भाषाशुद्धीचे यशापयश आणि सावरकर

'सिग्नल'साठी 'अग्निरथगमनागमननिदर्शनपट्टिका' किंवा तसलाच काहीतरी संस्कृतोद्भव शब्द रुळवण्याच्या
[भाषाशुद्धीवादी/सावरकरी?] प्रयत्नाचे काय हसे झाले, विसरलात एवढ्यात?)

चॅलेंज - प्रे. टग्या
http://www.mr.upakram.org/node/1495#comment-24320

>> भाषाशुद्धीवादी/सावरकरी प्रयत्नांचे हसे झाले ?

सावरकरांनी भाषाशुद्धीची चळवळ सन १९२५ साली सुरु केली आणि त्यांची भूमिका ज्यांना पटली त्यांनीही ती चळवळ पुढे
चालविली. या विषयावर अनेक वादविवाद झाले अणि हळुहळू भाषाशूद्धीचे तत्त्व लोकांना पटू लागले. भाषाशुद्धीचे सर्वच पुरस्कर्ते
सावरकरांचे अनुयायी होते असे नाही. माधव ज्यूलियन हे पूर्वी भाषाशुद्धीचे विरोधक होते. पण आंधळा विरोध करण्याऐवजी या
विषयाचा अभ्यास करुनच तिचे खंडन करावे या हेतूने त्यांनी भाषाशुद्धीचा अभ्यास केला. पण अभ्यास केल्यावर तेच भाषाशुद्धीचे
कट्टर समर्थक बनले ! ते इतके की पूर्वी ते आपल्या कवितांमध्ये फारसी शब्दांची खैरात करत असत. ह्या कविता त्यांनी पुन्हा
शुद्ध स्वरूपात लिहून काढल्या !
भाषाशुद्धीलाही काही मर्यादा आहेत, हे सावरकरांना आणि तिच्या समर्थकांना मान्य होते. भाषाशुद्धीच्या तपशीलाबाबत तिच्या
पुरस्कर्त्यांमध्येही काही बाबतीत मतभिन्नता होती. ज्या कल्पना आपल्याकडे पूर्वी नव्हत्या व ज्यांना प्रयत्न करूनही समर्पक
प्रतिशब्द सुचविता येत नाही किंवा जे परकीय शब्द मराठीने आत्मसात करून, त्यामुळे तिच्या शब्दसंपत्तीत आणि सौंदर्यात
भरच पडली आहे, त्यांच्यासाठी तेच परकीय शब्द वापरण्यास त्यांची हरकत नव्हती.
-------------------------------

भाषाशुद्धीचे तत्त्व बरोबर आहे का नाही हा मूळ प्रश्न आहे.
भाषाशुद्धीला आक्षेप असणार्‍यांनी पुढील फक्त दोनच मुद्द्यांचा विचार करावा.

पहिला मुद्दा :-
१) जे शब्द आपल्या भाषेत नव्हते, ते जसेच्या तसे परकी भाषेतून स्विकारल्यास हळूहळू, ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या न्यायाने,
परकीय शब्दांचे मराठीतील प्रमाण वाढत जाते.
२) आपल्या भाषेत ज्या शब्दांना प्रतिशब्द नाहीत, असेच शब्द परकी भाषेतून येतात असे नाही,
ज्या अर्थाचे शब्द आपल्या भाषेत पूर्वी होते, त्याच अर्थाचे परकी भाषेतील शब्दही, त्या भाषेच्या संपर्काने आपल्या भाषेत
येतात. हे शब्द आपल्या भाषेतील मूळ शब्दांची जागा घेतात. परिणामी मूळ शब्द मागे पडतात वा वापरातून नाहीसे होतात.
३) परकी भाषेतील नुसते शब्दच येत नाहीत तर त्याबरोबर त्या भाषेचे व्याकरणही येते व मूळ भाषेतील व्याकरणाच्या
बाबतीतही (वाक्यरचना, एकवचन-अनेकवचन इ.) अव्यवस्था निर्माण होते.

कोणतीही भाषा म्हणजे तिची शब्दसंपत्ती आणि तिचे व्याकरण.
आपल्या काही उपक्रमबंधूंनी मृत भाषेची व्याख्या केली आहे (त्यांच्या समजुतीप्रमाणे). (ती त्यांच्याच भाषेत त्या
चर्चाप्रस्तावांमध्ये जाऊन वाचावी ). भाषाशुद्धीचा आग्रह न धरता इंग्रजी भाषेतील सर्वच शब्द, ‘जसेच्या तसे’ त्यांना प्रतिशब्द न
बनविता, घेतले गेले असते तर या शब्दांची संख्या फारच वाढली असती. सर्वनामे आणि सहाय्यक क्रियापदे सोडली तर इतर
बहुतेक सर्व शब्द (क्रियापदेसुद्धा) इंग्रजीच वापरले जातील. मग या भाषेला काय म्हणायचे हा प्रश्न निर्माण झाला असता ! ती
धड मराठीही असणार नाही आणि इंग्रजीही ! ‘अशा भाषेपेक्षा इंग्रजीच बोललेली काय वाईट ?’ असे काहीजण म्हणू लागतील !
(किंवा अशी मराठी ही इंग्रजीची एक बोलीभाषाच मानली जाईल !)
आज ‘संस्कृत मृत भाषा आहे’ म्हणून काही जण संस्कृतच्या नांवाने ओरडतात, पण उद्या मराठीच्या नावांने तसे रडण्याची पाळी
त्यांच्यावर येऊ शकते !
....................

दुसरा मुद्दा :-
मराठीत इंग्रजी शब्दांना आज अनेक प्रतिशब्द रुढ झालेले आहेत. भाषाशुद्धीच्या चळवळीनंतर (सुमारे पाऊण शतकात) मराठीत
इंग्रजी शब्दांसाठी जे सर्व प्रतिशब्द निर्माण झाले आहेत, ते सर्व गाळून मूळ इंग्रजी शब्दच मराठीत वापरून, ह्या मराठीची आणि
आज भाषाशुद्धीमुळे प्रतिशब्द रूढ झालेल्या मराठीची, तुलना करुन पहावी. कोणती भाषा क्लिष्ट व कोणती सोपी हे त्यांचे
त्यांनीच ठरवावे.

.... आणि या गोष्टीचा विचार करायला जास्त दूर जायला नको !
इतर संस्थळांचे जाऊ द्या, पण आपण ‘उपक्रम’ चे सदस्य आहात.
‘उपक्रम’वर वेबसाईट(संकेतस्थळ), FAQ (नेहमी पडणारे प्रश्न = नेपप्र.), हेल्प(साहाय्य), न्यू पोस्टस्(नवे लेखन),
पासवर्ड(परवलीचा शब्द), लॉग-इन(येण्याची नोंद), लॉग-आऊट(जाण्याची नोंद), क्लिक्(टिचकी), ग्रुप(समुदाय),
टायपिंग(टंकलेखन,टंकण), यूजर्स(सदस्य), यूजर-नेम(वापरावयाचे नाव), ई-मेल(विरोप), ई-मेल पत्ता(विरोप पत्ता)
होम-पेज(मुख्यपृष्ठ), कॉमेंट(प्रतिसाद), स्क्रॅप-बुक(खरडवही) या शब्दांना प्रतिशब्द वापरले आहेत.

ह्या शब्दांऐवजी मूळ इंग्रजी शब्द वापरणेच एखाद्याला सोपे वाटू शकते, पण एकदा रूळल्यावर व जास्तीत जास्त लोक हे शब्द
वापरू लागल्यावर हेच शब्द सोपे वाटू लागतील !
एका शब्दाला शक्यतो एकाच शब्दात प्रतिशब्द असावा, दोन शब्दांत नको.
या पैकी काही शब्दांना माझ्या अवलोकनात आलेले प्रतिशब्द पुढील प्रमाणे :-
परवलीचा शब्द- पारशब्द, कूटशब्द, कूटाक्षरे
येण्याची नोंद- प्रवेश, आगमन
जाण्याची नोंद- गमन, निर्गमन
वापरावयाचे नांव- सदस्यनाम

-------------------------------
आपला आक्षेप संस्कृतमुळे क्लिष्ट, अगडबंव शब्द निर्माण होतात, म्हणून संस्कृतवरही आहे असे दिसते. इथे फक्त भाषाशुद्धीच्या
विषयापुरता संस्कृतचा विचार करू.(इंग्रजीत सर्वच शब्द सोपे, लहान वा समजण्यास कठीण नसलेले आहेत असे नाही.)

१) ‘संस्कृत ही मृत भाषा आहे’ अशी ओरड केली जाते. ‘संस्कृत म्हणजे पोथ्या-पुराणांची भाषा ! तिचे या विज्ञानयुगात काय
काम ?’ असेही काही लोकांना वाटू शकते.
संस्कृत ही कमीत कमी पाच हजार वर्षांपासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते. जगातील पहिले वाङ्मय संस्कृतमध्ये आहे.
संस्कृतमध्येही कालक्रमानुसार बदल होत गेले असतील, पण आज वेदवाङ्मयाव्यतिरिक्त, बहुतेक ग्रथांमध्ये उपलब्ध असलेली
संस्कृत ही पाणिनींच्या व्याकरणाने नियमबद्ध आहे. पाणिनींचा काळ इ.स.पूर्व ५०० वर्षे (सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीचा) मानला
जातो. आजही पाणिनींचा ‘अष्टाध्यायी’ हा व्याकरणावरील ग्रंथ अत्यंत उच्च प्रतीचा मानला जातो. संस्कृत ही अत्यंत नियमबद्ध
भाषा असल्याने संगणकविज्ञानात ती उपयुक्त ठरु शकेल असे तज्ज्ञांचे मत आहे.
विज्ञानाच्या ज्ञानशाखांमध्ये दररोज नवनवीन शब्दांची भर पडत जाते. असे असूनही काव्य, तत्त्वज्ञान यांच्या बाबतीत समृद्ध
असलेल्या, जगातील सर्वात प्राचीन भाषांपैकी एक असलेल्या संस्कृतमध्ये, या शब्दांना समर्पक प्रतिशब्द बनविण्याची अद्भुत
क्षमता आहे, हे आश्चर्यच नव्हे का ? ही एकच गोष्ट संस्कृतची तिचे या विज्ञानयुगातील स्थान, महत्त्व सिद्ध करीत नाही काय ?
परकी शब्दांच्या आक्रमणापासून स्वतःचे अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी व इंग्रजी भाषेच्या बोलीभाषा म्हणवल्या न जाण्यासाठी
मराठी व इतर भारतीय भाषांना संस्कृतचा आसरा घेणे भाग आहे. जी भाषा दुसर्‍या भाषांना नवजीवन देऊ शकते ती स्वतः मृत
कशी काय ठरू शकते ? अशा संस्कृतवर ‘मृत भाषा’ असा प्रथमदर्शनी खरा वाटणारा आक्षेप घेतला जाण्याजोगी तिची परिस्थति
व्हावी हे कर्तृत्व कुणाचे ? आपलेच नाही का ?
२) संस्कृत व इंग्रजी यांना एकाच मापाने मोजणे चूक आहे. संस्कृत ही काही आपल्याला परकी नाही. बहुतेक भारतीय भाषांची
उत्पत्ती संस्कृतपासून आहे किंवा संस्कृतचा त्या भाषांवर सांस्कृतिक, भाषिक प्रभाव आहे. मराठी, हिंदी, तमिळ इ. भाषांची
आपआपसांत स्पर्धा आहे असे आपण म्हणू शकतो, पण संस्कृतची व इतर भारतीय भाषांची स्पर्धा नाही. दक्षिण भारतीय
भाषिकांमध्ये हिंदीबद्दल आकस असला तरी संस्कृतबद्दल प्रेमच आहे.
३) भारतीय भाषांतील बरेच शब्द संस्कृतातून आलेले वा त्यांचा अपभ्रंश होऊन आलेले आहेत.
इंग्रजी शब्दांना प्रतिशब्द बनविताना (प्रामुख्याने वैज्ञानिक परिभाषेसाठी) सर्व भारतीय भाषांसाठी सामाईक प्रतिशब्द-कोश
बनविण्याची विवेकी दृष्टी ठेवली तर एकच प्रतिशब्द अनेक भारतीय भाषांमध्ये वापरला जाऊ शकतो व त्या भाषांतील प्रतिशब्द
शिकण्यासाठी वेगळे परिश्रम करावे लागणार नाहीत. समान प्रतिशब्द असल्याने त्या भाषा शिकणे वा समजणे अधिक सोपे
होईल.
-------------------------------

.. आपला आक्षेप नक्की कशाबद्दल आहे ? भाषाशुद्धीच्या मूळ तत्त्वांबद्दल की क्लिष्ट, बोजड, समजण्यास कठीण प्रतिशब्दांबद्दल ?
आपल्याला जर भाषाशुद्धीचे तत्त्व मान्य असेल तर मग वादाचा मुद्दा नाहीच.

सुरुवातीला ज्या शब्दांना प्रतिशब्द नाहीत त्यांना मोठे वा कठीण वाटणारे शब्द सुचविले जाणे स्वाभाविक आहे.
पण हळूहळू साधे व समर्पक असे अनेक प्रतिशब्द रूढ होतात व कठीण शब्द मागे पडतात. शब्द सोपे वा कठीण हे ते शब्द
किती रुळलेले आहेत ते ठरवितात. या बाबतीत सोपे-कठीण अशी व्याख्या करावयाची म्हणजे शब्द जितके जास्त रुळलेले
तितके ते सोपे व जितके कमी रुळलेले तितके ते कठीण. आज मराठीत असे अनेक प्रतिशब्द रूळलेले आहेत.
भाषेतील प्रचलित परकी शब्दांना प्रतिशब्द सुचविणे व त्यांचा प्रचार करून ते लोकांच्या दैनंदिन व्यवहारात रूळविणे हे
हे काही एका वा काही व्यक्तींचे काम नव्हे. एका व्यक्तीच्या कार्यशक्तीला मर्यादा असते. एका व्यक्तीनेच सर्व कार्य केले पाहिजे
अशी अपेक्षा चूक आहे. प्रतिशब्द बनविताना सुबोध, अल्पाक्षरी आणि अर्थवाही शब्द बनविले जावेत याकडेच भाषाशुद्धीवाद्यांचा
कटाक्ष असावा. पण प्रत्येक वेळी हे शक्य होतेच असे नाही. साधे, सोपे, अल्पाक्षरी प्रतिशब्द जर सुचविता आले असते तर कुणी
क्लिष्ट, बहुअक्षरी शब्द सुचविले असते का ? विज्ञान, कायदा या क्षेत्रांत मूळ शब्दाचा निश्चित आणि असंदिग्ध अर्थ प्रकट
करावयाचा म्हणजे कधीकधी क्लिष्ट शब्द बनवावे लागतात.
भाषाशुद्धीवाद्यांना जर हे जमत नसेल आणि आपल्याला भाषाशुद्धीचे तत्त्व मान्य असेल तर आपण सोपे आणि समर्पक शब्द
बनवून दाखवा. मराठी भाषेची काळजी करणे हे आपलेही कर्तव्य ठरते. नुसते हसणे आणि टीका करणे फार सोपे आहे.
-------------------------------
भाषाशुद्धीचे यशापयश व सावरकर
सावरकरांच्या भाषाशुद्धीचे हसे झाले आहे हे बोलणे अतिशयोक्तीचे आहे. भाषाशुद्धी जेवढी व्हायला हवी तेवढी झाली नाही यात
सर्वसामान्य माणसाचाही दोष आहे. भाषाशुद्धीचे यश संमिश्र आहे. लोकसभा, राज्यसभा, संसद, विधानसभा, विधानपरिषद,
विधीमंडळ, घटना, विधी, राष्ट्रपती, राज्यपाल, नगरसेवक, महापौर, महानगरपालिका, नगरपालिका, विश्वस्त यासारखे कितीतरी
प्रतिशब्द हे इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द आहेत असे न वाटण्याइतके रूळेलेले आहेत. चित्रपट, दूरचित्रवाणी, वृत्तपत्र,
वाचनालय, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षण हे प्रतिशब्द नाहीत मग काय आहेत ?
महाराष्ट्र शासनाने सन १९६० मध्ये भाषा संचालनालयाची स्थापना केली म्हणजे तात्त्विकदृष्टया भाषाशुद्धीचे तत्त्व मान्य केले.
दहावीपर्यंतची शासकीय विज्ञानाच्या पाठ्यपुस्तके परिभाषिक संज्ञा वापरूनच लिहिलेली असतात. ‘दूरदर्शन’, ‘आकाशवाणी’ ही
सरकारी प्रसारमाध्यमांची नावे काय सुचवितात ?
सावरकर आणि राज्यकर्ते — मग ते स्वकीय असोत वा परकीय — दोघेही नेहमीच दोन ध्रुवांची दोन टोके राहिलेली आहेत.
तरीही शासकीय पातळीवर भाषाशुद्धी मान्य झालेली आहे. हा सावरकरांच्या भाषाशुद्धीचा विजय नाही मग कोणाचा आहे ?
-------------------------------

भाषेचा संबंध सर्व समाजाशी असतो. अर्थात् भाषाशुद्धी चळवळ ही सर्वांची आहे अणि सर्वांचा तिला हातभार लागला तरच ती
यशस्वी होऊ शकते. विज्ञान, राजकारण, इतिहास इ. ज्ञानशाखांमध्ये पारिभाषिक संज्ञाकोश बनवून प्रतिशब्द अमलात आणणे
एवढ्यापुरतीच भाषाशुद्धी मर्यादीत नाही. सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनातील संबंधित सर्वच गोष्टींत ती अमलात आली
पाहिजे. हल्ली संगणकक्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे हे क्षेत्र समाजजीवनाचे एक अविभाज्य अंग होऊ पाहत आहे.
यातील अनेक इंग्रजी शब्द सर्वसामान्य माणसाच्या जीवनात रूळले आहेत. या क्षेत्रातील परकी शब्दांसाठी प्रतिशब्द बनविण्याचा
प्रामुख्याने विचार केला पाहिजे.

लहान मूल हे अनुकरणातून शिकते. सर्वसामान्य समाजाच्या बाबतीतही हे खरे आहे.
सर्वसामान्य माणूस कुणाच्या भाषेचे अनुकरण करतो ?
लेखकांनी लिहिलेली पुस्तके, पत्रकार, वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी, जाहिराती, आकाशवाणी यांची भाषाच सर्वसामान्य माणूस आत्मसात
करत असतो. या लोकांनी भाषाशुद्धीचे तत्त्व स्वीकारून ती आचरणात आणली तरच सर्वसामान्य माणसाची भाषा सुधारू शकते.
भाषाशुद्धीचा व्हावा तेवढा प्रसार झाला याची कारणमीमांसा करताना ‘सर्वसामान्य माणूस नेहमी बरोबरच असतो आणि तो नेहमी
योग्य तेच करतो’ असा केला जाणारा तर्क निराधार आहे.
आज मराठी शाळा बंद पडत आहेत. मराठी पालक मुलांना इंग्रजी शाळांमध्ये घालत आहेत. इंग्रजी माध्यमातील मराठी मुलांना
धड एक वाक्यही शुद्ध मराठीत बोलता येत नाही. आज मराठीचेच हसे होण्याची वेळ आली आहे ! याला जबाबदार कोण ?
मराठी माणूसच ना ?
ज्या शब्दांना मराठीत समर्पक प्रतिशब्द नाहीत वा ते वापरणे अवघड वाटते, त्यांच्याऐवजी जर इंग्रजी शब्द वापरले तर ते
एकवेळ समर्थनीय ठरेल, पण दैनंदिन जीवनातील उठणे, बसणे, वाचणे या क्रियांसाठीही मातृभाषेऐवजी दुसर्‍या भाषेतील शब्द जे
लोक वापरतात, त्यांनी कुणावर हसावे हाच एक प्रश्न आहे !

या विषयावरील एक मननीय लेख ‘लोकसत्ता’च्या संस्थळावर वाचनात आला. त्याचा दुवा खाली देत आहे.
http://www.loksatta.com/daily/20030501/raj01.htm
-------------------------------

पदनाम कोश
माझ्या माहितीप्रमाणे ‘पदनाम कोशा’मध्ये अशा स्वरुपाचे काही प्रतिशब्द असल्याने आचार्य अत्रे यांनी त्याची, ‘पदनाम कोश हा
बदनाम कोश आहे’ अशी चेष्टा केली होती. हैद्राबाद साहित्य संमेलनात सरकारने तयार केलेल्या या कोशाचा निषेध करण्याचा
ठराव मांडण्यात आला, तेव्हा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना ‘हा बदनाम कोश नसून शुभनाम कोश आहे’ असे त्यांचे साधार
खंडन केले होते. उथळ भूमिकेवरुन या गोष्टींची चर्चा करता येणार नाही. (संदर्भ:‘सभेत कसे बोलावे ?’- ले. माधव गडकरी, पृष्ठ
क्र.१०३-१०४)
-------------------------------

सावरकर
.. ‘सावरकरी प्रयत्नांचे हसू झाले’ हे विधान वस्तुस्थितीला धरुन नाहीच, पण सावरकरांच्या बाबतीत उथळपणे असले शब्दप्रयोग
करणेही योग्य नाही. सावरकर ही हसण्यावारी नेण्याजोगी गोष्ट नाही. आपल्याला ‘त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत/हे शब्द
लोकांनी स्विकारले नाहीत’ असेही म्हणता आले असते(अर्थात् आपल्या समजुतीप्रमाणे).

लेखनविषय: दुवे:

Comments

प्रतिभा

सावरकरांनी निर्माणे केलेले शब्द सहजपणे रूळले याचे कारण तसे शब्द तयार करण्यासाठी लागणारी प्रतिभा त्यांच्याकडे होती. इंग्रजीमध्ये हेच काम शेक्सपिअरने फारच मोठ्या प्रमाणात केले. (~ १७०० शब्द)
यासंबंधी काही रोचक दुवे.

दुवा १

दुवा २

----

मानतोच! त्याबाबत दुमत नाही

स्वा. सावरकरांच्या विचारसरणी विषयी मतभेद असू शकतील. पण त्यांनी मराठी भाषेला जे नवीन शब्द दिले, असे शब्द निर्माण करण्याची जी दृष्टी दिली, त्यासाठी समस्त मराठीभाषाप्रेमींनी त्यांचे ऋण मानलेच पाहिजे.

१०१% मान्य. या चर्चेत विरोधी सूर काढणार्‍यांनाही सावरकरांची महती मान्यच असावी. कदाचित त्यांचे म्हणणे असे असावे की सावरकर लाखांत एकमेव होते तरी आताच्या काळात ज्याने त्याने उठून स्वतःला सावरकर मानू नये. = ह. घ्या.

प्रियालीताई....

तरी आताच्या काळात ज्याने त्याने उठून स्वतःला सावरकर मानू नये.

म्हणजे नक्की काय करू नये ? आमच्यासारख्या सावरकरांच्या ‘‘भोळ्याभाबड्या’’ भक्तांना सांगता का जरा ?

(आपला मानलेला भाऊ) उपमन्यू

 
^ वर