परमसखा मृत्यू : किती आळवावा.

सदर लेख हा आजचा सुधारक या वैचारिक मासिकात ऒगस्ट २००८ मध्ये प्रकाशित झाला आहे. लेखाच्या खालील टिपणी ही आजच्या सुधारकच्या संपादकांची आहे. सदर लेख हा चर्चेचा प्रस्ताव म्हणुन जशाच्या तसा देत आहे . या वरील प्रतिक्रिया या आजच्या सुधारक च्या संपादकांना कळविल्या जातील.
==============================================


परमसखा मृत्यू : किती आळवावा....

मंजिरी घाटपांडे

"तुला अगदी शंभरावर पाच वर्षे आयुष्य!" मैत्रिणींच्या संमेलनात पोचायला मला थोडा उशीर झाला काय अन सगळ्यांनी हे असे उस्फुर्त स्वागत केले माझे. ऐकले अन अंगावर सरसरुन काटा आला. मनात म्हटले, माणसाची ' अधिकाची भूक कधी संपणारच नाही आहे का? पूर्वी नाव काढताच हजर होणा-याला शंभर वर्षे आयुष्य बहाल केले जायचे, आता शंभरावर पाच!' साहजिकच चर्चा या शंभरावर पाच आणि त्यावरुन अंगावर उठणारा काटा अशीच सुरु राहिली.

नुकतीच वयाची ११७ वर्षे पूर्ण केलेल्या रांगडया शेतकरी माणसाविषयी बातमी वाचली. त्यावरुन आपल्या पुराणकथांमधील सात चिरंजीवांची आठवण झाली. अमरत्वाची कल्पना खरोखरच एवढी आकर्षक आहे का! असली तर का! या सात चिरंजीवांच्या कल्पनेबाबत दुर्गाबाई भागवतांनी म्हटलंय, ``माणसाला अमर होण्याची नैसर्गिक इच्छा असते. पण चिरंजीव झाल्यावर त्याला नैसर्गिक अंकूर फुटणार नाहीत. ते अमरत्व प्रवाही नसणार. ते अमरत्व कोमेजणार नाही पण ते फुलणार, फळणारही नाही, असाच इशारा, दयायचा असावा.``

मृत्यूविषयी माणसाला जेवढी भीती आहे तेवढंच आकर्षणही आहे. ११७ वर्षांच्या माणसाची बातमी जरी पेपरमध्ये छापून येण्याएवढी महत्वाची वाटली तरी बहुतेक वृध्दांशी चर्चा केली तर त्यांची प्रतिक्रिया ``नकोरे बाबा एवढं लांबलचक आयुष्य!`` अशीच असते.

जगातील बहुतेक धर्मांनी आत्महत्या हे पाप मानलं आहे. या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर, सावरकर, साने गुरूजी यांसारख्या आपल्या परिचयातील उदाहरणांमधील एक प्रकारच्या आत्महत्यांनाच आपल्याकडे उच्चतर दर्जा दिलेला आहे. हा किती मोठा विरोधाभास आहे? ख्रिश्चॅनिटीचा पाया असणाऱ्या जेनेसिस नुसार मानवी जगातील पहिला मत्यू हा नैसर्गिक मत्यू नव्हताच. ऎडम आणि ईव्ह यांच्या केन आणि एबल या दोन भावाभावातील वैरातून केन हा एबलचा द्वेष करतो आणि रागाच्या भरात तो त्याला मारुनच टाकतो.ख्रिश्चॅनिटीनुसार हा जगातला पहिला मानवी मत्यू!

निसर्गाकडे पाहिलं तर काय दिसते? जिवितकार्य पूर्ण झाले की मत्यू! कोणा किटकाचा तीन दिवसात तर एखादया केळीचा प्रसवतांनाच! जन्म, वाढ, पुनरूत्पादन आणि विनाश ही खरं तर निसर्गाचीच साखळी आहे. पण मानवाने प्रगतीच्या नशेत या साखळीला खोडा घातला आहे. अर्थात काळाची पावलं उलटी कधीच जाउ शकणार नाहीत. काळाच्या सुरूवातीच्या पावलांत माणसाने जन्म घेण्याच्या नैसर्गिक हक्कात हस्तक्षेप केलेला आहेच पण मत्यू पावण्याच्या नैसर्गिक हक्कात मात्र तो हस्तक्षेप करण्यास कचरतो आहे, हे काय आहे?

वास्तविक फक्त भारतीय परंपरांचा विचार केला तरी समाजाचं कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात नेतत्व करणाऱ्यांनी नैसर्गिक मत्यूवर अवलंबून राहणं नाकारलेलंच दिसते. `अनादि मी अनंत मी । अवध्य मी भला ।` असं बजावणाऱ्या सावरकरांनी शेवटी वयाच्या ८३व्या वर्पी निर्धारपूर्वक अन्नत्याग करून मत्यूला मिठी मारली. त्यापूर्वी अंदमान बेटावर काळया पाण्याची शिक्षा भोगताना त्यांनी जे मनोबल दाखवले होते, त्याहून हे मनोबल निश्चितच तसूभरही कमी नव्हते. ज्ञानेश्वरांनी तर अगदी लहान वयात कृतार्थ मत्यू पत्करला तो समाधीच्या मार्गाने. पाश्चात्यांमध्येही सॊक्रेटिसने विष पिउन मृत्यु पत्करला तो पलायनवाद नाकारण्यासाठी. हॆम्लॊक हे विष पिउन तो अगदी स्थिर बुद्धीने मृत्युला सामोरा गेला. हा सगळा इतिहास काय सांगतो? अनैसर्गिक मरणाला पुर्वी मानवी समाजात मान्यताच नव्हे, तर प्रतिष्ठा ही होती. फक्त कायद्याचे पाठबळ नव्हते आणि ते अजुनहि नाही. आणि अशा त-हेच्या स्वयंनिर्णयासाठी फार मोठ्या मानसिक बळाची गरज असते. जे सामान्य माणसाजवळ अभावानेच आढळते; आणि कोणतीही कठीण गोष्ट एकटादुकटा जेव्हा करु शकत नाही तेव्हा एकमेकांच्या सहकार्यांने ती पार पाडणे थोडेतरी सुलभ होते, ही गोष्ट सर्वमान्य आहे. त्यामुळेच आज इच्छामरणाच्या कायद्याची जास्त गरज निर्माण झाली आहे. कारण एकमेकांना ज्या गोष्टीत मदत करायला जायचे ती गोष्ट तर आधी कायदेशीर असली पाहिजे. इच्छामरणाबाबत अनेकांनी वैयक्तिक पातळीवर ही गरज मान्य केलेली आहे. या पुर्वी आ. सु.च्या अंकात माझ्या प्रसिद्ध झालेल्या पत्रास पाठींबा देणारे दुरध्वनी अनेक मान्यवरांनी केलेले आहेत. खाजगी बैठकांमध्ये तर अनेकांनी 'इच्छामरणाची सोय असायला हवी' हे मान्यच केलेले आहे. या ही पुढे जाउन या विषयावर कोणी जनहित याचिका दाखल करणार असेल तर त्याला मी वैयक्तिकरित्या आर्थिक मदत ( रु १०,०००/-) करेन असे ही कळविले गेले.

याबाबत पुन्हा दुर्गाबाई भागवतांचाच दाखला आहे. एका मुलाखतीत म्हणले आहे," आत्महत्या हे पाप आहे असे अनेक धर्मांनी ठरवलले आहे खरे, पण मला काही ते पटत नाही . ज्याच्या नशीबाला असह्य शारिरीक वेदना आहेत; ज्याच्या मानसिक भौतिक संवेदनांचा अंतच झालेला आहे, किंवा ज्याचं जगुन संपल आहे त्याला जर सुटका हवी असेल, तर त्याला लोळत घोळत दीनवाणे मरण येण्यापेक्षा, सन्मानाने विनायातना चटकन मरण येणं हा त्याचा हक्क आहे असे मी मानते. असं मरण सुखाने येईल याची व्यवस्था करायला हवी. आत्महत्या म्हणण्यापेक्षा त्याला इच्छामरण हा शब्द अधिक योग्य. सावकरांचे मरण हे इच्छामरण होते. अशा मरणासाठी एक चळवळ चालवण्याची गरज आहे म्हणजे अन्नत्याग करुन मरण्याची वेळ लोकांवर येणार नाही."

अर्थात आक्षेप घेणा-यांजवळ पुष्कळ मुद्दे आहेत. भारतासारख्या देशात जिथे एका सिगरेट साठी आजीचा जीव घेणारे नातू आहेत, तिथे इच्छामरणाचा कायदा झाला तर लोकांना मोकळे रानच मिळेल. कायद्याच आधार घेउन घरातील वृद्धांचे सरसहा खुन पडु लागतील. वैद्यकीय पेशात भ्रष्टाचार माजेल. इ... शिवाय ज्याला खरोखरच मरायचयं त्याला कायद्याची काय गरज? हा तर विरोधकांच्या हातातील फार मोठा मुद्दा आहे. पण कायदा एवढ्यासाठी हवा आहे कि आयुष्यभर आम्ही कायदेशीरपणे जगतो, संपत्ती मिळवतो,तिचा उपभोग घेतो, तिचे दान करतो, मग अशा या प्रतिष्ठीत आयुष्याच्या शेवटीच आम्ही आत्महत्या करुन बेकायदा कृत्य का करावे?

कायद्याच्या आवश्यकतेबाबत तांत्रिक मुद्दे तर अनेक आहेत. वैद्यकिय तज्ञ मंडळी हे मुद्दे नक्कीच अधिक विस्ताराने मांडू शकतील. पण समजा अगदी माझ्या सारख्या चाळिस बेचाळीस वयाच्या बाईने तिच्या वृद्धापकाळासाठी असा इच्छामरणाचा निर्णय करुन ठेवला असला तरी तेव्हा तो अमलात आणण्यासाठी माझी शारिरीक स्थिती असेलच याची काय शाश्वती? वृद्धापकाळात साध्या दैनंदिन कृतींसाठीसुद्धा दुस-याची मदत घ्यावी लागते हे आपण हरघडी पाहतोच आहोत ना? मग इच्छामरणासारखा निर्णय अमलात आणण्याजोगी माझी शारिरीक स्थिती राहिल अस मी मानणं हा केवढा मुर्खपणा! म्हणुनच येथे मदतीची गरज आहे. ती जास्तीत जास्त सुरक्षीत कशी असेल याचा विचार नंतर करता येईल.

ही सर्व कहाणी स्वाभाविकपणेच जोडली जाते ती नियोजनाशी! जर भविष्यात मी कायम स्वावलंबीच राहणार आहे तर मला 'म्हातारपणची काठी' लागणारच नाही. मग माझ मूल मी जास्त निरपेक्षपणे, जबाबदारीच ओझ त्याच्यावर न लादता वाढ्वू शकेन. त्याचा विकास अधिक खुलेपणाने होउ शकेल. बालवयाच्या माझ्या परावलंबित्वाकडून, स्वावलंबित्वाकडे झालेला माझा प्रवास तिथेच पुर्णविराम पावेल. त्याला पुन्हा परावलंबित्वाची भीती उरणारच नाही या ठीकाणी अर्थातच माझ्या आर्थिक, मानसिक, शारिरिक जगण्याचा विकास उर्ध्वगामीच राहील. शिवाय या त-हेने वृद्धांची संख्या आपोआप नियंत्रित राहू लागली तर जागतिक अर्थकारणावर काय परिणाम होतील हे अर्थतज्ञांनी जरुर सांगावे.

एका अर्थाने, आपण माणुस म्हणुन जन्मलो हे आपले भाग्यच म्हटले पाहिजे.'रिटायर्ड लाईफ' ही संकल्पना फक्त मानव जातीतच आहे. अवती भवती जरा बघितले तर काय दिसते? ज्यावेळी प्राणी अन्न मिळवण्याची धडपड थांबवतो तेव्हाच त्याचा मृत्यु नक्की होतो. जेव्हा वनस्पतींची मूळं पाणी शोषण थांबवतात तेव्हा तिला नष्ट व्हावेच लागते. शत्रुपासून पळण्याची प्रेरणा आणि शक्ती संपली कि जिवाचा नाश अटळ रहातो. म्हणजेच अन्न व संरक्षण या दोन मूलभुत गोष्टींसाठी संघर्ष करण्याची ताकद संपली की निसर्गत:च त्या जीवाचा अंत होतो. यात कुठे 'रिटायर्ड लाइफ' आहे ? पण प्रगत मानवी समाजात काय आहे- पस्तीस वर्षे नोकरी करा आणि पंचेचाळीस वर्षे पेन्शन खा! हे लिहिणं कदाचित काही लोकांना फार क्रूरपणाचे वाटेल. पण ते सत्य आहे. उमेदीची निम्मी वर्षे माणूस म्हातारपणाची तरतूद करण्यात घालवतो आणि निम्मी वर्षे सेटल होण्यात. अर्थात हे थोडे विषयांतर झाले. पण मथितार्थ एवढाच की जेव्हा 'जनना' त माणसाने हस्तक्षेप केला तेव्हाच 'मरणा'तही तो करावा लागणार हे अटळ होते.

प्रगत शहरी समाजापुरतं निरिक्षण नोंदवायचे झाले तर, आसन्न मरण स्थितीतील रोग्यांचे प्राणवायु पुरवठा करणारे यंत्र चालू ठेवायचे कि नाही याचा निर्णय तुम्हीच घ्या, असं नातेवाईकांना सांगणारी डॊक्टर मंडळी वेगळे काय करीत आहेत? 'तेरी भी चुप मेरी भी चुप!' असा कायदा व्यवहारात वापरात आहे. आणि या प्रकरणाचे भरत वाक्य ठरलेलं आहे. "डॊक्टर म्हणालेच होते, असं ठेवुन काही सुधारणा होणार नाही. तुम्हाला निर्णय घ्यायलाच लागेल. काय करावे अगदी सुचतं नव्हते. पण एवढ्यातच ते गेले. अगदी अवघड जबाबदारीतून सोडवल बघा त्यांनी आम्हाला!"

शेवटी आपल्या माणसाचा हात हातात असताना मृत्यू येणे , एका अज्ञाताच्या प्रवासासाठी प्रस्थान ठेवायला मिळणे हे खरोखरच अहो भाग्य असणार. पण त्यासाठी स्वत:च स्वत:चा भाग्य विधाता व्हावे लागणार हे नक्की.! कारण असा रिझर्व्हेशनचा प्रवास नियोजनाशिवाय करायला मिळणे अशक्यच की.

'पुरेसे जगून झाल्यावर' मरणाचा हक्क जर माणसाला मिळाला तर नक्कीच त्याला आहे ते जगण अधिक हवसे वाटेल. ते अर्थपुर्ण करण्यासाठी तो अधिक धडपडेल. मृत्युची किंबहुना विनासायास मृत्यूची शाश्वती त्याच्या जगण्याला एक सकारात्मक बळ देईल.

डी -२०२, कपिल अभिजात, डहाणूकर कॊलनी, कोथरुड, पुणे ४११०३८.
संपर्क: ९४२२३०२२८७

[ लेखिका 'मृत्यु: स्वाधीन की पराधीन' या विषयाच्या सामाजिक, भावनिक, आर्थिक, जीवशास्त्रीय अशा अंगाने चर्चा व्हावी, असे सुचवतात. इच्छुकांचे लेख संपादित करुन छापले जातील.- सं.]
---------------------------------------------------------------------

Comments

अत्यंत विचारप्रवण

लेख लिहिल्याबद्दल लेखिकेपर्यंत अभिनंदन पोहोचवावे.

याबद्दल माझे काही विस्कळीत विचार आहेत, पण मते बनवण्यासाठी अधिक अभ्यासाची गरज आहे. तेव्हा हा प्रतिसाद इथेच थांबवतो.

काय लिहावे?

लेख आवडला आणि विचार सुद्धा आवडले. पण या विषयाला अंत नाही. आशावाद - निराशावाद यावरचा एक संवाद म्हणून या विषयावर चर्चा करता येईल. सुचेल तसा सविस्तर प्रतिसाद लिहिण्याचा विचार आहे.

अवघड विषय पण...

"परमसखा मृत्यू : किती आळवावा.... " हे शिर्षक वाचताना आणि लेख वाचताना त्यातील गाभा समजल्यावर मला पटकन आठवले ते भा.रा. तांब्यांचे आणि लताच्या आवाजात स्वरबद्ध झालेले सुप्रसिद्ध गीत: "नववधू प्रिया मी बावरते, लाजते पुढे सरते, फिरते... कळे मला तू प्राणसखा जरी, कळे तूच आधार सुखा जरी, तुजं वाचून संसार फुका जरी... मन जवळ यावया गांगरते".

शाळेत कधीकाळी या गाण्याचा अर्थ जेंव्हा समजला की तांबे ही कविता साक्षात मृत्यूस आपला नवरदेव आणि स्वतःस त्याची नववधू म्हणत मृत्यूस एकीकडे कवटाळण्यासाठी आतूर तर दुसरीकडे थोडे लांबूनच... अशी अवस्था वर्णितात आहेत. वरील लेखात, लेखिका म्हणते की, "..बहुतेक वृध्दांशी चर्चा केली तर त्यांची प्रतिक्रिया ``नकोरे बाबा एवढं लांबलचक आयुष्य!`` अशीच असते." पण त्यापुढे त्यांनी अजून एक प्रश्न त्याच व्यक्तिंना विचारायला हवा की "जर इतके लांबलचक आयुष्य नको असेल, तर मृत्यू कधी हवा आहे? आज आला तर चालेल का उद्या का तशी वेळ आत्ता सांगता येत नाही?" मला वाटते की बहुतांशी माणसांना मृत्यू हा अनिश्चित काळात कुठेतरी दूरवरच हवा असतो, अगदी कितीही लांबलचक आयुष्य नको असले तरी देखील.

लेखात विषयासंदर्भात जी काही भारतीय उदाहरणे आली आहेत त्याबद्दल पण इच्छामरण या पेक्षा जरा वेगळे म्हणावेसे वाटते - सन्मान्य आणि दुर्दैवी अपवाद हा साने गुरूजींचा ज्यांचे मरण हे कायद्याच्या दृष्टीने आत्महत्या या सदरात मोडणारे होते. पण महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर गेल्या शतकात तीन विनायक होवून गेले ज्यांनी "प्रायोपवेशन" हे आयुष्यात परीपुर्ती झाल्यावर स्विकारले. एक वर आधी आल्याप्रमाणे विनायक दामोदर सावरकर, दुसरे विनोबा भावे तर तिसरे कुष्ठरोग्यांसाठी काम करणारे विनायकराव (आत्ता आडनाव विसरलो). पण त्या तिघांनी स्वत:ची कर्तव्ये पूर्ण झाल्यावर हळू हळू जीवनावश्यक गोष्टी त्यागून मरण स्विकारले. मला आठवते आहे की विनोबांनी जेंव्हा प्रायोपवेशन करायचे ठरवले तेंव्हा काहीजण कोर्टात धावले होते की ही आत्महत्या आहे म्हणून, पण नक्की कारण काय झाले ते माहीत नाही पण ती आत्महत्या ठरली नव्हती. अर्थात हा झाला कायद्याचा मुद्दा. ज्ञानेश्वर आणि हे तीन विनायक हे सन्मान्य अपवाद. त्यांनी केले म्हणून इतरांनी ते करावे अथवा इतर ते करू शकतील अशातला भाग नाही. किंबहूना महाराष्ट्रात इतका मोठा संतसंप्रदाय झाला पण संजीवन समाधी ही एका ज्ञानेश्वरांपुरतीच मर्यादीत राहीली. त्याचे डोळस अथवा अंधानुकरण, योग्यता असूनही इतर संतांनी केले नाही. ... ज्यानी स्वतः मरण स्विकारले नाही अशा थोरामोठ्यांची गेल्या दिडएक शतकातील उदाहरणे पाहील्यास काय दिसते?

  • टिळक हे जीवनाच्या अखेरीस भान हरपण्याच्या क्षणापर्यंत देशाचा विचार करत होते, त्यांच्या शेवटच्या बडबडण्यामधे पण तेच येत होते...
  • भगतसिंग फासावर जाण्याआधी सोशालीस्ट क्रांतिवरील पुस्तके वाचत होता जरी त्याला मरण जवळ आले आहे आणि नास्तिक असल्याने पुढे काहीच नाही ही भावना होती तरी....
  • स्वतः दुर्गा भागवत ज्या ऋषितुल्य विदूषी होत्या त्यांनी देखील आयुष्य संपवताना निसर्गावरच भरवसा ठेवला आणि नव्वदीतपण ग्रंथ संपदा तयार करत राहील्या.
  • १९ व्या शतकाच्या शेवटी रामकृष्ण परमहंस हे घशाच्या कर्करोगाने ग्रस्त होते पण त्यांनी आयुष्य स्वतःहून संपवले नाही, जरी कधी संपणार आहे याची त्यांना कल्पना आली होती आणि मनाची पूर्ण तयारी झाली होती.
  • रा.स्व. संघाचे गोळवलकर गुरूजी हे देखील कर्करोगाने ग्रस्त होते, पण त्यांच्या तत्वासाठी आणी संघटनेसाठी कार्य चालू ठेवले. जेंव्हा कल्पना आली, त्या क्षणाला मात्र तुकारामाचा अभंग अंती लिहीला आणि सर्वांना नमस्कार करत खुर्चीवर बसून प्राण सोडला पण प्राणत्याग केला असे काही म्हणता येणार नाही.
  • याच गोळवलकर गुरूजींचे गुरूबंधू आणि रामकृष्ण परमहंसांच्या परीवारातील दुसर्‍या पिढीतील, आता ९६ वर्षांचे स्वामी सर्वगतानंद हे १९३५ सालपासून रामकृष्ण मठाचे काम करत आहेत. १९५४ सालपासून अमेरिकेत - बॉस्टनमध्ये वास्तव्य केले आहे. त्यांना दोनदा भेटण्याचा योग आला. साधारण १२-१४ वर्षांपुर्वी एकदा तर एकदा दिड वर्षापूर्वी - त्यांनी नव्वदी ओलांडल्यावर. अर्थातच त्यांनी आता रामकृष्ण मठाच्या सक्रीय कामकाजातून सहभाग काढला आहे, फिरणे अर्थातच कमी झाले आहे पण सल्लागार म्हणून वडीलकीच्या नात्याने काम करत रहातात. जगण्यावर कदाचीत इच्छा नसेलही पण म्हणून आपणहून मरण कवटाळणे त्यांनी स्विकारलेले नाही...
  • असे म्हणतात की गांधीजी म्हणायचे की "मी १२० वर्षे जगणार आहे". ते तसे जगले ही असते आणि अथक कार्य करत राहीले असते.

ही विविध वृत्ती/निष्ठांच्या मोठ्या व्यक्तींची उदाहरणे इतकेच सांगतात की जगण्याला सकारात्मक बळ मिळण्यासाठी मृत्यूची शाश्वती लागत नाही तर आयुष्यात काही तरी ध्येय लागते. ते प्रत्येकाचे वेगळे असू शकते. कुणाचे स्वतःपुरते मर्यादीत तर कुणाचे जगाचे कल्याण करणारे. दोन्हीचे महत्व हे आयुष्य परीपूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून कमी होत नाही.

आता राहता राहीला मुद्दा इच्छा मरणाचा. त्याचा कायदा केल्यास, मला कायम गंमतीत म्हणावेसे वाटते की एकाच्या इच्छेने दुसर्‍याचे मरण होणे वाढेल की काय! अर्थात म्हणूनच त्याला स्वेच्छामरण पण म्हणत असतील! गंमतीचा भाग सोडून द्या पण हा गुंतागुंतीचा प्रश्न आहे हे लेखिकेने पण मान्य केले आहेच. तेच मला म्हणावेसे वाटते. जेंव्हा भारत आंतराळ क्षेत्रात मोठा होतो, अथवा पोखरण २ आणि आता आण्विक करार करत महासत्ता बनत असतो, तेंव्हा बर्‍याचदा वाटते की अजून मूलभूत प्रश्न आपण सोडवलेले नाहीत, तर असल्या उड्या कशाला? कुठे तरी असेच स्वेच्छामरणासंदर्भात म्हणावेसे वाटते की आपण समाज म्हणून सध्याच्या काळात अजून इतके परीपक्व झालो आहोत का? जर नसलो तर हा कायदा करण्याची गरज काय? म्हणूनच मला स्वेच्छामरणाची तुलना ही वैद्यकीय गरज नसताना केल्या गेलेल्या सिझेरीयन बाळंतपणाशी कराविशी वाटते.

असे म्हणताना मी मरणोन्मुख व्यक्ती जी "जीवनाधार कृत्रिम व्यवस्थेवर - लाईफ सपोर्ट सिस्टीमवर " केवळ हृदय आणि डोके चालू आहे असे यंत्रावरील आलेखामुळे कळते त्या व्यक्तींबद्दल बोलत नाही आहे. त्यांच्या संदर्भात वेगळे निकष त्या व्यक्तींनी आधीच लिहून ठेवलेल्या इच्छेवर अथवा जवळच्या नातेवाईकांच्या म्हणण्यावर ठरवणे महत्वाचे वाटते. त्यासाठी योग्य अशा कायदेशीर तरतुदी असाव्यात पण म्हणून वयाच्या साठी/सत्तरी/ऐंशीत कशातही असोत जर हातपाय धड असतील तर उगाच स्वेच्छामरण असणे नको वाटते. पण असे दुर्दैवी प्रसंग सोडल्यास सर्वसामान्य माणसाने जे आयुष्य स्वेच्छेने मिळाले नाही ते "स्वेच्छेने म्हणत", पण बहुतांशी "अनिच्छेपोटी " निराशेने संपवणे हे श्रेयस्कर वाटत नाही तर मिळालेल्या आयुष्याचा स्वतःसाठी उपभोग आणि इतरांसाठी यथाशक्ती उपयोग करत ते घालवावे असे वाटते. त्यालाच वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम म्हणता येऊ शकेल.

असामान्य

प्रतिसाद चांगला आहे. पण त्यात दिलेली सर्व उदाहरणे ही माझ्या दृष्टीने असामान्य व्यक्तिमत्वे आहेत. मला एकच प्रश्न विचारायचा आहे की, माणसाला मरण हवेसे वाटण्याचे कारण काय? मला तरी मृत्युची भाषा करणारे हे निराशावादाचे प्रतिक वाटतात. विषय खुप् क्लिष्ट आहे. पण डोक्यात न थांबणारे विचार सोडुन जाणारा आहे.

तोच मुद्दा...

पण त्यात दिलेली सर्व उदाहरणे ही माझ्या दृष्टीने असामान्य व्यक्तिमत्वे आहेत.

माझा तोच मुद्दा होता. प्रकृती चांगली असताना स्वेच्छा मरण हा प्रकार हा सर्वसामान्य करणे बरोबर वाटत नाही. काही असामान्य व्यक्तींनी तसे केले तरी तसे प्रत्येक असामान्य व्यक्तीने केलेले नाही हे लक्षात ठेवणे महत्वाचे. मरणोसन्न अवस्था असताना मात्र काहीतरी कायदा असलेला योग्य ठरू शकतो हे ही तितकेच खरे.

प्रतिक्रिया प्रकाशित

आजचा सुधारक जाने २००९ मध्ये प्रकाशित
प्रकाश घाटपांडे

इच्छामरण - दयामरण

सर्वप्रथम, मंजिरीताईंचे एका चांगल्या लेखाबद्दल आणि वेगळ्या विचारांवर मत मांडण्यास उद्युक्त केल्याबद्दल धन्यवाद.

मरण हे एकमेव शाश्वत सत्य आहे असे मानले तरी सतत मरणाचा विचार करून मनुष्य जगत नाही हे देखील सत्यच आहे. वेळ-काळ योजून जनन नियोजीत करता येते त्याप्रमाणे माणसाला मरणही नियोजीत करता यावे, तो हक्क त्याला बहाल करण्यात यावा यासाठी आजवर अनेक प्रयत्न झाले आहेत पण त्याला बहुतांशवेळा अपयशच मिळाले आहे. मरण नियोजीत करण्याचे इच्छामरण आणि दयामरण या दोन वेगळे प्रकार आहेत असे वाटते.

इच्छामरण

इच्छामरण मागण्यासाठी/ अवंलबण्यासाठी मनुष्य हा मानसिक दृष्टीने सक्षम असायला हवा. आपण स्वेच्छामरणाचा निर्णय घेतो आहोत यावर त्याचा ठाम विश्वास असायला हवा. सदर कृत्य तो एखाद्याच्या सांगण्यावरून किंवा भरीला पडल्याने करत नाही हे त्याला सिद्ध करून देता यावे. सदर निर्णय झटक्यात घेता येणार नाही हे लक्षात घेता, व्यावहारिक दृष्ट्या ही गोष्ट किंचित कठीण वाटते.

आत्महत्या हा पलायनवाद झाला. अत्यंत निराशेपोटी माणूस तो अवलंबतो परंतु त्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन अयोग्य वाटते. इच्छामरणाला आत्महत्या म्हणावे का याबाबत साशंकता वाटते. आत्महत्याही बहुधा गुप्तता राखून किंवा मागचा पुढचा विचार न करता झटक्यात घेतलेल्या निर्णयाने केली जाते. इच्छामरणासाठी आपली आणि आपल्या आप्तांची मनाची तयारी करून देणे गरजेचे वाटते. भीष्म पितामहांनी जे अवलंबिले ते इच्छामरण कारण शरशय्येवरूनही ते पांडवांना उपदेश करत राहिले, इतरांना पूर्ण कल्पना देऊन प्राण त्यागला.

सावरकरांचे मरण हे इच्छामरणच असावे. अशाप्रकारचे मरण अवलंबताना मी आणखीही काही वृद्धांना पाहिले आहे. त्यांची वासना कमी होत जाऊन अन्नपाण्याचा त्याग केला जातो हे समाजात घडताना पाहिले आहे. त्यावर कायदा आक्षेप घेतो असे दिसत नाही. परंतु हे न होता, आपले मरण इतरांनी आपल्याला बहाल करावे असा विचार म्हणजे इतरांकडून आपला खून करवून घेणे आहे असे वाटते.

दुर्गाबाईंनी म्हटल्याप्रमाणे

ज्याच्या नशीबाला असह्य शारिरीक वेदना आहेत; ज्याच्या मानसिक भौतिक संवेदनांचा अंतच झालेला आहे, किंवा ज्याचं जगुन संपल आहे त्याला जर सुटका हवी असेल, तर त्याला लोळत घोळत दीनवाणे मरण येण्यापेक्षा, सन्मानाने विनायातना चटकन मरण येणं हा त्याचा हक्क आहे असे मी मानते.

प्रत्येक माणसाची सहनशक्ती वेगवेगळी असते. कॅन्सरमुळे होणार्‍या असह्य वेदनांतून जाणारी आणि तरीही आनंदी राहण्याचा प्रयत्न करणारी एक लहान मुलगी मी पाहिली आहे तर मायग्रेनमुळे जीव द्यावासा वाटतो म्हणणारी प्रौढ माणसंही पाहिली आहेत. यावरून शारिरीक वेदनांचे आणि सहनशक्तीचे मापदंड ठरवणे हे कठीण काम वाटते. दुसरं म्हणजे, विनायातना मरण यावं ही प्रत्येकाची इच्छा असते परंतु वैद्यकी पेशाला ती साजेशी गोष्ट वाटत नाही. खुट्ट झाले की मरण पाहिजे असे लोक म्हणू लागले तर वैद्यकशास्त्राचा हा पराभव मानावा लागेल. वैद्यकशास्त्र सहसा माणसाचे जीवन सुकर व्हावे या हेतूने कार्य करते.

एखाद्याचे जगून संपलं आहे हे तरी कितपत खरे? अमेरिकेत राहून ८० वर्षांचे वृद्ध प्रवास करतात, खेळतात, प्रेमात पडतात, लग्न करतात त्यांचे मला अतिशय कौतुक वाटते. एकदाच मिळालेल्या आयुष्याचा उपभोग ते अद्यापही घेत आहेत याची जाणीव होते. जगात थोड्या अधिक फरकाने प्रत्येकाला आपण आणि आपले आप्त हे अमरत्वाचा पट्टा घेऊन अवतरले आहेत असे वाटत असते. आपल्या मृत्युची घटका जवळ आल्याचे लक्षात येताच ती लांबवावी कशी याचा विचार सर्वसामान्य माणसांच्या मनात येतो. आयुष्यात कधीतरी निराशेपोटी मरणाचा विचार मनात आला तरी प्रत्यक्ष आत्महत्येपर्यंत पोहोचणारी माणसे अतिशय थोडकी असतात आणि एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला/ फसला म्हणून पुन्हा पुन्हा करणारी त्याहूनही कमी असतात आणि जी असतात त्यांना मानसिक व्याधी असल्याचे मानले जाते.

लेखात आलेल्या सॉक्रेटिसच्या उदाहरणावरून पाश्चात्य जगात आत्महत्येला प्रतिष्ठा होती असे वाटत नाही. सॉक्रेटिसला मृत्युदंडाची शिक्षा झाली होती आणि तीतून सुटण्याचे मार्ग नाकारत त्याने दिले गेलेले हेम्लॉक प्याले अशी कथा वाचण्यास मिळते. समाधी या मृत्युला मात्र प्रतिष्ठा असावी परंतु ती देखील संन्यास घेतलेल्यांसाठीच मर्यादीत असावी असे वाटते. अशाप्रकारे जपानमधील सामुराई योद्ध्यांनाही प्रसंगी आपले प्राण घेण्याचे शिक्षण दिले जाई परंतु तेही त्या गटापुरतेच मर्यादित वाटते आणि समाज संकल्पना वाटत नाही.

दयामरण

दयामरणाचे मला वाटतं दोन प्रकार असतात - स्वसंमतीने मागितलेले दयामरण आणि परसंमतीने अंमलात आणलेले दयामरण. यापैकी स्वसंमतीने मागितलेले दयामरण हे इच्छामरणाशी जुळते वाटते. परसंमतीने अंमलात येणार्‍या मरणाबद्दल मात्र कायद्याने अनेक बंधने येतात. ब्रेनडेथ, मरगळलेल्या भाजीसारख्या किंवा तत्सम अवस्थेत असलेल्या रुग्णाला डॉक्टर्स, कुटुंबीय आणि कायदा यांच्या सहाय्याने दयामरण देणे एकवेळ ठीक वाटते परंतु अशक्यप्राय परिस्थितीतूनही परत येणारे रुग्ण आहेतच.

पुन्हा येथे सांगावेसे वाटते की जननात हस्तक्षेप झाला म्हणून मरणात हस्तक्षेप करावा ही वैद्यकशास्त्रामागील शुद्ध हेतूची धारणा नसावी (चू. भू. दे. घे.) येथेही मरणासन्न जीवाला दयामरण द्यायचे झाले तर कोणता मार्ग अवलंबला पाहिजे यावर मतभेद दिसतात. मरणप्राय रुग्णाचा जीवनाधार काढून घेणे हे डॉक्टरने करणे म्हणजे फाशीची शिक्षा अंमलात आणणार्‍या जल्लादाप्रमाणे झाले असा मतप्रवाह दिसतो. तर, देण्यात येणारे उपचार हळू हळू कमी करून मृत्यु द्यावा असा दुसरा विचारप्रवाह दिसतो.

संपूर्ण प्रतिसादाचा गोषवारा इतकाच की स्वेच्छामरण/ इच्छामरण या कल्पना सुखदायी वाटल्या तरी कायद्याच्या आणि समाजाच्या दृष्टीने त्यात बर्‍याच अडचणी निर्माण होणे शक्य आहे आणि जगातील कोणताही समाज अद्याप या कल्पना राबवण्यास तयार आहे असे वाटत नाही.

प्रतिक्रिया पकाशित

आजचा सुधारक जाने २००९ मध्ये प्रकाशित
प्रकाश घाटपांडे

स्ट्रुल्डब्रुग - गलिव्हरच्या प्रवासातले चिरंजीव

दुर्गाबाईंच्या लेखनातले उतारे वाचून हा साहित्यिक संदर्भ मनात आला -
गलिव्हर लापुटा बेटावर जातो तेव्हा तिथल्या लोकांशी गप्पा मारताना त्याला समजते की त्या बेटावरचे काही लोक जन्मतःच चिरंजीव म्हणून जन्माला येतात. गलिव्हर त्यांच्या सौभाग्याबद्दल अत्यंत आनंदित होतो - इतके आयुष्य असते तर कोणी ते कसे सत्कारणी लावु शकते असे बडबडू लागतो. त्याच्याशी बोलणारा त्याला सांगतो की चिरंजीवी असण्यासारखे दुर्दैव नाही. भावंडे, मित्रमंडळी सर्व मरून जातात, पिढी बदलते तशी भाषा बदलते, विचारसरणी बदलते. चिरंजीवी व्यक्ती एकाकी पडते. एका शतकातला चिरंजीवी दुसर्‍या शतकातल्या चिरंजीवीलाही समजून घेऊ शकत नाही, मग अल्पायुषी नव्या पिढीतल्या लोकांशी कसे जमणार... इ.इ. (इंग्रजी पाठ्याचा दुवा)

मंजिरी घाटपांडे यांनी फार विचार करून हा लेख लिहिलेला आहे. आणि अनेक प्रतिसादकर्त्यांनी विचारपूर्वक माहिती जोडलेली आहे. जाता जाता माझे मत असे की असामान्य व्यक्तींसाठी एक कायदा आणि आम्हा सामान्यांसाठी वेगळा हे ठीक वाटत नाही. "अ"सामान्यांचा जीवनक्रम पटल्यास अनुकरणीय मानण्यात त्यांचा आदरच आहे. न पटल्यास त्यांचेही वागणे चुकले म्हणण्यातच त्यांचा आदर आहे.

"इच्छामरणा"बद्दल कायदे कार्यक्षम असू शकतील की नाही याबद्दल केवळ कल्पनांचेच खेळ करण्याची गरज नाही. विदा विश्लेषणही केले जाऊ शकते. अमेरिकेतील ओरेगॉन राज्यात "डेथ विथ डिग्निटी" (आत्मसन्मानात मृत्यू) हा कायदा गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. त्याच्या अंमलबजावणीबद्दल आकडेवारी राज्यसरकारच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे (दुवा).

फरक

अमेरिकेतील ओरेगॉन राज्यात "डेथ विथ डिग्निटी" (आत्मसन्मानात मृत्यू) हा कायदा गेली अनेक वर्षे कार्यरत आहे.

वर प्रियालीने म्हणल्याप्रमाणे "डेथ विथ डिग्नीटीस" "दयामरण" हा शब्द वापरता येईल. त्यात मरणोन्मुख व्यक्तीसंदर्भात मृत्यूची अनैसर्गिक सोय असणे हा भाग येतो. तो मला देखील योग्य कायदा करून मान्य असल्याचे मी वर म्हणले आहे.

इच्छामरण हा शब्द आणि त्यासंबंधीची चळवळ आठवते त्या प्रमाणे "मंडलीक" नावाच्या व्यक्तीने महाराष्ट्रात आणि भारतात चालू केली होती. त्यांचे म्हणणे होते की वयाच्या पंचाहत्तर वर्षांनतर धडधाकट असले तरी मरण घेता यावे. त्यांनी स्वतःच्या बाबतीत तसे कायदा मोडून केले देखील. आक्षेपाचा मुद्दा आहे तो या संदर्भात.

म्हणूनच असामान्य व्यक्तींची उदाहरणे देत असताना देखील हेच दाखवले की सर्व असमान्य व्यक्ती मृत्यूस कवटाळत नाहीत तर त्यातील सन्मान्य अपवादच तसे क रतात आणि तरी देखील इतर त्यांचे त्याबाबतीत अनुकरण करत नाहीत. तसे करताना या अपवादात्मक व्यक्तींनी एकतर योगसमाधी घेतली अथवा प्रायोपवेशन (ज्यात हळू हळू अन्न, पाणी सोडत प्राण सोडला जातो)... पहीले करायला योगशास्त्रसंपन्न हवे तर दुसरे करायला कोणीच आडवत नाही आणि त्यासाठी कायद्याची गरजपण नाही. शिवाय त्यात हळू हळू मृत्यूस सामोरे जाणे असल्याने खरा निर्धार असल्याशिवाय तो संकल्प कोणी तडीस नेऊ शकत नाही...

परत हे कोणाबद्दल बोलले जाते तर ज्यांची प्रकृती चांगली आहे त्यांच्या संदर्भात.

हेच म्हणतो

पहीले करायला योगशास्त्रसंपन्न हवे तर दुसरे करायला कोणीच आडवत नाही आणि त्यासाठी कायद्याची गरजपण नाही.

हेच म्हणतो...

प्रकाशित

धनंजयाची प्रतिक्रिया आजचा सुधारक जाने २००९ मध्ये खालील टिपणीसह प्रकाशित.
[ धनंजय म्हणजे आजचा सुधारक - डिसेंबर २००७ "विज्ञानाबाबत माझी पुर्वपीठिका' लिहिलेले बाल्टिमोर चे धनंजय वैद्य]
प्रकाश घाटपांडे

जन पळभर म्हणतील...

इच्छा मरण म्हणजे काय? त्यापेक्षा मला वाटत आपण मरणाची व्याख्या समजून घेणे गरजेचे आहे. आता या व्याख्येला वेगवेगळे पैलु आहेत. मानवी जीवनाचा अंत, आत्मा शरीर सोडुन जातो वगैरे वगैरे...
मला वाटतं की याचा एक अर्थ जबाबदार्‍यांपासून कायमची नैसर्गीक अथवा अनैसर्गीक मुक्तता. काही लोक आपले आयुष्य ध्येयाने पेटुन जगतील, ध्येय गाठल्यावर कोणाला जर असे वाटले की आता माझ्या जगण्याचे कारण संपले, तर मग आनंदाने मरण पत्करायचा मार्ग जर कोणी अन्न - पाणी सोडून निवडला तर काय चूक आहे? त्यासाठी कायदा कशाला हवा? तसेच असलेल्या ध्येयाच्या मार्गात येणार्‍या संकटांना कंटाळून कोणी हाच मार्ग अवलंबवला तर?
अनेकदा कोणी अचानक मृत्यु पावल्यास असे म्हटले जाते की बघा हो, बर्‍याच जबाबदार्‍या आता यांच्यावर सोडून गेला/गेली. मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की माणसाला मरण पत्करत असताना त्याच्या जबाबदार्‍यांची भावना ही मरण हवं की नको ते योग्य/अयोग्य ठरवते. आता मला मरायचं आहे. जे जगलो त्यात मी समाधानी आहे असं म्हटलं तर माझे कुटुंबीय मला तसे करू देतील काय? ते मला त्यांच्यासाठी जबाबदार धरतातच.
खरतर

"जन पळभर म्हणतील हाय हाय
मी जाता राहिल कार्य काय?"

या ओळींमध्ये मृत्यु आनंदाने स्वीकारणे योग्य आहे हे चटकन पटते. मग तो हवाच, मग कसा हवा वगैरे उगाच अट्टाहास वाटतो आणि त्यासाठी कायदा हा तर आपल्या मृत्युला आपणच स्वीकारण्यासाठी केलेला जबाबदारी वाटून घेण्याचा एक अट्टाहास वाटतो. कायदा म्हटलं की पळवाटा या आल्याच तसेच त्याचा गैरवापर आलाच. ज्याला मृत्युला कवटाळायचेच असेल तो आपला मार्ग कसाही स्वीकारतो. मग एखादा सैनिक देखील गोळ्यांची बरसाता सुरु असताना शत्रुवर हल्ला करण्यासाठी इच्छामरण स्वीकारतो असेच म्हटले पाहिजे. या उदाहरणात असे म्हणायला हवे की देशाच्या रक्षणाच्या वरकरणी कारणासाठी इच्छामरणाची व्यवस्था कायद्याने केली आहेच.
या उलट ज्याला फाशीची शिक्षा झाली आहे. पण जगण्याची इच्छा आहे, त्याचे काय? त्याच्यासाठी उलट कायदा? त्या गुन्हेगाराने केलेला गुन्हा हा त्याच्या भावनांचा अतिरेक समजून वेगळी शिक्षा द्यावी. सक्तिच्या मरणाचा कायदा का? कायदा म्हणलं की समाज येतो, समाज म्हणलं की एक चौकट येते. आता या चौकटीत मृत्यु हा एक असा विषय आहे कि जो समाजाला सहजासहजी पचनी पडत नाही. म्हणून पचनी पाडण्यासाठी कायद्याची गरज हिच मुळी अट्टाहासाची गोष्ट आहे. ज्याला हसत मृत्यु स्वीकारायचा आहे त्याने वर लिहिलेले मार्ग अवलंबावावेत. तुमच्या मानसीक कमकुवतपणावर पांघरुण घालायला कायद्याची चादर हवी हे मात्र पटत नाही.

जाता जाता घाटपांडे साहेबांना एक प्रश्न : एखाद्याच्या पत्रिकेत मृत्युयोग आहे असे कळते का? जर नसेल तर असे कायदे करून योग जुळवून आणता येतात का?

फायदा


जाता जाता घाटपांडे साहेबांना एक प्रश्न : एखाद्याच्या पत्रिकेत मृत्युयोग आहे असे कळते का? जर नसेल तर असे कायदे करून योग जुळवून आणता येतात का?


जन्म योग आपल्या हातात नाही.
मृत्यु योगात हे अडथळे. http://mr.upakram.org/node/811 येथील प्रश्नक्रमांक २० वाचा.
आता राहिला लग्नयोग. हा योग जुळवुन फायदे मात्र करुन घेता येतात.

प्रकाश घाटपांडे

प्रतिक्रिया प्रकाशित

आजचा सुधारक जाने २००९ मध्ये प्रकाशित
प्रकाश घाटपांडे

जैन धर्मीयांचे संथारा व्रत

मराठी असे आमुची मायबोली |
***********************************
जैनधर्मीयांचे संथारा व्रत:
जैनधर्मीयांचे सरासरी आयुर्मान इतरांहून अधिक असते(पूर्वी होते).(कदाचित्‌ याला शाकाहार कारणीभूत असू शकेल).त्यामुळे वृद्धांची संख्या सतत वाढणारी.जैन समाजधुरीणांनी या समस्येवर विचार करून संथारा या धार्मिक व्रताची निर्मिती केली असावी.या व्रताचे नियम माहित नाहीत. पण हा प्रायोपवेशनाचाच एक प्रकार आहे.धार्मिक अधिष्टानामुळे या व्रताला समाजमान्यता आणि प्रतिष्ठा आहे.हे धर्माचरण असल्याने इथे आत्महत्येच्या अपराधाचा प्रश्न उद्भवत नाही.व्रतधारक व्यक्तीला धार्मिकतेचे पाठबळ असते.त्यामुळे मानसिक तयारी होते.
इच्छामरणाचा कायदा झाला नाही तर जैन धर्म स्वीकारणे हा चांगला पर्याय ठरावा असे वाटते.अशा धर्मपरिवर्तनाविषयी काहीच माहिती नाही. पण ते शक्य असावे असे वाटते.
वृद्धापकाळामुळे व्यक्ती परावलंबी झाली, अंथरुणाला खिळून राहिली की ते भारभूत जगणे नकोसे होणे साहजिक आहे. अशावेळी मृत्यू विनायातना आणि सन्मानपूर्वक यावा यासाठी इच्छामरणाचा कायदा आवश्यक आहे.जैन धर्माचा स्वीकार हा नंतरचा पर्याय आहे.

संथारा एक व्रत आहे.

आपले जिवन आता पूर्ण झाले आहे आणि आता जगणे केवळ एक ओझे आहे असे वाटत असताना हे व्रत स्विकारायचे असते.

भरपूर जिवन आणि हे व्रत अशी सांगड मात्र करता येणार नाही आणि करायला नको.

प्रतिक्रिया प्रकाशित

आजचा सुधारक जाने २००९ मध्ये प्रकाशित
प्रकाश घाटपांडे

छान लेख

सुंदर लेख.. मंजिरीताईंना अभिनंदन कळवावे.
माझ्या मते दयामरण असावे त्याचबरोबर (धडधाकट असनाही) स्वेच्छामरणाचीही तरतूद असावी व ते घेऊ द्यायचे की नाहि हे कोर्टाने ठरवावे असे वाटते. फाशीप्रमाणेच इतक्या मोठ्या घटनेच्या निर्णयाची जबाबदारी ती व्यक्ती अथवा त्याच्याशी संबंधीत नातलग यांवर न सोपवता कोर्टात ठरावे असे वाटते.

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

छापील प्रतिक्रिया येथे पहा

आपल्याला छापील प्रतिक्रिया http://drop.io/praghat येथुन उचलता येतील्.
प्रकाश घाटपांडे

छापील प्रतिक्रिया येथे पहा

आपल्याला छापील प्रतिक्रिया http://drop.io/praghat येथुन उचलता येतील्.
प्रकाश घाटपांडे

 
^ वर