उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
शास्त्र आणि विज्ञान
प्रियाली
June 3, 2008 - 11:40 am
ज्योतिषाविषयी ज्या चर्चा सुरू आहेत त्यात दोन चार शब्द नेहमी कानावर पडतात.
१. शास्त्र
२. विज्ञान
३. विद्या
शास्त्र हा शब्द धर्माशी, कायदा-सुव्यवस्थेशी, राजकारणाशी वगैरे संबंधित गणला जातो (उदा. धर्मशास्त्र, युद्धशास्त्र, नितीशास्त्र इ. ) पण विज्ञानासाठी सामान्यपणे वापरला जातो (उदा. रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र) तरी या दोन्ही शब्दांत गल्लत आहे का?
विज्ञान हा शब्द ज्ञानाशी संबंधित आहे. शास्त्रांतूनही ज्ञान प्रसारित होतेच पण तरीही हे शब्द वेगळे आहेत. त्यांचा वेगळेपणा कसा समजून घ्यावा?
विद्या हा शब्द कोठे वापरावा आणि कोठे वापरू नये?
दुवे:
Comments
मला वाटतं
"विद्या" हा शब्द मराठितल्या "स्किल"(किंवा स्किल-सेट) च्या अगदि जवळ जातो.
म्हणजे, अमुक् अमुक् गोष्ट करण्याची अचुकता, शक्यतो सरावानं आलेली.
जसं की धनुर्विद्या,तंत्रविद्या(जारण-मारण प्रकारातली),ज्योतिर्विद्या,लेखनविद्या वगैरे.
बाकी शास्त्र, विज्ञान याबाबतीत मलाही विचार करावा लागतोय.
(तरीही तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे किंचित् गोंधळ उडतोय.)
जन सामान्यांचे मन
हम्म!
मनोबा,
मस्त विनोद केलात. :))) पण विद्ये बाबतचा तर्क पटण्याजोगा आहे. - अमुक् अमुक् गोष्ट करण्याची अचुकता, शक्यतो सरावानं आलेली.
परंतु धनुर्विद्या हे धनुर्शास्त्र किंवा ज्योतिर्विद्या हे ज्योतिषशास्त्र नाही का? ;-) मग या शब्दांत वेगळेपणा आहे का आणि असल्यास हे वेगवेगळे शब्द कधी वापरायचे?
हा गोंधळ कसा निस्तरावा? :-(
हा प्रश्न पडण्याचे मुख्य कारण म्हणजे काही ज्योतिषी ज्योतिषशास्त्राला ज्योतिष न म्हणता विद्या म्हणतात (म्हणो बापडे! ;-)) असे घाटपांड्यांनी म्हटलेले आढळले पण मला त्यातलाही अर्थ लागला नाही.
तसं नसावं
धनु: शास्त्र असा शब्द ऐकला नाय कधी.
धनुर्विद्या ऐकलाय.
शिवाय शस्त्रविद्या हा ही शब्द् ऐकलाय.(हितं "शस्त्र-शास्त्र " असं नाय करता येणार.)
जे पुस्तकात असतं ते शास्त्र,म्हणजे त्या विषयाबद्दलचे तर्क,विचार् किंवा प्रयोग ह्या सगळ्याचा संग्रह म्हंजे शास्त्र.
कायदेशास्त्र,रसायन शास्त्र वगैरे.
त्या शास्त्रावर जी व्यक्ती प्रभुत्व मिळवते, ती मिळवते तिला अवगत असते विद्या.
म्हणज आचार्य शंकर ह्यांची "परकाया-प्रवेश" ही विद्या अवगत आहे, हे दाखवण्यासाठी
अम्रु नावाच्या राजाच्या अंगात केलेला परकायप्रवेश.
ती विद्या त्यांना अवगत होती.(असे म्हणतात.)
हल्लीच्या काळात बोलायचं तर शिंप्यांना शिवण-विद्या अवगत असते.
(शिवण-विद्ये विषयी काही ढोबळ विचार् मांडले, नियम केले आणि केले संग्रहित ;तर् ते बनेल शिवण-शास्त्र.)
तसच शल्य-चिकित्सकाला(उदा:- स्व. नीतु मांडके) ह्यांना हृदयोपचार विद्या अवगत होती असं म्हणता येइल.
अरेच्चा, एक लक्षात् आलं का?
बहुतांश ठिकाणी "विद्या" ह्याच्या ऐवजी "कला " हा शब्द वापरता येइल्. आणि वाक्य जसेच्या तसे वापरता येइल.
ह्ये बघा:-
त्याला शिवण-विद्या अवगत आहे.---बरोबर्
त्याला शिवण-कला अवगत् आहे.---बरोबर
त्याला शिवण-शास्त्र अवगत आहे.--चुक
त्याचा शिवण-शास्त्राचा अभ्यास आहे.--बरोबर.
आणखी येकः-
राजला प्रसिद्धी-विद्या अवगत आहे.
राज प्रसिद्धी शास्त्राचा गाढा अभ्यासक् आहे.
राज प्रसिद्धीच्या कलेत माहीर आहे.
आपलाच,
शास्त्रापुरते प्रतिसाद देणारा,
व प्रतिसाद-विद्या अवगत असलेला
जन सामान्यांचे मन
काही तुलनात्मक अर्थविचार
वेगवेगळ्या भाषांत "शास्त्र", "विज्ञान", "विद्या" शब्दांची अर्थव्याप्ती वेगवेगळी असावी. परंतु संस्कृत, मराठी आणि हिंदी भाषांतले अर्थ एकमेकांशी थोडेफार समांतर आहेत.
संस्कृतच्या बाबतीत या प्रश्नाचा अमरकोषात अनपेक्षित विस्तार सापडला.
शास्त्र :
याचा उल्लेख "नानार्थवर्गा"त येतो :
निदेशग्रन्थयो: शास्त्रम् ... । ३.३.१७९
निदेश=आज्ञा, आणि ग्रंथ या अर्थी "शास्त्र" शब्द आहे. शास्त्र म्हणजे आदेशावली (उदा. धर्मशास्त्र जसेच्या तसे वाचून अमलात आणणे). किंवा ते ग्रंथ म्हणजे मनुस्मृती, वगैरे.
विज्ञानाबद्दल :
धीवर्ग (पहिल्या कांडात पाचवा वर्ग) असे म्हणतो :
मोक्षे धीर्ज्ञानं अन्यत्र विज्ञानं शिल्पशास्त्रयो: ।... १.५.६
मोक्षाच्या बाबतीत जी जाण/बुद्धी असते, तिला "ज्ञान" म्हणतात, आणि अन्य बाबतीत शिल्प=तंत्रज्ञान आणि शास्त्राविषयी जी जाण/बुद्धी असते तिला विज्ञान म्हणतात.
"शास्त्राविषयी जाण" हे विज्ञान असल्यामुळे, विज्ञान हे शास्त्रापेक्षा काही वेगळे आहे, असेच दिसते. संशोधन, ऊहापोह, वगैरे, हे विज्ञानाचा भाग आहेत.
"विद्या" शब्द अमरकोषात नाही!!! (पण तो शब्द ज्ञात होता, कारण "विद्याधर"ही योनी उल्लेखिलेली आहे. शिवाय "अविद्या" शब्द उल्लेखिलेला आहे.) विद्या बहुधा शिकलेली असावी, संशोधनाने किंवा तर्काने मिळवलेली नसावी. ग्रंथाला "विद्या" म्हणत नाहीत.
ग्रंथात/आदेशावलीत आहे ते शास्त्र
ते शिकायचे म्हणजे अर्जन करायची ती विद्या
(ऐहिक कारणासाठी) ते जाणायचे तर ते विज्ञान
--------------------
हिंदीत माझ्या शालेय शिक्षिकेने असे सांगितले की "शास्त्र" म्हणजे धर्मशास्त्र, "शास्त्रज्ञ" म्हणजे त्या बाबतीत पंडित. विज्ञान म्हणजे इंग्रजीत ज्याला "सायन्स" म्हणतात ते, आणि वैज्ञानिक म्हणजे तो अभ्यास/व्यवसाय असलेली व्यक्ती.
--------------------
मराठीत "शास्त्र" शब्द धर्मशास्त्राविषयी आणि तंत्र/तर्क/अभ्यासाविषयीही वापरला जातो. (उदाहरणे प्रियाली यांनी दिलेलीच आहेत. नीतिशास्त्र आणि रसायनशास्त्र.) मराठीत "शास्त्रज्ञ" संशोधन करणाराही असू शकतो. "विज्ञान" मात्र केवळ तंत्र/तर्क अभ्यासाविषयीच वापरला जातो. व्यक्ती म्हणून "वैज्ञानिक" क्वचितच सापडतो. शोध मात्र बहुधा "वैज्ञानिक शोध" असतात, "शास्त्रीय शोध" नसतात. मराठीत पुस्तकांत "विद्या" असते, हे संस्कृतापेक्षा वेगळे.
("शास्त्र" शब्दाचे अनेक अर्थ अग्निहोत्र्यांच्या शब्दकोषात आहेत, पैकी एक इंग्रजी सायन्स आहे. "विज्ञान" शब्दाचा प्राथमिक अर्थ इंग्रजी सायन्स असा आहे.)
--------------------
तीन्ही भाषांत शब्दांच्या अर्थांत विलक्षण साम्य दिसून येते, पण शब्दांच्या अर्थाच्या व्याप्तीत थोडा, पण महत्त्वाचा, फरक दिसून येतो.
ग्रंथ किंवा आदेशावली उपलब्ध असले, तर "अमुक" संस्कृतात आणि हिंदीत शास्त्र होते - निकष सोपा आहे.
मराठीत "अमुक हे शास्त्र आहे क?" या प्रश्नाचे उत्तर देणे कठिण, कारण "शास्त्र" शब्दाची अर्थव्याप्ती त्या मानाने सर्वात धूसर आहे.
"अमुक हे विज्ञान आहे का?" या प्रश्नाचे उत्तर संस्कृत, हिंदी, मराठी तीन्ही भाषांत जवळजवळ सारखे मिळणे अधिक शक्य आहे. फक्त त्याचे निकष विचारपूर्वक ठरवावे लागतील.
ज्ञान-विज्ञान-अज्ञान
मोक्षे धीर्ज्ञानं अन्यत्र विज्ञानं शिल्पशास्त्रयो: ।... १.५.६
मोक्षाच्या बाबतीत जी जाण/बुद्धी असते, तिला "ज्ञान" म्हणतात, आणि अन्य बाबतीत शिल्प=तंत्रज्ञान आणि शास्त्राविषयी जी जाण/बुद्धी असते तिला विज्ञान म्हणतात.
मी पण याच अर्थी ऐकलेले आहे. भौतिक साधनांच्या म्हणजे जे जे काही सामान्यपणे (इन रेग्यूलर लाईफ या अर्थी, सामान्य-असामान्य या अर्थाने नाही), ज्ञान लागते - ज्याला कदाचीत व्यावहारीक ज्ञान म्हणू शकू त्याला विज्ञान म्हणतात. पण जे व्यावहारीक जगाच्या पुढचेच - केवळ मोक्षच नाही तर मोक्षाच्या मार्गावरील सर्व - ते ज्ञान.
एकंदरीत ज्ञान या शब्दावरून परस्परविरोधी अर्थ निघत चर्वीचरण होऊ शकते, (कसे ते पहा):
गीते मधे ज्ञान आणि अज्ञान असे दोन ठळक फरक केले आहेत. विज्ञान हा अज्ञानाचाच भाग धरलेला आहे. येथे अर्थात एक लक्षात घेतले पाहीजे की जे (मोक्षाकडे नेणारे) ज्ञान नाही ते अज्ञान. मग त्यातील एक भाग हा व्यावहारीक जगात लागणारा असू शकतो (विज्ञान) तर दुसरा वापरून आपण त्रास निर्माण करू शकतो (रुढार्थाने अज्ञान).
गीतेत ज्ञान कुठले सांगीतले आहे ते खाली वाचा:
नम्रता दंभ-शून्यत्व अहिंसा ऋजुता क्षमा । पावित्र्य गुरू-शुश्रूषा स्थिरता आत्म-संयम ॥ ७ ॥
निरहंकारता चित्ती विषयांत विरक्तता । जन्म-मृत्यु-जरा-रोग-दुःख-दोष-विचारणा ॥ ८ ॥
निःसंग-वृत्ति कर्मात पुत्रादींत अलिप्तता । प्रिय-अप्रिय लाभांत अखंड सम-चित्तता ॥ ९ ॥
माझ्या ठाई अनन्यत्वे भक्ति निष्काम निश्चळ । एकांताविषयी प्रीती जन-संगांत नावड ॥ १० ॥
आत्म-ज्ञानी स्थिर श्रद्धा तत्त्वता ज्ञेय-दर्शन । हे ज्ञान बोलिले सारे अज्ञान विपरीत जे ॥ ११ ॥ (१३ वा अध्याय)
यात ज्ञान म्हणून सांगीतलेले बरेचसे आपण गूण या अर्थाने वापरत असलेले शब्द आहेत. याच सरळ अर्थ असा होऊ शकतो की असे गूण जेंव्हा सजगतेने (कॉन्शसली) वापरले जातात तेंव्हा ते ज्ञान ठरते. थोडक्यात दुर्योधन/दु:शासनांसारख्यांसमोर "अहिंसा ऋजुता क्षमा" दाखवणे अथवा त्यांच्याबाजूने लढणार्या भिष्म-द्रोण-कृपाचार्यांसारख्यांची नको तेथे गुरू-शुश्रूषा करणे इत्यादी म्हणजे विपरीत आहे म्हणून अज्ञान आहे.
तरी देखील असेही म्हणायला जागा आहे की ज्ञान हा शब्द जनरलाईझ करून पण वापरलेला आहे. कारण ज्ञानाचे प्रकार सांगताना परत सात्वीक, राजसीक आणि तामसी असे तीन सांगीतले आहेत.
भूत-मात्रांत जे पाहे भाव एक सनातन । अभिन्न भेदलेल्यांत जाण ते ज्ञान सात्त्विक ॥ २० ॥
भेद-बुद्धीस पोषूनि सर्व भूतांत पाहते । वेगळे वेगळे भाव जाण ते ज्ञान राजस ॥ २१ ॥
एका देहांत सर्वस्व मानुनी गुंतले वृथा । भावार्थ-हीन जे क्षुद्र जाण ते ज्ञान तामस ॥ २२ ॥ (१८ वा अध्याय)
पण याच अध्यायात शेवटी असे म्हणले आहे जेथे ज्ञान हा शब्द परत विशिष्ठ अर्थाचा होतो:
असे गूढाहुनी गूढ बोलिलो ज्ञान मी तुज । ध्यानी घेऊनि ते सारे स्वेच्छेने योग्य ते करी ॥ ६३ ॥
शास्त्रापुरत
फलज्योतिष हे शास्त्र आहे काय? याचा विचार करताना आम्ही शब्दोच्छल केला.
प्राचीन काळापासून आपल्याकडे शास्त्र हा शब्द फार सैलपणे वापरला गेला आहे. कोणत्याही विषयावरच्या ग्रंथगत माहितीला शास्त्र म्हटले जात असे. आपापल्या मताला शास्त्राचा आधार आहे हे दाखवण्याची धडपड चालत असे. शास्त्र म्हणजे काय तर आधीच्या लोकांनी लिहून ठेवलेला एखादा बहुजन-मान्य ग्रंथ. विधवांच्या पुनर्विवाहाला शास्त्राधार आहे का नाही, किंवा संन्यास घेतल्यावर पुन: संसार करण्यास शास्त्राधार आहे का नाही याची चर्चा करणाऱ्या पंडितांनी आधार म्हणून कोणती शास्त्रे घेतली असावीत ? आणि मुळात त्या शास्त्रांना आधार कशाचा होता ? हा विचार केला म्हणजे आमचा मुद्दा लक्षात येईल. धर्म शास्त्र निती शास्त्र समाजशास्त्र अशी ही शास्त्रे . लग्नाची पत्रिका देताना लोक म्हणायची अहो शास्त्रा पुरती तरी टोपी घाला ना ? पुजेत शास्त्रा पुरती सुपारी असते.
सायन्स या शब्दाचा ऑक्सफर्ड डिक्श्नरी मध्ये दिलेला अर्थ निरिक्षण आणि पडताळा यातून प्राप्त होणारे ज्ञान, विज्ञान, शास्त्र, असा आहे. शास्त्र आणि विज्ञान या शब्दांच्या सुस्पष्ट अर्थांबाबत मतभिन्नता आहे. तरीपण आपण विज्ञान म्हणजे फिजिकल सायन्स या अर्थाने फलज्योतिष हे विज्ञान आहे का नाही? असा प्रश्न जर विचारला तर त्यास आजमितिस नाही हेच उत्तर द्यावे लागेल.
प्रकाश घाटपांडे
आणि विद्या?
तुम्ही बाजूच्या चर्चेत म्हणालात की काही ज्योतिषी या शास्त्राला विद्या असे म्हणतात. तर ज्योतिषाच्या बाबतीत हे कसे विस्तृत करून सांगता येईल?
तिथे हा प्रश्न विचारता विषयांतर झाले असते.
विद्या
ज्योतिषाच्या बाबतीत विद्या म्हणले कि त्यात व्यक्तिसापेक्षता येते. काळी विद्या ही अशीच सापेक्ष आहे (तिचे अस्तित्व वादापुरते मानले तर) अतिंद्रिय सामर्थ्य, अनुभुती, उपासना, पुर्वसंचित , अध्यात्मिक सामर्थ्य इत्यादि गोष्टी त्यात घुसडता येतात.
कर्णपिशाच्च ही विद्या मानली आहे . त्यात कानात येउन कुणीतरी' तिसरी शक्ती ' (पिशाच्च)समोरच्याचे भविष्य सांगते. यात ग्रह कुंडलि काहि भानगड नसते.
थोडक्यात विद्या हे एक वेगळेच जग आहे
प्रकाश घाटपांडे
थोडे अधिक विश्लेषण
शास्त्र = धर्मशात्र, न्यायशात्र इ. = ह्यामधे पूर्वसूरींच्या मतानुसार पुस्तकात सांगितलेल्या गोष्टी प्रमाण मानणे हे गृहित आहे.
अमुक अमुक गोष्टीला काही शास्त्राधार आहे का? म्हणजे आधी कोणी ह्या संबंधी लिहिले आहे का?
शास्त्र हे मुख्यतः रेफरन्ससाठी वापरले जात असावे.
विज्ञान = विशेष + ज्ञान = हे केवळ भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र ह्याच अर्थाने नव्हे तर कोणत्याही विषयातले विशेष अभ्यासाने मिळवलेले ज्ञान.
विद्या = ही गुरुकडूनच ग्रहण करायची असते. म्हणूनच 'विद्यादान', 'विद्यार्थी' असे शब्द आहेत. विद्येमध्ये तंत्राचा (टेक्नीकचा) भाग येतो. विशिष्ठ गोष्ट का आणि कशाप्रकारे करायची याचे ज्ञान + तंत्र आवगत झाले की विद्या मिळाली. तंत्रामधे अभ्यासाचा भाग आहे.
अपेंडिक्सचे ऑपरेशन करताना पोटावर कट कुठे घ्यायचा हे पुस्तकात, फिल्ममधे बघून, शिक्षकांकडून शिकता येते. पण तंत्राचा भाग हा स्वतः ऑपरेशन करण्याच्या अनुभवातूनच मिळतो. तरच ती विद्या पूर्णतेने मिळते. सतत अभ्यासाने तंत्रात पारंगतता येऊन कौशल्य (स्किल) वाढीस लागते.
कलेचा प्रांत थोडा हटके असावा (अंगभूत कौशल्य + ज्ञान + तंत्र) कारण कलेमध्ये काही अंगभूत कौशल्याचा भाग गृहित आहे. काही नैसर्गिक गुणवत्ता असेल तर कलेचा प्रवास सुकर होतो आणि प्रगती वेगाने होते. तसे नसेल तर जमत नाही असे नाही, पण कष्टांच्या मानाने प्रगती यथातथाच राहण्याची शक्यता जास्त.
चतुरंग
प्रतिशब्द
या तिन्ही शब्दांना इंग्रजी प्रतिशब्द काय असावेत?
माझ्या मते शास्त्र आणि विज्ञान या दोन्हींना सायन्स हा शब्द लागू होऊ शकल. विद्या = स्किल बरोबर वाटते. चूभूद्या घ्या.
----
सायंटिफिक आर्ट??
शास्त्राचा अर्थ सायंटिफिक आर्ट किंवा आर्टिस्टीक सायन्स असा घेत येईल का? (ज्यात विज्ञानाबरोबर काहि कला येणेही आवश्यक आहे)
उदा. संगीत शास्त्र् होते पण संगीत विज्ञान होत नाही
इथे शरद उपाध्ये सांगतात ती ज्योतिषशास्त्राची व्याख्या आठवली: ज्योतिषशास्त्र हा तर्कशास्त्राचा कल्पनाविलास आहे
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणरे आणि न समजणारे
काही प्रतिशब्द
शास्त्र : १ डॉक्ट्रिन २ नॉलेज सिस्टिम ३ स्क्रिप्चर (संदर्भानुसार) ४ सायन्स
विज्ञान : सायन्स
शास्त्र=डॉक्ट्रिन
हे शब्द जवळचे वाटले.
सहमत
शास्त्र आणि विद्या यात हाच फरक असावा.
आपण हे वाक्य नेहमी ऐकतो "कोणतीही गोष्ट करण्याचे एक शास्त्र असते." म्हणजे त्यात काही ठराविक नियम पाळले जाणे आवश्यक आहे. ते शास्त्र अवगत असणे म्हणजेच ती विद्या एखाद्याजवळ असणे किंवा अवगत असणे. विद्या उलगडली तर त्याला शास्त्र म्हणू शकतो.
अभिजित...
पाण्याची खोली तपासून तर उड्या कोणीही मारेल..जो न बघता उडी मारतो त्याचेच डोके फुटते. ;-)
अवांतर-
'शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत' या शब्दप्रयोगात संगीत हे शास्त्र किंवा संगीताचे एक शास्त्र आहे असे अभिप्रेत आहे असे वाटते.
आपण सर्वसाधारणपणे ती कला आहे असे समजतो.
एखादी गोष्ट कला आहे की शास्त्र आहे हे ठरवण्याबाबत नक्की निकष काय आहेत? ते जाणकारांनी या निमित्ताने सांगावे.
जाणकार
नाहिये मी.पण अंदाजाने वाटतं ते असं:-
संगीत-शास्त्र
गायन-विद्या, गायन कला,
नाट्य-शास्त्र
मुद्राभिनय कला किंवा मुद्राभिनय विद्या.
संगीत हे शास्त्र.त्याचे नियम ,आडाखे बनिवता येतेत.
पण गायन,वादन ह्या विद्या किंवा कला किंवा स्किल्स.
(आता कृपया "हे असेच का?" असं विचारु नका. मुळातच अंदाज बांधुन विधानं करुन र्हायलोय.)
किंवा "भाषा-शास्त्र" असं आपण म्हणु शकतो. ज्यात भाषेचे रुप्, नियम् स्पष्ट केलेले असतात,किम्वा त्याबद्दल चर्चा असते, असं काहीही.
पण संभाषण ही कला किंवा विद्या.
ती नुसती लिहिलेली नसते, तर प्रत्यक्षात वापरात आणली जाते.
विद्येचे "प्रॅक्टीशनर" असतात.(शल्य् चिकित्सा ही त्यामुळं विद्या ठरते. वैद्यक हे शास्त्र.)
शास्त्राचे "अभ्यासक" असतात.किंवा "जाणकार"किंवा "शास्त्रज्ञ" असतात.
जन सामान्यांचे मन
विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान
मला वाटतं विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. ज्ञान म्हणजे घटनांची / गोष्टींची माहिती होणे. वि-ज्ञान म्हणजे त्या घटनांमागचा कार्यकारणभावही माहीत होणे.
मी कॉलेजमध्ये असतांना Science is the continuous discovery of its own mistakes अशी सायन्स ची व्याख्या सांगितली जात असे. सायन्स व विज्ञान हे समानार्थी शब्द आहेत असे मी समजतो. प्रत्येक वेळी "असे कां?" हा प्रश्न विचारून एखाद्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्याचा विज्ञानाचा प्रयत्न असतो. म्हणून विज्ञानांतील उपपत्ती (थिअरी) बदलत असतात. संशोधनाअंती एखादी थिअरी बदलायची वेळ आली तरी वैज्ञानिकांची त्याला तयारी असते. वैज्ञानिक संशोधनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते वैज्ञानिकांपुरतेच मर्यादित न राहता कालांतराने (कधी कधी काही पिढ्यांनंतर) सर्वसाधारण शिक्षणांतून सर्वज्ञात (commonplace understanding ) होते.
धन्यवाद
प्रतिसाद देणार्या सर्वांचे धन्यवाद. या विविध संज्ञांचा अर्थ लावून त्या नेमक्या कोठे वापराव्यात हे या चर्चेतून स्पष्ट झाले असेल. ही चर्चा पुढे सुरू ठेवावी किंवा अशा प्रकारच्या गोंधळवून टाकणार्या संज्ञांची चर्चाही करण्यात यावी.
अतिव्यग्रतेमुळे यापेक्षा अधिक प्रतिसाद लिहिणे सध्या अशक्य आहे. तरी --- चालू दे! :-)
प्रयत्न..
प्रियाली,
एक उदाहरण देऊन सांगायचा प्रयत्न करतो....
१) 'तानपुर्याच्या तारा नीट जुळवून घ्याव्या' हे जे सांगितलेले आहे त्याला 'शास्त्र' म्हणतात. रागाप्रमाणे पंचम - जोड - खर्ज किंवा निषाद - जोड - खर्ज किंवा मध्यम - जोड - खर्ज या पद्धतीने तानपुरा अगदी सुरेल जुळवावा असे 'शास्त्र' सांगते!
२) पंचम, निषाद किंवा मध्यम, जोड, आणि खर्ज त्या त्या स्थानावरच अगदी परफेक्ट जुळवून घेतल्याने छान रेझोनन्स् निर्माण होतो. जोडीतली एक तार झंकारली असता दुसरी आपोआप बोलते तसेच खर्ज छेडला असता जोड व पंचम या तारा आपोआप बोलतात व तानपुरा स्वरांच्या योग्य स्थानावर ट्यून केला गेला आहे हे समजते. या मागे वैज्ञानिक कारंणच आहे. कारण जोपर्यंत त्या त्या स्थानावर तारा नीट जुळवल्या जात नाहीत तोपर्यंत तानपुर्यातून योग्य रेझोनन्स् मिळत नाही व तो सुरेल झंकारत नाही.
'त्या त्या स्थानावर तारा परफेक्ट जुळल्या पाहिजेत' हे जे सांगितले आहे त्यामागे 'वैज्ञानिक' कारण आहे आणि म्हणूनच या प्रकाराला 'विज्ञान' असे म्हणता येईल!
आणि
३) हे जे सर्व मी तुला सांगितले/मी सांगू शकलो याला 'विद्या' म्हणतात! :)
मला ही 'विद्या' भीमण्णा, पं फिरोज दस्तूर आणि पं अच्युतराव अभ्यंकर यांच्याकडून थोड्याफार प्रमाणात मिळाली आहे.
असो...
आपला,
(शास्त्रीबुवा, वैज्ञानिक आणि विद्यावाचस्पती!) तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
शास्त्र आणि विद्या
यांतला फरक सोप्या उदाहरणाने सहज भाषेत मस्त समजावलात. धन्यवाद!
मस्त तात्या!
अत्यंत नेमका आणि नेटका सोदाहरण प्रतिसाद!
जणू अचूक लागलेला स्वर! :)
चतुरंग