ग्रीनडेक्स - ग्राहक आणि पर्यावरण

विविध देशांची सरकारे आणि कंपन्या कितपत पर्यावरण-सजग आहेत यांची सर्वेक्षणे नेहमी होत असतात. पण सर्वसामान्य लोकांची जीवनशैली आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम यांचा अभ्यास नुकताच नॅशनल जिओग्राफिक सोसायटीने (National Geographic Society) केला. वेगवेगळ्या देशांचे नागरिक, उपभोक्त्यांच्या/ग्राहकाच्या रूपात असताना पर्यावरणाबद्दल कितपत जागरूक असतात याचा आढावा या अभ्यासातून घेतला आहे. प्रत्येक देशाला मिळालेल्या गुणांना त्यांनी ग्रीनडेक्स (Greendex) असे नाव दिले आहे.

या सर्वेक्षणात चौदा देशातील नागरिकांना खालील विषयांवर प्रश्न विचारले गेले :

  • ऊर्जेचा वापर आणि ऊर्जेची बचत
  • परिवहनाचे पर्याय आणि निवड
  • नेहमीच्या अन्नाचा स्रोत
  • पारंपारिक वस्तूंऐवजी पर्यावरणास उपकारक वस्तूंचा वापर
  • पर्यावरण आणि त्याच्या संवर्धनाविषयीचा दृष्टिकोन

सर्वेक्षण अचूक होण्यासाठी ग्राहकांचे ऐच्छिक वर्तन विचारात घेतले होते. (म्हणजे पर्याय असताना ग्राहकांनी हेतूपूर्वक घेतलेला निर्णय)

सर्वेक्षणात असे दिसून आले की भारत आणि ब्राझील या देशांतील ग्राहक पर्यावरणाविषयी आणि ते टिकवण्याविषयी जास्त सजग आहेत. त्यांनी प्रत्येकी ६० ग्रीनडेक्स गुण मिळवले. या दोन देशांपाठोपाठ आहेत चीन (५६.१ गण), मेक्सिको (५४.३ गुण), हंगेरी (५३.२ गुण) आणि रशिया (५२.४ गुण) श्रीमंत देशांपैकी ब्रिटन, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया यांनी ५०.२ गुण मिळवले. सर्वात कमी म्हणजे ४४.९ गुण अमेरिकेच्या ग्राहकांनी मिळवले.

या सर्वेक्षणातून असे दिसून आले की विकसनशील देशांमधील ग्राहक पर्यावरणाविषयी अधिक जागरुक आहेत आणि पर्यावरणाविषयी स्वतःला जबाबदार मानतात. शिवाय जागतिक तापमान वाढीचा (global warming ) आपल्यावर वाइट परिणाम होईल असे विकसनशील देशांतील ग्राहकांना वाटते. पर्यावरणाविषयी बोलण्यास/ऐकण्यास ते अधिक उत्सुक असतात, पर्यावरणावरील परिणाम टाळण्यासाठी काहीतरी करावे अशी त्यांची इच्छा असते. हे त्यांच्या खालील वर्तनावरून दिसून येते.

  • तुलनेने लहान घरे
  • पर्यावरणास कमी हानी पोचवणार्‍या उत्पादनांना (green products) अधिक पसंती
  • वीजेवर चालणार्‍या आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा कमी वापर
  • चालणे, सायकल किंवा सार्वजनिक परिवहन यांचा अधिक वापर
  • नेहमी जावे लागणार्‍या ठिकाणाच्या जवळ राहण्यास पसंती
  • स्थानिक किंवा जवळच्या प्रदेशात तयार झालेल्या अन्नाचे सेवन

विकसित देशांतील नागरिकांचे वर्तन पुढीलप्रमाणे आढळून आले

  • मोठी घरे आणि वातानुकूलन यंत्रणा
  • अनेक गाड्या आणि एकट्याने बर्‍याचवेळा प्रवास
  • सार्वजनिक परिवहनाचा कमी वापर
  • पर्यावरणास कमी हानी पोचवणार्‍या उत्पादनांना (green products) अधिक पसंती नाही
  • पाण्याचा अधिक वापर

विकसनशील देशांच्या आर्थिक प्रगतीमुळे त्या देशांतील ग्राहकांचे वर्तन बदलून हे गुण भविष्यात बदलू शकतात.

संदर्भ :
१. http://event.nationalgeographic.com/greendex/
२. http://afp.google.com/article/ALeqM5iCtHHXiQoR1Z5P5kI2gLjjx_AuCw

=======================================================================

  • या सर्वेक्षणाविषयी आपले काय मत आहे?
  • विकसनशील देशातील ग्राहक पर्यावरणाविषयी अधिक जागरूक/संवेदनशील असण्याचे कारण काय असावे?
  • विकसित देशातील ग्राहकांचा पर्यावरणाविषयीचा दृष्टिकोन निष्काळजी असतो का? (असतो, का?)
  • एक ग्राहक म्हणून पर्यावरणासाठी आपण काय करू शकतो?
  • याशिवाय या विषयाशी संबंधित इतर मुद्दे

Comments

काय करायला हवे?

मी जेंव्हा जेंव्हा प्रवास करतो तेंव्हा रिकाम्या पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा खच झालेला बघतो तेंव्हा नकळतच माझ्या मनात असा विचार आणि कल्पना येते. प्रवासाच्या प्रत्येक ठिकाणी ( सुरवात, मध्ये आणि शेवटच्या थांब्यावर) आपण चांगल्या पाण्याचे माठ ठेवले पाहिजे आणि ज्याला हवे असेल त्याने तेथून विकत घेतले पाहिजे. म्हणजे बाटली विकत घ्या आणि फेकुन द्या ही प्रथा बंद पडायला साह्य होईल.

पिण्याचे शुद्ध पाणी

पिण्याचे शुद्ध पाणी हा एक मोठा प्रश्न आहे. भविष्यात अधिकच उग्र स्वरूप घेईल. तुम्ही म्हणता तसे झाले तर खरेच चांगले होईल.

पिण्याचे पाणी

पुण्यात पाणी विकण्यासाठी बिसलरी च्या बाटल्या आल्या तेव्हाची गोष्ट. जिथे पुण्ण्यासाठी पाणपोई उघडल्या जातात आणी पाणी सुद्धा दुष्प्राप्य नाही तिथे ही बिसलरी च पाणी विकत घ्यायला लोक काय येडे आहेत का? असा प्रश्न तेव्हा माझ्या मनात आला होता. लवकरच तो फोल ठरला. नेहरु स्टेडियमला क्रिकेटची मॅच होती तिथे बंदोबस्ताचा भाग म्हणुन बिनतारी स्थानक लावायला आम्ही गेलो. बिसलरी वाल्यांनी काय आयडिया केली. आदल्या दिवशी तिथल्या कर्मचार्‍यांना हाताशी धरुन तेथील पिण्याची पाण्याची व्यवस्था कुचकामी केली. पोलिसांना बिसलरी फुकट दिले आणि मॅचला बिसलरीचा खप आणी रिकाम्या बाटल्यांचा खच वाढला.
प्रकाश घाटपांडे

युरेका

युरेका फोर्ब्स ने रेल्वे स्थानकावर चालवलेला असा एक 'प्याऊ' पाहण्यात आहे. इथे माफक दरात शुद्ध पाणी तुम्ही सोबत आणलेल्या बाटलीत भरून मिळते.

पर्यावरण की पर्याय?

विकसनशील देशांमधील ग्राहक पर्यावरणाविषयी अधिक जागरुक आहेत आणि पर्यावरणाविषयी स्वतःला जबाबदार मानतात.

हे वाक्य अजिबात पटले नाही. येथे प्रश्न पर्यावरणाचा नसून पर्यायांचा आहे. जर विकसनशील देशांत विकसित देशांसारखे पर्याय उपलब्ध झाले तर विकसनशील देशातील लोकसंख्या पाहता हेच आकडे कसे बदलतील याचा विचार करा. विकसित आणि विकसनशील देशांतील मनुष्यप्राण्याच्या गरजा वेगळ्या असतात परंतु जसा विकास घडतो तशाच गरजांचे डोंगरही वाढू लागतात.

त्यामुळे, वरील सर्वेक्षण फसवे वाटले.

  • तुलनेने लहान घरे - पण लोकसंख्या?
  • पर्यावरणास कमी हानी पोचवणार्‍या उत्पादनांना (green products) अधिक पसंती
  • वीजेवर चालणार्‍या आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा कमी वापर
  • चालणे, सायकल किंवा सार्वजनिक परिवहन यांचा अधिक वापर

हे सर्व जनतेकडे पर्याय नसल्याने निर्माण झाले आहे. त्यांना पर्यावरणाची काळजी आहे किंवा त्याबाबत ते सजग आहेत असे चित्र दिसत नाही असे वाटते. उदा. नॅनो परवडणे शक्य असल्यास ती दारादारांत दिसणारच आणि एकदा आली की लोक वापरणार नाहीत का? वापरतीलच. काही वर्षांच्या अंतराने भारतवारी केल्यावर केवळ मुंबईतील एखादा रस्ता ओलांडण्यासाठी लागणारा वेळ बघा -

  • १० वर्षांपूर्वी - सुमारे ३ मि.
  • ४ वर्षांपूर्वी - सुमारे १० मि.
  • आता - सध्या आकडा उपलब्ध नाही.

यांत रस्त्यावरील बेशिस्त यंत्रणा न गणता केवळ वाहनांची संख्या गणली आहे.

  • नेहमी जावे लागणार्‍या ठिकाणाच्या जवळ राहण्यास पसंती
  • स्थानिक किंवा जवळच्या प्रदेशात तयार झालेल्या अन्नाचे सेवन

येथे मात्र थोडासा वेगळा प्रकार आहे. पर्यायाचा मुद्दा लागू होतोच परंतु थंड प्रदेशांतील देशांत जिथे वर्षांतील ४-६ महिने काही पिकत नाही त्यांना अन्न-आयात करावीच लागते. सुदैवाने भारत यात मोडत नाही.

मला वाटतं, विकसनशील देश विकसित होऊ लागले की त्यांचे प्रश्नही असेच बदलतील आणि बदलाची प्रक्रिया कधीच सुरू झाली आहे. उदा. भारतातील एखाद्या फूडमॉलमध्ये चक्कर मारली तर अन्नाच्या गरजा वाढवून ठेवणारी असंख्य उत्पादने दिसून येतील.

विकसनशील देशांत सध्याचे प्रश्नही पर्यावरणाला पोषक आहेत असे वाटत नाही. उदा.

  • पाण्याचे आणि हवेचे प्रदूषण,
  • ध्वनी प्रदूषण,
  • रिसायकलिंगचा अभाव,
  • नियोजित नागरी सुविधांचा अभाव

आणि बरेच.

चांगला विषय

चांगला विषय आणि चर्चा आहे.

सर्वेक्षणाविषयी मला जरा वाचून नंतर माहीती द्यावी लागेल. पण खालील काही पटकन सुचलेले मुद्दे दोन प्रश्नांसंदर्भात:

विकसनशील देशातील ग्राहक पर्यावरणाविषयी अधिक जागरूक/संवेदनशील असण्याचे कारण काय असावे?

हा मुद्दा थोडासा वादाचा होऊ शकेल. विकसनशील देशात विशेष करून पौर्वात्य संस्कॄतीच्या पद्धतीने जो पर्यंत विचार-आचार होते, तो पर्यंत गरजा कमी होत्या आणि स्थानीक होत्या. आता पाश्चिमात्यकरणाबरोबर पाश्चिमात्य अर्थव्यवस्था आली, जीचे मूळच "माणसाच्या गरजा अनंत असतात" या एका वाक्यात आहे. परीणामी नवीन पिढी, उद्योजक आणि राज्यकर्ते ह्यांना पर्यावरण हे बर्‍याचदा विकसीत होण्याच्या प्रक्रीयेतील अडथळा वाटतो, विशेष करून जेंव्हा अमेरीकेकडे आदर्श म्हणून बघितले जाते तेंव्हा...

विकसित देशातील ग्राहकांचा पर्यावरणाविषयीचा दृष्टिकोन निष्काळजी असतो का? (असतो, का?)
त्याचे कारण ज्या पद्धतीची अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था तयार झाली आहे त्यात आहे. पण आता त्यातही बरेच बदलत आहे. पण मोठ मोठ्या कंपन्यांच्या स्वार्थापोटी सरकारे अनेकदा अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. त्यात पर्यावरणवादी कधी कधी सामान्यांना न पचणारा अतिरेक करायचे / करतात. पण आता त्यात पण फरक पडायला लागला आहे. (थोडेफार अमेरिकेपुरतेच स्वानुभवावर आधारीत हे बोलतोय त्यामुळे जनरलायझेशन करण्यात मर्यादा असू शकतात).

बाकी वर द्वारकानाथांनी मांडलेला पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. त्या संदर्भात उपक्रमावरची ही चर्चा/माहीती/छायाचित्रे पहा.

खोटे, ढळढळीत खोटे आणि आकडेवारी

आकडेवारीचे विश्लेषण जसे करू तसे निष्कर्ष काढता येतात. परदेशात नासाडी आणि मस्ती बरीच आहे हे मान्य केले तरीही पर्यावरणाविषयीची काळजी भारतात अधिक आहे हे स्वीकारणे जड आहे.

(निसर्गप्रेमी) एकलव्य

वरच्यांशी सहमत

वर अनेकांनी मांडलेल्या मुद्द्यांशी सहमत, पुन्हा मांडतो आहे:

या सर्वेक्षणाविषयी आपले काय मत आहे?
विकसनशील देशांतले पर्यावरणाला जपणारे वागणे पर्याय नसल्यामुळे असावे. जागरूकतेमुळे नसावे. पर्याय मिळताच नासाडी सुरू होते. पूर्वी प्लॅस्टिकच्या पिशव्या दुकानदार देत नसत. कुठल्यातरी दुकानात सामानासाठी प्लॅस्टिकची पिशवी द्यायचे, त्या पिशव्या आम्ही घरात जपून ठेवत असू. पिशव्या स्वस्त आणि भरपूर मिळू लागल्या तसे पिशव्या उकिरड्यांवर दिसायला लागल्या, नाल्या तुंबायला लागल्या. त्यामुळे आमच्या गावात तरी जागरूकता नसावी.

नॅशनल जियोग्रॅफिक सोसायटी कदाचित काळजीपूर्वक विकसनशील देशांचा अनुनय करत असावी. प्रशंसा करून जागरूकता निर्माण करत असावी. यात विनय असला तर चांगलेच आहे.

उगाच कोणा देशाला "भिकारड्या देशा, नासाडी थांबव!" म्हटले तर राग येईल. त्याऐवजी "तुमचा किती छान काटकसरी समाज. पैसे आल्यावरही तसेच काटकसरी राहा, आमच्यासारखे उधळे होऊ नका..." असे म्हटले तर चांगलेच आहे. या प्रशंसेच्या सुरामुळे "सल्ला देणारे तुम्ही दुरभिमानी कोण?" असा प्रश्न विकसनशील समाज लगेच विचारणार नाही. शिवाय त्यात विकसित समाजाने केलेल्या चुकांची प्रांजळ कबुलीही आहे.

विकसनशील देशातील ग्राहक पर्यावरणाविषयी अधिक जागरूक/संवेदनशील असण्याचे कारण काय असावे?
पर्याय नसणे, म्हणून काटकसर. जागरूकता नसावी.

विकसित देशातील ग्राहकांचा पर्यावरणाविषयीचा दृष्टिकोन निष्काळजी असतो का? (असतो, का?)
होय, थोडाफार असतो. जिथे धोका दत्त म्हणून समोर उभा राहातो, तिथे निष्काळजी नसतो. उदा: गावातल्या कचर्‍याची विल्हेवाट नीट लावतात. तो कचरा पुरायला जागा संपली की कचरा उचलण्यासाठी करभार वाढवतात. रिसायक्लिंगच्या सोयी उपलब्ध करून देतात. जिथे पर्यावरणावरचा दुष्परिणाम नासाडीच्या ठिकाणापासून दृष्टीआड असतो, तिथे दुर्लक्ष करतात. उदाहरणार्थ, पेट्रोलमधल्या शिस्याकडे खूप दशके दुर्लक्ष केले. कारण शिसे असते भुर्र चालणार्‍या मोटारीत, दुष्परिणाम असतात दूर कुठल्यातरी मुलाच्या कळे-नकळे मतिमंद होण्यात... त्याच प्रमाणे, ऊर्जेची नासाडी असते टेक्सासमध्ये वातानुकूलन करण्यात, दुष्परिणाम असतो दूर कुठे मालदीव बेटे बुडण्यात. दृष्टीआड सृष्टी.

एक ग्राहक म्हणून पर्यावरणासाठी आपण काय करू शकतो?
जागरूक होऊ शकतो. पण किंमत वाढल्याशिवाय नासाडी बहुधा थांबणार नाही. मोफतचं चंदन बाळा, खसाखसा उगाळा! चंदनाचा भाव वाढला तरच मी उगाळणे आवरीन! पण भाववाढीची झळ गरीब देशाला विकसित देशापेक्षा अधिक बसेल, हेच आपल्या जगापुढचे एक मोठे नैतिक कोडे आहे.

विशिष्ट स्वरूपाची माहिती

धनंजय यांच्याशी एकदम सहमत !

मला वाटते "ग्रीन्डेक्स्" या प्रकाराकडे एका वेगळ्या पद्धतीने केलेली आकडेवारी म्हणून महत्त्व आहेच. आतापावेतो झालेले सर्व अभ्यास हे, वेगवेगळ्या देशातील शासनाची धोरणे , त्यांची अंमलबजावणी , उद्योगधंद्यानी पाळलेले नियम इ. इ. प्रकारचे होते. नवीन यानीच म्हण्टल्याप्रमाणे , सर्वसामान्य लोकांची जीवनशैली आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम यांचा अभ्यास नुकताच नॅशनल जिओग्राफिक सोसायटीने (National Geographic Society) केलेला हा अभ्यास आहे . लोकांच्या सवयींमधे (बिहेवियर) पर्याय नसण्याचा भाग आहेच ! पण जर मूळ लेख नीट वाचला तर असे दिसते की

The Greendex shows us that consumers' choices play a large role in their environmental footprint. Governments and businesses, therefore, have a responsibility to ensure that environmentally friendly options are available and affordable to all consumers, especially those in the developing countries, whose index rankings may fall as economies grow and consumption patterns change.

थोडक्यात , पर्यावरणाकडे बघण्याचा हा एक नवा प्रयत्न आहे - आतापर्यंतच्या प्रयत्नांपेक्षा वेगळा.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

पर्यावरण काळाची गरज !!!

दोस्त हो,
पर्यावरण या विषयाचा आम्हाला लै कंटाळा :) पण चर्चा प्रस्तावातील
'भारत आणि ब्राझील या देशांतील ग्राहक पर्यावरणाविषयी आणि ते टिकवण्याविषयी जास्त सजग आहेत' या वाक्याने जरा बरं वाटलं म्हणुन आमचेही दोन शब्द-

विकसनशील देशातील ग्राहक पर्यावरणाविषयी अधिक जागरूक/संवेदनशील असण्याचे कारण काय असावे?

लोकसंख्या वाढ, औद्योगिकरणातील चढाओढ यामुळे निसर्गनिर्मित गोष्टींचा जास्तीत जास्त वापर होत आहे ही गोष्ट विकसनशील देशातील ग्राहकांच्या नजरेत येत असावी. दैनंदीन वापरातील प्रदुषण वाढवणा-या वस्तूंच्या अतिवापरामुळे निसर्गावर व निसर्गाचा समतोल राखण्यावर ताण पडत आहे. तसेच लोकसंख्यावाढ व औद्योगिकरणामुळे प्रदुषण वाढत चालले आहेत व त्याचा परिणाम सरळसरळ मानवी जीवनावर होत असल्यामुळे धोक्याची घंटा विकसनशील देशातील ग्राहकांच्या नजरेस येत असावी त्यामुळे त्याला पर्यावरणाच्या नियोजनाची आवश्यकता वाटत असावी.

विकसित देशातील ग्राहकांचा पर्यावरणाविषयीचा दृष्टिकोन निष्काळजी असतो का? (असतो, का?)

खरं म्हणजे निष्काळजीपणाला घोर अज्ञान जवाबदार आहे असे वाटते. जो पर्यंत त्याचे दुष्परिणाम ग्राहकांच्या नजरेस येत नाही तो पर्यंत त्याचे महत्व वाटत नाही. एक साधे उदाहरण पाहा- घरगुती आणि शेतीसाठी पाण्याचा वापर करत असतांना पाणी प्रचंड वापरलेले असते. पाहिजे त्यापेक्षा पाणी धुण्यासाठी, स्नानासाठी वापरले जाते. तेच शेतीच्याबाबतीतही ;पाण्याची मात्रा माहिती नसल्यामुळे किंवा रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा कमी झालेला कस त्यामुळे पाण्याचा प्रचंड वापर आणि मला वाटते त्यामुळेच भूगर्भ जलाची समस्या निर्माण होते सांगायचा मुद्दा असा की भूगर्भातील पाणी इतके उपसुन काढले आहे की, त्याची पातळी खाली खाली जात राहिली आहे. पाचशे फुटापर्यंत खोदले तरी पाणी लागत नाही हे कशामुळे घडले आहे. तर पाण्याच्या अवाजवी वापरामुळे. याचे शिक्षण जोपर्यंत मिळत नाही तो पर्यंत निष्काळजीपणा जाणार नाही.

एक ग्राहक म्हणून पर्यावरणासाठी आपण काय करू शकतो?

लै अवघड प्रश्न आहे भो !!! पर्यावणावर बोलणं सोपं आहे. पण काळजी घ्यायच्या नावाने बोंब आहे.

१) अविनाशी उर्जा साधनांचा उपयोग केला पाहिजे असे वाटते. जसे सौरउर्जा, पवन ऊर्जा, जल उर्जा, इत्यांदींचा वापर केला पाहिजे
२) नैसर्गिक वायू, खनिजतेलाजवळ असलेल्या हा वायू मिथेनचा बनलेला असुन त्यात हैड्रोकार्बन्स असतात त्यामुळे त्याचे जळणे स्वच्छ, कमी प्रदुषण करणारे असते त्याचा उपयोग वाढवला पाहिजे.
३) सध्या शहरांमधे (आमच्या औरंगाबादची गोष्ट )रिक्षा, टॅक्सी आणि इतर खासगी वाहनात डिझेल, पेट्रोलचा वापर करण्याऐवजी रॉकेल वापरत असल्यामुळे त्याचे प्रदुषण तर विचारु नका. अशा प्रदुषण वाढवणा-या गाडीतून मी प्रवास करणार नाही. ( मी नाही केला तरी त्याचे काही अडत नाही. इतर लोक तयार असतात कमी पैसे लागतात म्हणुन )

पाण्याची प्लॅष्टीकची बॉटल फेकण्याऐवजी प्रेझेंट आलेल्या वॉटरबॅगमधे पाणी सतत जवळ बाळगत राहीन. :)
डबा खालल्यानंतर राहिलेल्या शिल्लक पोळ्यांचे तुकडे इतरत्र फेकण्याऐवजी प्राणी मात्रांना खाऊ घालेन. :)

(पडीक असल्यामुळे हे सर्व सुचते आहे, विषयांतर होत असेल तर क्षमा असावी. )

अवांतर :) पर्यावरणावर लिहिणा-यांचे प्रतिसाद मोठे का असतात ते आज कळले ( ह. घ्या )

सर्वेक्षण आणि मी

या सर्वेक्षणाविषयी आपले काय मत आहे?
हे सर्वेक्षण किंवा तत्सम सर्वेक्षणे कधी, कुठे, कशी केली जातात हे एक कोडेच आहे. (आजपर्यंत तरी मला/ माझ्या माहितीतल्या कोणत्याही लोकांना एकाही सर्वेक्षकाने कसलाही प्रश्न विचारलेला नाही.) शिवाय 'आपण किती जागरूक आहोत' हे दाखवण्यासाठी भारतासारख्या विकसनशील देशात थापा मारणारे खूप असतात.
पर्याय, त्यांचा वापर करण्याइतकी सुबत्ता यांच्या कमरतरतेबरोबरच सर्वेक्षणाच्या चाचणी समूहाची मर्यादा आणि खरे बोलणे यांची वानवा असल्याने कदाचित 'भारतात पर्यावरणाबद्दल जागरुकता जास्त दिसते' असा निष्कर्ष निघाला असावा.
विकसनशील देशातील ग्राहक पर्यावरणाविषयी अधिक जागरूक/संवेदनशील असण्याचे कारण काय असावे?
इतर विकसनशील देशांची परिस्थिती माहित नाही पण भारतातील ग्राहक अधिक जागरूक/संवेदनाशील आहेत हेच मुळात पटत नाही. काही मूठभर पर्यावरणवादी सोडले तर अभ्युदय होत असलेल्या समाजात पर्यावरणाची नासाडी करणार्‍या गोष्टी 'आपण किती समृद्ध आहोत' हे 'दाखवण्यासाठी आग्रहाने केल्या जातात. (उदा. हजारो लोकांच्या जेवणावळी, प्रत्येक खोलीत ए.सी., घरटी दोन-तीन मोटारी, बाहेर फक्त बिस्लेरी किंवा ऍक्वाफिना पिणे, फक्त सीलबंद वस्तू खाणे, फक्त ए.सी. मॉलमध्येच खरेदी करणे, एका बंगल्यासाठी दोन-दोन कूपनलिका खोदणे, घरात जाकुझी बसवणे इ.इ.)
शिवाय याच समाजाची हिप्पोक्रसी म्हणजे 'ग्रीनपीस' सारख्या संस्थेला देणग्या देणे, पार्टीत 'एन्व्हायरमेंट','क्लायमेट चेंज' या विषयांवर गप्फा मारणे.
सर्वेक्षक याला जागरुकता म्हणत असतील तर असोत बापडे.
विकसित देशातील ग्राहकांचा पर्यावरणाविषयीचा दृष्टिकोन निष्काळजी असतो का? (असतो, का?)

विकसित देशात कशाला? विकसनशील अथवा मागास देशात सुबत्ता असलेले लोक बिनधास्त असतात. त्यांना पर्यावरणातील बदलाने पडणार्‍या फरकाने काहीच तोशिस लागत नाही. गरम होतंय? प्रत्येक खोलीत तीन टनाचे ए.सी. बसवा... , गाडीतला ए.सी. इफेक्टीव्ह नाही? दोन पॉइंट पाच लिटर इंजिनाची गाडी घ्या, नळाला पाणी येत नाही? टँकर मागवा! धिस समर वी आर गोईंग टू स्विज्तर्लंड, यू नो! पर्यावरण गेलं चुलीत.
एक ग्राहक म्हणून पर्यावरणासाठी आपण काय करू शकतो?
इतरांनी काय करावे ते मी बापडा कोण सांगणार? जनजागृती वगैरे करणारे लोक वेगळे असतात.
मी काय करतो ते सांगतो.
मी (आणि आमच्या घरातील कुटुंबीय) आक्वागार्डने भरलेल्या पाण्याच्या बाटल्या बरोबर नेतो. ज्या खोलीत कोणीच नाही त्या खोलीतले दिवे/विद्युत उपकरणे बंद करतो. कमीत कमी ऊर्जा वापरणारी (उदा. सीएफएल्) उपकरणे वापरतो. प्रचंड उन्हाळ्याशिवाय (>४० अंश से.) ए.सी. वापरत नाही. अशावेळी ए.सी. चे तापमान २८ अंश सें. लावतो. (१८ नाही.) दुकानात स्वतःच्या पिशव्या नेतो. प्लास्टिक अथवा कागदाच्या मिळालेल्या पिशव्या जपून ठेवतो आणि पुन्हापुन्हा वापरतो.
माझी गाडी दर सहा महिन्यांनी ट्युनिंग करून घेतो. टायरमध्ये हवा चेक करतो. वॉशिंग मशीनमध्ये एकाच घाण्यात कपडे धुतो. दारात, ग्यालरीत झाडे लावतो, शक्यतो अन्न वाया जाऊ देत नाही. इ.इ.
तरीही हे पुरेसे आहे असे नाही याची मला जाणीव आहे. करण्यासारखे पुष्कळ आहे. ते करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीन. शिवाय माझ्या आपसुक अंगवळणी पडलेले हे 'संस्कार' पुढे चालावेत म्हणून प्रयत्न सुरू आहेत. पण खात्री देता येत नाही. 'हू केअर्स' हा ऍटिट्यूड पुढच्या पिढीत येऊ शकेल.

किंमती वाढल्या तर

वर धनंजय यांनी मांडलेला मुद्दा (किंमती वाढल्या तर वापर कमी होईल). सध्याच्या परिस्थितीत योग्य ठरतो आहे अशी चिन्हे आहेत.

पेट्रोलच्या किंमती इथे अमेरिकेत खूपच वाढल्या आहेत, त्यामुळे कधी नव्हे ते आमच्या गावात गेल्या काही महिन्यांत "रायडरशिप" म्हणजे सबवे (लोकल ट्रेन) चा वापर करणार्‍या लोकांचे प्रमाण जवळ जवळ १०% नी वाढले आहे.

किंमती वाढल्या तरी..

फार काही फरक पडतो असे वाटत नाही. कारण लोकांना हळूहळू त्या वाढलेल्या किंमतींची संवय होते. थोडा काळ वापर कमी होतो, पण मग तो मूळपदावर जातो.

ह्याव्यतिरिक्त धनंजय ह्यांच्याशी सहमत.

 
^ वर