वसंतोत्सव - चेरि ब्लॉसम (वॉशिंग्टन डिसी)

अमेरिकेतील वास्तव्याने मला काय दिले याचा हिशेब कधी मांडायचाच झाला तर पोटोमॅक नदीकाठी तासोनतास केलेल्या भटकंतीचा क्रम अगदी वरचा असेल.

पोटोमॅकच्या तीरावरील एक संध्याकाळ

अथांग पाण्यात डोलणार्‍या नावा, अफाट आकाश, पानाफुलांनी लगडलेली झाडे आणि हिरवेगार गालिचे अशा या परिसरात मी अनेकदा स्वतःला विसरून जातो. माझ्या जीवनसखीलाही निसर्गामध्ये हरवून जायला आवडते त्यामुळे जरा कोठे संधी मिळाली आम्ही वॉशिंग्टनच्या त्रिस्थळी धाव घेतो. ही त्रिस्थळे म्हणजे नॅशनल मॉल, टायडल बेसिन आणि पोटोमॅक नॅशनल पार्क.
कॅपिटॉल (अमेरिकन संसद) ते वॉशिंग्टन मॉन्युमेन्ट हा पट्टा नॅशनल मॉल म्हणून प्रसिद्ध आहे. वॉशिंग्टन मॉन्युमेन्टची मान अगदी ताठ आहे... त्याहून उंच इमारत अमेरिकेच्या राजधानीत नाही. वॉशिंग्टन मॉन्युमेन्टच्या उंचवट्यावर उभे राहून कॅपिटॉलकडे तोंड केल्यास डाव्या अंगाला व्हाईट हाऊस तर पाठीमागे लिंकन स्मृतीस्थळ आणि उजव्या अंगास जेफरसन स्मृतीस्थळ आहे.

जेफरसनच्या समोर नैसर्गिक असे पाण्याचे तळे तयार झाले आहे. हेच ते रम्य टायडल बेसिनचे रिंगण! बोटिंगचा आणि भटकण्याचा आनंद येथे अगदी मनमुराद लुटावा. याखेरीज आजूबाजूच्या परिसरात असणारी म्युझिअम्स हा स्वतंत्र लेखमालेचा विषय होईल. होप डायमन्डपासून ते पुण्याच्या दगडापर्यंत आणि अतिप्राचीन ज्यू परंपरेपासून ते अवकाशयानांपर्यंत बरेच काही येथे जतन करून ठेवलेले आहे. पण त्याविषयी आज नाही. या ठिकाणी आज फक्त वसंत ऋतूचा आनंद लुटायचा आहे.

अमेरिका आणि जपान यांच्या वाढत्या मैत्रीचे प्रतीक म्हणून सन १९१२ मध्ये टोकियोच्या महापौराने चेरिची ३००० झाडे अमेरिकेला भेट देऊ केली. ह्या झाडांचा बहर तेव्हापासून वॉशिंग्टन परिसराची शोभा वाढवितो आहे. महिन्या दीड महिन्यापूर्वी याच परिसरातील पानाफुलांचे ताटवे आणि माणसांचे थवे यांची टिपलेली डझनभर क्षणचित्रे येथे विखरून टाकली आहेत.

आणखी काय काय म्हणून येथे सांगू? वर मांडलेली आणि संगणकावर साठवून ठेवलेली इतरही अनेक प्रकाशचित्रे ही निव्वळ एक बायप्रॉडक्ट आहे. मोबाईलवर असलेल्या सुविधेचा उठविलेला हा जबरदस्त फायदा!! (थॅक्स टू माय बेटर हाफ् फॉर द बेस्ट वनस्!)
चेरिब्लॉसमच्या काळात अनेकदा, अगदी वेगवेगळया वेळी, पोटोमॅक आणि डिसी परिसरात आम्ही वेड्यासारखे धावलो खरे पण अगदी प्रत्येक वेळी डिजिटल घेऊन जायला विसरलो. हळहळ वाटली पण हे क्षण कॅमेर्‍यात बंद करूच नयेत.... किमान माझ्यासारख्याने तर नाहीच नाही.

भान हरपून जावे असाच हा भव्य पसारा आहे. अगदी आजही डोळे मिटले की मन कसे प्रसन्नतेने भरून जाते. पोटाची खळगी भरण्याचा विचार काही काळ का होईना पण "कोहम्" "कोहम्" च्या कुंजनात विरून जातो.

Comments

अप्रतिम

अप्रतिम!

- मेघना भुस्कुटे

सुंदर चित्रे.

चेरीब्लॉसमच्या काळातले डीसी तुम्ही फारच सुरेख टिपले आहे.

मस्त

सुंदर छायाचित्रे आणि माहीती. डिसी च्या चेरी ब्लॉसम बद्दल् ऐकून आहे. डिसीला येणे झाले पण त्या काळात नाही अथवा निवांतपणे नाही. आता ही छायाचित्रे पाहून नक्कीच त्याकाळात कधीतरी भेट द्याविशी वाटतेय!

पुरवणी

वसंतोत्सव म्हणावा तर रंगांची उधळण कोठे दिसत नाही अशी विचारणा व्यनितून काल झाली होती. आजही तोच प्रश्न आणखी दोघांनी विचारला. चेरिब्लॉसमचा वसंतकाळी येणारा बहर हा फिका गुलाबी असतो की जो काही काळाने शुभ्रतेकडे झुकतो. (अगदी आठवड्याभरानंतर मात्र सारे कसे अगदी हिरवेगार होऊन जाते.) चित्रे काढायची असा बेत नसल्याने बहुतेक शुभ्र चित्रे येथे चिकटवली आहेत.

जगात एक दोन ठिकाणीच इतक्या मोठ्या प्रमाणात चेरिब्लॉसमची तृप्ती अनुभवता येते असे ऐकून आहे. (खुलासा - आंतरजालावर जाऊन पडताळा घेतलेला नाही. )

आजूबाजूला असलेले ट्युलिप्स आणि इतर फुलांचे गालिचेही टिपले आहेत.... पण येथे दिलेली नाहीत. तो ठसठशीत मूड वेगळा आणि येथे मांडलेली धुंदी वेगळीच.

चेरिब्लॉसम बघून मन हर्षोल्लसित झाले!

डीसी ची छोटेखानी ओळख करुन देणारा तुमचा लेख आवडला.
अजून एकदाही तिथे भेट दिलेली नाही पण हा लेख वाचून जाण्याची ऊर्मी बळावली!
सर्व प्रकाशचित्रे सुरेख आहेत!

चतुरंग

सकुरा

छायाचित्रे सुरेख आहेत.
मनात साठवलेल्या आठवणी स्वत:ला आनंद देतात. कॅमेरा तो आनंद इतरांपर्यंत पोहचवतो.

चेरिब्लॉसमला जापानमध्ये 'साकुरा' म्हणतात.
या काळात ठिकठिकाणी लोक चेरीच्या झाडाखाली बसून खान्या-पिण्याचा आनन्द लुटत असतात. ज्याला 'हानामी' असं म्हटल जात. जापानी भाषेत 'हाना' म्हणजे फूल.
पूर्ण् जापानभर या काळात लोक विविध कार्यक्रम आयोजित करतात. अगदी सणच साजरा करतात!

मावळा सामा

साकुरा ऐकून आनंद झाला.

मीपण असे म्हणून नाही... पण माहितीत आणखी थोडी भर

डिसी मध्येही हा काळ सणासारखाच साजरा केला जातो. या काळात व्हाईट हाऊसही काही काळ खुले केले जाते/जायचे. अनेक पर्यटनसुलभ (छप्पर नसलेल्या, मोठ्या खिडक्यांच्या) गाड्या मोफत उपलब्ध केलेल्या असतात. अगदी पुण्यातील गणपतीइतकी नाही पण तुफान गर्दी असते. संगीताचे, मुलांचे तसेच पतंग उडविणे, फूटबॉल यासारख्या नानाविध कार्यक्रमांची रेलचेल असते.

एकलव्य सान

सुरेख

चेरीब्लॉसम आवडला. डीसीची ओळखही आवडली.

एक बावळट प्रश्न - या झाडांना नंतर चेरीच्या फळांचे घडही लागतात का हो?

बाकी अमेरिकेतील वास्तव्याने मला काय दिले याचे उत्तर मीही असेच देईन की भर शहरात राहून निसर्गाच्या सान्निध्यात राहायची संधी दिली.

हेचि फळ काय मम तपाला

नाही! डिसी मधील या हजारो झाडांना फळे येत नाहीत.

गुलाबी आणि पांढर्‍या रंगाची ही उधळण वसंताच्या प्रारंभी असते. त्यानंतर साधारण आठवड्याभराने सारे हिरवेगार होऊन जाते.

डिसी व्यतिरिक्त चेरिब्लॉसम हे जपानमध्ये आढळते. (मूळचा हा उत्सव जपानचाच) तेथे फळे येतात किंवा नाही याची कल्पना नाही.

फोटो मस्त आहेत.

फोटो काय क्लास काढलेत राव !!!

चेरीच्या झाडांखाली त्या ओट्यावर आम्ही दोघं पाण्यात पाय सोडून बसलोय, लेकरं दुर खेळताहेत. तोवर तिच्या गळ्यात हात टाकलाय
आणि ती म्हणतेय काढ सख्या गळ्यातील तुझे हे चांदण्याचे हात ते बघ उभे क्षितीजावर दिवसाचे दूत :)
(की बघ ते अमेरिकेचे पोलीस पावती देण्यासाठी आपल्याकडे येताहेत )

अहाहा

बिरुटेसाहेब ,
या लेखावरच्या सर्वात सुंदर प्रतिक्रियेचा मान तुम्हाला. 'ब्लॉसम् आम्हीही पाहिला. पण तुम्हाला "दिसला" तसा पहायला तिकडे जायची अट नाही आणि जाऊन "तसा" दिसायला चर्मचक्षूंपेक्षा वेगळे काहीतरी हवे :-)

कमाल आहे

"ऑसम् ब्लॉसम्" आम्ही कसा "एन्जॉय" केला हे सरांना कसे काय कळले बॉ?

(रसिक दादेने मोहरलेला) एकलव्य

चित्रे सुरेख

वॉशिंग्टन डीसी चे मोठे मोठे रस्ते फिरायला आवडते. पण हे दॄष्य कधीच पाहिले नाही.
आमच्या इथेही झाडे गुलाबी झाली आहेत, आणि पांढरी.
पण बाहेर जाऊन फोटो काढायला वेळ झालेला नाही. :-(

सुंदर चित्रे

त्या निमित्ताने वॉशिंग्टन डीसीचा फेरफटकाही घडला.

मागे काढलेली काही चेरीब्लॉसमची चित्रे सापडली.

रुक्ष वॉशिंग्टन डीसीला फुटलेला बहारः

cherry blossom bark
रुक्ष वॉशिंग्टन डीसीला फुटलेला बहार

चेरी ब्लॉसमच्या फुलांचा झुबका

Bunch of cherry blossoms
चेरी ब्लॉसमच्या फुलांचा झुबका

सुंदर लेख

छोटेखानी लेख फार आवडला :)
डिसीचा साकूरा तर फारच आवडीचा!
या साकूराचे गेल्यावर्षी मला घडलेले दर्शन इथे वाचता येईल.

-ऋषिकेश

 
^ वर