भाषाशुद्धीचे यशापयश आणि सावरकर

'सिग्नल'साठी 'अग्निरथगमनागमननिदर्शनपट्टिका' किंवा तसलाच काहीतरी संस्कृतोद्भव शब्द रुळवण्याच्या
[भाषाशुद्धीवादी/सावरकरी?] प्रयत्नाचे काय हसे झाले, विसरलात एवढ्यात?)

चॅलेंज - प्रे. टग्या
http://www.mr.upakram.org/node/1495#comment-24320

>> भाषाशुद्धीवादी/सावरकरी प्रयत्नांचे हसे झाले ?

सावरकरांनी भाषाशुद्धीची चळवळ सन १९२५ साली सुरु केली आणि त्यांची भूमिका ज्यांना पटली त्यांनीही ती चळवळ पुढे
चालविली. या विषयावर अनेक वादविवाद झाले अणि हळुहळू भाषाशूद्धीचे तत्त्व लोकांना पटू लागले. भाषाशुद्धीचे सर्वच पुरस्कर्ते
सावरकरांचे अनुयायी होते असे नाही. माधव ज्यूलियन हे पूर्वी भाषाशुद्धीचे विरोधक होते. पण आंधळा विरोध करण्याऐवजी या
विषयाचा अभ्यास करुनच तिचे खंडन करावे या हेतूने त्यांनी भाषाशुद्धीचा अभ्यास केला. पण अभ्यास केल्यावर तेच भाषाशुद्धीचे
कट्टर समर्थक बनले ! ते इतके की पूर्वी ते आपल्या कवितांमध्ये फारसी शब्दांची खैरात करत असत. ह्या कविता त्यांनी पुन्हा
शुद्ध स्वरूपात लिहून काढल्या !
भाषाशुद्धीलाही काही मर्यादा आहेत, हे सावरकरांना आणि तिच्या समर्थकांना मान्य होते. भाषाशुद्धीच्या तपशीलाबाबत तिच्या
पुरस्कर्त्यांमध्येही काही बाबतीत मतभिन्नता होती. ज्या कल्पना आपल्याकडे पूर्वी नव्हत्या व ज्यांना प्रयत्न करूनही समर्पक
प्रतिशब्द सुचविता येत नाही किंवा जे परकीय शब्द मराठीने आत्मसात करून, त्यामुळे तिच्या शब्दसंपत्तीत आणि सौंदर्यात
भरच पडली आहे, त्यांच्यासाठी तेच परकीय शब्द वापरण्यास त्यांची हरकत नव्हती.
-------------------------------

भाषाशुद्धीचे तत्त्व बरोबर आहे का नाही हा मूळ प्रश्न आहे.
भाषाशुद्धीला आक्षेप असणार्‍यांनी पुढील फक्त दोनच मुद्द्यांचा विचार करावा.

पहिला मुद्दा :-
१) जे शब्द आपल्या भाषेत नव्हते, ते जसेच्या तसे परकी भाषेतून स्विकारल्यास हळूहळू, ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या न्यायाने,
परकीय शब्दांचे मराठीतील प्रमाण वाढत जाते.
२) आपल्या भाषेत ज्या शब्दांना प्रतिशब्द नाहीत, असेच शब्द परकी भाषेतून येतात असे नाही,
ज्या अर्थाचे शब्द आपल्या भाषेत पूर्वी होते, त्याच अर्थाचे परकी भाषेतील शब्दही, त्या भाषेच्या संपर्काने आपल्या भाषेत
येतात. हे शब्द आपल्या भाषेतील मूळ शब्दांची जागा घेतात. परिणामी मूळ शब्द मागे पडतात वा वापरातून नाहीसे होतात.
३) परकी भाषेतील नुसते शब्दच येत नाहीत तर त्याबरोबर त्या भाषेचे व्याकरणही येते व मूळ भाषेतील व्याकरणाच्या
बाबतीतही (वाक्यरचना, एकवचन-अनेकवचन इ.) अव्यवस्था निर्माण होते.

कोणतीही भाषा म्हणजे तिची शब्दसंपत्ती आणि तिचे व्याकरण.
आपल्या काही उपक्रमबंधूंनी मृत भाषेची व्याख्या केली आहे (त्यांच्या समजुतीप्रमाणे). (ती त्यांच्याच भाषेत त्या
चर्चाप्रस्तावांमध्ये जाऊन वाचावी ). भाषाशुद्धीचा आग्रह न धरता इंग्रजी भाषेतील सर्वच शब्द, ‘जसेच्या तसे’ त्यांना प्रतिशब्द न
बनविता, घेतले गेले असते तर या शब्दांची संख्या फारच वाढली असती. सर्वनामे आणि सहाय्यक क्रियापदे सोडली तर इतर
बहुतेक सर्व शब्द (क्रियापदेसुद्धा) इंग्रजीच वापरले जातील. मग या भाषेला काय म्हणायचे हा प्रश्न निर्माण झाला असता ! ती
धड मराठीही असणार नाही आणि इंग्रजीही ! ‘अशा भाषेपेक्षा इंग्रजीच बोललेली काय वाईट ?’ असे काहीजण म्हणू लागतील !
(किंवा अशी मराठी ही इंग्रजीची एक बोलीभाषाच मानली जाईल !)
आज ‘संस्कृत मृत भाषा आहे’ म्हणून काही जण संस्कृतच्या नांवाने ओरडतात, पण उद्या मराठीच्या नावांने तसे रडण्याची पाळी
त्यांच्यावर येऊ शकते !
....................

दुसरा मुद्दा :-
मराठीत इंग्रजी शब्दांना आज अनेक प्रतिशब्द रुढ झालेले आहेत. भाषाशुद्धीच्या चळवळीनंतर (सुमारे पाऊण शतकात) मराठीत
इंग्रजी शब्दांसाठी जे सर्व प्रतिशब्द निर्माण झाले आहेत, ते सर्व गाळून मूळ इंग्रजी शब्दच मराठीत वापरून, ह्या मराठीची आणि
आज भाषाशुद्धीमुळे प्रतिशब्द रूढ झालेल्या मराठीची, तुलना करुन पहावी. कोणती भाषा क्लिष्ट व कोणती सोपी हे त्यांचे
त्यांनीच ठरवावे.

.... आणि या गोष्टीचा विचार करायला जास्त दूर जायला नको !
इतर संस्थळांचे जाऊ द्या, पण आपण ‘उपक्रम’ चे सदस्य आहात.
‘उपक्रम’वर वेबसाईट(संकेतस्थळ), FAQ (नेहमी पडणारे प्रश्न = नेपप्र.), हेल्प(साहाय्य), न्यू पोस्टस्(नवे लेखन),
पासवर्ड(परवलीचा शब्द), लॉग-इन(येण्याची नोंद), लॉग-आऊट(जाण्याची नोंद), क्लिक्(टिचकी), ग्रुप(समुदाय),
टायपिंग(टंकलेखन,टंकण), यूजर्स(सदस्य), यूजर-नेम(वापरावयाचे नाव), ई-मेल(विरोप), ई-मेल पत्ता(विरोप पत्ता)
होम-पेज(मुख्यपृष्ठ), कॉमेंट(प्रतिसाद), स्क्रॅप-बुक(खरडवही) या शब्दांना प्रतिशब्द वापरले आहेत.

ह्या शब्दांऐवजी मूळ इंग्रजी शब्द वापरणेच एखाद्याला सोपे वाटू शकते, पण एकदा रूळल्यावर व जास्तीत जास्त लोक हे शब्द
वापरू लागल्यावर हेच शब्द सोपे वाटू लागतील !
एका शब्दाला शक्यतो एकाच शब्दात प्रतिशब्द असावा, दोन शब्दांत नको.
या पैकी काही शब्दांना माझ्या अवलोकनात आलेले प्रतिशब्द पुढील प्रमाणे :-
परवलीचा शब्द- पारशब्द, कूटशब्द, कूटाक्षरे
येण्याची नोंद- प्रवेश, आगमन
जाण्याची नोंद- गमन, निर्गमन
वापरावयाचे नांव- सदस्यनाम

-------------------------------
आपला आक्षेप संस्कृतमुळे क्लिष्ट, अगडबंव शब्द निर्माण होतात, म्हणून संस्कृतवरही आहे असे दिसते. इथे फक्त भाषाशुद्धीच्या
विषयापुरता संस्कृतचा विचार करू.(इंग्रजीत सर्वच शब्द सोपे, लहान वा समजण्यास कठीण नसलेले आहेत असे नाही.)

१) ‘संस्कृत ही मृत भाषा आहे’ अशी ओरड केली जाते. ‘संस्कृत म्हणजे पोथ्या-पुराणांची भाषा ! तिचे या विज्ञानयुगात काय
काम ?’ असेही काही लोकांना वाटू शकते.
संस्कृत ही कमीत कमी पाच हजार वर्षांपासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते. जगातील पहिले वाङ्मय संस्कृतमध्ये आहे.
संस्कृतमध्येही कालक्रमानुसार बदल होत गेले असतील, पण आज वेदवाङ्मयाव्यतिरिक्त, बहुतेक ग्रथांमध्ये उपलब्ध असलेली
संस्कृत ही पाणिनींच्या व्याकरणाने नियमबद्ध आहे. पाणिनींचा काळ इ.स.पूर्व ५०० वर्षे (सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीचा) मानला
जातो. आजही पाणिनींचा ‘अष्टाध्यायी’ हा व्याकरणावरील ग्रंथ अत्यंत उच्च प्रतीचा मानला जातो. संस्कृत ही अत्यंत नियमबद्ध
भाषा असल्याने संगणकविज्ञानात ती उपयुक्त ठरु शकेल असे तज्ज्ञांचे मत आहे.
विज्ञानाच्या ज्ञानशाखांमध्ये दररोज नवनवीन शब्दांची भर पडत जाते. असे असूनही काव्य, तत्त्वज्ञान यांच्या बाबतीत समृद्ध
असलेल्या, जगातील सर्वात प्राचीन भाषांपैकी एक असलेल्या संस्कृतमध्ये, या शब्दांना समर्पक प्रतिशब्द बनविण्याची अद्भुत
क्षमता आहे, हे आश्चर्यच नव्हे का ? ही एकच गोष्ट संस्कृतची तिचे या विज्ञानयुगातील स्थान, महत्त्व सिद्ध करीत नाही काय ?
परकी शब्दांच्या आक्रमणापासून स्वतःचे अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी व इंग्रजी भाषेच्या बोलीभाषा म्हणवल्या न जाण्यासाठी
मराठी व इतर भारतीय भाषांना संस्कृतचा आसरा घेणे भाग आहे. जी भाषा दुसर्‍या भाषांना नवजीवन देऊ शकते ती स्वतः मृत
कशी काय ठरू शकते ? अशा संस्कृतवर ‘मृत भाषा’ असा प्रथमदर्शनी खरा वाटणारा आक्षेप घेतला जाण्याजोगी तिची परिस्थति
व्हावी हे कर्तृत्व कुणाचे ? आपलेच नाही का ?
२) संस्कृत व इंग्रजी यांना एकाच मापाने मोजणे चूक आहे. संस्कृत ही काही आपल्याला परकी नाही. बहुतेक भारतीय भाषांची
उत्पत्ती संस्कृतपासून आहे किंवा संस्कृतचा त्या भाषांवर सांस्कृतिक, भाषिक प्रभाव आहे. मराठी, हिंदी, तमिळ इ. भाषांची
आपआपसांत स्पर्धा आहे असे आपण म्हणू शकतो, पण संस्कृतची व इतर भारतीय भाषांची स्पर्धा नाही. दक्षिण भारतीय
भाषिकांमध्ये हिंदीबद्दल आकस असला तरी संस्कृतबद्दल प्रेमच आहे.
३) भारतीय भाषांतील बरेच शब्द संस्कृतातून आलेले वा त्यांचा अपभ्रंश होऊन आलेले आहेत.
इंग्रजी शब्दांना प्रतिशब्द बनविताना (प्रामुख्याने वैज्ञानिक परिभाषेसाठी) सर्व भारतीय भाषांसाठी सामाईक प्रतिशब्द-कोश
बनविण्याची विवेकी दृष्टी ठेवली तर एकच प्रतिशब्द अनेक भारतीय भाषांमध्ये वापरला जाऊ शकतो व त्या भाषांतील प्रतिशब्द
शिकण्यासाठी वेगळे परिश्रम करावे लागणार नाहीत. समान प्रतिशब्द असल्याने त्या भाषा शिकणे वा समजणे अधिक सोपे
होईल.
-------------------------------

.. आपला आक्षेप नक्की कशाबद्दल आहे ? भाषाशुद्धीच्या मूळ तत्त्वांबद्दल की क्लिष्ट, बोजड, समजण्यास कठीण प्रतिशब्दांबद्दल ?
आपल्याला जर भाषाशुद्धीचे तत्त्व मान्य असेल तर मग वादाचा मुद्दा नाहीच.

सुरुवातीला ज्या शब्दांना प्रतिशब्द नाहीत त्यांना मोठे वा कठीण वाटणारे शब्द सुचविले जाणे स्वाभाविक आहे.
पण हळूहळू साधे व समर्पक असे अनेक प्रतिशब्द रूढ होतात व कठीण शब्द मागे पडतात. शब्द सोपे वा कठीण हे ते शब्द
किती रुळलेले आहेत ते ठरवितात. या बाबतीत सोपे-कठीण अशी व्याख्या करावयाची म्हणजे शब्द जितके जास्त रुळलेले
तितके ते सोपे व जितके कमी रुळलेले तितके ते कठीण. आज मराठीत असे अनेक प्रतिशब्द रूळलेले आहेत.
भाषेतील प्रचलित परकी शब्दांना प्रतिशब्द सुचविणे व त्यांचा प्रचार करून ते लोकांच्या दैनंदिन व्यवहारात रूळविणे हे
हे काही एका वा काही व्यक्तींचे काम नव्हे. एका व्यक्तीच्या कार्यशक्तीला मर्यादा असते. एका व्यक्तीनेच सर्व कार्य केले पाहिजे
अशी अपेक्षा चूक आहे. प्रतिशब्द बनविताना सुबोध, अल्पाक्षरी आणि अर्थवाही शब्द बनविले जावेत याकडेच भाषाशुद्धीवाद्यांचा
कटाक्ष असावा. पण प्रत्येक वेळी हे शक्य होतेच असे नाही. साधे, सोपे, अल्पाक्षरी प्रतिशब्द जर सुचविता आले असते तर कुणी
क्लिष्ट, बहुअक्षरी शब्द सुचविले असते का ? विज्ञान, कायदा या क्षेत्रांत मूळ शब्दाचा निश्चित आणि असंदिग्ध अर्थ प्रकट
करावयाचा म्हणजे कधीकधी क्लिष्ट शब्द बनवावे लागतात.
भाषाशुद्धीवाद्यांना जर हे जमत नसेल आणि आपल्याला भाषाशुद्धीचे तत्त्व मान्य असेल तर आपण सोपे आणि समर्पक शब्द
बनवून दाखवा. मराठी भाषेची काळजी करणे हे आपलेही कर्तव्य ठरते. नुसते हसणे आणि टीका करणे फार सोपे आहे.
-------------------------------
भाषाशुद्धीचे यशापयश व सावरकर
सावरकरांच्या भाषाशुद्धीचे हसे झाले आहे हे बोलणे अतिशयोक्तीचे आहे. भाषाशुद्धी जेवढी व्हायला हवी तेवढी झाली नाही यात
सर्वसामान्य माणसाचाही दोष आहे. भाषाशुद्धीचे यश संमिश्र आहे. लोकसभा, राज्यसभा, संसद, विधानसभा, विधानपरिषद,
विधीमंडळ, घटना, विधी, राष्ट्रपती, राज्यपाल, नगरसेवक, महापौर, महानगरपालिका, नगरपालिका, विश्वस्त यासारखे कितीतरी
प्रतिशब्द हे इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द आहेत असे न वाटण्याइतके रूळेलेले आहेत. चित्रपट, दूरचित्रवाणी, वृत्तपत्र,
वाचनालय, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षण हे प्रतिशब्द नाहीत मग काय आहेत ?
महाराष्ट्र शासनाने सन १९६० मध्ये भाषा संचालनालयाची स्थापना केली म्हणजे तात्त्विकदृष्टया भाषाशुद्धीचे तत्त्व मान्य केले.
दहावीपर्यंतची शासकीय विज्ञानाच्या पाठ्यपुस्तके परिभाषिक संज्ञा वापरूनच लिहिलेली असतात. ‘दूरदर्शन’, ‘आकाशवाणी’ ही
सरकारी प्रसारमाध्यमांची नावे काय सुचवितात ?
सावरकर आणि राज्यकर्ते — मग ते स्वकीय असोत वा परकीय — दोघेही नेहमीच दोन ध्रुवांची दोन टोके राहिलेली आहेत.
तरीही शासकीय पातळीवर भाषाशुद्धी मान्य झालेली आहे. हा सावरकरांच्या भाषाशुद्धीचा विजय नाही मग कोणाचा आहे ?
-------------------------------

भाषेचा संबंध सर्व समाजाशी असतो. अर्थात् भाषाशुद्धी चळवळ ही सर्वांची आहे अणि सर्वांचा तिला हातभार लागला तरच ती
यशस्वी होऊ शकते. विज्ञान, राजकारण, इतिहास इ. ज्ञानशाखांमध्ये पारिभाषिक संज्ञाकोश बनवून प्रतिशब्द अमलात आणणे
एवढ्यापुरतीच भाषाशुद्धी मर्यादीत नाही. सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनातील संबंधित सर्वच गोष्टींत ती अमलात आली
पाहिजे. हल्ली संगणकक्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे हे क्षेत्र समाजजीवनाचे एक अविभाज्य अंग होऊ पाहत आहे.
यातील अनेक इंग्रजी शब्द सर्वसामान्य माणसाच्या जीवनात रूळले आहेत. या क्षेत्रातील परकी शब्दांसाठी प्रतिशब्द बनविण्याचा
प्रामुख्याने विचार केला पाहिजे.

लहान मूल हे अनुकरणातून शिकते. सर्वसामान्य समाजाच्या बाबतीतही हे खरे आहे.
सर्वसामान्य माणूस कुणाच्या भाषेचे अनुकरण करतो ?
लेखकांनी लिहिलेली पुस्तके, पत्रकार, वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी, जाहिराती, आकाशवाणी यांची भाषाच सर्वसामान्य माणूस आत्मसात
करत असतो. या लोकांनी भाषाशुद्धीचे तत्त्व स्वीकारून ती आचरणात आणली तरच सर्वसामान्य माणसाची भाषा सुधारू शकते.
भाषाशुद्धीचा व्हावा तेवढा प्रसार झाला याची कारणमीमांसा करताना ‘सर्वसामान्य माणूस नेहमी बरोबरच असतो आणि तो नेहमी
योग्य तेच करतो’ असा केला जाणारा तर्क निराधार आहे.
आज मराठी शाळा बंद पडत आहेत. मराठी पालक मुलांना इंग्रजी शाळांमध्ये घालत आहेत. इंग्रजी माध्यमातील मराठी मुलांना
धड एक वाक्यही शुद्ध मराठीत बोलता येत नाही. आज मराठीचेच हसे होण्याची वेळ आली आहे ! याला जबाबदार कोण ?
मराठी माणूसच ना ?
ज्या शब्दांना मराठीत समर्पक प्रतिशब्द नाहीत वा ते वापरणे अवघड वाटते, त्यांच्याऐवजी जर इंग्रजी शब्द वापरले तर ते
एकवेळ समर्थनीय ठरेल, पण दैनंदिन जीवनातील उठणे, बसणे, वाचणे या क्रियांसाठीही मातृभाषेऐवजी दुसर्‍या भाषेतील शब्द जे
लोक वापरतात, त्यांनी कुणावर हसावे हाच एक प्रश्न आहे !

या विषयावरील एक मननीय लेख ‘लोकसत्ता’च्या संस्थळावर वाचनात आला. त्याचा दुवा खाली देत आहे.
http://www.loksatta.com/daily/20030501/raj01.htm
-------------------------------

पदनाम कोश
माझ्या माहितीप्रमाणे ‘पदनाम कोशा’मध्ये अशा स्वरुपाचे काही प्रतिशब्द असल्याने आचार्य अत्रे यांनी त्याची, ‘पदनाम कोश हा
बदनाम कोश आहे’ अशी चेष्टा केली होती. हैद्राबाद साहित्य संमेलनात सरकारने तयार केलेल्या या कोशाचा निषेध करण्याचा
ठराव मांडण्यात आला, तेव्हा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना ‘हा बदनाम कोश नसून शुभनाम कोश आहे’ असे त्यांचे साधार
खंडन केले होते. उथळ भूमिकेवरुन या गोष्टींची चर्चा करता येणार नाही. (संदर्भ:‘सभेत कसे बोलावे ?’- ले. माधव गडकरी, पृष्ठ
क्र.१०३-१०४)
-------------------------------

सावरकर
.. ‘सावरकरी प्रयत्नांचे हसू झाले’ हे विधान वस्तुस्थितीला धरुन नाहीच, पण सावरकरांच्या बाबतीत उथळपणे असले शब्दप्रयोग
करणेही योग्य नाही. सावरकर ही हसण्यावारी नेण्याजोगी गोष्ट नाही. आपल्याला ‘त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत/हे शब्द
लोकांनी स्विकारले नाहीत’ असेही म्हणता आले असते(अर्थात् आपल्या समजुतीप्रमाणे).

लेखनविषय: दुवे:

Comments

सुरवात करा

शरद
अतिशय सुरेख व योग्यवेळी आलेला लेख.आज या विषयाची चर्चा होणे[ व त्यावर केवळ चर्चा होत रहाणे न रहाता त्या वर कामास सुरवात होणे] अतिशय गरजेचे आहे.

लहान मुल हे अनुकरणातून शिकते.सर्व सामान्य समाजाच्या बाबतीतही हे खरे आहे.
अगदी बरोबर. मुल आईपासून सुरवात करते. आजचा समाज दूरचित्रवाणीपासून ! आज काही सुरवात करावयाची असेल तर ती वर्तमानपत्रे व दूरचित्रवाणीपासूनच झाली पाहिजे.
मी एकटा काय करणार असे न म्हणता आवाज उठवला पाहिजे.
.
शरद

छान विषय

ह्या शब्दांऐवजी मूळ इंग्रजी शब्द वापरणेच एखाद्याला सोपे वाटू शकते, पण एकदा रूळल्यावर व जास्तीत जास्त लोक हे शब्द
वापरू लागल्यावर हेच शब्द सोपे वाटू लागतील !

+१.. सहमत

आपला आक्षेप नक्की कशाबद्दल आहे ? भाषाशुद्धीच्या मूळ तत्त्वांबद्दल की क्लिष्ट, बोजड, समजण्यास कठीण प्रतिशब्दांबद्दल ?

येथे मी माझ्याबद्दल लिहितो.. बाकीच्यांचे माहित नाहि मात्र माझा आक्षेप आहे, रुळलेल्या+मराठीकरण पूर्ण झालेल्या पण मुळ "परकीय" शब्दांना उगाच प्रतिशब्द शोधण्याबद्दल.
यावर विस्तृत मत देण्याआधी काहि मुलभूत प्रश्नः
१. परकीय शब्द कोणाला म्हणावे? फक्त इंग्रजी शब्दांना? का कोणत्याहि भाषेतून आलेल्या तत्सम शब्दांना?
जर फक्त इंग्रजी शब्दांनाच प्रतिशब्द शोधायचे असतील तर ही भाषाशुद्धी न होता इंग्रजीचा दुस्वास वाटतो. जर कोणत्याहि भाषेतून आलेले शब्द चालणार नसतील तर संस्कृत का चालावेत?

२. प्रतिशब्द कसे तयार करावेत? त्यासाठी संस्कृतच का प्रमाण मानावी?
उदा. रिक्षा जर मला सुटसुटीत वाटत असेल तर जपानी शब्द असला तरी आता तो मराठी झाला आहे. संस्कृत भाषा जेव्हा वापरली जात असे तेव्हा रिक्षा नव्हत्या हे तर (तरी) मान्य व्हावे. अश्यावेळी उगाच संस्कृत शब्द शोधून त्याला मराठी का मानावे?

आता माझे मतः
जिथे सोपा मराठी शब्द आहे तेथे तो आवर्जून वापरावा.. परंतू एखाद्या वस्तुला, प्रसंगाला, भावनेला, संकल्पनेला मराठीत शब्द नसेल परंतू विविध भाषांत त्यासाठी शब्द असेल तर त्यातील ज्या शब्दाला मराठी बाज आहे आणि सोपा आहे असा शब्द आपलासा करावा.. वापरावा. मग तो शब्द संस्कृत नसला, इंग्रजी असला तरी बेहत्तर.. सोपा आणि मराठी बाजाला धक्का लावणार नाहि असा हवा. शक्यतो क्रियापदे मराठी अथवा भारतीय भाषिक वापरावीत.
एकदा का तो शब्द मराठी झाला की त्याला हक्काने वापरावे.. त्याला परकीय म्हणू नये . जसे बस, कप, मुखडा, रिक्षा, बडा हे "शुद्ध मराठी" शब्द आहेत असे मी मानते.

थोडक्यात अती कुठेच करू नये.. प्रयत्न जरूर व्हावेत मात्र शुद्धता आणि एकसुरीपणा-साचलेपणा यातील फरक डोक्यात असावा.

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

केवळ इतकेच नाहीत..

जसे बस, कप, मुखडा, रिक्षा, बडा हे "शुद्ध मराठी" शब्द आहेत असे मी मानते.

हरकत, हजर, हिंदू, कपाट, पाव, बटाटा, इमान, इनाम, कागद, दप्तर, इमारत, तबक, जिना, कलम, दगा, समई, चादर, झगा, झबले, खुर्ची, मेज, मजला, कारभार, इमले, नजर, तिकिट, काडतूस, कूपन, दरबार, किल्ला, कापड, किंमत, चावी, पगार, बाग, महिना, खुशाल, गोषवारा, अक्कल, औरस, इतराजी, परवानगी, रवानगी, जहागीर, जमीन, जमीनदार, जहागीरदार, डॉक्टर, तब्येत, जुजबी, जरूर, सरकार, अक्कडबाज, आखाडा, अचानक, अटक, अत्तर, अत्तरदाणी, अंदाज, आरसा, छान, छाप, छापा, कट्यार,सुरा (चाकू), कच्चा, गुलाब, माफी, सफेत इ. इ. आणिही अनेक आहेत पण लिहायला वेळ नाही. हे सर्व शब्द शुद्ध मराठी आहेत.

अय्या, इश्श हे उद्गार शुद्ध मराठी आहेत.

हापूस, अननस, गुलाब, पेरु, टॉमेटो, बटाटा, कोबी हे शब्द शुद्ध मराठी आहेत.

अपभ्रंशीत शब्द जसे, फलाट (प्लॅटफॉर्म), डांबीस (डॅम बीस्ट), डामरट (डॅम रॅट), तिकिट (टिकिट), काँप्युटर (कम्प्युटर), पास - नापास हे सर्व शुद्ध मराठी आहेत.

हे शब्द तसेच इंग्रजीतून नव्याने येणारा प्रत्येक शब्द बदलण्याची गरज वाटत नाही. सुटसुटीत, सोपे मराठी प्रतिशब्द मिळत असतील, शोधता आले, बनवता आले तर काहीच हरकत नाही. त्यांचे स्वागतच होईल किंवा समानार्थी शब्द म्हणून रुळवता येतील.

पगार या शब्दासाठी वेतन हा शब्द सुचवण्यात आला होता आणि तो बर्‍यापैकी प्रचलीतही आहे पण म्हणून पगार बाद झालेला नाही आणि पगार हा शब्द वापरणार्‍यांची भाषा अशुद्ध आहे असे म्हणण्याचा कोणी प्रयत्न करू नये.

बाद हा शब्द मूळ अरबी आहे पण तरीही शुद्ध मराठीच.

इतकेच नव्हे तर,

म्हाराज, काय ह्यी मराटीची दशा? आन् माजी गावरान माय-मराटी असुद् व्हय? - हे मराठी वाक्य देखील शुद्धच आहे.

याला प्रमाणभाषा मानले जात नसेल आणि बोलीभाषा म्हटले जात असेल परंतु मराठीच्या या गावरान बोली भाषेत वरील वाक्य हे शुद्धच आहे.

थोडक्यात अती कुठेच करू नये.. प्रयत्न जरूर व्हावेत मात्र शुद्धता आणि एकसुरीपणा-साचलेपणा यातील फरक डोक्यात असावा.

१००% सहमत.

वरील शब्द मराठीतून काढून त्याकरता प्रतिशब्द शोधावेत आणि ते वापरावेत असा एखाद्याचा आग्रह असल्यास त्यांना भविष्यात मराठी मरेल का अशी चिंताच करायला नको. त्यापेक्षा सरळ श्राद्ध घालण्याची तयारी सुरु करावी.

तयारी हा मूळ फार्सी शब्द आहे पण तरीही शुद्ध मराठीच.

आज मराठी शाळा बंद पडत आहेत. मराठी पालक मुलांना इंग्रजी शाळांमध्ये घालत आहेत. इंग्रजी माध्यमातील मराठी मुलांना धड एक वाक्यही शुद्ध मराठीत बोलता येत नाही. आज मराठीचेच हसे होण्याची वेळ आली आहे ! याला जबाबदार कोण ? मराठी माणूसच ना ?

नाही, केवळ मराठी माणूसच नाही. मराठी माणूस केवळ काही अंशी जबाबदार आहे. जागतिकीकरण, इंग्रजी ही ज्ञानभाषा म्हणून भारताने स्वीकारणे, माणसाने देशाबाहेर वास्तव्य करणे अशा अनेक घटना याला जबाबदार आहेत आणि अपरिहार्यही आहेत.

मराठी ही दुय्यम भाषा म्हणून स्वीकारणे, उच्चशिक्षण (विशेषतः - तांत्रिक, वैद्यकीय वगैरे शाखा) मराठीतून उपलब्ध नसणे, मराठीही केवळ प्रादेशिक भाषा असणे अशा अनेक गोष्टी जबाबदार आहेत. त्यामुळे मराठी लयाला जाईल का?

तर नाही, हेच बदलती मराठी या चर्चेच्या दोन्ही भागांत चर्चिले गेले आहे. भाषा भाषकांमुळे जगते. जोपर्यंत मराठी भाषक जिवंत आहेत तोपर्यंत या ना त्या स्वरुपात मराठी नक्कीच जिवंत राहील.

शुद्ध मराठी शब्द?

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रियाली यांनी जी शब्दावली दिली आहे ते शब्द मराठी भाषेत स्वीकारले गेले आहेत. ते मराठीत रूढ झाले आहेत. मराठी लेखनात ते वापरण्यास काही प्रत्यवाय नाही. त्या शब्दांच्या वापराने मराठी लेखन अशुद्ध होत नाही.हे सगळे मान्य. पण भाषाशास्त्रानुसार त्यांची गणना 'शुद्ध मराठी' शब्दांत करता येणार नाही.कारण ते परभाषेतून आले आहेत. त्यांचे मूळ(एटिमॉलॉजी) मराठी नाही.मराठी भाषेत असे अभारतीय शब्द मोठ्या संख्येने येण्याचे कारण म्हणजे अनेक वर्षे आपल्या देशावर असलेले परकीय शासन. बहुसंख्य शब्द अरबी, फारसी, इंग्रजी आहेत. ज्ञानेश्वरीत यांतील एकही शब्द आढळणार नाही. मात्र दासबोधात बहुतेक सर्व सापडतील.
. अशा शब्दांसाठी नवीन संस्कृतोद्भव शब्द शोधले पाहिजेत असे नव्हे.पण या शब्दांनी ज्या मूळ भारतीय शब्दांवर अतिक्रमण केले आहे, ते शब्दही वापरात ठेवावे.अन्यथा खर्‍या अर्थाने शुद्ध असलेले मूळ शब्द लुप्त होतील.
जसे: कलम-->लेखणी ,किल्ला--->गड,दुर्ग
पगार --->वेतन ,परवानगी--> संमती,
जमीन-->भू,भुई, भूमी ,माफी-->क्षमा ,हजर--> उपस्थित
सफेद---> पांढरे, धवल, ढवळे, श्वेत. इत्यादि.

शुद्ध आणि अतिक्रमण

आपला मुद्दा योग्य आहे. जे आपण फार्सी आणि अरबी शब्दांबद्दल बोलता तेच मी इंग्रजीच्या अतिक्रमणाबद्दल "बदलती मराठी - २" मध्ये बोलत होते परंतु दोन्ही गोष्टींत एक महत्त्वाचा फरक आहे.

गेले पाचशे किंवा अधिक वर्ष जे शब्द आपल्या तोंडी आणि मनात रुळत गेले त्यांना खड्यांप्रमाणे बाजूला फेकण्यातले हशील लक्षात येत नाही. त्याकाळी भाषाशुद्धीची चळवळ झाली असती तर ते योग्य होते परंतु गेल्या शेकडो वर्षांत हे शब्द जनमानसाने स्वीकारले, हे शब्द वापरून जी साहित्यनिर्मिती झाली उदा. दासबोधच घ्या ते सर्व अशुद्ध आहे म्हणून टाकून द्यायचे का?

मी असे ऐकले आहे की शिवाजीमहाराजांनी एक राज्यव्यवहारकोष बनवला होता आणि त्यात परकीय शब्दांसाठी प्रतिशब्द बनवले होते. (चू. भू. दे. घे.) आणि तरीही लोक पेशवा हाच शब्द वापरत होते. पंतप्रधान फक्त कागदोपत्री राहीला.

सक्ती करून कोणतीही भाषा वाढत नाही. लोक व्यवहारात जे शब्द वापरतात ते स्वीकारत जातात आणि भाषा वाढत जाते. त्यात शुद्धाशुद्ध असे काही नाही.

याचा अर्थ, भाषेतील मूळ शब्दांचा विसर पडावा असे मुळीच नाही. सुटसुटीत सोपे शब्द जरुर शोधावेत परंतु एखादा परकीय शब्द सहज तोंडवळणी पडत असेल तर तो ही आपलासा करायला हरकत नसावी आणि म्हणूनच भरमसाठ इंग्रजी शब्द रुळायच्या आधीच मराठी शब्दांचा विसर पडू नये याची काळजी घ्यायला हवी.

परंतु जर शब्द स्वीकारला तर त्यात शुद्ध अशुद्ध असे काही नसावे. (शब्दाचे मूळ किंवा एटिमॉलॉजी या वेगळ्या गोष्टी आहेत. ऋषींचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये म्हणतात त्याचप्रमाणे संस्कृत शब्दांचे मूळही शोधू नये. न जाणो सिंधूपलीकडील शब्द मिळाले तर पंचाईत व्हायची. - ह. घ्या.) जे आपलं असतं ते सर्वच शुद्ध असतं.

हल्ली तर लोकांचं रक्तही (तथाकथित) शुद्ध नसतं (म्हणजे शुद्ध अशुद्ध मानलं तर) असे म्हणता येईल. मराठी-गुजराथ्यांशी लग्न करतात, हिंदु मुसलमानांशी, ख्रिश्चन ज्यूंशी. तर मग त्यांची अपत्ये अशुद्ध मानायची का? बदलत्या वेळेनुसार लोकांनी हे शुद्ध अशुद्धाचं थोतांड सोडून द्यायला हवं. शब्दांच्या बाबतही हेच लागू आहे.

या शब्दांनी ज्या मूळ भारतीय शब्दांवर अतिक्रमण केले आहे, ते शब्दही वापरात ठेवावे.अन्यथा खर्‍या अर्थाने शुद्ध असलेले मूळ शब्द लुप्त होतील.

मला वाटतं शब्दांत शुद्ध -अशुद्ध असं काही नसतं. शुद्ध या शब्दाचा उच्चार कोणी शूध्द असा करत असेल तर त्याला फारतर अशुद्ध म्हणू किंवा हा शब्द अस्तित्वातच नाही असे म्हणू.

आता आपण दिलेली उदाहरणे पाहा-

यांतील कोणतेही शब्द स्वकीय किंवा परकीय लोक विसरलेले नाहीत. दोन्ही शब्दांचा उपयोग लोक त्यांच्या समजूतीप्रमाणे करतात. उदा.

त्यांचे पाय भारत भूमीला लागले. मातृभूमीची ओढ त्यांना परत घेऊन आली.

आणि

मी खंडाळ्याजवळ जमीन विकत घेतली.

आता लेखणी आणि कलम यांचे उदाहरण घेतले तर लोक हल्ली पेन हा शब्द अधिक वापरतात. परंतु, लेखणी आणि कलम विसरलेले नाहीत. तेव्हा अतिक्रमणाने लोक मूळ शब्द विसरतील असे म्हणता येत नाही परंतु बोजड शब्दांचा त्याग करतील कदाचित आणि त्यात मला व्यक्तिशः काहीही गैर वाटत नाही.

+१

सहमत.

भाषेत शुद्धाशुद्ध असे काही नसते. मुळात भाषेची निर्मिती मनुष्यांतील संपर्काच्या सोयीसाठी झाली आणि त्यातील 'सोय' हाच मुद्दा सर्वात महत्वाचा ठरला आणि यापुढेही ठरेल. पुढे पुढे मनुष्य जसा प्रगत होत गेला तश्या संस्कृती, परंपरा वगैरे जाणीवा आकारास आल्या आणि त्यांचा प्रभाव भाषेवर पडत गेला, तसेच भाषेला इतर भौगोलिक व सामाजिक संदर्भही मिळत गेले. भाषेच्या उत्क्रांतीची ही प्रक्रिया चालू आहे आणि राहाणार. अर्थात् जर दुसर्‍या संस्कृतीमधून/प्रदेशातून एखादी गोष्ट आपल्याकडे आली तर त्यासंदर्भातील शब्दही आपल्या भाषेत येणारच आणि जर ते शब्द लोकांना प्रतिशब्दांपेक्षा सोपे वाटले तर लोक नैसर्गिकरीत्या तेच वापरणार. त्यामुळे केवळ परकीय भाषांमधील शब्द मराठी भाषेत आल्याकारणाने मराठी भाषा अशुद्ध झाली असे म्हणणे कदापि योग्य ठरणार नाही.

थोडे अवांतर बोलायचे झाले तर परकीय शब्द भाषेत येणे आणि मुळात भाषेचा वापर कमी होऊन तिची जागा परकीय भाषेने घेणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण बर्‍याचदा या दोन मुद्द्यांची सरमिसळ होताना दिसते. आपली भाषा टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवेतच, पण त्याचबरोबर केवळ परकीय भाषेतील शब्द हटवण्याच्या नादात आपण आपली भाषा सामान्यांपासून दूर जाणार नाही याचेही भान ठेवायला हवे. मराठी भाषेबद्दल बोलायचे झाले, तर मराठी भाषा आज शहरांपेक्षा ग्रामीण भागात अधिक जिवंत किंवा अधिक योग्य शब्द वापरायचा झाला तर शाबूत आहे. जेव्हा तिकडेही ती रसातळाला जाईल आणि सामन्य जनता मराठीपेक्षा इतर भाषा जास्त वापरू लागेल, तेव्हा मराठी भाषा खर्‍या अर्थाने मृत्यूपंथास लागली असे आपल्याला म्हणता येईल. आणि हे होण्याची शक्यता एवढ्यात तरी दिसत नाही, सबब चिंता करू नये. किंबहुना मराठी भाषा टिकण्याचे आशास्थान म्हणून आपण ग्रामीण भागाकडे पाहायला हवे. आपण नागर लोक त्यांच्या भाषेकडे अशुद्ध म्हणून तुच्छतेने पाहातो पण भाषा टिकवण्यासाठी हेच लोक अधिक प्रयत्नशील आहेत असे वाटते. मूठभर शहरी लोकांच्या तोंडी परकीय भाषेने (पक्षी इंग्रजीने) अतिक्रमण केल्याने धीर सोडण्याचे काहीच कारण मला तरी दिसत नाही.

शूध्द?

>>शुद्ध या शब्दाचा उच्चार कोणी शूध्द असा करत असेल<<
शूध्द हा उच्चार ज्याला 'ध'नंतर विराम न घेता करता येईल, त्याला जगातल्या सर्व भाषांतील शब्दांचे उच्चार करता येतील. असे असूनही श्रद्धा, उद्धट, बद्ध, श्राद्ध हे शब्द हमखास अनुच्चारणीय रूपात का लिहिले जातात हे समजत नाही. असा प्रकार हिंदीत कधीही दिसत नाही.
हल्लीहली मराठीतले काही शुद्धलेखनतज्ज्ञ लख्ख, विठ्ठल, जथ्था, लफ्फा हे शब्द अनुक्रमे लक्ख, विट्‌ठल, जत्था, आणि लप्फा असे लिहावेत असा विनाकारण आग्रह धरू लागले आहेत. पण असे करण्याची काहीही गरज नाही. खछठथफ या अक्षरांतल्या सौम्य 'ह'मुळे त्या अक्षरांची स्वत:शीच झालेली जोडाक्षरे उच्चारताना फारशी अडचण जाणवत नाही. याउलट, घझढधभ या अक्षरांतला महाप्राण 'ह' तीव्र असल्याने घ्घ, झ्झ. ढ्‌ढ, ध्ध, भ्भ हे उच्चार सहजासहजी करता येत नाहीत. --वाचक्‍नवी

इतके मराठेकी...

अय्या, इश्श हे उद्गार शुद्ध मराठी आहेत.
इतके मराठी की यांचे भाषांतर इतर कुठल्याही भाषेत करता येत नसावे!--वाचक्‍नवी

तमिळमधून?

अय्या, इश्श हे उद्गार शुद्ध मराठी आहेत.
इतके मराठी की यांचे भाषांतर इतर कुठल्याही भाषेत करता येत नसावे!--वाचक्‍नवी

हे शब्द बहुधा तमिळमधून मराठीत आले आहेत असे वाचल्याचे पुसटसे आठवते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

इश्य

मराठी 'इश्श्य', बंगालीत 'इश्श्' होतो. हिंदीत 'धत्' होऊ शकेल.

इश्श आणि अय्‍या

हे शब्द बहुधा तमिळमधून मराठीत आले आहेत असे वाचल्याचे पुसटसे आठवते.
शक्य आहे. तरीसुद्धा, सबंध मराठी भाषाच तमिळपासून झाली अशी उपपत्ती माडणारे विश्वनाथ खैरे यांनीदेखील त्यांच्या 'मराठी भाषेचे मूळ' या पुस्तकात, तमिळमधून मराठीत आलेल्या शब्दांच्या यादीत अय्या-इश्शची नोंद केलेली दिसत नाही. याचा अर्थ असा घ्यावा लागेल की हे शब्द तमिळमधून मराठीत जसेच्या तसे आले नाहीत.
परंतु, त्यांच्या 'अडगुलं मडगुलं' या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे---
"इश्श या बहुढंगी उद्गाराचे मूळ आद्य भाषाचार्यांनी इतर अनेक शब्दांप्रमाणेच संस्कृतात शोधण्याचा प्रयत्‍न केला. विस्र(हा शब्द आजानुकर्णांनी त्यांच्या एका गूढकथेत वापरला आहे !) म्हणजे मांसाची घाण.त्यावरून इश्शरं-इश्शरे अशी एक, तर र्‍हीच्छ्‌-ईच्छ्‌-इश्श-इशी अशी दुसरी उपपत्ती त्यांनी लावली.

"इश्शच्या जवळपासच्या उच्चाराचा शब्द संस्कृतात नाही हे उघडच आहे. तमिळ कोशात मात्र ईशि आणि शी हे शब्द धिक्कार, तिरस्कार, उबग या अर्थाचे उद्गार म्हणून सापडतात. कानडीतही इस्‌ आणि इस्सि याच अर्थाचे आहेत. या दोन भाषांत समान शब्द असले म्हणजे प्रथमपणाचा मान तमिळ शब्दाला असतो. तेव्हा मराठी बोलण्यात इश्श हा शब्द तमिळमधूनच आला असे म्हणता येईल.

"अशा गोष्टीत सब घोडे बारा टक्के करता येत नाहीत. 'इश्श' इतकाच प्रचारातला शब्द 'हुश्श' हा आहे. तो तमिळमध्ये नाही, पण कानडीत आहे. कानडी ही पण द्रविड कुळातली भाषा, आणि मराठीहून जुनी. तेव्हा तो मराठी भाषकांच्या बोलण्यात कन्नड भाषकांकडून आला असावा. थोडक्यात, प्रत्येक शब्दाचे मूळ तमिळ असे काही म्हणता येणार नाही."

विश्वनाथ खैरे पुढे लिहितात.--"स्त्रियांची शब्दशक्ती आणि शब्दभक्तीही पुरुषांहून अधिक असते. मराठी स्त्रियांना आपले ठेवणीतले शब्द तमिळ आहेत असे कळले तर आश्चर्य वाटेल, आणि त्यांच्या तोंडून सहजच 'अय्या' असा आश्चर्योद्गार निघेल. पुढचे वाचले तर, पुन्हा अय्या म्हणण्याची पाळी. कारण हा मराठी अय्या 'मद्रासी अय्या'पेक्षाही खास तमिळ आहे. ऐ म्हणजे आश्चर्य किंवा नवल, तर ऐयम्‌ म्हणजे संदेह. या दोन्हींच्या अर्थसंयोगातून 'अय्या' हा नवलाचा उद्गार मराठीत आला यात काय नवल! मद्रासी 'अय्या' मात्र संस्कृत 'आर्य'वरून आला असे अनेक तमिळ पंडित मानतात."--वाचक्‍नवी

मराठी भाषेचे मूळ

छे, इश्श, अय्या हे उद्गार तमिळ आहेत असे 'मराठी भाषेचे मूळ' या पुस्तकात खैरे यांनी लिहिले आहे. मात्र सध्या संदर्भासाठी पुस्तक उपलब्ध नसल्याने चू.भू.द्या.घ्या.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अय्य, अय्या, अय्यर, अय्यंगार.

कानडीत अय्य म्हणजे आर्य; पिता; विद्यागुरू; मालक.
मद्रासी अय्या हा साधारणपणे नामाला जोडून येतो. मुत्तय्या, कृष्णय्या वगैरे. अय्यर, अय्यंगार आणि हे दोन शब्द संस्कृत 'आर्य'पासून आले असू शकतात. अय्ययो ह्याचा अर्थदेखील कदचित अरे आर्या असा असू शकेल.
मराठी माणसाच्या दृष्टीने पांढरी लुंगी किंचित वर नेसलेले आणि आडवे गंध लावलेले सगळेच पुरुष मद्रासीअय्या असतात. उत्तरेचे जसे भैय्ये तसेच हे अय्ये. भैय्याचे स्त्रीलिंग भैय्यीण तर अय्याचे अम्मा.--वाचक्‍नवी

अय्या, अय्यप्पा, आई

अय्यप्पा हा मल्याळी देव मानला जातो. दाक्षिणात्य भाषांत बायकांना अक्का/ आक्काप्रमाणे बायकांना अय्या म्हणतात का? या सर्व शब्दांचा आई या शब्दाशी काही संबंध असावा का?

अय्यो! हा शब्द उद्गारवाचक म्हणून कानडी लोकही वापरतात. अय्या हा शब्द मराठीत दक्षिणेकडून आला हे खरे.

आई हा शब्दही तमिळमधून आला असे सांगितले जाते. चू. भू. दे. घे.देव करो आणि आईचे कोणी शुद्धीकरण न करो! - ह. घ्या

कन्नडमध्ये

आईला कन्नडमध्ये अम्मा, अव्वा, तायि वगैरे म्हणतात


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

बायकांना अय्या म्हणतात का

अय्या पुरुषांना म्हणतात. अय्या, अप्पा ही पुल्लिंगी संबोधने आहेत.

बहुधा मराठीत जसे अरे बापरे किंवा (अबब, बाबा रे बाबा) म्हणतात. तसे अय्यय्यो असावे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

जयवंत दळवी

जयवंत दळवी यांच्या "अधांतरी" या मराठी कादंबरीतील सावित्री/साऊ ही कथानायिका आपल्या आईला "अय्या" असे म्हणते. दक्षिणेतील काही भागात बहुदा "अय्या" हे नामाभिधान आईकरताही असावे.

उ: जयवंत दळवी

अय्या" हे नामाभिधान आईकरताही असावे.

अय्या हे विष्णूचे नांव आहे. (शब्दशः अर्थ बाप) त्यामुळे ते स्त्रीकरिता वापरले जात नाही असे वाटते.

१. http://en.wikipedia.org/wiki/Ayyavazhi


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मै समय हूं

श्रीयुत ऋषिकेश तथा प्रियालीदेवी यांनी जैसे कथिले तैसेच विचारतरंग अमुच्याही मनात प्रवेश करते जाहले. भाषेची लुकसानी या विषयावर गेल्या सहस्त्र दिनांमाजी दशसहस्त्र चर्चा घडियेल्या. प्रत्येक चर्चेमाजी ज्ञानी मंडळी निकराने अपुले म्हणणे मांडत राहिली. ऐसा गहन तंटा सुटावा तरी कसा? जे चावुंडराये करविले ते कोठे लुप्त जाहले?

आंतरजालावर सफर करते समयी खुद्द टोपीकरालाही तयाच्या भ्रष्ट भाषेच्या भवितव्याविषयी चिंता जाहली हे जाणिले. चित्ती परमसंतोष जाहला. अधिक काय लिहीणे? ये वेळी अमुचे विचार मांडताना मूळ विषयाशी फारकत जाहली. ऐशा अपराधाची सरकारदरबारी माफी असावी.

----

चेंडूफळी

फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षण हे प्रतिशब्द नाहीत मग काय आहेत ?
भाषाशुद्धी वि. म्लेच्छ(यवन?) अशा या सामन्यात भाशु संघाकडे वरील चारच खेळाडू आहेत असे दिसते. असे झाल्यास कुटील म्लेच्छ सहजासहजी सामना जिंकतील. तरी खालील जागांसाठी शीघ्रतेने प्रतिशब्द शोधून तेथे खेळाडू उभे करावेत ही विनंती.

स्लिप, गली, पॉइंट, कव्हर पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिडविकेट, डीप मिडविकेट, लाँग ऑन, लाँग ऑफ, मिडऑन, मिडऑफ, स्वेअर लेग, डीप बॅकवर्ड पॉइंट, सिली मिड ऑफ, सिली मिड ऑन, थर्ड मॅन, फाइन लेग, डीप फाइन लेग.

----

सहमत..

तरी खालील जागांसाठी शीघ्रतेने प्रतिशब्द शोधून तेथे खेळाडू उभे करावेत ही विनंती.

स्लिप, गली, पॉइंट, कव्हर पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिडविकेट, डीप मिडविकेट, लाँग ऑन, लाँग ऑफ, मिडऑन, मिडऑफ, स्वेअर लेग, डीप बॅकवर्ड पॉइंट, सिली मिड ऑफ, सिली मिड ऑन, थर्ड मॅन, फाइन लेग, डीप फाइन लेग.

सहमत आहे! राजेन्द्ररावांचा प्रतिसाद आवडला...

आम्हाला एक शब्द सुचला आहे...

स्लीप - सहजझेलचौकी! :)

असो,

आपला,
(यष्टिरक्षक) तात्या किरमाणी.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

धन्यवाद

स्लीप - सहजझेलचौकी! :)

पण एवढ्याने भागणार नाही (गुणणारही नाही!)
आपल्या फलंदाजांना फटके मारायचे आहेत. (इथे अर्थाचा अनर्थ होतो आहे. आपल्या फलंदाजांची फटके मारण्याची मनिषा आहे असे वाचावे. :) )
स्क्वेअर ड्राइव्ह, स्ट्रेट ड्राइव्ह, पुल, लेग ग्लान्स, कव्हर ड्राइव्ह, हुक, स्वीप(झाडू?), रिव्हर्स स्वीप(उलटा झाडू), फ्लिक

गोलंदाजांना चेंडू टाकायचे आहेत
बाउन्सर, गुगली, ऑफ स्पिन,लेग स्पिन, फ्लिपर, राँग वन(चुकलेला?), गुडलेंग्थ बॉल, फुलटॉस, बीमर

दुसरा उपाय म्हणजे अशा भ्रष्ट खेळाचा त्याग करून सचिनसकट सर्वांना कबड्डीसारखा १००% देशी खेळ खेळायला लावणे.

अवांतर : या सर्व शब्दांसाठी गांगुलीने बंगाली, भज्जीने पंजाबी, कुंबळेने दाक्षिणात्य प्रतिशब्द शोधावेत का?

उदा. पॉइंट - बिंदू, कव्हर पॉइंट - आवेष्टन बिंदू, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर - तोकडे अधिक आवेष्टन, सिली मिड ऑफ - मूढमध्यउजवा
गली - गल्ली इ.

----

माधव जूलियन

पण अभ्यास केल्यावर तेच भाषाशुद्धीचे कट्टर समर्थक बनले ! ते इतके की पूर्वी ते आपल्या कवितांमध्ये फारसी शब्दांची खैरात करत असत. ह्या कविता त्यांनी पुन्हा शुद्ध स्वरूपात लिहून काढल्या !

हा संपूर्ण इतिहास नाही. यानंतर १९१७ मध्ये जूलियन यांनी (वस्तुस्थितीची जाणीव झाल्यानंतर) भाषाशुद्धिविरोधात असे लिहिले की "संस्कृत शब्दांची निष्कारण गर्दी निषेधार्ह आहे. या (सफाईकामगार) लोकांना संस्कृत भाषा अवगत असावी. पण स्वत:च्या मराठी भाषेशी नीट परिचय नसावा याची कीव येते! बोलीतील सुलभ शब्दांकडे आपले दुर्लक्ष होते."

नंतर १९२१ साली त्यांनी "प्रत्येक मराठी शब्दाचे संस्कृतशी नाते जोडण्याचा मूर्खपणाचा प्रयत्न धिक्कारला."

भाषेच्या बाबतीत शुद्धीकरण ही शास्त्रबाह्य कल्पना आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. धर्माभिमान, खोटा स्वाभिमान, उच्चनीचतेच्या कल्पना... स्वत:ला श्रेष्ठ समजण्याची भावना अशा कारणांमुळे लोक शुद्धीकरणाकडे वळतात.

तत्पूर्वी समीक्षक व भाषाअभ्यासक प्रा. श्री. के. क्षीरसागर यांनी त्याकाळी सह्याद्री मासिकात "मराठीचे वैरी सावरकर आणि पटवर्धन (माधव जूलियन)" असा लेख लिहून त्यात खालील मत व्यक्त केले होते

"भाषाशुद्धीवाद्यांना क्लिष्ट आणि विकृत शब्दनिर्मितीचा रोग जडला आहे.त्यांच्या ह्या उद्योगामुळे अस्वाभाविक शब्दांची टांकसांळ निर्माण झाली आहे. भाषाशुद्धीचे कारण पुढे करून हल्ली जो उठतो तो नवे शब्द बनवत सुटला आहे. त्यामुळे मराठीचे स्वाभाविक सौंदर्य बिघडत असून फारसी आणि इंग्रजी शब्दांचे उच्चाटन व्हायच्या ऐवजी त्यांची आठवणच पक्की होत आहे,"

अर्थात या कोणत्याही कारणांमुळे भाषाशुद्धाविरोधकांना सावरकरांविषयी अनादर आहे असा निष्कर्ष कृपया काढू नये. सावरकरांचे स्वातंत्रयुद्धातील कार्य अपूर्व असेच आहे. मात्र भाषाशुद्धी ज्या पद्धतीने केली जाते त्याला सकारण विरोध असणारच.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

तंतोतंत पटले.

>>भाषेच्या बाबतीत शुद्धीकरण ही शास्त्रबाह्य कल्पना आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. धर्माभिमान, खोटा स्वाभिमान, उच्चनीचतेच्या कल्पना... स्वत:ला श्रेष्ठ समजण्याची भावना अशा कारणांमुळे लोक शुद्धीकरणाकडे वळतात.<< हे तंतोतंत पटले. मला वाटते सर्व उपक्रमी या मताशी सहमत होतील. आपल्या पूर्वसूरींपेक्षा आपली दृष्टी आता अधिक विशाल आणि विचारसरणी अधिक प्रगल्भ झाली आहे.
अग्निरथगमानागमन...हा शब्द सावरकरांचा नाही हे मी अनेकदा वाचले आहे.
दिनांक, बोलपट, महापौर, रंगपट, रंगावृत्ती, स्थायी समिती, स्वाक्षरी, स्थानक, आयुक्त, कोषाध्यक्ष, प्रेक्षागृह, दिनदर्शिका, धनादेश…हे सावरकरांचे शब्द. हे अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत झिरपले. त्याचे विकान(=दुकान), खाद्यालय(=हॉटेल) हे शब्द लोकांनी स्वीकारले नाहीत. --वाचक्‍नवी

क्षुधाशांतीगृह

क्षुधाशांतीगृह हा कोणाचा शब्द? आरभाट आणि चिल्लर मध्ये वाचला होता. प्रत्यक्षात कुठेही नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

उपहारगृह

आणि उपहारगृह?

हॉटेलला मराठीत काय म्हणतात? मी हॉटेलच म्हणते.

हॉटेल इज ऍन एस्टॅब्लिशमेंट दॅट प्रोव्हाईडस लॉजिंग, मील्स, एंटरटेनमेंट अँड अदर सर्विसेस टू पब्लिक. - इति मरिअम-वेब्स्टर डिक्शनरी.

हॉटेल

हॉटेल या (मराठी) शब्दाचा मी अमेरिकेत ऐकलेला उच्चार म्हणजे "होट्येल्" (चूभूदेघे) !

लॉजिंग आणि बोर्डिंग

गुजराथेत बोर्डिंगला लोजिंग आणि लॉजिंगला बोर्डिंग म्हणतात. लोज मात्र जमवामाटे असते, तिथे राहण्य़ाची सोय नसते.
अल्पाहाराला मराठीत फराळ म्हणतात. दिवाळीतलाही फराळ आणि उपासाचे जेवणही फरळ. फलाहाराला मात्र फराळ म्हणत नाहीत. मद्राशी याला टिफिन म्हणतात. त्यामुळे टिफिन रूम म्हणजे मद्रासेत रेस्तराँ . मुंबईत अल्पोपाहाराला खाणे म्हणतात. चार वाजले आता खाणे खाऊ या, असे सररास ऐकू येते. तुरुंगात अल्पाहाराला छोटी हजेरी म्हणतात.
मुंबईत स्वयंपाक करणे याला जेवण करणे म्हणतात. तर पुण्यात जेवण म्हणजे भोजन. तर बंगालीत भोजन म्हणजे भजन. न्याहारी किंवा नाश्ता म्हणजे मुळात ब्रेकफ़ास्ट, पण हल्ली नाश्ता दिवसभरात केव्हाही आणि कितीही वेळा करता येतो. पाटपाणी करण्याला हिंदीत खाना लगाना म्हणतात. हा खाना अपवादानेच अपने हाथसे बनाया हुआ असतो.--वाचक्‍नवी

हॉटेल आणि खाद्यालय

खाद्यालयाच्या समर्थनास्तव, हॉटेल->खॉत्याल->खात्याल->खाद्यालय अशी व्युत्पत्ती देखील मी वाचली आहे. रसवंतीगृहांप्रमाणेच महाराष्ट्रात अनेक क्षुधाशान्तिगृहे आहेत. भोजनालये आणि विश्रांती गृहे तर भरपूर. मोठ्या शहरात देवरुखे किंवा कर्‍हाडे ब्राह्मणांच्या खानावळी आता थोड्या राहिल्या आहेत. त्यांतली पुण्यातली प्रसिद्ध बादशाही खानावळ अजूनही दर्जा टिकवून आहे. हल्ली मराठवाडा खानावळ, खानदेशी खानावळ, बोलाई मटणाची खानावळ वगैरेंची चलती आहे. पण खरा धुडगूस घातला आहे तो पंजाबी धाब्यांनी. आधी उडप्यांनी आणि मग पंजाब्यांनी इराणी रेस्टॉरन्टांना बंद पडायला लावले.

दुव्यावरील लेख

लेखात दिलेल्या लोकसत्ताच्या दुव्यावरील लेख वाचला. त्यातील खालील वाक्य वाचून सखेद आश्चर्य वाटले.

परंतू जनतेच्या भल्यासाठी आणि सोईसाठी केलेल्या या कामाचा (प्रतिशब्द शोधण्याचा) जनतेला पुरेसा उपयोग करून घेता आला नाही असेच आज खेदाने म्हणावे लागत आहे.

म्हणजे आम्ही बोजड प्रतिशब्द बनवणार, ते जनतेने वापरले नाहीत तर ती त्यांची चूक. म्याडम सरकारी खात्यात असल्याने हे सरकारी धोरण आहे असे मानण्यास हरकत नसावी.

----

माझी एक साधी शंका

अग्निरथगमनागमननिदर्शनपट्टिका हा शब्द श्री. वि.दा. सावरकरकृत आहे हे प.पू.
मा. श्री. टगोजीराव ह्यांनी कुठे वाचले? कृपया जर सविस्तर संदर्भ देता आला तर बरे. शक्यतो पुस्तकाचे नाव, प्रकाशक, प्रकाशन वर्ष देता आले तर फारच उत्तम.

कळावें,
आपला अज्ञानी बालक,
ऋजु.

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

संतुलित

जयगिरी, आपला लेख अतिशय आवडला. लेख खरेच संतुलित झाला आहे.
सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यातले योगदान उल्लेखनीय वाटतेच पण त्याचबरोबर स्वाक्षरी, दिनांक यांसारखे इतके सोपे शब्द त्यांनी बनवले त्याबद्दल कृतज्ञतेशिवाय माझ्या मनात कोणतीही भावना नाही. भाषाशुद्धीच्या चळवळीतून अनेक इंग्रजी शब्दांना सुलभ मराठी शब्द मिळणे कुणाला आवडणार नाही? पण सावरकरांसारखे सुलभ सोपे शब्द बनवण्याइतकी वैचारिक प्रगल्भता असलेली व्यक्ती महाराष्ट्रात असल्यास मला माहिती नाही. :-(

-सौरभ.
==================

The financial situation at the moment is so bad that women are now marrying for love! ;-) so.....

'प्रत्येक प्रियकरानं आपापली प्रेयसी मारुन टाकून तिच्या कातड्याचा डफ करुन त्यावर प्रेमगीतं म्हणावी.

+१ / -१

भाषाशुद्धीच्या चळवळीतून अनेक इंग्रजी शब्दांना सुलभ मराठी शब्द मिळणे कुणाला आवडणार नाही? पण सावरकरांसारखे सुलभ सोपे शब्द बनवण्याइतकी वैचारिक प्रगल्भता असलेली व्यक्ती महाराष्ट्रात असल्यास मला माहिती नाही.

+१ सहमत

लेख खरेच संतुलित झाला आहे

-१
लेख लेखकाच्या विचारांशी प्रामाणिक असला, वाचनीय, मननीय आणि एक महत्त्वाच्या विषयावर माहितीपूर्ण विवेचन करणारा असला तरी संतुलित म्हणता येईल का?
(इथे सावरकर, लेखक अथवा भाषाशुद्धीची चळवळ यापैकी कोणाचाहि उपमर्द करण्याचा हेतु नाहि)

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

आहे काय? आहेच! ;-)

ऋषिकेश, खरं सांगायचं तर मला मराठीवर इंग्रजीचं आक्रमण (होत असलं तरी!) बिलकूल आवडत नाही. जोपर्यंत इंग्रजी शब्दांना सुलभ मराठी शब्द मिळतील (मग ते संस्कृत, फार्शी, तमीळ, हिंदी वगैरेपासून उत्पन्न झालेले असले तरी) माझा भाषाशुद्धीला पाठिंबाच राहिल. आता पाठिंबा असल्याने वरचा लेख संतुलित वाटणारच, नाही का? ;-)

-सौरभ.

==================

The financial situation at the moment is so bad that women are now marrying for love!

स्वाक्षरी आणि दिनांक

स्वाक्षरी आणि दिनांक हे शब्द देखिल रोजच्या बोलीभाषेत फारसे कुणी वापरत नाही.
तारीख आणि सही हेच जास्त प्रचलित आहेत. उदा. 'अमुक तारखेला गावी जाऊ' 'तमुक ठीकाणी सही कर' इ.इ.
'अमुक दिनांकाला गावी जाऊ' असे मी तरी कधी म्हणत नाही.
तेव्हा हे शब्द देखिल सोपे वाटत असले तरी अपयशीच म्हणायचे

हुतात्मा

हुतात्मा हा सावरकरांनी बनवलेला एक यशस्वी शब्द आहे असे वाटते.
- दिगम्भा

उत्तम विवेचन

एखाद्या अनुभवी वकिलाने न्यायालयात तर्कशुद्ध पद्धतीने जोरदार आपली बाजू मांडावी अशा रीतीने आपण सप्रमाण मुद्दे मांडले आहेत.
लेख आवडला व पटलाही
जयेश

वकील

एखाद्या अनुभवी वकिलाने न्यायालयात तर्कशुद्ध पद्धतीने जोरदार आपली बाजू मांडावी अशा रीतीने आपण सप्रमाण मुद्दे मांडले आहेत.

भले! हुश्शार! तर्कशुद्ध पद्धती मांडायची कोणी तर वकिलांनी. अहो महाशय, वकील हा देखील फार्सी का अरबी शब्द आहे.

ज्याच्यावाचून पावलोपावली अडतं त्यालाच लाथा घालायच्या ही संस्कृती कोणाची हो?

-राजीव.

सोडा हो

विली वोन्का यांनी "वकील" शब्दाबद्दल सांगितले आहे.

वरील वाक्यात "वकील" आणि "मुद्दा", तसेच मूळ लेखातही अनेक शब्द आले आहेत (सन, खैरात, तपशील, वगैरे).

पण मूळ लेखात सार्वत्रिक सामान्य अपवाद मानून घेतलेला आहे. जयेश लेखात म्हणतात :

ज्या कल्पना आपल्याकडे पूर्वी नव्हत्या व ज्यांना प्रयत्न करूनही समर्पक
प्रतिशब्द सुचविता येत नाही किंवा जे परकीय शब्द मराठीने आत्मसात करून, त्यामुळे तिच्या शब्दसंपत्तीत आणि सौंदर्यात भरच पडली आहे, त्यांच्यासाठी तेच परकीय शब्द वापरण्यास त्यांची हरकत नव्हती.

हा अपवादच सार्वत्रिक नियम होतो. अशा प्रकारे आपण परभाषेतून आलेले बहुतेक शब्द या अपवादाखाली वापरू शकतो. कारण कोणत्याही दोन शब्दांबद्दल अर्थातील सूक्ष्म भेद दाखवता येतात. उदाहरणार्थ : "वकीली"साठी पूर्वीच "शिष्टाई" शब्द उपलब्ध होता, पण दोन शब्दांत अर्थाचा सूक्ष्म फरक दाखवता येतो. मराठीत निवडणुकीसाठी "उमेदवार" उभा राहातो, तर हिंदीत निर्वाचनासाठी "प्रतिस्पर्धक" उभा राहातो. कोणी म्हणेल की हा तंतोतंत प्रतिशब्द आहे. पण उमेदवाराला "उमेद" असते, आणि प्रतिस्पर्धकात "प्रतिस्पर्धा" असते, असा सूक्ष्म भेद कोणी दाखवू शकेल. मराठी उमेदवार सकारात्मक उमेद दाखवतात, तर हिंदी प्रतिस्पर्धक भांडकुदळपणा दाखवतात. त्याच प्रकारे आपण "हॉटेल" आणि "भोजनालय/विश्रामगृह" यांच्यात अर्थाचा नीरक्षीरविवेक करू शकतो. "हॉटेला"त गिर्‍हाईक जेवू शकतो, किंवा/आणि राहूही शकतो अशा सर्व प्रकारच्या व्यापारी संस्थांचा समावेश होतो. भोजनालय/खानावळीत केवळ अन्न खाल्ले जाऊ शकते, तर विश्रामगृहात/अतिथिगृहात सहसा वसतीची सोय व्हावीच लागते. "हॉटेल"चे नेमके अर्थवलय त्या चारही शब्दांत नाही. अर्थातच वरील नियमाप्रमाणे "'हॉटेल' हा परकीय शब्द मराठीने आत्मसात करून, तिच्या शब्दसंपत्तीत आणि सौंदर्यात भरच पडली आहे, आणि हा परकीय शब्द वापरण्यास हरकत नाही."

१) जे शब्द आपल्या भाषेत नव्हते, ते जसेच्या तसे परकी भाषेतून स्विकारल्यास हळूहळू, ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या न्यायाने, परकीय शब्दांचे मराठीतील प्रमाण वाढत जाते.

होय आणि नाही. (नाहीचा अंश अधिक.) काही शब्द टिकतात, काही शब्द टिकत नाहीत. गेल्या काही शतकांत फारसी आणि अरबी शब्दांचे मराठीतील प्रमाण कमी झाले. शिवशाहीत मराठीमध्ये फारसीचे प्रमाण पुष्कळ होते. त्यानंतर कमी झाले. थेंबेथेंबे तळे साचतेच असे काही नाही. इतिहासाच्या घटनांच्या अनुषंगाने तळ्याच्या तटाला भेग पडून तळे आटूसुद्धा शकते.

२) आपल्या भाषेत ज्या शब्दांना प्रतिशब्द नाहीत, असेच शब्द परकी भाषेतून येतात असे नाही, ज्या अर्थाचे शब्द आपल्या भाषेत पूर्वी होते, त्याच अर्थाचे परकी भाषेतील शब्दही, त्या भाषेच्या संपर्काने आपल्या भाषेत येतात. हे शब्द आपल्या भाषेतील मूळ शब्दांची जागा घेतात. परिणामी मूळ शब्द मागे पडतात वा वापरातून नाहीसे होतात.

शक्य आहे. परंतु साधारणपणे शब्दांच्या अर्थच्छटा वेगळ्या असतात. गडू-पेला-फुलपात्र या सर्वांची जागा "ग्लास" शब्दाने घेतली आहे. कारण "ग्लास"ची अर्थच्छटा वेगळी आहे. पुणे जिल्ह्यातील एका लहान गावात मी "गुरुजी, मास्तर, आणि सर" या तीन शब्दांचा वेगळा अर्थ आहे, हे शिकलो. कालांतराने "गुरुजी" असे कुठल्याच शिक्षकाला म्हटले जाणार नाही - शहरातील बालवाडीपासून उच्च माध्यमिक शाळांमध्ये "अमुक-तमुक-सर"च शिकवण्या करतात (पुरुष असल्यास, स्त्री असल्यास "टीचर/?मॅडम?"). शहरांत "सर" शब्दाने "गुरुजी" शब्दाची जागा घेतली, असे म्हणता येईल. पण संक्रमणाच्या काळात (उदा : खेड्यापाड्यांत) "गुरुजी, मास्तर, आणि सर" या तीन शब्दांचे वेगवेगळे अर्थ आहेत/होते, हे नाकारता येत नाही. त्यामुळे वरील अपवादान्वये शब्दांची ही आयात सुयोग्य मानली जावी.

३) परकी भाषेतील नुसते शब्दच येत नाहीत तर त्याबरोबर त्या भाषेचे व्याकरणही येते व मूळ भाषेतील व्याकरणाच्या बाबतीतही (वाक्यरचना, एकवचन-अनेकवचन इ.) अव्यवस्था निर्माण होते.

हे होण्यास शेकडो वर्षे लागू शकतील. मराठीत तीन लिंगे आहेत, दोन वचने आहेत. सिद्धांतापुरते मी हे मान्य करू शकतो, की बदल घडू शकतात. संस्कृतात तीन लिंगे होती; बदलून हिंदीपर्यंत दोनच पोचलीत. संस्कृतात तीन वचने होती; बदलून मराठीपर्यंत दोनच पोचलीत. संस्कृतात क्रियापद विधानात्मक वाक्याच्या शेवटी, सुरुवातीला किंवा मध्येही येऊ शकते. मराठीत मात्र वाक्याच्या जवळजवळ नेहमीच शेवटी येते. ("आला बरे का तो!" हे विधानात्मक वाक्य नव्हे.) इंग्रजीत कर्ता-क्रिया-कर्म-अन्यकारक/पूरक अशीच वाक्यरचना असते. संस्कृत/इंग्रजी पैकी कुठलीच वाक्यरचना मराठीभाषक वापरताना दिसत नाहीत.

वाक्यरचना ही शेकडो वर्षे बदलत नसते. (इतिहासात तरी लवकर बदलल्याची उदाहरणे सापडत नाहीत.) किंबहुना भाषेची पठडी म्हणजे वाक्यरचना आणि लिंग-वचन-कारके वगैरे चिवट आणि मूलभूत तपशील. अर्थातच मराठीतही या बाबतीत संक्रमण चालू आहे. "मी" शब्दाची तृतीया (म्यां) मागे कधीतरी सुशिक्षित बोलण्यातून गळून पडली. अनेक प्रत्यय फार बदललेत. उदाहरणार्थ : "फळें पडलीं"->"फळऽ पडली" हाच उच्चार सुशिक्षित बोलण्यात आढळतो. पण हे सर्व महत्त्वाचे बदल इंग्रजी किंवा फारसीच्या प्रभावामुळे मुळीच नाहीत. जयेश यांचा मुद्दा क्रमांक ३, हा विचार करता त्यांच्या लेखाच्या एकूण विचारप्रवाहाविरुद्ध सबळ समर्थन देतो.

मला वाटते - सोडा हो वादविवाद... कोणाला भाषा-शुद्धी करायची आहे, तर करू द्या. हा एक छंद आहे. पण प्रतिशब्द रुळायला हवे असतील तर प्रचंड प्रतिभा लागते - खुद्द सावरकरांपाशी तशी प्रतिभा होती, पण त्यांचेही काही थोडेच शब्द रुळलेत. अत्र्यांनी काही थोडे शब्द रुळवलेत. पदनामकोशाला काही प्रमाणात यश मिळाले. (पण पदनामकोश हा सरकारी प्रयत्न असल्यामुळे, मतदार म्हणून आपल्या सर्वांनी त्याबाबत खर्च/फायद्याच्या गुणोत्तराचा विचार करणे श्रेयस्कर.) बाकी सर्व बाबतीत भाषाशुद्धी म्हणजे छंद किंवा गप्पा.

उष्ट्रक पुच्छ चुंबन

पण प्रतिशब्द रुळायला हवे असतील तर प्रचंड प्रतिभा लागते - खुद्द सावरकरांपाशी तशी प्रतिभा होती,
सहमत!
माझ्यासम यकःश्चित पामरने या विषयी बोलणे म्हणजे उष्ट्रकाच्या पुच्छाचे चुंबन.

धनंजयराव व राजीव साहेब

धनंजयजी,
आपण नकळत वरील मुद्दे माझ्या तोंडी घातले आहेत. काही हरकत नाही, चर्चा लांबल्यामुळे कदाचित असे झाले असावे. :-)

राजीव साहेब
आपलाही कदाचित गैरसमज झाला आहे. भाषाशुद्धीचा मी कुठेही आग्रह धरलेला नाही. लेख आवडला, मांडणी आवडली म्हणून कौतुक केले इतकेच. मुद्दा पटला नाही तर थेट गुद्यांवर येणे ही संस्कृती कोणती (ह.घ्या :-)

जयेश

क्षमस्व

एक वाक्य तुमच्या प्रतिसादातले निमित्त होते, पण माझा बहुतेक प्रतिसाद जयगिरी यांच्या मूळ लेखाशी संबंधित होता. हे मी स्पष्ट केले नव्हते, पण लक्षात येईस्तोवर विसुनाना यांनी प्रतिसाद दिला होता, सुधारणा करता आली नाही. क्षमस्व.

गेल्या पाच वर्षातले बदल

>>वाक्यरचना ही शेकडो वर्षे बदलत नसते. (इतिहासात तरी लवकर बदलल्याची उदाहरणे सापडत नाहीत.) <<
गेल्या पाच वर्षांपासून मराठीतल्या जाहिरातीमधल्या भाषेत कर्ता-कर्म-क्रियापद ही रचना उलटीसुलटी झाल्याचे दिसत आहे. तसेच हिंदी-इंग्रजीच्या प्रभावाने मराठीत देखील मुख्य वाक्य आधी आणि 'जसे-ज्याप्रमाणे-जेव्हा' असे शब्द मध्ये टाकून नंतर लिहिलेली गौण वाक्ये, अशी वाक्यरचना अनेक वृत्तपत्रलेखक करायला लागले आहेत. आमच्यासारख्यांना असले लिखाण वाचताना विचित्र वाटते, पण सवयीने हाच प्रकार लोकांच्या अंगवळणी पडण्याची दाट शक्यता आहे. --वाचक्‍नवी

आश्चर्य आहे

वाक्यरचना ही फार मूलभूत असते.

जाहिरातींबद्दल साशंक आहे - जाहिरातींचे अनेक नमुने आजानुकर्ण (वगैरेंनी) दिले होते, ते अ-मराठीभाषकांनी शब्दास शब्द जुळवून लिहिल्यासारखे दिसतात. अधून मधून झी-मराठी/आल्फा वरच्या कार्यक्रमांची झलक यू-ट्यूब संकेतस्थळावर बघितली आहे - पण त्या कार्यक्रमांत इंग्रजी शब्द सर्रास वापरत असले तरी शब्दांचा क्रम मराठीच आठवतो.

जसे-ज्याप्रमाणे-जेव्हा या शब्दांनी जोडलेली उपवाक्ये, अशा उपवाक्यांनी बनवलेले महावाक्य हे बर्‍याच जुन्या काळापासून मराठीत वापरले जात असावे. मराठी लेखनाच्या सामान्य शैलीत अशी वाक्ये फारशी वापरेनातका. (पंत कवींची पल्लेदार वाक्ये तरी सामान्य शैलीत कुठे होती.)

गुंतागुंतीचे विचार नेमकेपणे मांडताना अनेक उपवाक्ये असलेली महावाक्ये बनवणे अर्थाच्या दृष्टीने जरुरीचे असते. कुठल्याही भाषेत तांत्रिक बाबतीत लिहिताना (विशेषकरून कायद्याच्या विषयी, किंवा तत्त्वज्ञानाविषयी लिहिताना) उपवाक्यांनी बनवलेली महावाक्ये लिहिण्याची पद्धत असते.

इंग्रजीमध्येसुद्धा सामान्य गप्पा मारताना (किंवा प्रसारमाध्यमातल्या लोकप्रिय कार्यक्रमांत) लहानलहान एक-क्रियापदी वाक्येच (फार-फारतर दोन-क्रियापदी वाक्ये) बहुधा वापरतात.

तांत्रिक आणि वैचारिक गुंतागुंतीचे विषय जर मराठीत लिहिले जातील तर काही थोड्या तंत्रज्ञ मराठी वाचकांना तरी "जसे-ज्याप्रमाणे-जेव्हा-जेणेकरून-जरी-जेथे-जेथून-ज्यासाठी-ज्याला" शब्दांनी जोडलेली महावाक्ये पचवायला शिकलेच पाहिजे. महावाक्ये करण्याची मुभा मराठीमध्ये आधीपासूनच आहे. तांत्रिक गुंतागुंतीचे विषय कदाचित सामान्य प्रचारात मराठीत लिहिले जात नसतील.

आता कोणी लघुवाक्यशैलीला मराठी अस्मिता मानेलही, आणि "जसे-ज्याप्रमाणे-जेव्हा" यांना उपरे म्हणून बहिष्कृत करेलही. अशा व्यक्तीला गुंतागुंतीचे विषय मराठीत वाचता येणार नाहीत. त्यातील माहिती मिळवणे जरुरीचे असेल तर इंग्रजी-हिंदी मध्ये लिहिलेली तांत्रिक पुस्तके वाचेल. अस्मितेचा र्‍हास अधिक "ज्याप्रमाणे" शब्द वापरून होतो, की अवघे पुस्तकच दुसर्‍या भाषेत वाचून, ते ज्याने-त्याने ठरवावे.

सहमत

गुंतागुंतीचे विचार नेमकेपणे मांडताना अनेक उपवाक्ये असलेली महावाक्ये बनवणे अर्थाच्या दृष्टीने जरुरीचे असते.

तांत्रिक आणि वैचारिक गुंतागुंतीचे विषय जर मराठीत लिहिले जातील तर काही थोड्या तंत्रज्ञ मराठी वाचकांना तरी "जसे-ज्याप्रमाणे-जेव्हा-जेणेकरून-जरी-जेथे-जेथून-ज्यासाठी-ज्याला" शब्दांनी जोडलेली महावाक्ये पचवायला शिकलेच पाहिजे.

धनंजय यांच्या वरील मताशी मी संपूर्ण सहमत आहे. जाहिरातींचे सोडा, अगदी उपक्रमावर सुद्धा अनेक चर्चांमध्ये याची उदाहरणे आढळतील. याचे स्वाभाविक कारण म्हणजे, येथील बरेच सदस्य कामानिमित्त इंग्लिशमध्ये लेखन करत असावेत, त्यामुळे मराठीमध्ये लेखन करताना त्या शैलीचे प्रतिबिंब पडणे स्वाभाविक आहे. अगदी मी सुद्धा याला अपवाद नाही.

गंभीर विषयांच्या चर्चांमध्ये नेमकेपणा येण्यासाठी महावाक्यांचा उपयोग अनिवार्य ठरतो असे वाटते. ललित वा फिक्शन स्वरुपाच्या लेखनात कदाचित महावा़क्ये तितकीशी आवश्यक नसतील.

जयेश

वा!

वा! फारच उद्बोधक आणि ज्ञानात भर वगैरे टाकणारा लेख आणि प्रतिसाद..!

वाचून ज्ञान भर तर पडलीच परंतु त्यासोबत अंमळ करमणूकही झाली याचा विशेष आनंद वाटतो..

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

बोटांचे तुकडे

हल्ली चर्चांना इतके प्रतिसाद येतात की माऊसने स्क्रोल करता करता बोटांचे तुकडे पडायची वेळ येते. :-)
उपक्रपंतांनी पानाच्या शेवटी थेट वरच्या टॉपला :-) जाण्यासाठी टिचकी उपलब्ध करुन दिली तर बरे होईल.

-(कमी प्रतिसाद देणारा)सौरभ.:-)

==================

The financial situation at the moment is so bad that women are now marrying for love!

चांगली चर्चा

भाषाविषयाच्या प्राध्यापकांना उपयोगाला येईल अशी ही चर्चा आहे.
मजा आली !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अगदी

सहमत आहे. हल्लीच्या 'प्राडाँ'चा एकंदर व्यासंग, विद्वत्ता, संशोधकवृत्ती बघता ही चर्चा त्यांच्यासाठी नक्कीच अत्यंत उपयोगी अशीच आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

एक उतारा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
लेखक रवींद्र पिंगे यांच्या "सावरकरांचे ऋण" या लेखातील पुढील भाग , श्री.जयगिरी यांच्या या चर्चा प्रस्तावाच्या निमित्ताने उद्धृत करावासा वाटतो.
"वीर सावरकरांनी नव्याने तयार केलेले शब्द नुसते आठवून पहा: दिनांक, बोलपट, महापौर, रंगपट, रंगावृत्ती, स्थायी समिती, स्वाक्षरी, स्थानक, आयुक्त, कोषाध्यक्ष, प्रेक्षागृह, दिनदर्शिका, धनादेश… कसं सुचलं असेल त्यांना हे सोपं शब्दभांडार? सावरकरांच्या पूर्वी हे शब्द मराठीत मुळीच नव्हते. आज ते आपल्या रोजच्या व्यवहारात विरघळून गेले आहेत. साने गुरुजी, गो० नी० दांडेकर, के० नारखेडे यांनी बोलीभाषेतली सुकुमार शब्दफुलं प्रमाण ग्रांथिक भाषेत बेमालूम गुंफिली. मात्र, संस्कृत भाषेचा आधार असलेले सर्वस्वी नवे मराठी शब्द निर्माण करण्याची अमोघ कामगिरी एकट्या तात्यारावांनीच केली.
सावरकरांचे दिनांक, महापौर, स्थानक, मध्यंतर, आयुक्त, बोलपट, हे सोपे नवे शब्द थेट तळागाळापर्यंत झिरपत गेले. लोकांनी ते आपलेसे केले. ...
"
स्वा. सावरकरांच्या विचारसरणी विषयी मतभेद असू शकतील. पण त्यांनी मराठी भाषेला जे नवीन शब्द दिले, असे शब्द निर्माण करण्याची जी दृष्टी दिली, त्यासाठी समस्त मराठीभाषाप्रेमींनी त्यांचे ऋण मानलेच पाहिजे.

 
^ वर