ढाक बहिरीची चित्रे

शनिवार दि १७ मे ला आम्ही म्हणजे आजानुकर्ण आणि आमचे काही मैतर ढाक बहिरीच्या ट्रेकला गेलो होतो. त्याचे काही फोटो खाली आहेत. अगदी सर्वच नसले तरी काही फोटो फोटोग्राफीचे सर्वमान्य नियम(नियम हा शब्द धोकादायक आहे. हे नियम न पाळताही चांगले फोटो येतात. पण पाळले तर साधारण फोटोही चांगले दिसतात) लक्षात घेऊन काढले आहेत. हे सुरुवातीला ठरवून केलं तर नंतर सरावाने आपोआप जमतं. त्याच त्याच चुका परत परत करु नयेत :-) नवीन नवीन चुका कराव्यात.

एकटा जीव सदाशिव
आकाश
जंगलराज
कळकराय आणि बहिरी यांच्यामधली घळ(सौजन्यः योगेश)
राजमाची किल्ला आणि मागे नागफणी(ड्युक्स् नोज)
कळकरायवर चढाई (वेगळा ग्रुप)
बहिरीच्या गुहेकडे(सौजन्यः श्रीकांत)
खाली फक्त दरी
ढाक-बहिरी डोंगर आणि कळकराय सुळका

या लेखाच्या अनुषंगाने फोटोग्राफीच्या टिप्सवर चर्चा झाल्यास हरकत नाही.

अभिजित

लेखनविषय: दुवे:

Comments

कॅमेरा

प्रकाशचित्रे चांगली आहेत. कोणत्या कॅमेराने काढली ते सांगितले तर माहितीमध्ये भर पडेल. जसे:
कंपनी:
प्रकारः फिल्म / डिजीटल
सेटिंगः एखादे प्रकाशाचित्र घेताना कॅमेराचे सेटिंग काय होते वगैरे.

बाकी जाणकार माहितीमध्ये भर घालतीलच. शेवटून दुसरे प्रकाशचित्र कसे काढले बॉ?

माझा कॅमेरा

माझ कॅमेरा: सोनी डी एस् सी ड्ब्लू ५ आहे. दोन वर्षापूर्वी घेतला होता. आत हे मॉडेल बाजारात नाही. त्याच्या ऐवजी आणलेल्या एस् ६०० वगैरे मॉडेल मध्ये कार्ल झेस् लेन्स् नाही. तसेच मॅनुअल सेटिंग् नाहीत. माझा कॅमेरा ५ मेगापिक्सलचा आहे पण मी बहुतेक चित्रे ३ मेगापिक्सल सेटिंगला काढतो.

प्रकाशचित्र काढताना शटर, ऍपरचर, आयएसओ यांचे सेटींग काय होते हे सर्व सांगणे अवघड आहे. परंतु फाईलच्या ऍडवान्स् प्रॉपर्टीजमध्ये ही माहिती मिळते. या माहितीला एक्झिफ म्हणतात.

शेवटून् दुसरे छायाचित्र काढताना प्रथम मी फक्त दरीचा फोटो काढला होता. पण त्यामुळे रेफरन्स पॉइंट मिळत नव्ह्ता. म्हणून स्वतःचेच पाय वापरले. :-)

अभिजित...

ऑटो

मी अनेकदा ऑटोमोड मध्येच फोटो काढतो. डिजीटल कॅमेरामध्ये एवढे काही असते की नक्की कशासाठी काय वापरावे या विचाराने गोंधळायला होते. माझ्याकडे निकॉन कूलपिक्स पी ३ आहे. ८.१ मे.पि. आहे. पण मी सुद्धा ३ मे.पि.नेच काढतो. हे. मे. पि. चे आकडे नेहमी गोंधळात टाकतात.

हे एक प्रकाशचित्र मी काढलेले.

हि वाट दूर जाते

निकॉन एफ ५५ (फिल्म एसएलआर) वापरून काढले आहे.

मेगापिक्सेल आणि काही सुचवण्या

मेगा पिक्सेलचे आकडे हे चित्राचे रेजल्युशन ठरवण्यासाठी असतात. डिजिटल चित्र हे असंख्य रंगी बेरंगी ठीपक्यांनी (पिक्सेलनी)बनलेले असते. जेव्हढे मेगा पिक्सेल अधिक तितके हे ठिपके लहान म्हणजेच विशिष्ठ जागेत जास्तित जास्त ठिपके मावणार. जितके ठिपके लहान तितके अधिक बारकावे चित्रात नोंदले जाणार. अधिक बारकावे=अधिक रेजल्युशन. सहसा १-३ मेगा पिक्सेल वर काढलेल्या चित्राचा आकार ८" गुणिले १०" पर्यंत असेल तर मानवी नजरेला जाणवणारे सर्व बारकावे टिपता येतात. पण हेच चित्र मोठे करुन प्रिंट करायचे असेल (उदा २०" गुणिले ३०") तर त्याचे रेजल्युशन वाढवाले लागेल म्हणजेच जास्त मेगा पिक्सेल = अतिसुक्षम ठिपके.

थोडक्यात अंतिम चित्राचा आकार किती असणार आहे त्यावर मेगा पिक्सेल ठरवावेत.

तुमचे वरील चित्र सुंदर आहे ते अजुन सुंदर कसे करता येईल ह्या विषयी सुचवण्या.

१.चित्रातील क्षितिज रेषा चित्राच्या अगदी मध्यभागी असणार नाही ह्याची काळजी तुम्ही घेतली असलीत तरी ती किंचीत वाकडी आहे. त्यामुळे सगळे चित्रच काहिसे एका बाजुला कललेले वाटते. प्रसंगी ट्रायपॉडचा वापर करुन हे टाळाता येते.

२.हे चित्र तुम्ही दुपारच्या वेळी घेतले असावे. त्या ऐवजी सकाळी कोवळ्या उन्हात घेतले असते तर प्रकाश अजुन सुंदर टिपता आला असता. चित्रातला डावीकडचा भाग ओहर एक्स्पोज्ड झाल्या सारखा वाटतो

३. दुपारीच घ्यावे लागले असेल तर पोलरायजर फिल्टर वापरुन प्रकाशाची तिव्रता नियंत्रीत करता आली असती.

४. चित्र उभे काढले असते तर उजवी कडचे कंपाउंड टाळता आले असते आणि झाडांचे शेंडे देखिल चित्रात आले असते.

बहुतेक पटले

उभे चांगले दिसले असते.

वेगळा विचार :
डावीकडे ओव्हरएक्स्पोझ झाले आहे, हे चांगले आहे, वाईट नव्हे. मला वाटते चित्र रस्त्याच्या वळणाचे असावे. (मूळ उद्देश्य चाणक्य सांगू शकतील.) हिरवळ, छोटे झाड, दूरवरच्या वास्तू, या ओव्हरएक्स्पोझरने धूसर झाल्या आहेत, ही चांगली गोष्ट आहे. (या डेप्थ-ऑफ-फोकसने बहुधा धूसर करता येणार नाहीत, कारण रस्त्याचे वळण पूर्णच रेखीव हवे आहे.
(उभ्या चित्राने हा भागही आपोआप कातला गेला असता, हा दुहेरी फायदा!)

पोलरायझरचे काम येथे न्यूट्रल-डेन्सिटी असेच आहे का? (कारण हिरवळीवरचा प्रकाश पोलराइझ्ड नसावा, तोच एकटा अधिक झाकला जाणार नाही.) मग उजवीकडचा सावलीतला भाग अंधारा झाला असता.
आकाश ओव्हरएक्स्पोझ्ड आहे, हे मलातरी योग्यच वाटते. ते निळ्याचे पांढरे (=फिक्के) झाल्याने मला तरी रसभंग झालेला वाटत नाही.

पोलरायझर

पोलरायझरचे काम येथे न्यूट्रल-डेन्सिटी असेच आहे का? (कारण हिरवळीवरचा प्रकाश पोलराइझ्ड नसावा, तोच एकटा अधिक झाकला जाणार नाही.) मग उजवीकडचा सावलीतला भाग अंधारा झाला असता.

त्यासाठी स्प्लिट न्युट्रल डेन्सिटी फिल्टर उत्तम.

आकाश ओव्हरएक्स्पोझ्ड आहे, हे मलातरी योग्यच वाटते. ते निळ्याचे पांढरे (=फिक्के) झाल्याने मला तरी रसभंग झालेला वाटत नाही.

झाडांना नुसत्याच पर्णहीन फांद्या असल्याने त्याच्या काँट्रॉस्ट वर पांढरे आकाश तितके खटकणार नाही पण तरीही निळे आकाश चित्र अजुन खुलवू शकले असते असे मला वाटते.

कोलबेर - धनंजय

धन्यवाद. तुम्हा दोघांचे ही प्रतिसाद वाचून मला छायाचित्रकार झाल्यासारखे वाटते आहे :) ३ प्रतिसादांमधून बरिच माहिती मिळाली. या समुदाया अंतर्गत एखादा उपक्रम राबवूयात का? काही प्रकाशचित्रे द्यायची आणि आपपली मते मांडायची. यामुळे बरेच लोकशिक्षण सुद्धा होईल. आपले काय मत?

ह्म्म्

या समुदाया अंतर्गत एखादा उपक्रम राबवूयात का? काही प्रकाशचित्रे द्यायची आणि आपपली मते मांडायची
सहमत,
फक्त छायाचित्रे स्वत:ची द्यायची..... सोबत छायाचित्राची एक्सीफ (EXIF) माहिती पण दिलीत तर बरे होइल.

-
ध्रुव

चला तर मग

ध्रुव, तु पहिले प्रकाशचित्र देउन सुरुवात करतोस का? बाकी मग तज्ञ आहेतच...

नक्की

देतो...

ध्रुव

ढाक बहिरी

ढाक बहिरी आणि कळकराय हे नेमके काय प्रकार आहेत? ;-) आमच्या ज्ञानात थोडीशी भर घालाल का? :-) शक्य असल्यास एक मस्तसा लेखही चालेल.

बाकी, फोटो सुरेखच.

असेच म्हणतो...

शक्य असल्यास एक मस्तसा लेखही चालेल.

.
जन सामान्यांचे मन

मस्त!

अभिजित, छायाचित्रे मस्त आहेत. एकटा जीव, आकाश आणि शेवटचे चित्र विशेष आवडले. "खाली फक्त दरी" चा फोटो भन्नाट आहे!

अगदी सर्वच नसले तरी काही फोटो फोटोग्राफीचे सर्वमान्य नियम .... लक्षात घेऊन काढले आहेत.

कोणते बरे हे नियम?

खाली फक्त दरी

सर्वच छायाचित्रे आवडली. वर प्रियाली ने म्हणल्याप्रमाणे ढाक बहीरीवर लेख वाचायला आवडेल.

छायाचित्रे नियम पाळून काढलीत, ते बरे केलेत :-) आता ते नियम कुठले ते कळले तर आमच्या सारख्यांना आम्ही छायाचित्रे नियमात काढतो की नियमबाह्य काढतो ते समजेल!

"खाली फक्त दरी" चा फोटो भन्नाट आहे!

+१.

त्यात "मुलाचे तरी पाय दरीत दिसताहेत" असे आणि "बाळा जरा जपून बरं का," असे म्हणवेसे वाटले :))

+१

वा! प्रकाशचित्रे अतिशय भन्नाट! :) त्यातही "खाली फक्त दरी" चा फोटो तर श्वास रोखायला लावणारा आहे :)

बाकी

आता ते नियम कुठले ते कळले तर आमच्या सारख्यांना आम्ही छायाचित्रे नियमात काढतो की नियमबाह्य काढतो ते समजेल

+१

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणरे आणि न समजणारे

++१ | जगात

++१

------------------
जगात १७६० प्रकारचे लोक असतात, मोजायला येणारे आणि मोजायला न येणारे :)

अवांतर फाजीलपणा

कळकराय कळसूबाईचा कोणी आप्त-स्वकीय लागतो का रे अभिजीता? ;-)

मस्त रे !!!

अभिजित,
ढाक बहिरीची चित्रे सुरेख.

ढाक बहिरी काय आहे ?कळकराय म्हणजे कोणत्या देवाचे नाव ? :)
राजमाची किल्ला, नागफणी यावर जरा माहितीपूर्ण लेखन येऊ द्या !!!

छान चित्रे

गिरिभ्रमणाचा वृत्तांत तुम्ही किंवा आजानुकर्णांनी लिहून कळवावाच.

फोटो सुंदरच आहेत.

१. "एकटा जीव सदाशिव" (येथे अल्ट्राव्हायोलेट फिल्टर वापरून धुकट-धुरकटपणा कमी झाला असता का? आहे हसे चित्र ठेवल्यासही काही तक्रार नाही. रंग "इंप्रेशनिस्ट चित्रकारांसारखे वाटतात.)
२. "आकाश" (यात एखादीच काडी फोकसमध्ये ठेवली असती तर एक वेगळे प्रभावी चित्र निर्माण झाले असते.
वगैरे वगैरे बारीकसारीक.

चित्रे थरारक आहेत.

मस्त रे...

एकदम झकास!!

"एकटा जीव" खूपच आवडले (मोकळ्या आभाळाची चित्रे मला जास्त भावतात@@)

ढाकला जाऊन आता एकदम युगे लोटल्यासारखे वाटायला लागले... एकूणच ढाक हा लिहायचा (माझ्याच्याने तरी ) नाहीच तर मोकाट जगायचा प्रकार आहे.

अभिजित आणि गँगचे अभिनंदन, हेवा आणि (फोटो दिल्याबद्दल) आभार!!

सु रे ख!

वा वा!
काय मजा करता रे तुम्ही!
चित्रे अतिशय सु रे ख आहेत!
बघून अगदी तुमच्या बरोबर भटकायला यावेसेच वाटले.
ती धुळकटलेली घळ सुद्धा चढून यावीशी वाटली.
जंगलपण बरं दिसतंय...
काही लोकल लोकं वगैरे भेटली की नाही? काही किस्से?
आणि मिसळ खाल्ली का???

फार मजा आली असणार एकुणच...

लेखाची वाट पाहतो आहोतच... तोच आनंद!

बाकी दरीचा फोटो विषयी सर्वांप्रमाणेच +१

आपला
भटकोपंत

मिसळ

मिसळ नाही खाल्ली पण पिठलं भाकर, ठेचा, कांदा खाल्ला. खाल्ला कसला हाणला. इतर फोटो येथे मिळतील.

अभिजित...

छान

चित्रे झकास आली आहेत :))


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

वृत्तांत

आधीच्या योजनेनुसार शुक्रवारी रात्री जायचे ठरले होते. (पण एका सदस्येला दुसरी कामे असल्याने शनिवारी जायचे ठरले आणि तरीही उन्हात काळी पडण्याची शक्यता असल्याने ती आलीच नाही ;) ).

शनिवारी सकाळी ५.४५ ला पुणे लोणावळा लोकलने निघालो. एकूण ७ सदस्य होते. त्यापैकी ३ सदस्य हे ढाकच्या त्रैमासिक वार्‍या करत असल्याने त्यांच्या अनुभवाची शिदोरी सोबत होतीच. लोकलमध्ये बसल्यावर आधी येणार येणार म्हटलेले इतर सदस्य का नाही आले वगैरे चौकशी केली तर "ढाक सोडून कुठेही - अगदी हिमालयात पण - यायला तयार आहे. पण ढाक नको!" असंच न आलेल्या सर्वांचं म्हणणं होतं हे कळलं आणि जरा भीती वाटायला लागली.

मळवलीच्या अलीकडे असलेल्या कामशेत स्टेशनावर साधारण ७.०० ला उतरलो. भूक लागली होती. पण कामशेत गावातून जांभिवलीला जाण्याची व्यवस्था काय आहे हे बघायचं होतं. गावात गेल्यागेल्या लगेच मागून जांभिवलीची एक एस्टी येताना दिसली. हात दाखवून एस्टी थांबवली आणि बसलो. जुनी एशियाड बसचा लाल डब्यात कायाप्रवेश केलेली बस होती. मला लाल डब्यातली सीटंच जास्त आरामदायी वाटतात. ह्या जुन्या निम-आराम गाडीच्या शीटांमुळे १० मिनिटात पाठ दुखायला लागली. ५० मिनिटात जांभिवली गावात पोचलो. आमच्याच एस्टीत आलेला दुसरा एक लहान ग्रुपही झोपायचे सामान घेऊन तिथे उतरला. ते बहुधा ढाकवर मुक्कामाच्या योजनेने आले असावेत.

जांभिवली अगदी छोटं गाव आहे. ५० घरं असावीत. अनुभवी सदस्यांनी आधीच्या फेर्‍यांमध्ये काही ओळखी काढून ठेवलेल्या असाव्यात. एका दुकानवजा घरात पोहे आणि चहा सांगितला. पोहे व्हायला तासभर लागले. नंतर साखरपाक ऊर्फ चहा झाला. कंटाळा पळून गेला आणि नऊ वाजता चालायला सुरुवात केली.

जांभिवली गावातून सुरुवातीचा अर्धापाऊण तास तुरळक झाडी लागत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला करवंदाची आणि आंब्याची झाडं. पुढे अजून भरपूर करवंदं मिळतील अशी अनुभवी मंडळींनी खात्री दिल्याने थोड्याच करवंदांची चव बघून चिकट झालेला हात आवरता घेतला. पाणी कमी पडायला नको म्हणून हातावर माती चोळून चिकटपणा घालवला.

ऊन कडक व्हायला लागले होते. पण मधून मधून ढगही येत होते त्यामुळे फारसा त्रास होत नव्हता. वाराही जोरदार सुटला होता. एक पठार चढून वर आलो आणि मग ढाकचा सुळका दिसायला लागला. थोडा वेळ विश्रांती घेतली. अभिजितने मंडईतून (हो हो मंडई म्हणजे भाजी मंडईच) आणलेल्या चिकू-काकडी-टोमॅटोवर ताव मारला. बाजूला एका झाडाखाली माडी घेऊन बसलेले तिघेजण होते. मागच्या एका ट्रेकमध्ये काही सदस्यांनी माडी पिऊन काय प्रकार केले होते त्याची चर्चा झाली. नंतर हळूहळू ढाकचा ट्रेक कसा अवघड आहे याच्यावर चर्चेची गाडी आली.

एक पण मिस्टेक झाली ना तर काय खरं नाही. पण बाकी सोपा ट्रेक आहे.

च्यायला, नवीन आलेल्या लोकांना असं सांगितल्यावर कोण चढंल का?

हे बघा. आपलं काम आहे तुम्हाला वार्न करायचं. नाही तर परत म्हणाला सांगितलं नव्हतं. आणि जमेल रे. आपण दोरी आणली आहे. कमरेला दोरी बांधून खेचून घेऊ वर.

मागच्या वर्षी बीजे मेडीकलची दोन पोरं गेली ना तिथं.

दोन नाही एक.

मी दोन ऐकलं होतं.

नाही. एकच होता.

काय दोरी तुटली का?

नाही. डोळे फिरले त्याचे वर आल्यावर. चक्कर आली.

च्यायला.

डायरेक्ट खाली. सूं...

अरे माझ्या ओळखीचा होता तो. माझ्या मित्राच्या मित्राचा रूममेट. शिरूरला होता शिकायला.

अरे घाबरू नको आपण चढू.

पठार संपल्यावर जंगल लागलं. मे महिन्याची १७ तारीख आहे. सकाळचे १०.३० वाजले आहेत असं वाटतंच नव्हतं इतकं घनदाट जंगल. अगदी रात्री येतो तसा किर्र आवाज येत होता. आणि जोरदार मोठ्या माशा गुणगुणत होत्या. डोकं उठलं. आम्ही आलो होतो त्या पठारावरून उतरून ढाकच्या डोंगराच्या साधारण मध्यापर्यंत जायचं आणि मग ढाकचा डोंगर चढायचा होता. माश्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. दमलो तरी थांबून देत नव्हत्या. थांबलो की चावायच्या. मग तसंच धावत पळत फोटोत दिसते त्या घळीपर्यंत आलो. बाजूला असलेल्या ढाकच्या सुळक्यावर (कळकराय) वर काही मंडळी चढाईचे प्रयोग करत होते. पण त्या कामापेक्षा समोरचे काम अवघड होते हे घळ पाहून कळले.

एक तर दोन डोंगरांमध्ये असलेल्या साधारण फूट-दीडफूट खाचेची ती घळ होती. उन्हाळ्यामुळे मोकळी झालेली माती आणि खोल खड्डे यामुळे उतरताना त्रास होत होता. समोर थेट दरी होती. पाय चुकला की खाली. पाठीवरची बॅग अडकून पाय खाली टेकत नव्हते. टेकले तरी घसरत होते.ती घळ उतरून खाली आलो. आता समोरचा अर्ध्यातासाचा शेवटचा टप्पा राहिला होता.

हा टप्पा सगळ्यात अवघड. मला खूपच भीती वाटायला लागली त्यामुळे माघार घेऊन मी खाली गुहेतच थांबलो. काही सदस्य वर जाऊन आले. त्यांचे अनुभव त्यांच्यापाशी :)

मायबोलीवर सापडलेले हे दोन फोटो ट्रेकचा धोका पुरेसे स्पष्ट करणारे आहेत.

येतानाचा अनुभव फारसा वेगळा नव्हता. पण उगीच वाटत राहिलं की थोडं डेरिंग केलं असतं तर जमलं असतं. पण बरं झालं नाही केलं. एक तर माझी उंची कमी आहे. त्यामुळे पाय ठेवायची जागा आणि हाताने धरायच्या कपारी यामध्ये जास्त अंतर असले तर फार त्रास होतो. दुसरा माणूस मदत करू शकेल इतकी जागाच नाही आणि इथे चूक झाली तर दुसरी संधी नाही. येताना परत माश्या, ऊन, वारा. फक्त येताना भरपूर करवंदं खाल्ली. नंतर गावात आल्यावर पिठलं भाकरी आणि ठेचा. मग कामशेत आणि नंतर शिवाजीनगर.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

वा रे!

मस्त रे कर्णा!
"ढाक सोडून कुठेही - अगदी हिमालयात पण - यायला तयार आहे. पण ढाक नको!"

फोटो पाहिल्यावर मलापण असं वाटायला लागलं बरं का... ;))
म्हणजे लंपन सारखं पोटात पाक पुक की काय म्हणतात तसं!
एशियाड चा कायाप्रवेश हा प्रयोग जबरी आवडलाय!
मला लाल डब्यातली सीटंच जास्त आरामदायी वाटतात.

हो रे अगदी खरं आहे! ती शिटं आजीबाईंसारखी मऊ प्रेमळ असतात. एशियाड सिट्स् मात्र खडूस आंटी सारखे असतात.

साखरपाक ऊर्फ चहा झाला.
वेगळ्या ठिकाणी/गावात असलो की हा चहा पण उत्तम लागतो हे मात्र खरे. असा बनवतात कारण चांगला चहा म्हणजे गोड चहा अशीच व्याख्या असते.

पाणी कमी पडायला नको म्हणून हातावर माती चोळून चिकटपणा घालवला.
शाबास.. येकदम व्हर्जिनल ट्रेकर आहेस् गड्या!

बाजूला एका झाडाखाली माडी घेऊन बसलेले तिघेजण होते
अरे अश्या ठिकाणे जायचं आणि माडी प्यायची? अरेरे!
संभाषण जबरी घेतले आहेस्.
'गेलेला तो' पण माडी प्यायलेला होता का रे?
आणि माशा चावायच्या? बापरे त्या मोठ्या घोडमाशा असणार. नांगी होती का?
फोटो पाहून कळंलच की ट्रेक फाडू आहे.
पण उगीच वाटत राहिलं की थोडं डेरिंग केलं असतं तर जमलं असतं.

अरे असं तर 'नंतर' होतंच असतं. पण त्या क्षणी जे वाटलं ना तेच खरं बाकी!
मला वाटतं की तू योग्य तेच केले.

- गुंडोपंत

अगग

अभिजीत, योगेश धन्य आहात!! फोटो आवडले, वर्णन आवडले.

दरीचा फोटो पाहून माझ्या पायात गोळे आले. फोटो पाहून बसल्या जागी थरार, रोमांच अनुभवला. धन्यवाद!!

जबरॉ, भन्नाट.

अवांतर - खाली फक्त दरी चा फोटो जर का उजवी कडे कलुन पाहीला तर झाडे वरच्या दिशेला [नॉर्मल दिशा] व पाय जोर काढायला त्या शिळेवर असा ट्रीक फोटो वाटु शकतो. ;-)

ही बहिरी कोन?

ढाक बहिरी मधली ही बहिरी कोन? आमचा एक सरकती ( शेती सांभाळणारा मुकादम )व्हता. त्याच नाव चंदु. त्याच्या बायकोच नाव बहिरी. कारण ती मुकी व बहिरी होती. त्यावरुन तिचे नाव बहिरी असेच पडले होते. शेतीचा जमाखर्चाच्या वडिलांच्या वहित तिचे नांव सौ. बहिराबाई चंदु येडे असेच लिहिले होते. सोमवारी सर्वांचा आठवड्याचा पगार घरी होई. त्यावेळी तिचा आंगठा घेतला जाई. तिची मुल ही तिला आई हाक न मारता बहिरीच हाक मारत. मुकी बहिरी असुनही सगळा संसार रेटला. चार मुलं नवरा. सर्व शेतमजुरात चंदु एकटाच अक्षरओळख असणारा होता . त्यामुळे तो सरकती झाला. तसा चंदु बी ढाक व्हताच. म्हनुनच बहिरीच निभावल.
प्रकाश घाटपांडे

भाषा

किस्सा आवडला. काहीसा क्रूर वाटला पण तरी आवडला.
पुर्वीच्या काळी आपण 'जसे आहोत तसे आहोत' हे मान्य करणे फार सहज होते. सर्व भार देवावर असल्याने 'त्याने जसे घडवले तसे' या विश्वासावर मीच असा का? असा आत्मक्लेश करून घेण्याचे कारणच नव्हते, नाही का?

तसा चंदु बी ढाक व्हताच.

यात ढाक शब्दाला असलेला अर्थ वाचून गंम्मत वाटली. या शब्दाला काही अर्थ असेल असे वाटलेच नव्हते.

-निनाद

सर्वसाधारण नियम

नियम कोणते हा प्रश्न तर् अपेक्षित होताच :-)

या प्रतिसादात बरेच इंग्रजी शब्द आलेले असतील. तेव्हा चर्चेचा रोख इंग्रजी शब्दांना मराठी शब्द वापरावे का असाही वळू शकतो. पण कृपया वळवू नका. उलट त्या शब्दांना सारखाच शब्द मराठीत असेल तर् तो लिहिल्यास मला पुढच्या वेळी तो माहित असेल. फोटोला छायाचित्र म्हणण्याऐवजी प्रकाशचित्र म्हणणे मला पटते पण् त्याचा वापर करणे सुटसुटीत वाटले नाही.

१. रूल ऑफ थर्डः चित्राचे कंपोझिशन हा चित्र चांगलं दिसण्यातला सर्वात महत्त्वाचा घटक आहे. सर्वसाधारणपणे रुल ऑफ थर्ड आपल्याला चांगले कंपोझिशन मिळवून देतो. चित्रातला जो भाग आपल्याला महत्त्वाचा वाटतो तो भाग खालील चार् लाल ठिपक्यांवर किंवा उभ्या वा आडव्या रेषांवर आला पाहिजे.

उदा: हा फोटो पहा.

बैलगाडी उजव्या कोपर्‍यात आहे. ह्या ऐवजी जर मी बैलगाडी मध्यभागी ठेवून फोटो काढला असता तर तो तितका सहज वाटला नसता. आपल्या स्वाभाविकपणे महत्त्वाची गोष्ट मध्ये ठेवावीशी वाटते. पण फोटोमध्ये १/३ अंतरावरच्या रेषा आणि लाल बिंदू नजरेत लगेच भरतात.

किंवा हा

२. कंपोझिशनचे इतर नियम (कर्ण, मध्य वगैरे): कधी कधी स्वतःच्या डोळ्यांना जे सुंदर दिसते पटते ते करावे. पण अशा गोष्टी कधी कधीच चांगल्या दिसतात. (चांगलं वाईट आपण फोटो कोणासाठी काढतोय त्याने/त्यावर ठरवा.)

आता हा फोटो पहा :

मध्ये पडलेलं जे झाड आहे ते बरोबर कर्णावर आहे. (मराठीत हे सगळं अवघड जातंय.) हे मला फोटो काढल्यावर कळालं ;-) पण तोही एक थंब रूल आहेच. नवीन नवीन प्रकारे फोटो काढतच आपण शिकतो.

किंवा हा फोटो पहा: यात ढग फोटोच्या मध्ये आहे.

खालील फोटो जरासा चुकला आहे. सममिती (सिमेट्री ) पाळली असती तर परिपूर्ण झाला असता.

३. नवीन कोन/दृष्टिकोन/अँगल्सः फोटो घेताना नवनवीन अँगलमधून फोटो काढा. डिजीटल कॅमेर्‍यामुळे आपल्याला वाट्टेल तेवढे फोटो काढता येतात. (;-) मी काही नवीन सांगत नाही). वरचा आकाश नावाचा फोटो पहा. यात मी खाली बसून वाळलेल्या झाडाझुडपांच्या काड्यांतून वर बघत हा फोटो काढला आहे. (धनंजय यांच्या प्रश्नाचे उत्तर:तशा त्या साधारण एक ते दीड पुरुष उंचीच्या काड्या असल्याने एकाच काडीच्या फार जवळ जाता आलं नाही. तुम्हाला अपेक्षित असलेला दुसरा एक फोटो मी काढला आहे. लवकरच दाखवतो. )

तसाच हा फोटो पहा: यात राजांच्या उजवीकडे पायाशी बसून फोटो काढला आहे. एक वेगळा कोन आणि नेहमीपेक्षा वेगळा फोटो. :-)

४. जवळ जा: थांबा. जा म्हटलं की निघाला? ज्याचा फोटो काढायचा त्याच्या शक्य तितक्या जवळ जा. काही वेळा हे शक्य नसते. पण जेव्हा शक्य असेल तेव्हा नक्की करून बघा. घरातल्या छोट्या छोट्या वस्तूंचेही सुंदर फोटो येतात.

उदा: ह्या रुल ऑफ थर्ड सुद्धा वापरलाय पहा. पण मुलीच्या लक्षात आले असते तर मला थर्ड लागला असता. या फोटोचे सौजन्य तिचेच आहे असे म्हणायला हरकत नाही. पण असं शक्यतो करू नये. विचारल्याशिवाय फोटो काढू नये. हाही एक नियमच आहे.

५. शटर स्पीडः शटर स्पीड कमी ठेवून एखाद्या गतिमान वस्तूची गती दाखवता येते. उदा. एखादा धबधबा आहे आणि १/१००० सेकंद शटर स्पीड ठेवून फोटो काढलात तर पडणारे पाणी जणू स्तब्ध झाले आहे असे दिसेल. पण ते तसे असत नाही म्हणून शटर स्पीड १/२०० किंवा थोडे कमीजास्त करून पाण्याचा वाहतेपणा दाखवता येऊ शकतो.

उदा: पळणारे खेळाडू, गाड्या, चक्रे वगैरे गोष्टींची गती फोटोत दिसली तर् तो फोटो अधिक सहज काढलेला आणि वास्तवदर्शी वाटतो.

किंवा

हे आणि असे बरेच काही. याला नियम न म्हणता सल्ले म्हटलं तरी चालेल. कारण ह्या गोष्टी वारंवार प्रत्यक्ष करून शिकायच्या असतात. तसेच हे केले तरच फोटो चांगले येतात असं काही नाही. किंवा वर दिलेले माझे फोटो मला चांगले वाटले पण दुसर्‍याला वाटतीलच असं नाही. वरचे फोटो त्या त्या नियमाची उदाहरणे म्हणून ठीक आहेत. शेवटी महत्त्वाचे : नियम तोपर्यंत पाळा जोपर्यंत तुम्हाला ते कधी तोडायचे हे समजत नाही .

खालील दोन संकेतस्थळे उपयुक्त आहेत.
नॅशनल जिऑग्रफिक
डिजिटल फोटोग्राफी स्कूल

अभिजित...

सुरेख..

अभिजित,सुरेख फोटो आणि त्यांच्या कॅप्शन्सही आवडल्या..:)
रुल्सही वाचले आणि कर्णा, वृतांतही उत्तमच! आवडले.
स्वाती

समसमासंयोग

उत्कृष्ट प्रकाशचित्रे , ती कशी काढावीत याची तांत्रिक माहिती अभिजितचा देणारा लेख-प्रतिसाद आणि -
ती कुठे? कोणत्या परिस्थितीत काढली?- याबद्दल माहिती देणारा आजानुकर्णाचा प्रतिसाद!
समसमासंयोग की जाहला!

एकूण चर्चा मनोरंजक आणि उद्बोधक - आवडली.

वा

वा ! चित्रे, वर्णन, अजानुकर्णाचा प्रतिसाद सर्व आवडले.
--लिखाळ.

सुंदर वर्णन आणि सुरेख प्रकाशचित्रे

कित्येक वर्षांपूर्वी केलेला 'ढाकचा बहिरी' पुन्हा ताजातवाना होऊन डोळ्यांसमोर उभा राहिला! कर्ण, अभिजित धन्यवाद!
असे खतरनाक पहाड हे कायम एक आव्हान असतात पुन्हःपुन्हा चढून जाण्यासाठी!

चतुरंग

आवडले.

मस्त चित्रे. खाली फक्त दरीचे छायाचित्र फारच रोमांचकारी.

ढाक

ढाकचे फोटो आणि ढाकचा ट्रेकही सुंदर आहे. ढाक म्हणजे महराष्ट्रातील ट्रेकर्सची पंढरी. ढाकला आपण गेला नसाल तर आपण अजून नवखे/बच्चे आहात अश्या अर्थानी लोक बघतात.
ढाक: http://www.trekshitiz.com/
ढाकचा ट्रेक म्हणजे महाराष्ट्रातील काही अवघड किल्ल्यांपैकी एक. पुण्यापसुन निघुन मुंबई जुन्या मार्गाने कामशेतपर्यंत जावे तिथुन जांभीवली गावापर्यंत गाडी मार्ग जातो. जांभीवली गावात गाडी लावुन एका दिवसात ढाकचा किल्ला व ढाक बहिरीची (भैरी/ढाकच्या भैरवाची) गुहा बघुन परत येता येते. जांभीवली गावातुन कळकराय (कळकराय हा ढाक किल्ल्याच्या बाजुला असलेला प्रस्तरारोहटण करण्यास अवघड असलेला एक सुळका आहे) व ढाक किल्ल्याचे सुंदर व रौद्र दर्शन होते. येथुन एक पायवाट ढाकच्या व कळकरायच्या मधल्या खिंडीत जाते. य्र्थुन एक रस्ता खाली दरीकदे जातो व एक रस्ता ढाकच्या किल्ल्याकडे जातो. दरीकडे जाणारा रस्ता पकडून थोडेसेच् खाली उतरले की डावीकडे कळकराय सुळका अंगावर पडेल असे वाटते व उजवीकडे दगडाच्या छातीमध्ये ढाकची जगप्रसिद्ध गुहा दिसते. गुहेत चढुन जायला थोडेसे सोप्या श्रेणीचे (पुस्तकातील सोपी. आपल्यासरख्या माणसांना तेही भितीदायक वाटते :) ) प्रस्तरारोहण करावे लागते. शेवटचे दहा फुट चढताना मात्र नक्की काळजी घेणे आवश्यक आहे.

ढाकच्या गुहेत गेलो की लक्षात येते की वर दोन गुहा आहेत. प्रथम गुहेत बहिरी देवाचा म्हणजेच भैरोबा/भैरवाचा रंग फासलेली दगद दिसतो. याच गुहेमध्ये दोन पाण्याची डटाकी आहेत. यातील पाणी पिण्यासाठी वापरता येते पण हल्ली फारच खराब झाले आहे. याच पाण्यात काही मोठी काही छोटी भांडी बुडवलेली आहेत. ही भांडी खालच्या गावातील लोक जत्रेच्या वेळेला वापरतात. आपणही भांडी वापरुन परत धुवोन ठेवली तर चालते. दुसरी गुहा ही बळीचे प्राणी पक्षी मारायला वापरतात असे वाटते. कारण दुसर्‍या गुहेत जी पाण्याची कुंडं आहेत ती पाण्याऐवजी प्राण्या-पक्ष्यांच्या केसा पिसांनी भरलेली दिसतात. येथे वासही फार घाण येतो. हे असे नेहमी असते क ते माहित नाही पण आम्ही गेलो तेव्हा तरी असे दिसले.

ढाकच्या गुहेतुन उतरायला तिन मार्ग आहेत, एक म्हणजे आलो तसे परत जाणे. दुसरे म्हणजे दोर बांधुन १००-१२० फुट रॅपलींग करुन उतरणे अथवा तिसरे म्हणजे थेट उडी मारणे :)

ढाकला जेव्हा केव्हा जाल तेव्हा काही खबरदारी घ्यायला विसरु नका.
१. येथील गुहांमध्ये चप्पल बुट चालत नाहीत.
२. ढाकच्या बहिरीच्या गुहेत स्त्रियांना परवानगी नाही.
वरील दोन्ही गोष्टी गावातले बरेच लोक असतील तेव्हाच पाळायच्या. शक्यतो अश्या ठिकाणी गावकर्‍यांच्या भावना दुखावुन चालत नाही.
३. प्रथमोपचार पेटी बाळगा.

वरील माहिती बर्‍याच अंशी पूर्ण सांगण्याचा प्रयत्न केला आहे. चू.भू......
ध्रुव

चपखल

ध्रुव,
चपखल आणि स्थानिक माहिती ,अतिशय नेमक्या शब्दात चपखलपणे मांडल्या बद्दल अभिनंदन.
आवडले!

आपला
गुंडोपंत

परत जाण्याचे मार्ग

ढाकच्या गुहेतुन उतरायला तिन मार्ग आहेत, एक म्हणजे आलो तसे परत जाणे. दुसरे म्हणजे दोर बांधुन १००-१२० फुट रॅपलींग करुन उतरणे अथवा तिसरे म्हणजे थेट उडी मारणे :)

:-)) आवडलं बरंका..हे परत जाण्याचे मार्ग म्हणजे घरी परत जाण्याचे की देवाकडे परत जाण्याचे मार्ग आहेत??

ढाकला आपण गेला नसाल तर आपण अजून नवखे/बच्चे आहात अश्या अर्थानी लोक बघतात.

खरी गोष्ट आहे. मागे एका मित्राला म्हणालो की आम्ही भरपूर ट्रेक केले. त्याने विचारले ढाकला गेला होता का? मी नाही म्हटल्यावर असा तुच्छ कटाक्ष त्याने टाकला की बस..

ढाकवरील योगेश आणी ध्रुवच्या प्रतिसादाचा वेगळा लेख केला तरी चालेल.

अभिजित...

शिकवणी.

या सर्व दिग्गज लोकांकडून मला शिकवणी घ्यायला आवडेल.

उपक्रमी लोकांचा गिर्यरोहण, पदभ्रमण करणार्‍यांचा उत्तम गट होऊ शकेल,

कृपया यावर पूढाकार घ्यावा.

चांगली माहिती मिळते आहे

जास्त काय बोलू?
आपला,
(चालू फोटोग्राफी स्कूलचा विद्यार्थी)अनिरुद्ध दातार

छान

अभिजित, फोटो आणि माहिती एकदम मस्त! :-)

प्रत्यक्षाहून

प्रतिमा उत्कट... असेच म्हणावेसे वाटते आहे, फारच छान फोटो आहेत सगळे. अनुक्रमे ३ रा, ४ था आणि ५ वा मनाला जास्त भावले.

________________________________________________________
संपादन मंडळांकडून फूस असल्याशिवाय योगिराज टगोजींचे अवांतरप्रतिसादकार्य पार पडले नसते. त्यामुळे, योगिराजांना संपादनमंडळातील कुणीतरी शिष्या सामील आहे, असे आम्हाला वारंवार वाटते आहे. (अतींद्रिय शक्ती). (शुक्रवारी योगसाधनेच्यावेळी ह्या कन्येची आमच्या अंतःचक्षूंपुढे प्रतिमा येईलच, तेव्हा आम्ही तुम्हा सर्वांना कळवू.)
- सर्किट

 
^ वर