आर्यांचे मुळस्थान कोणते? : डॉ. आंबेडकर
आर्यांचे मुळस्थान कोणते? याबद्दल बरेच वाद आहेत. एका चर्चेमध्ये नुकताच त्याचा उल्लेख झाला. जगातील अनेक विचारवंतांनी त्याबद्दल मते मांडली आहेत. भारतातील एक विचारवंत डॉ. भि. रा. आंबेडकर यांनी आर्यांच्या मुळस्थानाबद्दल १९४६ साली मते मांडली.
आंबेडकरांनी आर्यवंशाबद्दल व आर्यांच्या मुळस्थानाबद्दल प्रचलीत असलेल्या सिध्दांताचा या लेखामध्ये अभ्यास केलेला आहे. ते पुढिलप्रमाणे..
आर्य वंशाबद्दल बरेच मतभेद आहेत परंतू काहि अंगाबद्दल पुर्ण एकमत आहे ते येणेप्रमाणे: -
१. ज्यांनी वैदिक वांङमय तयार केले ते लोक आर्य वंशाचे होते.
२. हे लोक मुळचे भारताबाहेरचे. त्यांनी भारतावर स्वारी केली.
३. मुळ रहिवाशी दास व दस्यू या नावाने ओळखले जात. त्यांचा वंश व आर्यांचा वंश यात फरक होता.
४. आर्यांचा रंग गोरा होता. दास व दस्यू यांचा रंग काळा होता
५. आर्यांनी दास व दस्यू यांना जिंकून अंकित केले.
आर्यवंश या नावाच एक वंश अस्तित्वात होता, या पायावर सिध्दांताची उभारणी केलेली आहे, या मुद्दाचा प्रथम विचार करणे जरूर आहे.
हा आर्यवंश म्हणजे काय?
वंश म्हणजे काय? आनुवंशिकपण मिळालेले काही विशिष्ट मुणधर्म ज्यांच्यामध्ये दिसून येतात, अशा लोकांचा समाज, अशी "वंश" शब्दाची व्याखा करता येइल. शरीराच्या कातडीचा रंग आणि बांधा हवा व प्रदेश यावर अवलंबून असतात, त्यामुळे डोक्याचा आकार म्हणजे डोक्याची लांबी, रुंदी आणि उंची यांचे सर्वसाधारण प्रमाण लोकांचा वंश कोणता आहे, हे ठामपणे ठरविण्यास उपयोउगी पडते., असे मानवशास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञ समजतात.
प्रो. रिप्ले वंशशास्त्राचे अभ्यासक आहेत. त्यांच्या मते युरोपियन लोक तीन वंशाचे आहेत.
१. ट्युटॉनिक (लांब डोके)
२. आल्पाईन (सेल्टिक) (गोल डोके)
३. मेडिटॅरिनीयन (लांब डोके)
शारीरीक दृष्टीने पाहिले तर आर्य वंश अस्तित्वात आहे, असे वाटते का? या विषयावर दोन प्रकारची मते आहेत.
१. आर्य वंशातील लोकांची डोकी लांब असतात असे वर्णन मानववंशशास्त्रज्ञ करतात. परंतु हे वर्णन पुरेसे दिसत नाही. कारण लांब डोक्याचे दुसर्यारही वंशात आहेत. प्रो. रिप्ले यांच्या प्रमाणे युरोपातील दोन वंशाचे लोक लांब डोक्याचे आहेत. त्यापैकी कोणता वंश हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.
२. प्रो. मॅक्स मुल्लर, प्रो. बेनफे यांनी आर्यांसंदर्भात भाषाशास्त्राचा आधार घेतला आहे. आर्य लोकांचे मुळस्थान शोधून काढावयाचे तर ते मानववंशाची प्राथमिक भाषा असेल तीवरून शोधून काढावे लागेल, असे मत प्रो. बेनफे यांनी माडंलेले आहे. ग्रिक व वैदिक वांङमयात आर्य व इतर शब्दांच्या जवळपास जाणार्या शब्दांवरून सर्वसाधारणपणे एक भाषा बोलणार्या लोकांचा वंश वा विशिष्ट प्रकारचे अवयव असणार्या लोकांचा वंश या दोन्ही अर्थांनी प्रो. मॅक्स मुल्लर यांनी आर्यांचे अस्तित्व मान्य केले आहे.
वैदिक वांङमय चाळून पाहिले असता 'अर्य' व 'आर्य' हे दोन शब्द ऋगवेदांत सापडतात, 'अर्य' हा शब्द ऋग्वेदांत ८८ ठिकाणी वापरलेला आहे. (१) शत्रु , (२) सभ्य माणुस, (३) भारताचे नाव आणि (४) मालक, वैश्य किंवा रहिवाशी, अशा निरनिराळ्या अर्थांनी हा शब्द वापरलेला आहे.
"आर्य" हा शब्द ऋग्वेदांत ३१ ठिकाणी वापरलेला आहे. परंतु तो आर्य वंश या अर्थाने एकाही ठिकाणी वापरलेला नाही. वर केलेल्या विवेचनावरून असे स्पष्ट होते की, 'अर्य' व 'आर्य' हे दोन शब्द ऋगवेदांत वंशवाचक या अर्थाने मुळीच वापरलेले नाहित.
ग्रीक व हिंदी लोकांनी सिंहाला जे नाव दिले आहे त्या नावाचे आर्यांच्या मातृभाषेतील एकाही शब्दाशी साम्य जुळत नाही.
कॉकेशस पर्वताचा प्रदेश आर्यांचा मुळ प्रदेश आहे असे मत मांडणार्या विद्वानांचा दुसरा पक्ष आहे. कॉकेशियन लोक विशेष चेहर्याचे व बांध्याचे आहेत असे कोणी समजू नये. त्यांच्यात डोळ्यात भरण्यासारखे काहि नाही, निरनिराळ्या भाषा बोलनारे, अनेक धर्म पाळनारे, भिन्न -भिन्न चालीरीती पाळणारे लोक आहेत. ते एका प्रकारचे लोक नाहित तर ते अनेक लोकांची खिचडी आहे. अशा प्रकारचा प्रदेश आर्यांचे मुळस्थान कसा असू शकेल? उलटअंशी या प्रदेशात अनेक लोक येऊन राहिले व मेले त्यांच्याबरोबर त्यांच्या भाषा रितीभाती मातीत गाडल्या गेल्या.
नैसर्गिक दृष्ये, अलौकिक कथा व दंतकथा यांची जी वर्णने वैदिक वांड्मयात पाहावयास मिळतात ती उत्तर ध्रुवाजवळच्या नैसर्गिक दृष्याशी हुबेहुब हजुळतात. यावरून श्री. टिळकांनी आर्क्टिक प्रदेश हाच आर्यांचा मुळ प्रदेश असला पाहिजे असा निष्कर्ष काढला.
श्री. टिळकांचा सिध्दांत मौलिक खरा, तथापि त्यात एक न्यून आहे. ते म्हणजे वैदिक आर्यांचे आवडते जानवर घोडा. हे जानवर आर्यांचे आयुष्य व धर्म यांच्याशी जाम जखडलेले आहे. अश्वमेध यज्ञातील घोड्यांशी संभोग करण्याकरीता राज्यांच्या राण्यामध्ये नेहमी चुरस चालु असे. (यजुर्वेद आणि माधवाचार्याचे भाष्य) या गोष्टीवरूनच असे दिसते की, घोड्याला वैदिक आर्य लोकात अत्यंत महत्व प्राप्त झालेले होते. परंतु आर्क्टिक प्रदेशात घोडे होते का? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी मिळाले तर आर्यांचे मुळस्थान आर्क्टिक प्रदेशात होते, हा सिध्दांत लंगडा पडतो.
आर्यांनी भारतावर स्वारी केली मूळच्या रानटी रहिवाशांवर स्वार्या करून त्यांना जिंकले.
ऋग्वेदात या मुद्याला यत्किंचितही पुरावा मिळत नाही. याबाबतीत श्री. पी. टी. श्रीनिवास अय्यांगर यांचे मत (Life in Ancient India in the age of the Mantras, pp. 11-12) :- "आर्य, दास व दस्यु हे शब्द ज्या मंत्रांमध्ये वापरलेले आहेत त्यात ते वंशवाचक नव्हे तर पंथवाचक या अर्थाने वापरलेले आहेत. ऋग्वेदातील मंत्राची शब्दसंख्या १,५३,९७२ आहे. त्यात आर्य शब्द फक्त ३३ वेळा वापरण्यात आलेला आहे. जर आर्यांनी मूळ रहिवाश्यांचा पराभव केला असेल तर आत्मश्लाधापर अनेक वेळा आर्य शब्दाचा उल्लेख केला असता"
आर्यांचा मुळ प्रदेश भारताबाहेर होता याला वैदिक वांङ्मयात पुरावा मिळत नाही. वैदिक वांङ्मयात सात नद्यांचा उल्लेख "माझी गंगा, माझी यमुना, माझी सरस्वती" अशा शब्दांनी केलेला आहे. परका माणूस नद्यांना इतक्या प्रेमळ व जिव्हाळ्याचा शब्दांनी कधी संबोधेल काय? मात्र तो जर पुष्कळ काळ नद्यांच्या सहवासात राहिला असेल तरच त्याला आपुलकी वाटू लागेल.
आर्यांचे मुळस्थान भारताबाहेरचे आहे याला वैदिक वांङ्मयात पुरावा मिळत नाही उलटपक्षी, वैदिक आर्यांचे मुळस्थान भारतच असावे याचेच पुरावे जास्त मिळतात.
दास व दस्यू हे आर्यांचे शत्रू आहेत, असे ऋग्वेदात बरेच उल्लेख आहेत. मात्र त्यांच्यात मोठ्या लढाया झाल्या अशाप्रकारचा उल्लेख ऋग्वेदात मुळीच सापडत नाही. आर्य हा शब्द ऋग्वेदात ३३ ठिकाणी आलेला आहे. त्यातून ८ ठिकाणी तो दास ७ ठिकाणी तो दस्यू या शब्दाच्या विरोधात वापरलेला आहे.
दूसरा मुद्दा असा कि, आर्य व दास यांना समान कोणी शत्रु मिळाला कि, त्याचा पाडाव करण्यासाठी आर्य व दास एक होत असत यासंबधीचे उल्लेख ऋग्वेदात मिळतात. ऋग्वेदातील ऋचा १) ६-३३-३ , २) ७-८३-१, ३)८-५१-९, ४)१०-१०२-३
तिसरा मुद्दा असा कि, आर्य व दास यांच्यातील झगडा कितीही तीव्र असला तरी तो वंशवाचक स्वरूपाचा नव्हता; तो धार्मिक भिन्नतेमुळे झालेला होता. त्यांचे धार्मिक विधी वेगळे होते, ते अग्निपुजक नव्हते, ते प्रार्थना न करणारे वा यज्ञात पुरोहित न आणणारे होते, ब्राम्हणांचा द्वेष करणारे, त्यांना दान न करणारे होते. याबद्दलचे ऋग्वेदातील काही संदर्भ आंबेडकारांनी या मुद्यासंदर्भात दिलेले आहेत.
दास व दस्यू हे शब्द वंशवाचक अर्थाने वापरलेले आहे असे मत असणारे: मृध्रवाक् आणि अनस या ऋग्वेदातील दोन विशेषणांचा दाखला देतात तसेच दास हे कृष्ण वर्णाचे आहेत, असे ऋग्वेदातील दासांचे वर्णनाचा उल्लेख देतात.
मृध्रवाक् हा शब्द चार ठिकाणी आलेला आहे त्याचा अर्थ रांगडी भाषा बोलनारा असा आहे. परंतू रांगडी बोली वंशभिन्नता दाखवते असे मानणे म्हणजे शुध्द पोरखेळ होय.
अनस हा शब्द ऋग्वेदात (५-२९-१०) वापरलेला आहे. या शब्दाचे भिन्न अर्थ करनारे दोन पंथ आहेत,
१) एकाच्या मते उच्चार "अ+नस" याचा अर्थ 'नाक नसलेला वा चपटे नाक असलेला'.
२)दुसरा उच्चार "अन्+अस" म्हणजे बिन तोंडाचा वा चांगली बोली न बोलनारा
मात्र वैदिक वांङ्मयात दास्यू हे बिन नाकाचे लोक आहेत असा उल्लेख कोठेही सापडत नाही त्यामुळे अनस हा शब्द मृध्रवाक् या शब्दाचा समानअर्थी शब्द समजूनच अनसचा उच्चार केला पाहिजे.
दास हे कृष्णयोनी आहेत हे वर्णन ऋग्वेदात (६-४८-२१) फक्त एकाच ठिकाणी आलेले आहे. ते खरेखुरे वर्णन आहे कि अलंकारीक स्वरूपाचे आहे हे समजणे कठिण आहे, तसेच केवळ एकाच ठिकाणी हे वर्णन आल्यामुळे दास हे कृष्णवर्णी वंशाचे हा निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही.
याबाबतीत खालील ऋचा लक्षात घ्याव्यात.
१) ६-२२-१० : "हे वज्रि, तु तुझ्या शक्तीने दासांना आर्य करून टाकलेस, दृष्ट लोकांना तू सृष्ट केलेस. ती तुझी शक्ती आम्हाला दे, म्हणजे तिच्या प्रभावाने आम्ही आमच्या शत्रुंना पादाक्रांत करू"
२)१०-४९-३ : (इंद्र म्हणतो) " मी दस्यूंचे आर्यत्व नष्ट केले आहे'"
३)१-१५-८: "हे इंद्रा ! आर्य कोण आहेत व दास्यू कोण आहेत हे तू शोधून काढ आणि आर्य व दस्यू यांना परस्परांपासून दूर ठेव"
वरील ऋचांवरून स्पष्ट होते कि आर्य, दास व दस्यू यांच्यातील भेद हा शारीरीक किंवा वंशसुचक स्वरूपाचा नव्हता.
वरील विवेचनावरून स्पष्ट होते कि "आर्यांनी भारतावर स्वारी केली मूळच्या रानटी रहिवाशांवर स्वार्या करून त्यांना जिंकले." हा सिध्दांत चुकिचा ठरतो, हा सिध्दांत मुळातच दोन रोगांनी पछाडलेला आहे. काहि गोष्टी गृहित धरायच्या व त्या गृहित गोष्टींवरून काही अनुमाने काढावयाची अशा तर्हेची उभारणी हा या सिध्दांताचा पहिला रोग होय. अशी उभारणी शास्त्रीय पध्दतीने केलेल्या संशोधनाच्या कसोटीस लागत नाही, हा त्या सिध्दांताचा दुसरा रोग होय.
सत्य गोष्टींची रचना करून त्या रचनेतून सिध्दांताची उत्क्रांती होऊ दिलेली नाही. उलटअंशी, सिध्दांताचे स्वरूप आधि आखण्यात आले व त्यानंतर ते स्वरूप सिध्द करण्यासाठी सत्य गोष्टींची निवड करण्यात आली.
हा सिध्दांत मुळचा युरोपियन ग्रंथकारांचा, त्यामागील प्रेरणा म्हणजे १८३५ साली प्रसिध्द झालेले डॉ. बॉप (Bop() यांचे "तुलनात्मक व्याकरण " (Comparative Grammar ) या नावाचे युगप्रवर्तक पुस्तक. युरोप व आशिया खंडात बोलल्या जाणार्या काहि भाषांचे मुळस्थान कोणत्यातरी एका जून्या भाषेत असले पाहिजे, असे अनुमान डॉ. बॉप यांनी मांडले होते.. डॉ. बॉप यांचे अनुमान ज्या युरोपियन व आशियन भाषांना लागू पडते त्या भाषांना हिंदी-जर्मन भाषा असे नाव दिलेले आहे. सांघिक दृष्टिने त्या भाषांना आर्यन भाषा असेच संबोधण्यात येते. कारण, वैदिक भाषा म्हणजे आर्यांची भाषा आणि आर्य लोक म्हणजे हिंदि-जर्मन लोकांचा मुळचा वंश, असा सर्वसाधारणपणे समज दृढ झालेला आहे. हा समज युरोपियन ग्रंथकारांच्या सिध्दांताचे प्रमुख अंग होऊन बसलेला आहे.
वर्णभेदाने पछाडल्यामुळेच आर्यांनी चातुर्वर्ण्य निर्माण केले, हे युरोपियन ग्रंथकारांचे विधान तर धांदात खोटे आहे. तसे जर असते तर चारी वर्गांचे चार निरनिराळे रंग असावयास पाहिजे होते. हे चार रंग धारण करणारे चार वर्ग कोणते व त्यांची चातुर्वर्ण्यात कशी गणना केली गेली, याबद्दल कोणत्याही ग्रंथकाराने स्पष्ट खुलासा केलेला नीही.
मुळात युरोपियन लोक गोरे होरे कि काळे? याबद्दल प्रो. रिप्ले (Races of Europe, by Prof. Repley, P.466) यांच्याप्रमाणे युरोपियन लोक लांब डोक्याचे व कृष्ण वर्णाचे होते, युरोपातील फार प्राचीन काळचे लिगुरियन लोक हे रंगाने काळे असले पाहिजेत...
ऋग्वेदात काहि भागात रंगाबद्दलचे उल्लेख आढळतात. १) १-११७-८: शाव्य काळा तर रुशती निमगोरी होती, २) १-११७-५: वंदन यांचा रंग पिवळा होता. ३)२-३-९ : ताबटसर-पिंगट रंग असणारा मुलगा दे, अशी प्रार्थना.
वैदिक आर्य स्वतः एका रंगाचे नव्हते, तर मग त्यांच्यात वर्णभेद कोठून उत्पन्न होणार? राम, कृष्ण, ऋग्वेदातील ऋचा लिहिणारे दिर्घतमस तसेच कण्वऋषी (१०३१-११) हे काळ्या रंगाचे होते.
१) आर्य वंश अस्तित्वात होता, याबद्दल वेदांमध्ये काही पुरावे मिळत नाहीत.
२)आर्य वंशीय लोकांनी स्वारी करून दास व दस्यू लोकांना जिंकले, याबद्दल वेदांमध्ये काही पुरावे मिळत नाहीत.
३)आर्य, दास व दस्यू यांच्यात वांशिक भेद होता, हे दाखविणारा पुरावा वेदांमध्ये नाही.
४) आर्य रंगाने दास व दस्यू यांच्याहून निराळे होते असे दाखविणरा पुरावा वेदांमध्ये नाही.
क्रमश: (बराच मोठा लेख आहे. जसा वेळ मिळेल तसे इतर भाग टाकण्याच प्रयत्न करेल. )
Comments
धन्यवाद
आंबेडकरांचा हा लेख इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. लेखाचे पुढील भागही टाकावेत.
आर्य नावाचा कोणताही वंश नाही याबद्दल वाद नाही परंतु अग्निपूजक लोक बाहेरून आले नाहीत हे तितकेसे पटणारे नाही. ते स्थलांतरित होऊन येत गेले असावेत. मूळ माणूस सर्वप्रथम आफ्रिकेतून स्थलांतरित झाला असे मानले जाते. याबाबत डार्विनचे म्हणणे असे काहीसे (शब्दशः नाही) -
"जगाच्या प्रत्येक खंडावर आढळणार्या सस्तन प्राण्यांशी साधर्म्य साधणारा परंतु आता नष्ट झालेला प्राणी प्रागैतिहासिक काळात अस्तित्वात होता असे दिसते. मानवाशी साधर्म्य साधणारे गोरिला आणि चिम्पान्झी ही दोन्ही माकडे आफ्रिकेतील असल्याने, माणसाशी साधर्म्य साधणारे परंतु आता विनाश पावलेले माकडही आफ्रिकेतीलच असायला हवे."
माणसाचा प्रवास आफ्रिकेतून भारतात होताना इथिओपिया, अरबस्तान, मध्य आशियाच्यामार्गे झाला. हे सर्व प्रागैतिहासिक काळात झाले असले तरी माणसाने आपल्या प्रवासाचे मार्ग बंद केले किंवा तो ते मार्ग विसरला असे म्हणता येणार नाही. मध्य आशियाची भौगोलिक परिस्थिती पाहता तेथील स्टेपीच्या प्रदेशात भटक्या जमाती अस्तित्वात आल्या. त्यांनी आपला प्रदेश सोडून पूर्वेकडे नदीच्या दिशेने, हिरव्या प्रदेशाच्या दिशेने स्थलांतर केले यात तथ्य वाटते. त्यामुळे भारतात बाहेरून लोक आलेच नाहीत हे पटत नाहीत.
आर्यन् इन्वेजनचा सिद्धांत मात्र पटण्याजोगा नाही, घुसखोरी करून मोठ्याप्रमाणावर सैन्य घुसवणे माणूस बर्यापैकी प्रगत झाल्यावर मंगोलांना आणि ग्रीकांना (मॅसेडोनियांना)ही जमले नाही कारण दुर्गम प्रदेश, हिमालयामुळे दुथडी भरून वाहणार्या नद्या आणि त्यावर निर्माण झालेली वने. यामुळे सिल्क रोड अस्तित्वात येण्याआधी टप्प्या ट्प्प्याने किंवा गटा गटाने प्रवास केले गेले असावेत. सैन्यासकट नव्हेत.
अश्वमेध यज्ञाच्या विधीत राण्यांना घोड्याचा बळी दिल्यावर पुढे येऊन मोठमोठ्याने असभ्य बोलून त्याच्यासोबत रात्र घालवावी लागे आणि दुसर्या दिवशी राण्यांचे शुद्धीकरण केले जाई असे वाचले आहे परंतु बळी दिलेल्या घोड्यासमवेत संभोग हे वाचलेले नाही.
अश्वमेधाचा घोडा आणि संभोग्
पहा भारतीय विवाह् संस्थेचा इतिहास - वि का राजवडे (प्रकरण आणि पृष्ठ नंतर सांगेन).
हे जमेल का?
हे पुस्तक मिळवून संदर्भ शोधणे मला सध्यातरी शक्य नाही :-(. आपल्याला शक्य झाल्यास त्या प्रकरणातील महत्त्वाचा भाग टंकल्यास आभारी राहीन.
प्रकाटाआ
प्रकाटाआ..
पत्ता
आपला पत्ता कळवावा... पोस्टाने झेरोक्स पाठवीन.
घोडा?
घोडा?
त्यासाठी चूरस!?!?!
बापरे!
नशीबच!! मी कोणताही अश्वमेध यज्ञ करणारा राजा नाही झालो!
राणीच्या इतक्या मोठ्या अपेक्षा असतील तर अवघड आहे...
आपला
गुंडोपंत
(लेखक "सूक्ष्म लेखन" करत असतील तर प्रतिसाद पण 'सूक्ष्म' द्यायला काय हरकत आहे?)
अश्वमेध- भारतीय विवाह संस्थेचा इतिहास
हे बघा भारतीय विवाह संस्थेचा इतिहासातील पान. आजही अश्लील म्हणुन आरोप होउ शकतो. चित्रमयजगत च्या १९२३ अंकांत निबंधाची काही टिपणे छापली होती. पुस्तक या सदरात ३१ डिसेंबर १९७६ ला लोकवाङमय गृह ने प्रथम आवृत्ती प्रकाशित केली. १ डिसेंबर १९२६ राजवाड्यांच निधन झाले. म्हणजे प्रताधिकार संपल्यावर पुस्तकाची आवृत्ती काढलेली दिसते.
भारतीय विवाह संस्थेचा इतिहास पान ७८
भारतीय विवाह संस्थेचा इतिहास पान ७९
प्रकाश घाटपांडे
सही!
क्या बात है!
वाचून मजाच आले एकदम!
आता हेपण मिळवून वाचलेच पाहिजे.
इतिहासाचार्य वि का राजवाडे यांचे आहे का हे
भारतीय विवाह संस्थेचा इतिहास?
आता घ्या घालून म्हणावं संस्कृती जपणार्यांनो!
(आपलेच दात आपल्या घशात म्हणतोय मी! )
आयर्वींगने पण विकांचे लेख वाचले असावेत की काय असे वाटले. पण शेवटी भाषांतर ते भाषांतर त्यामुळे त्याच्या लेखनात असा ठोसपणा कुठला असायला...?
आपला
गुंडोपंत
(लेखक "सूक्ष्म लेखन" करत असतील तर प्रतिसाद पण 'सूक्ष्म' द्यायला काय हरकत आहे?)
होय
होय इतिहासाचार्य वि.का राजवाड्यांच्या "भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास" या पुस्तकाचा उतारा जसाच्या तसा आहे. या पुस्तकाला कॉम्रेड डांग्यांची प्रस्तावना आहे. पण चित्रमय जगत च्या १९२३ च्या काळात हा उतारा प्रसिद्ध केला असेल असे वाटत नाही.
प्रकाश घाटपांडे
प्रकाशक?
प्रकाशक वरदा बुक्स का?
आपला
गुंडोपंत
(लेखक "सूक्ष्म लेखन" करत असतील तर प्रतिसाद पण 'सूक्ष्म' द्यायला काय हरकत आहे?)
धन्यवाद | चांगले विवेचन
आंबेडकरांचा लेख इथे दिल्याबद्दल धन्यवाद! त्यांनी केलेले विवेचन तर्कशुद्ध आणि पटण्यासारखे आहे.
धन्यवाद
घाटपांडे आणि विसुनाना दोघांचेही अनेक धन्यवाद. ऑब्सिन या शब्दाचा अर्थ नेहमीच अश्लील होईल असे नसल्याने मी असभ्य हा शब्द वापरला होता परंतु राजवाड्यांच्या पुस्तकातील उतारे सद्य संस्कृतीतही अनेकांना अश्लील वाटतील असे असावेत. ;-)
मला शंका होती कारण घोडा जिवंत असताना त्याच्याशी असे वर्तन केल्याचे वाचले नव्हते पण घोडा मृत झाल्यावर रात्रभर राण्या त्याच्या बाजूला राहात हे ठाऊक होते तर मग मेलेल्या घोड्याशी संभोग कसा होईल असा प्रश्न पडला. ती शंका फिटली. :)
तातडीने स्कॅनिंग करून येथे चढवल्याबद्दल अनेक धन्यवाद.
रामायणात रामाने अश्वमेध केल्याचा उल्लेख येतो. (अर्थातच, उत्तर रामायणात येतो.) त्याच्या पूर्तीसाठी रामाला पुनर्विवाह करण्याची गळ आणि त्या यज्ञासाठी लागणारे राणीचे अनन्यसाधारण महत्त्व आज कळले.
अवांतरः क्षौमवस्त्र
घाटपांड्यांनी दिलेल्या स्कॅनिंगनुसार आणखी एक गोष्ट दिसली की यज्ञासाठीही क्षौमवस्त्राचा वापर होई. रेशीमाचा नाही. क्षौमवस्त्र हे सोवळ्याचे वस्त्र आहे म्हणजेच त्याला महत्त्व आहे आणि क्षौमवस्त्राचे धागे अळशीच्या तंतूपासून बनवले जात.
तेव्हा, वैदिक काळात रेशीम भारतात उपलब्ध नसावे किंवा अत्यल्प वापरात असावे या शक्यतेला पुष्टी मिळते.
कौषेय आणि लवण
कौषेय आणि लवण या दोन्हींचा स्पष्ट उल्लेख श्रुतींत आढळत नाही असे आपण म्हटल्याचे स्मरते. (चु.भू.द्या. घ्या.)
कौषेय वस्त्राबद्दल रामायणात उल्लेख आढळतो. मनुस्मृती, भागवत पुराण यांतही!
मिठाबद्दलचा उल्लेखही आयुर्वेद, मनुस्मृती, नारद पुराणात आढळतो.
मग या वस्तू भारतीय वाङ्मयात पहिल्यांदा कधी आल्या? हे कळाले तर बरे होईल.
लेखन कधी झाले
भागवत् पुराण हे बरेचदा बदलले गेले आहे असे मानले जाते, त्यामुळे मोठे तपशील नाही तरी वर्णनात्मक बारीक सारिक तपशील बदलले गेले असणे शक्य वाटते. चू. भू. दे. घे. नारद पुराणाबद्दल फारसे माहित नाही. :-(
महाभारतकाळात सिंहासनाचाही शोध लागलेला नव्हता असे वाचले आहे. राजे सिंहासनासदृश खुर्चीवर बसत नसत.
आयुर्वेद कधी लिहिले गेले त्याची कल्पना नाही परंतु मनुस्मृती कधी लिहिली गेली याची कल्पना आहे का? पुश्यमित्र शुंगाच्या काळात तर नव्हे? चू. भू. दे. घे. तसे असल्यास रेशमाचा उल्लेख शक्य आहेच.
अवांतर : स्कंदपुराणात सत्यनारायणाच्या पूजेचा उल्लेख येतो पण पुराणकाळात साखर खाल्ली जात नव्हती, गोडासाठी मधाचा वापर होई असे वाचलेले आहे.
उपनिषदकालीन शर्करा
विदेहाचा राजा जनक याने अनेक ऋषीमुनींना पाचारण करून त्यांच्याशी आदिकारणाची चर्चा केल्याचे सर्वश्रुत आहेच.
(याज्ञवल्क्य - गार्गी संवाद.) हे सर्व कथानक (बृहदारण्यक) उपनिषदात येते.
उद्दालक मुनींचा उल्लेख बृहदारण्यक आणि छांदोग्यात येतो. या उद्दालकाचा नातू (मुलीचा मुलगा सुजाता - कहोदाचा मुलगा) म्हणजे अष्टावक्र होय.
या अष्टावक्राने मिथिलेचा राजा जनक याला आत्मज्ञान दिले असा उल्लेख रामायणात आणि महाभारतात येतो. याचाच अर्थ तो दोन्ही ग्रंथ निर्माण होण्या अगोदर होऊन गेला. (हा भाग दोन्ही/ पैकी एका ग्रंथात प्रक्षिप्त असावा असे म्हटले जाऊ शकते. ;))
जनकाला अष्टावक्राने जी गीता सांगितली त्यात शर्करेचा उल्लेख येतो.
या अष्टावक्र गीतेत -
यथैवेक्षुरसे क्लृप्ता तेन व्याप्तैव शर्करा |
तथा विश्वं मयि क्लृप्तं मया व्याप्तं निरन्तरम् || २- ६||
असा श्लोक आहे.
(ज्याप्रमाणे इक्षुरसाने - उसाच्या रसाने निर्माण झालेली साखर त्यानेच व्यापलेली असते (त्याच चवीची असते) तसेच हे माझ्यापासून निर्माण झालेले विश्व मी नेहमी व्यापून असतो.)
म्हणजे उपनिषद कालात शर्करा - साखर (कोणत्यातरी स्वरूपात - बहुदा काळसर खडीसाखर) उपलब्ध असावी असा निष्कर्ष काढता येईल - नाही का?
(याला डोंगर पोखरून उंदीर काढणे असे म्हटले जाऊ शकते. ;);))
डोंगर पोखरून
हो तसेच असावे ;-). (चू. भू. दे.घे) याचे कारण वर्णनात्मक आलेले शब्द हे कितीवेळा आले यावर ग्राह्य धरले जातात. साखरेचा समग्र उल्लेख म्हणजे गूळ, काकवी, दाणेदार साखर हा कौटिल्याने केल्याचे वाचले आहे. (हे वाचनात आले, प्रत्यक्ष मी वाचलेले नाही) त्याआधी अतिशय क्षुल्लक ठिकाणी वर्णनात्मक साखरेचा उल्लेख येतो जो मागाहून भरला गेला (एखाद्या गोष्टीला मीठ-मसाला लावला जातो तसा येथे साखर) असे समजले जाते.
वर्णनात्मक अनेकदा शब्द येतात जसे, कौषेय पण हेच कौषेय म्हणजे रेशीम असे नाही. महाभारतातही गूळ किंवा काकवी यांचे उल्लेख फार कमी आहेत. गोड म्हणजे मधु हेच उल्लेख अधिक सापडतात.
अवांतर - शक्य आहे
वैदिक काळात रेशीम भारतात उपलब्ध नसावे किंवा अत्यल्प वापरात असावे या शक्यतेला पुष्टी मिळते
शक्य आहे. भारताला रेशमाची ओळख चीनमार्फत झाली. चीनपासून भूमध्य सागराशी जाणारा सिल्क रूट साधारणपणे इ.पू. दुसर्या शतकापासून वापरात येऊ लागला. वैदिक काळ हा त्यापूर्वीचा असल्याने भारतीयांना त्याकाळी रेशमाची फारशी ओळख नसावी हे साहजिकच आहे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.