सामाजीक गुंतवणूक

मधे "गिव्हींग स्मार्ट - गेटींग इंपॅक्ट" या शिर्षकाखाली एक परीसंवाद The Indus Entrepreneurs - TIE च्या कार्यक्रमात होता. गेले अडीच वर्षे चालू असलेल्या Social Entrepreneurs Special Interest Group तर्फे हा कार्यक्रम होता. संपूर्ण सभागृह भरलेले होते आणि लोकं उभे राहून पण ऐकत होती. भारतीय आणि अभारतीय अशी सर्वच माणसे त्यात होती. त्यातही विशेष करून अभारतीय जास्त होती. यात तीन वक्ते होते. त्यातील पहील्या वक्त्यापासून सामाजीक उद्यमशीलतेबद्दल लिहायला सुरवात करतो. सर्वप्रथम - हा लेख माहीती म्हणून आहे, कुणाची व्यक्ती/संस्था यांची जाहीरात म्हणून नाही.

TIE च्या स्थापनेत ज्यांचा सहभाग होता असे गुरूराज अथवा देश देशपांडे हे ते वक्ते होते. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी - देश देशपांडे हे अतिशय हसरे आणि जमिनीवर पाय ठेवून चालणारे व्यक्तीमत्व आहे. त्यांच्या भाषणात त्यांनी सांगीतल्या प्रमाणे, १९७१-७२ मधे ते कर्नाटकातून अमेरिकेत आले. ९०च्या दशकात नवीन कंपन्या काढल्या. सिकॅमोर नेटवर्क्स मुळे त्यांचे खूपच नाव झाले . पुढे प्रथितयश आणि पैसा यामुळे त्यांनी स्वतः नवीन उद्योग सुरू करण्या ऐवजी नवीन उमद्यांना तयार करायला सुरवात केली. त्याच सुमारास त्यांन मॅसॅच्यूसेटस ईन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या व्यवस्थापन मंडळात नेमले गेले. तेथे त्यांनी उद्यमशीलता वाढवण्यासाठी म्हणून मोठी देणगी देऊन देशपांडे रिसर्च सेंटर स्थापले. पुढे सामाजीक उद्यमशीलतेबद्द्ल जसजसे समजू लागले तसे त्यांना वाटले की भारतात या संदर्भात काहीतरी केले पाहीजे. म्हणून देशपांडे फाउंडेशनमार्फत त्यांच्या हुबळी या गावापाशी एक भाग नक्की करून तेथे सामाजीक उद्यमशीलतेने चालू केलेल्या स्वयंसेवी संस्था तयार करण्याला, त्यांना "टेस्ट बेड" (अथवा सँडबॉक्स) आणि अनुदान दिले. फक्त फरक असा की या संस्थांनी विना नफा तत्वावर असले तरी एखाद्या "प्रोफेशनल बिझिनेस" प्रमाणे स्वतःचे काम चालवायचे - त्यातून पैसा, उद्योग, काहीतरी खूप समाजोपयोगी असे कमाल/किमान यश मिळवायचेच.

त्यातूनच एक संस्था पुढे आली - तिचे नाव आहे अक्षयपात्र. भारतात का कर्नाटकात मला आठवत नाही पण असा नियम आहे की शाळेत मधल्यावेळचे खाणे/आहार मुलांना फुकट मिळाला पाहीजे. पण सरकारला ते करणे जमत नव्हते. अक्षयपात्र या संस्थेने तो भाग सहजसाध्य केला पण व्यवस्थापन तयार करून. त्यातून आज जवळ ८ लाख मुलांना जेवण मिळण्याची सोय झाली आणि हा प्रकल्प आणि त्याचे धंद्याचे गणित हे यशस्वी ठरल्यामुळे तो इतरत्र पण राबवला जाण्याचे प्रयत्न चालू झाले आहेत. देशपांड्यांनी सांगीतल्या प्रमाणे युएस काँग्रेसला ह्या प्रकल्पाची माहीती समजल्याने त्यांनी काही प्रतिनिधी ते पहायला पाठवले होते.

ह्या कार्यक्रमातील इतर वक्त्यांबद्दल् आणि त्यांच्या संघटनांबद्द्ल दोन्ही अमेरिकन संस्था - कॉमन इंपॅक्ट आणि सॅफ्रन सर्कल (हा आशियाई/चिनी प्रकल्प आहे - हिंदूत्वावाद्यांचा नाही!) नंतरच्या लेखात लिहीन. पण या कार्यक्रमात एक मुलगी आली होती जिची बहीण आमच्या समितीच्या बैठकीत येऊन त्याबद्दल बोलली होती त्याबद्दल थोडक्यात - ह्या मुली हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या आहेत. एमबीए करताना भारतात गेल्या. उत्तरभारतात त्यांनी पाहीले की शिक्षणाचे हाल आहेत. मग हार्वर्डच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने त्यांनी पैसा गोळा करून एक खाजगी शाळा आणि शिक्षण पद्धती चालू केली आणि तसे काम वाढवायचा प्रयत्न आजही चालू आहे. असे अनेक, अनेक ठिकाणी आहेत.

आज जवळ जवळ चार अब्ज लोक हे कुठल्यान् कुठल्या प्राथमिक गोष्टीसाठी वंचीत आहेत - अन्न, शिक्षण, पाणि, रोजगार/संपत्ती, पर्यावरण इत्यादी. अनेक लोकं यात मन लावून कामे करत आहेत. काही चळवळे असतात तर बरेचसे हे केवळ सामजीक बांधिलकी म्हणून काहीना काही करू इच्छितात. येथे प्रतिसादात थोडक्यात अथवा त्याहूनही उत्तम म्हणजे या समुदायात वेगळे लेख लिहून आपण आपले अनुभव / माहीती येथे वाटावी ही विनंती.

लेखनविषय: दुवे:

Comments

गुरुराज

माझा सीआयडी मधील मित्र प्रदीप देसाई हा बेळगाव भागातील आहे. त्याने मला याबाबत माहिती दिली होती. मदतीचे आरक्षण असा एक गप्पात विषय चालला होता. त्यावेळी जात धर्म पंथ निरपेक्ष मदत योग्य त्या ठिकाणी प्रत्यक्ष पोहोचवणे व हे काम कुठलाही गाजावाजा न करता करत राहणे हे देशपांडे करत आले आहेत. हा केवळ "फिलॉन्थ्रॉपिकल अप्रोच" नसून अस्वस्थतेतुन आलेली सामाजिक संवेदना आहे.
गुरुराज तथा देश देशपांड्याना अभिवादन.
प्रकाश घाटपांडे

चांगला विषय

त्यातून आज जवळ ८ लाख मुलांना जेवण मिळण्याची सोय झाली आणि हा प्रकल्प आणि त्याचे धंद्याचे गणित हे यशस्वी ठरल्यामुळे
या "यशस्वी गणीता" विषयी अजुन माहीती मिळाली तर बरे होईल. असे सस्टेनेबल [शाश्वत??] कार्यक्रम कसे करतात. मागे एकदा वाचले होते की महाराष्ट्रात एका आदीवासी जिल्हात अशाच होतकरु तरुणांना एकत्र करुन टॉमॅटो पासुन केचप इ. तयार करुन शहरात विकायचा प्रकल्प पुढे हळुहळु दर्जा, उत्पादन, विक्रीजाळे इ. व्यावसायीक गणीत न जमल्याने आता बंद पडायच्या मागावर होता. आपल्याकडे अनेक प्रकल्प जसे तुती/रेशीम, मख्खीपालन/मध, लोकर/कंबळ, प्रदेशानुसार विविध क्षेत्रातील व्यवसाय प्रकल्प आहेत तसेच माझ्या मते ह्या सगळ्यांसाठी महाराष्ट्र सरकारचे कुठले ना कुठले खाते, महामंडळ आहे. हेच मॉडेल घेऊन [जसे शाळेत जेवण हा भारतभर चाललेला सरकारी प्रकल्प आहे त्यात भलेबुरे सर्व प्रकार घडत असणार व वर उल्लेख केलेला तसाच व "यशस्वी" प्रकल्प] तसेच प्रकल्प सेवाभावी संस्थांनी जर का व्यावसायीक व्यवस्थापन करुन अजुन यशस्वी केले तर नक्कीच लवकर फायदा दिसुन येईल.

"स्वयंपुर्ण खेडे" यावर खरोखर अजुन संशोधन व प्रकल्प झाले पाहीजेत.

बाकी मोफत जेवण वरुन गोंदवलेकरमहाराज यांचे [श्री. बेलसरे यांनी लिहलेले] चरित्र वाचुन त्यांनी जमीन, गोधन याचा योग्य वापर करुन तेथील गरीब जनतेच्या जीवनात एक स्थैर्य आणल्याचे आठवते.

चांगला विषय आहे. पुढचा भाग वाचायची उत्सुकता!

गोंदवले

बाकी मोफत जेवण वरुन गोंदवलेकरमहाराज यांचे [श्री. बेलसरे यांनी लिहलेले] चरित्र वाचुन त्यांनी जमीन, गोधन याचा योग्य वापर करुन तेथील गरीब जनतेच्या जीवनात एक स्थैर्य आणल्याचे आठवते.

हा भाग मला माहीत नव्हता. पण गोंदवल्याला अनेकवेळेस गेलो आहे. तेथे कायम मोफत जेवण (प्रसाद) दिले जाते (जातो) . एकदा उत्सवात गेलो होतो. पाच एक हजार माणसे दिसली. घरच्यांना म्हणले की कदाचीत वेळेवर मिळणार नाही अथवा तितक्या लोकांचे असेल का ते कळायला मार्ग नाही. पण कुठेही चेंगराचेंगरी नाही, मधे घुसणे नाही, आणि कडक व्यवस्था. किती वाजले ते कळायच्या आत पंगतीत बसायला आणि व्यवस्थित खायला मिळाले. नंतर एकदा तेथील व्यक्तीकडून समजल्याप्रमाणे ९ कुकर्स (मला वाटते सौर उर्जेवरील) त्यांच्या कडे आहेत. प्रत्येक कुकरची क्षमत ही एकावेळेस १ पोतं तांदूळ भातासाठी लावण्याची आहे. ते कधी कुठे धान्य / भाज्या मागायला जात नाहीत पण पुरले नाही असे कधी होत नाही (कारण लोकं सातत्याने आणून देतात).

चांगला लेख | वर्ल्ड चॅलेंज

लेख चांगला आहे. देशपांडे फाउंडेशन बद्दल वाचून चांगले वाटले. त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल सविस्तर वाचायला आवडेल.

असे सामाजिक उद्योगाशी संबंधित प्रक्रल्पांना प्रोत्साहित करून त्यांना पुरस्कार देण्याचा उपक्रम बीबीसी ('शेल' च्या साहाय्याने) चालवते. http://www.theworldchallenge.co.uk हे त्यांचे संकेतस्थळ. २००८ साठीची नामांकने देण्याचे काम अजून सुरू आहे. गेल्या वर्षांतील नामांकने पाहता येतील.

 
^ वर