कोल्हापुरात होणारा विश्वशांती यज्ञ रद्द केला जावा.
कोल्हापुरात नोव्हेंबर महिन्यात विश्वशांती यज्ञ होऊ घातला आहे। त्यात ३० लाख रूपयांचे तूप, १६ लाख रूपयांचे तीळ व इतर अनेक खाद्यपदार्थ जाळले जाणार आहेत (एकूण दोन कोटी रूपयांचा खर्च) देशात लाखो लोक उपाशी असताना खाद्यपदार्थांचा असा नाश करणे चुकीचे व अनैतिक आहे. टनावारी लाकूड जाळले जाणार आहे. हा निसर्गसंपत्तीचा नाश आहे. अशा यज्ञाने विश्वशांती होत असती तर रामायण, महाभारत काळापासून युद्धे व मानवसंहार झालाच नसता.
अशा यज्ञामुळे होणार आहे तो केवळ कोट्यवधी रूपयांचा धूर तसेच हवेचे व संस्कृतीचे प्रदूषण. त्याऐवजी हाच पैसा समाजातील उपेक्षित वर्गाच्या कल्याणासाठी वापरला तर खरे पुण्यकर्म होईल.
परंतु आपला स्वार्थ साधण्यासाठी अशा कर्मकांडाचे भूत समाजाच्या मानेवर बसवले आहे. धर्मातील जगाच्या कल्याणाची मूळ तत्त्वे बाजूला ठेवून निरर्थक कर्मकांडालाच महत्त्व दिले आहे. खोट्या धर्माभिमानाच्या अफूच्या गोळीच्या प्रभावाखाली समाज या स्वार्थी कारस्थानाला पिढ्यानपिढ्या बळी पडलेला आहे. अनेक समाजसुधारकांनी याविरूद्ध जागृती केली. तरीही आपले महत्व टिकविण्यासाठी असले उपद्व्याप केले जातात.
जगभरातील सर्व सुजाण नागरिकांनी या विश्वशांती यज्ञाच्या थोतांडाला सर्वशक्तीनिशी विरोध करावा व तो रद्द करण्यास भाग पाडावे.
Comments
सहमत
कोल्हापुरांत होणारा विश्वशान्ति यज्ञ रद्द केला जावा या प्रस्तावाला माझा पाठिंबा आहे.
रद्द करावा पण..
+१
कोल्हापुरांत होणारा विश्वशान्ति यज्ञ दिलेल्या कारणास्तव रद्द केला जावा या प्रस्तावाला माझा पाठिंबा आहे.
मात्र जर यज्ञहि रद्द होणार असेल आणि यज्ञ रद्द झाल्याने माल(धान्य+पैसा) फक्त आयोजकांच्या घरात (घशात) जाणार असेल तर यज्ञ परवडला असे म्हणायची पाळी येऊ नये.
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
+१
मात्र जर यज्ञहि रद्द होणार असेल आणि यज्ञ रद्द झाल्याने माल(धान्य+पैसा) फक्त आयोजकांच्या घरात (घशात) जाणार असेल तर यज्ञ परवडला असे म्हणायची पाळी येऊ नये.
सहमत आहे.
----
कोण करत आहे?
हा यज्ञ कोण करत आहे? आयोजक-प्रायोजक कोण? लाखोंचे तूप आणि तीळ हे जरा अतिशयोक्त वाटले. तूप आणि तिळासह इतर सामग्रीही लागत असावी. यज्ञाच्या निमित्ताने ब्राह्मण(?)भोजनही असावे. इतका सर्व पैसा ज्या लोकांकडे देणगी म्हणून मागितला जाईल त्या लोकांनी ना करावी की अर्धा प्रश्न तिथेच मिटला.
असो, जरा अधिक खुलासेवार आणि जमल्यास संदर्भासह माहिती दिल्यास बातमी विश्वासार्ह वाटावी.
ब्राह्मण भोजन
>>यज्ञाच्या निमित्ताने ब्राह्मण(?)भोजनही असावे.
हा उल्लेख असंबद्ध वाटला. 'ब्राम्हण (?) भोजन असेलच की' असे खवचटपणे म्हणून आपला ब्राम्हण्द्वेष दाखवलेला दिसला.
मला काही कुठल्या जातीचा अभिमान वगैरे नाही पण सार्वजनिक ठिकाणी असे (कुठल्याही) जातीवाचक खवचट उल्लेख येऊ नयेत अशी येथील व्यवस्थापनाने काळजी घ्यावी असे वाटते.
लक्ष
तुमचे प्रत्येक प्रतिसादावर बारीक लक्ष दिसते. फक्त इथेच की सगळीकडे? :)
----
वाचावं तसं दिसतं
कोणत्याही धार्मिक कार्यात ब्राह्मणांना दक्षिणा देणे, भोजन देणे ही प्रथा आहे. निदान आम्हाला तरी (जात ब्राह्मण असल्याने) सणसमारंभाला ब्राह्मण म्हणून जेवा खायला बोलावल्याचे आठवते. अगदी आजउद्याचीच गोष्ट सांगायची तर उद्या अमेरिकेतही एकीकडे हवनानंतरच्या भोजनाचे आमंत्रण आहे. हल्ली फक्त ब्राह्मणांनाच न बोलावता सरसकट सर्वांना बोलवत असावेत म्हणून ब्राह्मणांपुढे प्रश्नचिन्ह दिले आहे.
हा यज्ञ तर थांबवाच
पण त्याच बरोबर अमिताभ बरा व्हावा म्हणून केले जाणारे यज्ञ पण कोणीतरी थांबवाल का?
कोल्हापुरातील विश्वशांती यज्ञाबद्दल अधिक माहिती.
उदंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
या यज्ञाचे मुख्य संयोजक - चित्रकूट येथील रामकुंडल शुक्ल महाराज.
स्थानिक संयोजक - शरद मुनिश्वर, रवी घाटगे, सुशील कोरडे,
कालावधी - २ ते १३ नोव्हेंबर २००८
स्थळ - म.गांधी मैदान, वरूणतीर्थ वेस, शिवाजी पेठ, कोल्हापूर.
हवनासाठी लागणारे इतर मुख्य पदार्थ - तूप, तीळ, जव, तांदूळ, बेलपत्र, कमलपुष्प
अधिक माहितीसाठी सोमवार दि.६ ऑक्टोबर २००८ च्या दै.सकाळ (कोल्हापूर) च्या टुडे पुरवणीतील १ व २ क्रमांकाची पाने वाचावीत. ती स्कॅन केलेली आहेत. इच्छुकांना इ-मेलद्वारे पाठवता येतील.
स्थानिक वृत्तवाहिनी व वृत्तपत्रांनी या विषयाची नोंद घेण्यास सुरवात केली आहे.
या निमित्ताने गोळा केलेली सामग्री (जर गोळा केलीच असेल तर) संबंधितांच्या घशात जाण्यापेक्षा गोरगरीब, गरजू विद्यार्थी, वृद्धाश्रमातील वृद्ध यांच्या मुखात जाऊ शकते.
या विषयाला ब्राह्मण भोजन वगैरे वेगळे फाटे फोडू नयेत ही कळकळीची विनंती. खाद्यपदार्थांचा नाश, मग तो कोणीही केला असो, तितकाच निंदनीय आहे, असावा.
चर्चा पुढे सुरू ठेवावी.
धन्यवाद
यज्ञ - धर्म - दान
याच सोबत तो कोणत्याही प्रकारे केलेला असेल तरिही निंदनीय असावा ना?
चर्चा प्रसिद्धीसाठी जास्त वाटते. मुद्दे मांडले तर धार्मिक वादाचा रंग चढेल, त्यामुळे मुद्दे मांडणे टाळत आहे. पण एक मुद्दा कळकळीने मांडावासा वाटतो की कोल्हापूर सारख्या शहरात असे अनेक प्रश्न आहेत जिथे लक्ष घालणे गरजेचे आहे. हे असे मुद्दे प्रसिद्धीसाठी जास्त वाटतात. याच धर्तीवर जात-धर्म संमेलने सुद्धा कायदेशीररित्या बंद करावीत असे वाटते. गरिबांची काळजी इंटरनेटवर चर्चा करुन नक्कीच कमी होणार नाही. असा विरोध करण्या ऐवजी कोल्हापूरात असाच धनधान्य संकलन उपक्रम करा. खास गरीबांसाठी. त्यासाठी चर्चा का नाही सुरु केलीत? दानशूर नागरिक यज्ञापेक्षा या कारणासाठी नक्कीच दान करतील.
अवांतर
ह्यावरून आठवले, बोरीवलीला मंडपेश्वर गुंफेत व कल्याणला दुर्गाडी किल्ल्यावर दर त्रिपुरारी पौर्णिमेला पणत्यांची सुंदर आरास केली जाते. त्यासाठी स्वयंसेवक / स्वयंसेविका १५ दिवस आधीपासून घरोघरी हिंडून वाटी वाटी तेल गोळा करतात. ह्यामुळे नागरिकांना सुद्धा हे उत्सव आपले वाटतात. सध्याच्या उत्सवासाठी खंडणी मागण्याच्या काळात हे नवल विशेषच.
एव्हढेच नव्हे तर मा. एकनाथजी रानडे ह्यांनी घरटी रु. १ गोळा करून कन्याकुमारीला विवेकानंद स्मारक बांधले.
श्रीयुत चाणक्य ह्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. देणार्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी...
यज्ञ संकल्पना आणि आधुनिकता
'यजन' संकल्पना सर्व लोकांनी एकत्र येऊन भरपूर खावे, 'प्यावे'(सोमरस), आनंद करावा, (शिवाय यज्ञवेदीजवळ उघडपणे युवाकृत्य करावे) या वेदपूर्वकालीन आदिम जमातीच्या प्रारंभीच्या कल्पनातून निर्माण झाली आहे.
पुढे पौराणिक कालात याच संकल्पनेत दानाची भर पडून राजाने अथवा धनिकाने आपल्याकडील सर्व स्थावर-जंगमाचे सामान्य लोकांना दान करावे ही कल्पना आली. ब्राह्मण जेव्हा खरोखरीच ब्राह्मण भिक्षू होते (ते केवळ ज्ञानदानाचे कार्य करीत आणि केवळ गुरुदक्षिणा आणि भिक्षा यांवर गुजार करीत त्यावेळी_) त्यांना या दानधर्मात अग्रक्रम मिळावा अशी योजना होती. परंतु या प्रथेचा अनिष्ट फायदा घेऊन त्यांनी समाजाचे ब्रेनवॉशिंग केले आणि ब्राह्मणाला केलेले दानच फक्त पुण्यप्रद असते अशा खुळचट कल्पना धर्मग्रंथांच्या तपशीलात घुसडल्या. सर्वसामान्यपणे याचा प्रचंड आर्थिक फायदा ब्राह्मणांना झाला, तोटा निम्नज्ञातीयांना झाला आणि समाजात जातीभेदाबरोबरच वर्गभेदही निर्माण झाला.
आजच्या काळात यज्ञाचे स्वरूप पूर्णपणे बदलून जमा केलेल्या धनराशीचा (एखादा ट्रस्ट करून) गरीब जनतेसाठी विनियोग झाला तर खरोखर विश्वशांती, समाजशांती, व्यक्तीशांती,समष्टीशांती इ.इ. होईल.
अशाप्रकारचे ज्ञानयज्ञ, वनस्पतीयज्ञ, शुद्धीयज्ञ, रथयज्ञ इ.इ. यज्ञ अनुक्रमे शिष्यवृत्ती, वनसंवर्धन, ग्रामस्वच्छता,रस्तेबांधणी यांसाठी निधी उभारण्यासाठी करता येतील.
नाहीतर विश्वशांती यज्ञात जाळण्यासाठी समिधा, तूप, हवि, तीळ कशाला हवेत? सरळ नोटाच जाळाव्यात!!! नाहीतरी आर्थिक मंदी आल्यावर त्यांची किंमत सरपणाइतकीच राहणार आहे.
(कोणत्याही जातीवर टीका करण्याचा हेतू नाही. जे सत्य आहे तेच लिहिले आहे.)
या यज्ञातील खाद्यपदार्थांच्या नाशाचा मूळ मुद्दा बाजूला पडतोय.
चर्चेचा मूळ मुद्दा हा आहे की, दोन कोटी रुपयांचे बजेट असलेल्या विश्वशांती यज्ञातील लाखो रूपयांच्या खाद्यपदार्थांना अग्निसमर्पित करणे हे सर्वथा चुकीचे व अनैतिक आहे.
यज्ञ व इतर धार्मिक कृत्यांचा वैज्ञानिक दृष्टीने उहापोह करणे हा महत्त्वाचा परंतु वेगळा व व्यापक विषय आहे. दोन्हींची गल्लत कळत नकळत केली जाते व चर्चेला वेगळे वळण लागते किंवा लावले जाते.
मूळ मुद्द्याला दिलेल्या पाठींब्याबद्दल सर्वांचे आभार. असाच लोभ रहावा.
आर्य चाणक्य यांनी म्हटले आहे की,
-१- चर्चा प्रसिद्धीसाठी जास्त वाटते.
माझे उत्तर - लाखो रूपयांचे मौल्यवान खाद्यपदार्थ जाळून टाकले जाणे व त्याचे विश्वशांती वगैरे उदात्तीकरण करणे या ढोंगाची प्रसिद्धी होणे व त्याद्वारे जनजागृती होणे गरजेचे आहे. कोणीही सुसंस्कृत माणूस याला विरोधच करेल. आर्य चाणक्य यांनी या मूळ मुद्याला का विरोध केला नाही?
-२- असा विरोध करण्या ऐवजी कोल्हापूरात असाच धनधान्य संकलन उपक्रम करा. खास गरीबांसाठी. त्यासाठी चर्चा का नाही सुरु केलीत? दानशूर नागरिक यज्ञापेक्षा या कारणासाठी नक्कीच दान करतील.
माझे उत्तर - ज्या व्यक्तींना अन्नदान वगैरे प्रकारचा दानधर्म करायचा असतो, ते व्यक्तीगत पातळीवर करतात. किंवा अनेक सामाजिक संस्था कायमस्वरूपी असे कार्य करीत असतात. वृत्तपत्रांचे रिलिफ फंडही संकटकाळात समाजकार्य करीत असतात. त्यांच्यामार्फतही आपले व्यक्तीगत योगदान देता येते. त्यात नवीन काही नाही.
-३- कोल्हापुरात इतर अनेक प्रश्न आहेत.
माझे उत्तर - नक्कीच आहेत. सर्वच शहरांप्रमाणे कोल्हापुरातही अनेक समस्या आहेत. पण त्यामुळे या विश्वशांती यज्ञ थोतांडाचे गांभीर्य कमी होत नाही. इथे म्हातारी मेल्याचे दुःख आहेच. पण कर्मकांडरूपी काळ अधिक सोकावतो व तो अनेकांच्या विवेकबुद्धीचा बळी घेतो. या विरूद्ध जनजागृती होणे आवश्यकच आहे.
तात्पर्य, मूळ मुद्दा सोडून चर्चा भलतीकडे भरकटवू नये. ते सर्वांच्या लक्षात येतेच.
ह्म्म्म्म..
या चर्चेला वेगळी दिशा मिळू नये अथवा भरकटू नये म्हणूनच विस्तृत प्रतिसाद टाळला आहे. माझी एक विनंती आहे. की अन्न, उर्जा यांची नासाडी हा जर मुख्य विषय आहे तर ते विषय योग्य प्रकारे मांडावेत व विधायक कार्य करावे. एखाद्या गोष्टीला विरोध करून हे साध्य होणार नाही.
काही गोष्टींची नासाडी होऊ नये म्हणून आम्हाला काही गोष्टी अशाच मांडाव्याश्या वाटतात.
असो, या शिवाय आणखी काही मुद्दे आहेत जिथे, अन्न उर्जा वाचवली जाऊ शकते, तिथे कोल्हापूर हा मुद्दा बाजुला ठेवू.
हिंदू धर्मात मृत्यु नंतर प्रेत जाळले जाते. त्यासाठी लागण्यार्या पदार्थांचे काय? ती नासाडी नाही का? आता हिंदू पद्धत सोडा, प्रेत पुरणे हे भारतीय लोकसंख्येच्या दृष्टीने परवडणारे आहे का? भविष्यात प्रेतासाठीची जागा सुद्धा ५००० रु. प्रति स्क्वे. फुट वगैरे दराने आधीच काही वर्षे घेऊन ठेवावी लागेल. जागेचा काळाबाजार होईल त्याचे काय?
सर्वात शेवटी: मी यज्ञाचे समर्थन केलेले नाही. माझे म्हणणे एवढेच आहे की या प्रकाराला तुम्ही नासाडी म्हणून एक रंग देत आहात. पण त्याच वेळी भारतभर होणारी नासाडी जी प्रत्येक घरापासून सुरु होते त्या बद्दल काहीच बोलत नाही अथवा हात झटकता आहात. तुमचा विरोध या यज्ञाला दिसतो आहे. मला हे मुद्दे राजकिय वाटतात. प्रथम नासाडी म्हणून गरिबांच्या भावनांना हात घालायचा, मुद्दा तापला की मग त्याला धार्मिक रंग, आधिक तापला की जातीय रंग. या रंगपंचमीमध्ये मग हात कसे धुवायचे हे प्रत्येक राककिय पक्षाला चांगलेच माहित असते. या पेक्षा तुम्ही हा खर्च कमी करण्यावर आणि नासाडी कमी करण्यावर भर द्या. जे लोक हा यज्ञ करणार आहेत त्यांची अधिकृत मते येथे मांडा. जर मुद्दा खर्च आणि नासाडीचा आहे तर यज्ञ रद्द कशाला? त्याचे स्वरुप बदला. खर्च कमी करायला लावा. नासाडी होणार नाही याची काळजी घ्या. जनतेच्या अन्नाचा आणि पैशाची एवढी कळकळ असेल तर धर्माच्या नावाखाली दिल्या जाणार्या यात्रांच्या भरघोस मदतीं विरुद्धा आवाज उठवा. जिथे रोजच्या संघर्षाची जाणीव लोकांना आहे तिथे फक्त कर्मकांडासाठी विवेकबुद्धी बाजुला ठेवणारे लोक असतील यावर माझा तरी विश्वास बसत नाही.
जाता जाता: वृत्तपत्रांचे रिलिफ फंड वगैरे, पगारातुन सक्तिने जाणारा निधी वगैरे नक्की कुठे जातो हे सर्वांना कळते. महापुर बिहारात आला तसा महाराष्ट्राच्या नाशकात पण आला होता. त्यावेळी कुठे गेला हा दानधर्म? गरजु माणूस हा गरजु माणूनस आहे, तिथे मग जात, धर्म, राज्य असे निकष का लावले जातात?
तात्प्रर्य, चर्चेचा मूळ उद्देश आधी स्वतःला समजावून घ्या. (यज्ञ नको? की नासाडी नको?) व्यासपीठ मिळाले म्हणून उगाचच भलती आरोळी ठोकण्यात काही एक अर्थ नाही.
व्यक्तिगत चर्चा करायची असल्यास व्य. नि. अथवा खरडवहीचा वापर करावा ही नम्र विनंती.
पुन्हा तेच?
आर्य चाणक्य यांच्या काही मुद्यांशी मी सहमत आहे.
माझा विरोध यज्ञाला आहेच पण विशेषतः या यज्ञाला जास्त आहे कारण त्यामध्ये होणारा खाद्यपदार्थांचा प्रचंड नाश. याबाबतीत माझा वैचारिक गोंधळ अजिबात नाही.
आर्य चाणक्य यांनी यज्ञाचे समर्थन केले नसेल पण विरोधही केलेला नाही. इतर मुद्दे मांडून ते दिशाभूल करू इच्छितात.
उदाहरणार्थ -
मधल्या काही दशकांमध्ये जेवढ्या निवडणुका झाल्या, त्यावर झालेला पैसा किती? तो पैसा विधायक कार्यासाठी / विकास कामासाठी वापरता आला नसता काय?
कोल्हापूरातल्या सहकारराज मध्ये जेवढा पैसा वाहतो आणि मुरतो, तो सामाजिक विकासासाठी का वापरला जात नाही?
महालक्ष्मी मंदिरावर जेवढा खर्च केला जातो तो योग्य आहे का?
रंकाळ्याचे सुशोभीकरण गरजेचे होते काय?
वगैरे, वगैरे, वगैरे......
या सर्व मुद्द्यांवर स्वतंत्र चर्चा होऊ शकते. पण मूळ मुद्द्याचे उत्तर जसे बाकीच्यांनी ठाम प्रतिपादन केले व विरोध केला तसे आर्य चाणक्य यांनी केलेले नाही.
आता वरील मुद्द्यांबाबत.
१. निवडणुका कोणी लादल्या, कोणी कोणाचा पाठींबा काढून घेतला, कोणी धार्मिक भावना भडकावल्या वगैरे राजकीय चिखलफेकीत मला यावेळी अजिबात रस नाही.
२. सहकारातला मुरलेला पैसाच दिसतो. त्याने झालेली विकासकामे दिसत नाहीत हा दृष्टीदोष अनेकांना आहे. असो. साधे उदाहरण - कोल्हापुरात (दक्षिण महाराष्ट्रात) दूधव्यवसायामुळे असंख्य संसार जगवले गेले. महिला बचतगटांनी असंख्य भगिनींना स्वक्षमतेची जाणीव करून दिली. इथे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण नगण्य आहे. हे श्रेय सहकाराचेच आहे. अपप्रवृत्ती इतर क्षेत्रांप्रमाणे यातही आहेत. पुण्याची सुवर्ण सहकारी बँक, साताऱ्याची युनायटेड वेस्टर्न बँक, कोल्हापुरातील मानिनी व भुदरगड पतसंस्था "कोणी" बुडवल्या हे सर्वांनाच ठाऊक आहे. असो. चटणी भाकरी खाणाऱ्यांनी उभारायचे आणि श्रीखंडपुरी खाणाऱ्यांनी बुडवायचे हे महाराष्ट्राला नवीन नाही.
३. महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिरावरील खर्चातील अनावश्यक बाबींचा तपशील आर्य चाणक्य देतील काय? याबाबत त्यांनी प.महाराष्ट्र देवस्थान कमिटीशी काही संवाद साधला आहे काय? की व्यासपीठ मिळाले म्हणून उगाचच भलती आरोळी ठोकत आहेत?
४. रंकाळ्याचे सुशोभीकरण काही प्रमाणात आवश्यक होते. पर्यावरणाला बाधा आणणाऱ्या गोष्टींबद्दल पर्यावरणप्रेमी संघटना व इतर लोक संघर्ष करीत आहेत.
५. प्रेत पुरण्यासाठी जागा मिळणार नाही असे कसे म्हणता. विशिष्ट कालावधीनंतर तीच जागा दुसऱ्या प्रेतासाठी वापरता येते.
६. सामान्य माणसाच्या रोजच्या संघर्षातही मागे लावलेले कर्मकांडाचे पिशाच्च सुटत नाही. म्हणून तर देवस्थानांच्या ठिकाणची गर्दी वाढत आहे. (त्यामुळे रस्त्यावरच्या अपघातांची संख्याही वाढत आहे.) नारायण नागबळी वगैरेंचे विधींचे प्रमाण वाढत आहे. असले प्रकार सुचवणाऱ्या व करवून घेणाऱ्या वर्गाची चांदी होत आहे.
७. यज्ञाबाबत विसूनाना यांनी मौलिक माहिती पुरवली त्याबद्दल त्यांचे आभार. आर्य चाणक्य यावर काही भाष्य करतील काय?
८. मला याबाबत जाहीर चर्चाच करायची आहे. कारण या महत्त्वाच्या विषयाबद्दल प्रत्येकाची अनुकूल व प्रतिकूल मते असतात. ती प्रकट होऊ देत असे वाटते.
पुन्हा एकदा तात्पर्य, मूळ मुद्दा सोडून चर्चा भलतीकडे भरकटवू नये. ते सर्वांच्या लक्षात येतेच.
म्हणून विश्वशांती यज्ञाचे एकतर समर्थन करा किंवा विरोध करा. बुळबुळीत मुद्दे मांडून गुळमुळीत भूमिका घेऊ नका.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
कोल्हापुरी मसाला = नाद खुळा !
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
कोल्हापूरी
आम्ही कोल्हापूरी, तुम्ही यज्ञ आणि नासाडी या दोन गोष्टींचा वेगळा विचार करावा अशी माझी नम्र विनंती आहे. एकुण तुमच्या प्रतिसादावरून असे दिसते की कोल्हपूरच्या काही मुद्यांवर बोट ठेवल्याने तुम्ही नाराज झाला आहात. हि चर्चा यज्ञ आणि नासाडी या संबंधीत आहे. त्यामुळे येथे जास्त मुद्दे मांडणे योग्य नाही. वाटल्यास खरडवही वापरा.
यज्ञ हा धार्मिक विधी आहे आणि अन्न पदार्थांची नासाडी हा वेगळा भाग आहे. मी पहिल्या प्रतिसादा पासून तेच सांगतो आहे. यज्ञ करा. भारत हा सर्वधर्म समभाव मानणारा देश आहे असे आजवर मी समजत आलो आहे कारण सरकार तसे सांगते जगाला. यज्ञात नासाडी नको. हा मुद्दा मी सांगतो आहे. अगदी बाळबोध भाषेत सांगायचे झाले तर पोट भरायला जेवढे गरजेचे आहे तेवढेच वाढून घ्या. पदार्थ आहेत म्हणून घ्या आणि न खाता टाकून द्या असे नाही. अन्न उरलेच तर ते गरजूंना देता येते. पण उष्टे उकिरड्यावर टाकण्यात कोणताच अर्थ नाही. पण यावर उपाय म्हणून अन्नच तयार करू नका असा हट्ट धरणे योग्य नाही. जर तुम्हाला यज्ञाचा विधी पटत नसेल तर इतर धर्मियांचे चोचले पुरवणे कसे पटते? तिथे लगेच म्हणता की मला त्याच्याशी काही देणे घेणे नाही. यज्ञ होण्यास माझा विरोध नाही. पण अन्नाच्या नासाडीला आहे. हल्ली हिंदू धर्मातल्या अनेक गोष्टींना विरोध करण्यास पुरोगामीपणाचा आव आणला जातो. त्यानुसार आम्ही मागास असलोत तर चालेल. पण चुकिच्या विचारांचे समर्थन मला करायचे नसेल तर मी नाही करणार. पदार्थांची/पैस्याची नासाडीचे हिंदू धर्मातलेच उदाहरण द्यायचे झाले तर समस्त महाराष्ट्रात साजरा केला जाणारा गणेशोत्सव. आज या सार्वजनीक गणेशोत्सवात पैसाची नासाडी आणि गुंडगिरी (कोल्हापूर हेच ताजे उदाहरण आहे) या शिवाय काहीच होत नाही. मग तुम्ही त्यावर बंदी घाला का म्हणत नाही? मोहरमाला निघणारी ताबुताची मिरवणुक आणि त्यात होणारी नासाडी, वाहतुकीची कोंडी आणि लोकांच्या वेळेचा अपव्यय तुम्हाला का दिसत नाही. फक्त हा एक यज्ञच का? हाच माझा मुद्दा आहे. तुम्ही त्याचे योग्य उत्तर तर देत नाहीच पण त्या पुढे जाऊन जे तुमच्या सोबत सहमत नाहीत त्यांच्यावर अरेरावी करत आहात. प्रत्येक समस्येवर तोडगा असतोच. पण मला हवा तसाच तोडगा हा हट्ट का?
हे म्हणणे हास्यास्पद आहे. सर्व समावेशक तोडगा काढा ना? उगाच शड्डू ठोकले म्हणजे मुद्दे बरोबर आहेत असे नाही. मुद्दा समजत नसेल तर आधी विषयाची पुर्ण तयारी करा आणि मगच शड्डू ठोका.
असाच विरोध खिश्चन धर्मांतरालाही करा
मी इतकेच म्हणेन की असाच विरोध
या भागात वेगाने वाढत असलेल्या खिश्चन धर्मांतरालाही करा!!
किमान तशी विरोध करण्याची हिम्मत तरी दाखवा...
आपला
गुंडोपंत
ख्रिश्चन धर्मांतरे
ख्रिश्चन धर्मांतरात नक्की किती धान्याची/खाद्य पदार्थांची नासाडी होते ह्याचे आकडे द्या मगच हा प्रतिसाद इथल्या चर्चेशी सुसंगत ठरेल. 'आम्ही कोल्हापुरी' ह्यांना यज्ञातुन होणारी अन्नाची नासाडी दिसते आहे आणि त्यासाठी अश्या प्रकारच्या नासाडीचा निषेध नोंदवणे योग्य वाटते.
अन्यथा इतर कुठल्याही कारणास्तव ख्रिश्चन धर्मांतरे हा प्रकार खटकत असेल तर त्याचा निषेध इथे नोंदवणे असंबद्ध ठरते.
३० लाख रूपयांचे तूप, १६ लाख रूपयांचे तीळ व इतर अनेक खाद्यपदार्थ जाळले जाणार आहेत ही घटना कोणत्याही धर्माच्या नावाखाली केली जाणार असेली तरी ती निंदनीयच आहे.
सहमत पण
३० लाख रूपयांचे तूप, १६ लाख रूपयांचे तीळ व इतर अनेक खाद्यपदार्थ जाळले जाणार आहेत ही घटना कोणत्याही धर्माच्या नावाखाली केली जाणार असेली तरी ती निंदनीयच आहे.
या विधानाशी पुर्ण पणे सहमत आहे.
पण म्हणून या भागात चालणार्या एव्हेंजलिस्ट चर्च च्या कारवायांना विसरणे पण योग्य नाही. किंबहुना त्या दर वेळी अधोरेखीत करत राहणे हा ही त्या थांबवण्यासाठीचा एक मार्ग आहे.
अर्थातच या व्यासपीठावर हा ज्वलंत आणि अत्याचारी प्रश्न आणायला कुणाचीच हरकत का असावी असे मला वाटते.
आता ख्रिश्चन धर्मांतरात नक्की किती धान्याची/खाद्य पदार्थांची नासाडी?
जर दुष्काळात किंवा (बिहार तसेच ओरिसा येथील) पुर प्रकरणात जर तुम्ही येनकेन प्रकारे ख्रिश्चन होवून बाटायला तयार असाल तरच अन्नाची मदत होते. जर तुम्ही चर्च शी संबंधीत व्हायला नकार दिलात तर मदत चक्क फेकून दिली जाते पण गरजूंना दिली जात नाही हे मी माझ्या डोळ्यांनी / अनुभवले पाहिले आहे.
फार लांब कशाला मिरजेला जावून गरीबांसाठी म्हणून कोणत्याही धर्म विषयक गोष्टी मध्ये न आणता चर्च कडून मदत मिळवून दाखवा!
ही सुद्धा नासाडीच आहे आणि ती अतिशय भयावह रीतीने आणि छुपे पणाने केली जाते.
आणि अनेकदा चर्च कडे येणारी मदत ही केवळ वितरणाचा मर्ग म्हणून आलेली असते त्याचा फायदा करून घेतला जातो.
आपणही हे सहजतेने पाहु शकाल कोणत्याही धर्मांतर करणार्या चर्चच्या कामात डोकावून पहा किंवा सामील होवून पहा काय दिसते ते. (तुम्ही कामाला तयार असाल तर लगेच एक पोस्ट कोड असलेली लिस्ट तुम्हाला मिळेल आणि योग्य ती परिक्षा/कुटूंबाची संपुर्ण माहिती घेवून तुम्हाला कामाला पाठवले जाईल! सध्या मुख्य हिंदु हब काशी - उत्तर भारत हे उद्दीष्ट आहे)
या छुप्या नासाडीची आकडेवारी मिळणे कठीण आहे कारण त्यासाठी या एव्हेंजलीस्ट चर्च ला मिळणारी मदत नक्की किती होते आहे याची माहीती काढावी लागेल.
आपला
गुंडोपंत
सहमत...
पंत तुमच्याशी सहमत आहे. याच सोबत राजकिय लोक जी आम्ही घामाने कमावलेल्या पैस्याची नासाडी करतात त्या बद्दल सुद्धा बोलायला कोणीच तयार नाही. मस्त ७२००० करोडचे पॅकेज जाहीर केले. पुढे त्याचे काय झाले हे कोणी विचारते का? कोणाला किती कर्ज माफ झाले याची यादी जाहिर झाली का? पण आम्ही असे म्हटले की विषयांतर. फक्त यज्ञ बंद पाडा एवढेच येथे लिहायचे. मग सगळे खुष.
अवांतरः राहून राहून एक प्रश्न पडतो, भारताबाहेर फिरायला जाणारे जे हिंदू आहेत. ते अनेकदा मोठाल्या चर्चना वास्तूचा एक नमूना या कारणाने भेट देतात. तसेच मशिदिंना देतात का? देत असल्यास आजवर असे वाचले नाही अथवा ही मक्का मशिद असा , मशिदीत उभा असलेला फोटोही नाही पाहीला. काय बरे कारण असावे. माफ करा... यज्ञ बंद करा यज्ञ बंद करा.... कोण रे तो विषयांतर करतोय? :)
काफिर
ते लोक 'इतरांना' काफिर मानतात... ते त्यांच्या 'सो कॉल्ड पवित्र' वास्तुपाशी कसे येवू देतील?
आणि जावून काय मरायचंय का? कोण तलवार काढून मारेल काही सांगता येते का?
बाकी तसे दुबई मधे जाऊन फसवलेले अनेक भारतीय, पाकी आणि बांग्लादेशी गुलामासारखे मरताहेत ती गोष्ट वेगळी...
पण त्या गुलामगीरी आणि फसवणूकीचा निषेध वगैरे केला तर विषयांतर व्हायचे बाबा... जाऊ दे!
आपला
गुंडोपंत
अवांतर - एक सत्यानुभव
अगदी १००% खरे.
माझे एक काका "वात्सल्य ट्रस्ट" चे संस्थापक आहेत त्यांनी असे सांगितले की मुंबईतील एक नामांकित बेबी फुड बनवणारी कंपनी आपल्याकडिल काही कारणास्तव रद्दबादल झालेले (उदा. चुकीची छपाई, अर्धवट भरले गेलेले डबे) बालखाद्यान्नाचे डबे सेवाभावी संस्थांना देत असे. तिथे मोठ्या पदावर असलेला अधिकारी ख्रिश्चन होता. तो ते डबे फक्त ख्रिस्ती अनाथालयांना पुरवायचा. ह्यांनी वारंवार विनंती करूनसुद्धा वात्सल्य ट्रस्ट हिंदुंची संस्था आहे म्हणून ते डबे त्याने शेवटपर्यंत मिळवू दिले नाहीत.
मात्र त्याच्या निवृत्ती नंतर तिथे एक कर्णिक नावाचा अधिकारी आला आणि त्याने निष्पक्षतेने डबे वाटप सुरु केले. जिथे बालखाद्यान्नाचा प्रश्न येतो तिथेही ही मंडळी धर्मांधता सोडत नाहीत.
ता.क. : ज्यांना मदर तेरेसा ह्यांच्या सेवाभावीपणाबद्दल आदर आहे त्यांनी बीबीसीचा हेल्स एन्जल हा माहितीपटसुद्धा पहावा. म्हणजे मरणासन्न रुग्णांवर उपचार न करता त्यांना प्रथम बाप्तिस्मा कसा दिला जातो ते पण कळेल.
_________________________________________________________
सुन्दरी च सरला च मधुरा च एषा भाषा, आगच्छन्तु, आगच्छन्तु, आस्वादयन्तु ।
तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तोम् ।।
यज्ञ ते चर्च व्हाया मशीद
यज्ञ ते चर्च व्हाया मशीद....
केव्हा तरी हे वळण येणार हे माहीत होतेच. धार्मिक बाबींशी म्हणून मूळ विषयाशी दूरान्वयाने का होईना संबंध म्हणून (एका मर्यादेपर्यंत) मी याला "विषयांतर" म्हणून विरोध करणार नाही. त्यामुळे काहींची पोटदुखी परस्पर थांबावी. ; )
सक्तीने केलेले धर्मांतर मग ते कोणत्याही धर्मातून कोणत्याही धर्मात असो अत्यंत निंदनीय आहे. पण ज्याला स्वखुशीने ते करायचे असेल तर आडव्या येणाऱ्या धर्म किंवा राजसत्तेला वाकवायलाच हवे. (उदा. शिवरायांनी नेताजी पालकरना हिंदू धर्मात पुनःप्रवेश देऊ केला असताना त्यावेळच्या सनातनी धर्ममार्तंडांनी केलेला थयथयाट शिवरायांनी मोडून काढला होता.) अशी परतीची द्वारे बंद केल्यानेही हिंदू धर्माचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर एखादा स्वखुशीने धर्मांतर करतो तेव्हा त्यावर ती वेळ का आली, त्यामागे केवळ पैशाची लालूच की त्याची झालेली सामाजिक कुचंबणा याचाही सनातनी धर्ममार्तंडांनी विचार करायला हवा. दलितांना आजही अनेक मंदिरांत उघड/छुपी प्रवेशबंदी आहे. त्यावरही चर्चा हवी.
देव-धर्म हा आईसारखा हवा. तिच्याजवळ जाताना, आपले सुखदुःख मांडताना मुलांमध्ये भेदभाव नसावा. ज्या धर्मात स्त्री -पुरूष, जात वगैरे अनेक भेदभाव आढळतात, त्यानुसार प्रार्थनास्थळांत प्रवेशबंदी केली जाते व इतर अनेक रूढी परंपरा लादल्या जातात त्याही बंद व्हायला हव्यात.
उदा. शनिशिंगणापूरला स्त्रियांना विशिष्ट ठिकाणी प्रवेश नाही, गोव्यांतील अनेक मंदिरात गाभाऱ्यात ब्राह्मणांशिवाय इतरांना प्रवेश नाही (इतर जातीचा कितीही सत्शील पुरूष असला तरीही त्याला प्रवेश नाही. पण एखादा ब्राह्मण कितीही नीच कृत्ये करणारा दुराचारी असेल तरीही त्याला प्रवेश. वा रे न्याय!), विधुर धार्मिक कृत्ये करू शकतो पण विधवेला ती परवानगी नाही. मासिक धर्म सुरू असताना स्त्रियांना धार्मिक कृत्ये करण्यास व देवदर्शन करण्यास बंदी, वगैरे. असा दुजाभाव इतरही धर्मात असेल. मला माहिती नाही. असल्यास तोही तितकाच निंदनीय आहे.
चाणक्य,
१. कोल्हापूरचे प्रश्न तुम्ही मांडलेत मला याचा अजिबात राग नाही. पण चुकीच्या ठिकाणी मांडलेत याचे सखेदाश्चर्य वाटले.
२. कोणत्याही सामाजिक, धार्मिक कारणासाठी केली जाणारी पैशाची नासाडी व अन्नाची नासाडी दोन्हीही चुकीचेच आहे. पण अन्नाला आपण पूर्णब्रह्म मानतो. अशा वेळी ३० लाख रूपयांचे तूप, १६ लाख रूपयांचे तीळ व इतर अनेक खाद्यपदार्थ जाळले जाणार आहेत ही घटना कोणत्याही धर्माच्या नावाखाली केली जाणार असली तरी ती निंदनीयच आहे. इतकी सोपी भूमिका मी पुनः पुनः मांडतो आहे. ती बाकीच्या बहुतेकांना पटत आहे. तुम्हालाही काही अंशी पटत असेल तर मी तुमचा व्यक्तिशः आभारी आहे.
३. माझ्या मुद्याला जे सहमत नाहीत त्यांच्यावर मी मुळीच अरेरावी करत नाही. मला ते आवडतही नाही. पण मूळ मुद्याला कोणी सोयीस्कर बगल देतो हेही मला आवडत नाही.
धन्यवाद. लगे रहो.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
कोल्हापुरी मसाला = नाद खुळा !
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
ह्म्म्म..
तुम्ही दर वेळी मला न चुकता तुमच्या प्रतिसादात न चुकता उपप्रतिसाद देता. या बद्दल मी तुमचा व्यक्तिशः आभारी आहे.
माझे मुद्दे परत वाचले, तर तुमच्या लक्षात येईल की मी अन्न आणि पैस्याच्या नासाडीला मान्य केलेले नाही. माझा विरोध आहे तो ज्या प्रकारे आंधळा अथवा पक्षपाती विरोध केला जातो एका धर्माला, त्याला आहे. माझी ही भुमिका एकदम सोपी आहे आणि ती तुम्हाला मुलतः मान्य करायची नसल्याने तेच तेच मुद्दे परत परत मांडले जात आहेत.
तुम्ही स्वत:ला आम्ही कोल्हापुरी म्हणून व्यक्त करता आहात. मग तुम्हाला तुमच्या सोबत कोल्हापूरचा मुद्दा जोडला तर सखेद आश्चर्य का वाटावे?
तुमचा हा प्रतिसाद वाचून तुम्ही यज्ञ, अन्न आणि पैसा यांची नासाडी यापेक्षा नकळत तुमचा ब्राम्हणद्वेष प्रकट करत आहात असे वाचकाचे मत होण्यास मोठा वाव आहे. आजच्या भारतातल्या ब्राम्हणांमधले बहुसंख्य ब्राम्हण समाजाच्या दृष्टीने चुकिच्या गोष्टींचा विरोध करतात. तरी ही मुठभर लोकांची उदाहरणे घेउन सरसकट सगळ्यांना झोडपले जाते. हे योग्य आहे?
हिंदू एकता संघटनेचाही विश्वशांती यज्ञाला विरोध
चाणक्य,
मी मूळ लेखात किंवा प्रत्येक प्रतिसादात कोणा एकाच धर्माविरूद्ध लिहीलेले नाही. गैरकृत्ये, मग ती कोणत्या का धर्माचे पांघरूण घालून केली जात असतील तर त्याला स्पष्टपणे विरोध केला आहे व करतच राहणार.
होय, मी कोल्हापुरी आहे. म्हणून कोल्हापूरचे म्हणून जे प्रश्न आहेत ते (आणि जे सामर्थ्य आहे ते देखील) रोज जिथे तिथे चघळत नाही. अर्थात, ते जिथे मांडायला हवेत तिथे परखडपणे मांडतोच. त्याच धर्तीवर तुम्ही कोल्हापूरचे जे प्रश्न मांडलेत त्यांना विरोध केलेला नाही. तथापि, मूळ विषयाशी कोणत्याही प्रकारे त्यांचा संबंध नाही. म्हणून ते इथे मांडू नयेत. तरी ही तुम्ही मांडलेल्या अशाच काही गैरलागू मुद्यांचा थोडक्यात परामर्श यापूर्वीच घेतलेला आहे.
धार्मिक बाबींमध्ये केल्या जाणाऱ्या अन्यायाचे दाखले देताना मी "ब्राह्मण" शब्दाचा अल्प व योग्य वापर केला या व्यतिरिक्त विशिष्ट जाती धर्माचा या संवादात व इतरत्रही उल्लेख केलेला नाही व करत नाही. तुम्हाला तेवढाच शब्द खुपत असेल व त्यावरून तुम्ही आणखी काही फाटे फोडणार असाल तर "ब्राह्मण" शब्दाऐवजी "सनातनी" शब्द वापरेन म्हणजे एका संपूर्ण जातीऐवजी ती विशिष्ट "सनातनी" मनोवृत्ती बाळगणारे (मग ते कोणत्याही जातीतील असोत) त्यांना अधोरेखित केले जाईल. तुम्ही त्या "मूठभर" लोकांचा साधा निषेध तरी कराल?
याव्यतिरिक्त,
विसूनानांनी पुढील प्रमाणे प्रतिसाद दिला होता -
पुढे पौराणिक कालात याच संकल्पनेत दानाची भर पडून राजाने अथवा धनिकाने आपल्याकडील सर्व स्थावर-जंगमाचे सामान्य लोकांना दान करावे ही कल्पना आली. ब्राह्मण जेव्हा खरोखरीच ब्राह्मण भिक्षू होते (ते केवळ ज्ञानदानाचे कार्य करीत आणि केवळ गुरुदक्षिणा आणि भिक्षा यांवर गुजार करीत त्यावेळी_) त्यांना या दानधर्मात अग्रक्रम मिळावा अशी योजना होती. परंतु या प्रथेचा अनिष्ट फायदा घेऊन त्यांनी समाजाचे ब्रेनवॉशिंग केले आणि ब्राह्मणाला केलेले दानच फक्त पुण्यप्रद असते अशा खुळचट कल्पना धर्मग्रंथांच्या तपशीलात घुसडल्या. सर्वसामान्यपणे याचा प्रचंड आर्थिक फायदा ब्राह्मणांना झाला, तोटा निम्नज्ञातीयांना झाला आणि समाजात जातीभेदाबरोबरच वर्गभेदही निर्माण झाला.
आजच्या काळात यज्ञाचे स्वरूप पूर्णपणे बदलून जमा केलेल्या धनराशीचा (एखादा ट्रस्ट करून) गरीब जनतेसाठी विनियोग झाला तर खरोखर विश्वशांती, समाजशांती, व्यक्तीशांती,समष्टीशांती इ.इ. होईल.
अशाप्रकारचे ज्ञानयज्ञ, वनस्पतीयज्ञ, शुद्धीयज्ञ, रथयज्ञ इ.इ. यज्ञ अनुक्रमे शिष्यवृत्ती, वनसंवर्धन, ग्रामस्वच्छता,रस्तेबांधणी यांसाठी निधी उभारण्यासाठी करता येतील.
नाहीतर विश्वशांती यज्ञात जाळण्यासाठी समिधा, तूप, हवि, तीळ कशाला हवेत? सरळ नोटाच जाळाव्यात!!! नाहीतरी आर्थिक मंदी आल्यावर त्यांची किंमत सरपणाइतकीच राहणार आहे.
(कोणत्याही जातीवर टीका करण्याचा हेतू नाही. जे सत्य आहे तेच लिहिले आहे.)
यावर कुणाचीच कशी थेट प्रतिक्रिया नाही?
ताजा कलम, कोल्हापुरातील कडवी हिंदुत्ववादी संघटना - हिंदू एकता - यांनीही या विश्वशांती यज्ञाच्या थोतांडास जाहीर विरोध केला आहे. त्यासाठी त्यांनी स्वा.सावरकरांचे समयोचित दाखले दिले आहेत. हिंदू एकतेच्या या भूमिकेचे कोल्हापुरात उत्साहात स्वागत होत आहे.
हे धाडस बाकीच्या संघटना दाखवतील?
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
कोल्हापुरी मसाला = नाद खुळा !
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
बरं सांगितलं
ब्राह्मणांवर जरा काही बोलले की लगेच उसळून येणार्या व्यक्ती किती असुरक्षित असतात हेच या चर्चेवरून दिसतं आहे. तुम्ही सुरु केलेल्या चर्चेत मला काहीही वाईट दिसलं नाही. जातीवर काही लिहिलेलेही नाही. कुठे गैरप्रकार चालला असेल आणि एखाद्याने त्याला वाचा फोडायचा प्रयत्न केला तर लगेच इतर धर्मीय का आठवावे? आपण काही करायचे नाही आणि दुसर्यांना करू द्यायचे नाही हा बाणा विचित्र वाटतो.
कोल्हापुरी तुमचा प्रयत्न चांगला आहे, हा यज्ञ होऊ नये म्हणून तुम्ही निषेधाशिवाय काय केलंत हे ही सांगा. संकेतस्थळांवर निषेध म्हणून तुमची बाजू घेणारे बरेच मिळतील. कोल्हापूरात निषेध कसा घडवणार.
- राजीव.
दोन कोटींच्या खर्चिक विश्वशांती महायज्ञाला वाढता विरोध.
धन्यवाद राजीव,
कोल्हापुरातील अनेक पक्षविरहीत संघटना व सुजाण नागरीक "आम्ही भारतीय लोक आंदोलन" या नावाने (व स्वतंत्रपणे देखील) या यज्ञाला विरोध करण्यासाठी एकत्र येत आहेत. त्यामध्ये अनेक सामान्य नागरीक आहेत जे "आपण भले की आपले काम भले" या पद्धतीने आजवर जगत होते. परंतु खर्चाचे आकडे पाहिल्यानंतर सात्विक संतापाने काहीतरी केले पाहीजे म्हणून एकत्र येत आहेत.
दि.७ ऑक्टोबर च्या कोल्हापूर सकाळमध्ये माझे पत्र प्रसिद्ध झाल्यापासून असंख्य लोकांनी माझ्याशी संपर्क साधला व एकत्र येण्याचे आवाहन केले. त्याने प्रोत्साहित होऊन समाजातील मान्यवर व्यक्तींना, संशोधकांना भेटून या सर्वांना एकत्र आणण्याची सुरूवात काही प्रमाणात मी केली. एका आठवड्यातच ज्येष्ठ नेते प्रा.एन.डी.पाटील, ज्येष्ठ इतिहाससंशोधक जयसिंगराव पवार, माजी कुलगुरू श्री.कणबरकर, श्री.बाबुराव धारवाडे, श्री.गोविंद पानसरे व इतर अनेक मान्यवर एकत्र आले आहेत. या सर्वांनी कालच जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, पालिका आयुक्त यांना भेटून वस्तुस्थितीची माहिती दिली-घेतली आहे.
कडवी हिंदुत्ववादी संघटना - हिंदू एकता यांनीही यज्ञाला सक्रीय विरोध सुरू केला आहे. त्यासाठी त्यांनी स्वा.सावरकरांचा वैज्ञानिक दृष्टीकोन योग्य स्वरूपात मांडला आहे.
१२ दिवस दोन कोटी रूपयांचे मौल्यवान पदार्थ जाळले जाणार याच विचाराने सामान्य माणूस अस्वस्थ आहे. व तो जमेल त्या प्रकारे संघटित होऊन विरोध करू पाहत आहे.या सर्वांचा आमच्याकडून समन्वय साधला जात आहे.
धक्कादायक बातमी अशी की, यज्ञ आयोजकांनी गांधी मैदानावर यज्ञकुंडासाठी ८०८ खड्डे पाडणार हे महापालिका प्रशासनाला सांगितलेच नव्हते. तसेच जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा यांनाही अद्याप कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही. या यज्ञासाठी किमान एक लाख लोक बाहेरगावाहून येणे अपेक्षित आहे. त्यामुळे मूलभूत सोयी सुविधा, वाहतूक यांच्यावर काय ताण पडणार आहे याचा संबंधितांनी विचार केलेला नाही. याची गंभीर दखल प्रशासनानेही घेतली आहे.
गांधी मैदान हे जुन्या कोल्हापुरातील मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध असलेले सर्वात मोठे मैदान आहे. ते आतापासूनच १३ नोव्हेंबर पर्यंत खेळण्यासाठी, फिरण्यासाठी वगैरे पूर्ण बंद राहणार आहे. आत्ताच खड्डे पाडण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे त्या मैदानाची होणारी दुर्दशा भरून येणारी नाही. त्याविरोधात स्थानिक तरूण मंडळे, तालीम मंडळे हेदेखील एकत्र येत आहेत.
ऐन सणासुदीच्या काळात १५ हजार किलो तूप व इतर मौल्यवान खाद्यपदार्थ या यज्ञासाठी वापरणार म्हणजे ते बाजारातून गायब होणार. महागाई आणखी वाढणार. सामान्य जनता आणखी होरपळणार.
त्या मैदानाच्या भोवती दिवाळीच्या काळात काही गरजू लोक फटाका स्टॉल लावून आपली गुजराण करतात. त्यांनाही आयोजकांकडून बंदी करण्यात आलेली आहे. म्हणजे त्या गरीबांच्या पोटावर पाय.
कोट्यवधी रुपयांच्या खाद्यपदार्थांचा धूर म्हणजे पर्यावरणाचा प्रश्न आहे.
असे अनेक प्रश्न या यज्ञाने उभे राहणार आहेत. विश्वशांती राहोच. पण सामान्य लोकांची मनःशांती व समाजस्वास्थ्य त्यामुळे बिघडणार आहे. या सर्वांना वाचा फोडण्याचे काम वृत्तपत्रे करत आहेत.
दुसरीकडे यज्ञ आयोजकांनी एकदाही यज्ञाचे नेमके फायदे काय हे पुराव्यासह जाहीर केलेले नाही. तसेच या प्रचंड खर्चाचे कोणतेही समर्थन दिलेले नाही. काही वर्षांपूर्वी परभणीच्या जवळपास कुठेतरी असाच यज्ञ केला होता. त्यानंतर विश्वशांती झाली की कुणाची शांती झाली ते संयोजकांनाच माहिती. ; )
यावरून बरेच काही स्पष्ट होते.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
कोल्हापुरी मसाला = नाद खुळा !
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
चांगले आहे
तुम्ही कोल्हापूरमध्ये काय चालले आहे हे कळवत राहता हे फार चांगले आहे. उगीच 'उत्तर र्होडेशियातील अस्वलांच्या अडचणी' वगैरेंवर चर्चा करण्यापेक्षा आपल्या इथे काय चालले आहे यावर चर्चा करणे चांगले.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥