आर्यांचे मुळस्थान कोणते? : डॉ. आंबेडकर - २

आर्यांच्या मुळस्थानबद्दल डॉ. आंबेडकरांचा मुळ लेख हा बराच मोठा आहे, त्यात हिंदू तसेच इतर धर्मग्रंथातील संदर्भ दिलेले आहेत, जसे वर्ण या शब्दाचा उल्लेख इराणी वांङ्मयात येतो. "वर्ण" किंवा "वरेण" हा शब्द "झेंद अवेस्ता"(Zenda Avesta) मध्ये ६ वेळा वापरलेला आहे. "झेंद अवेस्ता" मधिल "वर्ण" किंवा "वरेण" च्या उल्लेखाबद्दल दिलेले स्पष्टिकरण जवळजवळ दोन ते तीन पानांचे आहे. त्यामुळे आंबेडकरांचा मुळ लेख इथे उतरवणे शक्य नव्हते, मला जो भाग महत्वाचा वाटला तो इथे उतरवला आहे. त्यामुळे कदाचीत हे लेख अपुर्ण वाटू शकतात.( तसे असल्यास त्यास मी जबाबदार ठरतो.)

आर्य वंशाचे दोन पंथ होते.

आर्यांनी भारतावर स्वारी केली व दास व दस्यू यांना जिंकले या सिध्दांताला जे लोक उचलून धरतात त्यांनी ऋग्वेदातील काहि ऋचांकडे कानाडोळा केलेला आहे. या ऋचा लक्षात न घेता त्या सिध्दांताची ज्यांनी उभारणी केली त्यांचा सारा खटाटोप व्यर्थ आहे, असे त्या ऋचा वाचल्यानंतर लक्षात येते. त्या ऋचा खाली देत आहे.

१. ऋग्वेद, ६-३३-३ - "हे इंद्रा! आमचे शत्रु दास व आर्य या दोघांनाही तू ठार केले आहेस."
२. ऋग्वेद, ६-६०-३ - " सन्मार्ग आणि सध्दर्म यांचे पालन करणार इंद्र व अग्नी यांनी आम्हाला घायाळ (दुखापत) करणारे दास व आर्य यांना नेस्तनाबूद केले."
३. ऋग्वेद, ७-८१-१ - "सुदामाचे शत्रु दास व आर्य यांना इंद्र व वरूण यांनी ठार मारले व त्यांनी दास व आर्य यांच्यापासून सुदामाचे रक्षण केले."
४. ऋग्वेद, ७-२४-२७ - "हे इंद्रा! सिंधू नदिच्या तीरावर राहाणार्‍या क्रूर राक्षसांच्या आणि आर्यांच्या तावडीतून तू आम्हाला मुक्त केलेस. तू दासांच्या हातातून त्यांची शस्त्रे हिरावून घे."
५. ऋग्वेद, १०-३८-३ - "हे परमपूज्य इंद्रा! अधार्मिक दास व आर्य हे आमचे शत्रू आहेत. त्यांचा सहजपणे पाडाव करण्याचे सामर्थ आमच्यात येवो, तु आम्हाला आशीर्वाद दे. तुझ्या साहाय्याने आम्ही त्या शत्रूंना ठार करू"
६. ऋग्वेद, १०-८६-१९ - "हे ममेयूं! जो तूझी प्रार्थना करतो त्याला तू सर्वप्रकारचे सामर्थ देतोस. आपले शत्रू आर्य व दस्यू यांचा आम्ही तुझ्या मदतीने संहार करू."

वरील ऋचा आर्य ऋषींनी तयार केलेल्या असल्या पाहिजेत. त्या ऋचांतील अर्थ आर्य वंशाविरूध्द आहेत. या दोन गोष्टी लक्षात घेतल्या तर असे अनूमान काढता येते की आर्यांचे दोन वर्ग होते व ते परस्परांपासून सर्व दृष्टीने भिन्न होते व म्हणूनच ते वैरभावाने परस्परांशी वागत व झगडत होते. आर्यांचे दोन वेगवेगळे वर्ग अस्तित्वात होते हे सत्य होते व ते सत्य सिध्द करणारे अनेक पुरावे आहेत.

आर्यांचे दोन वेगवेगळे वर्ग अस्तित्वात होते. त्याचा एक पुराव असा की, निरनिराळ्या वेदांना पवित्र मानण्याबद्दल आर्यांत पुष्कळ दिवस वितंडवाद चालला होता. वेदांचा ज्यांनी कसून अभ्यास केलेला आहे त्यांची खात्री झालेली आहे की, खर पाहिले असता ऋग्वेद व अथर्ववेद हे दोन ग्रंथ वेद या पदवीला योग्य आहेत. सामवेद व यजुर्वेद हे ऋग्वेदाचे केवळ निरनिराळे भाग होत.
ऋग्वेदाला जितके पवित्र मानावे, तितकेच अथर्ववेदाला पवित्र मानावे, या गोष्टीला ब्राम्हण लोकांनी पुष्कळ वर्षे विरोध केलेला होता, ही गोष्ट वेदाभ्यासी पंडितांना माहित आहे.
ऋग्वेद व अथर्ववेदाला समसमान पवित्रपणा देण्यस ब्राम्हण का तयार नव्हते?
ऋग्वेदाला पवित्र तर अथर्ववेदाला अपवित्र मानण्याकडे ब्रांम्हणांची मनोवृत्ती का धावत होती?
माझ्या मते या प्रश्नांचे उत्तर असे आहे की. ऋग्वेद हा एका वर्गातील आर्यांनी रचला व अथर्ववेद हा दुसर्‍या वर्गातील आर्यांनी रचला, आणि हे दोन्ही वर्ग परस्परात मिसळून आर्यांचा एक वर्ग तयार झाला. तेंव्हा ऋगवेद व अथर्ववेद यांना समसमान पवित्रपणा देण्यात आला.

याशिवाय दुसरे पुरावे सर्व ब्राम्हणी वांङ्मयात इतस्ततः विखुरलेले आढळून येतात. हे पुरावे विशेषतः विश्वोत्पत्तीसंबंधी जे दोन सिध्दांत मांडण्यात आलेले आहेत त्यात दिसून येतात. या दोन सिध्दांतावरून असे सूचित होते की, ते आर्यांच्या दोन वर्गाने मांडलेले असावेत.

तैत्तिरीय संहिता, शतपथ ब्राम्हण, तैत्तिरीय आरण्यक, महाभारताचे वनपर्व, महाभारताचे आदिपर्व, रामायणातील दुसरे कांड, रामायणातील तिसरे कांड, तसेच पुराणातील काहि संदर्भ- जसे सूर्यवंशी लोकासंबंधी विष्णू पुराणातील गोष्ट, तशाच स्वरूपातील सोमवंशी लोकांसंबंधी गोष्ट...(मूळ लेखामधील सिध्दांताचे सविस्तर वर्णन मी इथे देत नाही , तर फक्त त्या ग्रंथांचा उल्लेख येथे करत आहे)

विश्वोत्पत्तीसंबंधीचे उपरिनिर्दिष्ट खुलासेवजा सिध्दांताची तुलना केली तर आपणाला काय दिसून येते? मला वाटते कि, या तुलनेतून पुढील मुद्दे उपस्थित होतातः-
१. विश्वोत्पत्तीसंबंधीचा एक सिध्दांत धार्मिक स्वरूपाचा आहे; तर दुसरा धर्मांतीत स्वरूपाचा आहे. (one is sacerdotal in colour and character, the other is secular()
२. मनू हा मानव असून तो सृष्टीचा कर्ता होय असे एक सिध्दांत मानतो; तर दुसरा सिध्दांत असे मानतो की, सृष्टीचा निर्माता ब्रम्हदेव किंवा प्रजापती आहे.
३. एक सिध्दांत ऐतिहासिक घटना सांगणारा आहे; तर दुसरा सिध्दांत अलौकिक घटनांची कथा सांगणारा आहे.
४. एक सिध्दांत जलप्रलयाची कथा सांगतो; तर दुसरा सिध्दांत त्याबद्दल ब्रसुध्दा काढीत नाही.
५. एक सिध्दांत चार वर्णांचे स्पष्टीकरण करण्याची मनीषा दाखवितो; तर दुसरा सिध्दांत समाजाची उत्पती कशी झाली, याचेच स्पष्टीकरण करण्याची मनीषा दाखवितो.

दोन प्रकारच्या सिध्दांतामध्ये असलेले उपरिनिर्दिष्ट फरक हे संख्येने बरेच व स्वरूपाने प्रमुख दर्जाचे आहेत हे स्पष्ट होते. चातुर्वर्ण्यासंबंधी जे निरनिराळे स्पष्टीकरण या दोन सिध्दांतांनी दिलेले आहे त्यातील फरक हा विशेषतः स्थूल मानाचा आहे. धार्मिक स्वरूपाचा जो सिध्दांत आहे त्यात चातुर्वर्ण्याला महत्व दिलेले आहे. धर्मविरहित स्वरूपाचा जो सिध्दांत आहे त्यात चारुर्वर्ण्याचे नावही नाही. मनूच्या संततीचे स्थित्यंतर चार वर्णात कसे झाले, हे दाखविण्याच्या हेतूने दोन्ही प्रकारच्या सिध्दांताची एकजूट करण्याचे प्रयत्न झाले, हे खरे आहे. ही गोष्ट रामायण व पुराणे यातील सिध्दांत लक्षात घेतले तर कळून येते. परंतू दोन्ही ध्येयवादी सिध्दांत एकत्र करण्याचा हा प्रयत्न होता हे स्पष्ट आहे. हा प्रयत्न जाणूनबुजून आणि पूर्वयोजनेनुसार झालेला आहे. परंतु या दोन्ही प्रकारच्या ध्येयवादी सिध्दांतात एवढा स्थूल मानाचा फरक आहे की, ते सिध्दांत एकत्र करण्याचा प्रयत्न झालेला असतानाही तो फरक स्पष्टपणे दृग्गोच्र होतो. या बाबतीत अशी गंमत झालेली आहे की, चातुर्वर्ण्याबद्दलचे एकच स्पष्टीकरण असण्याएवजी दोन स्पष्टीकरणे झालेली आहेत. एक पुरूषाने उत्पन्न केलेले चातुर्वर्ण्य व दुसरे मनूच्या पुत्रांनी पायरीपायरीने तयार केलेले चातुर्वर्ण्य. दोन्ही ध्येयवादी सिध्दांत एक करण्याचा प्रयत्न जो झाला त्याचा परिणाम अगदी ओंगळ स्वरूपाचा झाला. यावरून हेच सिध्द होते कि, ते सिध्दांत मूलतः वेगळ्या स्वरूपाचे आणि परस्परांशी न जुळणारे असे आहेत. हे भिन्न स्वरूपाचे दोन प्रकारचे सिध्दांत ब्राम्हणी वांङ्मयात असतानासुध्दा या विषयाचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे, अशा पंडितांनी त्याची दखल घेतलेली नाही, ही एक शोचनीय गोष्ट आहे. परंतु ते सिध्दांत अस्तिवात आहेत व ते विशेष प्रकारचे आहेत हि बाब डोळ्याआड करता येणार नाही. या सिध्दांताच्या अस्तिवात्वाचे जे महत्व आहे ते कोणते? मला असे वाटते की, परस्पर भिन्न अशा स्वरूपाचे जे हे दोन्ही प्रकारचे सिध्दांत आहेत ते निरनिराळ्या दोन आर्य वंशीयांनी मांडलेले असावेत. एक आर्य वंश चातुर्वर्ण्याला मानणारा असावा तर दूसरा आर्य वंश चातुर्वर्ण्याला मानणारा नसावा. हे दोन्ही वंश काहि काळानंतर परस्पारात मिसळले असावेत व त्यांना एकाच आर्य वंशाचे लोक म्हणून संबोधण्यात आले असावे. ही तर्कपध्दती जर सबळ वाटली तर दोन्ही सिध्दांतातील स्थूल भेद जो ब्राम्हणी वांङ्मयात दाखविण्यात आलेला आहे तो आपल्या नव्या सिध्दांताला (आर्य वंशाचे दोन पंथ होते) पोषक असाच पुरावा होतो.

क्रमशः (मूळ लेख इंग्लिशमध्ये आहे. हवा असल्यास व्य. नि. ने पाठवू शकतो.)

लेखनविषय: दुवे:

Comments

मूळ लेख

मला कृपया व्य. नि. ने पाठवावा. या भागावर प्रतिसाद नंतर देईनच. धन्यवाद.

व्य. नि.

मूळ लेख मलाही व्य. नि. ने पाठवा ही विनंती.
धन्यवाद.

इंद्र, अथर्ववेद, विश्वोत्पत्ती वगैरे

इंद्र ही मूळची मित्तानी देवता, मित्तानी राज्याच्या (आजचा इराकचा उत्तरेकडील भाग) आजूबाजूकडील अनेक प्रदेशांतून भारतात स्थलांतर झाले असावे. त्यामुळे कोण्या एका इंद्राने येऊन तथाकथित आर्य आणि तथाकथित दस्यूंवर स्वारी केली असावी हा सिद्धांत नाकारता येत नाही. तसेही स्थलांतर टप्प्याटप्प्याने झाले असेल तर इंद्राने स्वारी करण्यापूर्वी तथाकथित आर्य भारतात येऊन वसले असावेत. त्यांचे दोन वर्ग होते का याबाबत मात्र कल्पना येत नाही.

ऋग्वेद व अथर्ववेदाला समसमान पवित्रपणा देण्यस ब्राम्हण का तयार नव्हते? ऋग्वेदाला पवित्र तर अथर्ववेदाला अपवित्र मानण्याकडे ब्रांम्हणांची मनोवृत्ती का धावत होती?

वेदांबद्दल मला फारशी माहिती नाही परंतु अथर्ववेद हा जादू, तांत्रिक विद्या इ. शी निगडित असल्याने त्याला इतर वेदांइतके महत्त्व नाही असे कधीतरी ऐकले होते. तज्ज्ञांकडून या (गैर)समजावर प्रकाश टाकला गेला तर आवडेल.

विश्वोत्पत्तीसंबंधी जे दोन सिध्दांत मांडण्यात आलेले आहेत त्यात दिसून येतात.

मला वाटतं हिंदू पुराणांत एकच विश्वोत्पत्ती आहे आणि ती हिरण्यगर्भातून प्रजापतीने (ब्रह्मदेवाने[?]) उत्पन्न केल्याची कथा आहे असे वाटते. चू. भू. दे. घे. याबाबत इतरांची मते कळावीत. नासदीय सूक्तातही हिरण्यगर्भातून विश्वोत्पत्ती विषयी सांगितलेले आहे.

वर्णव्यवस्था लावणारा मनु आणि मानवजातीला वाचवणारा आद्य-मानव मनु या वेगळ्या व्यक्ति असाव्यात.

मत्स्यावताराप्रमाणे मनू हा मानवजातीचा आद्यपिता मानला जातो पण त्याने विश्वोत्पत्ती केलेली नाही. प्रलयातून मनुष्य आणि प्राणीगणाला वाचवलेले आहे. त्यामुळे दोन्ही कथा वेगळ्या वाटतात. तसेही मनूची गोष्टही इंद्राप्रमाणेच इंपोर्टेड असावी असा कयास आहे.

थोडस्स अजुन एक

"मनु " बद्दल.
मनु ही व्यक्ती नसून अधिकारपद आहे असं ऐकलयं.
(अगदि "व्यास" ह्या पदवी बद्दल सुद्धा. म्हणजे एखादा प्रकांडपंडीत वगैरे झाला रे झाला की त्याला "व्यास"ही उपाधी
मिळायची असं काही जणांचं म्हणणं आहे.)
त्यानुसारच "मन्वंतर"(=मनु+ अंतर) हा शब्द आलाय आपल्याकडे.
आपल्या पौराणिक(की वैदिक) सिद्धांतानुसार प्रलय केवळ एकच नाही तर अनेकानेक येउन गेलेत.
विश्वाची(मुख्यतः जीवसृष्तीची ) त्यात प्रचंड हानी झाली.
पण विश्व संपले नाही. जीवाचे काही ना काही अवशेष उरलेच एखाद्या शेवटच्या मानवासकट(किंवा शेवटच्या मानवाच्या कुटुंबासकट).
आणि ते पुनश्च जीव्-सृष्टीवसवु लागले.
मग पुन्हा त्यांची भरभराट.पुन्हा प्रचंड मोठा विनाश/प्रलय.
पुन्श्च नव्या जगाची सुरुवात. असं सृष्टीचक्र मानण्यात आलय.
त्यामुळे प्रत्येक युगात किंवा प्रत्येक प्रलयाच्या वेळी वाचलेला एक मनु असतोच.
म्हणजेच अनेकानेक प्रलय आणि त्याकारणे अनेकानेक मनु होउन गेलेत; आपल्या सिद्धांतानुसार.

जन सामान्यांचे मन

इंद्र, दास, दस्यु वगैरे.

हित्ताइत(Hittite) जमातीचा राजा आणि मित्तनि(Mitanni)जमातीचा राजा यांच्यामध्ये इ.स.पू. १४०० च्या सुमारास झालेल्या तहनाम्यात मित्र, इंद्र, वरुण व नासत्य(अश्विदेव) या देवांचा(?) नामनिर्देश आहे. बोघझ-कोइ येथे हे तहनामे सापडले. हित्ताइत भाषा ही वैदिक आणि अवेस्ता या भाषांपेक्षा प्राचीन. या भाषेत ऐक, तेर, पंझर, सत्त(एक, त्रि, पंच, सप्त) हे शब्द आहेत. यातील भाषादोष हे अक्कडियन लिपीमुळे झाले आहेत.
दास आणि दस्यू यांचा आर्यांशी संघर्ष झाला. आणि आर्यांनी त्यांना जिंकून जितजन म्हणून सांभाळले. दास आणि दस्यू वेगळे असावेत. शंबर, शुष्ण, चिमुरि, धुनि यां दस्यूंना इंद्राने जिंकले असे ऋग्वेदात म्हटले आहे. इंद्राने आर्यांशी युद्ध केले असल्यास माहीत नाही; इंद्र या आर्यांचाच देव(!) असल्याने ही शक्यता कमी वाटते.
अथर्ववेदात भैषज्यकर्मे, आयुष्यकर्मे, अभिचारकर्मे किंवा कृत्याप्रतिहरणकर्मे, स्त्रीकर्मे, सांमनस्यकर्मे, राजकर्मे, ब्राह्मणमाहात्म्य, पौष्टिककर्मे, शांतिकर्मे, आणि विश्वोत्पती व अध्यात्म्य असे दहा विषय हाताळले आहेत.
अभिचारकर्मांच्या या मंत्रांत शत्रू, राक्षस, कृत्या यांचा प्रतिबंध कसा करावा ते सांगितले आहे. या मंत्रांची भाषा काहीशी निष्टुर आहे.( असे काही मंत्र भैषज्यसूक्तांतही आहेत.) या मंत्रांत यातुधान(राक्षस), किमीदिन्‌(दुष्ट पिशाचांचा एक प्रकार) यांच्या विरुद्ध वापरायचे ताईत, आयुधे यांची माहिती आहे. शत्रूला मूत्रावरोध व्हावा म्हणून मंत्र आहेत. हा मंत्र पुढे वैद्यकीय उपाय म्हणून मान्य झाला. शत्रूच्या यज्ञातील आहुतींचा नाश कसा करावा, चेटुक कसे करावे आणि चेटक्यांचा नाश कसा करावा हेही मंत्र आहेत.
अथर्ववेदातील अभिचारमंत्रांच्या प्राधान्यामुळे त्या वेदास बराच काळ मान्यता नव्हती. अथर्ववेदाचे सर्पवेद, पिशाचवेद,असुरवेद, इतिहासवेद आणि पुराणवेद असे पाच उपवेद मानले जातात.
विश्वोत्पतीसंबंधी काही सूक्ते अथर्ववेदात आहेत. त्यांत काय लिहिले आहे ते शोधायला लागेल.
बाकी मनु, आणि विश्वोत्पतीबद्दल प्रियालींच्या मतांबद्दल विरोध नसावा.--वाचक्‍नवी.

विश्वव्यवस्था

>>मला वाटतं हिंदू पुराणांत एकच विश्वोत्पत्ती आहे आणि ती हिरण्यगर्भातून प्रजापतीने (ब्रह्मदेवाने[?]) उत्पन्न केल्याची कथा आहे असे वाटते. चू. भू. दे. घे. याबाबत इतरांची मते कळावीत. नासदीय सूक्तातही हिरण्यगर्भातून विश्वोत्पत्ती विषयी सांगितलेले आहे.<<
प्रातःकालचा सूर्य, निर्मल आणि अगाध जल, हासरी उषा, नभामधील तारकांचा संचार, पर्जन्य, वादळ, मेघगर्जना, विद्युत्‌प्रकाश या सर्वांच्या गतीमध्ये वैदिक प्रतिभेला एकाच नियमाचे नियंत्रण भासमान झाले. दिवस आणि रात्र, ऋतुचक्रांचे संवत्सररूप नियमित परिवर्तन, वनस्पतींच्या नियमबद्ध पत्र-पुष-फलरूप विकासक्रिया यांच्याकडे पाहून ऋषींच्या प्रतिभेला सृष्टीच्या सर्व व्यापारात व्रताचे पालन करण्याची प्रवृत्ती दिसली. विश्व हे नियमबद्ध आहे; इंद्र, वरुण, सविता, अग्नी, वायु, हिरण्यगर्भ इत्यादी सर्व देव त्या नियमांचे पालन करतात. या व्यवस्थेला ऋग्वेदात 'ऋत' असे संबोधले आहे देवांचा आदिदेव प्रजापती किंवा ब्रह्मा हा ऋतातूनच प्रथम उत्पन्‍न झाला, म्हणून त्याला ऋतज म्हणतात. अग्नी, सोम, वरुण सविता यांना ऋतावा म्हणजे ऋत धारण करणारे व ऋतपा म्हणजे ऋत पालन करणारे असे म्हटले आहे.
त्यामुळे ऋतातून जेव्हा ब्रह्मा झाला त्यापूर्वी विश्व होते असे दिसते.
प्रियाली म्हणतात तसे नासदीयसूक्तात(१०.१२९) सृष्टिपूर्व स्थितीचे वर्णन आहे, (१०.८१, ८२,१२१) इथे वाचस्पती, विश्वकर्मा, हिरण्यगर्भ भूतपती यांच्यासंबंधीची सूक्ते आहेत. तसेच पुरुषसूक्त(१०.९०) येथे विश्वपुरुष व त्याच्यापासून निर्माण झालेली सृष्टी यांचे वर्णन आहे. मात्र ही सूक्ते तर्कशुद्ध नसून कविप्रतिभेचा आविष्कार आहेत असे काहीजणांचे मत आहे. --वाचक्‍नवी

कविप्रतिभेचा आविष्कार

प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

ही सूक्ते तर्कशुद्ध नसून कविप्रतिभेचा आविष्कार आहेत असे काहीजणांचे मत आहे.

बहुधा माझेही. (परंतु तर्कशुद्धतेबद्दल जरा साशंक आहे.) मला असेही वाटते की ज्याप्रमाणे रस्त्यात दोन व्यक्ती भांडत असताना आपण अचानक तिथून जाऊ लागलो आणि आपल्याला त्यांच्या भांडणाचे कारण माहित नसेल तर आपण मनात बहुधा असं झालं असेल, तसं झालं असेल असे विचार करतो. कधीतरी घरी येऊन कुटुंबात तिच गोष्ट आपल्या समजूतीप्रमाणे सांगतो. ते विचार आणि आपण मनात धरलेली भांडणाची कारणे तर्कशुद्धही असावीत पण म्हणून सत्य असतात असे नाही. त्याचप्रमाणे आपल्या समजूतीनुसार, अनुभवानुसार आणि परिस्थितीनुसार विश्वोत्पत्ती, सृष्टीनिर्मिती यांची सूक्ते रचण्यात आली.

 
^ वर