सामुदायीक प्रभाव (कॉमन इंपॅक्ट)

सामाजीक उद्यमशीलता या सदरात मोडणारा सामाजीक गुंतवणूक म्हणून एक लेख लिहीला पण चुकून तो चर्चेत टाकला. त्यात संदर्भ दिलेला पुढचा भाग येथे सांगतो. हा लेख मोठा करण्याची इच्छा नाही. असे अनेक भेटलेल्या संस्था आणि त्यांच्या विविध कल्पना उपक्रमींपर्यंत पोचवण्याची प्रामाणिक इच्छा आहे. जे जे आपणासी ठावे । ते ते इतरांसी सांगावे...इतकाच काय तो उद्देश. यात केवळ भारतीय संस्थांसंदर्भात सांगण्याची इच्छा नाही तर अमेरिकन संस्थांसंदर्भात पण लिहायचा प्रयत्न करेन. एक राहून राहून जाणवलेली गोष्ट - अमेरिकन सामान्य माणूस हा दान देण्यासंदर्भात जास्त सढळ असतो. कदाचीत ते चर्च सिस्टीममुळे (सेवा) आले असावे असे वाटते. फक्त त्यात आता अमेरिकन पद्धतीने एक हळू हळू "सिस्टीम" तयार होत आहे. त्या सिस्टीमचा शोध घेणारा हा प्रवास आहे. ह्यात कृपया आपण ही कुठे काही पहात असाल तर जरूर स्वतंत्र लेख लिहा अथवा किमान प्रतिसादात संदर्भ सांगा ही विनंती

"गिव्हींग स्मार्ट - गेटींग इंपॅक्ट" या शिर्षकाखाली एक परीसंवाद The Indus Entrepreneurs - TIE च्या कार्यक्रमात जीम मॅथेसन नावाचे एक व्हेन्चर कॅपिटॅलीस्ट आले होते. बरीच वर्षे नौदलात काम केल्यावर नंतर ते खाजगी क्षेत्रात वळले आणि कालांतराने व्हेंचर कॅपिटल अर्थात उद्यमशील व्यक्तींच्या नफा होऊ शकणार्‍या खाजगी उद्योगांना चालना देण्यासाठी आर्थीक गुंतवणूकीत ते शिरले. पण त्याच बरोबर त्यांना आणि त्यांच्या पत्नीस सामाजीक काम करायची ओढ होती. त्यामुळे सेंटर फॉर वूमन अँण्ड एंटरप्राईज नावाच्या संस्थेत ते मदत करू लागले. त्याच बरोबर दुसर्‍या एका संस्थेशी त्यांचा संबंध आला. त्याचे नाव आहे - "कॉमन इंपॅक्ट".

कॉमन इंपॅक्ट संघटनेत अनेक मान्यवर कंपन्या सहभागी आहेत. उ.दा. सिस्को, स्टेट स्ट्रीट बँक, फिडेलीटी, इत्यादी. कॉमन इंपॅक्ट अशा विनानफातत्वावरील अथव बिनसरकारी (नॉन प्रॉफिट/एनजीओ) संस्थांबरोबर काम चालू करते ज्यांना व्यवस्थापन कौशल्यासंदर्भात मदत केल्यास त्या त्यांच्या ध्येयात यशस्वी होऊ शकतील. बर्‍याचदा अशा संघटनांचे उद्देश चांगले असतात, स्वतःच्या कामासंदर्भात काय करावे लागणार आहे याची चांगली जाणीव असते, सेवाभावी /स्वप्नाळू माणसांचा एखादा चांगला गट ही भरपूर काम करायला तयार असतो. पण जेंव्हा व्यावहारीक पातळीवर काम करायची वेळ येते, तेंव्हा गणित चुकत जाते. कधी पैसा कमी असतो तर कधी असला तरी त्याचे व्यवस्थापन जमत नाही. तेच कार्यक्रम पूर्तीच्यासंदर्भात होऊ शकते. त्याचे मुख्य कारण असे असते की संगणक, माहीती तंत्रज्ञान, मार्केटींग, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि एकंदरीतच व्यवस्थापनशास्त्रातील माहीतीचा अभाव. कॉमन इंपॅक्ट ने मोठ मोठ्या कंपन्यांना त्यांच्या सामाजीक बांधिलकीच्या (हा अजून एक वेगळा विषय आहे) उद्दीष्टांसाठी संपर्क करून संबंध प्रस्थापित केले. या कंपन्या स्वतःच्या ज्या कर्मचार्‍यांना असे सेवाभावी काम करण्याची इच्छा असते त्यांचा गट तयार करतात. कॉमन इंपॅक्ट मग सेवाभावी संस्था आणि स्वयंसेवक (व्हॉलेंटीयर्स) यांचा विशिष्ठ कामासाठी संपर्क करून देते. त्या कामाने सेवाभावीसंस्थेच्या कार्यात आणि मिळणार्‍या यशात चांगला फरक पडण्याची शक्यता असते.

अशा प्रकारे कॉमन इंपॅक्ट ने अनेक सेवाभावी संस्थांचे आणि खाजगी उद्योगांचे एकत्र कार्यक्रम राबवून कुठल्यान् कुठल्या सामाजीक कार्यात सामुदायीक प्रभाव पाडता येऊ शकतो हे दाखवून दिले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक कामात (प्रोजेक्ट) गुंतवलेल्या एका डॉलर मागे ते ७ डॉलर समाजात परत करतात. प्रत्येक कर्यपूर्तीनंतर त्याच्याशी निगडीत असलेल्या सेवाभावी संस्थांना $२०,००० ते $४०,००० पर्यंतचा फायदा होतो आणि दूरगामी स्वावलंबित्व पण प्राप्त होते.

लेखनविषय: दुवे:

Comments

उद्योजक हा नागरिक

"कॉर्पोरेट सिटिझनशिप" असे शब्द ऐकले की बहुधा आपल्या मनात उद्योगसमूहांनी केलेला देणग्या येतात.

पण वर उल्लेख केल्याप्रमाणे त्याच्याबरोबर व्यवस्थापनशास्त्राचे ज्ञान देणे हे फार चांगले.

कॉमन इंपॅक्टबद्दल माहिती वाचायला आवडली.

पैसा, कौशल्य, व्यवस्थापन

पैसा + कौशल्य + व्यवस्थापन [नियोजन व अंमलबजावणी] यांची सर्वांची योग्य सांगड घातल्याशिवाय वर उल्लेख केल्याप्रमाणे दूरगामी स्वावलंबित्व अवघड आहे.

केवळ पैसा नाही तर व्यवस्थापनातुन मदत हा देखील तितकाच महत्वाचा भाग हे पटते. कॉमनइंपॅक्ट डॉट ओर्ग संस्थेच्या माहीती बद्दल धन्यवाद.

भारत [महाराष्ट्र] व अफ्रिकेत काम करत असलेल्या वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाची माहीती वाचायला आवडेल.

माहिती आवडली.

कॉमनइंपॅक्ट डॉट ओर्ग संस्थेच्या माहीती बद्दल धन्यवाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारतात ?

बहुसंख्य सेवाभावी संस्थांना पैसा आणि व्यवस्थापन ह्या दोन्ही गोष्टींची गरज असते. ह्यापैकी पैसा देणार्‍या आस्थापनांबाबत ऐकले / वाचले होते. पण व्यवस्थापकीय कौशल्याच्या दानाबद्दल कल्पना नव्हती.

भारतात असे काही घडते आहे काय?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

कल्पना नाही

पण व्यवस्थापकीय कौशल्याच्या दानाबद्दल कल्पना नव्हती. भारतात असे काही घडते आहे काय?

भारतात सामाजीक उद्यमशीलता येत आहे पण खाजगी व्यवस्थापनाकडुन कौशल्याचे दान होत असलेले ऐकलेले नाही. पण सामाजीक उद्यमशील व्यक्ती /संस्था ऐकल्या/पाहील्या आहेत. त्यावर पुढे लिहीन.

 
^ वर