ग्रंथालय कथा आणि व्यथा

"अहो,अहो, तुम्ही पुस्तकांना हात लावताय की!"
"बघतोय मी."
"बघतोय काय? मला सांगा कि कुठल पुस्तक हवयं?"
"मला कुठल पुस्तक हवय तेच तर मी बघतोय.तेवढाच तुमचा त्रास कमी होईल."
"नाही नाही.तुम्ही हात लावायचा नाही.जे हवं असेल ते मला सांगा."
मुंबईतल्या एका ग्रंथालयातील एका सेविकेबरोबर झालेले हे संभाषण.
"ठीक आहे ते डावीकडून तिसरे पुस्तक द्या."
ते पुस्तक पाहिल्यावर ते फारसे उपयुक्त नसल्याचे जाणवले. मी ते परत केले. कार्डेक्स बघून दुसर पुस्तक मागवलं. ते चाळल्यानंतर तेही महत्वाचे वाटलं नाही. तेही परत केले. आता ती बाई त्रासिक नजरेने माझ्याकडे बघू लागली. तिला वाटलं असेल कि मी मुद्दाम त्रास देण्यासाठी असं करतोय. तिसरं पुस्तक मागवलं. बघितल्यावर मला ते आवडलं. मी ते घेतलं.'बरं झालं कटकट गेली.' अशा नजरेने तिनं माझ्याकडे बघितलं. मला हव्या असलेल्या ज्योतिषशास्त्र या विषयावरील पुस्तकांची रॅक व कार्डेक्स हे जवळ जवळ होते. मग कार्डेक्समध्ये शोधत बसण्याऐवजी आपण रॅकमध्ये शोधू अशा विचारांनी मी सहजगत्या पुस्तक चाळत होतो. पण ते ग्रंथालयाच्या वाचकनीतीमध्ये बसतं नव्हतं.
मी इतरत्र बघितलं. एका टेबलवर रंगीबेरंगी मुखपृष्ठ असलेल्या कथा कादंब-या अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या.वाचक त्यातली पुस्तके निवडून घेत होती. बहुतेक पुस्तके नवी होती.वाचक मंडळी 'उदार' होउन दिलेल्या मर्यादित स्वातंत्र्यावर खूष होती. सर्व मराठी ग्रंथालयांमध्ये थोड्या फ़ार फ़रकाने हीच परिस्थीती असते.
विषयवार सूची -संदर्भाची रजिस्टर असतात त्यांना पोथ्यांचे स्वरूप आलेले असते.कोपरे फ़ाटलेले असतात, अक्षरं पुसट झालेली असतात. ड्‍रॉवर्स कॆटलॊग असतील तर ते बहुधा न उघड्ण्यासाठीच असतात.अधिक जोर लावला तर ओढणार्‍याचा निषेध म्हणून त्याच्या अंगावर येतात.
पुण्यातल्या एका नामवंत मराठी ग्रंथालयात नवीन म्हणून गेलो.फक्त ऒथर इंडेक्स होता.आतमध्ये कार्डस खचाखच भरलेली होती.प्लास्टिक कोटेड नव्हती.त्यांना ओवणारी सळई नव्हती.त्यामुळे त्याची स्थिती खेळून खेळून झालेल्या पत्त्याच्या कॆट सारखी झाली होती.बोटांची कसरत करुनही दोन कार्डस मध्ये वाचण्याइतपत सुयोग्य अंतर ठेवणे जड जात होते.शेवटी मी हव असलेले कार्ड वाचण्यासाठी ते बाहेर काढले, क्रम बदलला जाउ नये म्हणून खुणेसाठी कागद ठेवला. आणि कार्ड घेउन बाईंच्या कडे गेलो.
"बाई हे पुस्तक बघायचय."
"अहो. तुम्ही कार्ड कशाल बाहेर काढ्लतं? कार्डस अजिबात बाहेर काढायची नाहीत."बाईंनी खेकसून वाचक आचारसंहितेमधला एक नियम सांगितला.
"मी परत योग्य जागी ठेवतो. तुम्ही काळजी करु नका."
"नाही, पण कार्डस बाहेर काढायची नाहीत. "बाईंनी निक्षून सांगितले.
बाकी ग्रंथालयं वाचकांच्या वैचारिक पातळीबरोबर अशा नियमावल्या ठेउन त्यांची नैतिकता देखिल वाढ्वतात. या ग्रंथालयात मी दिवाळी अंक योजनेत सामील व्हायला गेलो.
"किती उशीर झालाय. आता जेमतेम दीड महिना राहिलाय. कशाला होताय मेंबर?" बाईंनी व्यावहारिक सल्ला दिला.
"वैयक्तिक अडचणीमुळे नाही येउ शकलो. हरकत नाही,दिड महिना राहिला तरी." अस म्हणून मी मेंबर झालो. मला एक दिवाळी अंक हवा होता. एखाद्या चांगल्या आर्टिकल साठी संपूर्ण अंक खरेदी करण मला परवडणारं नव्हतं. दोन आठवड्यात तो अंक मिळू न शकल्याने मी तो अंक राखून ठेवण्याची विनंती केली. पण दिड महिन्यात तो अंक मिळू शकला नाही.
मी बाईंना म्हटलं ,"अंकाच्या सात आठ कॊपी असताना दिड महिन्यात एकही कॊपी माझ्या वाट्याला का येउ नये?"
"आमचं दुसरं युनिट कोथरुडला असतं. तिकडे काही अंक असतात. आता योजना संपल्याने आम्ही सर्व अंक एकत्र करीत आहोत. तुम्हाला तो अंक सर्वसाधारण सदस्यत्वाखाली आम्ही देउ."बाईंनी स्थितप्रदन्याच्या भूमिकेतून सांगितले. बाईंनी सांगितलेले कारण खरे असेलही, पण माझ्या मनात मात्र असे अंक ग्रंथालयाच्या हितसंबंधी लोकांकडे अडकून पडले असावेत अशी शंका चाटून गेली. दिवाळी अंकाची व माझी लपाछपी शेवटी दिवाळी अंकाला खेळ्ण्याचा कंटाळा आल्याने संपली.
लहानपणी गावाला असताना ग्रामपंचायतीने चावडीत ग्रंथालय चालू केले होतं. 'दत्तू बामन' या नावाने परिचित असलेली व्यक्ती ग्रंथपाल झाली. काळसरं, गव्हाळ रंगाची, मजबूत बांध्याची ही व्यक्ती निळा सदरा त्याला मोठा खिसा.पेनसाठी त्यातच स्वतंत्र छोटा नळकांडीसारखा खिसा मात्र त्यात टेस्टर. पांढरा लेंगा, चपचपून तेल लावून कोंबडा पाड्लेले केस, तांबारलेले डोळे, पायात कर्र कर्र करणार्‍या वहाणा अशी होती.
कपाटे उघडून खुर्चीवर बसल्यावर प्रथम तंबाखू चोळून बार भरण्याचा कार्यक्रम होई आणि मग आता कामाला सुरुवात करायला हरकत नाही, अशा थाटात देवाणघेवाणीचे रजिस्टर उघडून लाल बॊलपेनने उभ्या आडव्या रेषा मारत बसे.त्या रेषा दुरेघी,जवळजवळ व समांतर असतील याकडे विशेष वेळ खर्च करी. तोपर्यंत आपल्याल वाचायला पुस्तक मिळेल या आशेपोटी आलेले वाचक व चिल्लीपिल्ली मंडळी घुटमळत राहतं. तेवढ्यात त्याला आपल्या रेडिओची आठवण येई. त्याच्याकडे एक चौकोनी डबडा रेडिओ होता. तो उघडून तो बसे.
खरे तर, तो रेडिओ त्याच्या प्रकृतीच्या मानाने चांगला चालतं होता. पण तो अधिक चांगला चालण्यासाठी तो टेस्टर घालून फ़िरवता येण्यासारखे सर्व पार्ट फ़िरवत असे. हे करताना तो जीभ नाकाच्या दिशेला बाहेर काढी.उजवा डोळा बारीक मिटून डावा डोळा शून्यात लावी. त्याला रेडिओतील कुठ्लही ज्ञान नव्हतं, तरी काड्या करण्याच्या उपजत प्रवृत्तीमुळे चांगले चालणारे स्टेशनही तो घालवून बसे. तो पर्यंत ग्रंथालयाची वेळ संपत आलेली असे. मग एखाद्या पोरावर तो ओरडे,"तुला कशाला पाहिजे रे पुस्तक? तुझ्या म्हतार्‍याने तरी वाचलं होतं का? पळ इथून." आलेल्या मंडळींना आपल्याला हातात येईल ती पुस्तके गळ्यात मारून वाटेला लावी.
'समानशीले व्यसनेषु सख्यम' या नात्याने त्याच्याजवळ असलेली मित्रमंडळी आपल्याला हवी ती पुस्तके कपाटातून काढून घेउन"द्त्त्या भ.... 'बाबा कदम'वाली दोन नेली बरं का?" असे म्हणून घेउन जात. ग्रंथालयातील सुट्ट्याही त्याच्या सोयीवर अवलंबून असतं. पण तरीही ग्रंथालय गावात वाचनाची अभिरुची निर्माण करण्यास कारणीभूत ठरलं.
डॊ.जयंत नारळीकरांनी आपली वाचक या नात्याने मांडलेली भूमिका अतिशय सुस्पष्ट व रास्त आहे. ते म्हणतात,"आधुनिकीकरणाचे फ़ायदे एवढे मोठे आहेत, कि प्रसंगी माहिती संकलित करण्यापासून येणा-या सर्व अडचणी पुढे किरकोळ ठरतात. आधुनिकीकरणामध्ये येणा-या सर्व अडचणी दूर करून ते वाचकांना सुलभ वाटावे अशा प्रकारे वापरले गेले पाहिजे.ग्रंथांबद्दल माहिती असणारे तज्न्य कर्मचारी व वाचक यांच्यात याद्वारे देवाणघेवाण वाढेल आणि वाचकांना माहिती अधिक सुलभपणे मिळू शकेल."(संदर्भ दै.सकाळ ११ नोव्हे १९९०)
एकदा " भांडारकर इन्स्टीट्यूट" मध्ये गेलो. तेथील प्रमुख ग्रंथपाल डॊ. वा.ल.मंजूळ यांची ओळख करुन घेतली. ज्योतिषावरील संदर्भ शोधताना कॆट्लॊग उघडला.पुन्हा त्याच अडचणी आल्या. शेवटी मंजूळांनी मुक्त स्वातंत्र्य दिलं. गरज वाटेल तेव्हा कधीही या, असे सांगून ग्रंथालय व वाचक यातील दरी कमी केली.
ग्रंथालयातील कर्मचार्‍यांना ग्रंथांविषयी माहिती असणे आवश्यक आहे. एकाने म्हणे प्र.के. अत्र्यांचा 'झेंडूची फ़ुले' हा कविता संग्रह वनस्पतीशास्त्र विभागात टाकला होता.
मुंबईत नायगावातल्या एका प्रसिद्ध मराठी ग्रंथालयात जायचो.त्यावेळी ग्रंथालयातील त्या बाईच्या कपाळावर न लपवता येण्यासारखी आठी पडायची. मी एक पुस्तक वारंवार मागायचो, त्या बाई मागणीचा कागद घेउन रॆकच्या आड अदृष्य व्हायच्या आणि परत येउन 'नाही 'असं सांगायच्या. असं दोन तीन वेळा घडले. एकदा त्या बाई नव्ह्त्या, दुस-या बाईंच्या कडे पुस्तक मागितले.नसणारच असे गृहित धरले होते. पण बाईंनी लगेच काढून दिले. मीही ते लगेच स्वीकारले, उघडून बघण्याची पण गरज नव्हती. वाचून झालेवर परत करण्याचा चिकटवलेला कागद मी बघितला, तेव्हा त्यावर गेल्या दहा वर्षांचे ग्रंथालय मोजणीचे फ़क्त शिक्के होते.
प्रकाश घाटपांडे.(पुर्व प्रसिद्धी 'रुची' मे १९९७)

Comments

सहमत

आपल्या विचारांशी सहमत आहे. पुणे विद्यापीठात काही वर्षे घालवूनही जयकर ग्रंथालयातील माझ्या 'विषयाबाहेरची' पुस्तके मिळवण्यात मला कधीच यश आले नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये पुस्तकांना हात लावू दिला जात नसे. पुण्यातील एक अत्त्युत्तम ग्रंथसंग्रह असलेले ग्रंथालय अशी जयकर ग्रंथालयाची ख्याती आहे. आणि या ग्रंथालयाचा सदस्य असूनही याचा कधी च लाभ घेता आला नाही ही खंत अजून आहे.
मागे एकदा यावर चर्चा झाली होती, तेव्हा एका ग्रंथपालांनी त्यांची बाजू मांडली होती. मनुष्यबळाची कमी, पुस्तकांच्या पुरेश्या प्रती उपलब्ध नसणे वगैरे. यात बरेचसे तथ्यही आहे. पण प्राप्त परिस्थितीमध्येदेखील निरुपयोगी नियम शिथील केले तर वाचकांना नक्कीच फायदा होईल.
याउलट अनुभव आला पुण्याच्या ब्रिटीश ग्रंथालयात. ग्रंथालयातील हवे ते पुस्तक, हवा तितका वेळ चाळण्याचा आनंद पहिल्यांदा इथे लुटता आला.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

पुण्यातील

पुण्यातील मराठी पुस्तकांच्या कोणत्याही ग्रंथालयामध्ये हीच परिस्थिती आहे.

आमच्या गावाच्या ग्रामपंचायतीच्या वाचनालयामध्ये कोणालाही मुक्त संचार होता. कोणतेही पुस्तक हाताळायला मिळायचे. त्या निमित्ताने बर्‍याच पुस्तकांवरील धूळही साफ होऊन ग्रंथपाल साहेबांचे काम कमी होत असे. शिवाय विद्यार्थी असल्यास एप्रिल मे महिन्याच्या सुट्टीत पूर्ण दिवस वाचनालयात बसून कितीही पुस्तके वाचू शकत होतो. या कालावधीत पुस्तकांची मोजणी व पुस्तके व्यवस्थित लावणे या कामात ग्रंथपाल साहेबांना शक्य तशी मदत करावी लागे. नवशिक्या वाचकांना पुस्तके रेकमेंड करणे व त्याचा १/३ सारांश अर्धा कप चहासोबत सांगणे हा ग्रंथपाल साहेबांचा छंद.

नवी आलेली पुस्तके मात्र ग्रंथपाल साहेबांची वाचून झाल्याशिवाय सामान्य वाचकांसाठी उपलब्ध होत नसत एवढा एकच मुद्दा त्रासदायक होता.

पुण्यात आल्यावर सदाशिव पेठेतील एका सरकारी ग्रंथालयामध्ये सदस्य होण्यासाठी गेलो असता माझे आडनाव विचारुन नंतर "आम्ही अमर्याद काळासाठी सदस्यनोंदणी बंद केली आहे." असे उत्तर ऐकवले होते. लक्ष्मी रस्त्यावरील एका वाचनालयात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सदस्य न करुन घेण्याचे वाचनालयाचे धोरण आहे हे वाक्य कारण म्हणून सांगितले.

तेव्हापासून पुण्यात पुस्तक विकत घेऊन वाचणे हे कमी अपमानास्पद आहे हे जाणवले. पुण्यातील ग्रंथपालांनी केलेल्या अपमानापेक्षा दुकानदारांनी केलेला अपमान जास्त सुसह्य व कमी बोचणारा असतो.येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

पटले


तेव्हापासून पुण्यात पुस्तक विकत घेऊन वाचणे हे कमी अपमानास्पद आहे हे जाणवले.


पटले. पण किती पुस्तकं विकत घेउन वाचणार? इतिहासाचार्य राजवाडे यांच्या स्वप्नातील ग्रंथालय हे शनिवार वाड्यापासून ते कोतवाल् चावडीपर्यंत होते.
प्रकाश घाटपांडे

नमस्कार

जयकर ग्रंथालयात माझी सुद्धा राजेंद्र यांच्या अनुभवासारखिच थोडिफार स्थिती.

पुणे मराठी ग्रंथालयात मात्र वगणूक अतिशय चांगली मिळाली. पुस्तक उशीराने परत दिल्यावर वगैरे सुद्धा ते लोक सामंजस्याने वागवतात.

--लिखाळ.

परदेशात भारतीयांनी एकमेकांकडे पाहून स्मितहास्य करावे असे मला वाटते.

भाग्यवान दिसता


पुणे मराठी ग्रंथालयात मात्र वगणूक अतिशय चांगली मिळाली. पुस्तक उशीराने परत दिल्यावर वगैरे सुद्धा ते लोक सामंजस्याने वागवतात.


भाग्यवान दिसता. वरील अनुभवात पुणे मराठी ग्रंथालय पण आहे. वाचन हा वाचकांचा हक्क् नसून ग्रंथालयाने तुम्हाला दिलेली सवलत वा सुविधा आहे. हे मला तिथे प्रकर्षाने जाणवले.
प्रकाश घाटपांडे

बरी परिस्थिती..

ठाण्याच्या १०० वर्षांहून जुन्या असलेल्या 'ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाची' परिस्थिती त्या मानाने खूप बरी आहे असे म्हणायला हवे!

आपला,
('ग्रंथालय' या प्रकारावर विलक्षण श्रद्धा असलेला!) तात्या.

अगदी मान्य

ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालय (मला वाटते आपण तलावपाळी जवळचे म्हणत असाल) ते तसेच अजून् एक नगरपालीकेचेच मराठी ग्रंथ संग्रहालय टेंभी नाका का कुठेतरी - मी वापरलेली आहेत आणि तेंव्हा तरी ती खूप वापरात असायची. खूप जुनी पुस्तके असायची जी नक्कीच इतरत्र सहज मिळणार नाहीत..

विकास

इथेही बरी परिस्थिती.

औरंगाबादच्या सर्वच ग्रंथालयाचीही परिस्थिती उत्तम आहे.पाहिजे ती पुस्तके मागितल्यावर मिळणे,किंवा थांबवून दिल्या जातात याचा आनंद काही औरच असतो. पण ग्रंथाच्या देवाण घेवाणीत ग्रंथ देणा-या कर्मचा-यांच्या स्वभावावर बरंच काही अवलंबून असते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुमच्या

युयुत्सुराव,
तुमच्या युनिव्हर्सिटीच्या ग्रंथालया अनुभवा विषयीपण माहिती द्या ना...
चिकना चोपडा नि चकाचक झकपक अमेरिकन ग्रंथालय अनुभव पण चालेल ना आम्हाला वाचायला! आणी नवीनातल्या नवीन रिसर्च च्या कागदांचे संकलन कसे अद्ययावत ठेवले जाते तेही...
त्यात पण बरेच मुद्दे असणार विचार करण्या सारखे... सगळे नाही पण काही तर नक्कीच सहजतेने वापरात आणण्याजोगे... ते काय म्हणतात ते ' युझर फ्रेंडली' असतात तसे.
आणी आय आय टी ची पण सगळी ग्रंथालये जोडलेली आहेत का हो?

आपला
गुंडोपंत
~उपक्रमावर लिहायचे तर 'उपक्रम युझर फ्रेंडली' असणे आवश्यक आहे;) ~

चकाचक झकपक अमेरिकन ग्रंथालय

चिकना चोपडा नि चकाचक झकपक अमेरिकन ग्रंथालय अनुभव पण चालेल ना आम्हाला वाचायला!

खरंय त्यात वाईट काय? ;-) चांगलं ते चांगलंच ना. :)

घ्या! एक अमेरिकन अनुभव. तो अमेरिकेचा बडेजाव सांगण्यासाठी नाही तर केवळ माहितीसाठी आणि जे चांगले आहे ते इतरांना कळावे म्हणून केवळ.

आमच्या काउंटीचे सार्वजनिक वाचनालय मुंबईतल्या एखाद्या मॉलएवढे मोठे आहे आणि ते सभासदांना फुकट/ मोफत आहे. प्रत्येक सभासद सुमारे २० पुस्तके आणि १० डिविडी एकावेळेस आपल्या कार्डावर घेऊ शकतो. याशिवाय केवळ संदर्भासाठी ठेवलेली अनेक पुस्तके आहेत.

मोठ्यांच्या पुस्तकांची, तरूणांच्या पुस्तकांची, छोट्यांच्या पुस्तकांची, विडिओ कॅसेट्स, ऑडियो कॅसेट्स (ऑडियो पुस्तके), चित्रपटांच्या डिविडी (ज्यांत अनेक हिंदी चित्रपट आहेत.) यांची वेगवेगळी दालने आहेत. याखेरीज इंटरनेट वापरण्यासाठी दोन, अभ्यास करणार्‍यांसाठी खाजगी काचबंद अशी सुमारे २०, कॉन्फरन्स हॉल, मुलांना नवनवीन कला शिकवण्यासाठी दोन अशी इतर दालने आहेत. वेंडिंग मशिन्स ठेवण्यासाठी आणि तेथे बसून खाण्यासाठी ही एक छोटे दालन आहे.

आमची काऊंटी (म्हणजे परगणा ना?) ही सुविधा देण्यासाठी आम्हाला अतिरिक्त कर लावते. या ग्रंथालयात काउंटीतील एखाद्या व्यक्तीला जाऊन मदत करावीशी वाटली तर ते विनामोबदला मदत करतात. मी ही केली आहे. ग्रंथपालांचे वर्तन अतिशय अदबशीर आणि तत्पर असते. "तुम्हाला काही मदत हवी का?" असे स्वतःहून विचारले जाते. ग्रंथालयात नसलेले परंतु इतर ग्रंथालयात असलेले पुस्तक एका दिवसांत मागवले जाते. ते आले आहे हे घरी फोन करून कळवले जाते. पुस्तके ऑनलाईन मागवणे, रिन्यू करणे इ. ग्रंथालयाच्या संकेतस्थळावरून करता येते. पुस्तके ग्रंथालयात कोणत्या रॅकमध्ये आहेत हे कळण्यासाठी सुमारे १०-१२ संगणक कार्यतत्पर असतात.

ग्रंथालयात वाचनाशिवाय काऊंटीला उपयुक्त असे अनेक कार्यक्रम मोफत राबवले जातात.

युनिवर्सिटीच्या ग्रंथालयाबद्दल मात्र नाही सांगू शकत. ;-)

वेडींग मशीन :)

वेंडिंग मशिन्स ठेवण्यासाठी

वेंडिंग मधल्या वे वरचा अनुस्वार लवकर न दिसल्यामुळे थोडा घोळ झाला. :)
वेंडिंग मधल्या वे वरचा अनुस्वार लवकर न दिसल्यामुळे घोळ झाला. :)
वेंडिंग मधल्या वे वरचा अनुस्वार लवकर न दिसल्यामुळे थोडा घोळ झाला. :)
वेंडिंग मधल्या वे वरचा अनुस्वार लवकर न दिसल्यामुळे थोडा घोळ झाला. :)

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

हाहाहा!!!!

त्याला मुद्रासंकल्पनाचा* दोष असे म्हणावे लागेल.

* मुद्रासंकल्पन या शब्दाचा शोध "म" च्या प्रशासकांच्या प्रतिसादातून लागला.

स्वप्नवत्

वा! स्वप्नवत् प्रकार आहे हा. असे भारतात होईल का कधी?
आपला
(स्वप्नील) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

स्वप्नवत

इतिहासाचार्य राजवडे आज असते तर् त्यांना हे वाचूनच हर्षवायू झाला असता.

प्रकाश घाटपांडे

ऑडियो पुस्तके

ऑडियो पुस्तके मराठी मध्ये आहेत का हो?
कोणी तसा प्रयत्न केला आहे का?

आपला
अण्णा

डि़जीटल लायब्ररी

जाणकार लोक आपण विचारत आहात ती माहिती देतीलच. पण एक अजून नवी कल्पना अमेरिकेत प्रचलित होते आहे त्याबद्दल सांगावेसे वाटते:
डि़जीटल लायब्ररी अर्थात विश्वजालावर वरील संगणकीय वाचनालय (ग्रंथालय) ही एक तशी नवीन संकल्पना आहे. खालील दुवा पहा. हार्वर्ड येथील हे जगातील कोठूनही उपलब्ध असलेले वाचनालय. हार्वर्ड वाचनालय गूगलने पुस्तकांचे संगणकीय स्वरूपात बदल करायला लागण्याआधीपासूनच अमेरिकेतील अनेक विश्व विद्यालये या कामात गुंतली होती. अश्या कामातून अनेक विषयांना वाहिलेल्या माहितीची संगणकीय वाचनालये तयार झाली आहेत. संगणकीय असो किंवा नेहमीची "भौतिक", कुठच्याही वाचनालयाचा कणा म्हणजे पुस्तके.
ही पुस्तके वर्गवारी करून ठेवायची असतात - मग ती संगणकीय स्वरूपात असोत वा ग्रंथालयातील फळ्यांवर. ही वर्गवारी करण्याचे एक शास्त्र (किंवा पद्धती म्हणू हवे तर) असते. त्यात पुस्तकांबद्दलचा विदा गोळा केला जातो - जसे पुस्तकाचे लेखक, प्रकाशक, विषय. हा सर्व विदा विदागारात (database) ठेवला जातो. अर्थातच हे करीत असताना ह्या विदाचे वर्गीकरण होते. तुम्ही ग्रंथालयात जेव्हा संगणकावर एखादी संज्ञा देऊन शोध घेता तेव्हा ती संज्ञा ही अश्या "विदाबद्दलच्या विदातून" (meta data) शोधली जाते. असा विदा गोळा करणे हे काम त्यात तज्ञ व्यक्तीच करू शकतात.

अवांतर - मृदुलांच्या "दुसरे म्हणजे वाचनाचे, ज्ञान जमवण्याचे महत्व आपल्या लोकांना अजून तितके पटलेले नाही. ज्ञान म्हणजे शाळेच्या पुस्तकात मिळते ते, असा काहीसा समज आहे. त्यामुळे ग्रंथालयांची काळजी घेण्याची आच नाही. " मताशी सहमत आहे. पण बर्‍याच सामाजिक "व्यथांना" दूर करण्याची किल्ली ही शालेय शिक्षणात तसेच लोकशिक्षणात असते. ज्यांना आपल्या आजूबाजूचे काही बदलावेसे वाटते त्याने अशा बाबतीत स्वतः रस घेणे जरूरीचे आहे. प्रत्येकाने आपल्या जवळच्या लोकांना पुस्तकांचे महत्त्व समजावून देण्यासाठी जागरूक करण्यात हातभार लावला तर मोठे काम होऊ शकते. जर ग्रंथालयांना आणि ग्रंथपालांना बदलणे कठीण असले (ते आहेच) तर सुरुवात म्हणून आपल्या जवळपासच्या लहान मुलांच्या शिक्षणापासून सुरुवात केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो कारण एकवेळ मुलांना शिक्षण देणे सोपे आहे - हा एक असा दुवा पहा
मुलांमध्ये वाचनाची गोडी आणि क्षमता तयार करण्यासाठी हा दुवा पहा आणि एक अमेरिकेतही पुस्तके कशी वापरावी याचे असे शिक्षण (मोठ्यांनाही) द्यावे लागते त्याचा हा पुरावा पहा!

संगणकीय वाचनालय स्कॉलर

गुगल स्कॉलर जे काही सर्च रिझल्ट ते ते संगणकीय वाचनालय या प्रकारातूनच येते का?
या प्रोजेक्टवर बराच वाद झाला होता मागे... कॉपीराईटवरून.
अनेक लोकांनी खटले पण भरले होते गुगल वर.
पण त्यांनी तो प्रयोग रेटलाच पुढे.
मला वाटते भारतीय वाचनालयांकडे वाचकाला जगाच्या बरोबर राखु शकतील अशी पुस्तके नसतात.
पुणे विद्यापीठातल्या आणी इतर अनेक प्राध्यापकांना जगात त्यांच्या विषयात लेटेस्ट काय आहे हे माहीत नसते. जगात कॉपीराईट व इतर महत्वाच्या क्षेत्रात काय घडामोडी आहेत हे माहीत् नसते. विद्यार्थ्यांचे तर सोडा.
या सगळ्या साठी वाचनालयेच महत्वाचीच ठरतात.

उत्तरे

गुगल स्कॉलर जे काही सर्च रिझल्ट ते ते संगणकीय वाचनालय या प्रकारातूनच येते का?

नाही. गुगल स्कॉलरवर वेगवेगळ्या विषयांवरील शास्त्रशुद्ध लेखनाचे दुवे किंवा माहिती मिळते. ही माहिती एकाच ठिकाणी नसते तर त्याचे दुवे असतात. गूगल स्कॉलर कसे काम करते हे पाहण्यासाठी हा दुवा बघा. संगणकीय वाचनालयात बर्‍याचदा एकाच ठिकाणी हे सर्व ग्रंथ असतात तरीही कधीकधी जरी वरवर एकच वाटले तरी अर्थात त्यातही इतर ठिकाणचे दुवे असू शकतात. पण त्याला meta data तयार करणे अत्यावश्यक असते.

मला वाटते भारतीय वाचनालयांकडे वाचकाला जगाच्या बरोबर राखु शकतील अशी पुस्तके नसतात.
पुणे विद्यापीठातल्या आणी इतर अनेक प्राध्यापकांना जगात त्यांच्या विषयात लेटेस्ट काय आहे हे माहीत नसते. जगात कॉपीराईट व इतर महत्वाच्या क्षेत्रात काय घडामोडी आहेत हे माहीत् नसते. विद्यार्थ्यांचे तर सोडा.
या सगळ्या साठी वाचनालयेच महत्वाचीच ठरतात.

संगणकीय वाचनालयाची माहिती देण्याचा उद्देश हा अशी वाचनालये भौतिक वाचनालयांची जागा लगेच घेतील असे सुचवायचा नव्हता, तर नवीन प्रकाराची माहिती देण्याचा होता. आणि आज नाही तर उद्या संगणकीय वाचनालये महत्त्वाची ठरतील हे दिसते आहे. (घरबसल्या जर जगभरची पुस्तके केवळ ग्राहक होऊन वाचायला मिळाली तर ते कुणाला नको असेल?) ह्या प्रकाराची माहिती करून घेण्याचा आणि हे तंत्रज्ञान वापरायचा प्रयत्न जेवढे आधी आपण करू तेवढा या क्रांतीचा फायदाही आपल्याला लवकर मिळेल.

कॉपीराईट वगैरेबद्दल तुम्ही म्हणता ते खरे वाटावे अशीच परिस्थिती आहे.

आभार

माहितीपूर्ण दुवा!

डिजिटल ग्रंथालय

मी Digital Library & Information science चा ई कोर्स केला.येथे तो उपलब्ध आहे. कोर्स खूप चांगला आहे पण त्याची अंमलबजावणि मात्र् टिपिकल् शासकीय पद्ध्तीने झाली. पुण्यात इएमाआरसी मधे त्याचे सेंटर होते. content development या दृष्टिने जर् काही कोर्सेस असतील् तर् कृपया तज्ञांनी मार्गदर्शन करावे.

प्रकाश घाटपांडे

आभार

ह्या ई- कोर्सची माहिती दिल्याबद्दल आभार.

आपल्याला content development म्हणजे नक्की काय स्वरूपाची माहिती पाहिजे आहे ते समजले नाही.

कंटेंट डेवेल्पमेंट्

कच्च्या स्वरुपात असलेली माहिती चे उपयुक्त माहितीत रुपांतर्, डेटाबेस मॅनेजमेंट चा भाग. नॉलेज वर्कर या साठी उपयुक्त गोष्ट .
प्रकाश घाटपांडे

विषय

असा कुठचा कोर्स असल्याचे मला तरी माहिती नाही.
पण तरी काही प्रश्नांची उत्तरे देऊ शकते. सर्वात मुख्य आणि प्रथम करायची गोष्ट म्हणजे तुमच्या संगणकीय वाचनालयाचे ध्येय काय हे तुम्हाला ठरवावे लागेल. म्हणजे एखादा विषय, त्याचे वाचक कोण, किती इत्यादी. तसेच त्याचे काही काळानंतर एखाद्या मोठ्या संगणकीय वाचनालयाशी हे वाचनालय संलग्न होणार किंवा कसे तेही ठरवावे लागेल. म्हणजेच भविष्यातील आराखडा. हे सर्व केल्यानंतरच तुम्हाला त्याला योग्य अशी यंत्रणा ( infrastructure) उभारता येईल.

तुम्ही म्हणता कच्च्या माहितीचे उपयुक्त माहितीत भाषांतर वगैरे याला मुख्य गरज आहे ती संकलक आणि scanner वगैरेची. म्हणजे अशी माहिती योग्य त्या स्वरूपात एकत्र करता येईल. त्यानंतर अर्थातच या समस्त लेखनाचे वर्गीकरण. त्यासाठी शक्यतो रूढ पद्धतींची मदत घेतलेली बरी. वर्गीकरण कसे करावे याची माहिती येथे मिळू शकेल.

मी काही वर्षांपूर्वी (भरपूर वेळ असताना!) content management system मधून एक छोटेखानी संगणकीय वाचनालय तयार केले होते. एकदा काय करायचे हा विचार ठरला की जे तंत्रज्ञान मुबलकपणे उपलब्ध आहे त्यामुळे हे निश्चित जमू शकते.

चित्रा

एशियन ड्रामा

पुस्तके ठेवणार्‍याची काय गोष्ट सांगता युयुत्सुसाहेब? अहो, सध्या "एशियन ड्रामा" वाचतो आहे असे मी माझ्या रेझ्युमिमध्ये (मराठी?) लिहिले होते. तेव्हा अगदी "भल्याभल्यांनी" हे काय आहे ... नाटक का? असे विचारले होते...

असो... मिरडालांचे नाव वाचून बरे वाटले.

(एशिअन) एकलव्य

अहाहा! या जगात!

नाशिकच्या सावाना चे मात्र छान आहे. पुस्तके अगदी हातात मिळतात!... वाचक वाचना विषयी गंभीर आहे असे जाणवून दिल्यावर(याला महत्व आहे बरं का... :) ) पुस्तकांच्या कपाटांपर्यंत पोहोचता येते. इथे मी दिवस चे दिवस घालवले आहेत. खुपच छान अनुभव आहे.

बुकं

(घाटपांडे साहेब छान लिहिलय आपण! हा माझाही आवडता विषय आहे.)

मित्रहो (आणी मैत्रिणींनो!;) )
बुकं हातात मिळणं हे पुर्वी फार मोठी गोष्ट होती. हल्ली जरा दुर्मीळ पणा कमी होत चालला आहे. वाचनालयांचे पण संगणकीकरण करणे अत्त्यावश्यक आहे. त्यामुळे शोधशोध करणे सोपे होईल.

पुस्तकांच्या रॅक्स पर्यंत जाऊ ने देण्यामागे पुस्तकांची ढापाढाप आणी नासधुस- पाने फाडून घेणे, अश्या प्रकारचे वर्तन कारणीभूत आहे असे वाटते.
मी अनेकदा अशी पाने फाडतांना पाहिली आहे आणी हटकले/पकडले पण आहे. त्यामुळे पुस्तके ही 'आपल्या सगळ्यांची' संपत्ती आहे हा भाव समाजात जागृत होत नाहे तोवर हे घडत राहील.
यात ग्रंथालये(च) महत्वाची भुमीका बजावू शकतात.

जसे
१. नवीन सदस्यांसाठी एक नोदणीच्या वेळी वाचनालय कसे वापरावे याचे प्रशिक्षण देणे. (पण नवीन सदस्य तर पाहिजे ना त्यासाठी?)
२. आपले नियम सुकर आणी पुस्तके वापरणार्‍यांच्या दृष्टीकोनातून कसे आहेत हे तपासून पाहणे. (तेव्हढा पगार मिळतो का आम्हाला साहेब?)
३. आपली ग्रंथसंपदा केव्हढी आणी किती उपयोगी आहे याचे वेळोवेळी प्रदर्शन मांडणे. (हेच कांमं करु का आता आम्ही? आं?)
४. नियम 'का आहेत' हे सदस्यांना वारंवार समजावून देणे. (कोणी ऐकायला तर थांबले पाहिजे ना भाऊ!)
५. ग्राहकसेवेचे प्रशिक्षण सर्व ग्रंथालय सेवकांना देणे - आणी कायम देत राहणे. (यांना आधी बाहेर काढा हो!)
६. ग्रंथालय आणी वाचक वेगळे नाहीत हे व्यवस्थापनाने मान्य करणे. (हे कोण आपल्याला सांगणारे? आम्ही आमचे बघुन घेऊ!)
७. मुक्त संचार देण्यासोबत सुरक्षेचे उपाय राबवणे.
८. आपली ग्रंथ संपदा ही समाजाच्या गरजेशी निगडीत आहे आणी राहिल हे सतत पाहणे.
असो. असे अनेक उपाय करता येतील.

पण आता वाचक म्हणून मी काय काय करु शकतो?
१. ग्रंथालय हे माझेच नाही तर इतरांसाठी ही आहे याचे जाणीव ठेवणे. (मह्णून तर आयर्विंग वॅलेस च्या स्वर्गिय शैय्याची 'ती' पाने फाडून घेतो आहे ना... नाही तर इतर वाचकांची संस्कृती बुडेल ना बाबा!)
२. पुस्तके जपुन हाताळू शकतो. ग्रंथालय चालकांना हा विश्वास देऊ शकतो. (अगदी जपुनच फाडली ती पाने... कळणार पण नाही!)
३. फाटकी पाने चिकटवू शकतो.
४. ग्रंथालयाची नासधुस होणार नाही हे पाहू शकतो.
५. नियमीतपणे पुस्तके वाचू शकतो!
६. ग्रंथालयाचे नियम का व कसे हे नीट समजून घेऊन मग सदस्यत्वाचा फायदा घेऊ शकतो. (फायद्याचं...? काय म्हणाले?)
७. पुस्तके वेळेवर परत करु शकतो. (बरं बरं)

मित्र-मत्रिणींनो,
मला असे पण वाटते की व्यवस्थापनाने आपले ग्रंथालय इतर ग्रंथालयांसोबत साखळीत जोडणे आवश्यक आहे. यामुळे कोणतेही पुस्तक कुठेही परत करणे सोपे होईल, आणी इतर वाचनालयातली पुस्तके पण कोठे ही नाममात्र फी मध्ये उपलब्ध होऊ शकतील. यासाठी संगणकीकरण मोठीच मदत करु शकेल.

याशिवाय मला असा पण प्रश्न आहे की, ग्रंथालयात, पुस्तकांशिवाय व्याख्याने आणी टि. व्ही. चे रेकॉर्डेड कार्यक्रम पण का मिळू नयेत? असे किती तरी (फक्त माहितीपुर्णच?) कार्यक्रम असतात की जे हुकतात पण नंतर बघायला मिळतीलच असे नाही.

आज जे समाजाला आवडते आहे ते देण्यात काय गैर आहे?

काय वाटते आपल्याला?
आपला
(पुस्तकवेडा)
गुंडोपंत

नासधूस

पुस्तकांच्या रॅक्स पर्यंत जाऊ ने देण्यामागे पुस्तकांची ढापाढाप आणी नासधुस- पाने फाडून घेणे, अश्या प्रकारचे वर्तन कारणीभूत आहे असे वाटते.

४. ग्रंथालयाची नासधुस होणार नाही हे पाहू शकतो.

भांडारकर इंस्टिट्यूट वर जो हल्ला झाला होता, तेव्हा अशाच प्रकारची नासधूस झाली . पण ते कारण मात्र जेम्सलेन प्रकरण होते. भाडोत्री समाज कंटक आणून तो हल्ला झाला होता. एक क्वार्टर व वडापाव यांची सोय केली कि असे भाडोत्री लोक मिळतात अशी येथील सामाजिक परिस्थिती आहे. कल्याणकारी लोकशाही राज्यात (?) ही परिस्थिती तर मुघल राजवटीत तर प्राचीन हस्तलिखितांचे किती नुकसान झाले असेल कुणास ठाउक?
प्रकाश घाटपांडे

केंब्रिज

'कथा आणि व्यथा' चांगल्या उतरल्या आहेत. गुंडोपतांनी मांडलेल्या मुद्द्यांशी सहमत.
केंब्रिजच्या सार्वजनिक ग्रंथालयातील सोयी प्रियाली यांनी वर लिहिल्याप्रमाणे पण एकदम लहान प्रमाणावर आहेत. केंब्रिज छोटे गाव आहे, म्हणून. :-) पुस्तके विकत घ्यायची असली तर स्वस्त असतात. पुस्तकांच्या दुकानात तासंतास बसून ती वाचता येतात. तसेच वाचनालयातून फुकट घरी घेऊन जाता येतात. त्यामुळे वाचनसंस्कृती खोलवर झिरपलेली आहे. सार्वजनिक वाहनाने प्रवास सर्रास, तेव्हा जवळपास सगळ्यांच्याच हातात पुस्तक असते. कित्येकदा पुस्तक मिळवण्याची किंमत एका चहाच्या कपापेक्षा कमी. भारतात ती परिस्थिती नाही. त्यामुळे पुस्तकाची पाने लांबवण्यासारख्या घटना नेहमीच्याच. दुसरे म्हणजे वाचनाचे, ज्ञान जमवण्याचे महत्व आपल्या लोकांना अजून तितके पटलेले नाही. ज्ञान म्हणजे शाळेच्या पुस्तकात मिळते ते, असा काहीसा समज आहे. त्यामुळे ग्रंथालयांची काळजी घेण्याची आच नाही.

चांगला विषय...

... सुंदरपणे मांडला आहे. धन्यवाद!

अमेरिकेतील मला आवडलेल्या काही उत्तम संस्थांपैकी "वाचनलयां"चा क्रमांक खूपच वरचा आहे. येथे तासनतास आपण प्रसन्नपणे घालवू शकतो. गजबजलेले आणि तरीही शांत असे हे स्थळ असते.
अमेरिकेमध्ये प्रियालीताईंनी सांगितल्याप्रमाणे वाचनालये प्रत्येक गावात आहेत. पुस्तके एकावेळी २० ते ५० च्या दरम्यान मिळू शकतात.
वाचनालयाचे ओळखपत्र विसरले असेल तरीही नाव आणि दूरध्वनीक्रमांक सांगितल्यास भागते.
बर्‍याचदा एकापेक्षा जास्तही वाचनालये गावात असतात. गुंड्याभाऊंनी जी साखळीची सूचना केली आहे ती या वाचनालयांमध्ये प्रत्यक्षात अस्तित्वात असते. एका ठिकाणाहून घेतलेले पुस्तक/ ध्वनीफित/ चित्रफित वाचक दुसरीकडे परत करू शकतो.
दूरध्वनी किंवा संकेतस्थळावरून पुस्तकांची मुदत वाढविता येते, किंवा पुस्तक उपलब्ध असल्यास राखून ठेवण्याची सूचना करता येऊ शकते.

भारतातही माझ्या सुदैवाने माझा ग्रंथालयांचा आणि ग्रंथपालांचा अनुभव अतिशय रम्य असाच आहे. अगदी लहानपणी इचलकरंजीस आजोळी जात असे. तेव्हा तेथील राजवाडा वाचनालयांत अगदी अमेरिकन वाचनालयांत मिळतात तश्याच (काळाच्या आणि परिस्थितीचा फायदा दिल्यास) सोयी होत्या. भरपूर दिवाळी अंक, मासिके, वर्तमानपत्रे वाचावयास मिळत असे.

काही चरित्रे वाचनासाठी आमच्या शाळेतील शिक्षकांनी ज्ञानप्रबोधिनीच्या ग्रंथालयास भेट देऊन तेथे चौकशी करण्यास सांगितले होते. धनंजय कीरांपासून ते प्रशालेतील मुलांच्या निबंधांपर्यंत सारे आम्हाला उपलब्ध करून दिलेले आठवते. पुणे विद्यापीठाचा माझा अनुभवही रोमॅन्टिक आहे. बीसीएल् ही छानच! पुणे मराठी ग्रंथालयात शाळाकाळात एकदाच गेलो होतो... पण तेथे पुस्तके कशी शोधायची याचाच पत्ता लागला नाही.

अनुभव

आमच्या कोपर्‍यावरील छोटे ग्रंथालय चांगले आहे. साठा सध्या मर्यादित असला तरी वाढतो आहे. आणि पुस्तके हाताळायला मिळतात.
मागे एकदा पिवळेपणाच्या संदर्भात एका गायिकेच्या रुग्णालयात मध्ये थोडा असाच अनुभव आला होता. बंद कपाटातली पुस्तके बघून (ती न चाळता) हवे ते पुस्तक सांगून ते घेणे हा मार्ग होता. अर्थात रुग्णालयात पुस्तके वाचणे हा 'प्रायोरीटी जॉब' नसल्याने जास्त काही वाटले नाही.
क्रॉस वर्ड मध्ये पुस्तके चाळायला मिळतात हे चांगले. पण मराठीत विशेष निवडीला वाव नसतो तिथे.
योगेश यांचे म्हणणे पटते. पुस्तके विकत घेणे हा कमी अपमानकारक मार्ग आहे.

मला वाटते

पुण्यात पुस्तक विकत घेऊन वाचणे हे कमी अपमानास्पद आहे

एकंरीत पुणेकर अपमान करण्यात EXPERT आहेत (कदाचित)

सेवा ही वृत्ती म्हणून यावी....मग क्षेत्र कुठलेही असो.......

सेवा ही वृत्ती म्हणून यावी....मग क्षेत्र कुठलेही असो.......

सेवा ही वृत्ती म्हणून यावी.......मग क्षेत्र कुठलेही असो.......

लेख वाचला. बरोब्बर लिहिलय तुम्ही. मी फारसा जास्त आपल्या गावातल्या म्हणजे बेल्ह्याच्या लायब्ररी मधे गेलो नाही. पण वहिनी जाते, त्यावेळेस असेच काही अनुभव सांगते. खरे तर वाचनाचे संस्कार हे लहान वयापासूनच व्ह्ययला हवेत. शाळेत असताना कोणीही ग्रंथालयाबद्दलची जाणीवपुर्वक खरी ओळख करुन दिली नाही. ग्रंथपाल हा तर ह्या संस्कार मंदिराचा पुजारी, त्याने असे कायम शंकीत पहारेकरी होऊ नये.

सेवा ही वृत्ती म्हणून यावी.......मग क्षेत्र कुठलेही असो.......त्याला अधिकाराचा किंवा औपचारिकतेचा नको तेवढा संसर्ग नको. असे झाले तर आजीबाई खिडकी बंद करा... कानाला वारा लागत नाही का? असे म्हनणारा कंडक्टर, साब चाय ठंडी हो जायेगी असे अदबिने म्हनणरा वेटर, किति दग-दग करता शामराव ह्या वयात... असे बोलून छातीला स्टेथो लावणारा डॉक्टर, हे सेवा देताना अजून सुंदर दिसतील. वाईट बातमीची तार आणि नोकरी लागल्याचे पत्र त्याच निर्विकार चेहरयाने देणारा पोस्ट-मन कसा वाटेल?

खुपच छान!!!!!!!!

घाटपांडे साहेब
पूस्तकाची आवड असुन सुद्धा ज्याना तुम्ही सांगितल्याप्रमाणे अडचणीवर मात करुन ग्रंथालयातून पुस्तक मिळवताना जी कसरत करावी लागते ती तुम्ही अगदि अचुक सांगितली आहे.
त्यामुळे कित्येकजण पुस्तक ग्रंथालयातून आणुन वाचण्याची तसदी घेत नाहीत
ले़ख आवडला.

ग्रंथपाल

मोहन पाठक

ग्रंथालयात् ग्रंथपाल म्हणून काम करण्यात आयुष्य संपले.
वाचकांचेही प्रकार असतात. अमेरिकेचेच नव्हे अनेक देशांचे उदाहरण देता येइल. तितके सजग वाचक आणि चांगली वाचनसंस्कृती
आपल्याकडे नाही, तसेच सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचारीही अनेक कारणांमुळे उदासीन आहेत.
प्रा. मोहन पाठक.

उत्कृष्ट लेख

उत्कृष्ट लेख व प्रतिसाद. उकरून काढावासा वाटला म्हणून काढला.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर