उदर भरण नोहे...

"वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे" हा जेवायला सुरवात करण्याआधीचा मराठी श्लोक बहुतांशी मराठी माणसाला माहीत असावा... असे श्लोक म्हणायची पद्धत का आली असावी तर अर्थातच जे काही आपण करतो ते स्वतःच्या बाहेर पाहून जाणिवेने करता यायला हवे म्हणून आहे असे वाटते. त्यातील अन्न हा भाग अतिशय महत्वाचा आहे.

"ताट स्वच्छ करा. पानात काही टाकायचे नाही. लोकांना खायला मिळत नाही आणि आपण अन्न टाकून माज करणे बरोबर नाही...इत्यादी" अशा आशयाची वाक्ये आपण लहानपणी ऐकली असण्याची शक्यता आहे. आता मोठे झाल्यावर आपल्या लहानग्यांना पण जर अतीच होऊ लागले (टाकणे, न खाणे इत्यादी) तर कालानुरूप याच आशयाची वाक्ये आम्हीपण ऐकवतो... त्यात कुठे अपराधी भावना जागृत करण्याचा उद्देश नसतो (तशी ती होत ही नाही!), पण कुठेतरी जाणीव नक्कीच करून द्यावीशी वाटते.

याच्याही पुढे जाऊन आपल्याकडे प्रकृती म्हणजे भुकेले असताना स्वतः खाणे, विकृती म्हणजे भूक नसताना पण भुकेल्याला न देता स्वतः खातच राहणे आणि संस्कृती म्हणजे समोरच्याची भूक भागल्यावर स्वतःच्या पोटापुरते खाणे अशी अतिशय सरळ-सोपी व्याख्या ही ह्या अन्नाच्या संदर्भाने केली जाते. पूर्वी अतिथी देवो भव म्हणत घरी येणार्‍या पाहूण्याला खाण्याच्या बाबतीत कधी विन्मुख पाठवले जायचे नाही. गोंदवल्याला २-३ हजार लोकांच्या एकदम पंगती (उत्सवात) बसतात आणि वाढणारे (सर्व बाकीच्या वेळेस व्यावसायीक) "श्रीराम जयराम.." , "पार्वती पते.." वगैरेम्हणून झाले की लोकांना वाकून नमस्कार करून "बसा महाराज" असे म्हणतात - कारण त्यांना पूजनीय असलेले गोंदवलेकर महाराज कुणाच्याही रूपाने येउ शकतील अशी श्रद्धा. असे अनेक इतर श्रद्धास्थानांमधे दिसत असेल.

"वदनी कवळ घेता.." सारखे दोन काव्यमय श्लोक आहेत एक मराठीत तर दुसरा हिंदीत:

मुखी घास घेता, करावा विचार, कशा साठी हे अन्न मी सेवणार,
घडो माझिया हातूनी देशसेवा, म्हणोनी मिळू दे मला शक्ती देवा ||

आणि

अन्नग्रहण करनेसे पेहले विचार मन मे करना है, किस हेतू से इस शरीर का रक्षण पोषण करना है,
हे परमेश्वर एक प्रार्थना नित्य तुम्हारे चरणोंमे, लग जाये, तन मन धन मेरा विश्वधर्म की सेवा मे ||

थोडक्यात अन्न हा विषय केवळ उदर भरणा साठी आपल्या (आणि इतरांच्याही) संस्कृतीत न राहता त्याचा संबंध हा यज्ञ, अर्थात कुठल्यान् कुठल्या रूपाने समाजासाठी समर्पण करण्यासाठी असतो असे धरले गेले आहे....

हे सर्व आज सुचायचे कारण काय विचाराल तर अर्थातच "हिज हायनेस" राष्ट्राध्यक्ष बुश यांची मुक्ताफळे. त्यांनी अन्न महाग होण्याची कारणे सांगताना त्यांनी ३५० कोटींच्या भारतीय मध्यमवर्गाला दोषी धरले. त्यांची तक्रार काय तर म्हणे आता भारतीय मध्यमवर्ग श्रीमंत होत चालला असल्याने त्यांची (मध्यमवर्गीयांची) चांगले आणि पौष्टीक खाण्याचा कल वाढला आहे! (जणू काही असे असल्यास ते चूकच आहे! तो हक्क फक्त अमेरिका आणि पाश्चात्यांचाच ...)

आता असल्या विधानांवर आपली वर्तमानपत्रे, राजकारणी वगैरे तुटून पडत आहेत आणि तसे पडलेही पाहीजे. काँग्रेसचे अधिकृत उत्तर आहे की "भारत हा अन्न निर्यात करणारा देश आहे आयात करणारा देश नाही", थोडक्यात आमच्यामुळे काही प्रश्न तयार झालेला नाही. बाकी पण टिका चालू आहे.

पण बूश हे जसे राजकीय वक्तव्य आणि काँग्रेसने दाखवल्याप्रमाणे आयात-निर्यातीच्या ठोकताळ्यात चुकले आहेत तसेच त्यांना मध्यमवर्गीयांच्या "पौष्टीक खाणे" या निरीक्षणाच्या बाबतीतपण चुकलेत असे म्हणावेसे वाटते... आज आपण सर्वच (ज्या कुठल्या वर्गात असू तिथे) खरेच पौष्टीक खात आहोत का? विचार करा आज भारतात आणि भारताबाहेर भारतीयांत "प्रोसेस्ड फूड" किती वाढले आहे, बाहेर खाणे किती वाढले आहे, "स्वीट्स" आता सणासुदीची पक्वान्ने न राहता "विकेन्डच्या पार्ट्याच्या नियमीत डिझर्ट डीशेस झाल्या आहेत"....खाण्याचा प्रकार आणि कामाची पद्धत दोन्ही एकाच काळात समाजात सरासरी बदल आहे. त्यावरून निर्माण होणारे लहान-मोठ्यांमधील प्रकृतीच्या तक्रारीपण कदाचीत वाढत असतील...

थोडक्यात आपला आहार आणि विहार आज खरेच सकस, पौष्टीक आहे असे आपल्याला वाटते, का अमेरिकन मॅकडॉनॉल्ड स्टाईलमधे "सूपरसाईझ्ड"होत चालला आहे असे वाटते?

राष्ट्राध्यक्ष बूश यांचे विधान चुकीचे आहे आणि त्यात नवल ते काही नाही... पण "अन्नाला पूर्णब्रम्ह" मानणारे आणि "खाण्यासाठी जगणार्‍यांपेक्षा, जगण्यासाठी खाणारे भारतीय" आपण स्वतःतून आणि एकंदरीतच समाजातून घालवत नाही आहोत ना? आपल्याला असे जाणवत असेल तर त्यावर (स्वतः कमी खाण्याव्यतिरीक्त अजून) उपाय काय असू शकतात असे वाटते?

Comments

चांगला मुद्दा ...

थोड्या वेळाने पुर्ण वचेन म्हणतो.
बाकी आपणास
>>सांगताना त्यांनी ३५० कोटींच्या भारतीय मध्यमवर्गाला दोषी धरले.
ह्यामध्ये ३५० मिलिअयन किंवा ३५ कोटी असे म्हणायचे असावे.

जन सामान्यांचे मन

३५ कोटी

ह्यामध्ये ३५० मिलिअयन किंवा ३५ कोटी असे म्हणायचे असावे.

चूक दुरूस्तीबद्दल धन्यवाद!

उदरभरण नोहे

चंपाषष्ठी ला आमच्या कडे घरी चोपडेकर महाराज त्यांच्या लवाजम्यासकट यायचे. लवाजमा म्हणजे दोन बैलगाड्या व त्यांचे सेवक - सहकारी. त्यांची विठ्ठलाची महापुजा साग्रसंगीत असायची त्यानंतर महाआरती असा तो सोहळा असायचा. त्यानंतर प्रसादाचे जेवण. भरपुर उशीर व्हायचा जेवायला. भुकेने कळवळू नये म्हणून आमची आई आम्हाला सकाळीच काही तरी भरीव खायला द्यायची. पुजा चालू असताना आम्ही ओट्यावर खेळायचो. आरतीला हजर व्हायला लागायचे.
बाहेर खेळताना मारुतीच्या देवळाजवळील ध्वजस्तंभापाशी नारायण घुटमळत होता. तो म्हणाला ," प्रकाश भुक लागलीये खायला देतोस का काही?" मी म्हटले की तुला माहिती आहे कि महाराजांची पुजा आरती झाल्याशिवाय काही खाता येत नाही. तुला मी नंतर प्रसाद आणून देईन. मी घरात गेल्यावर नंतर विसरुन गेलो. आमची यथासांग प्रसादाची जेवणे झाली सुद्धा. नंतर मला समजले की नारायण भुकेल्या पोटीच त्या ध्वजस्तंभावर असाच 'खुडुक' झाला. आज मला त्या बद्दल अपराधी वाटत. त्यावेळी त्याला जर धार्मिक रिवाज तोडून अन्न दिले असते तर न जाणो तो कदाचित वाचला असता.
लग्नात आग्रह करु करु लोकांना खायला घालतात. बरेच लोक नुसते उष्टावतात व ताटात टाकून देतात. हेच अन्न जर भुकेलेल्या लोकांना मिळाले तर? ज्यांची पोट भरलीत त्यांना आग्रह करु करु वाढणार आणी जे उपाशी आहेत त्यांना कोणि विचारत नाही? हे बघुन मी नेहमीच उद्विग्न होतो. बुफे बरा वाटतो किमान अन्न तरी आपल्या गरजेनुसार घेता येते.
बुशच कशाला अहो इथले माझे मित्र पण म्हणतात कि सदाशिवपेठेतल्या तुमच्या बाह्मनांनी चिकन मटन महाग करुन ठेवलय!
प्रकाश घाटपांडे

पैश्या पाशी पैसा ..

अन् कौलेस्ट्रौल पाशी कौलेस्ट्रौल जाते.
ढेरपोट्यांना तिरडी वर पडले तरी आग्रहाची निमंत्रणे
त्यांच्या कौलेस्ट्रौलला जबाबदार भिकारयाचा कटोरा !
वेपन्स् औफ 'मांस" डिस्ट्रक्षन तयार करायला हवे.
घमेंडीचे मांस ओरबाडायला ओसमा जागोजागी हवेच !

जास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.

@

@@

यावर

लेख आवडला.
येवढ्यात येथे येणेच होत नाहीये, तरी वेळ मिळेल तसा आपला लेख वाचला, आवडला.
बुश साहेब हे विसरताहेत की अमेरिका जगातला सगळ्यात जास्त 'जाड' लोकांचा देश आहे.
येथे बारिक होण्यावर जितका खर्च केला जातो त्या बजेट मध्ये आफ्रिकेच्या दुष्काळा वर कायम स्वरूपी मार्ग निघू शकेल असे वाटते.

प्रकाशरावांनी दिलेला लहानसा प्रसंग मनाला चटका लावून गेला.
नंतर मला समजले की नारायण भुकेल्या पोटीच त्या ध्वजस्तंभावर असाच 'खुडुक' झाला. आधी 'खुडुक झाला' म्हणजे झोपी गेला असेच वाटले. पण अर्थ कळल्यावर कसेसेच झाले.

खाण्याचा प्रकार आणि कामाची पद्धत दोन्ही एकाच काळात समाजात सरासरी बदल आहे. त्यावरून निर्माण होणारे लहान-मोठ्यांमधील प्रकृतीच्या तक्रारीपण कदाचीत वाढत असतील

या मुद्यावर धनंजयराव काही महत्वाची माहिती, आकडेवारी तसेच काही मौलिक सूचना देवू शकतील अशी आशा वाटते.
आपल्या सूचना लेख सदृश आल्यातरी चालतील. तसेच या येणार्‍या माहिती बद्दल आधीच धन्यवाद! ;)
आपला
व्यायामप्रेमी
गुंडोपंत

विषण्ण वाटले

प्रकाशरावांनी दिलेला लहानसा प्रसंग मनाला चटका लावून गेला.
नंतर मला समजले की नारायण भुकेल्या पोटीच त्या ध्वजस्तंभावर असाच 'खुडुक' झाला. आधी 'खुडुक झाला' म्हणजे झोपी गेला असेच वाटले. पण अर्थ कळल्यावर कसेसेच झाले.

विषण्ण वाटले... इतर काही लिहिण्याची ईच्छाच मेली.

अगदी असेच

विषण्ण वाटले... इतर काही लिहिण्याची ईच्छाच मेली.

प्रतिसाद आधीच वाचला होता पण काही लिहावेसेच वाटले नाही. :-(

अगदी असेच

"खुडुक" शब्द तीनतीनदा वाचला. काही वेगळा अर्थ असेल असे मन खटपट करत होते.

लहानपणचे असे काही प्रसंग आयुष्यभर हळहळ करायला लावतात. कुठेतरी खोलवर चांगले-वाईट संस्कारही करत असतील. काही प्रसंग आयुष्यभर सह-अनुभूती जागवतात. काही वेळेला मला आतून निबर करतात - असे फार नसावेत अशी मनोमन इच्छा आहे.

म्हणूनच

काही प्रसंग आयुष्यभर सह-अनुभूती जागवतात.

तसेच या संदर्भातील सर्वच प्रतिसादात इतरांनी म्हणलेच आहे.

म्हणूनच ते वाचल्यावर अस्वस्थेपोटी प्रतिक्रीया लिहाविशी वाटली नाही अथवा टाळले.

आणि त्यातही त्याचे

नाव 'नारायण' असावे ह्यालाच आपण नियतीचा खेळ म्हणतो का?

चतुरंग

नारायण

http://mr.upakram.org/node/396 या तील ग्रंथपाल दत्तु बाह्मन चा नारायण हा सख्खा भाउ. जव्हा त्येंच्या वाटन्या झाल्या तव्हा हा लई टेचीत व्हता असे लोक सांगतात. तव्हा हा तमाशा पघायला नारंग्गावला जायचा. पिच्चर पघायला पार पुन्याला यायचा. भारी भारी शिग्रेटी फुकायचा; चांगली चांगली कापडं घालायचा. लई पैशे उधळायचा.नंतर जेव्हा परिस्थिती खालावली तेव्हा हरकाम्या म्हणुन काम करायचा. आमच्या आडाचा गाळ काढायचा. त्याची आई चंपुताई व तो गावात जवळपास भिक मागत फिरायचे. त्यावेळी त्याचा भाउ दत्तू खाउन् पिउन् लेउन सुखी होता. गावात फिरताना एकमेकांना दिसायचे तेव्हा दत्तु त्यांच्या कडे निर्विकार पणे पाहयचा. खोल गेलेले मोठे डोळे , कृश शरीर, पिंजारलेले पांढरे केस, थिगळ लावलेले फाटके लुगडे अशी अनवाणी फिरणारी चंपुताईला पाहिली कि मला खुप भिती वाटायची.
पाचसहा वर्षांपुर्वी घरी गेलो.परत येताना वाड्याचे कुलुप घातले आणी माझी चुल्ती वाड्याच्या दाराशी दिसली ;अगदी चंपुताई सारखी. सोबत शर्टाच्या चिंध्या झालेले चड्डीचा पत्ता नसलेले रामोशाच्या पोरावानी काळे कभिन्न दिसणारे ते पोर; जे माझ्या चुलतभावाचे होते ; माझ्या आईने तिला लुगडे दिले; मी पोराला बिस्कीट पुडा दिल्यावर त्याचे डोळे आनंदाने लकलकले.
मी शेजारच्या मित्राच्या किराणा दुकानात पैसे दिले व त्याला सांगितले कि या अवधुतच्या मुलाला अधुन मधुन बिस्कीट पुडा देत जा. आणी खिन्न मनाने मी बाहेर पडलो. काही दिवसांनी समजले कि माझी चुलती बी अशीच खुडुक झाली.
माझ्या मित्राची आई म्हणाली की पाटलीण बाई ( माझी काकु)च्या नव्या घरात आम्ही राहायचो तेव्हा लई तोर्‍यात असायची. अंगभर सोन्याचे लडबडलेले दागिने; उत्तम लुगडी; शेतातल्या व घरातल्या कामवाल्यांवर रुबाबात ओरडायची. आम्ही म्हणायचो देखील पाटलीण बाई एवढा माज बरा नाई.
(भाउबंदकीतून बाहेर पडलेला)
प्रकाश घाटपांडे

हं

आता किती जणांना "तितकेच" विषण्ण वाटते आहे. [खुडुक] मानवी मन विचित्र असते हेच खरे. बोलण्यातुन / शब्दांच्या विशिष्ट मांडणीतुन मत तयार होते [लई वंगाळ श्या देत होता उदाहरणा सारखेच हे वरचे वाटते.]

"कर्माची फळे भोगावी लागतात" [ तरीच / असे होते म्हणुनच इ. ] हा युक्तिवाद आपण आपल्या मनाची समजुत घालायला [घालमेल कमी करायला] छान वापरतो नाही?

एक गोष्ट खरी आहे,[पुलंच्या अंतु बर्वा मधे बहुतेक की ] तुपाशी खाणार्‍याला उपाशी रहाणार्‍याचे कौतुक. संपुर्ण जगात कितीतरी बेघर जनता रोज भुकेली असते व मरते. अशी लोक जेव्हा कधी वेगवेगळी नशा करताना, असभ्य वर्तन करताना दिसतात तेव्हा त्यांच्या अवस्थेबद्दल तितकेसे वाईट न वाटणे ही देखील आपल्या मनाला / सदसदविवेकबुद्धीला आपण करुन दिलेली एक सोय आहे असे वाटते का? अर्थात अश्या बेघर लहान मुलांबद्दल नक्कीच वाईट वाटते मोठ्या बेघर माणसांपेक्षा.

मग वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना मदत दिली की जरा तेवढ्यापुरते सदसदविवेकबुद्धीला शांत केल्यासारखे वाटते. जाऊ दे आपल्या हातात अजुन काय आहे असे म्हणुन आपल्या आयुष्यात परत मग्न व्हायचे.

अवांतर - हेड रुल्स हार्ट वर्तन ठेवले की मनःशांती किंचीत जास्त लाभते. तुमचा काय अनुभव आहे?

तितकेच विषण्ण वाटले

तो म्हणाला ," प्रकाश भुक लागलीये खायला देतोस का काही?" मी म्हटले की तुला माहिती आहे कि महाराजांची पुजा आरती झाल्याशिवाय काही खाता येत नाही. तुला मी नंतर प्रसाद आणून देईन. मी घरात गेल्यावर नंतर विसरुन गेलो. आमची यथासांग प्रसादाची जेवणे झाली सुद्धा.

विषण्ण वाटण्याचे कारण केवळ नारायण खुडुक झाला म्हणून नाही तर आपण किती स्वार्थी आणि आप्पलपोटे असतो त्याचे उत्तम उदाहरण आहे.

इथे एक प्रसिद्ध गोष्ट आठवते की कोण्या एका गावात पाऊस पडत नसतो म्हणून राजाला स्वप्नात येऊन शंकर सांगतो की माझ्या पिंडीला दुधाने अभिषेक करा गावात पाऊस पडेल. राजा आपल्या राजवाड्यातील दुधाने अभिषेक करतो पण पिंडी भिजत नाही, नंतर तो दवंडी पिटतो की गावातील सर्वांनी आपापल्या घरातील दूध आणून पिंडीला अभिषेक करावा. लोक आपल्या पोराबाळांना उपाशी ठेवून पिंडीवर दुधाचा अभिषेक करतात तरी पिंडी भिजत नाही.

एक म्हातारी मात्र आपल्याकडील लहानसा दुधाचा गडू घेऊन येते तेव्हा तिला सर्वजण हसतात की इतक्या प्रचंड दुधाचा अभिषेक करून मूर्ती कोरडी राहिली आता या गडूतील दुधाने ती भिजणार का? म्हातारी म्हणते "माझ्या वासराला आचळाला लावल्यावर, नंतर माझ्या नातवांना दूध दिल्यावर इतकेच दूध शिल्लक राहिले." म्हातारी त्या दुधाचा अभिषेक करते आणि मूर्ती दुधाने चिंब होते.

लोक मात्र पुण्य मिळवायला पोराबाळांना उपाशी ठेवून प्रसादाची जेवणे घालतात.

दुसरे कारण असे, की नारायण ही प्रकाशरावांच्या मते बिनमहत्त्वाची किंवा अनास्थेची व्यक्ती असावी. अन्यथा, ते त्याला विसरून प्रसादाचे जेवण जेवले नसते. हीच गोष्ट आपल्या पोटची पोरे किंवा आप्त वाह्यात किंवा चुकलेले असतील तरी शक्य आहे का? नशा करणार्‍या, निरुद्योगी माणसांबद्दल आपल्याला दया वाटेनाशी होते हे सत्य असले तरी अंतिम सत्य नाही. जर ती माणसे कळवळून तुमच्याकडे पृच्छा करतात तेव्हा जर तुम्हाला काहीच वाटत नसेल तर तुमच्यातील माणूसकी संपली असे समजा.

नारायणाने कितीही वाईट कामे केलेली असली तरी भुकेकंगाल अवस्थेत त्याला भीक मागून काही न मिळाल्याने जर "खुडुक" व्हावे लागले असेल तर ते तितकेच विषण्ण करणारे आहे. केवळ त्याचा मृत्यू झाला म्हणून नाही तर ज्या आयुष्यात तुम्हाला कितीतरी चांगल्या गोष्टी करण्यासाठी होतं ते वाया गेलं म्हणून. नारायण चुकत होता तेव्हा समाज आणि त्याहीपेक्षा त्याचे नातेवाईक त्याला न समजावता तसेच राहिले म्हणून आणि असे अनेक.

गावात फिरताना एकमेकांना दिसायचे तेव्हा दत्तु त्यांच्या कडे निर्विकार पणे पाहयचा. खोल गेलेले मोठे डोळे , कृश शरीर, पिंजारलेले पांढरे केस, थिगळ लावलेले फाटके लुगडे अशी अनवाणी फिरणारी चंपुताईला पाहिली कि मला खुप भिती वाटायची.

आपली जन्मदाती आई या वेशात फिरते याची कल्पना तरी करवते का? निर्विकारपणा खूपच पुढची गोष्ट झाली.

तुमच्या प्रतिसादातील काही बाबतीतील माझ्या ब्लॉगवरील भिकारीण हे लिखाण आणि प्रतिसाद येथे वाचता येईल.

सहमत.

नशा करणार्‍या, निरुद्योगी माणसांबद्दल आपल्याला दया वाटेनाशी होते हे सत्य असले तरी अंतिम सत्य नाही. जर ती माणसे कळवळून तुमच्याकडे पृच्छा करतात तेव्हा जर तुम्हाला काहीच वाटत नसेल तर तुमच्यातील माणूसकी संपली असे समजा.

पुर्णतः सहमत्.

जन सामान्यांचे मन

वय...

मला वाटते प्रकाशरावांनी त्यांच्या लहानपणचा किस्सा सांगितला. जेंव्हा सर्व गोष्टी विचारांती होतातच असा भाग नाही. पण त्याचे विश्लेषण होताना आत्ताच्या प्रकाशराव बाकीचे सर्व सामाजीक बोलत असताना पुजेच्या नैवैद्यासाठी त्या नारायणाला खायला देयचे थांबले असे म्हणल्यासारखे वाटले. हे म्हणजे गांधीजींच्या वडीलांच्या निधनाच्या वेळच्या त्यांनी स्वतः सांगितलेल्या गोष्टीचा "आऊट ऑफ कॉन्टेक्स्ट" वापर गांधीजींना नावे ठेवण्यासाठी करण्यासारखे नकळत असेल पण झाल्यासारखे वाटले.

अवांतर

असाच वयासंदर्भातील एक बोलका प्रसंग "ए टाईम टू किल" या चित्रपटात आहे. त्यातील आरोपीच्या साठीतल्या वकीलाला कमी दाखवण्यासाठी त्याचे सबंध हे कायद्याने अजाण असलेल्या मुलीशी कसे आलेत हे फिर्यादीचा वकील सांगतो. पण तो हे सांगत नाही की तेंव्हा हा वकील १८ वर्षाचा आणि जिच्याशी संबंध आलेले असतात ती मुलगी १६ वर्षाची असते आणि त्यांचे नंतर लग्न होऊन कायम टिकलेले असते.

थोडक्यात , प्रकाशरावांशी अनेकदा माझे पण वाद होतात, पण अशा गोष्टींचे विश्लेषण करताना त्यांच्या बद्दल माणूसकी नसलेली व्यक्ती असे वाटत नाही...

भलतंच आणि अतिच!

पण त्याचे विश्लेषण होताना आत्ताच्या प्रकाशराव बाकीचे सर्व सामाजीक बोलत असताना पुजेच्या नैवैद्यासाठी त्या नारायणाला खायला देयचे थांबले असे म्हणल्यासारखे वाटले.

मला वाटतं, मी विश्लेषणात कोठेही प्रकाशरावांवर ठपका लावलेला नाही. एखादी गोष्ट वाचून तुमच्या मनात नेमके काय भाव उत्पन्न झाले ते व्यक्त केले आहेत. त्यावेळी घाटपांडे वयाने लहान होते हे सहज समजण्यासारखे आहे, मला तर नारायणही एखादा ६-७ वर्षांचा मुलगा असावा असे प्रथम गोष्ट वाचून वाटले. ते तसे नसून नारायणची पार्श्वभूमी लक्षात आल्यावर तितकेच विषण्ण वाटले का असे "सहज" यांनी विचारल्यावर विषण्णता कोणत्या कारणांनी आले ते लिहिले आहे. प्रकाशराव वयाने लहान असूनही भुकेल्याला अन्न न देता पूजेनंतरच अन्नप्राशन करावे हे सांगणारा समाज स्वार्थी आहे. यांत प्रकाशरावांचे वय लक्षात न येते तर म्हातारीची गोष्टही न येती कारण घरात पूजा असली की बरेचदा लहान मुलांनाही उपाशी ठेवले जाते. बहुधा, ही पूजा चालत असता ते स्वतःही उपाशी असावेत.

नारायण बिनमहत्त्वाची व्यक्ती असण्याचा मात्र वयाशी संबंध नाही. ते प्रकाशरावांच्याच नाही तर प्रत्येकाच्या बाबतीत खरे आहे.

एखादा प्रसंग वाचून मनात वेगवेगळे भाव उत्पन्न होतात त्याने आनंद किंवा विषण्णता उत्पन्न होते. त्यात जर ठपका लागतो तर तो समाजावर लागतो.

थोडक्यात , प्रकाशरावांशी अनेकदा माझे पण वाद होतात, पण अशा गोष्टींचे विश्लेषण करताना त्यांच्या बद्दल माणूसकी नसलेली व्यक्ती असे वाटत नाही...

प्रतिसादाचा नसलेला रोख याबाजूने वळवणे हे जरा भलतंच आणि अतिच झालं. हा प्रतिसाद नसता तर प्रकाशरावांचा खालचा प्रतिसादही नसता असे वाटते कारण त्यांनी त्या प्रतिसादात जे लिहिले ती पार्श्वभूमी आतापर्यंत अनेकांना माहित झाली आहे तेव्हा त्यांना पुन्हा खुलासा करत रहावा लागला नसता.

आपण किती स्वार्थी आणि आप्पलपोटे असतो त्याचे उत्तम उदाहरण आहे.

यांत आपण म्हणजे आपण सर्वच म्हणूनच माझ्या ब्लॉगचा दुवा दिला आहे.

नारायणची गोष्ट वाचून मी प्रतिक्रिया का दिली नसावी याचा उलगडा आता मला झाला. विषण्णतेसह पश्चात्तापाची भावनाही निर्माण झाली असे खेदाने म्हणावे लागले.

स्वार्थी समाज


भुकेल्याला अन्न न देता पूजेनंतरच अन्नप्राशन करावे हे सांगणारा समाज स्वार्थी आहे.


मला वाटते हे तितकस खरं नाही. समाज स्वार्थी जसा आहे तसा परमार्थी ही आहे. देव-धर्माचे अवडंबर माजवले गेलेल्या समाजाची ती समुह शरणगतता, गतानुगतिकता आहे. हीच गोष्ट अंधश्रद्धेची वाहक बनते. समाजात दान-धर्म हा रुजला आहे पण तोही डोळसपणे नव्हे. डोळसपणे दान -धर्म करणारा हा दान देखील सत्पात्री असावे याचा आग्रही असतो. केवळ पुण्ण्यासाठी दानधर्म करणारा हा ते फक्त यांत्रिकपणे वा कर्मकांडाचा भाग म्हणुन उरकून टाकतो.

कारण घरात पूजा असली की बरेचदा लहान मुलांनाही उपाशी ठेवले जाते. बहुधा, ही पूजा चालत असता ते स्वतःही उपाशी असावेत.


खरं आहे; मोठी माणसं स्वतः उपाशी राहयचे पण लहानमुलांना भुक सहन होणार नाहि म्हणून त्यांना अगोदर खायला देणे ही त्यामानाने सोय/तडजोड/ सुधारणाच होती.
प्रियाली ची भिकारिण वाचल्यावर मला माझ्या सीआयडी कार्यालयाच्या दाराशी एका कचरापेटीत एक भिकारी व एक कुत्रा एकाच अन्नासाठी एकमेकांवर अक्षरशः गुरगुरत होते या प्रसंगाची आठवण होते.

प्रकाश घाटपांडे

विश्लेषण

नारायणचा प्रसंग जवळपास तीस - बत्तीस वर्षांपुर्वीचा आहे. हा प्रसंग माझ्या मनावर कोरला गेला आहे. ज्या सनातनी व ग्रामीण वातावरणात मी वाढलो त्या पार्श्वभुमीवर आजचा काळ , संवेदनशीलता, प्रगल्भता यांच्या चष्म्यातुन् त्याकाळात पहाता येणार नाही. तसेच समकालीन पार्श्वभूमीच्या उदाहरणाशीही करता येणार नाही. कारण समकालीन संदर्भसुद्धा सापेक्ष असतात.समाजातल्या दुर्बळ घटकांना मदत केली जायची त्यात नारायणलाही मदत व्हायची. माझा मी जेव्हा भुतकाळात डोकावतो त्यावेळी मी माझ्यावर झालेले संस्कार तपासुन पहात असतो. आजही धार्मिक समारंभाचे जेवण करताना मला नारायणचा चेहरा डोळ्यासमोर येतो आणि खरंच अपराधी वाटतं.
एकनाथ महाराजांनी सोवळ्यात तहानलेल्या गाढवाला पाणी पाजलं किंवा यासारखे दृष्टांत हे फक्त कथा-किर्तनात ऐकायचो. व्यवहारात रितिरिवाजांचा पगडा हा होताच. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म हे श्लोक म्हणण्यापुरते. त्याचा अर्थ कोणाला माहिती होता?
एखादे चित्र कायम ठेवुन त्याचा फक्त कॅनवास बदलला तर अगोदर सुंदर दिसणारे चित्र भेसुर दिसू लागते. विश्लेषणाचेही तसेच आहे. शेतातल्या पानमळ्यात फुलांवर बसलेल्या व थंडीत गोठलेल्या फुलपाखरांचे पंख खेळ म्हणुन मी तोडायचो तेव्हा मजा वाटायची. आज मात्र ते अमानुष वाटतं .पंख तोडून आपण त्या फुलपाखराचा अवकाशच संपवुन टाकत होतो. उद्या तुझाहि अवकाश कुणी असाच संपवुन टाकला तर? असा प्रश्नही मनात येत नसे.
प्रकाश घाटपांडे

तेव्हढेच...

एखादे चित्र कायम ठेवुन त्याचा फक्त कॅनवास बदलला तर अगोदर सुंदर दिसणारे चित्र भेसुर दिसू लागते. विश्लेषणाचेही तसेच आहे.

छान आणि चर्चेसंदर्भात चपखल वाक्य. संदर्भ चौकट अर्थात फ्रेम ऑफ रेफरन्स ला महत्व असते इतकेच काय ते म्हणायचे होते.

खाणे - पिणे

कधी कधी अमेरिकेला अचानक भारतावर आरोप करायची हुक्कीच येते. त्यात बुश असेल बोलायला तर? असो.
तुम्ही मुद्दे चांगले लिहिले आहेत. मला राहून राहून काही विचार येतात.
अमेरीका अन्नधान्य आयात करणारा देश आहे आणि आपण निर्यात करणारा. थोडक्यात त्यांच्यासाठी आपण एक स्त्रोत आहोत. बाकी अणुशक्ति वरून वेळोवेळी शक्तिप्रदर्शन करणार्‍या अमेरीकेला जर आम्ही म्हटले की नसते गैरसमज पसरवू नका. नाहीतर तुमच्या अन्नधान्य आयातीवर आम्हाला विचार करावा लागेल. मरा उपाशी लेकाच्यांनो, नाहितर अणुशक्ति वापरा. :)
दुसरा मुद्दा असा कि आम्ही शेती प्रधान देश आहोत असे आम्ही म्हणत आलो आहोत. पण आज आमची जी शेती उत्पादनाची क्षमता आहे ती खरच पुर्णपणे योग्य आहे? जर संपूर्ण शास्त्रीय अभ्यासाने/मार्गदर्शनाने शेती केली तर उत्पादन जास्त होऊन भारत आणखी बलाढ्य होईल काय?
भारतीय शेतकरर्‍यांना शेती सोबत जर एखाद्या त्यांना जमेल असा आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ठसा उमटवेल असा काही उद्योग धंदा करता येईल का? थोडक्यात भारतीय दुग्ध उद्योग आणखीन व्यावसायिकरित्या करता येईल काय?

छे छे..

>> अमेरीका अन्नधान्य आयात करणारा देश आहे आणि आपण निर्यात करणारा.

अमेरिका ,ऑस्ट्रेलिया आणि काही प्रमाणात युक्रेन हे आज जगभरातील् सर्वात मोठे अन्न धान्याचे उत्पादक आहेत.
भारत आत्ता आत्ता तर् कुठे अन्नाबाबतीत स्वयम् पुर्ण होतोय.(मागील् दोन-एक दशकात.)

अमेरिका आजही खाद्यान्न निर्यात करते.

आपल्याकडे एक् सार्वत्रिक गैरसमज आहे तो अकः-
"अमेरिका म्हणजे (केवळ्) तंत्रदज्ञानात आघाडिवर.त्यांच्यकडे धान्य नसणार."
अहो प्रचंड् मोठा गैर् समज् आहे हा..
भारताचे धान्योत्पादन त्यांच्या तुलनेत् फार् फार् कमी आहे.(ते का आहे,
भारतीय शेतीची उत्पादकता कमी का, ह्यावर् अर्थ शास्त्रात् एक् मोठा धडा होता आम्हाला.इथे ती एक् मोठी चर्चा होइल.)

इतकच काय,चीन मधील् लागवडी खालील जमीन भारताच्या निम्मि आहे ,पण तेवढ्याश्या जमिनीतुन्
ते भारताच्या जवळ जवळ दुप्पट धान्य उत्पादित करतात आज.
(केवळ त्याचा अभ्यास करण्यासाठी मा.उपमुख्यमंत्री (आबा)दोन्-चार वर्षांपुर्वी चीन दौर्‍यावर् गेले होते.)

जन सामान्यांचे मन.

श्लोक

कुठल्याशा शाळेत
वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभुचे
सहज स्मरण होते आपुल्या बांधवाचे
कृषीवल् कृषीकर्मी राबती दिनरात
श्रमिक श्रम करोनी वस्तु या निर्मीतात
स्मरण् करुनी त्यांचे अन्न सेवा खुशाल
उदर भरण् आहे चित्त होण्या विशाल
हा श्लोक शिकवतात मला तो खुप योग्य वाटतो.
-बुफे बरा वाटतो किमान अन्न तरी आपल्या गरजेनुसार घेता येते.
रांगेत उभे राहून एकदाच् हवे/नको तेवढे वाढून घ्यायचे , हवे तेवढे खायचे बाकी टाकून् द्यायचे हीच् रीत आजकाल सगळ्या बुफे मध्ये आढळते आणि हे बघून माझे मन् जास्त् उद्विग्न होते. इथे नागपूरमध्ये विष्णु मनोहरांनी मेजवानी क्लब सुरु केलाय. त्यांच्या एका कार्यक्रमाला गेले होते. त्यांच बोधवाक्य 'अन्न हे पूर्णब्रम्ह'. कार्यक्रमाला १००-१२५ गृहिणी . ताटात न् टाकलेली माझ्यासारखी एखाद दुसरीच. हे पाहून अतिशय वाईट वाटले.
-नंतर मला समजले की नारायण भुकेल्या पोटीच त्या ध्वजस्तंभावर असाच 'खुडुक' झाला. आधी 'खुडुक झाला' म्हणजे झोपी गेला असेच वाटले. पण अर्थ कळल्यावर मलाही कसेसेच झाले. नेवैद्य ह्या नारायणालाच दाखवला असता तर जास्त पुण्य मिळाले असते. संता तुकडोजी महाराज म्हणत गोग्रास देण्यापेक्षा तेच अन्न एखाद्या भुकेल्याला द्यावं. असे हे सगळ् पाहून महागाईवर काय बोलावे हे न सुचलेली एक सामान्य गृहिणी

अक्षरनंदन शाळेत


कुठल्याशा शाळेत
वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभुचे
सहज स्मरण होते आपुल्या बांधवाचे
कृषीवल् कृषीकर्मी राबती दिनरात
श्रमिक श्रम करोनी वस्तु या निर्मीतात
स्मरण् करुनी त्यांचे अन्न सेवा खुशाल
उदर भरण् आहे चित्त होण्या विशाल
हा श्लोक शिकवतात मला तो खुप योग्य वाटतो.


हे पुण्यातील नारळकर फाउंडेशन च्या अक्षरनंदन शाळेत म्हणले जाते.
प्रकाश घाटपांडे

चांगला श्लोक

वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभुचे
----
उदर भरण् आहे चित्त होण्या विशाल

ह्या श्लोकाच्या माहीतीसाठी (आणि प्रकाशरावांनी दिलेल्या अधिकमाहीतीसाठी) धन्यवाद. हा श्लोक पण पाठ करून घेण्यासारखा आहे.

अन्न नासाडी

जितका विकसीत देश तितकी जास्त अन्ननासाडी असे माझे तरी मत झाले आहे.

ह्या दुव्यावर अशी माहीती आहे की जवळजवळ तयार झालेले निम्मे धान्य उत्पादन अमेरिकेत वाया जाते. इतर विकसीत देशात थोडा टक्केवारीत फरक असेल पण मोठ्याप्रमाणावर अन्ननासाडी नक्कीच होत असेल.

भारतात देखील अन्न वाया जाणे/ नासाडी दिवसेंदिवस वाढत आहे. दुवा

ह्या दुव्यावर अजुन माहीती वाचता येईल. - जागतिक उपासमार - जागतीक मेजवान्या

प्रत्येक देशाने आपल्या देशातील अन्न कमी वाया जाउ दिले तरी ते उत्पादन केल्या सारखेच होईल. शेवटी देशाने म्हणजे काय तर प्रत्येक व्यक्तिने त्यात कामात योगदान द्यायचे.

"भुकेपेक्षा चार घास कमी खा" हा खरोखर अनेक बाबतीत उपयोगी मंत्र आहे.

-------------
आहार आणि विहार आज खरेच सकस, पौष्टीक आहे असे आपल्याला वाटते का?

हो आणी नाही. हो या करता कारण म्हणले तर आज खुपच प्रमाणात विविध व चांगले अन्न उपलब्ध आहे पण आपण त्यावर जी प्रक्रिया करतो किंवा उपलब्ध अन्नातील कमी सकस अन्नपदार्थांची निवड करतो त्यामुळे शेवटी आपला आहार तितका सकस व पौष्टीक नाही.

आपल्या आहारात शक्यतो कमीत कमी प्रक्रिया केलेले अन्न [प्रोसेस फुड], त्यातल्या त्यात ताजे , सर्व रंग, सर्व चवी, सर्व [विविधता] अन्नप्रकार [फळे, भाज्या, मांसाहार्, डाळी, कडधान्ये इ.] असावे. [सर्व म्हणजे रोज सर्व प्रकार नाही तर सर्व प्रकारांचा [रंग, चव, अन्नप्रकार]आलटुन पालटुन समावेश :-)] तसेच योग्य प्रमाण, जास्तीत जास्त जीवनसत्वे टीकुन रहातील व चांगले पचतील अशी प्रक्रिया करुन अन्न बनवणे.

आजच्या माहीतीच्या तसेच "सोयीच्या" युगात कुठले अन्न कशाप्रकारे सेवन केले की उत्तम यावर खुप माहिती उपलब्ध आहे. त्याचा उपयोग करुन आपला आहार सकस व पौष्टिक बनवणे जितके सहज शक्य आहे तितकेच निकृष्ट अन्नाच्या नादी लागणे सोपे आहे. प्रश्र केवळ आपल्या निवडीचा / निर्णयाचा आहे.
--------------

बाकी सण, समारंभ यात अन्नाची जी नासाडी होते ती कमी करता येईल. निदान ज्यांची पोटे भरतात त्यांनाच पंगतीला बोलावुन पंचपक्वान्ने घालण्यापेक्षा भुकेलेल्यांना अन्नदान केले तर बरे.
---------

शेवटी आपले आरोग्य, आपल्या खिशाला कमी भार [जास्त मागणी, कमी पुरवढा = भाववाढ] ह्या दोन हेतुनी जरी अन्न वाया घालवणे / कमी संपवणे केले तर बराच सामाजीक फायदा आहे. गरीब देशातील असहाय जनते पर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी तितके अन्न उपलब्ध असणे हे महत्वाचे.

पटले

पटले!
अगदी नेमका प्रतिसाद!

गरीब देशातील असहाय जनते पर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी तितके अन्न उपलब्ध असणे हे महत्वाचे.

१००% सहमत आहे.

आपला
गुंडोपंत

+१

उत्तम प्रतिसाद.

विकास यांचा चर्चाविषय विचार करायला लावणारा आहे.

बुश हे "दिसामाजि काहीच्या काही तरी ते बोलावे" हे व्रत पाळतात. त्यामुळे आजकाल त्यांच्या बोलण्याकडे माझे दुर्लक्ष होऊ लागले आहे. मी तसे दुर्लक्ष करू नये - काही म्हटते तरी ते एका मोठ्या आणि बलशाली देशाचे अध्यक्ष आहेत.

मस्त प्रतिसाद रे सहजा !!!

विकासरावांचा लेख नेहमीप्रमाणेच अंतर्मुख करायला लावणारा !!!

अमेरिकेचे धोरण आजकाल कळत नाही. जगाच्या उपासमारीला भारत जवाबदार, तेलाच्या माहागाईला भारतच जवाबदार, भारताचे राहणीमान उंचावले मोडक्या अर्थव्यस्थेला भारतच जवाबदार.भारताची प्रगती डोळ्यात भरु लागली असे हे होणारच असे वाटते.

अवांतरः- म्यानमार मधील वादळाला आणि हजारो लोक मृत्यु पावले त्याला जवाबदार भारत आहे म्हणु नये म्हणजे झालं....!!!! बाय द वे, त्या वादळाला 'नर्गीस' चे वादळ का म्हणतात ते कळले नाही हो, त्यावर कोणीतरी माहितीवजा लेख लिहा राव !!!! वादळाने लोक सावरले नाहीत आणि तिथे सार्वमत घेण्याची तयारी तेथील सरकारने चालवली आहे.

अवांतर - सायक्लॉन नर्गीस

ही पद्धत जुनी आहे. मी अमेरिकेत आल्यावर ही पद्धत विशेष करून पाहीली. वेस्ट इंडीज मधे काही शतके वादळांना ख्रिस्ती संतांची नावे दिली जात. शास्त्रीय आणि नुसते आकडे असलेली नावे देण्याऐवजी विशेषनामाने लक्षात ठेवणे सोपे जाते आणि चुका होणे कमी होते. जागतीक हवामान संस्था आता ती नावे (कदाचीत अमेरीकेबाहेर) ठरवते. थोड्याफार प्रमाणात भारतीय उपखंडात असा नियम आहे की प्रत्येक भागातील नावे दर चार वर्षांनी परत वापरली जातात (कदाचीत एखादी मोठी आपत्ती - नर्गीस सारखी येऊन गेली की ते नाव टाळत असावेत). अमेरिकेत दर वर्षी ए पासून झी/झेड पर्यंत नावे वापरली जातात आणि नंतर अल्फा, बिटा वगैरे नावे दिली जातात. भारतीय उपखंडातील उत्तर हिंदी महासागरातील या वर्षाची नावे खालील प्रमाणे:

Ogni
Akash
Gonu
Yemyin
Sidr
Nargis
Abe
Khai Muk

अधिक माहीती साठी हा दुवा पहा.

वाह...

पहिल्यांदाच ऐकतोय हे.
ग्रेट माहिती आहे...

जन सामान्यांचे मन

सावकाश

प्रतिसाद आणि दुवे माहीती पूर्ण आहेत.

"भुकेपेक्षा चार घास कमी खा" हा खरोखर अनेक बाबतीत उपयोगी मंत्र आहे.

आपल्याकडे "सावकाश जेवा" असे म्हणायची जी पद्धत आहे त्यातील "सावकाश" म्हणजे "स-अवकाश" अर्थात पोटात थोडी जागा राहील इतकेच जेवा असा त्याचा अर्थ आहे, असे ऐकले आहे.

तसेच अजून एक मार्मिक निरीक्षण ऐकले होते (खरे खोटे माहीत नाही): "पोटात आणि डोक्यात १०-२० मिनीटांचे अंतर असते." अर्थात पोट भरले आहे, हे समजायला डोक्याला साधारण १०-२० मिनीटांचा वेळ लागतो. त्यामुळे जेंव्हा माणसे भराभरा खातात तेंव्हा आपसूक पोटापेक्षा/गरजेपेक्षा जास्त खाऊ शकतात.

+१

माझ्या एका मित्राला त्याच्या फिजिशियनने नेमके हेच सांगितले आहे !

आकडेवारी

काही दिवसांपूर्वी श्री. जयराज साळगावकर यांनी जागतिक अन्नधान्य टंचाई या विषयावर केलेल्या सादरीकरणास उपस्थित राहण्याचा योग आला. या सादरीकरणामध्ये त्यांनी मांडलेल्या मुद्यांपैकी काही प्रमुख मुद्दे इथे देत आहे.

  • जागतिक तापमान वाढ
  • जैव इंधनाचे उत्पादन (एका एसयूव्ही ची टाकी भरण्यास इथेनॉल सोबत जेवढे धान्य लागते, तेवढे धान्य एका माणसाचे वर्षभर पोट भरू शकते).
  • ऑस्ट्रेलियातील सततच्या दुष्काळामुळे गव्हाच्या उत्पादनात घट, तसेच उक्रेन कडुन होणार्‍या गव्हाच्या पुरवठ्यामध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे.
  • भारतामध्ये दरवर्षी सुमारे २ कोटी टन गहू, तांदूळ व मसूर इत्यादी प्रकारचे धान्य उंदीर फस्त करतात, जे कॅनडाच्या वार्षिक गव्हाच्या उत्पादना एवढे आहे.
  • अमेरिकेमध्ये वर्षाला १६० बिलियन किलोग्रॅम अन्न माणसांना खाण्यास उपलब्ध होते, त्यापैकी जवळपास ४५ बिलियन किलोग्रॅम अन्न रिटेलर्स, रेस्टॉरन्ट्स व ग्राहकांडून वाया घालविले जाते. (हैदर रिझवी, इंटर प्रेस सर्व्हिसेस)
  • यूके मध्ये सुमारे एक तृतियांश अन्न फेकून दिले जाते, जे एका छोट्या आफ्रिकन देशाची भूक भागवू शकते. (डब्ल्यू.ए.आर.पी. - नोव्हेंबर ०७)
  • १ किलोग्रॅम प्रोसेस्ड रेड मीट्च्या उत्पादनासाठी सरासरी ४.५ किलोग्रॅम धान्य लागते. तसेच जिथे १ पौंड गव्हाच्या उत्पादनासाठी १०८ गॅलन्स पाणी लागते तिथे १ पौंड रेड मीट्च्या उत्पादनासाठी १२००० गॅलन्स पाणी लागते.
  • अमेरिकेमध्ये १/५ मक्याचे उत्पादन जैव इंधनाच्या निर्मितीसाठी वापरले जाते. मक्याला असलेली वाढती मागणी पाहून सोयाबीन उत्पादक मक्याकडे वळत असून ज्यामूळे सोयाबीनच्या किमतीत वाढ होत आहे.
  • जागतिक बॅंकेच्या अंदाजानुसार या टंचाईमुळे ३३ देशांमध्ये सामाजिक असंतोष पसरू शकतो. भारतामध्येही माओईस्ट, नक्षलवादी व अन्य अतिरेकी संघटना याचा गैरफायदा घेउन लोकांना भडकावू शकतात.

जयेश

काय म्हणता?

भारतामध्ये दरवर्षी सुमारे २ कोटी टन गहू, तांदूळ व मसूर इत्यादी प्रकारचे धान्य उंदीर फस्त करतात, जे कॅनडाच्या वार्षिक गव्हाच्या उत्पादना एवढे आहे.
अमेरिकेमध्ये वर्षाला १६० बिलियन किलोग्रॅम अन्न माणसांना खाण्यास उपलब्ध होते, त्यापैकी जवळपास ४५ बिलियन किलोग्रॅम अन्न रिटेलर्स, रेस्टॉरन्ट्स व ग्राहकांडून वाया घालविले जाते. (हैदर रिझवी, इंटर प्रेस सर्व्हिसेस)
यूके मध्ये सुमारे एक तृतियांश अन्न फेकून दिले जाते, जे एका छोट्या आफ्रिकन देशाची भूक भागवू शकते. (डब्ल्यू.ए.आर.पी. - नोव्हेंबर ०७)
१ किलोग्रॅम प्रोसेस्ड रेड मीट्च्या उत्पादनासाठी सरासरी ४.५ किलोग्रॅम धान्य लागते. तसेच जिथे १ पौंड गव्हाच्या उत्पादनासाठी १०८ गॅलन्स पाणी लागते तिथे १ पौंड रेड मीट्च्या उत्पादनासाठी १२००० गॅलन्स पाणी लागते.

हे पहिल्यांदाच माहित झालं.
हे भयावह आहे.
जन सामान्यांचे मन

"फुकटे"पणाने जगणे

नासाडीविरुद्धचा एक टोकाचा उपाय : फ्रीगनीझम् !

आवडले

फुकटेपणाने जगणे आवडले.

भारतात साधुबुवा/फकीरबाबा एस्टीत कंडक्टरने तिकीटाबद्दल विचारले की उजवा हात/मोरपिसांचा झाडू वर करून 'हरि ॐ'/भगवान तेरा भला करे असा आशीर्वाद देतात, हा देखील एक फ्रीगनीझमच ;)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

कपिल सिब्बल यांची आकडेवारी

ही आकडेवारी कपिल सिब्बल यांनी दिली आहे.

प्रकाशरावांचा 'खुडुक्' अनुभव काळजाला चरका देऊन गेला.

सुंदर विषय

वा! विकासराव मस्त लेख!..
प्रकाशरावांचा अनुभव विषण्ण करायला लावतो; परंतू हेच सत्य आहे.
असो.
भारताइतकी अन्नाची नासाडी अन्यत्र होत असेल की नाहि यावर शंका आहे. या निमित्ताने दोन गोष्टी प्रामुख्याने आठवतात:
१. भारतातील प्रत्येक देवळात जितके दूध, तेल, तूप, मध, दही, साखर आदी द्रव्ये अभिषेक, निरांजने आदी गोष्टीसाठी वाया जातात हे विपर्यस्त वाटत नाही का? आणि असा अभिषेक करून आलेला त्याच देवळाबाहेरची भिकार्‍यांची रांग दूर्लक्षून (काहि जण एखाद रुपया 'भीक' देऊन) पुढे जातात तेव्हा हा विरोधाभास फारच जाणवतो.

२. "वॉलाँग" या कॅ. श्याम चव्हाण (लेखकाचे पूर्ण नाव विसरलो, चुभुदेघे) या सत्यघटनेवरील कादंबरीतील प्रसंगः
या कादंबरीत कॅ. चीनी युद्धकैदी असतात. त्यावेळच्या चिनी युद्धकैद्यांच्या कँपचे वर्णन या कादंबरीत यथासांग येते. यात आपले भारतीय सैनिक जेवण झाल्यावर नदीकीनारी हात व ताटे धुत असत. त्या ताटातील व हाताला लागलेली शीते किनार्‍यावरच पडत. त्यावेळी चीनी अधिकारी भारतीय युद्धकैद्यांची सभा भरवून त्यांना सांगता "की आमचे शेतकरी अतीव कष्टाने हे अन्न पिकवतात ते असे वाया घालवू नका"
भारतीय सैनिकांना हा त्यांच्या मानसिक खच्चीकरणासाठी टाकलेला अजून एक डाव वाटतो (आणि असे असुही शकेल पण मुद्दा वेगळा आहे). त्यामुळे सैनिक आपले कर्म चालूच ठेवतात. शेवटी चिनी अधिकारी शीते वाया जाऊ नयेत म्हणून शेवटी कोंबड्या पाळतात.

यातील लष्करी/मानसिक/राजकीय डावपेचांचा भाग सोडला तरी हा धडा मलातरी भारतीयांनी शिकण्यासारखा वाटला.

-ऋषिकेश

चांगला किस्सा

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

यातील लष्करी/मानसिक/राजकीय डावपेचांचा भाग सोडला तरी हा धडा मलातरी भारतीयांनी शिकण्यासारखा वाटला.

खरे खोटे (चिन्यांच्या मनातले) काही असले तरी किस्सा चांगला आहे.

बाकी देवळात जर, दूध, तेल, तूप, मध, दही, साखर कोणी नैवेद्याला वापर केला आणि तो सर्वांना वाटला तर हरकत नसावी पण तरी देखील आपला मुद्दा पटणारा आणि बदल घडू शकतात हे जाणून विचार करायला लावणारा आहे.

 
^ वर