सामाजिक जबाबदारी - प्रसिद्धी माध्यमे आणि आपण

बाँब स्फोट, गोळीबार, हल्ला हे हल्लीचे सर्वात जास्त वाचले जाणारे, ऐकले जाणारे शब्द आहेत. वाचेल् जातात वृत्तपत्रात, महाजालावर आणि ऐकले जातात दृकश्राव्य माध्यमांवर. जे वाचले जाते आणि पाहिले जाते त्याने समाज मनावर खुप खोलवर परिणाम होतात. ब्रेकिंग न्युज देणे हे आद्य कर्तव्य असणार्‍या प्रत्रकाराला/वार्ताहाराला आपण आपले कर्तव्य चोख पार पाडतो आहोत असेच वाटणे सहाजिक आहे. पण ते करत असताना आपण नक्की काय करतो आहोत. त्याचे परिणाम काय होतील याचा विचार केला जातो?
तंत्रज्ञानच्या सोबतीने आज अनेक वृत्त वाहिन्या आहेत. वाहिनीचा कॅमेरामन नसेल तर मोबाईलवर ऑखोदेखा हाल देणे सुरु असतेच. एखादी बातमी घातक प्रतिक्रियांची साखळी बनवू शकते हे त्यांना कळत नाही का? हल्ली हेच विचार प्रत्येकाच्या मनात असतील. जे घडते आहे ते पहायला मिळत असल्याने या वाहिन्या पाहण्याचा मोह सुद्धा टाळला जात नाही. मन अस्वस्थ होऊन जाते. त्यात आणखी भर म्हणून मग घडलेल्या घटनेवर राजकिय नेत्यांच्या प्रतिक्रिया. प्रसिद्धी माध्यमाचा वापर स्टंटगिरी करण्यासाठी होतो. या सर्वांमध्ये सामान्य माणसाचे विचार अक्षरशः गुदमरुन जातात. तुम्हाला काय वाटते?

  1. आजच्या घडीला प्रसार-प्रसिद्धी माध्यमांकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवता?
  2. एखाद्या गोष्टीचे वार्तांकन करणे ही एक महत्वाची सामाजिक जबाबदारी आहे असे आपल्याला वाटत नाही का?
  3. जे अनिवासी भारतीय आहेत त्यांचा भारता बाहेर काय अनुभव आहे?
  4. हे प्रभावी माध्यम आहे हे आपण जाणतो. आजच्या घडीला आपण त्याचा कसा वापर करु शकतो?

असे अनेक मुद्दे आहेत जे आपल्याला येथे मांडता येतील. या चर्चेच्या निमित्ताने आपण ते येथे जरूर मांडावेत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात वृत्तपत्रांनी खुप महत्वाची आणि मोठी भुमिका निभावली आहे. हे प्रभावी माध्यम आहेच. ज्या काळात साक्षरता कमी होती त्यावेळचा या माध्यमाचा प्रभाव आपण वाचला आहे तर काहींनी अनुभवला आहे. आजच्या भारताला देखील या प्रभावी माध्यमाचा जबाबदारीने वापर करायचा आहे. लोकशिक्षणासाठी, देशप्रेमाचे. सेवेचे धडे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी. मित्रहो, आपण येथे लिहितो, वाचतो. महाजाल हे सुद्धा प्रभावी माध्यम आहेच. पण भारतात आज सुद्धा ते तळागाळा पर्यंत गेलेले नाही. भारतात आज सुद्धा वर्तमान पत्र जास्त प्रभावी आहे. आपण आपले विचार येथे जरुर मांडावेत. महाजालावर अनेक वृतपत्र संपादक/वार्ताहर वावरत आहेत. त्यांनी सुद्धा अशा उपक्रमांना सक्रिय पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. तर घ्या लेखणी/कळफलक आणि आपले विचार येथे मांडा. असे विचार मंथन करायचा हा पहिलाच आणि पण थोडा विस्कळीत प्रयत्न आहे. अनुभवानुसार त्यात बदल केले जातीलच. पण कुठेतरी सुरुवात व्हायला हवी. चला तर मग...

Comments

एक सुचना

माझं मत चर्चेवर यथावकश नोंदवतोच.. अश्या प्रकारच्या मंथनाला सुरुवात केल्यबद्दल आभार आणि अभिनंदन

मात्र ही चर्चा जर व्रुत्तपत्रांत छापली जाऊ शकते/शकली तर संपूर्ण चर्चेचे चर्चेच्या शेवटी संकलन होणे गरजेचे आहे. ज्यात काहि महत्त्वाचे प्रतिसाद, पुरक प्रतिसाद, एखादे मत मांडणारे आणि ते खोडणारे असे दोन्ही प्रतिसाद व्यवस्थित पोहोचतील तरीही एकसंधपणा येईल असे संकलन व्हावे. याशिवाय सर्वांनी जास्त अवांतर प्रतिसाद या चर्चेत येणार नाहित याची काळजी घ्यावी म्हणजे संकलकाला सोयीचे पडेल

ऋषिकेश

दुधारी तलवार

प्रसारमाध्यमे ही दुधारी तलवार आहे असे वाटते. प्रत्येक प्रसंगची ब्रेकिंग न्यूज आणि तिचा मारा नको वाटतो. आत्ताच्या प्रसंगात तर हल्ला चालू असताना त्याची इत्थंभूत माहिती देणे म्हणजे बेजबाबदारपणाचा कळस होता. नंतरही बर्‍याच प्रसंगात नको नको केले.
पण प्रसारमाध्येमे नको असेही म्हणता येत नाही कारण मग राजकारण्यांवर काहीच अंकुश रहाणार नाही. या निमित्ताने राजकारणी प्रत्येक गोष्ट किती गंभीरपणे घेतात हे तरी दिसले.
मिडीयाचा त्रास सगळीकडे आहे. ९/११ नंतर अमेरिकन मिडीयामुळेच इराक शत्रू आहे अशी भावना रूजायला मदत झाली. यावर काय उपाय असू शकतात याबद्दल आणखी मते वाचायला आवडेल.

----

अंकुश

राजकारण्यावर अंकुश म्हणून मदत आहेच. पण हल्ली राजकारण्यांचे एक शस्त्र सुद्धा बनले आहे. अलिकडे घडलेल्या घटनांमध्ये प्रसार माध्यमांवर सुद्धा अंकुश हवा असे नक्कीच वाटते. त्यांच्यासाठी सुद्धा एखादी संहिता बनवने गरजेचे वाटते.

शस्त्र

फॉक्सन्यूज हे बुश यांचे प्रचार साधन होते असे वाचण्यात आले होते.

----

काही उत्तरे

आजच्या घडीला प्रसार-प्रसिद्धी माध्यमांकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवता?

१. प्रबोधन : प्रसिद्धी माध्यमाचे एक महत्त्वाचे काम आहे जो अंधारात आहे त्यापर्यंत माहितीचा , ज्ञानाचा प्रकाश पोचविणे. उथळ सेन्सेशनॅलिझम च्या जमान्यात या उद्दिष्टाला तिलांजली दिलेली दिसते. एखाद्या प्रश्नाबद्दल संशोधन करून , लोकांना भेटून , ठिकठिकाणच्या पैलूंचा आढावा घेऊन त्याबद्दल रिपोर्ट् देणे हे प्रगल्भ पत्रकारितेचे लक्षण आहे. माध्यमांचे स्वरूप मुद्रणस्वरूपात मर्यादित होते तेव्हा अशा प्रकारची उदाहरणे आपल्याला माहिती असतील. इलेक्ट्रोनिक माध्यमांमधे तर कितीतरी अधिक शक्ती आहे. चांगल्या दर्जाच्या डॉक्युमेंटरीज् बनतात. त्यामधे सत्याचे नवे पैलू समोर येतात ; पण अशा स्वतंत्र डॉक्युमेंटरीजना टिव्ही चॅनल सारखे व्यासपीठ नसते त्यामुळे त्या लोकांपर्यंत पोचत नाहीत. अशी अपेक्षा प्रसिद्धी माध्यमांकडून ठेवायला हरकत नाही असे मला वाटते.

२. नि:स्पृहता : हा मुद्दा थोडा कळीचा आहे ; तो सोपा नाही हे मी आधीच मान्य करतो. जेव्हा एखाद्या घटनेशी , प्रश्नाशी संबंधित रिपोर्टीन्ग् आणि विश्लेषण केले जाते तेव्हा एकाच विशिष्ट गटाच्या हितसंबंधांचे रक्षण होते असा आरोप दुसर्‍या बाजूचे लोक करताना दिसतात. सत्याचे एकांगी दर्शन म्हणजेसुद्धा असत्य विधानच. तेव्हा , प्रश्नाच्या सर्व बाजू समजून घेणे , त्या उघडकीला आणणे - त्यातील काही बाजू जरी त्या त्या चॅनल/वृत्तपत्राच्या एकंदर तत्वांशी मेळ खाणार्‍या नसल्या , त्याच्या विरोधात असल्या तरी - हे आवश्यक आहे.

एखाद्या गोष्टीचे वार्तांकन करणे ही एक महत्वाची सामाजिक जबाबदारी आहे असे आपल्याला वाटत नाही का?

या प्रश्नाबाबत काही दुमत होण्याची गरज नाही. ही एक महत्वाची सामाजिक जबाबदारी आहेच. (कदाचित मला प्रश्नाचा रोख नीट कळला नसावा.)

जे अनिवासी भारतीय आहेत त्यांचा भारता बाहेर काय अनुभव आहे?

मी जे सांगेन ते अमेरिका या एका देशाबद्दलच , आणि तेही माझ्या अल्प अशा निरीक्षणावर नि विश्लेषणावर आधारित आहे.
गेल्या दशकात अमेरिकेला ढवळून काढणार्‍या अनेकानेक घटनांपैकी , जिथे प्रसिद्धी माध्यमांच्या एकंदर नैतिक भूमिकेवर , त्यांनी बजावलेल्या कामगिरीवर प्रकाश पडेल अशा दोन सर्वात मोठ्या घटना म्हणजे ९/११ आणि इराक युद्ध. (२ अध्यक्षीय निवडणुका म्हणजे नित्याचा अनुक्रम. त्यात पक्षनिहाय भूमिका वगैरे वगैरे लोकांनी घेतल्या. एक कृष्णवर्णीय माणूस अध्यक्ष बनला , पण या सार्‍यात प्रसिद्धी माध्यमांच्या भूमिकेचा कस लागला असे मी मानत नाही. कट्रिना वादळाबद्दलहि हेच वाटते.) अमेरिकेबद्दल ज्यामुळे प्रचंड सहानुभूती आणि प्रचंड राग निर्माण व्हावा अशा या घटना. ९/११ मधे टीव्ही माध्यमांनी आणि वृत्तपत्रांनी किती मोठा भाग घेतला हा भाग सर्वज्ञात आहे. कोट्यावधी लोकांनी विमाने पडताना पाहिली. त्यानंतर अनेक महिने वाहिन्यांना हा एकच विषय होता. ज्यावेळी आपल्या देशाची नैतिक बाजू प्रबळ असते तेव्हा प्रसिद्धी मध्यमांचे काम सोपे असते. अफगाणिस्तानात युद्ध केले गेले तेव्हा कुणाची भिवई वर गेली नाही. ("वी विल् स्मोक् देम्" या सारखी मूर्ख वक्तव्ये करणे , "डेझी कटर्स्" सारखे भीषण बॉम्ब्स् गुहेतल्या लोकांना काढायला वापरणे वगैरे प्रकार घडत असतानासुद्धा.) मात्र इराक युद्ध म्हणजे नैतिक कसोटीचा काळ होता. आता २००८ मधे बुशचे सगळ्यांनी पोतेरे केले आहे हे खरे ; पण जेव्हा या युद्द्धाचा प्रस्ताव बनवला गेला , तो पास झाला तेव्हा प्रसिद्धि माध्यमांपैकी कुणीही स्पष्ट शब्दात या खोटारडेपणाचा कडकडून निषेध केला असे मला ज्ञात नाही. युद्धाला विरोधक होते , पण ते केवळ अमेरिकेने या भानगडीत पडावे का नाही ? या बाबत. "वेपन्स् ओफ मास् डिस्ट्रक्शन्" या गोष्टीची नंतर यथेच्छ थट्टा झाली . पण २००३ मधे एकंदर मिडियाने गुळमुळीत धोरण घेतले असे माझे मत बनले आहे. (याबद्दल माझी माहिती अपुरी असेल तर मला नवे काही ऐकायला जरूर आवडेल.)

प्रसार आणि प्रसिद्धी

आजच्या घडीला प्रसार-प्रसिद्धी माध्यमांकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवता?

प्रसार आणि प्रसिद्धी यातला फरक त्यांना समजावा ही. एखादी घटना ताजी असेल तेव्हा निष्कर्ष काढून मोकळे होऊ नये, घटनेतील सत्य पुढे आल्याशिवाय विश्लेषकांना बोलावून प्रश्नोत्तरांचे गोळीबार सुरू करू नयेत. माणुसकी ही पत्रकारितेपेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे आणि माणुसकीला बाजूला सारून पत्रकारिता नको. विखुरलेली प्रेते, जखमींच्या भोवती गोल-गोल फिरणारा कॅमेरा इ. घृणास्पद होते.

कायदा आणि यंत्रणेने प्रसार माध्यमांना काही अंतरावर ठेवणे योग्य वाटते. ताज संपूर्णपणे सुरक्षित झालेले नसतानाही प्रसारमाध्यमे जवळ कशी जाऊ शकली याचे आश्चर्य वाटते.

बरखा दत्तसारख्या माजोरड्या पत्रकारांना थांबवायला हवे. या बाईने जे कव्हरेज केले ते अत्यंत तापदायक होते. नको तेवढी डिटेल्स देणे याच बरोबर मुलाखतीला लोकांना बोलवायचे आणि प्रश्न विचारल्यावर त्यांचे बोलून व्हायच्या आत स्वतःची चर्पटपंजरी सुरू करायची. अनेकदा तिने "लेट मी टॉक" किंवा "प्लीज मूव असाईड" असे म्हणून लोकांना ढकलल्याचे पाहिले आहे. (जर संतापलेल्या आणि भावनावश झालेल्या लोकांना बोलूच द्यायचे नव्हते तर बोलवायचे कशाला? लाईव कवरेज आव आणू नये.)
एकंदरीत, आविर्भावावरून बाई आपण किती ग्रेट पत्रकार आहोत या कोशात वावरताना दिसतात.

एखाद्या गोष्टीचे वार्तांकन करणे ही एक महत्वाची सामाजिक जबाबदारी आहे असे आपल्याला वाटत नाही का?

हो आहेच परंतु या क्षेत्रातील प्रचंड स्पर्धेमुळे जबाबदार्‍या धाब्यावर बसवून पत्रकारिता चालते असे नजरेस पडले.

जे अनिवासी भारतीय आहेत त्यांचा भारता बाहेर काय अनुभव आहे?

मी फारसे लक्ष देऊन पाहिले किंवा राजकारणात खूप रूची ठेवते असे म्हणणार नाही परंतु याकाळात मला वाटतं फॉक्स न्यूज एनडीटिव्हीचेच चित्रण दाखवत होते. चू. भू. दे. घे.

हे प्रभावी माध्यम आहे हे आपण जाणतो. आजच्या घडीला आपण त्याचा कसा वापर करु शकतो?

निष्पक्षपातीपणे वृत्त देण्याचे काम भारतीय आणि परदेशस्थ वाहिन्या करतात असे वाटत नाही. त्यामुळे प्रसिद्धी माध्यमे हे सामाजिक प्रबोधनाचे साधन न राहून व्यवसाय बनलेले आहेत. त्यांच्यातील व्यावसायिकतेला चुकीचे खतपाणी न घालण्याने कदाचित थोडा फरक पडेल असे वाटते. (खात्री नाही.)

बरखा दत्त

आजच असे वाचले की या दत्तबाईंनी क्यामेऱ्यासमोर कोणालातरी विचारले की "तुमचे नातेवाईक हॉटेलात अडकले आहेत, ते जिवंत असतील असे तुम्हाला वाटते का?"


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अपेक्षा

1. आजच्या घडीला प्रसार-प्रसिद्धी माध्यमांकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवता?
एखाद्या घटनेचे चित्रण करताना ती दृष्ये भडक किंवा सवंगपणे दाखवणे टाळणे, तेच बातम्या देताना आणि थोडी अधिक सामाजिक जबाबदारी मानणे.

2. एखाद्या गोष्टीचे वार्तांकन करणे ही एक महत्वाची सामाजिक जबाबदारी आहे असे आपल्याला वाटत नाही का?
हो, वाटते. अर्थातच, कारण निकोप लोकशाहीसाठी वार्तांकन झालेच पाहिजे.

3. जे अनिवासी भारतीय आहेत त्यांचा भारता बाहेर काय अनुभव आहे?
अनुभव असाच आहे, थोड्याफार फरकाने. इथल्या काही स्थानिक वाहिन्या तर स्थानिक दुर्घटना इतक्या खोलात जाऊन चित्रित करतात/दाखवतात, की घृणा यावी. स्थानिक बातम्या बघायचे मी सोडून दिले आहे/ कधीतरी वाचते, पण तेही वर्णन वर्तमानपत्रांची पाने भरभरून असते. वाहिन्यांचे व्यवहार पारदर्शक असतात असे नाही. कधीकधी विविध अंतर्गत हेतूंसाठी कामे करीत असतात असे वाटते.

4. हे प्रभावी माध्यम आहे हे आपण जाणतो. आजच्या घडीला आपण त्याचा कसा वापर करु शकतो?
आपण म्हणजे प्रसारमाध्यमात नसलेले लोक म्हणायचे असेल तर खरे सांगायचे तर माहिती नाही. माहितीच्या नेहमीच्या माध्यमांपर्यंत पोचण्याआधी त्याहून सोपे मार्ग आहेत का हे पाहिले पाहिजे. मला येथे गोर यांचे म्हणणे पटते -गोर यांच्या " The assault on reason" - या पुस्तकात यावरून भाष्य केले आहे.
त्यादृष्टीने इंटरनेटचे माध्यम सध्या सर्वात चांगले आहे. येथे बर्‍याच अंशी आपण स्वतंत्र असतो, हवे ते बोलू शकतो. हे अधिक प्रभावी कसे होईल, आणि दुष्टांपेक्षा सज्जन/विचारी लोक एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी या माध्यमाचा वापर कसा करतील यावर बरेच काही अवलंबून राहील.

नाठाळ प्रसिद्धिमाध्यमे !!

केवळ TRP च्या मागे लागलेल्या माध्यमांकडून, ते काही विशेष करतील ही अपेक्षा, केव्हाच सोडून दिली आहे. प्रसंगाचे गांभिर्य न बाळगता त्याचे वार्तांकन करत राहणे यातच यांना विशेष रस आहे. कोणी मरत असेल तरी त्याचे थेट प्रक्षेपण दाखवतील,पण त्याला मदत करणारर नाहीत.
आजच रेडीफ या संकेतस्थळावर मिळालेल्या माहितीनुसार 'विशाल ददलानी' या संगीतकाराने, अशा बेजबाबदार वाहिन्यांविरुद्ध न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे व सामान्यांना देखील त्याच्या या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले आहे. मी ही त्याच्या या मोहीमेला प्रतिसाद दिला आहे.
आपणास जर आधिक माहिती हवी असेल तर, आपण खाली दिलेल्या संकेतस्थळावर भेट देऊ शकता व आपणही सहभागी होऊ शकता.

http://smallchange.in/

तसेच त्याने मांडलेली भूमिका आपणास खाली दिलेल्या संकेतस्थळावर वाचू शकता.
http://www.rediff.com/movies/2008/dec/02mumattacks-vishal-versus-the-new...

उपयुक्त माहिती

याचा शक्य तेवढा जास्त प्रसार व्हावा!!!

सामाजिक जवाबदारी कोणाची ?

आजच्या घडीला प्रसार-प्रसिद्धी माध्यमांकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवता?

प्रसार माध्यमांचे सर्वात महत्वाचे आव्हान कोणते असेल तर राष्ट्रीय चारित्र्य निर्माण केले पाहिजे. समाजजीवनातील उत्तमोत्तम सद्गुणाची जोपासना प्रसिद्धी माध्यमांनी करावी. लोकशिक्षण, राजकीय शिक्षण, सामाजिक प्रबोधन, शैक्षणिक उद्बोधन, सांस्कृतिक अभियान अशा गोष्टींसाठी वेळ प्रसार-माध्यमांनी दिला पाहिजे.

एखाद्या गोष्टीचे वार्तांकन करणे ही एक महत्वाची सामाजिक जबाबदारी आहे असे आपल्याला वाटत नाही का?

सामाजिक जवाबदारीचे भान येथील समाजमनाला राहिलेलेच नाही अशी म्हणायची वेळ आली आहे. तेव्हा प्रसार-माध्यमांना वार्तांकन करतांना त्याला बाजाराचा /उद्योगाचा चा दर्जा आलेला असल्याने अशी मुल्य पायदळी तुडवली जातात. नैतिक मुल्य आणि प्रसार-माध्यमे यांचा काही संबध राहिलेला नाही . तेव्हा त्याचे शिक्षण देणे नव्हे तर ते दिसले पाहिजे असे वाटते
जे अनिवासी भारतीय आहेत त्यांचा भारता बाहेर काय अनुभव आहे?
निरंक
हे प्रभावी माध्यम आहे हे आपण जाणतो. आजच्या घडीला आपण त्याचा कसा वापर करु शकतो?

प्रसारणातील-माहितीतील गुणात्मक दर्जा वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच प्रसार माध्यमांवर नियंत्रण ठेवणे हे ग्राहक म्हणून आपल्याला जमणार नसल्यामुळे त्यावर नियंत्रण आणले पाहिजे असे वाटते. ( म्हणजे कोणती माहिती द्यावी आणि कोणती देऊ नये, त्याचबरोबर किती माहिती द्यावी )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अपेक्षा

आजच्या घडीला प्रसार-प्रसिद्धी माध्यमांकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवता?

१) वास्तव शक्य तेवढे वस्तुनिष्ठ दाखवणे
२) माध्यमाचे भाष्य कमी समाज मनाचे स्पंदन अधिक
३) विविध स्तरांचे प्रतिबिंब
४) समाज प्रबोधन

एखाद्या गोष्टीचे वार्तांकन करणे ही एक महत्वाची सामाजिक जबाबदारी आहे असे आपल्याला वाटत नाही का?

वाटते ना! पण सर्वस्पर्शी वार्तांकन अवघड आहे. या न्युज बाईट असतात. अक्षरशः घटनेचे लचके तोडतात.

जे अनिवासी भारतीय आहेत त्यांचा भारता बाहेर काय अनुभव आहे?

अजुन भारताबाहेर पाउल टाकले नाही. गैरलागु

हे प्रभावी माध्यम आहे हे आपण जाणतो. आजच्या घडीला आपण त्याचा कसा वापर करु शकतो

सत्य सामोर येण्यासाठी व्हिसल् ब्लोअर्स ची संख्या वाढवण्यास मदत करायला टिमकी वाजवायला मदत करु शकतो.
प्रकाश घाटपांडे

तारतम्य

१) आजच्या घडीला प्रसार-प्रसिद्धी माध्यमांकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवता?

अपेक्षा इतकीच की कुठलीही न्युज एक इव्हेंट् करणे सोडून् देऊन, स्पर्धेस् बळी पडून बातम्या देउ नये तर खात्रीलायक बातम्या व जनहित/सत्य यातील समन्वय साधत काम करावे. शिवाय् हा एक धंदा आहे व एक उदात्त जनहीतकारी काम आहे ही अपेक्षा सामान्य् लोकांनी करु नये. [मी तरि करत् नाही] तसेच लोकांनी कोण्या एका माध्यमावर[ग्रुपवर] पुर्व सत्य म्हणून विसंबुन नये. आजचे राजकारण म्हणजे एक महत्वाचे वृत्तपत्र आपल्या बाजुने करणे.

२) एखाद्या गोष्टीचे वार्तांकन करणे ही एक महत्वाची सामाजिक जबाबदारी आहे असे आपल्याला वाटत नाही का?

नक्कीच व सामाजीक जबाबदारीचे भान ठेवुन "वार्तांकन" केले जावे

३) जे अनिवासी भारतीय आहेत त्यांचा भारता बाहेर काय अनुभव आहे?

जेव्हा सगळे आलबेल असते तेव्हा प्रसारमाध्यम हा एक धंदा आहे हे नक्कीच जाणवते. मागणी तसा पुरवठा न्यायाने कै च्या कै माहीती बातम्या येत् असतात. तरी परदेशी माध्यमे न्याययंत्रणा, आंतरराष्ट्रीय घडामोडी, देशाचे संरक्षण याबाबत बातम्यात बर्‍यापैकी दक्ष असतात.

४) हे प्रभावी माध्यम आहे हे आपण जाणतो. आजच्या घडीला आपण त्याचा कसा वापर करु शकतो?

नवा इश्यु आला की जुना सोडून द्यायचा हे धोरण न अवलंबता. प्रत्येक माध्यमाने निदान वर्षातील महत्वाच्या घडामोडींचा वर्षाअखेर आढाव घेतला पाहीजे व अतिशय महत्वाच्या प्रश्नांचा जसे ह्या अतिरेकी हल्ल्यानंतर काय त्रुटी होत्या व त्या कश्या दुर केल्या, ९३च्या स्फोटानंतर काय सुधारणा केल्या होत्या? २००६ नंतर काय ? आज काय परिस्थीती ह्याचा उहापोह करत राहीले पाहीजे नाहीतर तेवढ्यापुरत्या बातम्या, किती गेले, कोण काय म्हणाले करुन सोडून न देता, महत्वाचे प्रश्न धसास लावले पाहीजेत.

 
^ वर