किटक नाश

बरेच वर्षापूर्वी आम्ही घरी पहिल्यांदाच किटक नाशक फवारणी करून घेतली. त्या फवारणीच्या काळात व त्यानंतर सांगितले गेल्याप्रमाणे ४-५ तास बाहेर राहिलो. परत आलो तेव्हा घरातील कुंडीतील झाडे मरून पडली होती. ते पाहून अतिशय वाईट वाटले आणि राग ही आला की जे किटक नाशक फवारणी करतात त्यांनी ह्या झाडांबाबत काहीच सांगितले नव्हते. आमचा जरी हा पहिलाच अनुभव होता तरी ज्यांचा हाच व्यवसाय आहे त्यांना तरी हे कळायला नको का?

त्यानंतर अनेक अनुभव येत गेले. १) ह्या फवारणीने पाली देखील मेल्या होत्या त्यामुळे काही महिन्यातच झुरळांची अतोनात वाढ झाली. २) ह्या फवारणीने कोळी मेले होते त्यामुळे काही महिन्यात चिलटं, रातकिडे ह्यांची वाढ झाली. ३) सर्वत्र भरपुर काळ्या मुंग्या दिसायला लागल्या होत्या.

हे पाहिल्यावर मनात विचार आले की खरोखरच ह्या जहरील्या रासायनिक फवारणीची आपल्या घराला इतकी आवश्यकता होतीच का? पाली व कोळी नैसर्गिक किटक नाशक नाहीत का? विषारी रासायनिक फवारणी करून आपण पर्यावरणाचा र्‍हास तर करत नाही ना?

मग लक्षात आले की पाली व कोळी जरी दिसायला विद्रुप असले तरी
ते माणसासाठी निरुपद्रवी आणि अत्यंत उपयोगी आहेत. त्यानंतर आम्ही आजतागायत कधीच घरात विषारी रासायनिक किटक नाशक फवारणी केली नाही.

Comments

सहमत

आहे. माझ्याकडे पाली आणि कोळी नाहीत त्यामुळे झुरळे झाली आहेत. त्यावर काय करावे हाच विचार चालू होता. इथे काही उपाय मिळाल्यास चांगलेच. :-)

----

पाळा

पाली आणि कोळी पाळलीत तरी झुरळे संपणार नाहीत. कारण हे प्राणी फक्त छोटे कीटक खातात, झुरळे नाहीत. झुरळांकरता बोरिक पावडर उत्तम. सर्व बारकी बारकी झुरळे पळून जातात. तसेच 'स्वीट ड्रीम' किंवा अशाच नावाची एक उदबत्ती असते, ती पेटवून दारेखिडक्या बंद करून घराबाहेर तासभर राहिले की आल्यावर सर्व मोठी झुरळे मरून पडलेली दिसतात. पिवळ्या रंगाच्या छोट्या शंकरपाळ्यासारख्या दिसणार्‍या वड्यांचे एक पाकिट २० रुपयाला मिळते. या वड्या वासहीन असतात. घरात झुरळांच्या वावरण्याच्या क्षेत्रात पेरल्या की आठवडाभरात झुरळे दिसेनाशी होतात. घराचे दरवाजे खिडक्या कायमच्या बंद नसल्या पाहिजेत, तरच परिणाम दिसतो. क्रेझी लाइन्स किंवा अशाच नावाच्या खडूने झुरळे येण्याच्या मार्गावर दुहेरीरेघा मारून ठेवल्या की, झुरळेआणि मुंग्या त्या रेघा ओलांडत तर नाहीतच, पण तसा प्रयत्‍न करताना मरून पडतात. याशिवाय सतत स्प्रे पंपाने औषधाचे फवारे मारत राहिले की झुरळांचे समूळ उच्चाटन होते. मात्र शेजारच्या घरांतून झुरळांची आवक होत नसेल तरच!

क्रेझी लाईन

उपाय सुचवल्याबद्दल धन्यवाद. यापैकी क्रेझी लाईन वापरून पाहिली आहे. सुरूवातीला सर्व झुरळे मेली पण नंतर नंतर रेघांवरून आरामात फिरत होती. बाकीचे उपाय करून बघतो.

----

काय बरे करू

झुरळे मला आवडत नहित.. मात्र कोळीही आवडत नाहित :(
झोपलो असताना बरोबर आपल्या डोक्यावर असलेली छतावरील पालही बर्‍याचदा अस्वस्थ करते..
काय बरे करू ?? :( ;)

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

पाल

झोपलो असताना बरोबर आपल्या डोक्यावर असलेली छतावरील पालही बर्‍याचदा अस्वस्थ करते

'पाल'थे झोपा. ;-)

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

पाल

खिडक्यांना जाळ्या लावून टाका. पाली येणार नाहीत.
झुरळे मात्र जिथे दिसतील तिथे मारा आणि स्वच्छता हा त्यांवर एकच उपाय.

मच्छरदाणी

कोळ्यांची जाळी ही उत्कृष्ठ मच्छरदाणी आहे. पलंगावरील छतावर् ही जाळी असल्या चांगलाच परिणाम साधतो असा स्वानुभव आहे. शिवाय झोपल्या झोपल्या को़ळ्याची हुनर ही बघता येते. काय सुंदर जाळी असतात.अडकलेल्या डासाला गुंडाळुन जाळीच्या कोपर्‍यात ठेवुन देतो.
स्वच्छतेच्या नावाखाली उगीचच जाळी काढून टाकतात.पण त्यामागे अशुभ असल्याची अंधश्रद्धा असावी.
प्रकाश घाटपांडे

मच्छरदाणी

मच्छरदाणीला पर्याय नाही!

गमतीदार प्रतिसाद, आवडला.
कोळ्यांची जाळी सुंदर असतात यात वाद नाही.

निसर्ग परस्परावलंबून आहे हेच खरे... (म्हणून मला झुरळे हवीत असा अर्थ नाही! ;)) )
मी दर दिवाळीला घर रंगवून घेतो, त्यावेळी भरपूर स्वच्छता करतो. म्हणजे सगळे घर १००% रिकामे करून मगच रंगवतो. त्यामुले अनेक नकोसे किटक पळून जातात.
नंतर काही आलेले आगंतुक पाहुणे मात्र राहतात. कोळी काही फारसा त्रास देत नाहीत. (काही भेटायला आलेल्या लोकांच्या चेहेर्‍यावर त्रास दिसतो पण मी तिकडे दुर्लक्ष करतो.

पण मी असे ऐकले आहे की एक विशिष्ट प्रकारचा काळा कोळी विषारी असतो.
याच्या पाठीवर एक लाल ठिपका असतो.
पण हा भारतात सापडत नाही, त्यामुळे काळजी नाही.

असो,
मुळात नैसर्गीक किटक नाशक (म्हणजे किड्यांना खाणारे किडे वगैरे) वापरणे उत्तम आहे. कारण त्यामुळे निसर्गाची लय साधली जाते.
सरडे झुरळे आणि माशा खातात. पण सरडेच कुठे उरले आहेत आता? झुरळे वाढणारच!

मला वाटते की, शक्य असल्यास किटकनाशकांची फवारणी करू नये. किटक नियोजन करावे असे मला वाटते पण जमतेच असे नाही.

किटकशास्त्राचा (एंटेमॉलॉजी?) अभ्यास असलेल्यांची मते महत्वाची...

(जर अगदीच काही शक्य नसेल तर ही 'मी हे पाळलेत' असे म्हणावे. 'माझो औरंगजेब' ही ढेकूण पाळणार्‍या मुलाची मजेदार गोष्ट किशोर मध्ये वाचलेली आठवते... तो ढेकूण पाळतो आणि त्याला औरंगजेब असे नाव देतो...)

आपला
गुंडोपंत

ढेकूण

आमच्याकडे इतके वर्षात एकदाच झाले. सगळे उपाय करून कंटाळलो. गाद्यांना औषध लावल्यानंतर त्यांनी पलंगाच्या सांदीत, भिंतीत बस्तान ठोकले. शेवटी एकाने सांगितले की स्टोव्हवाल्यांकडे ब्लो स्टोव्ह मिळतो. तो आग फेकतो. तोच आणा. मग बरहुकुम तोच स्टोव्ह ओळखीच्या स्टोव्हवाल्याकडून तात्पुरता आणला आणि सर्व भिंतींचे व पलंगाचे कोनाडे आगीच्या झोताने अक्षरश: तापवले. सर्व ढेकूण जळले. त्यानंतर आजतागायत कधीच ढेकूण झाले नाहीत. कदाचित् ढेकणांना मेलेल्या भाईबंदांचा वास येत असावा.

हर्बल पेस्ट कंट्रोल

आम्ही नेहमी हर्बल पेस्ट कंट्रोल करुन घेतो. काम करणारे लो़क येऊन ठराविक प्रकारची पेस्ट किटकांच्या वावराच्या संभाव्य ठिकाणी लावतात. बाकी काहिच नाही. ना झाडांना त्रास, ना दुर्गंधी. किटक मात्र जमीनीवर येऊन मरतात. मग कचरा काढला की झाले. पुढचे काही महिने तरी काहीच त्रास नाही.





अरे वा,

दादर / मुंबईत अशी कोणी किटनाशक फवारणी करते का ते पहायला हवे. बाकी एकदा बळीराजा मासिकात जनावरांच्या अंगावरील गोचिडा जाण्यासाठी तंबाखुच्या पाण्यात गुळ टाकून घट्ट मिश्रण बनवायचे आणि ते उग्र मिश्रण लावल्याने गोचिडा कायमच्या जातात असे वाचल्याचे आठवते. ढेकणांवर असा इलाज करता येईल बहुदा. तंबाखुच्या उग्र वासाने ह्या मिश्रणाला मुंग्या पण लागत नाहीत. (सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदीने तंबाखु स्वस्त होण्याची पण दाट शक्यता आहे.)

पेस्ट् कंट्रोल्..

माझ्या माहेरीही नेहेमी पेस्ट् कंट्रोलवाल्याला बोलवून पेस्ट् लावून घ्यायचो घरभर.. मग पुढचे २-३ वर्ष पाहायलाच नको..! झुरळं नावालाही नाही.. पाल एखाददुसरी आली तर् उन्हाळ्यात् यायची,नाहीतर् ती ही नाही..

नक्की बघा कुणी आहे का.. खूप उपयोगी!

स्वच्छता

ताई, तुमचे घर आहे का काय हो? चिलटं येतात घरात ती पाहिली आहेत पण रातकिडे? रातकिडे घरात घुसले तर घरात रहायलाच नको की.

चिलटं, रातकिडे, मुंग्या, झुरळे, ढेकूण इतके सगळे राहतात मग माणसं राहात कशी असतील. या सर्वांवर सर्वात सोपा उपाय म्हणजे स्वच्छता पाळा. घरातील कचरा कमी करा.

- राजीव.

हुं

ताई, तुमचे घर आहे का काय हो? चिलटं येतात घरात ती पाहिली आहेत पण रातकिडे? रातकिडे घरात घुसले तर घरात रहायलाच नको की.

घर प्रचंड मोठे आहे आणि राहणारी माणसे दोनच. त्यामुळे असे घडले. पण ते फार वर्षापूर्वी आणि मी लिहिले आहे की ते पाहुणे आले होते. त्याचा अर्थ असा नव्हे की त्यांनी बस्तानच ठोकले.

मला वाटते ह्यापुढे तुम्ही प्रतिसाद लिहिण्यापूर्वी दोनदा विचार करावा (राजीवदादा, नाहीतर पुढच्या वेळी मी पण खवचट प्रतिसाद देईन, मग पळता भूई थोडी होईल हे लक्षात ठेवलेत तर बरे). असो.

ह्यातील बर्‍याचश्या समस्यांवर निसर्गानेच उत्तर दिले. चिलटांच्या पाठोपाठ पाली पण आल्या आणि मला तरी पालींची किळस वाटत नाही. त्या कधी जमिनीवर येत नाहीत. निसर्गाने नेमून दिलेले त्यांचे काम त्या नियमित करतात. मग मी एक मांजर पाळली. तिने झुरळांचा फडशा पाडला.

रातकिडे होते खरे आणि माझे घर महामार्गाशेजारी आहे त्यामुळे रात्रंदिवस वाहनांचा कर्कश्य आवाज येत असतो जोडिला भोपूंचा आणि दिवसातून ३-४ वेळा वाहनांच्या टकरीचा पण आवाज येतो. त्यामुळे रातकिड्यांची किरकिर सुखद वाटली. वाटले, अजुन मुंबईत निसर्ग शिल्लक आहे. पण १-२ दिवसांत ते कुठेतरी गेले खरे.

अजुन एक महत्वाची गोष्ट, मी तिसर्‍या मजल्यावर राहते, आमच्या घराच्या एका खिडकीला लागून ताम्रशिंगीचा विशाल वृक्ष आहे. त्याला पावसाळा संपला की बहर यायला लागतो. त्याच्या मनोहारी पिवळ्या फुलांवर मध चाखायला चिलटं, चतुर, हळद्या, काही छोटे पक्षी आणि खारी येतात. सिमेंटच्या जंगलात राहणार्‍या आम्हा पामरांना हा एक
नेत्र सुखद अनुभव असतो.

क्वचित् त्यातली चिलटं कधी घरातही घुसतात. पण आम्ही त्यांचा द्वेष करत नाही. एखाद्या फळाची फोड घराबाहेर ठेवतो. मग चिलटं आपोआप घराबाहेर जातात.

आमचे घर..

आमचे घर मुख्य रस्त्याला जो उपरस्ता फुटतो, त्याला फुटलेल्या एका गल्लीत आहे. शेवटी मृतान्त(!) आहे, त्यामुळे वाहनांची वर्दळ नाही. गल्लीतील वाहनेच तेवढी भोंगे वाजवून पुरेसा त्रास देतात. आमच्याकडे म्हणण्यासारखी झुरळे नाहीत, पण क्‍वचित रातकिडे आणि पावसाळ्यात काजवे येतात. बुलबुल आणि पोपट घराच्या एका खिडकीतून येऊन दुसर्‍या खिडकीतून पसार होतात. दयाळ पक्षी भल्या पहाटे लांबलचक ताना घेऊन झोपेतून जागे व्हायला लावतो. कोकिळांची कटकट उन्हाळाभर असते. रात्रीच्या पहिल्या प्रहरी घराच्या गच्चीवरून शेकडो वटवाघळे आवाज न करता मार्गक्रमण करतात.
इतका त्रास असून आम्ही तिथेच राहतो. नशीब, आमचेकडे पद्मजा फाटकांनी वर्णन केल्यासारखा मोरांचा धुडगूस नाही. --वाचक्‍नवी

काही उपाय...

आमच्या जुन्या फ्लॅटमध्ये आमच्या वर राहणार्‍या गृहस्थांनी घराला रंग दिला तेव्हा वासामुळे सगळे ढेकूण आमच्या आणि समोरच्या घरात आले. यावर उपाय म्हणून सरळ एकदीड लिटर रॉकेल आणि शेतसामानाच्या दुकानातून कीटकनाशकाची बाटली आणली. घरातली तमाम अंथुरणे पांघुरणे धुऊन काढली. सर्व बेड उभे करुन किटकनाशक टाकलेले रॉकेल फवारले. भिंतीवरचे खिळे, सिलिंग, घड्याळे सर्व ठिकाणी लक्षपूर्वक फवारणी केली. काहीच सोडले नाही तेव्हा कुठे ढेकणांपासून मुक्ती मिळाली. असाच उपाय झुरळांबाबतही खूप फायदेशीर होतो.
पाली मात्र आहेतच. त्यांचा काही त्रास होत नाहीच. त्यामुळे त्यांना मारायची आवश्यकता वाटत नाहीच.
काही कीटकभक्षी वनस्पतींबद्दल वाचले होते. असा उपाय कोणी करुन पाहिला आहे काय?

बाकी तुम्ही वर लिहलेले मांजर झुरळे खाते? विचित्रच दिसते. ते प्लॅस्टिक खाणारे मांजर हेच काय?

सौरभदा-

शुद्ध अवांतर...

विषयाला फाटे फोडून एकमेकांवर व्यक्तिगत वार करत राहणे ही उपक्रमाची परंपरा नाही. विषयांतर, व्यक्तिगत हेवेदावे यासाठी कृपया खरडवही किंवा व्य. नि. यांचा वापर करावा. - संपादन मंडळ.

पाली टाळण्यासाठी

पाली टाळण्यासाठी फोडलेल्या अंड्याचे कवच घरात ठेवावे. पाली येत नाहीत. आपण स्वतः अंडी खात नसल्यास शेजारच्यांना खायला द्यावीत व फक्त टरफले परत आणावीत. अन्नाची नासाडी करू नये.

करवीरवासिनी अंबाबाईचा विजय असो.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर