ्या निसर्ग, निसर्ग संस्था आणि निसर्गाचे घटक यांच्या जीवावरच केलेल्या असतात.

सतत फोफावण्याच्या महत्त्वाकांक्षा असणाऱ्या जागतिक आर्थिक कंपन्या, त्यांचे व्यवहार आणि त्यांच्यातल्या तथाकथित अर्थतज्ञांच्या ज्ञानातला फोलपणा या आर्थिक महासंकटानं चव्हाट्यावर आणलाय. संपत्ती आणि समृद्धी फक्त या तज्ञांच्या बुद्धीचातुर्यानं आणि व्यवस्थापन कौशल्यानंच निर्माण होते असा एक फार मोठा भ्रम यांच्या डोक्यात असतो आणि ते आणि त्यांचे सहकारी एखाद्या नशेप्रमाणे त्या भ्रमातच सदैव वावरत असतात. एक जमीन खारावली तर दुसरी जमीन, एक नदी आटली तर दुसरी नदी, एक जंगल तोडून झालं की दुसरं जंगल... एवढंच नाही तर एक खंड संपला की दुसरा... असं यांचं हे संपलं की ते पादाक्रांत करणं अव्याहत चालू असतं. हेच असतं यांच्या दृष्टीनं 'क्रिएशन ऑफ वेल्थ'...

आता बाजार खाली पडलेत. ते पुन्हा कदाचित चढतील आणि पुन्हा आपटतीलही. कागदी घोडे नाचवणारे या सगळ्याचा फायदा उठवतील आणि आणखी अधिक संपत्ती स्वतः साठी आणि स्वतःच्या कंपनीसाठी निर्माण करतील. पण "अधिक संपत्तीची निर्मिती" म्हणजे नक्की काय आणि नक्की कुठून? जमीन आणि पाणी सगळं मिळून शेवटी तेवढंच राहतं. त्याच्यात अधिक निर्मिती होते? निसर्गाची अधिक निर्मिती करता येते?

१९६०च्या सुमारास प्रसिद्ध अमेरिकन निसर्गतज्ञ ऍल्डो लिओपोल्डनं लिहून ठेवलं होतं की "जमिनीला आपण विक्री योग्य वस्तू (कमोडिटी) समजतो ही आपली सर्वात मोठी चूक आहे असं मला वाटतं. कारण त्यामुळेच आपण तिचा दुरुपयोग करतो. जमिनीला आपण, आपण राहत असलेल्या समाजाचीच एक घटक आहे असं ज्यादिवशी पासून समजायला लागू त्यादिवशी पासून जमिनीचा वापर आपण प्रेमानं आणि आदरानं करायला सुरुवात करू शकू. "

पण अर्थकारण्यांना निसर्गतज्ञांच्या या सूचनांचा अर्थच कधी कळला नाही. अशा धोक्याच्या घंटांकडे त्यांनी कायमच दुर्लक्ष केलं. आता जमिनींची धूप झाली, जमिनी खारावल्या, त्यांची वाळवंटं बनली, जमिनी शेतीयोग्य राहिल्या नाहीत, लोकसंख्येचा भस्मासूर वाढतच राहिला आणि थोडक्यात जगभर उत्पादनक्षम जमिनींची प्रचंड टंचाई निर्माण झाली. जमिनीकडे आम्ही कायम कमोडिटी म्हणूनच बघितलं, आपल्या समाजाचा एक घटक म्हणून कधीच नाही.

यावर्षी इराणला अमेरिकेच्या दारात म्हणजे त्यांच्या जन्मजात वैऱ्याच्या दारात पदर पसरून उभं रहायला लागलं. जवळ जवळ तीस वर्षांनंतर पहिल्यांदा इराणनं अमेरिकेकडून दहा लाख टन गहू घेतला. यू. ए. इ. नं सुदान आणि कझाकिस्तानमध्ये जमीन विकत घेतलीये. शेतीसाठी. त्यांची अन्नधान्याची निकड भागवण्यासाठी. तशीच जमीन घेतलीये दक्षिण कोरियानं मंगोलियामध्ये, चीननं तर दक्षिण पूर्व आशियात बऱ्याच ठिकाणी अन लिबियानं युक्रेन मध्ये.

अन्नधान्याचे जगातले तीन प्रमुख निर्यातदार देश अमेरिका, न्यूझिलंड आणि ऑस्ट्रेलिया. तिघांचीही शेती मुख्यत्वेकरून रासायनिक खतं आणि जीवाश्म इंधनांवर अवलंबून. रासायनिक खतांच्या उत्पादनातला एक महत्त्वाचा घटक फॉस्फोरस. या फॉस्फोरसच्या वाढत्या तुटवड्यामुळे रासायनिक खतांचा तुटवडा पण दिवसेंदिवस वाढत जाणार. आणि इंधनांच्या तुटवड्याबद्दल तर बोलायलाच नको. म्हणजे थोडक्यात या शेतींचं भवितव्यही काही फारसं उज्ज्वल नाही.

भूगर्भ शास्त्रज्ञांनी २००५मध्येच हे सांगून टाकलं की जमिनीखालच्या तेलांचे स्त्रोत आता आटायला लागलेत. पुढच्या दशकात या स्त्रोतांमधून मिळणाऱ्या तेल उत्पादनांमध्ये प्रचंड घट होणार आहे. फेब्रुवारी २००५ मध्ये रॉबर्ट हिर्श या शास्त्रज्ञानं अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ एनर्जीसाठी एक अहवाल तयार केला होता. (http://en.wikipedia.org/wiki/Hirsch_report या दुव्यावर याबद्दलची अधिक माहिती मिळू शकते. ) या अहवालात तेल स्त्रोतांच्या आटण्यामुळे निर्माण होणाऱ्या महायुद्ध सदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी २० वर्षं जी मेहनत करावी लागेल याचा संपूर्ण प्रस्ताव दिला होता. हा २० वर्षांचा कार्यक्रम चालू करायलाही आता आपल्याला बराच उशीर झालाय! आणि याला कारण आपल्या तथाकथित तज्ञ लोकांचा "संपत्ती निर्मितीचा" आणि "वैश्विक उन्नतीचा" बडेजाव आणि निसर्ग अभ्यासकांच्या आक्रोशाकडे केलेलं दुर्लक्ष.

पारंपारिक अर्थशास्त्रीय समजूतीप्रमाणे संपत्तीच्या निर्मितीसाठी भांडवल आणि मनुष्यबळ या दोनच गोष्टींची गरज असते. जागतिक तेल उत्पादनात प्रत्येक वर्षी होणारी घट या सजूतीचं समूळ उच्चाटन करते. जगातल्या बारा सगळ्यात मोठ्या तेल उत्पादन राष्ट्रांपैकी आठ राष्ट्रांच्या तेलाच्या उत्पादनात मागच्या वर्षी घट झाली. जगातल्या प्रत्येक मोठ्या तेल विहिरीतल्या स्त्रोतांना आता ओहोटी लागलीये. पण आमचे "वैश्विक उन्नतीचा" बडेजाव मारणारे मात्र पुढच्या दशकात वाहनांची संख्या शंभर कोटीवरून दोनशे कोटी म्हणजे दुपटीनं वाढ होणार असं छाती ठोकपणे सांगतायत.

पवन उर्जा, सोलर एनर्जी, बायोफ्युएल हे सारे नवीन उर्जा स्त्रोत जगाच्या एकूण उर्जा निकडीच्या तुलनेत इतके तोकडे आणि महाग आहेत की या वैश्विक समस्येवर तोडगा म्हणून त्यांचा इथे विचारही करत न बसणं योग्य ठरेल. नवीन तेल विहिरींचा शोध आणि तेल शुद्धीकरणाच्या नवीन तंत्रांचा शोध या साऱ्याचा वेग तेलाच्या घटणाऱ्या वेगापेक्षा कित्येक पटीनं कमी आहे. या उद्योगानं नुकतंच त्यांना आर्क्टिक प्रदेशात नवीन नऊ हजार कोटी बॅरल तेलाचा शोध लागल्याचं जाहीर केलं. पण त्याबरोबरच हे जाहीर नाही केलं की नऊ हजार कोटी बॅरल म्हणजे संपूर्ण जगाची फक्त तीन वर्षाची तेलाची सोय, अर्थात हेही यांनी जाहीर केलेला आणि तेवढा मोठा तेलाचा साठा सापडला तरच...

आपण प्रत्येक तासाला अक्षरशः लक्षावधी टन तेल जाळतो. दररोज आठ कोटी टन कार्बन डाय ऑक्साईडचा धूर आपण वातावरणात सोडतो. ही एक महाप्रचंड वैश्विक शेकोटीच आपण पेटवलीये. आणि या शेकोटीत आपल्या पेक्षा जास्त आपली मुलं बाळं होरपळून जाणार आहेत. हे कटू आहे पण सत्य आहे.

आता आणखी अधिक तेल ज्वलनासाठी पाहिजे असेल तर सगळ्यात सोपा आणि स्वस्त तेलाचा स्त्रोत एकच आहे आणि तो म्हणजे असलेल्या तेल साठ्याचं जतन. वातावरणाशी मिळता जुळता असा हा एकच उपाय आता आपल्या हातात आहे. ही चराचर सृष्टीच हीच आपल्या व्यवसायाची, संपूर्ण अर्थकारणाची जननी आहे हे जिथपर्यंत आपल्या डोक्यात शिरत नाही तिथपर्यंत,"बेल-आऊट" आणि "प्रॉमिसेस" आणि आर्थिक मदती कितीही दिल्या गेल्या तरीही आर्थिक आरिष्टं परत परत डोकी वर काढणारच. खऱ्या अर्थानं सृष्टीचं संतुलन साधण्या शिवाय आपल्या समोर दुसरा कुठचाही पर्यायच नाहीये. ही तारेवरची कसरत आहे आणि ती आपल्याला करावीच लागणार.

अर्थात या सगळ्या बरोबरच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या साऱ्यानं गांगरून, घाबरून किंवा उदास होऊन जाऊ नका. याबाबतची जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा आणि ही वैश्विक शेकोटी आवाक्यात आणायला स्वतः हून पुढं होऊन हातभार लावा. ही सृष्टी आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी सुंदर करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.

Comments

चांगला लेख-भाषांतर

माझ्या कामाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे.

लेख-भाषांतर आवडले...संदर्भ देता आला तर अवश्य द्या तसेच दुवा देता आला तर अजूनच उत्तम.

जागतिक (सरासरी) तापमान वृद्धी आणि स्थानीक पर्यावरणीय बदल मान्य करण्यात अमेरिकेने बराच वेळ घालवला आहे. अमेरिका अशा साठी महत्वाची कारण जागतिक दादागिरीत#१ तसेच प्रदुषण आणि नैसर्गिक साधनसंपत्ती वापरात उर्वरीत जगापेक्षा अनेक पटीने वरचढ आहे.

ऍल गोअर आणि आता स्वतःच्या नावाने "क्लिंटन क्लायमेट इनिशिएटिव्ह" काढणारे बिल क्लिंटन हे कितीही पर्यावरणीय मित्र असलेले नेतृत्व अमेरिकेस गेल्या दशकात मिळाले तरी दोघांनी सत्तेत असताना जितकी ठोस धोरणे हवीत तितकी तयार करण्यासाठी पाठपुरावा केला नाही. रिपब्लीकन काँग्रेसमुळे काही मर्यादा आल्या होत्या हे सत्य आहे पण तरी देखील करता येण्यासारखे बरेच काही होते...

यावर अधिक चर्चा/प्रतिसाद नंतर देईन...फक्त जाता जाता एक सनसनाटी गोष्ट ऐकलेली सांगतो:

जगाचे अर्थकारण तेलावर अवलंबून आहे. हे तेल मध्यपुर्वेतील साठ्यांवर अवलंबून आहे. त्यातील सौदी अरेबियाच्या एका वरीष्ठाची मुलाखत सीबीएस वर घेतली. त्याने अनेकजण जे म्हणतात ते प्रथमतःच मान्य केले: तेलाचे बाजारभाव जरी आत्ताच्या काळात $६५-$१३० प्रती बॅरल झाला असला, तरी तेलाचा उत्पादन खर्च हा $२. इतकाच असतो!

संदर्भ

धन्यवाद.

रेक्स वायलर ग्रीनपीसच्या संस्थापक संचालकांपैकी एक. ग्रीनपीसच्या वेबसाईटवर (www.greenpeace.org)
'डीप ग्रीन' नावाचं सदर रेक्स लिहितो. 'डीप ग्रीन' तुम्हाला न्यूज लेटर सारखं पण नियमीतपणे मिळू शकतं. सदर लेख त्यावरच आधारित (थोडेफार बदल करून)लिहिला आहे.

हा विषय खरं तर सध्याचा सर्वात जास्त धगधगता (सर्वार्थानं!) विषय आहे आणि माझ्याही अतिशय जिव्हाळ्याचा आहे. दुर्दैवानी सर्वसामान्य लोकांचा या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही थंड आणि परकेपणाचा आहे . या लेखाला सुध्दा तुमच्या शिवाय इतर कोणाचा प्रतिसाद नाही हे याचंच द्योतक आहे. पण तरीही या आणि अशा विषयांवर मी अधून मधून इथे लिहायचं ठरवलं आहे.

मिलिंद

मिलींद साहेब

या लेखाला सुध्दा तुमच्या शिवाय इतर कोणाचा प्रतिसाद नाही हे याचंच द्योतक आहे. पण तरीही या आणि अशा विषयांवर मी अधून मधून इथे लिहायचं ठरवलं आहे.

तुम्ही नक्की लिहा, हा महत्वाचा विषय आहे. प्रतिसादास उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. पण प्रतिसाद आला नाही म्हणजे हा विषय लोकांना महत्वाचा वाटत नाही हे अनुमान चुकीचे आहे.

या विषयावर अजुन लेख येउ देत नियमीतपणे.

असेच म्हणतो

असेच म्हणतो. याचा व्यत्यास केला तर? कि हा विषय सर्वसामान्यांपर्यंत जेवढ्या तीव्रतेने पोहोचवता आला पाहिजे तेवढा जात नाही. असो, प्रतिसादांची संख्या हा निकष खरच फारसा पटत नाही. तुम्ही लिहित रहा. प्रतिसादां इतकेच वाचन महत्वाचे आहे.





वाचन

प्रतिसादां इतकेच वाचन महत्वाचे आहे.
सहमत. किंबहूना न पटण्यासारखे मुद्दे असणे, शंका निर्माण होणे यामुळे प्रतिसादांची गर्दी होते. या विषयात फारशी गती नसल्याने लेख वाचल्यानंतरही नेमका प्रतिसाद देता येत नाही/दिला जात नाही#. असे लेख वाढल्यानेच विषयाची जाण वाढेल, मतप्रवाह बनतील, वाद-विवाद व प्रतिसाद येतील.

# इतरत्र दिलेल्या प्रतिसादांसंदर्भात, प्रतिसादकर्त्याला मूळ विषयात गती असते असे मात्र खात्रीने म्हणता येत नाही, रस असू शकतो.

सहज आणि चाणक्य

सहज आणि चाणक्य

आपल्या दोघांचेही प्रतिसाद बघून मी काढलेलं अनुमान आतातायीपणाचं होतं असं वाटतंय. (आणि माझं अनुमान चुकीचं असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे!) तुमच्या प्रोत्साहनाबद्दल मनापासून आभार!

- मिलिंद

विषय

वरती तो यांनी दिलेला एक मुद्दा महत्वाचा आहे. तो म्हणजे

# इतरत्र दिलेल्या प्रतिसादांसंदर्भात, प्रतिसादकर्त्याला मूळ विषयात गती असते असे मात्र खात्रीने म्हणता येत नाही, रस असू शकतो.

हा विषय सर्वसामान्यांना समजेल अशा उदाहरणांसह आणि सोपा करुन समजावल्यास चांगले परिणाम नक्कीच दिसतील.





सरकारवर दबाव आवश्यक

हा लेख प्र्श्नासंबंधी एक धांदोळा म्हणून चांगला आहे. आवडला.

मात्र मी एक सामान्य माणूस म्हणून जगत असताना मला काय करता येईल हेही लेखात यायला हवे होते असे वाटते. हा प्रश्न आहे हे सगळ्यांना माहित आहे. त्यातही रोजच्या घबडग्यात छोट्या छोट्या गोष्टी जसे वीज/पाणी/इंधन वगैरे वाचवणेनासले फुटकळ उपाय अनेक जण करू शकतात. मोठ्या गोष्टींचे निर्णय (जये कायदा/नियम बनवणे, इंधन वाचवण्यासाठी कंपन्यांवर दबाव वगैरे) मात्र सरकारला घ्यावे लागतात. त्यासठी सरकारवर लोकांचा दबाब येणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकजागृती होणे आणि त्यासाठी लोकांच्या रोजच्या जीवनात जाणवणारे प्रश्न मांडणे गरजेचे आहे.

हा दाहक प्रश्न घराच्या दारात येऊन पोचला आहे हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी असे भावनात्मक / परिस्थितीचा टॉपव्ह्यू देणारे लिखाण कितपत उपयोगाचे आहे याविषतयी मला शंका आहे. त्यांच्या रोजच्या आयुष्यात, तसेच त्यांच्या व त्यांच्या मुलांच्या कालखंडात त्यांना काय फरक पडेल हे जोपर्यंत दाखवले जात नाहि तोपर्यंत आची दाहकता अथवा लेखकाला जाणवत असलेली प्राथमिकता (काही मुठभर लोक सोडल्यास) सर्वसामान्यांना जाणवणार नाही . (आता आतंकवाद्यांच्या बाबतीत ती प्राथमिकता लोकांना जाणवल्याने सरकारवर आपसूक दबाव आलेला आपण पाहतो आहोतच)

उद्या पोटात काहि जाईल का या विवंचनेत दिवस काढणार्‍याला ग्लोबल वॉर्मिंगशी आज काहिहि देणंघेणं नाहि आणि असूही नये. तेव्हा भारतासारख्या विकसनशील देशांकडून अश्या प्रकारची अपेक्षा करणं गैर नसलं तरी व्यवहार्य वाटत नाहि.

बाकी सरकारवर इतर मार्गांनी दबाव कसा आणावा हे कोणी सांगेल का?

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

वाचनीय लेख

बरेचदा असे लेख वाचून आपण तात्पूरती हळहळ व्यक्त करतो आणि आपण यात काय करणार असा विचार करुन विषयाकडे दुर्लक्ष करतो. लोकांनी आपल्या अनावश्यक गरजा कमी करणे व नैसर्गिक साधनसंपत्तीचा जपून वापर करणे यासारख्या गोष्टी केल्या तरी आपण आपल्या परीने या वैश्विक शेकोटीची धग कमी करू शकतो. सेतू बांधला जाईल की नाही यापेक्षाही खारीचा भाव असणे महत्वाचे!

जयेश

उपयोग तेव्हाच

खारीचा उपयोग आणि महती तेव्हाच जेव्हा राम त्याच्या बलाढ्य वानरसेनेसह पुल बांधायला घेतो. नुसत्या खारींनी आपला वाटा देऊन काहिहि होत नाहि

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

चांगला लेख

सृष्टीच्या संपत्तीकडे होणारे दुर्लक्ष आणि निसर्गाच्या संतुलनाशिवाय पर्याय नाही हा आपल्या लेखातला संदेश योग्यच आहे.
मिलिंदराव लेखाला न येणा-या प्रतिसादांचा विचार करु नये, आपण लिहित राहावे. आपले लेखन नैसर्गिक संपत्तीचे भान आनणारे आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वेगळा द्रूष्टीकोण

मिलिंद तुम्ही एक नवीन द्रूष्टीकोण् मांडला आहे.
सगळे मुद्दे कळतात पण वळत नाहीत.
आपल्याकडे 'नाही रे' वर्ग आहे ज्यांना भाकरीची चिंता असते, ते याच्याकडे लक्ष देणार नाहीत.
आणि आहे रे वर्ग आत्ममग्न असल्याने तोही लक्ष देणार नाही.

अनुमोदन.

कोणी वाचो अथवा न वाचो आपण लिहित रहावे हेच खरे. उलट याला असे व्यापक स्वरुप कसे देता येईल यावर अनेक पर्याय वापरता येतील.

उदा. आपण आपल्या मित्रमंडळीचा गट करुन असे लेख विरोपाद्वारे पाठवू शकता.

तसेच अधूनमधून असे लेख वर्तमानपत्रात लिहित रहा.

असे १५/२० लेख झालेतर आपण यावर पुस्तकही प्रकाशित करु शकता.

बघा किती सोपे आहे ना?

सहमत

कोणी वाचो अथवा न वाचो आपण लिहित रहावे हेच खरे. उलट याला असे व्यापक स्वरुप कसे देता येईल यावर अनेक पर्याय वापरता येतील.
सहमत आहे. प्रतिसाद न येण्याची अनेक कारणे असू शकतात. विस्तृत प्रतिसाद देण्यासाठी लागणार्‍या वेळेचा अभाव हे एक.
लोकांना हा प्रश्न जास्तीत जास्त जिव्हाळ्याचा वाटेल यासाठी वेगवेगळे मार्ग शोधायला हवेत.

----
"This is Linus Torvalds. I announce Linux."

चांगला लेख, चांगला विषय

लेख आणि विषय दोन्ही आवडले. अधिक लिहावे.

नैसर्गिक संपत्ती जपून वापरण्यापासून लहानपणापासून धडे दिले असतील तर माणूस मोठेपणीही त्याकडे लक्ष पुरवून असतो. काही गोष्टी अगदी सोप्या असतात जसे मुलांना एका खोलीतून दुसर्‍या खोलीत जात असतील तर दिवे, पंखे बंद करण्याची शिस्त लावणे. ब्रश करताना पाण्याचा नळ सोडून न ठेवण्याची शिस्त लावणे आणि त्याबद्दल त्यांना योग्य ती माहिती पुरवणे इ.

या सवयी मोठेपणी इंधन, उर्जा यांच्या संवर्धनासाठी आपसूक वापरल्या जाण्याची शक्यता मोठी वाटते.

आभार

प्रतिसाद पुढच्या लिखाणातील सुधारणांसाठी आणि प्रोत्साहनासाठी मोठीच मदत करतात आणि त्यामुळे आपण सगळेच जण प्रतिसादांची मोठ्या उत्सुकतेनं वाट पहात असतो. अर्थात हा विषय जरा वेगळा असल्यामुळे आणि लेखाची लांबी सुध्दा थोडी जास्त असल्यामुळे कदाचित माझी वरची प्रतीक्रिया व्यक्त करण्या आधी अजून थोडं थांबायला पाहिजे होतं.

असो. प्रतिसादांबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल आपल्या सगळ्यांचेच मनापासून आभार!!

मिलिंद

हे सत्य

१९६०च्या सुमारास प्रसिद्ध अमेरिकन निसर्गतज्ञ ऍल्डो लिओपोल्डनं लिहून ठेवलं होतं की "जमिनीला आपण विक्री योग्य वस्तू (कमोडिटी) समजतो ही आपली सर्वात मोठी चूक आहे असं मला वाटतं. कारण त्यामुळेच आपण तिचा दुरुपयोग करतो. जमिनीला आपण, आपण राहत असलेल्या समाजाचीच एक घटक आहे असं ज्यादिवशी पासून समजायला लागू त्यादिवशी पासून जमिनीचा वापर आपण प्रेमानं आणि आदरानं करायला सुरुवात करू शकू. "

हेच सत्य जगभरातले आदिवासी सांगत नाहीत का?
मिलिंद बोकील यांनी त्याच्या ऑस्ट्रेलियाला दिलेल्या भेटीवर एक लेख साप्ताहिक सकाळ च्या दिवाळी अंकामध्ये लिहिला आहे. तेथेही आदिवासींच्या विचारात तत्त्व दिसून आले आहे. त्यामुळे खाणकामा संघटीत विरोधाचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

भारतातले माडिया, गोंड, ठाकरं जमीनीच्या आदराप्रति काही वेगळ सांगत नाहीत.
मागे मिझोराम मध्ये कामाला गेलेल्या कुणाचे लेख वाचले होते तेथे असणारा एक अतिशय म्हातारा अदिवासीही त्याला हेच सांगतो.

गांधीजीपण हेच म्हणालेतः
सगळ्या मानवजातीच्या गरजेला पुरेल इतकी जमीन उपलब्ध आहे पण लोभाला पुरेल इतकी नाही.

कळंलं तरी हे वळणारं नाही, आजच्या लोभी अर्थव्यवस्थेत हे शक्य नाही हेच खरे!

आपला
गुंडोपंत

चित्रफित

इथे ही चित्रफित सुसंगत ठरेल असे वाटते.

ओबामा यांनी अल गोर यांची भेट घेतल्याचे वाचले. ओबामांच्या नवीन राज्यामध्ये अमेरिकेची पर्यावरणावरची भूमिका बदलावी असे मनापासून वाटते आहे.

----

संपत्तीची निर्मिती

एक चांगला प्रश्न लेखक पुढे करतात.

संपत्तीची निर्मिती म्हणजे काय? खरे तर "संपत्ती" म्हणजे काय याविषयी लेखकाने अधिक चर्चा करावी. याविषयी मूळ लेखक (रेक्स) व्याख्या न देता, काही संकेत देतात.

पण "अधिक संपत्तीची निर्मिती" म्हणजे नक्की काय आणि नक्की कुठून? जमीन आणि पाणी सगळं मिळून शेवटी तेवढंच राहतं. त्याच्यात अधिक निर्मिती होते? निसर्गाची अधिक निर्मिती करता येते?

...
(म्हणजे "संपत्ती" ही पूर्वापारपासून, आदिमानवाच्या काळापासून, तितकीच आहे का? मग तसे असेल तर मनुष्यवंशनाशानंतरही तितकीच राहील - काळजी कशाला. अर्थातच व्याख्या काही वेगळी असावी - मनुष्याला उपयुक्त साधने, असे काही...)

पारंपारिक अर्थशास्त्रीय समजूतीप्रमाणे संपत्तीच्या निर्मितीसाठी भांडवल आणि मनुष्यबळ या दोनच गोष्टींची गरज असते. जागतिक तेल उत्पादनात प्रत्येक वर्षी होणारी घट या समजूतीचं समूळ उच्चाटन करते.

उच्चाटन म्हणजे नेमके कसे हे समजले नाही. काही संसाधने जगात मर्यादित प्रमाणात आहेत, तसे खनिज तेल. "भांडवल आणि मनुष्यबळ यांच्यातून संपत्ती निर्माण होते" वगैरे अर्थशास्त्रीय संकल्पनांचे या मर्यादेमुळे समूळ उच्चाटन कसे होते?

याबद्दल तज्ज्ञांनी अधिक माहिती द्यावी.

- - - -

पर्यावरणाच्या र्‍हासाचा हिशोब कित्येक अर्थतज्ज्ञ काटेकोरपणे लावत नाहीत, या मताशी मी सहमत आहे, पण माझी याबाबत माहिती फार थोडी आहे. याबद्दल अधिक अर्थशास्त्रीय चर्चा वाचायला आवडेल.

संपत्ती

पण "अधिक संपत्तीची निर्मिती" म्हणजे नक्की काय आणि नक्की कुठून? जमीन आणि पाणी सगळं मिळून शेवटी तेवढंच राहतं. त्याच्यात अधिक निर्मिती होते? निसर्गाची अधिक निर्मिती करता येते?

याचा अर्थ म्हटला तर अगदी सोपा आहे. आपण रुढार्थानं ज्याला संपत्ती म्हणतो किंवा अर्थशास्त्रीय भाषेत ज्याला 'क्रिएशन ऑफ वेल्थ' म्हटलं जातं, त्याला लेखक संपत्ती मानायला तयारच नाहीये. कारण रुढार्थानं संपत्ती म्हणजे ज्याच्या बदल्यात तुम्ही इतर वस्तू किंवा सेवा विकत घेऊ शकता. परंतु तेल, क्षार, पाणी, जंगलं यांचा जसा नाश होत जाईल तशी रुढार्थाच्या या संपत्तीला फारसं काहीच महत्त्व राहणार नाही. एक वेळ अशी येईल की लाखो रुपये टाकूनही कदाचित एखादाच लिटर पेट्रोल तुमच्या गाडीत टाकायला तुम्हाला मिळेल. किंवा प्लास्टिकचं उत्पादन संपूर्ण समाप्त होईल. म्हणजे अगदी लिहायलाही बॉलपेन ऐवजी बोरू वापरावा लागेल. आणि ही स्थिती फार लांब नाही पुढच्या साठ सत्तर वर्षातच येईल. कागदी नोटा त्यावेळेस त्यामुळे रद्दीच होतील. त्यामुळे खरं तर संपत्ती म्हणजे फक्त निसर्ग संपत्ती. म्हणून लेखक म्हणतो की तुम्ही कसल्या वल्गना करता? कसली संपत्ती? आणि जमिन पाणी वगैरे निसर्ग संपत्ती तेवढीच राहते ना? का तीही 'क्रिएशन ऑफ वेल्थ' तुम्हीच करता??

पारंपारिक अर्थशास्त्रीय समजूतीप्रमाणे संपत्तीच्या निर्मितीसाठी भांडवल आणि मनुष्यबळ या दोनच गोष्टींची गरज असते. जागतिक तेल उत्पादनात प्रत्येक वर्षी होणारी घट या समजूतीचं समूळ उच्चाटन करते.

मी वर म्हटल्याप्रमाणे तेल ही सुध्दा (नैसर्गिक) संपत्ती आहेच. पण म्हणून भांडवल आणि मनुष्यबळाच्या प्रमाणात ही संपत्ती वाढत जाऊ शकते का? उलट ही संपत्ती कमी कमीच होत चालली आहे. म्हणूनच असं म्हटलंय की ही अर्थशास्त्रीय समजूत या ठिकाणी चुकीची ठरते.

मिलिंद

अजून एक विचार

काही गोष्टी मागे वाचनात आल्या होत्या, त्या पैकी एक म्हणजे जे अन्नधान्य आपल्या आसपास पिकते तोच आपला आहार बनवणे.

अन्नधान्य उत्पादन - अन्नधान्याची वाहतूक आणि तेलाची सद्य परिस्थिती आणि त्यायोगे पेटलेली वैश्विक शेकोटी ही साखळी पाहता या तत्त्वाचे फार दूरगामी परिणाम आहेत असे दिसून येईल.

आपण ज्या भूभागात नेहामी राहतो तेथे नैसर्गीक रीतीने पिकणारे अन्न खाणे
हा एक महत्त्वाचा आरोग्यदायी फायदाही आहेच!

कारण बाहेरून येणारी फळे अनेकदा आठ ते दहा महिने साठवलेली असतात.
त्यासाठी त्यावर वेगवेगळे वायू सोडले जातात. - त्यातला काही भाग आपणही खातोच.
आपला
गुंडोपंत

शब्द न् शब्द सहमत आहे

सतत फोफावण्याच्या महत्त्वाकांक्षा असणाऱ्या जागतिक आर्थिक कंपन्या, त्यांचे व्यवहार आणि त्यांच्यातल्या तथाकथित अर्थतज्ञांच्या ज्ञानातला फोलपणा या आर्थिक महासंकटानं चव्हाट्यावर आणलाय. संपत्ती आणि समृद्धी फक्त या तज्ञांच्या बुद्धीचातुर्यानं आणि व्यवस्थापन कौशल्यानंच निर्माण होते असा एक फार मोठा भ्रम यांच्या डोक्यात असतो आणि ते आणि त्यांचे सहकारी एखाद्या नशेप्रमाणे त्या भ्रमातच सदैव वावरत असतात. एक जमीन खारावली तर दुसरी जमीन, एक नदी आटली तर दुसरी नदी, एक जंगल तोडून झालं की दुसरं जंगल... एवढंच नाही तर एक खंड संपला की दुसरा... असं यांचं हे संपलं की ते पादाक्रांत करणं अव्याहत चालू असतं. हेच असतं यांच्या दृष्टीनं 'क्रिएशन ऑफ वेल्थ'...

हा शब्द न् शब्द सहमत आहे.
यात आपण सोडून गेलेल्या माणसांची काय परवड होते याचा जराही विचार करण्याचा प्रश्नच नाही.
रिलायन्स ची शेती हा असाच एक मोट्ठा धोका उभा राहतोय. हे लोक शेतर्‍याकडून भाड्याने घेणार आहेत आणि त्यांना निर्धारीत पैसे देणार आहेत.

पण ती शेती ते जबाबदारीने करतील का? ते शेतकर्‍याला द्याव्या लागणार्‍या पैशा पेक्षा जास्त पैसे त्या जमीनीतून काढतील अर्थात त्यात पर्यावरणाची जी हानी होईल त्याला जबाबदार कोण?

आणि रिलायन्स ला काय देणं घेणं? जमीनीचा कस गेल्यावर "आमचा ५ वर्षांचा करार संपला" असे म्हणून दुसरीकडे चालू लागतील. पण जे त्या जमीनीवर अवलंबून आहेत आणि राहतील त्यांचे काय?
शिवाय त्यांना तुकड्यातही जमीन नको आहे म्हणून ते गावातल्या सगळ्या शेतकर्‍यांची जमीन घेण्याच्या प्रयत्नात आहेत.

म्हणजे एखाद्याला द्यायची नसेल तरी पर्याय नाही कारण असे ऐकले आहे की रिलायन्सने या साठी भाडोत्री गुंड वापरल्याच्या घटना घडल्या आहेत.

शिवाय गावकुसाची जमीन ग्रामपंचायतींचे करार घडवून विकून टाकल्याच्याही घटना घडत आहेत.

नाशिक जवळ त्रंबकला जातांना एका झा नावाच्या कुणा बिहारी माणसाचे संदिप इंस्टीट्युट उभे राहिले आहे. यासाठी किमान ३०० एकर जमीन या माणसाने साम दाम दंड भेद वापरून ताब्यात घेतली आहे. या विषयी स्थानिक राजकारणी, अगदी दशरथ पाटिल आणि महापौर विनायक पांडेही या पैकी सुद्ध्हा कुणी ब्र ही नाही काढू शकले. कारण त्याचे लालू प्रसाद बरोबर घरगुती संबंध आहेत!
आता तेथिल प्रवाहाला बांध घालून तलाव करण्याचा बेत आहे.

असे अनेक किस्से आहेत. कुणाला सांगणार?
आता गावकुसाची जमीन गेल्यावर गावातल्या लोकांनी गुरे कुठे चारायची? त्याची जीवन शैली अचानक पणे १ वर्षात बदलणार आहे का?

कुणी विचारच करायला तयार नाहीये कशाचा....
आपला
काहीसा हताश काहीसा आशावादी
गुंडोपंत

नवे संस्थाने.

मला तर कधी हे वाचले तर प्रचंड निराश वाटते. आपल्या आजोबा-पणजोबानी जे आपल्याला दिले ते आपण आपल्या मुलांना तरी देऊ शकु का असा उदासिन विचार मनात येतो. परदेशी माफिया, राजकारण आणि गुन्हेगार हे जर एकत्र आले तर आपल्याला कोण वाली आहे?

उत्तम लेख

फार चांगल्या विषयावरील लेख आणि सुंदर चर्चा.

खारीचा उपयोग आणि महती तेव्हाच जेव्हा राम त्याच्या बलाढ्य वानरसेनेसह पुल बांधायला घेतो. नुसत्या खारींनी आपला वाटा देऊन काहिहि होत नाहि

हे ऋशिकेशचे म्हणणे योग्यच आहे.

मानव समुदायाच्या कलेक्टिव अनकॉन्शस/कॉनशस मध्ये 'समुद्रवसने देवी..'या सारख्या प्रार्थना आहेत की बेमुर्वत लोभ आहे ते बारकाईने अभ्यासायला हवे असे वाटते. म्हणजे भविष्याबद्दल काही मत बनवता येईल.
--लिखाळ.

 
^ वर